माझे दुसरे भाकीत होते:
हा विवाह फार काळ टिकणार नाही, घटस्फोट होण्याची शक्यता आहे.
या लेखाचा पहिला भाग इथे वाचा: केस स्टडी 027 भाग – १
आपल्या संदर्भासाठी जातकाची पत्रिका पुन्हा देत आहे:
जातक: महिला
जन्मदिनांक: 05 नोव्हेंबर 1971
जन्मवेळ: 03:55 पहाटे
जन्मस्थळ : बेंगलोर
जातकाची पत्रिका नुसती वरवर पाहिली तरी लक्षात येत होते की ह्या जातकाचा विवाह होणे अवघड आहे आणि विवाह झाला तरी तो किती काळ टिकेल या बद्दल शंका आहेतच.
घटस्फोट होण्यासाठी एकच एक ग्रहस्थिती अथवा ग्रहयोग जबाबदार नसतो, विवाहच्या विरोधी असे अनेक (कु)योग त्यासाठी पत्रिकेत असावे लागतात.
शुक्र हा विवाहाचा कारक ग्रह असल्याने ह्या शुक्राच्या स्थितीवर हे बरेचसे अवलंबून असते.
शुक्र अनेक मार्गाने बिघडू शकतो , त्यात शुक्र आणि हर्षलचे कुयोग ( केंद्रयोग अथवा प्रतियोग) जास्त परिणाम कारक असतात. सप्तम आणि द्वितीय स्थान दूषीत होणे हे आणखी एक कारण असू शकते. सप्तमेश बिघडल्यास देखील वैवाहिक जीवनात मोठे अडथळे येऊ शकतात. असे अनेक योग आहेत जे घटस्फोटाची शक्यता दाखवतात त्या सार्यांचा उहापोह विस्तारभयास्तव या लेखात करता येणार नाही, त्यासाठी मला एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.
आता आपण या जातकाच्या पत्रिकेत असे काय आहे ज्याने घटस्फोटाची शक्यता निर्माण झाली आहे ते पाहू:
- शुक्र – शनी प्रतियोग
- शुक्र – नेपच्यून युती
- चंद्र – नेपच्यून प्रतियोग
- शनी – नेपच्यून प्रतियोग
- शुक्र – मंगळ केंद्रयोग
- चंद्र – शुक्र प्रतियोग
शुक्र – शनी अशुभ योग ( इथे प्रतियोग आहे) असताना कलत्रकारक शुक्र अत्यंत बिघडतो, विवाह उशीरा होणे, विवाहा संदर्भात चिंता असणे, मोठ्या प्रमाणात तडजोडी कराव्या लागणे अशी फळें मिळतात, या योगावर इतर अशुभ ग्रहांचे योग असल्यास ( इथे शुक्र – नेपच्यून युती आणि शुक्र – मंगळ केंद्र योग आहेत) वैवाहिक व सांसारिक जीवनात मोठी संकटे येतात, जोडीदारात दोष, कामसुखात मोठी कमतरता, काही वेळा चारित्र्यहीनता, बाहेरख्याली पणा , पापाचरण अशी टोकाची फळें देखील मिळतात.
शुक्र – नेपच्यून युती काही वेळा चांगली फळें देते पण त्या साठी ही युती कोणा अशुभ ग्रहाच्या कुयोगात नसली तरच जर ही युती कोणा पाप ग्रहाच्या कुयोगात असेल तर मात्र बरीच अशुभ फळे मिळतात. नैराश्य , काल्पनिक चिंता, वैवाहिक जीवनात मोठी संकटे, मोठी फसगत, अपेक्षा भंग, वैवाहिक जोडीदाराचे अनारोग्य, लोकापवाद, संकटे अशी अनिष्ट फळे मिळतात.
शुक्र मंगळा मधले कोणतेही अशुभ योग सर्वसाधारण सुख न लाभू देणारे असतात. हे योग अंशात्मक असतील तर (जातकाच्या पत्रिकेत अंशात्मक केंद्र योग आहे!) वैवाहिक जीवनात असमाधान किंवा वैगुण्य निर्माण करतात. शुक्र – मंगळ अशुभ योगा वरच (इथे अंशात्मक केंद्र योग आहे) युरेनस, नेपच्यून , शनी सारख्या ग्रहाचा कुयोग असता (इथे शनी प्रतियोगात आहे) भावनांच्या दृष्टीने , वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने मोठेच दु:ख भोगावे लागते , अगर आपत्ती येतात. नवरा- बायकोत वितुष्ट येते, अगर बराच काळ विभक्त राहावे लागते.
