संग्रहात ठेवावी अशी प्रत्रिका !

आजच्या केसस्टडी मध्येे आपण एक खास पत्रिका अभ्यासू. ही पत्रिका मला इंटरनेट च्या माध्यामातून मिळाली आहे. जातकाने स्वत:च आपली सर्व माहिती जाहीरपणे उघड केली असल्याने इथे गोपनीयतेचा कोणत्याही प्रकारे भंग होत नाही. जातक माझा क्लायंट नाही हे वेगळे सांगायला नको.

इथे मी आपल्या सगळ्यांना एक खात्री देतो की माझ्या कडे आलेल्या जातकाची म्हणजेच माझ्या क्लायंट्सची माहीती मी कोणत्याही मार्गाने / माध्यमातून / प्रत्यक्ष/ अप्रत्यक्षरीत्या अशी जाहीर करत नाही.

या केस स्टडीला एक इतिहास आहे.

2001 ते 2010 अशी तब्बल दहा वर्षे आम्ही काही ज्योतिष अभ्यासक मित्र, इंटरनेटच्या माध्यमातून एक चर्चा ग्रुप चालवत होतो. या ग्रुप वर प्रामुख्याने जन्मपत्रिकांचा अभ्यास केला जात होता. त्या काळात आम्ही इतरांच्या प्रश्नांना उत्तर देत असल्याने  ‘फुकट ज्योतिषा’ साठी फिरणारे अनेक लोक आमच्या या ग्रुप वर येऊन आपली माहिती देऊन प्रश्न विचारत आणि आम्ही त्यांची उत्तरें देत असू.

असेच एकदा एका जातकाने नोव्हेंबर  2001 मध्ये , आपली माहीती देऊन प्रश्न विचारला होता: “विवाह केव्हा होणार ?”

या जातकाची पत्रिका अनेक अंगाने अभ्यसनीय असल्याने या पत्रिकेवर बरीच वादळी चर्चा झाली , अनेकांनी त्यात हिरीरीने भाग घेतला होता. या केसस्टडी बद्दल मजेची बाब म्हणजे या जातकाची केस म्हणजे पत्रिका सतत अनेक वर्षे आमच्या ग्रुप वर चर्चेत राहिली आणि याला कारण म्हणजे दर दोन एक वर्षाने ही जातक पुन्हा पुन्हा नवे नवे प्रश्न विचारत राहिली आणि हा सिलसिला काही वर्षे चालू राहिला इतका की आम्हा सगळ्यांना ही पत्रिका तोंडपाठ झाली होती.

ह्या पत्रिकेवर अनेकांनी भाष्य केले , अनुमाने केली, भाकीते केली तसेच मी ही जातकाच्या विवाह योगाचे आणि पाठोपाठ घटस्फोटाच्या शक्यतेचे अनुमान केले होते. जातकाच्या नोकरी- व्यवसाय कोणता असेल या बद्दलही अंदाज बांधला होता. तसेच जातकाला नोकरी व्यवसाया बद्दल दोन भाकिते पण केली होती.

माझा जातकाच्या नोकरी- व्यवसायाच्या स्वरूपा बद्दलचा अंदाज 100% बरोबर हे जातकाने ताबडतोब मान्य केले होते.

पुढे जातकाने त्याच्या विवाहा बद्दल मी केलेले अनुमान व विवाहाचा कालनिर्णय अगदी बरोबर ठरला असे कळवले होते.

[सहसा अशा ओपन चर्चा ग्रुप्स वर येणारे फुकटे (फुकट ज्योतिष विचारणारे ) असा फिडबॅक देत नाहीत पण या जातकाला काही नवे प्रश्न विचारायचे असल्याने नाईलाजाने मागच्या केलेल्या भाकीतांचे काय झाले हे जातकाला सांगावे लागले.]

