या भागात आपण कृष्णमुर्ती पद्धतीने आहुजा अंकलच्या प्रश्नाचे काय व कसे उत्तर मिळते ते पाहू.

आहुजा अंकलनी दिलेल्या ‘70’ ह्या होरारी क्रमांका वरुन बनवलेली प्रश्न कुंडली शेजारी दिली आहे.

 

 

प्रश्नकुंडलीचा तपशील:

दिनांक: 12 जानेवारी 2014 , रवीवार वेळ: 12:19:04

स्थळ: देवळाली कॅंप, नाशीक

होरारी क्रमांक : 70

अयनांश: न्यू के.पी.  23:57:46

सॉफ्ट्वेअर:  KPStar One.

 

चंद्र जातकाच्या मनातला भाव (विचार) दाखवतो !

प्रश्नशास्त्रात चंद्राला कमालीचे महत्व आहे हे वेगळे सांगायला नको, के.पी. होरारीत सर्व प्रथम चंद्र तपासतात, चंद्र प्रश्नाचा रोख बरोबर दाखवत नसेल तर एकतर जातकाने प्रश्न मनापासून , कळकळीने विचारलेला नाही अशी शंका घेता येते किंवा तो प्रश्न विचारायची ही योग्य वेळ नाही असाही अर्थ काढता येतो. अशा परिस्थितीत ती प्रश्नकुंडली वापरु नये. पण हे केवळ अर्ध सत्य आहे. त्याबद्दल एक महत्वाचा खुलासा करणे आवश्यक आहे.

‘जेव्हा जातक प्रश्न विचारतो त्याच वेळेची प्रश्नकुंडली मांडली तर त्या वेळेचा चंद्र जातकाच्या मनातले विचार अचुक दाखवतो. बर्‍याच वेळा जातक प्रश्न विचारतो त्यावेळी ज्योतिर्विद दुसर्‍या कामात व्यस्त असतो, लगेच प्रश्नकुंडली मांडण्याच्या स्थितीत नसतो. अशा वेळी नंतर सवडीने प्रश्नकुंडली मांडली जाते व उत्तर दिले जाते. पण प्रश्न विचारण्याची व प्रश्नकुंडली मांडण्याची वेळ भिन्न असल्याने त्या दुसर्‍या वेळेच्या प्रश्नकुंडलीतला चंद्र जातकाच्या मनातले भाव / विचार बरोबर दाखवेलच असे नाही त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणे चुकीचे ठरेल. तेव्हा लक्षात ठेवा जर तुम्ही जातकने प्रश्न विचारल्या क्षणीच प्रश्नकुंडली मांडली तर आणि तरच चंद्र तपासा अन्यथा सरळ प्रश्नाच्या संदर्भातील प्रमुख भावाच्या सबलॉर्ड पासून सुरवात करा.’

आताच्या या केस मध्ये आहुजा अंकल माझ्या समोरच बसले होते आणि त्याच क्षणाची प्रश्नकुंडली असल्याने आपण चंद्राची स्थिती प्रथम तपासायला हरकत नाही , नाही ती तपासलीच पाहीजे.

अंकलनी विचारलेला प्रश्न वास्तू खरेदी संदर्भातला आहे. वास्तू खरेदी साठी आपल्याला पत्रिकेतल्या ह्या भावांचा प्राधान्याने विचार करावा लागतो

वास्तु खरेदीचा व्यवहार सामान्यत: दोन व्यक्तींत होतो. जातक पत्रिकेतल्या प्रथम (1) भावावरुन बघतात तर ज्याच्याशी व्यवहार होणार ती व्यक्ती म्हणजे सप्तम स्थानावरुन पाहतात (7).  व्ययस्थान (12) हे जातकाचा खर्च दाखवते. तर अष्टम स्थान हे सप्तमाचे धनस्थान असल्याने त्यावरुन दुसर्‍या पार्टीला होणारा लाभ कळेल. जातक वास्तु विकत घेणार आहे जी विक्रेत्याच्या मालकीची आहे , विकेता सप्तमा (7) वरुन बघत असल्याने , सप्तमाचे चतुर्थ (4) हे त्या विकेत्याची वास्तु (जी जातक विकत घेऊ इच्छीतो आहे) म्हणजे दशम स्थान (10). आता दशम स्थान हे विक्रीचा विषय असलेली वस्तू असल्याने , दशमाचे व्ययस्थान नवम स्थान (9) हे विक्रेत्याने त्या वस्तू चा ताबा सोडणे दाखवते. पत्रिकेतले धनस्थान (2) हे प्रश्नकर्त्याचा पैसा दाखवते , षष्ठ्म स्थान (6) हे प्रश्नकर्त्याने वास्तु खरेदीसाठी घेतलेले कर्ज दाखवते.

