माझ्या फेसबुक ग्रुप वर  ….

मी एक क्वीझ दिला होता, एका व्यक्तीची जन्मकुंड्ली देऊन त्यावर आधारीत काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची उत्तरें म्हणून ही संपुर्ण केस स्ट्डी इथे देत आहे .

 

 

जातकाची माहिती

[ ही पत्रिका इंटरनेट च्या माध्यमातुन मिळालेली आहे , जातकाने स्वत: च आपली माहीती / समस्या खुले आम सार्वजनिक ठिकाणी उघड केली आहे , गोपनियतेचा कोणताही भंग होत नाही याची खात्री करुन घेतली आहे , आणि अर्थातच ही व्यक्ती माझ्या कडे आलेली जातक नाही ]

ह्या जातकाचा विवाह झाला आणि घटस्फोट पण , सध्या दुसरा विवाह करण्याच्या प्रयत्नात आहे आणि प्रश्न आहे दुसरा विवाह कधी होईल ? 
(प्रश्न विचारला आहे जुन 2018 , मध्ये)

जन्मतपशील:

केस 011 
जातक: पुरुष
जन्मदिनांक: 19 जुन 1980
जन्मवेळ: 14:57
जन्मस्थळ: दादर, मुंबई

आपल्याला जातकाचा दुसरा विवाह होणार का? आणि होणार असल्यास केव्हा? याबद्दलचे अनुमान करायचे आहे.

ज्यांना जादा आव्हानात्मक काम हवे त्यांनी :

जातकाचा विवाह केव्हा झाला होता?

जातकाचा घटस्फोट केव्हा झाला आहे?

याची अनुमाने करावीत.

आणि मुळात घटस्फोट का झाला असावा याचे ज्योतिषशास्त्रा नुसारची कारणमीमांसा करावी.


जातकाने दिलेल्या जन्मतपशीला नुसार केलेली ‘क्षेत्र कुंडली आणि केपी अयनांश वापरून केलेली (प्लॅसीडस ) भावचलित कुंडली ‘ 

 

उत्तर 

या जातकाचा विवाह  10 मे 2009  रोजी झाला आहे.

या घटनेची कारणमीमांसा :

घटना कधी घडली हे माहिती असल्यानेती त्याच तारखेला कशी घडली हे जुळवुन सांगणे सोपे आहे. बरेच ज्योतिषी काहीही करून, ओढाताण करत , नियम मोडत वेळ प्रसंगी स्वत: चे नवीन नियम बनवून  ह्या उत्तरा पर्यंत पोहोचून दाखवतील, पण आपल्याला असे न करता या घटनेचा जरा शास्त्रशुद्ध विचार करायचा आहे.

प्रथम नक्षत्र पद्धती नुसार ग्रहांचे कार्येशत्व  

 


 

जातकाचा विवाह झाला त्या दिवशी म्हणजे 10 मे 2009 रोजी जातकाला:  मंगळ  महादशा – चंद्र अंतर्दशा – राहू  विदशा – राहू   सुक्ष्मदशा चालू होती..

या साखळीतल्या प्रत्येक ग्रहाचा जरा अभ्यास करु.

दशा स्वामी मंगळ हा सप्तमेश आहे , मंगळ लाभात आहे आणि त्याची धनस्थाना (2) वर दृष्टी आहे म्हणजे मंगळाचा विवाहा साठी आवश्यक असलेल्या 2,7,11 या तीनही स्थानांशी संबंध आहे. मंगळ विवाहासाठी लायक / आश्वासक ग्रह आहे.

दशा स्वामी मंगळा चे नक्षत्र पद्धती प्रमाणे  कार्येशत्व: 8 / 11 / 1, 8 / 2, 7 ,  मंगळाचा सब: बुध 11, 9, 3, 6, 12

दशा स्वामी विवाहासाठी आवश्यक असलेल्या 2,7, 11 चा काहीसा कमकुवत  (‘ब’ / ‘ड’ दर्जाचा) का होईना कार्येश आहे. मंगळाचा सब ‘बुध’, लाभ (11) स्थानाचा अपवाद वगळता 6,12 च्या माध्यमातून विवाहास प्रतिकूल आहे.

