सौ. अंजली , वय वर्षे 35, लग्न होऊन आठ वर्षे झालेली आहेत, पण घरात पाळणा हालला नाही. गेले काही वर्षे विविध वैद्यकीय उपचार चालू होते पण कशालाच गुण आला नाही. पती-पत्नी दोघेही पूर्णपणे सक्षम आहेत याचा निर्वाळा सगळेच डॉक्टर छातीठोक पणे देत होते पण मग मूल का होत नाही याचे उत्तर मात्र त्यांच्या पाशी नव्हते, त्यांच्या विज्ञाना पाशी नव्हते की त्यांच्या बुद्द्धीप्रामाण्याच्या तत्वा नुसार पटेल असा कोणताही खुलासा ही त्यांना देता येत नव्हता !

विज्ञानाच्या आकलन शक्ती पलीकडेही जाऊन काही तरी आहे ही गोष्टच ते मान्य करत नाहीत आणि त्यांचे विज्ञान याचे उत्तरें द्यायला तोकडे पडतेय हे मान्य करायचा प्रांजळ पणाही दाखवता येत नाही!

असो, या असल्या तथाकथित बुद्धीप्रामाण्य वाद्यांना आणि अंनिस वाल्यांना जरा बाजूला ठेवू , त्यांना काय तो पोकळ आरडाओरडा करायचा ते करु द्यात. आपण आपल्या सौ. अंजलीच्या प्रश्नाबाबत ज्योतिषशास्त्रा द्वारे काय मार्गदर्शन करता येते ते पाहुयात.

सौ.अंजलीच्या जन्मवेळेचा काहीसा घोळ होता, तेव्हा जन्मवेळेची खातरजमा करुन घेऊन , जन्मवेळेचे शुद्धीकरण करत बसण्यात वेळ घालावण्या पेक्षा प्रश्नकुंडली द्वारे उत्तरे शोधण्याचे ठरवले. सौ. अंजलीने दिलेल्या ‘79’ क्रमांका नुसार तयार केलेली प्रश्नकंडली शेजारी छापली आहे.

 

 

प्रश्नकुंडलीचा तपशील:

दिनांक: 07 नोव्हेंबर 2013, गुरुवार: वेळ: 15:27:52 :स्थळ: देवळाली कॅंप, नाशीक :होरारी क्रमांक : 79 :अयनांश: न्यू के.पी. 23:57:37

प्रश्न आहे : सौ. अंजलीला संतान योग आहे का नाही?

ह्या प्रकारच्या प्रश्ना साठी प्रश्नकुंडलीतली खालील स्थाने मह्त्वाची असतात:

5: संतती स्थान

2: कुटुंबात वाढ

11: ईच्छापूर्ती

यात पंचम भाव (5) हा मुख्य (Principle) भाव मानला जातो.

प्रश्न कुंडली आहे आणि जातक समोरच बसला आहे, प्रश्न विचारता क्षणाची कुंडली मांडली आहे , तेव्हा हा चंद्र काय म्हणतो ते प्रथम पाहूयात.

 

चंद्र: पंचमात (5), चंदाची कर्क राशी लग्न स्थानी (1), चंद्र शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र पंचमात (5), लाभेश (11) आणि चतुर्थेश (4) , म्हणजे चंद्राचे एकंदर कार्येशत्व असे असेल .

चंद्र: 5/5/4, 11/1.

चंद्र संतान प्राप्तीच्या पंचमस्थानाचा (5) स्थानाचा बलवान कार्येश आहे, तसेच इच्छापूर्ती च्या लाभस्थानाचा (11) ही कार्येश आहे, प्रश्न कुंडली जातकाच्या प्रश्नाचा रोख बरोबर दाखवत आहे. म्हणजेच ही प्रश्नकुंडली आपल्याला सौ. अंजलीला संतान प्राप्ती होणार का नाही ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल.

सौ. अंजली ला संतान प्राप्ती होणार का नाही या साठी पंचमा (5) चा सब तपासला पाहीजे. पंचमाचा (5) सब लॉर्ड आहे चंद्र. या चंद्राचे कार्येशत्व आपण आधीच पाहीले आहे ते आहे, चंद्र: 5/5/4,11/ 1. चंद्र शुक्राच्या नक्षत्रात आहे आणि शुक्र मार्गी आहे. म्हणजे पंचमाच्या सब ने ग्रीन सिग्नल दिला आहे.

