‘काल निर्णय’ या मालिकेतला हा माझा दुसरा लेख. या मालिकेतला पहिला लेख या इथे वाचावयास मिळेल.

हा दुसरा भाग वाचण्या पूर्वी वर उल्लेख केलेला पहिला भाग वाचणे आवश्यक आहे  तरच हा दुसरा भाग व्यवस्थित समजू शकेल.

‘काल निर्णय’ भाग – 1

आपण यापूर्वीच्या भागात पाहीले आहे की आपली जन्मपत्रिका हा आपल्या जन्मवेळेचा आकाशातल्या ग्रहस्थितीचा एक शास्त्रशुद्ध नकाशा असतो, आजच्या भाषेत बोलायचे तर तो आपल्या जन्म वेळेला आकाशातल्या असलेल्या ग्रहस्थितीचा एक ‘स्क्रिन शॉट’ असतो.

या स्क्रिन शॉट वरुन आपल्याला त्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल व आयुष्यातल्या घटनांबद्दल बरेच काही कळू शकते हे आपण भाग -1 मध्ये पाहीले, त्याच बरोबर आपण हे ही पाहीले आहे की जरी जन्मस्थ ग्रह स्थिती वरुन आपल्याला ‘घटना’ कोणत्या ते समजू शकले तरी त्या घटना नक्की केव्हा घडणार आहेत हे मात्र कळत नाही. ‘अपघात होणार’ हे कळते पण तो अपघात वयाच्या पाचव्या वर्षी होणार का पंच्याहत्तराव्या वर्षी ते कळत नाही. ह्या अशा सर्व संभाव्य घटनांचा कालनिर्णय करावयाचा असेल तर आपल्याला दुसर्‍या काही पद्धतींचा अवलंब करावा लागेल आणि म्हणुनच  विविध कालनिर्णय पद्धतिंचा शोध लावला गेला.

शेकडो वर्षांच्या अभ्यासातून , निरिक्षणांतून एक असा तर्क मांडण्यात आला की:

“जसा आपल्या जन्मा नंतर जसा जसा काळ पुढे सरकत राहतो, आपले वय वाढत राहाते तसेच आपल्या जन्मवेळेच्या स्थितीतले ग्रह ही त्यांच्या त्यांच्या गतीनुसार मार्गक्रमण करत राहणार. जर जन्मस्थ ग्रहस्थितीचा व्यक्तीच्या आयुष्याच्या जडणघडणी वर जर एव्हढा मोठा परिणाम होत अ‍सेल तर मग ह्या सततच्या बदलणार्‍या तात्कालिन ग्रहस्थितींचा ही त्या व्यक्तीच्या आयुष्यावर काहीतरी परिणाम होत असलाच पाहीजे”

डायनॅमिक अ‍ॅनॅलायसिस करताना हेच प्रमुख तत्व मानून आपल्या जन्मपत्रिकेतली ग्रह स्थिती (जन्मस्थ ग्रहस्थिती) आणि सध्याची ग्रहस्थिती (तात्कालिन ग्रह स्थिती) यांच्यात असलेला संबंध असणार (co-relation), काय आहे , कसा आहे हे तपासले जाते , अभ्यासले जाते. चंद्र रोज सरासरी 12 अंश तर रवी, बुध, शुक्र हे सरासरी 1 अंशाने पुढे सरकतात म्हणजेच आकाशातली ग्रह स्थिती दर दिवशी एव्हढेच नव्हे तर तासा मिनीटाला बदलत असते .जर आपण पुन्हा एकदा दुसर्‍या एखाद्या वेळेचा आकाशस्थ ग्रहांचा ‘स्क्रिन शॉट’ घेतला तर तो आपल्या जन्मवेळेच्या ग्रहस्थिती पेक्षा खूपच वेगळा असणार आहे . जशी जशी तात्कालिन ग्रह स्थिती बदलत जाते तस तसे ह्या तात्कालिन स्थितीतल्या ग्रहांचे जन्मस्थ ग्रहांशी होणारे योग ही बदलत राहतात आणि हे बदलणारे योगच आपल्याला आगामी काळात घडणार्‍या घटनां बद्दल मार्गदर्शन करतात त्यावरुन कालनिर्णय केला जातो.

हे ‘डायनॅमिक अ‍ॅनॅलायसिस’ करण्या साठी अनेक पद्धती विकसित केल्या गेल्या आहेत.