नक्षत्र पद्धती नुसार ग्रहाच्या स्थानगत आणि नक्षत्रस्थिती नुसार काय फळ मिळणार ते ठरते आणि त्या ग्रहाचा ‘सब’ ती फळे ‘शुभ का अशुभ’ हे सांगतो.

इथे मंगळ जरी विवाहाला अनुकूल असला तरी त्याचा सब ‘बुध’ विवाहास प्रतिकूल आहे याचा अर्थ मंगळाच्या  दशेत विवाह झाला तरी मंगळाचा सब प्रतिकूल असल्याने हा विवाह सुखाचा असणार नाही. अगदी तसेच झाले आहे, या जातकाचा विवाह मंगळाच्या दशेत झाला पण पुढे घटस्फोट पण झाला आहे , मंगळाचा सब बुध प्रतिकूल असल्याने विवाह ही घटना घडली पण घटस्फोट घ्यावा लागल्याने विवाह सुखाचा ठरला नाही !

विवाहाच्या दिवशी चंद्राची अंतर्दशा चालू होती, अंतर्दशा स्वामी चंद्राचे कार्येशत्व : 8 / 11 / 1, 8 / 10  असे आहे, लाभ स्थानाचा (11) अपवाद वगळता बाकी सारे कार्येशत्व हे काही विवाहा साठीचे नाही पण चंद्र आणि मंगळ  अगदी अंशात्मक युतीत असल्याने (आणि एकाच म्हणजे शुक्राच्या नक्षत्रात असल्याने) मंगळाचे 8 / 11 / 1, 8 / 2, 7 हे कार्येशत्व पण चंद्राला लाभणार आहे. त्यामुळे चंद्राच्या अंतर्दशेत विवाह होऊ शकतो , ते संयुक्तीक आहे.

चंद्राच्या या अंतर्दशेतल्या राहू  विदशेत , राहू च्याच सुक्ष्मदशेत जातकाचा विवाह झाला.

राहू  विदशेत – राहू  सुक्ष्मदशेत विवाह होणे ही बाब बुचकळ्यात टाकणारी आहे , याला कारण राहू  चे कार्येशत्व!

राहू  दशमात (10) आहे , राहू ला राशी स्वामीत्व नाही, राहू  बुधाच्या नक्षत्रात , बुध भाग्यात (9) , बुधाच्या राशी भाग्य (9) आणि व्यय (12) स्थानांवर .

राहू  : 9 / 10 / 9, 12 / —

राहू  कोणाच्या युतीत वा दृष्टीत नाही , राहू  चंद्राच्या राशीत असल्याने चंद्राचे कार्येशत्व पण राहू  ला मिळेल ते असे: 8 / 11 / 1 , 8  /  10

राहू  शनीच्या सब मध्ये आहे , शनी चे कार्येशत्व  8/ 11 / 1, 8 / 4, 5

राहू  विवाहा साठी आवश्यक असलेल्या भावां पैकी लाभ स्थान (11) सोडता इतर एका ही भावाचा कार्येश नाही , राहू  चा सब ही विवाहास फारसा अनुकूल नाही, कसाही विचार केला तरी ‘राहू ’ च्या विदशेत – सुक्ष्मदशेत विवाह होणे कठीण आहे ,

ग्रहांची कार्येशत्वें पाहता , जातकाचा विवाह मंगळ महादशा- चंद्र अंतर्दशा- मंगळ विदशा या साखळीत व्हायला हवा होता.

इथे एक गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे, चंद्र अंतर्दशेतली बलवान मंगळ विदशा 8 मे 2009 संपली आणि त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात राहू  विदशेत जातकाचा विवाह झाला आहे !