आता दशा –अंतर्दशा- विदशा तपाऊन ठरवूया की हे ‘कुणी तरी येणार येणार ग’ हे गाणं सौ. अंजलीच्या घरात वाजेल का?

 

प्रश्न विचारते वेळी शुक्राची महादशा चालू आहे, ती 30 ऑगष्ट 2033 पर्यंत आहे, पूर्ण वीस वर्षे आहेत ! बराच मोठा कालावधी आहे हा. सौ. अंजलीचे वय लक्षात घेता  संतान लाभले तर ते याच दशेत. कारण ही दशा संपेपर्यंत सौ. अंजली चक्क पंचावन्न वर्षाची झाली असेल!

महादशा स्वामी शुक्राचे कार्येशत्व:शुक्र पंचमात (5) , लाभेश (11) – चतुर्थेश (4), शुक्र केतु च्या नक्षत्रात , केतु भाग्यात.

शुक्र: 9/5/ -/ 4, 11.

शुक्र पंचमाचा (5)  कार्येश आहेच शिवाय इच्छापूर्ती च्या लाभ स्थानाचा (11) पण कार्येश होत आहे.

शुक्राचा सब गुरु आहे. गुरु व्ययात (12) आहे, षष्ठेश (6) व नवमेश (9) आहे, गुरु स्वनक्षत्री आहे गुरु: 12 / 12/ 6,9 / 6,9 . गुरु तसे बघितले संततीसाठी च्या 2, 5, 11 पैकी एकही स्थान देत नाही आहे पण त्याच बरोबर तो संततीच्या विरोधी भावांचा ( 1, 4, 10, 8 इ.) कार्येश ही होत नाही, थोडक्यात गुरु तटस्थ आहे. गुरु सारखा शुभ आणि संतती चा नैसर्गीक कारक ग्रह संततीच्या बाबतीत तटस्थ आहे , काही हरकत नाही, गुरु महाराज निदान काही वाईट तरी निश्चीतच करणार नाहीत.

शुक्र महादशा स्वामी असा संतती साठी अनुकूल आहे.आता अंतर्दशा पाहावयाच्या. प्रश्न विचारते वेळी शुक्राचीच अंतर्दशा चालू होती , म्हणजे शुक्रापासून सुरवात करत केतु पर्यत सगळ्याच ग्रहांच्या अंतर्दशा या वीस वर्षात येणार होत्या.

खरे तर प्रश्नकुंडलीचा ‘अटेंशन स्पॅन’ 3 ते 6 महीनेच ठेवावा, त्यापुढील कालावधीचा सहसा विचार करु नये, या 3-6 महिन्यात योग नसल्यास तसे जातकाला स्पष्टपणे सांगून , सहा महिन्यानंतर पुन्हा प्रश्न विचारण्या साठी सुचवावे.

सौ. अंजली च्या प्रश्न कुंडलीसाठी मात्र ही 3-6 महिन्यांची मर्यादा आपल्याला ओलांडावी लागणार आहे कारण गर्भावस्थाच मुळात नऊ महिन्यांची असते , म्हणजे किमान वर्ष – दीड वर्षाचा तरी स्पॅन ठेवायला नको का?

त्या दृष्टिने विचार करुन मी फक्त पहिल्या दोन अंतर्दशांचाच विचार करायचा ठरवले:

 1. शुक्र अंतर्दशा  : समाप्ती 29 डिसेंबर 2016
 2. रवी  अंतर्दशा  : समाप्ती 29 डिसेंबर 2017

नोव्हेंबर 2013 ते डिसेंबर 2017 , चार वर्षाचा कालावधी बास झाला , सध्यातरी याहून जास्त पुढे जायला नको.

आपण तपासणार असलेल्या अंतर्दशांत पहिली अंतर्दशा शुक्राचीच आहे, शुक्राचे कार्येशत्व आपण बघितलेच आहे, शुक्र संतती साठी अनुकूल आहे. तसेच एखाद्या ग्रहाच्या दशेत त्याच ग्रहाची अंतर्दशा प्रभावशाली असते , असा एक जवळजवळ नियमच झाला आहे. तेव्हा शुक्राची अंतर्दशा निवडायला काहीच हरकत नाही.