  1. ग्रहगोचर
  2. दशा पद्ध्ती
  3. प्रोग्रेशन्स
  4. डायरेकशन्स
  5. रिटर्नस

या त्या मुख्य पद्धती. तशा ईतर ही काही पद्धतीं प्रचलित आहेत पण फार कमी ज्योतिर्विद त्यांचा वपार करतात.

या पैकी दशा पद्धती हे एक प्रकारचे चंद्राचे नक्षत्रां मधले प्रोग्रेशन्सच आहे पण दुर्दैवाने त्याच्या मागचे सुत्र, विचार प्रक्रिया कालौघात नष्ट झाली आहे , आता जंगजंग पछाढले तरी त्याची कारण मिमांसा काय आहे हे सापडत नाही,  सबब ‘दशापद्धती’ हा एक स्वतंत्र विभाग मानला जातो.

कालनिर्णया साठी भारतात जवळ जवळ सर्वच ज्योतिर्विद (त्यात पारंपरिक व के.पी. वाले पण आले) ‘गोचरभ्रमण’ व ‘दशा पद्धती ‘ यांचाच वापर करतात. ‘द्शा पद्धती’ असे मी लिहले असले तरी त्यातही सुमारे 30 विविध प्रकारच्या दशा पद्धती आहेत. त्यापैकी ‘विशोत्तरी’ , ‘अष्टोत्तरी’, ‘योगीनी’ या दशा पद्धतीं जास्त प्रचलित आहेत.

अगदी थोडे ज्योतिर्वद ‘सेकंडरी प्रोग्रेशनस’ – दिनवर्ष पद्धती’ किंवा ‘सोलर रिटर्न – वर्षफळ’ या पद्धतींचा वापर करतात. पाश्चात्य ज्योतिर्विदांचे तर ‘सेकंडरी प्रोग्रेशनस’ – ’ आणि ‘सोलर रिटर्न’ याशिवाय पान ही हलत नाही.

डायरेक्शन्स मध्ये ज्याला ‘सरताज’ म्हणता येईल अशी एकच एक पद्धती आहे ” प्रायमरी डायरेक्शन’ पण ही पद्धती इतकी क्लिष्ट आहे की माझे गणित खूप चांगले असूनही मला ह्या पद्धतीचा वापर करणे जमलेले नाही. एव्हढेच काय आजची सर्वात्तम मानली जाणारी ज्योतिष सॉफ्टवेअ‍र्स (सोलर फायर, केपलर, जानुस इ.) सुद्धा ह्या प्रकरणात हात घालत नाहीत !

पूर्वीच्या पिढीतले अनेक नामवंत ज्योतिर्वद ‘परिभ्रमण पद्धती’ नामक पद्धती वापरत असत. क्वचित कोणी ‘सर्वतोभद्र’ ही नक्षत्रांवर आधारित पद्धती वापरल्याचा उल्लेख आहे. माझ्या सारखे ज्योतिषी याहून वेगळी अशी पद्धती वापरतात. पण ही पद्धती काहीशी ‘शिक्रेट’ असल्याने त्याबद्दल जास्त माहिती देणे उचित ठरणार नाही!!

हा इतका महत्वाचा आणि अपरिहार्य विषय असताना सुद्धा भारतात त्यावर काही नाव घेण्या जोगे लिखाण उपलब्ध नाही हे आपले सर्वांचे दुर्दैवच म्हणायचे.

या सर्व पद्धतींत सगळ्यात सोपी (गणिताच्या दृष्टीने) पद्धती ही ‘गोचर भ्रमण’ पद्धती. पण ही पद्धत तितकी भरवशाची न वाटल्याने आणखीही काही पद्धती निर्माण करण्यात आल्या. त्या मागे निश्चीत अशी विचार धारा (theory/ thought process) आहे.

‘गोचर भ्रमण’ मध्ये तात्कालीन ग्रह हे त्यांच्या त्यांचा निसर्ग नियमित गतीने भ्रमण करतात (natural movement) व अशा भ्रमणातून मिळालेली ग्रह स्थितीच वापरली जाते. ईतर पद्धतीत ग्रह एक विषीष्ट गुणकाने पुढे सरकवले जातात, (artificial movement / symbolic movement) हा प्रवास नैसर्गीक असेलच असे नाही. पण अनुभवातून काही उपयुक्त गुणक सिद्ध झाले आहेत त्यांचा ‘गोचर भ्रमण’ पेक्षा अधिक चांगला पडताळा येते हे मात्र खरे.,

पुढच्या भागात ‘गोचरपद्धती’ ने कालनिर्णयाचा जास्त सखोल विचार करुयात.

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.