मी अंदाज केला हा शुक्र धनस्थानात असावा कारण जातकाची सांपत्तीक स्थिती! विकएंड होम ,  हिरे – मोती युक्त दागिने, भारीतली साडी, क्लाव्हा डिझाईनची पर्स,  टॉप मॉडेल आयफोन , अशा अ‍ॅक्सेसरीज बाईंच्या उच्च अभिरुचीची आणि उत्तम सांपत्तीक स्थिती बद्दलची खात्री पटवून देत होत्या, त्याचा विचार करता तसेेच बाईंचा आवाज, डोळे,पाहता त्यांचा शुक्र कर्केत द्वितीय स्थानात असावा हा अंदाज बांधता जास्त बळकट होतो.

अंदाजा प्रमाणे शुक्र जर चंद्राच्या कर्केत असेल तर चंद्र हा शुक्राच्या तुळ राशीत असल्याने हा अन्योन्य योग (म्युच्युअल एक्स्चेँज) होतो, तसेच शुक्र धनस्थानात आल्याने  धनेश (चंद्र ) पंचमात आणि पंचमेश (शुक्र) धनात असा आणखी एक उत्तम अन्योन्य योग पण होतो. याच वेळी दशमातल्या मीनेच्या गुरु शी या शुक्राचा ‘नव-पंचम’ योग पण होईल. असे योग असणे हेच तरंगिनी बेन च्या बाबतीत जास्त समर्पक ठरेल. त्यांच्या संपन्नेतेचे मुळ ह्या योगां मध्येच असावे!

 (शुक्रा बद्दलचा माझा अंदाज नंतर बरोबर ही ठरला!)

 

या लेखमालेतला पहीला भाग इथे वाचा    काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १

या लेखमालेतला दुसरा  भाग इथे वाचा    काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २

 

उपलब्ध माहीती वरुन तयार केलेली तरंगीनी बेन ची पत्रिका साधारण अशी दिसेल:

(ग्रहस्थिती बरोबरच मी अंदाज  केलेले अंश पण दिले आहेत, एक गुरु सोडला बाकी सर्व ग्रहांचे अंश बरोबर ठरले !)

 

 

 

आता पुढे काय?

काहीशी अपुरी का होईना, अंदाजे का होईना जातकाची पत्रिका तयार झाली. पण याचा किति उपयोग होईल? कारण आपल्याला जातकाच्या पत्रिकेत नेपच्युन कोठे आहे हे माहीती आहे पण या नेपच्युन चे मंगळ  / बुध / शुक्राशी कोणते योग होत आहेत हे कळल्या शिवाय आपल्याला या नेपच्युन ची नेमकी फळे कोणती हे ठरवता येणार नाहीत. मंगळ कोठे आहे, कसा आहे हे कळल्या शिवाय आपल्याला मंगळाची दाहक आक्रमकता कशा प्रकारे व्यक्त होणार आहे हे समजणार नाही.

माहीती अपुरी आहे हे मान्य करुन आणि  बुध , शुक्र, मंगळ आणि राहु , केतु असे उर्वरीत ग्रह बाजूला ठेवले तरी आपल्याला या पत्रिकेतून काय बघता येईल?

या पत्रिकेवर अगदी वरवर नजर टाकली तरी लक्षात येणारी ठळक वैषिष्ट्यें अशी आहेत:

  • धनस्थानात शुक्र , पंचमातल्या चंद्राशी दुहेरी अन्योन्य योगात (म्हणजे चंद्र – शुक्र हा एक अन्योन्य योग अधिक धनेश पंचमात आणि पंचमेश धनात)
  • शुक्र – गुरु नवपंचम योग
  • पंचमस्थानात चंद्र – युरेनस युती
  • लग्नात रवी – शनी युती , गुरुच्या केंद्र योगात
  • चतुर्थ आणि दशम स्थानातून होणारा गुरु- प्लुटो प्रतियोग.
  • शुक्र – युरेनस केंद्र योग

वर दिलेल्या वैषिष्ट्यां बद्दल विचार करण्यापूर्वी आपण जरा जन्मलग्न, रवी- चंद्र आदि ग्रहांच्या राशी गत आणि स्थानगत फळांचा एक धावता आढावा घेऊ, मात्र ग्रहांचे अंश किती आहेत याचा आपण अंदाज केला असला तरी खात्री नसल्याने ग्रहांची नक्षत्रगत फळे तपासता येणार नाहीत.