त्या नंतर काही काळाने पुन्हा एकदा जातकाने एक नवा प्रश्न विचारताना जातकाच्या नोकरी व्यवसाया बद्दल तेव्हा मी जे भाकीत केले होते ते बरोबर ठरल्याचा आवर्जून उल्लेख केला होता पण त्याच बरोबर मी केलेल्या जातकाच्या घटस्फोटा च्या अनुमान बद्दल मात्र ‘असे काही झाले नाही’ असे सांगितले होते.

काही वेळा आपण केलेले एखादे अशुभ भाकीत खरे ठरले नाही तर भाकीत चुकले याचे वाईट वाटण्या पेक्षा ‘अशुभ’ घडले नाही याचाच आनंद होतो. जेव्हा जेव्हा मी एखादे अशुभ भाकीत करतो तेव्हा तेव्हा ते चुकीचे ठरो अशीच इच्छा माझ्या मनात असते.

पुढे 2010 च्या आसपास आम्ही आमचा तो चर्चा ग्रुप बंद केला याला कारण म्हणजे ग्रुप मधले अनेक सक्रिय सभासद एव्हाना पूर्ण व्यवसायीक ज्योतिषी बनले होते,  वेळे अभावी म्हणा किंवा उत्तर चुकले तर आपली व्यावसायीक प्रतिमा डागाळेल अशी भिती वाटल्या मुळे असेल कदाचित त्यांंचा ग्रुप वरचा वावर , सहभाग कमी झाला. नवशिक्यांचे प्रमाण वाढले त्यामुळे चर्चेच्या विषयांत तोच तोच पणा यायला लागला, तेच तेच घीसेपीटें प्रश्न आणि चावून चोथा झालेले चर्चेचे प्रस्ताव यांचा आता उबग यायला लागला.

एखादा ग्रुप सांभाळणे हे मोठे वेळ काढू काम असते त्यामुळे मॉडरेशन करण्यासाठी कोणी वेळ काढू शकला नाही ,या कामाला कोणीच उत्सुक राहीले नाही ,मॉडरेशन कडे दुर्लक्ष झाले , मॉडरेशन अभावी फुकट ज्योतिष विचारणार्‍यांची संख्या बेसुमार वाढली , जन्मपत्रिकांंवर चर्चा होण्या ऐवजी आता क्रिकेट च्या मॅच चे निकाल , उपाय – तोडगे , मंत्र-तंत्र, अंधश्रद्धा पसरवणारे विषय , स्वामी /बुवा/ बापू यांचे प्रमाण वाढले , काहींना त्यात रुची असली तरी आम्ही जे कोअर ग्रुप मेंबर्स होतो त्यांना हे सहन झाले नाही.

मोठ्या कष्टाने उभा केलेला , लाडाकोडात वाढवलेला आणि एकेकाळी दर्जेदार आणि खात्रीच्या माहितीचा / ज्ञानाचा खजिना मानल्या गेलेल्या आमच्या ग्रुपचे असे धिंडवडे निघताना पाहण्या पेक्षा , तो सन्मानपूर्वक बंद करणे आम्हाला श्रेयस्कर वाटले आणि सर्वानुमते आम्ही तो ग्रुप अधिकृत रित्या बंद केला.

ग्रुप बंद झाल्याने या जातकाचे पुढे काय झाले हे कळण्याचा काही मार्ग नव्हता. आमचा ग्रुप बंद झाला तरी ग्रुप वरचे बरेच सक्रिय सभासद दुसर्‍या एका मोठ्या ग्रुपवर एकत्र येऊन चर्चा करत राहिलो. काही कालावधी नंतर अगदी योगायोगानेच ही जातक पुन्हा त्या दुसर्‍या ग्रुप च्या माध्यमातून समोर आली (फुकट भविष्याच्या नादात हा ग्रुप , तो ग्रुप , हा फोरम असे फिरत बसण्याची जातकाची सवय अजून गेली नव्हती!) , या खेपेला एक नवा प्रश्न विचारला होता, मला ही केस चांगली लक्षात होती,
मी न विचारताच जातकाने खुलासा केला ‘घटस्फोट झाला आहे!”

