या सर्व ग्रहस्थिती वरुन असे लक्षात येते की:

जातक सुखवस्तु , कर्तबगार , महत्वाकांक्षी, उत्कृष्ठ बुद्धीमत्ता , संवाद कौशल्य, श्रीमंती, वर्चस्व गाजवण्याची सवय असलेला, कलागुणांची आवड असलेला किंवा कलेच्या/ विद्येच्या जोरावर नाव लौकिक प्राप्त करुन घेणारा , व्यापारी पण त्याचवेळी बंडखोर , विचित्र / वैविध्यपूर्ण (चांगली / वाईट)  कृत्ये करणारा आणि मानसिक दृष्ट्या जरासा कमकुवत असावा. संतती असेल पण संतती विषयक काही समस्या नक्की असणार. प्रेम विवाह, रुढी-परंपरेच्या विपरीत किंवा घरच्यांचा विरोध पत्करुन केलेला विवाह , संपत्ती, कले वर आधारीत किंवा जुगारी पद्दतीच्या गुंतवणूकीवर आधारित व्यवसाय.

अर्थात हे शुक्र, बुध , मंगळ या महत्वाच्या ग्रहांच्या राशी नक्की माहीती नसताना वर्तवलेले अंदाज आहेत हे लक्षात ठेवले पाहीजे.

 

या लेखमालेतले पहीले तीन भाग इथे वाचा:

काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १

काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २

काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३

 

त्रिकेतल्या ग्रहस्थिती वरुन ढोबळ अंदाज आल्यानंतर मी  पत्रिकेतले महत्वाचे ग्रहयोग तपासले.

पत्रिकेतले ग्रहयोग तपासताना मी फक्त मुख्य योग विचारात घेतो, युती (० अंश) , केंद्र योग ( ९० अंश) , नव-पंचम (१२० अंश) आणि प्रतियोग ( १८० अंश). काहीजण लाभयोगाचा (६० अंश) विचार करतात पण लाभयोग परिणामाच्या दृष्टिने फारसे जोरकस असत नाहीत, लाभयोग अनुकूल वातावरण निर्माण करायला जरुर मदत करतात पण शेवटचा निर्णायक आघात करण्यात ते कोठेतरी कमी पडतात, बर्‍याच वेळा हे योग म्हणजे केवळ एक हुलकावणी ठरते, यश हातात आले म्हणे पर्यंत ते हातातून निसटून जाते! षडाष्टक योग (१५० अंश)  अशुभ फलदायी असतात हे मान्य असले तरी अशा योगांत गुरु,शनी, युरेनस अशा बड्या ग्रहांची उपस्थिती असेल तरच त्यांचा विचार करावा, पर्सनल प्लॅनेट्स ( रवी, चंद्र, बुध, शुक्र , मंगळ) यांच्यात होणारे षडाष्टक योग फारसे प्रभावी असत नाहीत असा माझा अनुभव आहे.

पत्रिकेतले ग्रहयोग तपासताना रवी पासुन सुरवात करुन , चंद्र, बुध, शुक, मंगळ अशा (सूर्य मालेचा क्रम) जावे. हा क्रम पाळलाच पाहीजे अशी कोणता नियम नाही की सक्ती नाही, पण अभ्यासाचा म्हणून शिस्तबद्ध असा क्रम ठरलेला असेल तर एखादा ग्रहयोग पाहायचा राहीला असे होणार नाही. ग्रहयोग पाहताना सुद्धा ग्रह ज्या स्थानात आहे तिथुन पुढची रास , त्यापुढची रास अशा क्रमाने गेल्यास काम सोपे होते आणि वेळ ही कमी लागतो!

 

जातकाची जन्मपत्रिका काहीशी अशी आहे. 