पण माझ्या नेहमीच्या सवयीने मी पुढची रवी ची अंतर्दशा ही तपासायचे ठरवले. रवी त्रितीय (3) स्थानात, धनेश (2), रवी गुरु च्या नक्षत्रात गुरु व्ययात (12) , षष्ठेश (6) व भाग्येश (9), रवी चे कार्येशत्व 12/3/6,9/2 . रविचा सब गुरुच आहे. एकंदर पाहता रवी काही संतती साठी फारसा अनुकूल नाही. म्हणजे आपल्याला आधी निवडलेल्या शुक्राच्या अंतर्दशेवरच लक्ष केंद्रित केले पाहीजे.

शुक्राची अंतर्दशा प्रश्न काला पासून 7 नोव्हेंबर 2013 ते 29 डिसेंबर 2016 अशी साधारण तीन वर्षाची आहे. नेमका कालनिर्णय करण्यासाठी आपल्याला या शुक्र अंतर्दशेतल्या विदशा तपासल्या पाहीजेत. या शुक्राच्या अंतर्दशेत सध्या शुक्राची विदशा चालू आहे म्हणजे पुन्हा एकदा , सर्वच ग्रहांच्या विदशा या शुक्र अंतर्दशेत येणार त्या तपासणे ओघानेच आले.

आता ईथे कॉमन सेन्स वापरायचा , सौ. अंजली आज संततीचा प्रश्न विचारतेय , (ते ही IVF यशस्वी होईल का अशा रितीने) म्हणजे या घटकेला तरी ती गर्भवती नाही (तसे असते तर ती संतती होईल का हा प्रश्न विचारायला कशाला आली असती?) म्हणजे यापुढील काळात IVF चा प्रयत्न, आणि तो यशस्वी ठरल्या नंतरची कमीत कमी सात महिने ते  साडे नऊ महिन्यांचा गर्भावस्थेचा काळ गृहित धरल्यास अपेक्षित घटनां येत्या आठ –नऊ महीन्यात तरी नक्कीच घडणार नाही, त्यामुळे नोव्हेंबर पासून आठ महिन्या नंतर जुन 2014 नंतर येणार्‍याच विदशा बघायच्या!

त्यामुळे पहिल्या दोन विदशा ज्या शुक्र आणि रवीच्या आहेत त्या सोडायच्या.

पुढची चंद्राची विदशा 20 मे 2014 ते 30 ऑगष्ट 2014 अशी आहे, सौ. अंजली आज गर्भवती नाही म्हणजे अगदी लौकरात लौकर म्हणजे ऑगष्ट महिन्यात प्रसुती होऊ शकते, हा हिशेब पूर्ण कालावधीची गर्भधारणा गृहीत धरुन,  पण काही वेळा सातव्या किंवा आठव्या महिन्यात सुद्धा प्रसुती होऊ शकते (आणि सौ. अंजलीच्या गुंतागुंतीच्या आणि नाजूक तब्बेतीचा विचार करता ही शक्यता जास्त!) , ती शक्यता गृहीत धरली तर प्रसुतीचा काळ जुन- जुलै 2014 मध्ये ही येऊ शकतो. तेव्हा चंद्राच्या विदशेचा विचार करणे आवश्यक आहे.

चंद्राचे कार्येशत्व आपण पाहीले आहेच, चंद्र: 5/5/4,11/ 1 म्हणजे चंद्र संततीस अनुकूल आहे. चंद्रा नंतरच्या पुढील विदशा आहेत: मंगळ, राहु, गुरु, शनी, बुध, आणि केतु त्याही बघितल्या पाहीजेतच.

आता इथे क्षणभर थांबून विचार करा.  दशा व अंतर्दशा स्वामी शुक्र आहे आणि तो पंचमा (5) चा आणि लाभाचा (11) कार्येश आहे, आपण बघितले आहे की संतती साठी व्दितीय (2) स्थानही आवश्यक असते , हे स्थान कुटुंबात होणारी वाढ दर्शवते. दशा आणि अंतर्दशा स्वामी द्वीतीय स्थानाचा (2) कार्येश नाही, तेव्हा निदान विदशा निवडताना तरी ती विदशा द्वितीय स्थानाची बलवान कार्येश आहे याला आपण जरा जास्त मह्त्व देऊ.