4: जातकाचे घर (सध्या वास्तव्य करत असेलेले भाड्याचे असो वा मालकीचे , तसेच आगामी काळातल्या वास्तूयोगा साठी ही हेच चतुर्थ स्थान वापरायचे)

12: वास्तू खरेदी म्हणजे खर्च आलाच तेव्हा व्ययस्थान महत्वाचे.

11: लाभ स्थान इच्छा पूर्तीचे.

या शिवाय आणखी काही भावांचा विचार करणे अगत्याचे असते. 9: खरेदी केलेल्या वास्तूचा निर्वेध , खुला ताबा मिळणे. 3: जातकाने घर बदलणे , म्हणजेच खरेदी केलेया घरात रहायला जाणे, तसेच खरेदी ची कागदपत्रे, करार मदार करणे इ.

जर जातक  जागा खरेदी साठी कर्ज घेणार असेल तर 6 व 2 ही स्थाने पण विचारात घ्यावी लागतात.

यात चतुर्थ भाव (4) हा मुख्य (Principle) भाव मानला जातो.

चला तर पाहूया , आहुजा अंकल ना वास्तू मिळते का नाही ते !

 

 

 

 

 

चंद्र: लाभात (11), चंद्राची कर्क राशी लग्न स्थानी (1), चंद्र स्वत:च नक्षत्रात म्हणजे परत 11 व 1 चे कार्येशत्व , म्हणजे चंद्राचे एकंदर कार्येशत्व असे असेल .चंद्र: 11/11/1/1.

चंद्र ईच्छापूर्ती च्या लाभ (11) स्थानाचा बलवान कार्येश आहे, जातकाच्या प्रश्नाचा रोख बरोबर दाखवत आहे. म्हणजेच ही प्रश्नकुंडली आपल्याला अहुजा अंकलच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल.

वास्तु खरेदी साठी चतुर्थ भाव (4) हा मुख्य (Principle) भाव असल्याने , आहुजा अंकल ना वास्तु खरेदीचा योग आहे का हे कळण्या साठी ह्या चतुर्थाचा सबलॉर्ड तपासला पाहीजे.

चतुर्थाचा (4) सबलॉर्ड आहे राहू.

राहू तांत्रीक दृष्ट्या वक्री असला तरी तो सदैव वक्रीच असल्याने त्याला मार्गीच मानले जाते. राहू स्वत:च्याच नक्षत्रात आहे. म्हणजे इथे प्रश्ना संदर्भातल्या प्रमुख भावाचा सबलॉर्ड वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा हा नियम पाळला गेला आहे.

राहू चे कार्येशत्व असे आहे:

राहु चतुर्थात (4), शनीच्या युतीत , स्वत:च्याच नक्षत्रात आणि शुक्राच्या राशीत, शनीच्या युतीत, राहु वर गुरुची पाचवी दृष्टी.

राहू: 4 / 4/ -/- राशी स्वामी: शुक्र: 6/6/2/11, 4 दृष्टि गुरु: 12 / 12/ 6,9 / 6,9 युती शनी: शनी चतुर्थात (4) आणि सप्तमेश व अष्टतमेश आहे. शनी गुरु च्या नक्षत्रात, गुरु व्ययात, षष्ठेश व नवमेश. शनी: 12/4/6.9/7,8 चतुर्थाचा सब लॉर्ड 4, 12, 9,6 , 2 , 11 चा कार्येश होत असल्याने आहुजा अंकल ना वास्तु योग आहे असा स्पष्ट संकेत मिळतोय.

आता दशा –अंतर्दशा-विदशा तपाऊन ठरवूया की हा ‘खोसला का घोसला’ बनेल का नाही!