 

 

 

जातकाच्या पत्रिकेतले ग्रहयोग असे आहेत:

 

 • रवी- शनी युती
 • रवी-प्लुटो केंद्र योग
 • रवी- चंद्र नव-पंचम
 • रवी – युरेनस नव-पंचम योग
 • रवी – नेपच्युन षडाष्टक
 • रवी- गुरु केंद्र योग

 

 • चंद्र – युरेनस युती
 • चंद्र – गुरु षडाष्टक
 • चंद्र – शनी नवपंचम
 • चंद्र – शुक्र केंद्र योग

(बुध कोठे आहे हे माहीती नाही त्यामुळे बुधाचे ग्रह योग तपासता येणार नाहीत)

 • शुक्र – युरेनस केंद्र योग
 • शुक्र – नेपच्युन नवपंचम
 • शुक्र – गुरु नवपंचम

(मंगळ कोठे आहे हे माहीती नाही त्यामुळे मंगळाचे ग्रह योग तपासता येणार नाहीत)

 • गुरु – प्लुटो प्रतियोग
 • गुरु- युरेनस षडाष्टक
 • गुरु – नेपच्युन नवपंचम
 • गुरु – शनी केंद्र योग

 

 • शनी – प्लुटो केंद्र योग
 • शनी – युरेनस नवपंचम
 • शनी – नेपच्युन षडाष्टक

(जातकाच्या पत्रिकेत प्लुटो , युरेनस , आणि नेपच्युन  हेे ग्रह सलग एका पाठोपाठच्या राशीं मध्ये असल्याने त्यांच्यात कोणतेही मोठे ग्रह योग होत नाहीत)

रवी आणि चंद्र वगळता बाकी ग्रहांचे नेमके अंश माहीती नसल्याने वर दिलेले सर्व योग राश्यात्मक आहेत.  या ग्रहयोगांचा अगदी वरवरचा विचार केला तरी बरेच धागेदोरे हाताला लागतील.

वर दिलेली ग्रह  योगांची यादी मोठी आहे , आणि ही यादी मी हा लेख लिहित असताना कॉम्प्युटर च्या स्क्रिन वर जातकाची पत्रिका पाहून तयार केली आहे,  मात्र हा प्रसंग घडला त्यावेळी हॉटेलात माझ्या कडे साधे कागद पेन सुद्धा नव्हते  त्यामुळे तेव्हा अशी यादी (केवळ डोळ्या समोर पत्रिका उभी करुन !) तयार करणे शक्य नव्हते शिवाय इतके सारे ग्रहयोग तपासायचे ठरवले तर अर्धा-पाऊण तास सहज लागतो. त्या वेळी हॉटेलात असताना माझ्याकडे इतका वेळ उपलब्ध नव्हता त्यामुळे मी फक्त काही ठळक (शुक्र – नेपच्युन, रवी – शनी, गुरु- प्लुटो इ.) योगांचाच विचार तेव्हा केला होता.

नुसत्या एका ग्रह योगावर लिहायचे म्हणले तर पानेच्या पाने लिहावी लागतील, हा इतका मोठा डोस वाचकांना कितपत झेपेल ? असा विचार करुन मी प्रत्येक योगाची ठळक वैषीष्ट्ये लिहतो.  ‘ग्रहयोग आणि मानसशास्त्र’ हा माझा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय असला तरी विस्तारभयास्तव त्याला नाईलाजाने कात्री लावावी लागते आहे, आपण समजून घ्याल ही अपेक्षा.

ग्रहांची राशीगत आणि स्थानगत फळें आपण तपासली आहेतच आता ग्रहयोगांचा जसा जसा उलगडा होत जाईल तसे तसे जातकाच्या बाबतीत काही अनुमानें / आडाखें मुर्त स्वरुप होत जातील, असे जेव्हा होईल तेव्हा ती अनुमानें  मी विटकरी  रंगात , ठळक टाईपात लिहली आहेत !

