११ जुन २०१७,  एक प्रसन्न रवीवार, सकाळी सकाळीच गंगापुर रोड वरच्या एका मद्र देशीय क्षुधाशांती गृहात म्हणजे साऊथ इंडीयन हाटीलात होतो. “नविनच सुरु झालेय, टिपीकल साऊथ!  ओनियन उथ्थपा फर्स्टक्लास पण इथली  काप्पे (कॉफी) ट्राय कर, एक नंबर काप्पे! इतकी अस्सल (ऑथेन्टीक) काप्पे दुसरीकडे कोठेच भेटणार नाय!” अशी माझ्या जासुसाची (म्हणजे एका खवैय्या दोस्ताची) खबर होती!

लहानसेच हाटील, खास मद्र शैलीतले, भडक आणि बटबटीत इंटेरिअर. नविनच असल्याने छत, टेबलं- खुर्च्या, क्रोकरी, पायाखालचे ग्लेज्ड सिरॅमीक सारे कसे एकदम चकाचक, हाटीलाचा म्हणून एक खास कळकट राप असतो तो इथे याला अजून चढायचा होता. काहीशी दाटीवाटीने मांडलेली सात आठ टेबले आणि त्यासाठी मिळून एकच असा खास अगदी चेन्नै हुन आयात केलेला बुटका, थुलथुलित वेटर सफेत लुंगी, बथ्थड चेहेरा आणि भस्मांकित कपाळा सहीत सज्ज होता.

हॉटेलच्या म्युझीक सिस्टीम मधून पाझरणारी, आस्तिकालाच काय पण एखाद्या कट्टर नास्तिकाला सुद्धा क्षणभर हात जोडावेसे वाटावे अशी काद्री गोपालनाथ ची त्यागराज कृत गणेश वंदना. गल्ल्यावर, काचेच्या थोराड बरण्यांचा आड दिसतो न दिसतो अशा बेताने लपुन बसलेला एक बुटका, जाड्या आणि टकल्या सुब्रमणियम स्वामी त्या गणेश वंदने वर डोळे मिटून ताल धरुन राहीलेला.

भटारखान्याच्या आडव्या, चिंचोळ्या खिडकीतून दिसणारी गॅसच्या चुलाण्यावरची खदखदणारी भांडी, एकाच वेळी नाकाला हुळहूळ लावणे आणि जिभेला खवळवून सोडणे अशी किमया करणारा सांभाराचा तिक्ष्ण, तिखट गंध, मध्येच एखाद्या गवयाने अवखळ मुरकी घ्यावी तशी तव्यावर कलथणे आपट्ल्याच्या आवाजाच्या साथीने उठणारी डोस्साय ची चुर्रचुर्र ! चुली शेजारच्या डेगचीत ठेवलेल्या वाफाळलेल्या , पांढर्‍याफेक, गबदुल इडल्यांचे ओझरते होणारे मोहक दर्शन आणि ह्या सगळ्यांच्या जोडीला, सगळा आसमंत भरुन वर चार बोटे उरलेला मायसोर चंदनाचा दरवळ!

व्वा, असा नुस्ता माहोल बघुनच दिल खुष झाला.

“काप्पे, साssर्र” असे काहीशा घोगर्‍या ,दबक्या आणि पिचक्या आवाजात पुटपुटत त्या मद्र नरेशाने स्टिलच्या पेला-वाटीतुन हिंदकळत आणलेली अस्सल मद्रदेशीय कड्ड्क फिल्टर काप्पे समोर ठेवली. वाफेच्या प्रत्येक आवर्तना बरोबर, धुंदी चढवत नेणारा तो काप्पेच्या मादक गंध मन, शरीर ,आत्मा आणखी जे काही असेल त्याचा क्षणात खुल्ला ताबा घेऊन गेला, वेड लावले म्हणण्याच्या पलीकडचे काही! आणि नंतर .. पहील्या घोटातच … ओ हो हो… चक्क ब्रम्हानंदाचा अनुभव मिळाला हो!
साला याला म्हणतात ‘काप्पे’!

मी असा निवांत काप्पे चा आस्वाद घेत असतानाच अविनाशजींचा फोन आला. हे अविनाशजी व्यवसायाने डॉक्टर असले तरी ज्योतिषाची जाम आवड. त्यांचे फोन ज्योतिषा संदर्भातच असतात, आजही त्यांच्या दोन एक शंका होत्याच त्यांना थोडक्यात उत्तरे दिली, ‘नशीब आज लौकर आटोपले’ असे म्हणले तरी दहा एक मिनिटें गेलीच.