 

 

 

प्रश्न विचारते वेळी चंद्र महादशा चालू आहे, ती 21 जानेवारी 2020 पर्यंत आहे, बराच मोठा कालावधी आहे हा. अहुजा अंकलचे घर झाले तर याच दशेत व्हायला पाहीजे.

चंद्राचे कार्येशत्व, चंद्र: 11/11/1/1.  चंद्र ईच्छापूर्ती च्या लाभ (11) स्थानाचा बलवान कार्येश आहे चंद्राचा सब गुरु आहे गुरु: 12 / 12/ 6,9 / 6,9 .  गुरु वास्तु संदर्भातले 12 वे स्थान देतो आहेच शिवाय 6 (कर्ज) आणि 9 (स्थलांतर, वास्तुचा खुला ताबा) ही दोन पुरक स्थाने पण देत आहे. जरी चंद्र चतुर्थाचा कार्येश होत नसला तरी तो ईच्छापूर्तीच्या लाभस्थानाचा (11) चा बलवान कार्येश आहे आणि या चंद्र महादशेची अजून सहा वर्षे शिल्लक असल्याने मी चंद्र महादशेचा विचार करायचे ठरवले.

या चंद्राच्या दशेत सध्या गुरु ची अंतर्दशा चालू आहे ती 22 एप्रिल 2014 पर्यंत आहे , गुरु चे कार्येशत्व आपण बघितले आहेत ते असे आहे: 12 / 12/ 6,9 / 6,9. जरी गुरु ची अंतर्दशा वास्तू संदर्भातली 12, 9, 6 ही स्थाने देत असली तरी मी ही अंतर्द्शा सोडून द्यायचे ठरवले, याला दोन कारणें आहेत:

महादशा स्वामी चंद्र वास्तू संदर्भातले चतुर्थ (4) हे स्थान देत नाही मग निदान अंतर्दशा स्वामी तरी चतुर्थाचा बळकट कार्येश असावा, पण गुरु चतुर्थाचा कार्येश नाही
प्रश्न जानेवारीत विचारला होता , गुरु अंतर्दशेचा काळ अवघा 4 महिन्यांचा उरला आहे तो मला वास्तू खरेदी सारख्या किचकट व वेळकाढू कामाला कमी वाटला.

गुरु नंतर ची अंतर्दशा येते ती शनीची. ही अंतर्दशा 21 नोव्हेंबर 2015 पर्यंत आहे. भरपूर वेळ आहे आहुजा अंकल ना व्यवहार पूर्ण करायला. पण शनी महाराज त्यांची ईच्छा पूर्ण करणार का?

शनी चतुर्थात (4) , अष्टमेश व सप्तमेश आहे , शनी गुरु च्या नक्षत्रात. शनी: 12/4/6.9/ 8, 7 ; शनी चा सब गुरु आहे गुरु: 12 / 12/ 6,9 / 6,9 म्हणजे शनी अंतर्दशा वास्तू साठी अनुकुल आहे. तो चतुर्थाचा दुसर्‍या: दर्जाचा कार्येशही आहे. इथे अंतर्दशा स्वामी शनीचा नक्षत्रस्वामी गुरु जरी वक्री असला तरी ती अंतर्दशा विचारात घेता येईल कारण शनी अंतर्दशा चालू होई पर्यंत गुरु मार्गी होईल.

शनी अंतर्दशेचा कालावधी आहे सुमारे दीड वर्षाचा, आत या कालावधीत घर घेणे होईल हे सांगणे म्हणजे फारच स्थूल भविष्य झाले एव्हढेच नव्हे ही एक प्रकारे ज्योतिष शास्त्राची चेष्टाच झाली. एव्हढेच सांगायचे असेल तर त्याला ज्योतिषी तरी कशाला पाहीजे. साध्या ‘कॉमनसेन्स’ ने सुद्धा असे भाकित करता येईल.

तेव्हा आपण शनीच्या अंतर्दशे मधल्या विदशा तपासू. शनीच्या अंतर्दशेत सगळ्याच ग्रहांच्या विदशां येणार आहेत त्यातली कोणती निवडायची? ज्योतीषाची खरी कसोटी ईथेच आहे, भविष्य चुकते ते याच पायरी वर !  दशा , अंतर्दशा निवडताना सहसा चुक होत नाही पण विदशा निवडताना मात्र भांबावल्या सारखे होते.