ग्रंथांतुन दिलेली स्थानगत आणि राशी गत फळे कमालीची स्थुल असतात, फसवी असतात आणि बर्‍याच वेळा ती जशीच्या तशी अनुभवाला येत नाहीत. पण एक ढोबळ अंदाज या अंगाने त्याचा थोडाफार उपयोग होतो किंबहुना प्रत्यक्षातली फळे कशी असतील या बाबतच्या आपल्या विचारांची एक दिशा ठरवण्या साठी याचा चांगला उपयोग करुन घेता येईल.

या पत्रिकेत आपल्याला चंद्र , युरेनस, गुरु , शनी आणि रवी यांच्या स्थान आणि राशी बद्दल नेमकी माहीती आहे. शुक्राच्या स्थाना बद्दल बर्‍यापैकी अंदाज करु शकलो आहोत. प्लुटो हा तसा वैयक्तिक फळे देण्यापेक्षा मोठ्या जनसमुदायावर परिणाम करणारा ग्रह असल्याने प्लुटो च्या स्थान गत , राशी गत फळांचा वैयक्तिक बाबतीत फारसा प्रभाव दिसत नाही पण गुरु – प्लुटो प्रतियोग नक्कीच विचारात घ्यावा लागेल.

प्रत्येक ग्रहाच्या स्थानगत आणि राशी गत फळांचा विचार मी त्या वेळी केला होता पण आत ते सगळे तपशीलवार इथे या लेखात लिहायचे म्हणले तर फार मोठा पंक्तीप्रपंच होईल म्हणून या सार्‍या फळांचा अगदी थोडक्यात आढावा घेतो.

जातकाचे मिथुन लग्न  म्हणजे बुधाचे लग्न आहे. वाणी (बोलणे) आणि बुद्धीमत्ता यावर बुधाचा अंमल असल्याने या लग्नावर जन्मलेल्या व्यक्ती हुषार , बोलक्या, व्यवहार कुशल, व्यापारी वृत्तीच्या , उत्साही , अवखळ , हजरजवाबी, काहीशा संशयी , दुसर्‍यावर चटकन विश्वास न टाकणार्‍या अशा असतात. कोणताही नविन विषय चटकन समजतो/आकलन होते , कोणत्याही प्रकाराचे बौद्धीक काम आवडते / जमते. लेखणी आणि वाणी अस्स्खलित व जोरदार असते वादविवादाची आवड (का खुमखुमी?) असते, मन विचारी असते, बुद्धी प्रगल्भ असते , युक्तिवादाने एखाद्या विषयाचा निकाल लावण्याची हातोटी असते, शास्त्र,  यंत्र , गणित , तर्कशास्त्र अशा  विषयांची कल असतो.आवड असते, प्रवास आवडतात,  उत्कृष्ट आकलन शक्ती आणि शीघ्र योजकता असते. मात्र दृढनिश्चय, एकाग्रता , चिकाटी यांचा मोठा अभाव असल्याने यांच्या वागण्या-बोलण्यात सातत्य राहात नाही, मते – विचार सतत बदलत राहतात, विसंगती असते. थोड्या मानसिक श्रमाने सुद्धा थकवा येतो, मनाचा समतोल ढळतो. स्वभाव प्रेमळ , कनवाळू असला तरी काहीसा भित्रा असतो.

 

लग्नातला रवी मिथुनेत असल्याने चांगली बुद्धीमत्ता प्रदान करेल, स्वभाव मानी पण दिलदार असेल. आत्मविश्वास भरपूर असेल. उत्कृष्ठ सामाजीक दर्जा (पत) लाभते, हा रवी जातकाची तब्बेत कणखर / निरोगी ठेवतो.