फोन वरचे बोलणे संपल्यावर पेल्यातल्या काप्पेचा शेवटचा घोट घेतला, आता कटायचे की अजुन एक कडक काप्पे मारायची असा विचार करत होतो इतक्यात…..

“एक्स्युज मी”

अशी हलकेच , कमालीच्या मंजुळ आणि काहीशा कंपयुक्त  (Vibrato) आवाजात साद आली…

माझ्या समोर एक भारदस्त गुज्जु महिला उभी होती. धप्प गोरा रंग, डिझाईनर प्रिंट साडी, कानात हिर्‍याची फुलें, गळयात सुबक मोत्याचा पेंडंट, हातात मोजक्याच दोन पण कमालीच्या नाजुक आणि रेखीव बांगड्या जोडीला तितकेच नाजुक स्विस वॉच, बोटात पुखराज, एका हातात क्लाव्हा डिझाईन चा लोगो मिरवणारी काऊ हाईड लेदर पर्स आणि दुसर्‍या हातात आयफोन!

या बाईंना मी हाटीलात आल्या आल्या पाहीले होते,  त्या आणि त्यांच्या बरोबर एक जण (त्यांचा नवरा!) पलिकडेच चार टेबले टाकून बसले होते, केळीच्या पानावरचा टामाटूचे सुबक नक्षीकाम असलेला,जाळीदार, लोणी थापून थापून थुलथुलीत केलेला ‘वोन्नियन ऊथ्थपा’ मोठ्या चवीने खात होते.

(या बाईंचा आणि माझा संवाद बराचसा इंग्रजी आणि अधुन मधुन हिंदी असा मिक्स झाला होता, वाचकांच्या सोयी साठी तो शुद्ध माय मराठीत सादर करत आहे)

“येस?”

“एक्स्युज मी, पण आपण ज्योतिष वगैरे जाणता काय?  नाही म्हणजे तुम्ही आत्ता फोन वर बोलत होतात ते ओझरते कानावर पडले त्यावरुन मला असे वाटले”

“हो, माझा ज्योतिषाचा थोडा अभ्यास आहे त्या आधारे सांगतो लोकांना”

“मला पण अ‍ॅस्ट्रॉलॉजीत इंटरेष्ट आहे”

“चांगले आहे! आपला परिचय?”

“मी तरंगिनी XXX, ते त्या टेबलावर बसलेत ना ते माझे हजबंड, आम्ही मुंबईचे, आमचा बिझनेस आहे. दर सेकंड – फोर्थ विकेंड ला आम्ही नाशिकला येत असतो, इथे आमचे विकएंड होम आहे”

“तरंगिनीजी आपली ओळख झाल्याने आनंद वाटला, मी, सुहास गोखले”

“सुहासजी मला पण आपल्याला भेटुन खुषी झाली”

“तरंगिनीजी, आपण उभ्या का बसा”

“थेंक्यू , सुहासजी”

तरंगिनी माझ्या समोरच्या खुर्चीवर ऐसपैस विसावल्या

“तरंगिनीजी, तुमचे नाव एकदम युनिक आहे, म्युझिकल आहे, तुमच्या हजबंडना गाण्याची खास आवड दिसते”

“त्यांना गाण्यातले काही कळत नाही, माझ्या आजोबांनी जन्मनक्षत्रा प्रमाणे ठेवले माझे हे नाव, मला फार आवडते म्हणून लग्नात बदलू दिले नाही”

तरंगिनीबाईंनी चार टेबले पलीकडे बसलेल्या आपल्या नवर्‍याला हाक मारली…

मी त्या रमणीकलाल ला नमस्कार केला, ह्या चाळीशीच्या पुढच्या गुज्जुंचे नाव ओळखणे सोप्पे असते, जसे बहुंताश नेपाळ्यांची नावे ‘बहादुर थापा’ असतात तसे निम्म्याच्या वर गुज्जु रमणीकलाल तरी असतात नाहीतर रमेस, मुकेस, धीरज अने महेंद्र !

“मला माझी होरोस्कोप दाखवायची आहे, तुम्ही होरोस्कोपच बघता ना? का हात पाहुन सांगता?”