 


 


इथे दोन शक्यता आहेत, जातक विवाहाची तारीख देताना चुकला असेल किंवा जातकाच्या जन्मवेळेत अगदी लहान चुक आहे ! विवाहा सारख्या महत्त्वाच्या घटनेची तारीख सांगताना सहसा चूक होत नाही. तेव्हा जन्मवेळेत लहानशी चूक असण्याची शक्यता जास्त आहे,

जन्मवेळेतली ही संभाव्य चूक असेल तर ती किती असावी ?

10 मे 2009 रोजी मंगळ महादशा- चंद्र अंतर्दशा- मंगळ विदशा हवी असेल तर जातकाची जन्मवेळ सध्याची जी 14:57 आहे त्या ऐवजी 14:56 अशी फक्त 1 मिनिट अलीकडे घेतली तर मंगळाची विदशा  8 मे 2009 ऐवजी 13 मे 2009 अशी पुढे सरकेल आणि 10 मे 2009 ह्या विवाहाच्या दिवशी मंगळ – चंद्र – मंगळ – शुक्र अशी साखळी तयार होते . शुक्र सुक्ष्मदशा स्वामी म्हणून आला. शुक्र 2, 7 चा प्रथम दर्जाचा कार्येश आहे त्याची उपस्थिती या साखळीत असणे  संयुक्तीक आहे . हे असेच व्हायला हवे होते. पण त्या साठी जातकाची जन्मवेळ 1 मिनिटाने अलीकडे असायला पाहिजे.

जन्मावेळेत अशी 1 मिनिटाची चूक होणे अगदी स्वाभाविक आहे,  माझा असा अनुभव आहे की बर्‍याच वेळ प्रत्यक्षातली जन्मवेळ ही नोंदवलेल्या जन्मवेळे पेक्षा दोन – चार मिनिटांनी मागेच असते.

नोंदवलेली जन्मवेळ 14:57  आणि त्यापेक्षा जास्त (म्हणजे 14:58+) तर 10 मे 2009 रोजी राहू  ची विदशा असेल , ती विवाहाला योग्य नाही.

जर जन्मवेळ 14:56 च्या अलीकडे असेल तर काय?

14:56 वेळ घेऊन आपण पाहिलेच आहे, इव्हेंट अगदी तंतोतंत मॅच होतो. मग 14:55 चे काय ? 14:52 चे काय?

मी तपासले आहे, 14:52 ते 14:56 यातली कोणतीही वेळ आपल्याला चांगली साखळी मिळवून देत आहे. या पाच मिनिटांत काही भावांचे सब बदलतात त्या अनुरोधाने आपल्याला 14:52 ते 14:56 पैकी नक्की कोणती वेळ ठरवणे अवघड नाही. शिवाय जातकाच्या आयुष्यात घडलेले आणखी काही प्रसंग असेच तपासून ह्या पाच मिनिटांचा स्पॅन आपण +/- 2 मिनिटांत आणू शकतो.

दशा – विदशा काहीही सांगत असल्या तरी घटना घडण्यासाठी ट्रान्सिट ची साथ असणे आवश्यक आहे , ग्रहस्थितीने  , दशा विदशांनी दर्शवलेल्या / सुचवलेली घटना घडण्या साठी ट्रान्सिट चा ट्रिगर आवश्यक असतो तो नसेल तर अनुकूल परिस्थिती निर्माण होते पण घटना घडत नाही.

विवाह 10 मे 2009 रोजी झाला आहे , दशा-अंतर्दशा साखळी अगदी अचूक जुळते आहे , त्या दिवशीचे ट्रान्सिट पण अनुकूल असायला हवेत ,  तसे  ते आहेत का?

या तारखेला गुरु कुंभेत होता , तो जातकाची 5, 11, 1 , (9) ही स्थाने प्रभावित करत होता, त्याच वेळी शनी सिंहे तुन जातकाची 5, 11, 1 , (8) ही स्थाने प्रभावीत करत होता ! हा केवळ योगायोग नाही !

