मी गेले दहा वर्षे मधुमेहाचा रुग्ण आहे आणि ग्लुकोमीटर  ( जे रक्तातली साखर मोजते) हा माझ्या मित्र बनला आहे. प्रत्येक मधुमेह्याकडे असा ग्लुकोमीटर असणे अत्यंत आवश्यक आहे किंबहुना या ग्लुकोमीटर शिवाय आपण मधुमेहा बरोबरची लढाई चालूच ठेऊ शकणार नाही.

माझा पहीला ग्लुकोमीटर मी 2011 साली खरेदी केला होता त्यानंतर दर दोन – तीन वर्षांनी नवा ग्लुकोमीटर खरेदी करत आलो आहे. कोणताही ग्लुकोमीटर साधारण इतकाच कालावधी कार्यरत राहू शकतो असा माझा अनुभव आहे.  या कालावधी नंतर बहुतेक मीटर्स मधला सेन्सर खराब होतो,  त्यामागे काही कारणे ही आहेत. धूळ हे कदाचित त्यामागचे मोठे कारण असू शकेल शिवाय हे मीटर ज्याला आपण ‘मास प्रॉडक्शन ‘ पद्धतीने , सहज परवडणार्‍या किंमतीत उपलब्ध करुन दिले गेले असल्याने त्यातला महत्त्वाचा असा भाग ‘सेन्सर’ त्याची कार्यक्षमात दिर्घकाळ राहील अशा पद्धतीची बनवणे परवडण्यासारखे नसावे, जर टीकाऊ सेन्सर वापरला तर या मीटर ची किंमत हजारों रुपयांत गेली असती. पॅथॅलॉजी लॅब मधली उपकरणे दीर्घकाळ टिकतात पण ती महाग असतात. आता काही मिटर्स त्याला अपवाद असतील किंवा काहींचे मिटर वर्षानुवर्षे चांगली सेवा देत असतील पण माझा अनुभव मात्र काहीसा असा आहे. त्यामुळे मी दर अडीच – तीन वर्षां नवा ग्लुकोमीटर खरेदी करतो. या ग्लुकोमीटर च्या किंमतीही तशा फार नाहीत आज बरेसचे मिटर्स हे 250 ते 500 रुपयां मध्ये मिळतात त्यामुळे मिटर ही काही आयुष्यभराची गुंतवणूक समजली पाहीजे असे नाही, दर दोन- तीन वर्षाने असा खर्च करणे काही अवघड नाही, जिथे दर तीन वर्षांनी , काही खास कारण नसताना, चालू अवस्थेतले हजारों रुपयांचे मोबाईल फोन बदलले जातात त्या तुलनेत शे-पाचशेचा मीटर बदलणे ही किस झाड की पत्ती ठरेल.

गेले वर्षभर मी डॉ मोर्पेन या कंपनीचा मिटर वापरत आहे या मिटरचा माझा अनुभव फार चांगला आहे , वापरायला सोपा तर आहेच , त्याच्या टेस्टींग पट्ट्या देखील इतरांच्या तुलनेत स्वस्त आहेत. हा मिटर रक्तातल्या साखरेचे मोजमाप बर्‍या पैकी अचूक करतो आणि त्यात सातत्य असते असा माझा अनुभव आहे. पॅथॅलॉजी लॅब मधुन मिळालेल्या रिपोर्ट्च्या तुलनेत हा मीटर फार चूक ठरत नाही हे पण मी तपासले आहे. जगातला कोणतच ग्लुकोमीटर अगदी अचूक रिडींग देणार नाही साधारण 10 ते 15 % चूक त्यात असतेच हे मान्यच करावे लागते शिवाय ग्लुकोमीटर हा पूर्ण रक्तातली साखर मोजतो आणि लॅब मध्ये रक्तातल्या प्लाझमा नामक घटकातली साखर मोजली जाते त्यामुळे लॅब चा रिपोर्ट आणि ग्लुकोमिटरच्या रिडिंग मध्ये काही तफावत असणे अगदी नैसर्गिक आहे नव्हे तर असा फरक असायलाच पाहीजे!