(बुध , मंगळ पत्रिकेत कोठे आहेत हे माहीती नसल्याने बुध व  मंगळाच्या योगां बद्दल काही विचार करता येणार नाही)

 

रवी-शनी राश्यात्मक युती :

रवी आणि शनी हे नातेच मुळात पिता-पुत्र असे असले तरी या दोघांत कायमचे उभे असे वैर असते! एक राजेशाही ग्रह (रवी) आणि एक विरक्त , सेवाभावी ग्रह (शनी) एकमेकांच्या योगात असताना फारशी चांगली फळे निर्माण होऊ शकत नाहीत. रवीचे राजेशाही कारकत्व शनीच्या थंड, विरक्त अविर्भावा खाली अक्षरश: दडपले जाते. या योगावरच्या व्यक्तींना परिस्थितीशी मोठा संघर्ष करावा लागतो, या योगात शनी असल्याने यश मिळते पण त्याला फार उशीर होतो. प्रत्येक गोष्ट मोठ्या कष्टाने, अडथळे पार करत, विलंबाने प्राप्त होते. शनी फळें देतोच नाही असे नाही पण धीर धरा, चिकाटीने प्रयत्न करा, उशीर लागेल जरुर पण मी फळ देणारच असे शनीचे आश्वासन असते! काही वेळा तर यश अशा वेळी मिळतेे की जातकाला त्याचा काहीच उपयोग होत नाही, वराती मागुन घोडे असा काहीसा अनुभव येतो ! आयुष्यभर ‘मोठा साहेब’ होण्यासाठी धडपड्णार्‍या , तळमळणार्‍या व्यक्तीला ते पद प्राप्त होते पण कसे? सेवानिवृत्तीला अवघे दोन महीने राहीलेले असताना!!

शनीच्या प्रभावाने असा योग असलेल्या व्यक्ती कष्टाळू , चिकाटाच्या , काटकसरी, संयमी, पोक्त विचाराच्या असतात. वेडीवाकडी धाडसे करत नाहीत, कोणत्या फॅशन , फ़ॅड, लहर यांच्या आहारी जात नाहीत.

तरंगीनीबेनच्या पत्रिकेत ही रवी – शनी युती दिसत असली तरी ती बरीच वाईड आहे (दोन ग्रहांत २० अंशा पेक्षा जास्त) त्यामुळे ही युती अंशात्मक नाही , कमी प्रभावी आहे. त्याच वेळी ह्या  रवी-शनी युती वर, चतुर्थातल्या प्लुटो कडून केंद्र योग , दशमातल्या गुरुशी गुरु कडून पण केंद्र योग ,  नेपच्युन वृश्चिकेत असल्याने त्याचा लग्नातल्या शनी  (आणि  रवी)  शी षडाष्टक योग, चंद्र – शनी नव-पंचम असे योग कार्यरत आहेत हे पण लक्षात घेतले पाहीजे! (अर्थात हे योग अंशात्मक आहेत का नाही हे आत्ता सांगता येत पण निदान हे योग राश्यात्मक आहेत हे तरी नक्की!)

चंद्र – शनी आणि शनी-नेपच्यून नुसते राश्यात्मक योग जरी विचारात घेतले तरी सुद्धा ही रवी-शनी युती बरीच अशुभ फळे निर्माण करु शकते. या युती बद्दलचे एक निरिक्षण असे ही आहे की ही युती असताना जातकाचा आयुष्याचा पुर्वार्ध चांगला जातो पण उत्तरार्ध एकदम खराब जातो किंवा पुर्वार्ध खराब जातो पण उत्तरार्धात भरभराट होतो.  जातकाचे वय ४२ म्हणजे आयुष्याचा उत्तरार्ध चालू आहे जातकाचे कपडे, दागिने , रुबाब , अविर्भाव पाहता हा उत्तरार्ध चांगलाच आहे म्हणायचे!

जातकाच्या आयुष्यातला पुर्वार्ध बराच खराब गेला असणार.

या युतीचे आणखी एक फळ म्हणजे जातकाच्या वडीलांच्या नोकरी-व्यवसायातली अधोगती! जातकाच्या जन्मा बरोबरच जातकाच्या वडीलांची आर्थिक वा अन्य स्थिती उत्तरोत्तर खालावत गेली असेल , कदाचित वडीलांचे छत्र लौकरच हरपले असेल. ही युती असताना जातकाचे त्याच्या वडीलांशी पटत नाही. पंचमात हर्षल आहे म्हणजे जातकाने वडिलांच्या मना विरुद्ध जाऊन विवाह केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही  लग्ना तली  रवी- शनी युती जातकाचा विवाह उशिरा घडवण्याची शक्यता पण आहे. 

