ही घटना पूर्णपणे सत्य आहे , खोटे काही नाही. माझा स्वत:चा अनुभव आहे.

या लेखमालेतले पहीले दोन भाग इथे वाचा:

काहीसे अमानवी… भाग – २

काहीसे अमानवी… भाग – १

पण प्रकरण तेव्हढ्यावर थांबले नाही ! मुळात मला ह्या असल्या गूढ , अमानवी अशा विषयांची जात्याच आवड आणि हे असले काही अनुभव आपल्याला ही यावेत ही खुमखुमी त्यामुळेही असेल  एक अस्सल अनुभव येऊन ही मी सुधारलो नाही !

गुरुवार चा दिवस उजाडला , नेहमी प्रमाणे मी ८ वाजता पंडितजींच्या कडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला गेलो , तसे पाहीले तर पं. अरविंद गजेंद्रगडकरजी स्वत: एक उत्तम ज्योतिषी होते आणि बरेच आध्यात्मिक उपाय – तोडगे सांगत असत. कालच्या घटने बद्दल त्यांना विचारणार होतो पण नेमके त्या दिवशी पंडितजी जरा गडबडीत होते त्यामुळे तो योग काही आला नाही.

पंडितजींच्या घरुन येताना मी मुद्दाम वाकडी वाट करुन पुन्हा एकदा डहाणूकर कॉलनी मधून ‘त्या’ जागेवर आलो….

या वेळेला सकाळचे १०॥ वाजले असतील , टक्क उजेड होता, वाहनांची वर्दळ होती. मी ‘त्या’ वळणा वरच्या कलव्हर्ट पाशी थांबलो, काही काळ त्या कलव्हर्टच्या कठड्यावर बसलो. मला काहीही खास वेगळे असे दिसले नाही, हां , ते झाड मात्र दिवसाच्या उजेडात सुद्धा डेंजर दिसते होते हे नक्की. मी त्या झाडा पाशी गेलो, ओढा अर्थातच कोरडा होता.. दगड , रानटी गवत आणि लोकांनी फेकलेल्या कॅरी बॅग्ज शिवाय दुसरे काही नव्हते. झाडावर कोणा मोठ्या पक्षाचे घरटे वगैरे काही आहे का तपासले पण तसे काही दिसत नव्हते.

गुरुवार चा बाकीचा वेळ असा तसाच घालवला, नाही म्हणायला आठवड्याची साफ-सफाई , धोबीघाट (कपडे धुणे), पुढच्या दोन दिवसांच्या कपड्यांना इस्त्री करणे , मॅगी व तत्सम रसद पुरवठा पुरेसा आहे का तपासणे अशी रुटीन कामे इमानेइतबारे केली. मात्र हे सर्व करत असताना एक अस्पष्ट थरथर दिवसभर जाणवत राहीली आणि ते ‘संगीत’ !

ते काय , कसले संगीत होते ? पण मनात सतत फेर धरत होते , पुन्हा त्या जागेवर जाऊन ते संगीत एकदा तरी ऐकावे अशी जबरदस्त उबळ येत होती. (तुम्हाला सांगतो,  ते संगीत पुन्हा एकदा तरी ऐकायला मिळावे यासाठी मी आजही तळमळत आहे !)

शेवटी चैन पडेना म्हणून मी संध्याकाळी कोथरुडच्या थोरात उद्यानात काही वेळ बसलो , पक्षी उद्यानात पक्षी बघितले , थोडे बरे वाटले. त्या दिवशी रात्री मेस ला जेवायला गेलोच नाही , मॅगी वर भागवले, काही वेळ पुस्तक वाचत बसलो. पण कालचा प्रसंग , ते ‘संगीत’ काही डोक्यातून जायला तयार नव्हते , रात्र झाली, घड्याळचा काटा १० कडे झुकला ,  शेवटी मी ठरवले काही नाही आज पुन्हा त्या जागेवर त्याच वेळी जायचेच आणि बघायचे काय होते ते , ते संगीत ऐकायचेच !