त्या दिवशीची इतर  ट्रान्सिट असे होते:

 1. गोचरीचा गुरु जन्मस्थ शुक्राशी अंशात्मक (3 अंशात) नव- पंचम करत होता
 2. गोचरीचा नेपच्युन  जन्मस्थ शुक्राशी अंशात्मक (4:30 अंशात) नव- पंचम करत होता
 3. गोचरीचा शनी जन्मस्थ शुक्राशी जवळपास अंशात्मक (7 अंशात)केंद्र योग करत होता
 4. गोचरीचा शनी जन्मस्थ शनीशी 6 अंशात युतीत होता
 5. गोचरीचा शनी जन्मस्थ मंगळाशी शी अंशात्मक युतीत होता
 6. गोचरीचा शनी जन्मस्थ चंद्रा शी अंशात्मक युतीत होता
 7. गोचरीचा शुक्र – गोचरीच्या मंगळा शी अंशात्मक युतीत
 8. गोचरीचा चंद्र जातकाच्या धन स्थानातुन भ्रमण करत होता.

इतके सारे फॅक्टर्स असताना जातकाचा विवाह नेमका 10 मे 2009 याच तारखेला होणार नाही तर केव्हा ?

आता प्रश्न पडतो जातकाचा विवाह नेमका याच कालावधीत का झाला? आधी का नाही ? नंतर का नाही?

जातकाच्या जन्मा पासूनच्या दशा पाहिल्या तर जन्मा च्या वेळी चालू असलेली शुक्र महादशा आणि त्या नंतर येणार्‍या रवी, चंद्र या दशा चालू असताना जातकाचे वत 0 ते 22 वर्षे होते या काळात विवाह होत नाही (ग्रहांना कायदेकानू माहिती असतात तर !)

त्यानंतर नोव्हेंबर 2002 ते नोव्हेंबर 2009 या कालावधीत आलेल्या मंगळाच्या दशेत जातकाचे वय 22 ते 29 असे अगदी विवाह योग्य होते.

मंगळा नंतरची राहू  दशा विवाहाला प्रतिकूल त्यामुळे जातकाचा विवाह मंगळाच्या दशेतच म्हणजे नोव्हेंबर 2002 ते नोव्हेंबर 2009 या सात वर्षातच व्हायला हवा होता.

या मंगळाच्या दशेतल्या मंगळाची अंतर्दशा विवाह देऊ शकते पण तेव्हा जातक 22-23  वर्षाचा होता, पुढच्या राहू , गुरु,  शनी , बुध या अंतर्दशा विवाह घडवून आणू शकल्या नाहीत कारण हे अंतर्दशा स्वामी विवाहास प्रतिकूल आहेत.

मंगळाच्या महादशेतल्या पुढच्या केतू,  शुक्र , रवी या अंतर्दशा विवाहासाठी अनुकूल होत्या , जातकाचे वय 24 – 28 पण अनुकूल होते पण या काळात गोचर अनुकूल नव्हते. (हा भाग मी तपासला आहे , पण विस्तार भयास्तव तो इथे लिहीत नाही, अभ्यासूंनी हे पडताळून पाहावे, शंका आल्यास मला विचारा)

मंगळाच्या महादशेतली चंद्राची अंतर्दशेचा कालावधी असा होता की अंतर्दशा स्वामी विवाहास अनुकूल, जातकाचे वय अनुकूल आणि त्या काळातले गोचर अनुकूल, त्यामुळेच ही चंद्राची अंतर्दशा जातकाला विवाह देऊन गेली.

मंगळाच्या महादशेत नंतर लगेचच येणार्‍या राहू  महादशेत जातकाला ‘घटस्फोट’ चे फळ मिळायचे होते त्यामुळे जातकाचा विवाह चंद्राच्या अंतर्दशेतच होणे ही मजबुरी होती !

 

आता कोणी म्हणेल , विवाह झाला तो दिवस माहिती होताच मग त्याचा ग्रहस्थिती , गोचरी , दशा-अंतर्दशांशी असा मेळ घालणे सोपे आहे. एकदम मान्य !

आता समजा हा जातक २००५ साली त्याच्या वयाच्या २५ व्या वर्षी माझ्याकडे विवाह कधी होईल हा प्रश्न विचारायला आला असता तर मी त्याचा कालनिर्णय कसा केला असता?