 

रवी – युरेनस नव-पंचम योग

असा योग असलेल्या व्यक्ती मोठ्या तडफदार असतात, रवीचा राजेशाही थाट आणि युरेनसची जबरद्स्त कार्यशक्ती यांचा सुंदर मिलाप या योगात पाहावयास मिळतो. हा योग असलेल्या जातकात उत्साह, धाडस, आत्मविश्वास, साहस, धडाडी , कर्तृत्व असते , यातच उत्तम बुद्धीमत्ता आणि कल्पकतेची जोड लाभलेली दिसते. दृढनिश्चय, चिकाटी आणि खंबीरपणा, हातात घेतलेले कोणतेही काम निर्धाराने पूर्ण करण्याची धमक या योगामुळे प्राप्त होते. कमी कालवधीत झपाट्याने प्रगती होताना दिसते.

 

चंद्र – युरेनस युती:

या योगा बद्दल श्री सि ई ओ कार्टर आपल्या ग्रंथात लिहतात:

There is high emotional tension.  Sometimes the affections are strangely and (possibly) tragically bestowed; there is an element of perversity and great determination, which may be directed wisely or unwisely, but very rarely follows any conventional or usual course.   The interests are nearly always strange, and both mind and feelings differ from those of ordinary humanity, often giving rise to conditions with which it is exceedingly difficult for another to deal, because the native is deaf to reason and seems unable to help himself, there being a veritable paralysis of the judgment.

मानसिक आणि स्वभावाच्या दृष्टीने जोरदार परिणाम, अत्यंत स्वतंत्र विचारसरणी, नाविन्यपूर्ण आणि चार –चौघां पेक्षा वेगळ्या गोष्टी करणे, विक्षीप्तपणा, लहरीपणा, इतर अशुभ योग असताना मानसिक दौर्बल्य, अस्थैर्य, मेंदूवर अवाजवी ताण शुभ योगातली युती बुद्धी आणि हुषारी देते, शुभ ग्रहांच्या नवपंचमातली युती संशोधन, साहीत्य, काव्य, कला , नव-कल्पना अशी फळे देते.

ही युती पंचमस्थानात आहे पण चंद्र – शनी योग होत असल्याने ही युती काही प्रमाणात बिघडलेली आहे. अशी बिघडलेली युती वैवाहीक जीवनात समस्या , सततची स्त्यित्यंतरे , अनपेक्षीत घटना देते, चतुर्थ स्थान बिघडलेले असल्यास मातेला त्रास , संकटे अशी फळे मिळू शकतात

पंचमात चंद्रा बरोबर हर्षल आहे, चंद्र – शनी नव-पंचम योग आहे , षष्ठात नेपच्युन आहे , बुध व्ययात असण्याची शक्यता आहे तसा तो असल्यास बुध- नेपच्युन प्रतियोग असेल, बुध लग्नातच असेल तर ती बुध – शनी युती असेल. बुध द्वितीय स्थानात असला तर त्याचा पंचमातल्या युरेनस व चंद्रा बरोबर केंद योग होईल, बुध कोठेही असला तरी , या सर्व ग्रहस्थिती वरुन आपल्याला असा अंदाज बांधता येईल की:

जातकाला जास्त काळजी करण्याची सवय असेल, नसलेले आजार झाले असल्याचा संशय सतत मनात असणे, आपल्या मनाने औषधे घेणे, नको इतका औषधांचा मारा करत राहणे, पथ्थ्यपाण्याचा अतिरेकी सोस किंवा मंत्रचळे पणा. आज अ‍ॅलोपॅथी , परवा होमिओपॅथी, तेरवा आयुर्वेद, मध्येच नेचरोपॅथी , कधी अक्युपंक्चर, तर कधी युनानी नुस्के असे प्रयोग करत राहाणे असा प्रकार असू शकतो. जातकाला कोणता तरी ‘फोबिया’ स्वरुपाचा मानसिक त्रास असावा, कदाचित ओसीडी किंवा डिप्रेशन देखील असू शकते.