आहुजा अंकल जागा विकत घेऊन सध्याचे राहते घर सोडून तिकडे स्थलांतर करणार होते.जागा खरेदी म्हणजे करार-मदार , कागदपत्रें आलीच, म्हणजेच आपल्याला घर बदलणे आणि करार-मदार , कागदपत्रें यासाठीच्या त्रितिय (3) स्थानाचाही विचार करायला हवा. आपला दशा स्वामी चंद्र आणि अंतर्दशा स्वामी शनी दोघेही त्रितिय स्थानाचे कार्येश नाहीत तेव्हा आपल्याला त्रितिय स्थानाच्या एखाद्या बलवान कार्येश ग्रहाची विदशा निवडली पाहीजे.

त्रितिय स्थानाचे दोनच कार्येश आहेत बुध व मंगळ. पण मंगळाचे कार्येशत्व 11 / 3 / 1 / 10, 5 हे जागा खरेदी पेक्षा जागा विक्रीला अनुकूल आहे, तेव्हा मंगळ आपल्याला चालणार नाही.

बुधाचे कार्येशत्व : बुध  षष्ठात (6),  व्ययेश (12) व त्रितीयेश (3) , बुध रवीच्या नक्षत्रात , रवी षष्टात (6) व द्वीतीयेश (2) ,  6 / 6 / 2 / 12,3 असे आहे , बुधाचा सब बुध च आहे. बुधाची विदशा आपल्याला चालू शकेल. आता आपली चंद्र- शनी- बुध अशी साखळी तयार होऊ शकते.

इथे पर्यंत तर गाडी येऊन पोहोचली,  आता ट्रांसीट चा कौल बघितला पाहीजे. ट्रांसीटचा विचार करताना आपला अपेक्षित कालावधी वर्षाच्या आतला असल्याने रवी चे भ्रमण तपासले पाहीजे.

आपली साखळी चंद्र- शनी- बुध अशी असल्याने रवीचे गोचर भ्रमण चंद्राची रास – शनीचे नक्षत्र किंवा शनीची रास – चंद्राचे नक्षत्र असे असायला हवे. अशी जोडी नाहीच मिळाली तर शनी-बुध यांची अशा पद्धतीने जोडी जमते का ते पाहायचे.

चंद्राच्या महादशेतली गुरु ची अंतर्दशा 22 एप्रिल 2014 ला संपते, नंतर शनी ची अंतर्दशा चालू होणार , ह्या शनी अंतर्दशेत पहिली येणार ती शनीची विदशा पण आपण त्याचा विचार करणार नाही आहोत, त्या नंतर येणारी बुधाची विदशा आपल्याला हवी आहे. बुधाची विदशा 23 जुलै 2014 या दिवशी चालू होते व 13 ऑक्टोबर 2014 संपते. आपल्याला या कालवधीतले ट्रांसीट तपासायचे आहे.

23 एप्रिल 2014 ला रवी मेषेत मंगळाच्या राशीत आहे – नाही चालणार ! रवी नंतर वृषभेत जाईल पण वृषभेचा स्वामी शुक्र आपल्या साखळीत नाही , त्यानंतर रवी मिथुनेत म्हणजेच बुधाच्या राशीत असेल तो 15 जून 2014 ते 17 जुलै 2014 या काळात. एकतर या कालावधीत बुधाची विदशा नाही आणि मिथुनेत चंद्र व शनी ची नक्षत्रे नाहीत.

 

 

 

 

रवी 17 जुलै 2014 ला चंद्राच्या राशीत म्हणजे कर्केत दाखल होईल , कर्केत गुरु , शनी व बुधाची नक्षत्रे आहेत. आपली साखळी चंद्र- शनी –बुध अशी आहे, तेव्हा रवी कर्केतच पण शनीच्या नक्षत्रात येई पर्यंत थांबावे लागेल. रवी 20 जुलै ला शनी च्या नक्षत्रात येईल पण त्या वेळी बुध विदशा चालू झालेली नसणार, ती चालू होईल 23 जुलै 2014 रोजी (पहाटे 3:38) .