सामान्यत: लग्नातला रवी हा एक शुभसंकेत मानला जातो. असा रवी जातकाला आकर्षक किंवा काहीसे मर्दानी सौदर्य बहाल करतो. जीवनरस मोठ्या प्रमाणात असल्याने असा रवी असलेले जातक काटक, कणखर असतात. कमालीचे आत्मविश्वासी असतात. सकारात्मक वागणे-बोलणे , नेतृत्व गुण , धाडसी स्वभाव . लढाऊ वृत्ती जात्याच असते. हा रवी पापग्रहांनी दुषित असला तरी हे गुण लपून राहात नाहीत, तब्बेत बिघडली तरी चटकन त्यात सुधार पडतो.  पत्रिकेत इतर ग्रहमान अनुकूल असल्यास असा रवी असलेल्या व्यक्ती अल्पावधीतच मोठी झेप घेतात, वयाच्या अवघ्या तिशीतच अशा व्यक्ती कर्तृत्वाचे शिखर गाठू शकतात. बर्‍याच वेळा या रवी मुळे जातकाला आयुष्यात अनेक सुसंधी प्राप्त होतात आणि जातक त्यांचा तत्परतेने लाभ घेताना आढळतो. जर या रवीशी शुक्र किंवा गुरुचे शुभ योग होत असतील दुधात साखर !

जातकाच्या पत्रिकेतला हा लग्नातला रवी शनीच्या (राश्यात्मक) युतीत असल्याने लग्नातल्या रवी ची खास अशी फळे असतात ती काहीशी कमी प्रमाणात मिळतील.

 

लग्नातला शनी उशीरा विवाह देण्याची शक्यता असली तरी हा मिथुनेचा शनी बुद्धीमत्ता आणि विद्येला पोषक ठरणारा आहे. मात्र हा शनी जातकाला जरा जास्तच गंभीर करतो, जास्तच सावध आणि काहीवेळा लाजाळू बनवतो. ‘धाडस’ , ‘नाविन्य’ आणि ‘गती’ शनीला मंजुर नसल्याने लग्नात शनी असलेला जातक असा कोणता प्रयत्नही करत नाही, सदानकदा घिसापीटा रस्ता तुडवणे त्याला सुरक्षित वाटते. मात्र असा शनी असलेलेल जातक कमालीचे कष्टाळू असतात , नेमून दिलेले काम इमाने इतबारे न थकता , न कंटाळता करत राहाणे एव्हढेच यांना माहिती असते.  बर्‍याच वेळा  अशा जातकांना अगदी लहान वयातच कामाला जुंपून घ्यावे लागते. परिस्थितीचा रेटाच इतका जबरदस्त असतो की त्यांना इतर कोणता पर्यायच शिल्लक राहिलेला नसतो. त्यामुळेच असेल कदाचित अशा व्यक्ती जास्त लौकर प्रौढत्व प्राप्त करून घेतात. कष्ट हा स्थायीभाव असल्याने अशा व्यक्तींना कामा शिवाय दुसरे काही अवधान नसते, सतत काम एके काम , त्यातच शनीची कडक शिस्त !

असा शनी असता, जातकाचे बालपण काहीसे कष्टात जाते , हा शनी जर अशुभ ग्रहांच्या अशुभ योगात असेल तर हे अनुमान जास्त बळकट होते. या शनीचा एक लाभ म्हणजे दीर्घायुष्य ! मरण यांच्यापासुन लांब पळते असे म्हणले तर फारसे चूक ठरणार नाही!

 

धन स्थानातला शुक्र जातकाला (त्यातही स्त्री जातकाला जास्त करुन)  सुंदर भिवया, सुंदर पाणीदार डोळे , कंपयुक्त गोड आवाज, दुसर्‍यावर छाप टाकणारे बोलणे, श्रीमंती, चैनीच्या वस्तुन, दागदागीने , खाद्यपदार्थ यांची आवड निर्माण करतो. मुळात शुक्रा सारखा ग्रह धनस्थानात असल्याने अशा उच्च (आणि खर्चिक) आवडीनिवडी पुरवायला आवश्यक असलेली चांगली सांपत्तीक स्थिती जातकाला मिळतेच.