म्हणजे माझे घटस्फोटाचे भाकीत पण बरोबर आले फक्त मी सांगितलेल्या कालावधीत घटस्फोट झाला नाही इतकेच , त्याच बरोबर मी जातकाला तिच्या नोकरी –व्यवसाया बद्दल ज्या दोन गोष्टींचा अंदाज केला होता त्यातली पहिली बाब तर आधीच बरोबर आली होती आता आता दुसरी बाब पण बरोबर आली आहे असे जातकाने सांगितले!

या वेळेला जातकाने माझा खास उल्लेख करत , मी (च) तिची पत्रिका तपासून उत्तर द्यावे असा आग्रह धरला होता पण एव्हाना मी फुकट ज्योतिष सांगायचे बंद केले होते , मी मानधनाची मागणी करताच जातकाने संपर्क तोडला!

कसे आहे बघा, या जातकाच्या बाबतीत मी जी काही भाकिते केली होती म्हणजे विवाहाची तारीख, नोकरी – व्यवसाया बद्दलचा अंदाज, त्याच संदर्भातली केलेली दोन भाकिते आणि घटस्फोट होणार हे मेजर भाकीत, इतके सगळे मी बरोबर सांगितले होते तरीही मला मानधन देऊन आपल्या पुढच्या प्रश्ना बद्दल मार्गदर्शन घ्यावे असे जातकाला वाटू नये याचे वैषम्य वाटले. जातकाचा अजून माझ्यावरती विश्वास बसला नाही का ‘ज्योतिष फुकटच सांगितले पाहिजे / ज्योतिषांनी पैसे घेऊ नये / समाजसेवा करावी ‘ असे जातकाला अजून ही वाटते होते, काही सांगता येत नाही.

असो.

या जातकाची माहिती व पत्रिका :

जातक: महिला

जन्मदिनांक: 05 नोव्हेंबर 1971

जन्मवेळ: 03:55 पहाटे

जन्मस्थळ : बेंगलोर


 

 


 

ही पत्रिका मी जेव्हा पहिल्यांदा म्हणजे नोव्हेंबर 2001 साली अभ्यासली होती तेव्हा मी केलेली भाकिते अशी होती:

१) जातकाचा नोकरी – व्यवसाय :  लेखन / पत्रकारिता (त्यातही क्राईम रिपोर्टिंग , शोध पत्रकारिता)

२) जातकाचा विवाह योग कधी ? : एप्रिल 2005 ते जून 2005

३) जातकाचा घटस्फोट होण्याची शक्यता.:  मार्च 2006 ते जून 2008 या दरम्यान जातकाच्या वैवाहिक जीवनात मोठ्या अडचणी येऊन त्याचे पर्यवसान दुर्दैवी घटस्फोटात. 

४) जातकाच्या नोकरी – व्यवसाया बद्दल दोन भाकिते. :  

अ) जातक टीव्ही / चित्रपट या करमणुकीच्या माध्यमात प्रवेश करून कथा/पटकथा / संवाद लेखन , स्टेज शोज , माफक अभिनय अशा क्षेत्रात काम करेल.

ब) या क्षेत्रात सुरवातीला यश मिळाले तरी थोड्याच कालावधी नंतर एक मोठी फसवणूक झाल्याने जातकाला नैराश्य येऊन त्या व्यवसायातून बाहेर पडेल. नंतरचा कल अध्यात्म, गूढ / दैवी शक्तीची उपासना / साधना असा राहील.

सुदैवाने त्या वेळी मी केलेल्या अ‍ॅनालायसीस च्या सविस्तर नोंदी आज ही माझ्या कडे जपून ठेवलेल्या असल्याने त्या आधारे मी ही भाकिते कशी केली  ते आता सांगतो.