“मी होरोस्कोप म्हणजे जन्म कुंडली वरुन भविष्य सांगतो”

“गुड, मला असेच पाहीजे आहे, ते हस्तरेषा सगळे बंडल वाटते”

“माझा त्या हात वाल्यांचा काही अनुभव नाही”

“तुम्ही ते होरोस्कोप बघायचे किती चार्ज घेता” बाईंचा सावध गुजराथी पवित्रा!

“ते तुमचे प्रश्न काय आहे, कसा आहे, तुम्हाला काय जाणून घ्यायचे आहे त्याच्या वर अवलंबून असते”

“ते ही खरेच पण माझी होरोस्कोप बनवलेली नाही”

“हरकत नाही , मी क्लायंटची माहीती घेऊन पत्रिका बनवतो आणि मगच जसा प्रश्न असेल त्या प्रमाणे पत्रिकेचा अभ्यास करुन भविष्य सांगतो”

“पत्रिका बनवायचा वेगळा चार्ज असतो काय?”

बाई आर्थिक सुस्थितीतल्या वाटत असल्या तरीही पैशाचा संबंध आला की सगळे गुज्जु सारखेच !

“नाही, पत्रिका बनवायचा वेगळा चार्ज नाही”

“ठीक आहे. मग माझी होरोस्कोप बनवणार का?”

“हो, बनवेन ना, त्यासाठी तुमची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण ही माहीती लागेल मला”

“माझा जन्म अहमदाबादचा, तारीख २० जुन १९७५,  एक्स्याक्ट टाईम माहीती नाही, पण एक नक्की माझा जन्म अगदी सनराईज ला झाला, पक्का. म्हणून माझे बापू मला ‘प्रभावती’ नावाने पण बोलवायचे”

मी पुढे काही बोलणार एव्हढ्यात बाईंचा फोन वाजला..

“एस्क्युज मी, माझ्या मैत्रिणीचा कॉल आहे तो अटेंड करते, चालेल ना? प्लीज ..”

“अहो हे काय विचारणे झाले? होऊ दे निवांत”

तरंगिनी बेन जरा बाजुला होऊन फोन वर बोलू लागल्या.

रमणिकलाल जो इतका वेळ निवांतपणे समोरच्या खुर्चीत ‘इदं न मम’ स्टाइल मध्ये बसला होता, त्याने  चष्म्याच्या काचा पुसल्या आणि हातातल्या ‘नवभारत टाइम्स’ मध्ये डोके खुपसले. त्यावेळी त्याच्या चेहेर्‍यावरचा अविर्भाव असा होता की “झालं आता किमान अर्ध्या तासांची निश्चींती!”.

मी रमणीकलाल ला तसाच सोडला आणि डोळे मिटून विचार करु लागलो. डोक्यातली विचार चक्रे सुरु झाली.

…….

…….

पंधरा एक मिनिटे झाली असतील, बाई फोन वर बोलण्यात, रमणीकलाल नवभारत टाइम्स मध्ये आणि मी माझ्या विचारात गुंग राहीलो.

बाईंचा फोन आटोपला आणि..

“सॉरी हं सुहासजी , मी तुम्हाला ताटकळत ठेवले, माझे फोन जरा असेच लांबतात”

“हरकत नाही, तर तुम्हाला भविष्य बघयाचे आहे असे म्हणत होतात”

“हां”

“आपली हरकत नसेल तर काही प्रश्न विचारु?”

“कसले प्रश्न ?”

“तसे खास काही नाही, आपण दिलेल्या माहीती वरुन विचारावेसे वाटले , अर्थात उत्तर देणे आपण नाकारु शकता, सिंपल ”

“त्यात काय? विचारा !”

फक्त एक उत्सुकता म्हणून विचारतोय, पण मला असे वाटते की आपण एखादा व्यवसाय सांभाळत असाल, डिझायनर आभुषणे, दागिने, फॅशन , बुटीक , आर्ट, लक्झुरी गुडस  किंंवा शेअर बाजार , आर्थिक गुंतवणूक व्यवस्थापन असा काही. “

“येस , माझा स्वत:चा ज्वेलरी डिझाईन चा व्यवसाय आहे आणि शेअर ट्रेडिंग तर आमचा फॅमीली बिझनेसच आहे त्याचे ही मी काम बघते पण मला समजले नाही आपण हे कसे जाणले? “