चंद्र – नेपच्यून अशुभ योग (इथे प्रतियोग आहे) त्याच वेळी इतर अशुभ ग्रहांचे कुयोग असल्यास ( इथे शनी चा प्रतियोग आणि मंगळाचा केंद्र योग आहे) भावनिक संघर्ष, तीव्र मानसिक त्रास, काही वेळा मनोविकृती, फसगत, लोकापवाद, आळ /आरोप येणे, कलंक लागणे, नावलौकिक / प्रतिष्ठा धुळीस मिळणे, पती-पत्नीत मोठी शारीरिक / मानसिक तफावत , कौटुंबिक सुखात मोठी कमतरता अशी फळे मिळतात.
तसे पाहिले तर चंद्र – शुक्र योग चांगली फळे देतात पण इथे प्रतियोग आहे आणि तो इतर अनेक कुयोगात आहे त्यामुळे जातकाला विवाहा संदर्भात अनेक अनिष्ट फळे मिळण्याची मोठी शक्यता आहे. वैवाहिक सुख न लाभणे, पती-पत्नी शारीरिक / मानसिक दृष्ट्या विजोड असतात, उधळेपणा, चंचलता, कुसंगती, मन:स्ताप, मानसिक / भावनिक संघर्ष , परतंत्र बुद्धी, पराधीनता.
शनी – नेपच्यून योग तसा दीर्घकाळ चालत असल्याने हा योग अगदी अंशात्मक असेल तरच त्याची फळे ठळकपणे मिळतात. इथे शनी – नेपच्युन प्रतियोग 3 अंशात असल्याने त्याचा विचार करता येईल. हा कुयोग जीवनात कमालीचे कष्ट आणि दगदग करायला लावतो, व्यक्ती चुकीच्या मार्गाने वाटचाल करते, प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्यातच उमेदीचा मोठा काळ खर्च करावा लागतो, आर्थिक व आरोग्य दृष्ट्या मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात, या योगावरच रवी , मंगळ , चंद्र यांचा संबंध आल्यास (इथे चंद्र प्रतियोगात आणि मंगळ केंद्र योगात आहे, रवी – शनी षडाष्टक आहे) दीर्घकाळाचे मोठे आजार, मानसिक चिंता, मोठे आर्थिक तडाखे, व्यक्ती जीवनात अपयशी होते, मोठी शोकांतिका होते.
इतके सारे अशुभ योग , त्यातले बहुतांश योग अंशात्मक आणि एका योगा बरोबर आणखी बरेच कुयोग एकत्रित अशी परिस्थिती असताना जातकाला वैवाहीक जीवनात फार मोठ्या संकंटांना सामोरे जावे लागणार यात काही शंकाच नाही, त्यामुळे या जातकाचा विवाह सुखाचा होणार नाही आणि त्याचा शेवट घटस्फोटात होईल असा अंदाज मी बांधला.
आता जातकाचा घटस्फोट होण्याची शक्यता दिसल्यामुळे तो केव्हा याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला.
जातकाचा विवाह जून 2005 मध्ये होईल असा मी अंदाज केला होता. इथे थोडे तारतम्य वापरावे लागले , अगदी विवाहाच्या दुसर्या दिवशी घटस्फोटाचा निर्णय घेऊन कोर्ट कचेरी केली तरी किमान एक वर्षाचा तरी कालावधी मध्ये जावा लागेल. म्हणजे जातकाचा घटस्फोट होणारच असेल तर तो साधारणपणे जून 2006 च्या नंतर होईल.
आता जातकाचा घटस्फोट होणार असेल तर विवाहाच्या विरोधी ग्रहांच्या अंतर्दशा आल्या पाहिजेत. जून 2006 नंतरच्या काळात , साधारण 2006 ते 2009 या काळात जातकाला गुरु च्या महादशेतल्या बुध , केतू आदी ग्रहांच्या अंतर्दशा भोगायच्या आहेत. यापैकी बुधाची अंतर्दशा विवाहाच्या दृष्टीने प्रतिकूल वाटली याचे कारण बुध लग्नेश, दशमेश आहे , षष्ठेश शनीच्या प्रतियोगात आणि षष्ठातल्या मंगळाच्या अंशात्मक केंद्र योगात आहे.
1, 6, 10 ही विवाहाच्या विरोधातली स्थाने, त्यापैकी 1, 10 बुधाच्या माध्यमातून , 6 बुध- मंगळ कुयोगाच्या माध्यमातून कार्यान्वित होत आहेत तसेच , घटस्फोट हा एक प्रकाराचा करार आणि घटस्फोट न्यायप्रक्रियेच्या म्हणजेच न्यायनिवाड्याच्या माध्यमातून होत असल्याने आणि 3 करार , 9 न्यायनिवाडा ही स्थाने विचारात घ्यावी लागतात, त्या दृष्टीने पाहता 3 हे स्थान बुधाच्या माध्यमातून (बुध तृतीय स्थानात आहे) आणि 9 हे स्थान शनीच्या माध्यमातून (बुध – शनी प्रतियोग) कार्यान्वित होत आहेत.