असा शुक्र त्याच्या कारकत्वा नुसार म्हणजे गाणी, कला, समाजकार्य, चैनीच्या वस्तू, दागदागीने-अलंकार, वस्त्रे प्रावरणे, खाद्यपदार्थ अशा विषयात कमालीची रुची देतो आणि बहुदा जातकाचा नोकरी-व्यवसाय देखील या क्षेत्रांशी संबधीत असतो.

शुक्राचे धनस्थानातले आस्तित्व आर्थिक संपन्नता दाखवते. असा शुक्र असलेल्या बहुसंख्य व्यक्ती अगदी धनाढ्य नसल्यातरी सुखवस्तु या सदरात मोडणार्‍या असतात, कला, चैनीच्या वस्तु हा अशा शुक्र असलेल्या जातकांचे मर्मस्थान असते आणि बहुतांश जातकांच्या बाबतीत ही हौस मौज पूर्ण पण होताना दिसते.

शुक्राचे कारकत्व बघितले तर ते कला, नखरा, शृंगार , चैन , रसिकता असेच आहे त्यामुळे या स्थानातला शुक्र जातकाला याच क्षेत्रांत ठेवतो, जातक स्वत: कलाकार नसला तरी कला विषयांची त्याला चांगली जाण असू शकते , असे जातक कलेचे मोठे दर्दी / चाहते असतात.  कलेची उत्तम जाण असल्याने केवळ महागड्याच नव्हे तर साध्या साध्या गोष्टीतले सौदर्य सुद्धा अशा जातकांना सहजी दिसते आणि त्यांची कदर केली जाते. त्यातही महीला जातकांच्या बाबतीत हे अनुमान जास्त प्रकर्षाने लागू पडताना दिसते.

(हे सर्व वर्णन तरंगिनी बेन च्या बाबतीत अगदी तंतोतंत लागु पडत होते! )

जातकाचा गुरु दशमात असल्याने त्याचा व शुक्राचा नवपंचम योग होत आहे. हा शुभ योग जातकाला अनेक मार्गानी चांगले घसघशीत लाभ देणारा ठरेल.

धनस्थानातल्या शुक्राचे मंगळाशी शुभ योग होत असतील तर उत्कृष्ठ सांपत्तीक दर्जा प्राप्त होतो. धनस्थानातल्या या शुक्राचे गुरुशी शुभ योग होत असतील तर थोरामोठ्यांच्या ओळखी होतात आणि त्याद्वारे अनेक लाभ मिळतात.

(प्रत्यक्षात जातकाचा मंगळ दशमातच गुरु च्या युतीत असल्याने मंगळाचा व शुक्राचा नवपंचम योग होत आहे. हा दुहेरी नव-पंचम योग जातकाला भाग्यशाली बनवणारा ठरला आहे.)

पत्रिकेत पंचमस्थानात दोन ग्रह आहेत चंद्र आणि युरेनस.

पंचमातला चंद्र जातकाला तरल बुद्धीमत्ता, निरिक्षण शक्ती, आकलनशक्ती, चौकसपणा , अभ्यासु आणि व्यापारी वृत्ती देतो त्याचबरोबर जुगारी पद्धतीच्या गुंतवणुकी वा त्यावर आधारित व्यवसायास हा चंद्र अनुकूल असतो. ह्या चंद्रामुळे बुद्धीमत्ता विविध मार्गांनी प्रकट होते खास करुन चैनीची साधने/ व्यवसाय, कलागुण, कलाक्षेत्रात रस, हौस, विलास, उत्साही,. या सार्‍याच्या प्रभावाने काहीसे रंगेल व्यक्तीमत्व निर्माण होते.