जातकाच्या पत्रिकेतला पंचमातला हर्षल काही खास फळे देण्याची शक्यता आहे, हा हर्षल चंद्रा बरोबर असून शनीने बाधित झाला असल्याने संतती आणि विवाह विषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. हा हर्षल वक्री असेल तर जरा जास्तच अशुभ फळ मिळतील. जातकाचा विवाह झाला आहे पण हा विवाह काहीसा अनपेक्षीत, रुढी परंपरा आणि समाज मान्यता यांच्या विपरीत जाऊन झालेला असण्याची शक्यता आहे. जातकाचे वडीलांशी पटत नसणार हा अंदाज आपण आधीच बांधला आहे.

 

गुरु- नेपच्युन नव-पंचम:

हा योग अंशात्मक असेल अनेक उत्कृष्ठ फळें मिळू शकतात, ह्या प्रामुख्याने अध्यात्मिक , दैवी उपासना, लोकसेवा, भूतदया, अनुकंपा, समाधानी वृत्ती, दैवी शक्तींची मदत, दृष्टांत, ध्येयवाद, नावलौकीक , किर्ती, प्रसिद्धी, बौद्धीक क्षेत्र / काल क्षेत्र / साहीत्य क्षेत्रात अनुकूलता, स्फूर्ती, अंतर्ज्ञान, कल्पनाशक्ती, वाचासिद्धी किंवा तत्सम दैवी गुण.

(तरंगीनी बेन च्या पत्रिकेत हा योग वृश्चीक – मीन या जलराशीतून होत आहे हे महत्वाचे.)

 

चंद्र – शुक्र केंद्र योग

चंद्र आणि शुक्र यांच्यात दुहेरी अन्योन्य योग आहे. ही अनन्यसाधारण स्थिती आहे. अन्योन्य योग असल्याने चंद्र – शुक्र केंद्र योग असला तरी त्याची फळे चंद्र – शुक्र युती सारखीच मिळणार आहे. या योग धन – पंचम स्थानातून होत असल्याने आर्थिक बाबतीत आणि  कलेच्या क्षेत्रातली जोरकस फळे मिळण्याची शक्यता आहे. असा योग असलेल्या व्यक्ती चांगल्या शौकिन असतात, वस्त्रप्रावरणे, अत्तरे, दागीने, चैनीच्या वस्तु यांची खास आवड, उच्च दर्जाचा चोखंदळपणा असतो. व्यक्ति कलाकार नाहीतर कलेची मोठी चाहती असू शकते. असा योग असलेल्या व्यक्तींचे जीवन मोठ्या सुखात , चैनीत जाते.

 

शुक्र (धनस्थानात असेल तर) – गुरु  नवपंचम योग:

या योगा बद्दल श्री सि ई ओ कार्टर आपल्या ग्रंथात लिहतात:

The great gift of the combination seems to be grace of expression, although this may be expressed in some other forms too.

सर्वसाधारण जास्त उत्साह, आनंदी वृत्ती, लोकसंग्रह, प्रेमळ – कनवाळूपणा, नावलौलीक, किर्ती, कोणत्याही कलेत, विद्येत लौकर प्रसिद्धी, ललित लिखाण, ऐटबाज बोलणे, पोषाखात नजरेत भरण्या इतका निटनेटकेपणा , सौदर्याभिरुची, फॅशन, भपकेबाज पणा, गर्व, नाटकीपणा, मानसिक चांचल्य, अधिरपणा, लहरीपणा, विवाहा नंतर भाग्योदय, प्रेमात यश, उद्योगव्यवसायात सुसंधी, भाग्य व ऐहीक उन्नत्ती .

या पत्रिकेत शुक्र धनस्थानात नसेल तर तो लग्नात , व्ययात किंवा लाभात असेल, या स्थितीत आधी लिहलेले नव-पंचम योगाचे परिणाम खूप कमी होतील व त्या जागी उथळपणा, हीन अभिरुची, स्वच्छंदीपणा, ऐषोरामी वृत्ती, आळस, अनाठायी मानापमान, विकाराधीनता, पैशाचा हव्यास आणि उधळपट्टी, सततचे असमाधान अशा प्रकाराची फळें मिळण्याची शक्यता वाढेल.