द्वितीय स्थानाचे कार्येश ग्रह कोणते?  व्दितीय स्थानातल्या ग्रहांच्या नक्षत्रातले ग्रह ‘अ’ दर्जाचे कार्येश, व्दितीय स्थानातले ग्रह ‘ब’ दर्जाचे कार्येश, द्वितियेशाच्या नक्षत्रातले ग्रह ‘क’ दर्जाचे कार्येश आणि शेवटी द्वितियेश स्वत: ‘ड’ दर्जाचा कार्येश.

मंगळ द्वितीय स्थानात आहे म्हणून तो  ‘ब’ दर्जाचा कार्येश, रवी द्वितीयेश म्हणून तो ‘ड’ दर्जाचा कार्येश, मंगळ आणि रवी दोघांच्या नक्षत्रात ग्रह नाहीत म्हणजे ‘अ” व ‘क’ दर्जाचे कार्येश कोणीही नाहीत. थोडक्यात मंगळ हा द्वीतीय स्थानाचा (2) बलवान कार्येश आहे तर रवी दुय्यम दर्जाचा कार्येश.शनी, बुध व राहु रवीच्या युतित आहेत पण ते द्वितीय स्थानाचे अत्यंत कमकुवत (ई दर्जाचे) कार्येश असल्याने त्यांची दखल घ्यायला नको.

आता ह्या ‘द्वितीय (2) ‘ या स्थानाच्या हिशेबाने आपण सर्व विदशांचा कस लावू.

चंद्र: द्वितीय स्थानाचा कार्येश नाही. बाद.

मंगळ: मंगळाचे कार्येशत्व तपासूया. मंगळ द्वितीयेत (2), दशमेश (10) व पंचमेश (5), मंगळ शुक्राच्या नक्षत्रात , शुक्र पंचमात (5) , लाभेश (11) व चतुर्थेश (4), म्हणजे मंगळ : 5/ 2/ 11, 4 / 10, 5 मंगळ तर संततीसाठीची तीनही स्थाने देत आहे ! मंगळाचा सब आहे, राहु. राहु स्वत: त्रितीय स्थानात आहे , स्वत:च्याच नक्षत्रात आहे, म्हणजे राहू : 3/3/-/- पण राहू रवी, शनी, बुधा च्या युतीत आहे आणी शुक्राच्या राशीत आहे. रवी संततीला फारसा अनुकूल नसला तरी विरोध ही करत नाही, शनी 12/3/9,6/ 7.8 आणी बुध 3/3/-/12,3 , शुक्र: 9/5/ -/ 4, 11 म्हणजे राहू संतती ला विरोध करत नाहीच उलट राशी स्वामी शुक्राच्या माध्यमातून संततीला लाभदायकच ठरणार आहे.

पण मंगळ चतुर्थ (4) आणि दशम (10) या दोन्ही संतती विरोधी भावांचा प्रथम दर्जाचा कार्येश आहे हे विसरता कामा नये. त्याचा विचार ही मी केला होता , त्या बद्दल खाली विस्ताराने लिहले आहे.

मग मंगळाची विदशा फायनल करायची का? त्या आधी आपण ठरल्या प्रमाणे बाकीच्या विदशा ही एकदा डोळ्या घालून घालूयात , No stone unturned!

मंगळा नंतर राहुची विदशा येणार , राहु चे कार्येशत्व आपण पाहिलेच आहे, राहु विदशा आपल्याला उपयोगाची नाही.

नंतर येते गुरु ची विदशा, गुरु व्ययात (12) , षष्ठेश (6) व भाग्येश (9), गुरु स्वत:च्याच नक्षत्रात , गुरु चे कार्येशत्व 12/12/6,9/6,9 , गुरु विदशा आपल्याला उपयोगाची नाही.

पुढची विदशा शनीची शनीचे कार्येशत्व 12/3/9,6/7,8 , शनी विदशा आपल्याला उपयोगाची नाही.

मग बुधाची विदशा? बुधाचे कार्येशत्व 3/3/-/3,12 , बुध ही काही अनुकूल नाही.