पंचमातला युरेनस प्रेमात पुढाकार घ्यायला लावतो, हा युरेनस कलेच्या अविष्काराला पण पोषक असतो, सट्टे – जुगार- घोड्यांची रेस अशा जुगारी क्षेत्राशी संबंध / वावर ही या युरेनस ची खास फळे म्हणता येतील, हा युरेनस जर शुक्राच्या योगात असल्यास प्रेमप्रकरणे , प्रेम विवाह, पाऊल वाकडे पडणे अशी फळे मिळताना दिसतात. हा युरेनस संततीच्या बाबतीत काहीसा अशुभ ठरेल. संतती होणारच नाही असे नाही पण  प्रसुतीच्या वेळी त्रास / गुंतागुंत, गर्भपात व संतती विषयी काही चिंता असणे अशा प्रकाराची फळें मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

युरेनस ह्या ग्रहाला भारतीय ज्योतिष शास्त्रात स्थान नाही म्हणून असेल कदाचित या भारतातल्या लेखकांनी या ग्रहा बद्दल फारसे लिहलेले आढळत नाही. म्हणून मी जरा लिहतो:

पंचमातला हा युरेनस कमालीची बुद्धीमत्ता देतो, नाविन्यपूर्ण संशोधन / कला हा स्थायीभाव असतो, संशोधन अथवा कलेचा अविष्कार ह्या पंचमातल्या युरेनस मुळेच. हा युरेनस  नेहमीच बंडखोर, प्रस्थापित चौकटींना धका देणारा, उत्स्फुर्त , अनोखा, अकल्पित, चमत्कार म्हणावा असा असतो, बर्‍याच वेळा काळाच्या पुढे जाऊन मांडलेल्या संकल्पना असू शकतात.

हा युरेनस पंचमस्थानात असल्याने आणि पंचमस्थान हे प्रणयाचे स्थान असल्याने, प्रणयाचा अविष्कार देखील खास युरेनस स्टाईलनेच होतो. प्रेमप्रकरणे , चालीरिती – रुढी परंपरांच्या विरुद्ध जाऊन केलेले प्रेम / प्रेमविवाह  , बर्‍याच वेळा ध्यानीमनी नसताना अनपेक्षीत विवाह बंधनात अडकणे होते. पत्रिकेत इतर काही अशुभ योग असतील तर ह्या युरेनसच्या प्रभावाने जातकाचे पाऊल वाकडे पडण्याची शक्यता असते , चोरट्या प्रेमसंबंधातून विवाहपूर्व गर्भ धारणा घडु शकते.  हा युरेनस काहीवेळा वैवाहीक जीवनात चमत्कृतीजन्य तणाव निर्माण करतो, काही वेळा त्याचा शेवट घटस्फोटात होताना दिसतो.

पंचमस्थान हे संततीचे स्थान असल्याने युरेनस या बाबतीतही आपला प्रभाव निश्चित दाखवतोच. संतती बाबत एखादे तरी विपरीत फळ मिळतेच , काहीवेळा संतती होताना कमालीचा त्रास, वारंवार गर्भपात होणे अशा सारख्या समस्या असतात. प्रथम संततीला आरोग्य विषयक त्रास असण्याची शक्यता असते. काही वेळा संतती जातका पासुन दूर जाते.

षष्ठात नेपच्युन आहे. मुळात नेपच्युन हा ग्रह मनोविकराशी चांगलाच संबंध ठेवून असल्याने षष्ठातला हा नेपच्युन जातकाला मानसिक दौर्बल्य , सततची चिंता (जास्त करुन आजारा बद्दलची) , कसली तरी अनामिक भिती , फोबिया, फसवी आजारपणे, ज्या आजाराचे निदान चटकन होत नाही / निदान करताना चुका होण्याची शक्यता असलेले आजार, आरोग्या विषयी अकारण काळजी, ओसीडी-  मंत्रचळेपणा अशा प्रकारची फळे मिळण्याची दाट शक्यता आहे. जातकाचा नेपच्युन लग्नातल्या रवी- शनी शी षडाष्टक योग करत असल्याने वर लिहलेली फळें जरा जास्त तिव्रतेने मिळतील. हा नेपच्युन जर वक्री असेल तर ही फळें मिळण्याची शक्यता अधिकच जास्त असते. षष्ठम स्थान हे जातकाचे मातुल घराणे दाखवत असल्याने या नेपच्युन मुळे जातकाच्या मातुल घराण्यातले (खास करुन मामा- मावशी) यांना काही मानसीक त्रास , मनोविकार असण्याची शक्यता असते.