माझे तेव्हाचे अ‍ॅनालयसीस:

जातकाच्या जन्मपत्रिकेवर अगदी वर वर नजर टाकली तरी काही घटक चटकन डोळ्यात भरतात ते असे:

या पत्रिकेत एक नाही दोन नाही तब्बल 30 ग्रहयोग आहेत! आणि त्यातले बहुतेक अंशात्मक आहेत आणि काही नवपंचमांचा अपवाद वगळता युती आणि केंद्रयोग, प्रतियोग असे हार्ड अस्पेक्ट्स जास्त आहेत , अशा पत्रिका फार कमी पाहावयास मिळतात.

या ग्रहयोगांची यादी अशी आहे:

 1. रवी – चंद्र अंशात्मक षडाष्टक
 2. चंद्र – बुध प्रतियोग 13 अंशात
 3. चंद्र – शुक्र प्रतियोग 11 अंशात
 4. चंद्र – मंगळ केंद्र योग 12 अंशात
 5. चंद्र – गुरु अंशात्मक प्रतियोग
 6. चंद्र – शनी युती 6 अंशात
 7. चंद्र – युरेनस नवपंचम योग 5 अंशात
 8. चंद्र – नेपच्यून प्रतियोग 9 अंशात
 9. चंद्र – प्लुटो नवपंचम 11 अंशात
 10. रवी – मंगळ नवपंचम 12 अंशात
 11. रवी – शनी षडाष्टक 7 अंशात
 12. बुध – शुक्र अंशात्मक युती
 13. बुध – मंगळ अंशात्मक केंद्र योग
 14. बुध – गुरु युती 12 अंशात
 15. बुध – शनी प्रतियोग 6 अंशात
 16. बुध – नेपच्यून युती 4 अंशात
 17. शुक्र – मंगळ अंशात्मक केंद्र योग
 18. शुक्र – गुरु युती 10 अंशात
 19. शुक्र – शनी प्रतियोग 5 अंशात
 20. शुक्र – नेपच्यून युती 10 अंशात
 21. मंगळ – गुरु केंद्र योग 9 अंशात
 22. मंगळ – शनी केंद्र योग 6 अंशात
 23. मंगळ – युरेनस वाईड षडाष्टक 17 अंश
 24. मंगळ – नेपच्यून अंशात्मक केंद्र योग
 25. मंगळ – प्लुटो अंशात्मक षडाष्टक
 26. गुरु – शनी प्रतियोग 5 अंशात
 27. गुरु – नेपच्यून युती 8 अंशात
 28. शनी – युरेनस नवपंचम 11 अंशात
 29. शनी – नेपच्यून प्रतीयोग 3 अंशात
 30. शनी – प्लुटो नवपंचम 4 अंशात

[या पत्रिकेत युरेनस – प्लुटो राश्यात्मक युती पण आहे पण ती विचारात घेण्यात काहीच अर्थ नाही कारण युरेनस एका राशीत साधारणपणे 7 वर्षे रहात असल्याने ही युती तब्बल सात वर्षे आकाशात होती ! तसेच वर दिलेल्या यादीतले शनी – नेपच्यून , शनी – प्लुटो  , शनी – युरेनस हे  मंदगती ग्रहां मधले योग देखील बराच काळ चालणारे आहेत आणि त्या काळात जन्मलेल्या लाखो/ करोडो लोकांच्या पत्रिकांत हे योग असतातच त्या मुळे या योगांचा फार गंभीरपणे विचार करायची आवश्यकता नाही ]

जातकाची ही अशी पत्रिका आणि  त्यातले ग्रहयोग खास करुन शनी , शुक्र आणि चंद्र यांच्यातले ,  पाहताच काही गोष्टी माझ्या चटकन लक्षात आल्या:

१) विवाहासाठी अत्यंत अवघड पत्रिका
२) विवाहास विलंब
३) विवाहा झाला तरी तो सुखाचा असणार नाही
४) घटस्फोटाची मोठी शक्यता