डॉ मोर्पेन या कंपनीचा मिटर समाधानकारक असला तरी नजिकच्या काळात ‘बिट-ओ’ नामक मीटर बद्दल बरेच ऐकले,  बाजारात तसा नविनच , अगदी सळसळत्या उत्साहाच्या तरुण उद्योजकांच्या स्टार्ट अप कंपनीचे उत्पादन , ह्या मिटरच्या सुटसुटीतपणा आणि डायरेक्ट आपल्या मोबाईल फोनवरच रिडिंग घ्यायची कल्पना मला फार आवडली , किंमत ही फार नाही, फक्त 250 रुपये म्हणून हा मीटर घेतला, मला हा मिटर आणि 20 टेस्टींग स्ट्रीप्स असे स्टार्टर कीट ऑनलाईन मागवल्याने 449 ला घरपोच प्राप्त झाले.

मिटर त्याचे फिट फिनिश अप्रतिम आहे हे खुलेपणाने मान्यच केले पाहीजे अगदी एखाद्या जर्मन / जपानी उपकरणा सारखे ! अतिशय सुबक पॅकेजिंग होते प्रत्येक टेस्टींग स्ट्रीप एका स्वतंत्र प्लॅस्टीक पाऊच मध्ये हा एक सुखद धक्का होता. सुरवात तर छान झाली ! रिडींग्ज बरोबर यायला लागली , त्यावर खूष होऊन मी फेसबुक वर त्या अर्थाची पोष्ट पण टाकल्याचे आपल्याला आठवत असेल.

दरम्यान मी आणखी 50 टेस्टींग स्ट्रीप्स अ‍ॅमेझॉन वरुन मागवल्या. सुरवातीची काही रिडींज या ‘बिट-ओ’ मिटर ने बरोबर दाखवली असली तरी नंतर काय झाले कोणास ठाऊक प्रत्येक टेस्ट गणिक मला रिडींग्ज चुकत आहे असे जाणवायला लागले. आता मी गेले काही वर्षे दररोज शुगर तपासत असल्याने, तपासणी करताना माझ्या कडून कोणती चूक होण्याची सुतराम शक्यता नाही. तसेच माझे रोजचे खाणे एक सारखे  असते, मोठे मोठे बदल नसतात, व्यायामाच्या वेळा, प्रकार सगळे अगदी आखीव रेखीव असते. त्यामुळे माझी शुगर साधारण काय पातळी वर असते किंवा दिवसभरात त्यात कसे चढउतार होत असतात याचा मला अगदी छान अंदाज आहे त्यामुळे ‘बिट-ओ’ ने दाखवलेल्या रिडिंग्ज बद्दल मला शंका येऊ लागल्या मी मग ‘बिट- ओ’ वर टेस्ट करतानाच लगेचच म्हणजे अवघ्या काही सेकंदातच माझ्या जुन्या डॉ मोर्पेन च्या मिटर वर पण तपासण्या केल्या आणि दोन्हींच्या रिडिंग्ज मध्ये फार तफावत दिसली , आता कोणत्याही दोन मिटर मध्ये फरक असणे स्वाभाविक असले तरी इथे पडणारा फरक फार मोठा होता , डॉ मोर्पेन चा मिटर बरोबर दाखवत होता , चुका ‘बिट-ओ ‘ मिटर मध्येच सातत्याने दिसायला लागल्या. हे कमी का म्हणून ‘बिट-ओ’ चे फोन अ‍ॅप मधल्या मोठ्या मोठ्या चुका , त्रुटी पण प्रकर्षाने जाणवायला लागल्या. इतक्या की ते अ‍ॅप म्हणजे आख्ख्या सॉफ़्टवेअर इंजिनियरींगची भीषण चेष्टा / अपमान ठरला आहे ! ‘बिट-ओ’ मिटर या अ‍ॅप शिवाय काम करणे अशक्य असल्याने या अ‍ॅप ला टाळताही येत नव्हते, ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ असे जे म्हणतात ते अनुभवास येत होते!