मी सर्व प्रथम या जातकाच्या पत्रिकेवरुन विवाह योग लौकर / सुयोग्य कालावधी / उशीरा या पैकी कसा आहे याचा अंदाज घेतला असता. सदरच्या पत्रिकेत अगदी वरवर पाहीले तरी जरासा उशीरा विवाह होण्याचे योग आहेत ( पत्रिकेतली चंद्र- शनी अंंशात्मक युती त्या दृष्टीने अभ्यासनिय आहे) , उशीरा विवाह हे मान्य पण नेमका किती?

‘किती उशीरा’ याची व्याख्या करताना जातकाचा धर्म , जात , शिक्षण , नोकरी -व्यवसाय, कौटुंबिक स्थिती या बाबतीत माहीती घेतली असती. ग्रहयोगां बरोबरच जातकाला लाभलेल्या परिस्थितीचा देखील परिणाम विवाह योगा वर होणारच. साधारण शहरी भागातल्या , सुशिक्षित समाजात शिक्षण पूर्ण करुन नोकरीत स्थिरावल्या नंतरच म्हणजे वयाच्या २६+ वर्षी विवाहाचा विचार केला जातो. पुण्या सारख्या ठिकाणीच्या मुलीं आजकाल तर पोष्ट ग्रॅज्युएट शिक्षण- भक्कम प्यॅकेज असलेली नोकरी‌, स्वत:चा (३ बेडरुमचा , कर्ज नसलेला ) फ्लॅट – चारचाकी आणि मुलाचे आई वडील दुसरी कडे राहात आहेत अशी परिस्थिति नसलेल्या मुलां कडे ढूंकूनही पाहात नाही अशी स्थिती आहे. पिढ्यानपिढ्या व्यवसायाची परंपरा असेल तर कदाचित ‘नाम के वास्ते’ शिक्षण घेतल्या वर लगेचच विवाहाचा विचार सुरु होतो. काही जाती-जमातीत लौकर विवाह करण्याची रुढी असते , काही वेळा मोठ्या भावा / बहिणीचा विवाह झाल्या शिवाय धाकट्याचे लग्न करत नाहीत, त्यामुळे मोठ्या भावा / बहिणीचा विवाह रखडला की धाकट्याला ताटकळत बसावे लागते. असे बरेच बारकावे आहेत.

असो.

मी साधारण २७ – ३५ असा कालावधी विचारात घेतला असता.

पुढ्च्या टप्प्यात मी जातकाच्या वयाच्या २७ – ३५ या कालावधीत येणार्‍या महादशा-अंतर्दशा तपासल्या असत्या. जातकाचा जन्म १९८० चा , जन्मत:च त्याला शुक्राची महादशा चालू होती, ही चालू असलेली शुक्र महादशा आणि त्या नंतर येणार्‍या रवी, चंद्र या महादशांं चालू असताना जातकाचे वत 0 ते 22 वर्षे होते, या काळात जातकाचा विवाह होणे शक्य वाटत नाही. पुढची मंगळाची दशा वयाच्या २२ ते २९ वर्षे असणार होती या काळात विवाह शक्य आहे , आपण वयाच्या ३५ पर्यंत विचार करणार असल्याने नंतरची राहू महादशा पण विचारात घेतली असती.

मंगळ का राहू महादशा याचा फैसला या दोन्ही ग्रहांचे कार्येशत्व तपासून निश्चित केले असते. विवाहा साठी लाभात असलेला सप्तमेश मंगळ जास्त अनुकूल आहे हे सरळ दिसतच आहे. जर काही कारणांने मंगळ महादशा विवाह देऊ शकत नाही असे दिसले असते तर नाईलाजाने राहू महादशेचा विचार केला असता.

एकदा ही मंगळाची महादशा निश्चित झाल्यावर मी वळलो असतो अंतर्दशे कडे. मंगळाच्या महादशेत सर्व ग्रहांच्या अंतर्दशा येणार असल्याने मी एक एक करत प्रत्येक अंतर्दशेचा अभ्यास केला असता.