गोचरीचा विचार करता गोचरीचा शनी सिंहेत आणि गोचरीचा गुरु धनू राशीत असताना म्हणजे डिसेंबर – 2007 ते डिसेंबर 2008 या काळात ही घटना घडण्याची शक्यता जास्त वाटली.
गुरु धनू राशीतून जातकाची 4, 8, 10, 11 ही स्थाने प्रभावित करणार आहे तर शनी सिंहेतून 12, 2, 6, 9 ही स्थाने प्रभावित करणार आहे.
13 सप्टेंबर 2008 च्या आसपास गोचरीचे शुक्र आणि मंगळ कन्येत 22 अंशावर अंशात्मक युतीत असतील म्हणजेच हे दोघे जातकाच्या लग्नातून भ्रमण करत असतील आणि सप्तमावर दृष्टी टाकतील आणि त्याच वेळी जन्मस्थ युरेनस जो लग्नात आहे आणि नेमका त्याच म्हणजे 22 अंशावरच असल्याने हा दिवस (अलीकडे – पलीकडे दोन- चार दिवस) जातकाला विवाहाच्या दृष्टीने कमालीचा अशुभ ठरणार आहे. याच कालावधीत गोचरीचा युरेनस कुंभेत असून तो जन्मस्थ मंगळाच्या राश्यात्मक युतीत असेल. गोचरीचा चंद्र आणि गोचरीचा नेपच्यून मकरेत अंशात्मक युतीत, गोचरीचा रवी जातकाच्या व्ययस्थानातून भ्रमण करत असेल.
म्हणजे सप्टेंबर 2008 हा महिना जातकाला वैवाहिक जीवनाच्या बाबतीत कमालीचा अशुभ ठरणार आहे पण जातकाला सांगताना मी बुधाची अंतर्दशा मार्च 2006 ते जून 2008 अशी आहे त्या दरम्यान जातकाच्या वैवाहीक जीवनात मोठ्या अडचणी येऊन त्याचा शेवट दुर्दैवी घटस्फोटात होईल असे भाकीत केले होते.
मार्च – 2008 मध्ये एक नवा प्रश्न विचारण्या साठी जातकाने संवाद साधला तेव्हा वैवाहिक जीवनात समस्या आहेत पण घटस्फोट होण्याची शक्यता दिसत नाही असे कळवले होते.
आता मार्च 2008 मध्ये जातक म्हणते की घटस्फोटाची शक्यता दिसत नाही म्हणजे घटस्फोट मी दिलेल्या कालावधीत म्हणजे जून 2008 पर्यंत तरी नक्कीच होणार नाही कारण अगदी एप्रिल 2008 मध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखला झाला तरी पाच – सहा महिन्यात निकाल हाती येणे शक्य नाही. त्या अंगाने माझे भाकीत चुकले पण त्याचे मला अजिबात वाईट वाटले नाही उलट असे अशुभ भाकीत टळले . जातकाचा संसार चालू आहे याचाच मला आनंद वाटला.
पण आश्चर्य म्हणजे जातकाने ऑगष्ट 2012 मध्ये संवाद साधून घटस्फोट झाला असल्याने कळवले म्हणजे माझे भाकीत काही अगदीच चुकले नाही ! मात्र घटस्फोट नक्की केव्हा झाला असेल या बाबत विचारले असता जातकाने उत्तर दिले नाही.
जातकाने जरी कोणता खुलासा केला नसला तरी मला अजूनही वाटते की माझा सप्टेंबर 2008 चा कयास होता त्या दरम्यान नक्कीच घटस्फोटाची ठिणगी पडली असणार इतके वाईट ग्रहमान तेव्हा होते.
मार्च 2008 रोजी घटस्फोट नव्हता , शक्यता वाटत नव्हती आणि ऑगष्ट 2012 पर्यंत घटस्फोट झालेला होता. ऑगष्ट 2012 मध्ये जातकाने विचारलेला प्रश्न आणि जातकाची एकंदर मूड पाहता ती त्या घटस्फोटाच्या हादस्यातून बाहेर येऊन सहा महीने ते एक वर्ष तरी नक्कीच झाले असणार म्हणजे मार्च 2008 पासून साधारण एक वर्षाने म्हणजे मार्च 2009 ते जानेवारी – फेब्रुवारी 2012 या तीन वर्षाच्या कालावधीत केव्हातरी जातकाचा घटस्फोट झालेला असावा. या काळात गुरु महादशेत , शुक्र आणी रवी अंतर्दशा चालू होत्या . या पैकी (बिघडलेल्या ) शुक्राची अंतर्दशा घटस्फोट देऊन गेली असणार. हा कालावधी मे 2009 ते जानेवारी 2012 असा येतो.