“गेस वर्क आणि थोडी अ‍ॅस्ट्रॉलॉजी!! ”

“क्या बात है ”

“गेल्या सहा महिन्यात आपण बिझनेस मध्ये नाविन्यपूर्ण बदल केले असतील, नाविन्यपूर्ण उत्पादने/ सेवा उपलब्ध करून दिली असेल, या मेहेनतीचे चांगले आणि अनपेक्षित सुद्धा, रिझल्ट्स मिळायला सुरवात झाली असावी”

“येस , सही बात बोली आपने , गेले दोन वर्षे मी एक्स्पोर्ट ऑर्डर साठी प्रयत्न करत होते , त्या साठी बरेच मेजर चेंजेस करावे लागले , आता ऑर्डर्स  मिळायला सुरवात झाली आहे, चांगला पिक-अप आहे , पण  तुम्ही हे कसे सांगितले ? आमची आधीपासून माहिती होती का? ”

“नाही, आपण पहिल्यांदाच तर भेटतोय ”
“कमाल आहे !”

“मी आपले काही अंदाज केले त्यावरुन विचारतो, बुरा मत मानना, आपले लहानपण जरा त्रास दायक गेले असेल, आपल्या वडीलांची स्थिती आपल्या जन्मा नंतर उत्तरोत्तर खालावत गेली असेल , आपले आपल्या वडीलांशी पटत नसेल. आपला विवाह काहीसा रितीबाह्य, खळबळजनक असा असेल, कदाचित आपण आई- वडिलांच्या मना विरुद्ध जाऊन विवाह केला असण्याची शक्यता आहे, आणि विवाह ही जरा उशीराने झाला असेल”

“सो टका सच! कमाल आहे, बापूंचा आमच्या लग्नाला विरोध होता, आम्ही पळून जाऊन लग्न केले, तेव्हा माझे वय २८ म्हणजे आमच्या समाजात लेट मॅरेजच. माझ्या जन्मानंतर दोन-पाच वर्षात बापूं च्या बिझनेसला मोठा सेट ब्यॅक बसला तेव्हा जो खराब वक्त चालू झाला, तो नंतर कधी सुधारलाच नाही . माझा बापूंशी तसा झगडा नव्हता पण त्यांचे माझे फारसे जमले नाही, त्यांच्या – माझ्यात जी काही बातचीत व्हायची ती माझ्या आईच्या मध्यस्तीने”

“आणखी एक अंदाज, जरा जादा पर्सनल है , आपल्याला जास्त काळजी करण्याची सवय आहे, खास करुन तब्बेतीच्या बाबतीत. नसलेले आजार झाले असल्याचा संशय सतत मनात असेल, आपल्या मनाने औषधे घेणे, औषधांचा मारा करत राहणे, चित्रविचित्र पथ्थ्ये पाळणे. सतत डॉक्टर बदलणे. कदाचीत आपण कोणत्यातरी  ‘फोबिया’ ने ग्रस्त राहीलेल्या असाल, आत्ता नसेल पण पूर्वी कधी डिप्रेशनची किंवा ओसीडी ची सुद्धा शक्यता वाटते

“माझा स्वभाव आहेच तसा प्रत्येक गोष्टीची जरा जास्तच काळजी करत असते , मला कधी डिप्रेशन किंवा ओसिडी चा त्रास झाला नाही पण येस, फोबियाची बॉर्डर लाईन केस आहे असे म्हणता येईल. बाकी औषधा बद्दल जे म्हणाला ते हुबेहुब तस्सेच आहे! हे आपले अंदाज नाही वाटत , आपल्याला नक्की आमचे बद्दल आधीपासुनच माहीती होती ना?”

“नाही हो, तसे नाही, फक्त थोडी अ‍ॅस्ट्रॉलॉजी, और कुछ नहीं

“इंटरेस्टींग!”

“आणखी एक, आपल्याला दोन मुली असतील त्यातल्या मोठ्या मुलीला आरोग्याची एखादी समस्या असण्याची शक्यता आहे , बहुदा लठ्ठपणा असावा.”

“सुहासजी! आम्हाला दोन मुली आहेत आणि मोठी मुलगी तुम्ही म्हणता तशी लठ्ठ आहे , सध्या ती व्हि.एल.सी.सी. च्या वेट लॉस प्रोग्रॅम वर आहेच. पण तुम्ही हे सगळे सांगता कसे? ही भुताटकी वगैरे आहे काय, ब्लेक मेजीक?”