23 जुलै 2014 पहाटे 3:38 ला रवी बरोबर चंद्राच्या राशीत , शनीच्या नक्षत्रात आणी बुधाच्या सब मध्ये असेल, वार बुधवार असेल ! आपली साखळी पण चंद-शनी-बुध अशीच आहे ना !!!!

मग  होणार का ‘खोसला का घोसला’? होणार हे नक्कीच,  वेस्टर्न होरारी आणि के.पी. इतका खणखणीत कौल दिल्या नंतर आहुजा अंकलचे घर झाले नाही तर नवलच म्हणायला पाहीजे. दोन्ही चार्ट्सचा एकत्रित विचार करुन मी खालील निष्कर्ष काढले:

 1. जागेची मालकी एका स्त्री कडे आहे किंवा जागेच्या व्यवहारात एका स्त्रीचा महत्वाचा सहभाग आहे, तिचा शव्द अखेरचा मानला जाईल अशी परिस्थीती आहे.
 2. जागा अंकलजींना मिळणार पण त्या व्यवहारात बरेच अडथळे येणार. हे अ‍डथळे मुख्यत: विक्रेत्याच्या किंमतीबाबतच्या मागणी मुळे आणि घुमजाव करण्याच्या स्वभावामुळे.
 3. जागा चांगली आहे, शहराच्या नव्या , उभरत्या भागात असेल.
 4. जागे जवळ नदी, तलाव, कालवा, विहीर असेल, कदाचित जागेतच विहीर असू शकेल.
 5. जागेचे बांधकाम सुस्थितीत असेल पण त्याच्या संरचनेत मोठा बदल करता येणार नाहीत, एकतर जागेचे बांधकामच तसे असेल किंवा कायद्याची काही बंधने असावीत.
 6. जागेची किंमत बाजार भाव पेक्षा जास्त असेल, जागेच्या बाबतीत काही तरी बाब दडवण्यात आली असेल ती निस्तरण्यासाठी जातकाला जादाचा खर्च येऊ शकेल.
 7. जागेच्या कागदपत्रांत काही समस्या नसतील पण खरेदी खत होता क्षणीच जागा ताब्यात मिळणार नाही, थोडासा का होईना विलंब लागेल.
 8. जागेच्या व्यवहारतला पहिला टप्पा साधारणपणे येत्या चार पाच महिन्यात पूर्ण होईल , जागा प्रत्यक्षात ताब्यात मिळायला सहा ते सात महीने लागतील .
 9. साधारण पणे जुलै 2014 च्या अखेरच्या आठवड्यात व्यवहार पूर्ण होईल.

मी अंकल ना म्हणालो,

“अंकलजी, चिंता की कोई बात नहीं, ये पर्ची साफ सफ बताती है , ये जो प्रॉपटी आप के मन है,वही आपको मिलेगी , जुलै महीनेकी तेईस तारीख के बाद और ऑगस्ट के पहिले, आपका ये सपना पुरा होगा”

“क्या कहेता है पुत्तर, तेरे मुहं मै घी-शक्कर, सचमुच अगर ऐसा हो जाता .. लेकिन क्या गारंटी , पुत्तर..”

“आपके दुकान के ‘टायर’ जैसी”

पडताळा:

 1. प्रॉपर्टी एका महिलेच्या नावावरच होती.
 2. जागा शहराच्या नव्याने विकसित होणार्‍या भागात आहे.
 3. जागे जवळच एक नैसर्गीक तलाव आहे.
 4. जागेचे बांधकाम लोड बेअरिंग पद्धतीचे आहे , त्यात मोठे बदल करणे शक्य नाही.
 5. जागेच्या एका हिस्स्यातून एका ‘अप्रोच रोड’ साठीचे हक्क (इजमेंट)  देण्यात आले आहेत, ही बाब जातकापासून लपवून ठेवण्यात आली होती.
 6. हे दिलेले हक्क अ‍ॅडजस्ट (?) करण्यासाठी सुमारे पाच लाख रुपये जादाचा खर्च अंकलजींना करावा लागणार आहे.
 7. मे महिन्यात अंकल नी विसारत  देऊन, साठेखत केले, पण त्या महिलेने नंतर शब्द फिरवला , साठे खत रद्द करायला निघाली.अंकल नी त्या महिलेच्या इतर नातेवाईंकां मार्फत मध्यस्ती करुन त्या महिलेचे मन वळवले.
 8. अखेर हो ना करत  जुलै च्या 28 तारखेला खरेदी खत झाले.
 9. जागा ताब्यात देताना त्या महिलेने बरीच खळखळ केली, रडारडी केली, तमाशा केला. पण शेवटी खरेदी खत केल्या नंतर वीस दिवसांनी जागेचा ताबा प्रत्यक्षात अंकल ना मिळाला.