शेवटी वैतागून मी ‘बिट-ओ’ मिटर कंपनीशी संपर्क साधून तक्रार केली , या मिटर बद्दलचे माझे असमाधान कळवले.  त्यांच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दोन एक दिवसात स्वत: फोन करुन माझ्या तक्रारी शांतपणे समजाऊन घेतल्या सुमारे तास भर आम्ही बोलत होतो, मी सुमारे पंधरा – वीस मोठ्या चूका त्यांना दाखवून दिल्या. त्याने ही मोकळेपणाने माझ्या या तक्रारीत काही तथ्य असल्याचे मान्य केले , कदाचित अशाच तक्रारी इतर ग्राहकांनीही केल्या असाव्यात.

शेवटी त्यांनी मला मी त्या मिटर साठी मोजलेले 449 रुपये परत करायचे ठरवले, हा मीटर मी डायरेक्ट या ‘बिट-ओ’ कंपनीच्या वेबसाईट वरूनच घेतला होता त्यामुळे त्याचे 449 परत करण्यास कंपनी बांधील होती पण जादाच्या 50 स्ट्रीप्स मात्र अ‍ॅमेझॉन मार्फत दुसर्‍या एका विक्रेत्या कडून  रुपये 649 मोजून घेतल्या होत्या . आता त्याचे पैसे परत करणे ‘बिट-ओ’ साठी बंधनकारक नव्हते तरी पण आश्चर्य म्हणजे तरी हि त्यांनी मनाचा मोठे पणा दाखवत ते ही पैसे परत करायचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी चेक द्वारे माझे रु 1098 परत केले. ‘बिट-ओ’ चा अनुभव खराब आला तरी त्या मिटर साठी आणि टेस्टींग स्ट्रीप्स मोजलेला पै न पै मला परत मिळाला! मिटर माझ्या कडेच पडून आहे तो परत करावा लागला नाही !

‘ग्राहकांचा संतोष हेच आमचे ब्रीदवाक्य’ अशा गप्पा मारणार्‍या अनेक कंपन्या आपण पाहतो पण ते प्रत्यक्षात आचरणात आणणार्‍या किती ?  ‘बिट-ओ’ चे उत्पादन असमाधानकारक अनुभव देऊन गेले असले तरी त्यांची तत्पर कस्टमर सेवा, ग्राहकांकडे समाधान होत नसेल तर ते मान्य करुन ग्राहकाने केलेला सर्व खर्च तत्परतेने परत करण्याचा मोठेपणा, मनाला भावून गेले, मिटर बद्दल चा अनुभव असमाधानकारक असला तर कंपनीचा अनुभव फार चांगला आला.

हे सारे भारतात होताना फार क्वचितच बघायला मिळते नाही का?

मान्य की आज त्यांच्या उत्पादनात काही त्रुटीं आहेत पण त्या तांत्रीक आहे , ठरवले तर त्या  दूर करता येतील, फार अवघड काम नाही ते. पण ग्राहकसन्मुख राहणे, ग्राहकाच्या समाधानाची काळजी घेणे हे काम अतिशय अवघड असते आणि म्हणूनच फार थोड्या कंपन्या हे करताना दिसतात.  जी कंपनी आपल्या ग्राहकांची इतकी काळजी घेते ती नक्कीच भरभराटीला येते, ‘बिट-ओ’ देखील त्याला अपवाद ठरनाही , मला खात्री आहे. त्यांना शुभेच्छा !

एखादी कंपनी चांगली असेल तर आपल्या उत्पादनांच्या दर्जा कडे आणि ग्राहकांच्या समाधाना कडे अटोकाट लक्ष देते किंबहुना एखाद्या चांगल्या कंपनीची ती पेहेचान आहे ! अर्थात आपण जेव्हा तक्रार करतो तेव्हा ती शांतपणे केली (भांडणाचा पवित्रा न घेता) तर नक्कीच काहीतरी समाधान्कारक तोडगा निघतोच असा माझा अनुभव आहे.

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.