जेव्हा जेव्हा (प्रथम) विवाहाचा प्रश्न असतो तेव्हा सर्वप्रथम पाहावयाचे ते जातकाचा विवाह  “लौकर विवाह – योग्य वयात विवाह – उशीरा विवाह ’ या तीन पैकी कोणत्या गटात मोडतो. इथे काही वेळा ‘उशीरा विवाह’  या गटातच ‘आजन्म अविवाहित’ हा उपगट असू शकतो. पण एखादी व्यक्ती आयुष्यभर अविवाहित राहील असे खात्रीने सांगू शकणारे  ग्रहयोग / ग्रहस्थिती अजून सापडलेली नाही. फारतर उशीरा आणि अतीउशीरा असा पाठ्यभेद आपण करू शकतो.

“लौकर विवाह – योग्य वयात विवाह – उशीरा विवाह “ ह्या व्याख्या तशा सापेक्ष आहेत म्हणजेच त्याची निश्चित अशी व्याख्या करता येत नाही. विवाहाचे कोणते वय योग्य हे बर्‍याचदा व्यक्ती, स्थळ, काळ , परिस्थिती सापेक्ष असते. जुन्या काळात मुलीचे लग्न  वयाच्या 7-8 वर्षाची असताना करून दिले जात असे तर काही जमातीत अजूनही पाळण्यातच विवाह लावायची प्रथा आहे. भारतातल्या विवाह विषयक कायद्यां नुसार मुलीचे वय 18+ आणि मुलाचे वय 21+ असल्या शिवाय तो विवाह कायदेशीर ठरतच नाही.

आज ही विवाहाचे वय हे धर्म , जात-पात , प्रांत , सामाजिक स्तर, शहरी / ग्रामीण, अशा अनेक घटकांवर अवलंबून असते. पन्नास वर्षापूर्वी शहरातल्या, शिकलेल्या मुलींची लग्ने 20-22 व्या वर्षी व्हायची आजकाल ही मर्यादा 27-28 अशी तिशी कडे कडे झुकली आहे, मुलांची लग्नाची वये ही त्या प्रमाणात 30 च्या पुढे आली आहेत. आजकालची तरुण पिढी नुसत्या पदवी पर्यंत थांबत नाही , त्याही पुढे जाऊन शिकतात, इथेच वयाची पंचविशी गाठली जाते त्यानंतर मग नोकरी मिळणे, घरदार उभे करणे , स्थिरस्थावर होणे यात काही वर्षे सहज जातात आणि आता लग्नाचा विचार करू म्हणे तो पर्यंत वयाची तिशी येते. .

त्या मुळे सर्वप्रथम जातकाची धर्म , जात-पात , प्रांत , सामाजिक स्तर, शहरी / ग्रामीण या अंगाने माहिती घेऊन तारतम्याने  ठरवायचे.  एकदा ही चौकट तयार झाली की मग जातकाच्या पत्रिकेतले ग्रहमान पाहून जातकाचा विवाह
“लौकर – योग्य वयात – उशीरा’ या पैकी कोणत्या गटात मोडतो आणि त्या नुसार जातकाचा विवाह कोणत्या कालखंडात होऊ शकतो याचा एक ढोबळ का होईना अंदाज बांधता येतो.

“लौकर – योग्य वयात – उशीरा’ लग्न यासाठी निश्चित / ठोस असे नियम नसले तरी काही ग्रहयोगां वरून असे अनुमान काढणे फारसे अवघड नाही. आता हे कोणते योग असे विचारलेत तर आत्ता या क्षणाला विस्तारभयास्तव संपूर्ण यादी देणे मला शक्य होणार नाही , त्यासाठी एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.