“नाही , भुताटकी , ब्लॅक मॅजीक वगैरे काही नाही, माझ्या थोडी अ‍ॅस्ट्रॉलॉजी अभ्यासा आहे त्यावरून सांगतो”

“आय अ‍ॅम वंडरस्ट्रक!”

“मी सुद्धा ! माझे बरेच अंदाज बरोबर येत आहेत हे पाहुन” 

“बरेच का सगळेच बरोबर सांगता आहात तुम्ही”

“मी माझ्या अभ्यासा वरुन तर्क करत असतो इतकेच. आता पहा , आपण गेल्या सात-आठ महीन्यांत एखादी मोठी प्रॉपर्टी घेतली असावी , कदाचित असेही असू शकते की आपल्याला प्रॉपर्टी चा / पैशाचा चांगला घसघशीत म्हणता येईल असा लाभ या काळात झाला असावा. पण या सार्‍याला एक दु:खाची किनार असेल, म्हणजे हे होत असतानाच आपण काहीतरी गमावले पण असेल आणि या सगळ्याचा आपल्या माहेरशी काहीतरी संबंध असेल”

“माय गॉड ! सुहासजी ! अदभुत आहे हे सगळे , काय सांगु, माझे बापु मागच्याच वर्षी  गेले आणि माझी आई या जानेवारीत , सहा महीन्यांं पुर्वी. आई नंतर तिच्या नावावर असलेली मोठी जागा आणि दागिने मला वारसा हक्काने मिळाले आहेत, पण तुमची कमाल आहे , हे कसे काय कळले?”

“अ‍ॅस्ट्रॉलॉजी!”

“पण हे असे अचुक सांगता येते?”

“याहुनही अधीक, आता मला सांगा अगदी अलीकडच्या काळात म्हणजे काल परवाच सुद्धा असेल, एखादी फसवणूक किंवा आजारपण अशी एखादी अस्वस्थ करुन टाकणारी घटना घडली असावी.  घटना आपल्या आयुष्यात घडलेली असेल किंवा आपल्या माहेर कडच्या एखाद्या व्यक्ती बाबतीत घडेलेली असेल.”

“अजब आहे! तीन दिवसांपूर्वीच तर माझ्या मामे बहीणी बद्दल ऐकले, इतक्या लहान वयात कॅन्सर डिटेक्ट झाला तिला , बिच्चारी, पण तुम्ही हे पण तर्काने जाणले?

येस ,  फक्त अ‍ॅस्ट्रॉलॉजी! आता आणखी एक अंदाज, आपल्या माहेरच्या नातेवाईंका पैकी म्हणजे मामा, मावशी या पैकी कोणी मानसिक आजाराने ग्रस्त असण्याची शक्यता आहे

“हे इतके बरोबर कसे काय सांगता? माझी मावशी गेले बरीच वर्षे मानसिक विकारा साठी सायकिअ‍ॅट्रीस्टची ट्रीटमेंट घेते आहे.  मानले तुमच्या स्ट्डीला!  होरोस्कोप बघायच्या आधीच इतके सारे सांगीतले ते पण इतके करेक्ट !! आय अ‍ॅम इंप्रेस्ड”

“तसा माझा थोडा अभ्यास आहे इतकेच”

“थोडा अभ्यास कसला तुम्ही तर मोठ्ठे ज्योतिषी दिसता, आपण एकदा डिटेल मध्ये बोललेच पाहीजे , तुम्हाला कधी वेळ आहे?”

“हो आपण नक्की भेटू , अगदी आज सुद्धा”

“आज भेटायला आवडले असते पण आज आम्ही फ्री नाही, आज दुपारीच आम्ही मुंबईला परत जातोय, पण आमच्या नेक्स्ट नाशिक व्हिजीट्ला , नेक्स्ट टू नेक्स्ट सॅटर्डे – संडेला नक्की जमेल आम्हाला”

“उत्तम,  नेक्स्ट टू नेक्स्ट सॅटरडे म्हणजे २४ जुन.”

“हां, २४ तारीख, सकाळी साडे नऊ- दहा वाजता भेटूया का?”

“फाईन, ही वेळ जमेल, मी माझा पत्ता एसेमेस करतो, जर काही बदल करावासा वाटल्यास फोन करुन कळवू एकमेकांना काय ?”