मी प्लॅनिंग सुरु केले , काल साधारण रात्री २। वाजता तो प्रकार घडला होता, म्हणून मी त्याच वेळेला ‘त्या’ जागे वर जायचे ठरवले. मग काय दोन वाजे पर्यंत जागत बसलो. झोप येऊ नये म्हणून दोन तीन कप चहा मारला. चांगला भगभगीत प्रकाश देणारी टॉर्च माझ्याकडे होती ती बरोबर घेतली आणि साधारण दोन च्या सुमारास स्कूटर बाहेर काढली, बिल्डिंग मधल्या इतर रहीवाश्यांना त्रास होऊ नये (आणि कळू नये म्हणून ! ) म्हणून स्कूटर कपौंड च्या बाहेर काढून , बरीच पुढे ढकलत नेऊन मग किक मारली. खरे तर मला ‘तो’ स्पॉट गणंजय सोसायटी- अंधशाळा टी जंक्शन – कल्व्हर्ट असा अगदी जवळच्या मार्गाने गाठता आला असता पण कालचा पॅटर्न डिस्टर्ब होऊ नये मी पुन्हा कालच्याच वाटेने जायचे ठरवले म्हणजे कर्वे रस्ता – डहाणूकर कॉलनी मुख्य रस्ता – कमीन्स सर्कल – गांधीभवन रस्ता असे. त्यामुळे गणंजय सोसायटी मधून मी आझाद वाडी – सुतार दवाखान्या वरुन तसेच पुढे आलो , शिवाजी पुतळा ओलांडून मी उजव्या हाताला वळून म्हातोबा देवळाच्या लहान गल्लीतून कर्वे रस्त्यावर दाखल झालो, आता माझी दिशा वारज्याकडे होती.

वारज्याच्या दिशेने पुढे येत डहाणुकर कॉलनी च्या प्रवेशा पाशीच्या आयलंड पाशी आलो. त्या वेळी तिथे आयलंड नव्हते ,आता आहे, ट्रॅफीक सिग्नल्स सुद्धा बसवले आहेत! आयलंडला उजवी कडे वळून मी डहाडूकर कॉलनीतल्या आतल्या रस्त्यावर आलो. घड्याळात बघितले काल साधारण याच वेळेला मी इथे होतो. डहाणूकर सर्कल ओलांडले , कमिन्स चे गेट आले , कालच्या आणि आजच्या परिस्थितीत काहीच फरक नव्हता , उलट कमीन्स गेट वर मला जरा जास्तच सामसुम दिसली. गांधीभवन रस्त्याला लागण्यापूर्वी मी स्कूटर रस्त्याच्या कडेला घेऊन बंद केली. टॉर्च व्यवस्थित चालतो आहे ना हे तपासले , गाय छाप चा एक कडक , ताजातवाना बार भरला, बरी असते अशी किक .. मेंदू एकदम अ‍ॅलर्ट राहतो !

अशा फुल्ल तयारीत पुन्हा स्कूटरला किक मारली.

गांधीभवन रस्त्याला कालच्या सारखेच आजही अंधाराचे साम्राज्य होते. मी स्कूटर चा वेग अगदी कमीतकमी म्हणजे कसाबसा बॅलन्स राखला जाऊ शकेल इतका कमी ठेऊन अक्षरश: खुरडत खुरड्त पुढे निघालो. स्मृतीवनातून वाहणार्‍या वार्‍याचा जोर कालच्या तुलनेत जास्त होता.

जसे मी काल त्या स्पॉट वर पोहोचलो होतो अगदी तस्साच मी आज ही त्या जागेवर पोहोचलो. कालच्या आणि आजच्या पॅटर्न मध्ये काहीही फरक केला नव्हता असे मला वाटत होते पण नंतर जेव्हा गोविंद आचार्यांनी खुलासा केला तेव्हा लक्षात आले की एक गोष्ट माझ्याकडून करावयाची राहून गेली होती ती म्हणजे ‘स्कूटरचा हॉर्न’ वाजवणे. आज मी स्कूटर अगदी हळू चालवत होतो आणि मला त्या कल्वर्ट पाशी थांबायचेच असल्याने हॉर्न वाजवायची आवश्यकता भासली नाही.