भिन्न प्रवृत्तीच्या या दोन ग्रहां नव-पंचम योग भाग्य आणि ऐहीक प्रगतीस हातभार लावतो, असा योग असलेल्या व्यक्ती आर्थिक सुस्थितीत असतात. गुरु च्या प्रभावाने थोरा मोठ्यांच्या ओळखी असणे व त्या द्वारे अनेक लाभ मिळणे असे फळ मिळताना आढळते. गुरुची विद्वत्ता आणि शुक्राची कलामत्कता या योगात चांगली नावारुपास येते , असा व्यक्तीने कला क्षेत्रात काम केल्यास या अनुकूल परिस्थितीचा चांगला लाभ उठवता येईल. प्रसिद्धी व यश तुलनात्मदृष्ट्या लौकर प्राप्त होते.

गुरुच्या  कारकत्व या योगात ऐटबाजपणा, सुव्यवस्थितपणा, वागण्याबोलण्यातला सुसंस्कृतपणा , उच्च अभिरुची आनंदी वृत्ती, हौस , थोरामोठ्यांचा जनसंपर्क अशा अनेक मार्गाने समोर येते.

मात्र काही वेळा बडेजाव, फुशारक्या,गर्विष्ठ्पणा, भपकेबाज पणा, फॅशन चा अतिरेक , नाटकी स्वभाव अशी फळे मिळण्याची शक्यता आहे.

 

शुक्र – नेपच्युन नवपंचम (शुक्र धनस्थानात आहे असे गृहीत धरल्यास)  

या योगा बद्दल श्री सि ई ओ कार्टर आपल्या ग्रंथात लिहतात:

Probably the contact is most easily expressed in the form of music, but it may also come through the finer expressions of other forms of art, and in the hands of a genius, it may be, even appear in the guise of poetry.  It is pre-eminently the artist combination and is more nearly related to beauty than to either the moral or the scientific spheres.

या योगाचा अविष्कार मुख्यत्वे करुन कलेच्या , कल्पनाशक्तीच्या माध्यमातुन होतो. कला, भावना, अंत:स्फुर्ती, क्ल्पनाशक्ती, मनाच्या नाजुक संवेदना या दृष्टीने हा योग फलदायी होताना दिसतो. या योगा वरच्या  व्यक्ती प्रेमळ, कोमल, सदहृदयी , उत्तम स्फुर्ती व क्ल्पनाशक्ती असलेल्या असतात. अभिनय , संगीत, गायन वादन, चित्रकला, मुर्तीकला, नृत्य वगैरे  क्षेत्रात चांगले प्राविण्य मिळते. हा योग सुखी व ऐषोआरामी जीवनाची आवड निर्माण करतो. आरोग्य जरा नाजुक असते.

नेपच्युन आणि शुक्राची जातकुळी एकच असल्याने शुक्राच्या कारकत्वाचा अतिशय चांगला विकास या योगामुळे झालेला पहावयास मिळतो. कला, कल्पनाशक्ती, सृजनशीलता, सौदर्य, भावना या अंगाने या योगाचा विचार करता येतो. नव-पंचम योग असल्याने वर दिलेल्या क्षेत्रात अत्यंत चांगली (दणकेबाज) फळे मिळतात. अनेक कलावंतांच्या पत्रिकांत असा योग हमखास पहावयास मिळतो. मात्र नेपच्युन च्या प्रभावामुळे असा योग असलेल्या व्यक्ती जरा जास्तच भावनाशील व स्वप्नाळु असतात. स्वत:च्या कल्पनाविश्वास रममाण होताना काहीवेळा वास्तवतेचे भान सुटलेले पहावयास मिळते.

इंट्युईशन, खरी होणारी सूचक स्वप्ने पडणे, दृष्टांत होणे , ईश्वरभक्तीत तल्लीन होणे अशी फळे मिळण्याची शक्यता जास्त असते.