सप्टेंबरात आहुजा अंकल देवळाली सोडून गेले, जाण्यापूर्वी अंकल मला भेटायला आले होते, आम्ही दोघेही दु:खी होतो, त्यांना देवळाली सोडून जायचे दु:ख होते तर मला “पुत्तर’ अशी प्रेमाने थबथबलेली हाक मारणारे आता कोणी उरले नाही याचे !

( ही केस मी दोन्ही पद्धतिने सोडवली आहे, के.पी. आणि वेस्टर्न होरारी, के.पी. घटना केव्हा घडेल याबद्दल अगदी अचूक मार्गदर्शन करते यात शंकाच नाही , पण इतर वर्णन / तपशील जे वेस्टर्न चार्ट ने पुरवले तसे तपशील देण्यात के.पी. कमालीची तोकडी  पड्ते. )

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. Rahul Patil

  संपूर्ण लेखमाला आवडली. बरेच logic लावावे लागते. पण तुमच्या ब्लॉग वर बऱ्याच case studies वाचल्यामुळे थोडेफार समजू लागले आहे.
  एक विनंती : जर KP कुंडली North Indian पद्धतीने देखील दिल्यास समाजायावास सोप्पे जाईल.

  बाकी सर्व मस्तच!!

  0
  1. सुहास गोखले

   श्री. राहुलजी,

   धन्यवाद.

   लॉजीक हा ज्योतिषशास्त्राचा महत्वाचा घटक आहे, कुंडलीतले सर्व घटक (ग्रह, स्थाने , राशी , ग्रहयोग) हे सारे संकेत असतात त्याचा योग्य तो (व्यक्ती, स्थळ, काळ, पारिस्थिती जन्य) अन्वयार्थ लावणे लॉजीक नेच शक्य होते.
   सुरवातीला अंदाज चुकेल पण हळूहलू जितक्या जास्त पत्रिका आपण अभ्यासाल तितका हा लॉजीकचा पाया बळकट होत जाईल.

   मी भावचलित पद्धतिची कुंडली वापरतो, मी जो साऊथ इंडियन पद्धतीचा फॉरमॅट वापरला आहे त्यात तसे पाहीले तर दोन्ही कुंडल्या समाविष्ट असतात. ( क्षेत्र आणि भावचलित) , हा फॉरमॅट महाराष्ट्रात व वरच्या उत्तरेकडच्या राज्यांत फारसा प्रचलित नाही. पण हा साऊथ इंडियन पद्धतीचा फॉरमॅट समजायला आणि वापरायला तसा फार सोपा आहे. आपण जर के.पी. चा अभ्यास करणार असाल तर 99.99 % पत्रिका मी दाखवलेल्या फॉरमॅट मध्येच सापडतील. तेव्हा या अशा फॉरमॅट मधली पत्रिका बघायची सवय करुन घ्यायलाच हवी.

   पत्रिका बनवण्यासाठी मी जे सॉफ्टवेअर वापरतो त्यामध्ये नॉर्थ इंडीयन पद्धतीची भावचलित कुंडली छापता येत नाही . ईतर काही सॉफ्ट्वेअर्स मध्ये अशी सोय आहे पण सध्यातरी त्या सॉफ्ट्वेअर्स मध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याचा माझा विचार नाही. हाताने चित्र काढून तशी पत्रिका छापता येईलही पण त्यात वेळ जाईल आणि एकंदर 24 फॅक्टर्स ची नोंद करण्यात कदाचित चूक राहून जाण्याची शक्यता राहील.

   अभिप्रया बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

   शुभेच्चा!
   सुहास

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.