मी अंदाज घेऊन काल साधारण जिथे माझी स्कूटर स्टॉल झाली होती त्याच जागेवर , रस्त्याच्या कडेला स्कुटर उभी केली. स्कुटर स्टॅन्ड ला लावली, समोरच्या ग्लॅव बॉक्स मधून टॉर्च काढून हातात घेतला पण तो बंदच ठेवला.  आता मी काहीसे सावध राहून एका एक पाऊल मोजून टाकत पुढे सरकायला सुरवात केली. दोन्ही बाजूला अगदी डोळ्यात तेल घालून म्हणतात ना तसे चौफेर लक्ष देत होतो. कालच्या आणि आजच्या परिस्थितीत जाणवण्या सारखा काहीच फरक नव्हता,  मी त्या कल्व्हर्ट पाशी पोचलो, किंबहुना काल ज्या जागी असताना तो भूल-भुलैय्या सुरु झाला होता त्याच जागी मी आता उभा होतो.

काहीतरी घडावे आणि पुन्हा तो खेळ सुरु व्हावा असे अत्यंत तिव्रतेने वाटत होते… काल ऐकलेले ते ‘संगीत’  पुन्हा एकदा थोडेतरी , एक झलक तरी ऐकायला मिळावी अशी आस लागून राहीली होती.. त्या तसल्या टेन्स परिस्थितीही माझी विनोद बुद्धी शाबूत होती.. विविध भारतीच्या फर्माईशी प्रोग्रॅम च्या निवेदका सारखे मी स्वत:शीच पूट्पुटलो “अब हम आपको सुनवाये जा रहे हैं एक स्वर्गिय संगीत , सुनना चाहते हैं ,  कोथरुड – पूना से सुहास गोखले…!” .. पण तसे काही झाले नाही.

तसाच पुढे येऊन मी त्या कल्वर्ट च्या कठड्यावर बसलो. टॉर्च चालू करुन चौफेर फिरवला काहीही वेगळे , विचित्र दिसले नाही.

जिथे तिथे चेष्टा मस्करी करण्याची माझी (वाईट) सवय ! (आता वयोमाना नुसार ती बरीच कमी झाली आहे ..)

मी टीपीकल रामसे बंधूंच्या हिंदीं सिनेमात असते तसे …” कोई है …  है .. है …. है …  अरे बजाव बजाव , हमकू गाणा सुणणेका हय ” असे काही बरळलो , तेही मोठ्याने! .. अर्थातच त्याला प्रत्युत्तर मिळाले नाही.

(गोविंद आचार्य नंतर म्हणाले होते … बेटा वाचलास ..  प्रत्युत्तर मिळाले असते तर तुझी काही खैर नव्हती..)

टॉर्च बंद करुन त्या कल्वर्ट वर आणखी थोडा वेळ बसलो. काहीही नाही सगळे सुमसाम, नाही म्हणायाला एक कोल्हा (का कुत्रा ?) बाजूने आला , रस्ता ओलांडून समोरच्या झाडीत गडप झाला. तेव्हढीच काय ती दखल घेण्या जोगी घटना. संगीत बिंगीत काही नाही, कमिन्स मधल्या मशिनरीची घरघर तेव्हढी ऐकायला येत होती. एक फोर्क लिफ़्ट कमिन्स च्या बॅक यार्डच्या एका टोका कडून दुसर्‍या टोकाकडे गेली त्याचा मोठा आवाज झाला.

समोरचे ते डेंजर झाड आज काही तितकेसे डेंजर वाटले नाही..मुळात ते झाड म्हणजे नेमके काय आहे याचा खुलासा मला काल (चांगलाच!) झाला असल्याने मी त्या झाडा कडे वेगळ्याच नजरेने पाहात असेन.  वारा चांगलाच जोरात आणि झोंबणारा होता.. त्याचा आता त्रास व्हायला लागला.. काहीही घडत नव्हते .. शेवटी मी कंटाळलो. स्कूटर पाशी गेलो , स्कूटर चालू केली आणि शांतपणे अंधशाळे समोरुन शार्प राईट घेऊन (काल हा शार्प राईट मी कसा घेतला असेन ?)  गणंजय च्या बॅडमिंटन हॉल वरुन सरळ आमच्या अपार्ट्मेंट पाशी पोहोचलो. आवाज होणार नाही याची दक्षता घेत मी चोरा सारखा स्कूटर पार्क करुन , घरात आलो. मला कोणी पाहीले नाही असा माझा समज होता पण..