“चालेल”

मी बाईंचा फोन नंबर घेऊन माझ्या पत्त्याचा एसेमेस त्यांना पाठवला, बाईंनी मेसेज मिळाल्याची मान डोलावली. तो पर्यंत मी फोन वरच्या कॅलेंडर मध्ये बाईंच्या अपॉईंट्मेंटची एंट्री केली.

“सुहासजी आम्ही आता निघतो, एक -दोन ठिकाणी जायचे आहे, त्याला उशीर नको व्हायला, मी एक दिवस आधी म्हणजे तेवीस तारखेला कॉल करुन अपॉईंटमेंट चे कन्फर्म  करेन, तेव्हा भेटूयात, जय श्रीकृष्ण”

“जय श्रीकृष्ण”

आधी ‘इदंम न मम’ च्या पोझ मध्ये बसलेला रमणिकलालच्या चेहेर्‍यावर पण एव्हाना काहीतरी भुताटकी पाहील्याचा भाव आला होता, त्यातुन सावरत त्याने ही ‘जय श्रीकृष्ण’ घातला आणि जोडी लगबगीने हॉटेल बाहेर पडली.

….

….

 

मी खुण करताच तो मद्र देशीय नरपुंगव हळूच माझ्या जवळ आला ..

“साsssर्र?”

“काप्पे! रिपीट माडी!”

……

……

ठरल्या प्रमाणे तरंगिनीबेन मला येऊन भेटल्या,  फार चांगले कंन्सलटींग सेशन झाले ते..

….

…..

 

असो,

तुम्ही म्हणाल समोर पत्रिका नसताना आणि पंचांग किंवा तत्सम साधने हाताशी नसताना हे असे बरोबर, अचूक कसे सांगता आले?

नाही, नाही, हे कर्ण पिशाच्च वगैर नाही की कोणती गुप्त साधना नाही की अघोरी विद्या नाही. असे सांगणे अवघड असले तरी अशक्य नाही. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाची भक्कम बैठक आणि नाडी ज्योतिषातली काही मुलभूत तत्वे चांगली आत्मसात केली असतील तर हे असे सांगणे जमू शकेल.

मात्र या अभ्यासा बरोबरच पाहीजे चांगली स्मरणशक्ती, तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता आणि थोडी शोधक नजर!

मी मुळात इलेक्ट्रीकल इंजिनियर असल्याने आणि बरीच वर्षे सॉफ्टवेअर डिझाईनींग क्षेत्रात काम केलेले असल्याने जलद गतीने , तोंडी गणिते करणे, अ‍ॅबस्ट्रॅक्ट थिंकिंग , व्हिज्युएलायशेन अशी तंत्रे माझ्या सरावाची आहेत आणि त्यांचा हुकमी उपयोग मला करुन घेता येतो!

आता ‘हे कसे?” याची तुम्हाला उत्सुकता लागली असेल ना?

सांगतो , सगळे बैजवार सांगतो , पण आत्ता लगेच नाही, पुढच्या भागात….   अगदी नक्की!..


 

एका सत्य घटनेवर आधारीत, जातकाने जन्मतारीख आदी तपशील आवश्यक ती गुप्तता राखून प्रसिद्ध करायला परवानगी दिली आहे.

 


 

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+8

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

12 प्रतिक्रिया

///////////////
 1. अण्णासाहेब गलांडे

  खरोखर आवडते म्हणुनच पुढच्या भागाची वाट पाहतो.

  +1
  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद .

   मी आपले नेहमीचे (रुटीन) पारंपरीक ज्योतिषशास्त्रातले नियम वापरुनच ही भाकिते केली होती, (मी आज ही ह्याच पद्धतीने करत असतो). हॉटेलात बसलेला असताना कोणतेही रिसोर्सेस (इंटरनेट सुद्धा नव्हते ) नसताना कोणताही अ‍ॅडव्हॉन्स पद्धती (कॅलक्युलेशन हेवी) वापरणे शक्यच नव्हते.