दशमातला गुरु स्वराशीचा (मीन) असल्याने बौद्धीक क्षेत्रातला व्यवसायाला अनुकूल असतो . व्यवसायाच्या दृष्टिने हा गुरु खास लाभदायक ठरतो, नोकरीत देखील वरची पदें, अधिकार, मान-सन्मान सहजगत्या प्राप्त होतो. याचवेळी धन स्थानात शुक्र असल्यास या गुरुच्या योगाने जातकाला अमाप संपत्ती, श्रीमंत पतीचा लाभ होऊ शकतो.

(हे सर्व वर्णन तरंगिनी बेन च्या बाबतीत अगदी तंतोतंत लागु पडत होते! )

दशमातला गुरु जातकाला भाग्यवान बनवतो. व्यक्तीची समजातली प्रतिमा / पत वरच्या दर्जाची असते. व्यक्ती लोकप्रिय असते , समाजात / नोकरी – व्यवसयाच्या ठिकाणी यांना मोठा आदर / मान-सन्मान मिळतो. नैसर्गिक कुंडलीत दशम स्थान शनीच्या मकरेच्या अखत्यारीत येते, शनीच्या प्रभावामुळे गुरु च्या भव्य दिव्यतेला शनीची कर्तव्यपरायणता, शिस्त, चिकाटी, संयम, न्यायप्रियतेची जोड लाभल्याने एक असाधारण मिश्रण तयार होते. शनीचा लगाम असल्याने गुरु उधळत नाही पण शनीचा प्रभाव असल्याने ह्या गुरुला नेहमी पेक्षा जास्त कष्ट उपसावे लागतात. असे जरी असले तरी शेवटी गुरु हा गुरुच त्यामुळे कष्ट पडले तरी ते सहज हसत खेळत निभावले जातात. बर्‍याच वेळा हा गुरु केलेल्या कष्टाच्या अनेक पटींने मोठे असे यश पदरात टाकतो. अनेक जातकांच्या बाबतीत ‘वाडवडीलांच्या पुण्याईवर / कर्तृत्वावर बसुन खाल्ले’ असे जे म्हणले जाते त्याचा अनुभव येताना दिसतो.  या दशमातल्या गुरुचे आणखी एक वैषीष्ट्य म्हणजे बहुतांश जातकांना मनाजोगता / शिक्षणाशी सुसंगत असा नोकरी – व्यवसाय लाभतो!

 

जातकाचा बुध नक्की कोठे आहे याचा अंदाज आपल्याला घेता आलेला नाही पण समजा हा बुध लग्नात असेल तर तिव्र व चौकस बुद्धीमता, हजरजबाबीपणा, संभाषण कला देतो, जर बुध धनस्थानात असेल तर साधारण अशीच फळे मिळू शकतात , शुक्र धनेतच असेल तर धनातील बुध-शुक्र युती बोलणे लाघवी बनवेल, संपत्ती देईल. मात्र हा बुध व्ययात असल्यास काहीशी अशुभ फळें मिळतील.

 

चतुर्थातला प्लुटो:  वैयक्तीक पातळीवरची फळे बघताना प्लुटो चा फरासा विचार केला जात नाही कारण अत्यंत संथगतीने फिरणार हा ग्रह व्यक्तिगत आयुष्यां पेक्षा आख्ख्या समाजावर प्रभाव टाकतो. पण असे असले तरी काही बाबतीत ह्या प्लुटो चे म्हणणे विचारात घ्यावे लागते.

चतुर्थात प्लुटो असताना जातकाचे बालपण बरेच खडतर / अडचणींचे असते. बालपणीच्या काळात घरात सतत कलह आणि काहीसे स्फोटक वातावरण असते. जातकाच्या आई-वडीलांत बेबनाव असणे,  सावत्र आई , आई-वडीलांचा घटस्फोट , आई – वडीलां पैकी एकाचे अकाली निधन, वडील (काही जातकांच्या बाबतीत आई) घर सोडून जाणे / परागंदा होणे असे प्रकार असू शकतात. काही जातकांच्या बाबतीत बालवयात शारिरिक / मानसिक अत्याचार झालेले असतात. काहींना बालमजुरी सारख्या कष्टप्रद कालखंडातून जावे लागते.  भावनिक उपासमार, प्रेम वात्सल्याचा अभाव अशी ही फळें मिळतात.  आई – वडीलां पैकी एकजण अत्यंत कडक / कठोर शिस्तीचा असल्याने सारे लहानपण कडक शिस्तीच्या धाकात करपले जाते. बर्‍याच वेळा असा प्लुटो असलेली व्यक्ती लहानपणी घरातून पळून जाते / जाण्याचा प्रयत्न करते किंवा परिस्थितीच अशी येते की जातकाला आई- वडीलांचे घर सोडून दुसरीकडे (अनाथाश्रम , बोर्डींग़ स्कूल्स, दत्तक) वास्तव्यास जावे लागते.