“रात्री बेरात्री कोठे जात असता हो? “

बिल्डिंग मधल्या कदम काकांनी दुसरे दिवशी मला हटकलेच ! मी ही वेड पांघरुन पेडगाव ला जात म्हणालो..

“कोठे काय ?”

“नाही कसे , परवा रात्री खूप उशीरा आलात, काल ही मध्यरात्री नंतर बाहेर काय केला आणि लगेच अर्ध्या-पाऊण तासात परत आलात काय ? काही भलते सलते उद्योग तर नाही ना चालले”

“काका , तुम्ही काय माझ्यावर वॉच ठेऊन असता का ?”

“वॉच कशाला ठेवायला लागतो… दम्याचा त्रास आहे मला , एकदा ढास लागली की थांबतेय काय , मग बाल्कनीत वार्‍याला उभे राहीले की थोडे बरे वाटते , काल परवा दोन्ही दिवशी तू आला गेलास तेव्हा त्या वेळी मी बाल्कनीतच तर उभा होतो. सगळे बघत होतो  ना.”

“काका तसे काही नाही हो…”

“नाही कसे .. ये आत ये..बोलू आपण”

आता या कदम काकांना नाही कसे म्हणणार , एकदम कडक माणूस , त्यात सोसायटीचे सेक्रेटरी , आधीच बिल्डिंग मधले फ्लॅटस विद्यार्थ्यांना / बॅचलर्स ना भाड्याला देण्याला त्यांचा कडाडून विरोध होता, त्यात आता हे निमित्त त्यांना मिळाले तर माझ्या घरमालका कडे तक्रार करुन मला हाकलतील सुद्धा , काय सांगावे  …

मी कदम काकांना सगळा किस्सा सांगीतल्यावर त्यांना घामच फुटला ,

“गाढवा, एकदा झाले ते ठीक पण म्हणून लगेच दुसर्‍या दिवशी पण कशाला तडफडायला गेला होतास तिथे… नशीब काही वेडे वाकडे झाले नाही.. देवाची कृपा ..”

असे म्हणत ते आतल्या खोलीत गेले व येताना कसलासा अंगारा आणला , म्हणाले आता एकतर अशा रात्री बेरात्री त्या ‘तसल्या’ रस्त्यावरुन जा ये करु नकोस आणि वेळ पडलीच तर हा स्वामींचा अंगारा जवळ ठेव..

“आणि एक कर .. तू आमच्या नाना बापटांना भेट , ते कमीन्स मध्येच काही काळ काम करत असल्याने तुला जो अनुभव आला त्याबद्दल त्यांना काहीतरी माहीती असेल. बापट आध्यात्मिक आहेत , प.पू. गुळवणी महाराज संप्रदायातले आहेत , ते तुला एखादा उपाय पण सुचवतील बघ. नाना आपल्या जवळच राहतात,  पौड रोडवरच्या किनारा हॉटेलच्या शेजारच्या न्यू फ्रेंड्स सोसायटीत , माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. माझे नाव सांग त्यांना.”

अगदी त्याच दिवशी नाही तरी मी लौकरच नाना बापटांना पण भेटलो , काय योगायोग बघा ते पण सांगलीचेच निघाले ! एक तर सांगलीचे कनेक्शन आणि आम्हा दोघांनाही भूत – खेत , अतिंद्रिय शक्ती , अतर्क्य अनुभवाची आवड मग काय दर आठ –पंधरा दिवसांनी नाना बापटांच्या कडे जाणे सुरु झाले. माझ्या पोतडीत बरेच किस्से जमा झाले. अजुनही झाले असते पण नाना बापटांचे  हृदयविकाराने आकस्मिक देहावसान झाले , तो सिलसिला थांबला .