विवाह योगा बाबतचा आपला अंदाज २७+ असा असल्याने मंगळाच्या महादशेतल्या सुरवातीच्या अंतर्दशांचा विचार केलाच नसता, त्या हिशेबाने मंगळ, राहू, गुरु, शनी आणि बुध या अंतर्दशा मी सोडून दिल्या असत्या.

उरलेल्या केतु , शुक्र, रवी आणि चंद्र अंतर्दशा पैकी शुक्र आणि रवी अंतर्दशा मला योग्य वाटल्या असत्या त्या वरून २००७ चा शेवट , २००८ आणि २००९ चे पहिले तीन महीने असा साधारण दीड वर्षाचा कालावधी मी निश्चित केला असता , नंतर गोचरीचा विचार केल्या नंतर गोचरीचा गुरु कुंभेत आणि गोचरीचा शनी सिंहेत असताना विवाह होण्याची मोठी शक्यता मला दिसली असती.

गुरुचा कुंभेत १ मे २००९ रोजी प्रवेश करेल, त्यानंतर ३१ जुलै २००९ रोजी तो वक्री अवस्थेत मकरेत जाईल, २० डिसेंबर २००९ रोजी गुरु पुन्हा कुंभेत दाखल होईल आणि २ मे २०१० रोजी तो मीनेत दाखल होईल होईल.
गुरु कुंभेत आला त्या दिवशी (१ मे २००९ ) शनी सिंहेत होता, गुरु वक्री अवस्थेत मकरेत जाईल तेव्हाही शनी सिंंहेत असेल. मात्र मार्गी होऊन गुरु पुन्हा २० डिसेंबर २००९ रोजी कुंभेत दाखल होईल तेव्हा मात्र शनी कन्येत असेल!

म्हणजे गुरु कुंभेत आणि शनी सिंहेत हे कॉम्बीनेशन १ मे २००९ ते ३१ जुलै २००९ या कालावधीतच उपलब्ध होणार आहे.

या सार्‍या अ‍ॅनॅलायसीस वरुन १ मे २००९ ते ३१ जुलै २००९ हा तीन महिन्यांचा कालवधी मी जातकाला सांगीतला असता आणि तो बरोबर ही ठरला असता कारण जातकाचा विवाह त्याच कालवधीत झाला आहे.

विवाहाच्या बाबतीतल्या कालनिर्णयाला इतकी सुक्ष्मता पुरेशी असते. (अगदी अमुक दिवस, इतके तास इतके मिनीटे असे सांगण्याचा प्रयत्न करणे हा या शास्त्रावर अत्याचार ठरेल !)

असो  …………..

जातकाचा हा विवाह फार काळ टिकला नाही , अवघ्या दोन वर्षात घटस्फोट झाला…

कसा ते पुढच्या भागात पाहू

क्रमश:

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. प्राणेश

  अफाट!
  इतका विचार करणारे ज्योतिर्विद् भूतलावर दुर्मिळच!

  0
  1. सुहास गोखले

   श्री प्राणेशजी

   धन्यवाद.

   इतका विचार करावाच लागतो तसे पाहीले तर याहुनही जास्त विचार करायला हवा पण काळ काम वेगाची गणितें पण सांभाळायला लागतात. एकच पत्रिका अशी दिवसभर अभ्यासत राहीलो तर कसे चालेल? या व्यवसायावर माझे पोट आहे , एक प्रश्ना साठी दिवस घालवला तर त्याचे श्रममूल्य चार-पाच हजार कोण देणार आहे का ? त्या मुळे प्रश्नाचे गांभिर्य , मिळणारे मानधन आणि उपलब्ध वेळ यांची सांगड घालावी लागते. इतकी मेहेनत करुन भाकित केले , ते बरोबर आले तरी कळवायची तसदी लोक घेत नाहीत अशी परिस्थिती आहे.

   आपण आहे त्यात जास्तीत जास्त चांगले काम करायचे

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.