या केस स्ट्डी मध्ये नोव्हेंबर 2001 मध्ये जातक विचारत होती ‘माझा विवाह कधी?”.  जातकाचा जन्म 1971 चा असल्याने 2001 मध्ये जातकाचे वय 30 होती या वया पर्यंत विवाह झाला नसल्याने ही ‘उशीरा विवाह’ या गटात मोडणारी पत्रिका म्हणावी लागेल. त्यामुळे या जातकाच्या बाबतीत मला विवाह ‘लौकर – योग्य वयात – उशीरा’ हे पाहावयाची आवश्यकता पडलीच नाही प्रश्न विचारते वेळीच जातकाच्या विवाहास विलंब झाला आहे हे स्पष्ट झालेले होते तरीही विषय निघालाच आहे तर जातकाच्या पत्रिकेत असे कोणते ग्रहमान आहे ज्यामुळे जातकाच्या विवाहास विलंब झाला हे पाहणे औत्सुक्य पूर्ण राहील.

ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने पाहिल्यास विवाहास विलंब होण्या साठी एकच एक ग्रहस्थिती कारणीभूत असते असे नाही तर अनेक प्रकारच्या ग्रहस्थिती विवाहास विलंब घडवून आणू शकतात. विस्तारभयास्तव त्या सार्‍यांचा उहापोह इथे करता येणे शक्य नाही , जातकाच्या पत्रिकेत विवाहास विलंब दर्शवणारे ग्रहमान असे आहे:

 • चंद्र – शनी (वक्री) अंशात्मक युती
 • चंद्र – शनी (वक्री) युती , नेपच्यून च्या प्रतियोगात
 • चंद्र – शुक्र प्रतियोग
 • शुक्र – मंगळ अंशात्मक केंद्रयोग
 • शुक्र – शनी प्रतियोग
 • मंगळ – शनी केंद्रयोग
 • बुध – शनी प्रतियोग
 • सप्तमेश गुरु नेपच्युन च्या राशात्मक युतीत

जातकाचा विवाह वयाची तिशी ओलांडली तरी का झाला नाही याचे उत्तर या ग्रहस्थितीत आहे.

इतकेच नव्हे तर इतकी अशुभ ग्रहस्थिती असताना विवाह झालाच तर तो टिकणे अवघड आहे आणि असा विवाह टिकला तरी वैवाहिक जीवन सुखाचे होणे त्याहूनही कठीण!

असो.

जातकाच्या विवाहा बाबतीत हा प्राथमिक कयास बांधल्या नंतर मी जातकाचा विवाह कधी होईल या बद्दलचा विचार सुरू केला.

ही केस मी सोडवली तेव्हा मला ‘नक्षत्र पद्धती’ चा परिचय असला तरी ती फारशी वापरत नव्हतो (जन्मकुंडली साठी तर नाहीच नाही !)  त्यामुळे या पत्रिकेचा अभ्यास पारंपरिक ज्योतिषशास्त्रातल्या नियम / अडाख्यांच्या साह्याने केला होता.

 


 


 

जातकाने प्रश्न विचारला होता नोव्हेंबर 2001 मध्ये , त्या वेळेला जातकाची  गुरु दशा नुकतीच सुरू झालेली होती ( जुलै 2001) आणि या गुरु महादशेतली गुरुची अंतर्दशा चालू होती.

 गुरू जो सप्तमेश आहे त्याचीच  महादशा , आणि त्याचीच अंतर्दशा चालू आहे आणि ज्या ग्रहाची महादशा त्याच ग्रहाची अंतर्दशा प्रभावी असते याचा पडताळा नेहमीच येत असल्याने या गुरु महादशेतल्या गुरु अंतर्देशेत  म्हणजेच सप्टेंबर 2003 पर्यंत जातकाचा विवाह होऊ शकतो असा मी प्राथमिक अंदाज केला.