त्या नाना बापटांचे माझ्यावर उपकार आहेत, त्यांनी सांगीतलेले अचाट किस्से आणि श्री, गोविंद आचार्यांशी त्यांनी घडवून आणलेली माझी भेट !

त्या नंतर मी बर्‍याच वेळा ‘त्या’ रस्त्याने जा- ये केली पण ‘तसा’ अनुभव काही पुन्हा आला नाही. पुढे मी राहाण्याची जागा बदलली , इतकेच काय नोकरी – व्यवसायातल्या बदला मुळे पुणे ही सोडावे लागले. आजही मी पुण्याला कामासाठी येत असतो पण कोथरुड ला फार कमी वेळा येतो त्यामुळे ‘त्या’ रस्त्यावरुन जायचा योग मात्र काही आला नाही.

तेव्हाची ती बजाज सुपर स्कूटर आजही माझ्या कडे आहे , रनिंग कंडिशन मध्ये आहे. ती घेऊन मला ‘त्या’ जागी, ‘त्या’ वेळी जायचेय. ‘ते’ संगीत मला पुन्हा एकदा (एकदा तरी) ऐकायचे आहे. ‘वोही गाणा सुणणे का है ।’  आणि हो , आता ‘तिथे’ गेलोच तर न विसरता स्कूटरचा हॉर्न नक्की वाजवणार आहे !!

समाप्त

पण दादानु ,  त्या सांगलीच्या नाना बापटांच्या किस्स्यांचे काय ? अरे हो मी तर ते विसरलोच की…बाकी तुम्ही बरीक लक्षात ठेवलेनी ते ?   काय हरकत नाही… आता तुम्ही आठवण करुन दिलीच आहे तर मग सांगायलाच पाहीजे नाना बापटांनी सांगीतलेला किस्सा …

आणि ते गोविंद आचार्यांचे काय …?

बाकी अगदी कावल्या सारकी नजर हाये जनु,.. सांगतो.. ते पण सांगतो पण असाच जेव्हा मूड लागेल तेव्हा..

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

16 प्रतिक्रिया

///////////////
 1. स्वप्नील

  सुहास जी पुढे जे काही घडले ते मूड वगरे लागेल तेव्हा नको तर लवकरच आम्हाला सांगा . आम्ही उत्सुक आहोत आणि बाबाजी चा किस्सा पण लिहा ना, त्यासाठी पण उत्सुक आहोत . . आणि बाकी ज्या ज्या जोतीशांकडे म्हणजे, अगदी तुम्ही ज्यांचा ज्याचा उल्लेख केला आहेत लेखात त्या सगळ्याच्या तर्हा शेअर करा अशी आमची एक विनंती आहे .

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी ,

   अहो लिहावयाचे सगळेच आहे पण चार ओळी लिहावयाच्या म्हणले तरी त्यात बराच वेळ मोडतो. असे ठरवून आज हे एव्हडे (इतक्या अओळॉ / पॅराग्राफ्स) लिहायचेच असे मला करता येत नाही…मला वाटले किंवा अंत:प्रेरणा झाली की लिहावयास सुरवात करतो… काही वेळा एखाद्या विषयवार लिहावयास घेतले जाते पण पुढे ते अर्धवट सोडावे लागते. तरी पण मी प्रयत्न करेन.

   सुहास गोखले

   0
 2. स्वप्नील

  …. आणि हो सर मी पण नाना बापट यांच्याच मार्गातला आहे . means संप्रदायातील …!!

  0
 3. माधुरी लेले

  बापरे नुसतं वाचून पण घाबरायला झालं.. आता दिवसा उजेडी जाताना पण राम राम म्हणत जाणार.. तुमची पण कमाल आहे बाकी..

  0
  1. सुहास गोखले

   माधुरी ताई,

   अहो घाबरु नका … तुम्हाला नाही होणार काही त्रास … ह्याला एव्हढे घाबरलात तर पुढचा नाना बापटांचा किस्सा ऐकलात तर काय होईल ? मला अजून माझे स्वत:चे Out Of Body Experiences OBE लिहायचे आहेत तेव्हा काय ?