आता शेवटची विदशा असेल केतु ची. केतु भाग्यात (9) , स्वत:च्याच नक्षत्रात केतु : 9/9 /- / – केतु मंगळाच्या राशीत रवी, शनी, बुधा च्या दृष्टित आहे. रवी संततीला फारसा अनुकूल नाही, शनी 12/3/9,6/ 7.8 आणी बुध 3/3/-/12,3 , मंगळ 5/ 2/ 11, 4 / 10, 5 . म्हणजे केतु राशी स्वामी च्या माध्यमातून संतती साठी लाभदायक आहे , पण राहू केतु सारखे छाया ग्रह प्रथम त्यांच्या युतीत किंवा दृष्टीयोगात असलेल्या ग्रहांची फळें प्राधान्याने देतात मग त्यांच्या नक्षत्र स्वामी नुसार, त्यानंतर राशी स्वामी नुसार आणि सगळ्यात शेवटी स्थानगत फळें.  त्यामुळे मंगळाची (राशी स्वामी म्हणुन) फळे केतु देऊ शकेल का या बद्दल संदेह आहे.

सगळा विचार करता मंगळाची विदशा नक्की करायला हरकत नाही.

आता आपली शुक्र – शुक्र – मंगळ अशी साखळी तयार झाली.

मंगळाच्या विदशेचा कालावधी आहे 30 ऑगष्ट 2014 ते 9 नोव्हेंबर 2014. या काळात सौ. अंजलीला संतान प्राप्ती होऊ शकते. हा कालवधी गर्भधारणा झाल्यापासून पुढे नऊ महीन्यांची गर्भावस्था ह्या निसर्गाच्या गणितात पण बसत आहे.

आता ट्रांसीट चा कौल बघितला पाहीजे.

 

 

ट्रांसीट्चा विचार करताना आपला अपेक्षित कालावधी वर्षाच्या आसपासाचा असल्याने रवी चे भ्रमण तपासले पाहीजे. आपली साखळी शुक्र – शुक्र – मंगळ अशी असल्याने रवीचे गोचर भ्रमण शुक्राची रास – मंगळाचे नक्षत्र किंवा मंगळाची रास – शुक्राचे नक्षत्र असे असायला हवे.

आपला अपेक्षित कालावधी आहे. 30 ऑगष्ट 2014 ते 9 नोव्हेंबर 2014. या काळात रवी कोठे हे तपासले पाहीजे. साधारण 17 ऑगष्ट ते 16 सप्टेंबर या काळात रवी सिंहेत असेल, सिंहेचा स्वामी रवी आपल्या साखळीत नाही, रवी नंतर बुधाच्या कन्येत येईल , बुध आपल्या साखळीत नाही. 18 ऑक्टोबर ला रवी शुक्राच्या तुळेत दाखल होईल. तुळेत पहिलेच नक्षत्र मंगळाचे आहे. तुळेत 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत रवी शुक्राच्या राशीत आणि मंगळाच्या नक्षत्रात असेल. हा कालावधी आपल्या 30 ऑगष्ट 2014 ते 9 नोव्हेंबर 2014 या फ्रेम मध्ये फिट्ट बसतो आहे.

म्हणजे 18 ऑक्टोबर 2014 ते 23 ऑक्टोबर 2014 या काळात सौ. अंजली ला संतती प्राप्त होणार !

साधारण पणे गर्भारपणाचा कालावधी नऊ महीने नऊ दिवस असतो, त्या हिशेबाने जानेवारी 2014 च्या पहिल्या – दुसर्‍या आठवड्यात गर्भधारणां झाली पाहीजे. म्हणजे संतती साठी योग्य ते वैद्यकिय उपचार करुन घेण्यासाठी सौ. अंजली कडे 7 नोव्हेंबर ते 7 जानेवारी असे दोन महीने आहेत.

साधारण पणे अशा वाढलेल्या वयात (35) गर्भधारणा होणे , गर्भावस्थेचा पूर्ण कालावधी पार पाडून प्रसुती होणे म्हणजे एक प्रकारचे दिव्यच म्हणायचे !

त्या दृष्टीने मी साशंक होऊन  पुन्हा एकदा अंतर्दशा , विदशा तपासल्या. शुक्राची दशा , अंतर्दशा आहे , शुक्र अनुकुल आहे पण तसा तो चतुर्थ (4) या संतती विरोधी स्थानाचा पण कार्येश आहेच, पण घाबरायचे नाही हे चतुर्थाचे कार्येशत्व ‘ड’ दर्जाचे आहे.