   बर्‍याच जणांना (ज्योतिष अभ्यासक / विद्यार्थी ) वाटत असते काहीतरी एक्सोटीक पद्धत वापरल्या शिवाय अचूक भवीष्य सांगता येणार नाही. मग ते नक्षत्रें , अष्टकवर्ग, नवमांशादी वर्गकुंडल्या, सर्वतोभद्र चक्र , सब-सब लॉर्ड्स, कस्पल ईंटर्लिंक अशा पद्धतींच्या मागे धावत असतात, या नादान एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होते, काहीच सांगता येत नाही, बारा ग्राह, बारा राशी, बारा भाव, भावेश, ग्रहयोग , दशा , गोचरी आणि एखादी डायनॅमिक अ‍ॅनालायसिस पद्धती बास इतकाच दारुगोळा पुरेसा आहे !

   या केस स्ट्डीतून मला हेच दाखवून द्यायचे आहे की बेसीक्स पक्के असतील तर काही अवघड नाही पण हे बेसीक्स पक्के करायला काही वर्षे लागतात , हजारोंनी पत्रिका अभ्यासुन पडताळा घ्यायचा असतो पण इतकी मेहेनत घ्यायची तयारी कोणाकडे आहे , एक चोपडे वाचले न वाचले झाले ज्योतिषशास्त्री !

   सुहास गोखले

   +1
 2. संतोष

  सुहासजी,

  छान लेख, लेखन शैली फारच छान, खास करून व्यक्ती वर्णन एकदम सुरेख आहे.

  अगोदरच्या लेखांवर वेळे अभावी comment देता आली नाही पण अगोदरचे लेख छान जमून आले आहेत.

  संतोष सुसवीरकर

  0
 3. प्राणेश

  व्वा! अतिशय उत्तम लेख! व्यक्तीचे वर्णन आणि “काप्पे’चे वर्णन अगदी पुलंची आठवण करून देणारे आहे.

  या लेखमालेचा ‘काही बोलायाचे आहे’ होणार नाही ही आशा.

  0
  1. सुहास गोखले

   श्री प्राणेशजी ,
   अभिप्राया बद्दल धन्यवाद . ‘काप्पे’ चे पुढले चार भाग पुर्ण तयार आहेत दर चार दिवसांनी एक या प्रमाणे प्रकाशीत होतील.
   ‘काही बोलायचे आहे’ चे उर्वरीत भाग पण तयार आहेत ते ‘काप्पे ‘ लेख माला संपली की लगेच प्रकाशीत करत आहे.
   सुहास गोखले

   +2
 4. Sudhanva Gharpure

  Suhasji,

  It was an amazing experience to read this Kappe, Sarrrrr !!! You have an extra-ordinary capabilities of story writing with proper observations. You can become another Pu. La. Deshpande !!! All the best.

  Well, after reading entire story, my face also became like Ramnikbhai, as if I also seen some Bhutatki !!! And you said that all this is possible after doing proper study of basics. Great !!! It would have been an excellent experience if I also had been sitting there on your table & having kadak Kappe !!!

  Wah, padh ke maza aa gaya.

  Warm regards,

  +1
  1. सुहास गोखले

   श्री. सुधन्वाजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद . लेखात लिहले आहे असे ह्यात कोणतीही काळी जादू , कर्ण पिशाच्च असे काही नाही . ज्योतिषशास्त्राचे जे पायाभूत नियम -आडाखे आहेत तेच वापरुन मी ही भाकितें केली होती. माझी फुशारकी मारण्याचा हेतु नाही सांगायचे इतकेच की मी एकटाच नव्हे तर असा अभ्यास असलेली कोणतीही व्यक्ती अशी भाकिते करु शकेल.
   बाकी लिखाण (लेखन शैली ) बद्दल म्हणायचे तर मला आजूबाजूच्या व्यक्ती – घटना-स्थळ – प्रसंग बारकाईने बघायची सवय आहे. थोडी फोटोग्राफीची कला अवगत असल्याने काही बाबीं नेमके पणाने टिपता येतात इतकेच. पु लं इतका मोठा नाही मी एक लहानसा प्रयत्न केला, नाहीतरी ज्योतिष हे तसे किचकट आणि रटाळ आहे त्यात लिहुन लिहुन काय लिहणार ?

   सुहास गोखले

   0
 5. Rakesh

  Ekdam mastttt…suhas ji….tumchi lekhan shaili chhanach ahe…maja ali….humour khup chhan pakadta yeto tumhala…kappe ani saaarrr…:)….analysis tar ekdamach amazing…BCP asawa thoda ani paramparik….

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री राकेशजी,

   या लेखमालेतले पुढचे दोन भाग प्रकाशीत झाले आहेत ते पण अवश्य वाचावेत ही विनंती.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.