मे 2009 ते मे 2010 या कालावधीत गुरु कुंभेत होता आणि तो जातकाची 6, 10, 12,2 ही स्थाने प्रभावित करत होता. तर शनी तेव्हा सिंहेत असल्याने तो जातकाची 12, 2, 6, 9 ही स्थाने प्रभावीत करत होता.
शनी सप्टेंबर 2009 मध्ये कन्येत जाणार आहे , कन्येतल्या शनीची स्थिती घटस्फोटाला अनुकूल नाही त्यामुळे शनी चा राशी बदल होण्याच्या जरासे आधीच म्हणजे जुलै – ऑगष्ट 2009 मध्ये हा घटस्फोट झाला असणार, बर्याच वेळा शनी जेव्हा राशी बदलण्याच्या बेतात असतो तेव्हा तो अनेक प्रलंबित घटना वेगाने घडवून आणतो असा अनुभव आहे. त्या काळात गोचरीचा मंगळ मिथुनेतुन म्हणजे जातकाच्या दशमातुन भ्रमण करत जातकाच्या सप्तमस्थान बिंदू शी केंद्र योग करत होता तसेच गोचरीचा प्लुटो वक्री अवस्थेत जातकच्या चतुर्थात असल्याने त्याचा गोचरीच्या मंगळाशी प्रतियोग होता. ऑगष्टच्या दुसर्या पंधरवड्यात गोचरीच्या शुक्र – मंगळाची राश्यात्मक युती होती. नेपच्युन वक्री अवस्थेत जातकाच्या षष्ठम स्थानात होता.
आता हे नेमके असेच झाले असेल का याबद्दल काहीच माहिती नाही कारण त्या नंतर जातकाशी प्रयत्न करुनही संपर्क साधता आला नाही, जातकाचा घटस्फोट नक्की केव्हा झाला हे गूढच राहणार असे दिसते.
जातकाचा व्यवसाय
या केस मध्ये जातकाचा प्रश्न विवाहा संदर्भात होता तरी मी जातकाच्या नोकरी – व्यवसाया बद्दलचे भाकीत केले होते त्याच्या मागचे एकमेव कारण म्हणजे मला ज्योतिष शिकायचे होते ! (आणि मी अजूनही शिकत आहे)
हे भाकीत मी केले त्या काळात एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय कोणता असू शकेल याचा अंदाज घेण्या इतपत माझा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नव्हता , या बाबतीत मी चाचपडतच होतो आणि म्हणूनच तेव्हा समोर आलेल्या प्रत्येक पत्रिके साठी व्यवसाया बाबत अशी (अनाहूत) भाकीतें करून त्यांचा ताळा- पडताळा घेत नियम/अडाखे/ अभ्यासाची एक रीत बसवण्याचा माझा प्रयत्न चालू होता त्याचाच एक भाग म्हणून हा अंदाज केला होता.
अशी भाकिते करायची , ती कशी केली याच्या सविस्तर नोंदी ठेवायच्या, जातकाने आपणहून कळवले तर उत्तमच नाहीतर स्वत: विचारुन केलेल्या भाकितांचा ताळा पडताळा काय आणि कसा आला याच्या नोंदी ठेवायच्या, भाकित चुकले असेल तर ते का चुकले याचे अॅनालायसीस करायचे, अशा एक नाही दोन नाही अक्षरश: शेकड्यांच्या घरात पत्रिका अभ्यासल्या होत्या.
पण आजच्या झटपट ज्योतिष पद्धतींच्या जमान्यात हा वेडेपणाच मानला जाईल म्हणा !
पण एक खात्रीने सांगतो, मी त्या काळात घेतलेल्या या ढोर मेहनतीची आज खूप चांगली फळे मला मिळत आहेत
असो.
जातकाच्या व्यवसाया बद्दल मी “बातमी / लेखन / प्रकाशन / ग्रंथ लेखन / न्यूज रिपोर्टर त्यातही शोध पत्रकारिता / संपादक अशा प्रकारच्या व्यवसाय” असे अनुमान केले होते आणि ते बरोबर ही आले होते. आता ते कसे ते आपण या लेखाच्या पुढच्या भागात पाहू.
क्रमश:
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020