काही वेळा विदशा दणका देऊ शकतात, त्यामुळे संतती विरोधी भावाच्या (1,4,8,10)  कोणत्या विदशा मधल्या काळात येऊन जाणार आहेत का हे पाहणे अगत्याचे ठरेल.

शुक्राच्या विदशे बाबत सवालच नाही. रवी विदशा पण सुदैवाने विरोधी नाही. नंतर येणारी चंद्राची विदशा मात्र काही काळजी निर्माण करु शकेल.  नंतर येईल ती आपण निवडलेली मंगळ विदशा , मंगळ  चतुर्थाचा (4) व दशमाचा (10) कार्येश असल्याने या विदशेत ही काही समस्या निर्माण होऊ शकतात.

पण लक्षात घ्या ,  विदशा / सुक्ष्म दशा स्वामी सहसा दशा स्वामी आणि अंतर्द्शा स्वामी च्या इच्छे विरुद्ध जात नाहीत, विरोध झाला तरीही तो सौम्य स्वरुपाचा , मामूली अडथळे , विलंब अशा स्वरुपाचा असतो पण संपूर्ण कार्य नाश करण्याची ताकद विदशेत / सुक्ष्मदशेत नसते. याबाबतीतला आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो असा:

आपल्या आयुष्यातल्या मोठ्या घटनां , ज्याला आपण ‘मैलाचे दगड – माईल स्टोन’ मानतो , ज्या घटना आपल्या आयुष्याला मोठी कलाटणीं देऊ शकतात, ज्या घटनां आपल्या आयुष्यातल्या पायाभूत (फाऊंडेशन) स्वरुपाच्या असतात,  ज्या घटनां आपल्या आयुष्यात अवघ्या एकदा का दोनदाच घडणार्‍या असतात, अशा घटनां दशा आणि अंतर्दशेच्या संपुर्ण ताब्यात असतात, या घटनाच्या बाबतीत विदशा , सुक्ष्म दशा , प्राण दशा , परंम दशा फारशी ढवळाढवळ   करु शकत नाहीत.

पण ज्या घटनां ज्या नित्यनेमाने (रुटीन) घडणार्‍या असतात  , ज्या घटनां आपल्या आयुष्यात बर्‍याच वेळा घडू शकतात, ज्या घटनां तुलनात्मक दृष्ट्या कमी महत्वाच्या असतात, अशा घटनांच्या बाबतीत मात्र विदशा (काही वेळा सुक्ष्मदशा देखील) निर्णायक ठरु शकते.

सौ. अंजलीच्या बाबतीत ‘संतती’ ही अशीच माइल -स्टोन पद्धतीची घटना आहे, एव्हढेच नव्हे तर सौ. अंजलीचे वय आणि नाजुक तब्बेत पाहता, अशी घट्ना तिच्या आयुष्यात एकदाच (now or never) घडू शकेल.  त्यामूळे दशा , अंतर्दशा स्वामी भक्कम आहेत ना , मग झाले तर,  त्या काहीशा प्रतिकूल अशा विदशांची फिकिर करायची गरज नाही.

तेव्हा गर्भधारणा होईल व गर्भावस्थेचे सर्व नऊ महिने पार पडतील. हा, आता मंगळ असल्याने शस्त्रक्रिया होणे स्वाभाविकच आहे , पण या अशा प्रकारच्या नाजुक आणि गुंतागुंतीच्या प्रसुतीत ‘सिझेरियन सेक्शन’ ने प्रसुती घडवून आणणे हाच जवळपास ‘नॉर्म’ च बनला आहे (कदाचित तो मार्ग जास्त सुरक्षित असावा), तेव्हा सौ. अंजलीच्या बाबतीत चंद्राची विदशा मे 2014 अखेर ते 30 ऑगष्ट 2-14 हा काळजीचा कालवधई असेल, हा जर सुखरुप ओलांडला गेला तर नंतर काळजीचे खास असे कोणतेही कारण नाही.