गुरु च्या दशेत , गुरुच्याच अंतर्दशेत कोणती विदशा फलदायी ठरेल हा प्रश्न पडला. विवाहा साठी द्वितीय (2) स्थान पण महत्त्वाचे. द्वितीय स्थानातला रवी ,  द्वितीयेश शुक्र आणि शुक्राच्या अंशात्मक युतीतला बुध या द्वितीय (2) स्थानाची फळे देणार असल्याने शुक्र किंवा रवी किंवा बुध विदशा पाहिल्या. या पैकी बुध हा लग्नेश व दशमेश असल्याने तो विवाहा साठी प्रतिकूल वाटला.  रवी आणि शुक्र विदशां मला योग्य वाटल्या , या दोन्ही विदशांचा एकत्रित कालावधी ऑगष्ट 2002 ते जानेवारी 2003 असा येतो.

या कालावधीतली गुरु आणि शनी ची गोचर भ्रमणे तपासणे हा माझा पुढचा टप्पा होता.

01 ऑगष्ट 2002 रोजी गोचर स्थिती अशी होती:

गुरु कर्केत आणि शनी मिथुनेत.

ह्या स्थितीत गुरु जातकाची 11, 3, 5, 7 ही स्थाने प्रभावित करत होता तर शनी 10, 12, 4, 7  ही स्थाने प्रभावित करत होता.

गुरु आणि शनीची ही स्थिती विवाहा साठी फारशी अनुकूल वाटली नाही.

पुढे शनी मिथुनेत आणि गुरु सिंहेत हे सिंहस्थाचे वर्ष म्हणून ते वगळावे लागणार.

आपण निवडलेली गुरु महादशा – गुरु अंतर्दशा तर सप्टेंबर 2003 ला संपणार आहे म्हणजे त्या कालावधीत विवाह घडणार नाही. मग पुढची शनीची अंतर्दशा पाहावयाची का असा प्रश्न पडला . शनीची सप्तमेश गुरु वर आणि शुक्रावर अशुभ का होईना दृष्टी आहे ( जातकाच्या विवाहाचे वाट्टोळे होणारच असेल तर अशी अशुभ दृष्टीच पाहीजे ना!) इतक्या भांडवलावर शनीच्या अंतर्दशेत म्हणजेच सप्टेंबर 2003 ते मार्च 2006 या कालावधीत विवाह घडून येऊ शकेल असे वाटल्याने मी त्या कालावधीतली गोचर भ्रमणे तपासली.

ऑगष्ट 2004 अखेरीस गुरु सिंहेतुन कन्येत दाखल होईल आणि 5 सप्टेंबर 2004 रोजी शनी कर्केत दाखल होईल म्हणजेच गुरु कन्येत आणि शनी कर्केत अशी स्थिती निर्माण होईल. या गोचरी नुसार:

गुरु जातकाची 1, 5, 7, 9 ही स्थाने प्रभावित करेल आणि

शनी जातकाची 11, 1, 5,  8 ही स्थाने प्रभावित करेल

ही स्थिती मला योग्य वाटली कारण या कालावधीत गुरु आणि शनी एकत्रित रित्या जातकाची 1, 5 ही स्थाने प्रभावित करणार होते.

कन्येत गुरु आणि कर्केत शनी ही स्थिती 13 जानेवारी 2005 पर्यंत टिकणार होती त्यानंतर शनी वक्री अवस्थेत मिथुनेत प्रवेश करेल आणि पुन्हा मार्गी होऊन 25 मे 2005 रोजी कर्केत दाखल होईल . तिथुन पुढे 27 सप्टेंबर 2005 पर्यंत म्हणजे गुरु तूळेत जाई पर्यंत वरील स्थिती कायम राहील.

म्हणजे 5 सप्टेंबर 2004  ते 14 जानेवारी 2005 आणि 25  मे 2005 ते 27 सप्टेंबर 2005 हे असे दोन कालखंड आहेत ज्या मध्ये गुरु कन्येत आणि शनी कर्केत अशी स्थिती असेल.

गुरु – शनी च्या गोचर भ्रमणा वरुन साधारण वर्ष निश्चित झाले की मंगळ आणि शुक्राच्या भ्रमणां वरुन महीन्या – दोन महीन्यांच्या आत बाहेरचा अंदाज आपण बांधू शकतो.