   मजा बाजूला ठेवली तर एक पहा .. तो एक वेगळ्या प्रकारचा अपघात होता.. त्यात शारिरीक त्रास , इजा , दुखापत वगैरे होण्याची शक्यता अगदी कमी असते. त्या अपघाता नंतर माझ्या अनेक संकल्पनांना धक्का बसला … खरे सत्य काय आहे याचा अंदाज आला … ते कोणते तरी टी,व्ही. चॅनेल म्हणते ना..”उघडा डोळे पहा नीट..” तसे काहीसे माझ्या बाबतीत झाले म्हणता येईल..नंतर मी या व अशा अनेक विषयांवर वाचले, अनेक लोकांशी माझी भेट झाली, चर्चा झाल्या.. काही प्रयोग मी स्वत: केले (आता मात्र त्यातले काही करत नाही..) अनेक बाबींचा खुलासा झाला… देव – देव असे जे आपण म्हणतो ते नक्की काय आहे / असू शकते याचा चांगलाच अंदाज आला.. देवाची पूजा करायची झालीच तर नेमकी कशी केली पाहीजे याची उत्तम जाण आली .. किंबहुना मी थोडासा नास्तीक झालो असे म्हणाले तर फारसे वावगे ठरणार नाही..

   असो. वेळ मिळाल्यास यावर जास्त खुलासा करेन.

   सुहास गोखले

   0
   1. माधुरी लेले

    थोडं गंमतीनं म्हटलं, परंतु असे अनुभव घ्ययलापण धाडस हवंच..नानांच्या आठवणी आणि गोविंदाचार्यांबद्दल वाचायचं आहेच.. सद्या लैच ताणतय..

    0
 4. स्वप्नील

  मला वाटले किंवा अंत:प्रेरणा झाली की लिहावयास सुरवात करतो—– असे असल्यामुळे तुम्ही एखादा लेख निम्मा सोडून दुसरा लिहिता काय ? आत्ता खुलासा झाला ! ok.सुहास जी मी पण आपल्या सारखे खूप जोतीशी फिरलो तसेच बर्याच अध्यात्मिक पद्धती , मार्ग , पंथ संप्रदाय यांच्या साधना माहिती करून घेतल्या . जरी आज मी एखाद्या साम्प्रदायातला असलो तरी कुठेही अडकून नाहीये . संप्रदाय, पंथ या पलीकडे जाऊन साधना करणे हेच महत्वाचे .

  0
 5. Himanshu

  शुद्ध भाषेत यास किडे असणे असे म्हणतात. पुढच्या वेळेस शिंक येईल याची काय ग्यारंटी? मालीका वाचताना मजा आली आणी ज्ञानातही भर पडली. नास्तिक बर्याच वर्षांपासुन हाेताे. आता तुमच्यामार्फत प्रुफ मिळताहेत.

  0
 6. Anant

  श्री. सुहासजी,

  मस्त !
  त्या संगीतात नक्कीच काही नारी जादू असणार त्याशिवाय तुम्ही एवढे धाडस करून पुन्हा प्रयत्न केला नसता.

  धन्यवाद,

  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   नक्कीच , मी जे काही ऐकले ते केवळ अलौकीक होते , माझ्या पोष्ट मध्ये मी लिहले आहे तसे ते म्युझीक थ्री डी स्वरुपाचे होते, त्त्यातल्या फ्रिक्वेंसीज आपल्या ऑडिओ स्पेक्ट्रम च्या बाहेरच्या असणार आणि काना पेक्षा त्या त्वचे ने किंवा आपल्याला अजूनही अज्ञात असलेल्या एखाद्या सेंसरी फॅकल्टी ने ग्रहण होत असेल. ती नवी फॅकल्टी मला त्या मितीत असताना मिळालेली होती असे दिसते. ते संगीत पुन्हा ऐकावे अशी प्रबळ ईच्छा होणारच … त्यासाठी काय पन..

   सुहास गोखले

   0
 7. Shridhar

  Apratim Likhan, ani ha lekh vachun tar dupari hi gham phutala, me sadhya punyatach asto, pan aata tya rastyavarun jatana mala ya lekhachi aathavan nakki yeel

  Dhanyawad
  Shridhar

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.