या सर्व तारखां सौ. अंजलीला लिहून दिल्या, इतके पॉझीटीव्ह रिडींग लिहून देताना मलाही अतिशय आनंद होत होता तर तिकडे केवळ योग आहेत , संतती होणार या बातमीनेच सौ. अंजलीच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा वाहू लागल्या! साहजीकच आहे म्हणा, संतती साठी आठ वर्षे तळमळत आहे  बिचारी. काय काय उपाय केले नसतील त्या पोरीने ! जो सांगेल तो उपाय करुन झाला होता, चार सहा डॉक्टर्स ना विचारुन झाले होते.

फेब्रुवारी 2014 च्या सुरवातीलाच  सौ. अंजली ने आनंदाची बातमी दिली, IVF ट्रीटमेंट यशस्वी होऊन गर्भधारणा झाली होती , पण तब्बेत अत्यंत नाजुक झाल्याने पूर्ण बेड रेस्ट आणि कमालीची काळजी घ्यावी लागणार होती, अगदी तारेवरची कसरत!

चांदण्यात न्या ग हिला , नटवा सजवा हिला, झोपाळे झुलवा

भोवताली बसा, हिला काय हवे पुसा , तिचे डोहाळे पुरवा, हो डोहाळे पुरवा

ग कुणी तरी , ग पारुताई , ग कुणीतरी येणार येणार ग

ग कुणीतरी येणार येणार ग , पाहुणा घरी येणार येणार ग

 

मी सौ. अंजलीला धीर दिला , “अंजली, काळजी करु नकोस , मी सांगीतल्या प्रमाणे पहिला टप्पा तर पार पडला ना? आता पुढचेही होईल सर्व व्यवस्थित..”

 

सौ. अंजली 18 ऑक्टोबर 2014 संध्याकाळी प्रसुत होऊन कन्या रत्न प्राप्त झाले.

त्या दिवशी प्रश्नकुंडली नुसार केतु ची सुक्ष्म दशा चालू होती. म्हणजे केतु जो संतती साठी चा दुसरा चांगला ग्रह होता त्याने ही आपला हातभार लावला. मंगळाची विदशा असल्याने प्रसुती सिझरियन सेक्शन ने करावी लागली, आणि शुक्राची दशा आणि अंतर्दशा असल्याने असेल कदाचित पण सौ. अंजलीची सुपुत्री नक्षत्रा सारखी देखणी म्हणता येईल अशी आहे.

इथे सौ. अंजली वर उपचार करणार्‍या डॉक्टर दांपत्याचे ही कौतुक केले पाहीजे , त्यांनी या केस मध्ये अफाट मेहेनत घेतली होती, गंमत म्हणजे , संपूर्ण गर्भावस्थेच्या काळात प्रत्येक तपासणीच्या वेळी डॉक्टर काळजीत होते,  सगळे सुरळीत पार पडेल का या बाबतीत काहीसे साशंक होते आणि   दर वेळी सौ. अंजलीच त्या डॉक्टरांना धीर देत होती,

“गोखले काकांनी सांगीतले आहे ना प्रसुती होणार म्हणून ,  मग ती  होणारच , अगदी त्यांनी सांगीतल्या प्रमाणे ऑक्टोबर 18 ते 23 ऑक्टोबर च्या दरम्यानच होणार !”

ते डॉक्टर दांपत्य नंतर मला भेटून गेले , भविष्य विचारायला नाही तर माझे आभार मानायला ! कारण माझ्या आश्वासक भविष्याने सौ. अंजलीचे मनोधैर्य कमालीचे वाढले होते , आणि तसे ते वाढले नसते तर प्रसुतीच काय पण गर्भधारणा सुद्धा होऊ शकली नसती अशी सौ.अंजलीची प्रकृती होती !

चला,  म्हणजे ज्योतिषशास्त्राचा असाही एक प्रभावी उपयोग करुन घेता येऊ शकतो हे निदान दोन तरी कट्टर बुद्धीप्रामाण्य वाद्यांना पटले, हे ही नसे थोडके!!

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

One comment

///////////////
 1. Rajendra

  Namaskar Sir ,
  I just come to know about your blog in last 3 days. Sir ji I must say that, I had never came across so well, in-depth, logical step by step explanation of any KP case studies examples. It is simply great . This is going to helps all who want to learn KP.

  Regards
  Rajendra

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.