अर्थात चतुर्थातल्या  प्लुटोची ही भयावह फळें हमखास मिळतात असे नाही, त्यासाठी प्लुटो बिघडलेला असावा लागतो, दुर्दैवाने जातकाच्या पत्रिकेत हा प्लुटो रवी व शनीच्या केंद्र योगात आहे त्यामुळे वर लिहलेली फळे काही अंशी तरी मिळाली असावीत.

(जातकाचा मंगळ दशमात असल्याने त्याचा प्लुटो शी प्रतियोग होत आहे !)

 

ग्रहांच्या स्थानगत फळांचा धावता आढावा घेतल्यानंतर आपण जरा भावेशाच्या फळांचा असाच एक धावता आढावा घेऊ.

जातकाचे मिथुन लग्न असल्याने बुध लग्नेश होतो. हा बुध नेमका कोठे आहे हे आपल्याला माहीती नाही त्यामुळे अंदाज करायचा झाला तर (रवी लग्नात असल्याने) हा बुध एकतर व्ययात, लग्नात किंवा धनस्थानातच असणार. बुध व्ययात असल्यास लग्नेश व्ययात असे होईल त्यामुळे सुख न लाभणे, सतत काळजी / चिंता असणे, लांबचे प्रवास, स्थान त्याग अशा प्रकाराची फळें मिळू शकतात. बुध लग्नात असेल तर लग्नेश लग्नात असल्याने चांग़लेच, उत्तम आरोग्य, आत्मविश्वास, आनंद व सौख्य. जर हा बुध धनस्थानात असेल तर लग्नेश धनात आल्यामुळे पैसा मिळवण्याचा जरा हव्यास, आपमतलबीपणा, स्वार्थी वृत्ती, पैसा हेच सर्वस्व त्याचा पुढे सारे तुच्छ असा स्वभाव, पैसा मिळतो, स्वकष्टार्जित धनलाभ, खाण्यापिण्याची खास आवड अशी फळें मिळतील.जातकाचा धनेश चंद्र पंचमात असल्याने साधारणत: जुगारी वृत्ती असते, जुगारात लाभही होतात, संतती साठी लाभदायक.

जातकाचा त्रितीयेश रवी लग्नातच असल्याने पराक्रम, धाडस, स्वकर्तृत्वावर भाग्योदय, नोकरी-व्यवसायात मोठ्या उलाढाली, जबरदस्त महत्वाकांक्षा, मानी स्वभाव अशा प्रकाराची फळें मिळतील.

जातकाचे मिथुन लग्न असल्याने बुध चतुर्थेश होतो. हा बुध नेमका कोठे आहे हे आपल्याला माहीती नाही त्यामुळे अंदाज करायचा झाला तर (रवी लग्नात असल्याने) हा बुध एकतर व्ययात, लग्नात किंवा धनस्थानातच असणार. बुध व्ययात असल्यास चतुर्थेश व्ययात असे होईल त्यामुळे आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. बुध लग्नात असेल तर चतुर्थेश लग्नात असल्याने आनंदी , मनमिळावू स्वभाव, स्वत:चे घर, वाहन सौख्य, जीवनात चांगली प्रगती अशी फळें मिळू शकतात. जर हा बुध धनस्थानात असेल तर चतुर्थेसह धनात आल्यामुळे घरची उत्कृष्ट सांपत्तीक स्थिती, कुटुंबावरचे प्रेम, प्रेमळ स्वभाव, उत्तम शिक्षण अशी फळें मिळतील.