या योगा मुळे व्यक्ती कलासक्त बनते मात्र काही वेळा ही कलासक्ती टोकाची असते त्यातुन चैन , पैशाची उधळपट्टी, सुख – ऐषोरामाचा अतिरेक आणि काही वेळा आळशी पणा अशीही फळे मिळू शकतात.

तरंगिनी बेन बाबतीत कला , कलासक्ती, ऐषोआरामाची सवय, नव निर्मिती अशी फळे मिळण्याची शक्यता मोठी आहे.

जर तरंगिनी बेन चा शुक्र धनस्थाना ऐवजी लग्न, व्यय अथवा लाभ स्थानात असेल तर वर दिलेली फळे थोड्या कमी प्रमाणात का होईना मिळतीलच पण अशुभ योग होत असल्याने , जास्त भावनाशील स्वभाव, भावना सहज दुखावल्या जातात, लौकर नैराश्य येते, अपेक्षाभंगाचे दु:ख मोठे असते, अनेक वेळा काल्पनिक चिंता / भिती असते. वैवाहीक जीवनात काही वैगुण्य असते , शुक्र / नेपच्युन जास्त बिघडले असेल मानसिक त्रासाचे मानसिक विकृती मध्ये रुपांतर होऊ शकते.

 

तरंगिनीबेन च्या पत्रिकेत आणखी काही ग्रहयोग आहेत , त्याचा विचार आपण पुढच्या भागात करु.

 

क्रमश:

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री अविनाशजी , माझ्या बहुतेक लेखांना आपली प्रतिक्रिया असते माझ्या लेखनात रुची दाखवल्या बद्दल मनापासून आभार

   सुहास गोखले

   0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री हिमांशुजी

   भारतीय ज्योतिषशास्त्रात युरेनस , नेपच्युन आणि प्लुटो चा फारसा विचार केला जात नाही. या ग्रहां वर फारसे लिखाण पण उपलब्ध नाही. त्यामुळे मी जे थोडेफार वाचले , अनुभव घघेतले ती लिहण्याचा एक प्रयत्न केला आहे.

   सुहास गोखले

   +1
  1. सुहास गोखले

   श्री. प्राणेशजी,

   पर्सोनल प्लॅनेट्स म्हणजे रवी आणि चंद्र , बुध, शुक्र आणि मंगळ. हे ग्रह जे सूर्याला जवळ आहेत , जलद गतीचे आहेत त्यामुळे यांचा प्रभाव मनुष्यावर जास्त जवळीकीने होतो. यांनाच ‘ईनर प्लॅनेटस’ असे ही म्हणतात. तर गुरु , शनी, युरेनस, नेपच्युन , प्लुटो यांना ‘आऊटर प्लॅनेट्स’ असे संबोधतात.

   मंगळ आणि गुरु यांच्या मध्ये हजारो अ‍ॅस्ट्रॉईडस फिरत आहेत , हा आपल्या सूर्य मालिकेतला पहीला अ‍ॅस्ट्रॉईड बेल्ट आहे. हा संदर्भ (रेफरन्स ) धरल्याने रवी ते मंगळ हे ग्रह अल्याडचे (ईनर ) आणि गुरु ते प्लुटो हे पल्याडचे (आऊटर) असे मानले जाते.

   राहु व केतु हे गणीताने सिद्ध केलेले बिंदू असल्याने त्यांना आकार , वजन नाही , ते दिसत नाही त्यामुळे त्यांना ग्रह या संज्ञेत बसवता येत नाही.

   अ‍ॅस्ट्रॉईडस चा विचार भारतिय पारंपारीक ज्योतिषात केला जात नाही पण पाश्चात्य ज्योतिर्विदांनी या अ‍ॅस्ट्रॉईडस चा अनेक अंगाने अभ्यास केला आहे , निरिक्षणे नोंदवली आहेत. या अ‍ॅस्ट्रॉईडस चा भविष्य कथनात खूप उपयोग होतो, मी अनुभव घेतला आहे, पलास, वेस्ता, जुनो, शिरॉ , इरॉस, वल्कन , सेरेस, सेडना या अ‍ॅस्ट्रॉईडस चा चांगला अनुभव येतो.

   सुहास गोखले

   +1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.