3 जून 2005 ला मंगळ मीनेत येईल म्हणजेच तो जातकाच्या सप्तम स्थानातून भ्रमण करेल त्याच वेळी तो गोचरीच्या गुरु शी (जो जातकाचा सप्तमेश आहे) राश्यात्मक नव पंचम योग करेल. जून 2005 च्या शेवटच्या आठवड्यात हा नव-पंचम अंशात्मक असेल.

27-28 -29 जून 2005 या कालावधीत गोचरीचा मंगळ जातकाच्या सप्तम स्थानावरून भ्रमण करत असताना जन्मस्थ (सप्तमेश) गुरुशी अंशात्मक नव-पंचम योग करेल. जातकाचा जन्मस्थ गुरु आणि गोचरीचा गुरु अंशात्मक लाभ योगात येतील. शुक्र त्या वेळी कर्केत असल्याने तो जातकाच्या लाभ स्थानातून भ्रमण करत असेल. गोचरीचे शनी, शुक्र आणि बुध जातकाच्या लाभस्थानात येतील. चंद्र देखील 28-29 जून या दोन दिवशी जातकाच्या सप्तमात असेल.

दशा विदशांचा विचार करता हा कालावधी गुरु महादशा- शनी अंतर्दशा – मंगळ विदशा असा येतो. त्यातल्या शुक्र आणि रवी सुक्ष्मदशांचा कालावधी इथे मॅच होतो. विदशा स्वामी मंगळ शनी आणि शुक्राच्या अंशात्मक योगात असल्याने मंगळाची विदशा सयुक्तीक वाटते.

या सगळ्याचा विचार करता आणि थोडे सेफ्टी मार्जीन राखत , जातकाचा विवाह 2005 च्या दुसर्‍या तिमाहीत म्हणजे एप्रिल –मे – जून 2005 या कालावधीत होईल असे भाकीत केले होते.

आणि ते बरोबर ही आले, जातकाने जून 2005 मध्ये विवाह झाला असे कळवले होते पण नेमका दिवस कळवला नाही.

माझे दुसरे भाकित होते: हा विवाह फार काळ टिकणार नाही, घटस्फोट होण्याची शक्यता आहे.

 

आता हे भाकीत मी कसे केले त्याबद्दल आपण या लेखाच्या दुसर्‍या भागात पाहू

 

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. Smruti

  मस्तच सोडवता कुंडली. हा अभ्यास काही सोपा नाही. त्यातही गहन म्हणजे महादशा आणि गोचर. जे भल्या भल्यांना जमत नाही ते म्हणजे घटना घडण्याचा नेमका कालावधी सांगणं. तुमच्या इतकी केस स्टडीज नवशिक्यांना सांगण्याचे कष्ट ही कुणी घेत नाही. Hats of to you. Thanks for sharing case studies with us. Good Luck Sir.

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद सुश्री स्मृतीजी

   मी माझे अनुभव समोर मांडत असतो कोणाला त्याचा उपयोग झाला तर मला आनंदच आहे

   सुहास गोखले

   0
 2. sandip

  सुहास जी
  एक शंका किंवा प्रश्न आपल्या तत्वात बसत नसेल तर उत्तर देउ नका. एखादा जातक प्रश्न घेउन येतो. माझ्या पत्नीची पत्रिका. गंभिर आजार होण्याची शक्यता कीती आहे?
  अश्या वेळी प्रश्नकुंडलीतून
  1) जातकाला स्वत: ला विधूर योग
  2) संततीला मातृ वियोग दिसतात का
  मी ज्योतिष विषयात बालवाडीत आहे. प्रश्न आपल्या सारख्या निष्णात माणसाना बावळटा सारखा वाटू शकेल
  उत्तर दिलत तरी नाहि दिलत तरी धन्यवाद.

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.