जातकाचा पंचमेश शुक्र धनात आहे! जीवनोपयोगी विद्या, विद्या आणि व्यवसाय सुसंगत, उत्तम आर्थिक उन्नत्ती , विद्येच्या जोरावर नावलौकीक , संतती सुख, कुटुंबप्रेम अशी फळे मिळतील.

जातकाचा षष्ठेश मंगळ आहे पण हा मंगळ पत्रिकेत कोठे आहे हे माहीती नसल्याने , या भावेशाची फळे ठरवता येणार नाहीत.

जातकाचा सप्तमेश गुरु आहे आणि तो दशमात स्वराशीचा आहे. चांगला मानी, विचारी, कर्तृत्ववान , संपन्न पती लाभतो !

जातकाचा अष्टमेश शनी , लग्नात आहे हा शनी आरोग्य विषयक समस्या निर्माण करेल, आणि हे अनारोग्य खास करुन गुह्येंद्रियांचे आजार, मुत्राशयचे आजार, मूळव्याध, हार्निया, हायड्रोसील, मासीक पाळीच्या तक्रारी अशा स्वरुपाचे असतील. अपघाताचे भय राहील, आयुष्यमान कमी करेल.

जातकाचा भाग्येश शनी , लग्नात आहे हा शनी प्रेमळपणा, सज्जन पणा, चांगली सुशील वर्तवणूक अशी फळे तर देईलच शिवाय भाग्येश लग्नात म्हणजे केंद्रात असल्याने तो अत्यंत शुभ फलदायी ठरेल.

जातकाचा दशमेश गुरु दशमातच स्वराशीत असल्याने पितृसुख चांगले, व्यवसाय करण्याकडे कल, व्यवसायात चांगले यश अशी फळें मिळू शकतात.

जातकाचा लाभेश मंगळ आहे पण हा मंगळ पत्रिकेत कोठे आहे हे माहीती नसल्याने , या भावेशाची फळे ठरवता येणार नाहीत.

जातकाचा व्ययेश शुक्र आहे. कर्ज फेड करावी लागेल, मोठ्या आर्थिक जबाबदार्‍या पेलाव्या लागतात.

या सर्व ग्रहस्थिती वरुन असे लक्षात येते की:

जातक सुखवस्तु , कर्तबगार , महत्वाकांक्षी, उत्कृष्ठ बुद्धीमत्ता , संवाद कौशल्य, श्रीमंती, वर्चस्व गाजवण्याची सवय असलेला, कलागुणांची आवड असलेला किंवा कलेच्या/ विद्येच्या जोरावर नाव लौकिक प्राप्त करुन घेणारा , व्यापारी पण त्याचवेळी बंडखोर , विचित्र / वैविध्यपूर्ण (चांगली / वाईट)  कृत्ये करणारा आणि मानसिक दृष्ट्या जरासा कमकुवत असावा. संतती असेल पण संतती विषयक काही समस्या नक्की असणार. प्रेम विवाह, रुढी-परंपरेच्या विपरीत किंवा घरच्यांचा विरोध पत्करुन केलेला विवाह , संपत्ती, कले वर आधारीत किंवा जुगारी पद्दतीच्या गुंतवणूकीवर आधारीत व्यवसाय. बालपण कष्टप्रद , बालपणी मानसीक /  शारीरीक छळ/ गैरप्रकार. दीर्घायुषी , शारीरीक तब्बेत उत्तम, मानसीक तब्बेत खराब. वैवाहीक जीवन काही प्रमाणात बिघडलेले. 

अर्थात हे शुक्र, बुध , मंगळ या महत्वाच्या ग्रहांच्या राशी नक्की माहीती नसताना वर्तवलेले अंदाज आहेत हे लक्षात ठेवले पाहीजे.

पत्रिकेतल्या ग्रहस्थिती वरुन ढोबळ अंदाज आल्यानंतर आता पत्रिकेतले महत्वाचे ग्रहयोग तपासावे लागतील:

ते पुढच्या भागात पाहूयात….

क्रमश:

शुभं भवतु 

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.