महाबळेश्वर परिसरात मित्रां समवेत ट्रेकिंग ला गेलेला रमेश रात्री दोन वाजता घरी परतला तो डावा कान गच्च दाबुन धरत !
रमेशच्या बायकोने घाबरत विचारले..
“काय को, काय झाले कानाला, काही लागले का?”
“नाही, काही लागले नाही पण..”
“कान फुटला का?”
“नाही…”
“मग असे झालेय तरी काय, कान एव्हढा का दाबून धरलाय ते?”
“काय सांगू तुला, महाबळेश्वरात मध विकत घेण्यासाठी आम्ही एका मधुमख्खी पालन केंद्रात गेलो होतो, कशी काय कोण जाणे तिथली एक मधमाशी माझ्या कानात शिरली, पार अगदी आत पर्यंत गेलीय. आता ती बाहेर येत नाहीये, आत अडकून बसलीय, सतत कानात गुँ ss गुँ असा आवाज येतोय, साला , डोके उठलेय ह्या आवाजाने ..”
रमेशची बायको हसायला लागली…
“अहो, असे कधी होते का? कानात बाहेरुन काही आत जाऊ शकत नाही, कानात आत एक पडदा असतो, तो अडवतो सगळ्याला, तुम्हाला कसला तरी भास होत असणार”
“माझे आई, ही साधी घरमाशी नाही, मधमाशी आहे! धारदार नांग्या असतात तिला, कानाचा पडदा फाडुन आत मध्ये गेलीय, कळले?”
“काही रक्त वगैरे आले होते का?”
“नाही”
“मग माशी नक्कीच आत गेलेली नाही, माशीने कानाचा पडदा फाडला तर रक्त आले असते ना ?”
“तु काय डॉक्टर आहेस का? वाद घालत बसू नको, जा पटकन थोडे खोबर्याचे तेल कोमट करुन आण, कानात सोडतो, म्हणजे भाजून मरेल XX साली..”
“अहो, शिव्या कसल्या देताय..”
“मग काय आरती ओवाळू तिची, इथे कंटीन्यू कानात गुँ ss गुँ करुन रायलीय, भेजा फुटायची वेळ आली”
“त्यापेक्षा आपण डॉक्टरां कडे जाऊ या का?”
“वेडी का काय तू? एव्हढ्या रात्रीचे दोन वाजता का डॉक्टर गाठायचा? त्या पेक्षा आपला तेलाचा उपाय जालिम आहे त्यानेच मरेल ती साली, सकाळी डॉक्टरांकडे जाऊन मेलेली माशी बाहेर काढून घेऊ, हाय काय अन नाय काय! पण आधी हे गुँ ss गुँ थांबले पाहीजे”
बायकोने आणलेले कोमट तेल रमेशने कानात सोड्ले, थोडा वेळ थांबून बायकोने उत्सुकतेने विचारले..
“थांबला का आवाज?”
“कमी झाल्या सारखा वाटतोय.!आणखी तेल घाल कानात,भाजून नै तर तेलात बुडून मेली पाहीजे साली”
“अहो, असे सारखे सारखे शिव्या देऊ नये हो भरल्या घरात”
“तुझ्या कानात असे सतत गुँ ss गुँ झाले असते ना तर मग कळले असते”
तेलाचा आणखी एकदा मारा होतो …
“बघ, माशीचा आवाज जवळजवळ थांबलाच, अधून मधून थोडे गुँ ss गुँ चालू आहे म्हणजे माशी मेली नसली तरी शेवटचे आचके देत असावी..”
“देवाची कृपा..”
“हॅ ..हॅ, म्हणे देवाची कृपा, तेलाची आयडीया माझी”
“हो पण ती आयडीया देवानेच सुचवली ना?”
“जाऊ दे ना, वाद कशाला, गुँ ss गुँ थांबलेय ना आता ? बस्स, आता एक फक्कड पैकी चहा करुन आण”
“आणते”
बायको चहा बाहेर घेऊन येते तो काय रमेश पुन्हा कान दाबून बसलेला होता.
“का, काय झाले..”
“मरी नहीं जिंदा है!”
“स्वामींचे वाक्य!”
“ए बयो… सगळी कडे तुझे स्वामी कशाला ते, मी त्या माशी बद्दल बोलतोय..”
“म्हणजे माशी मेली नाही, जिवंत आहे? तुम्हाला कसे कळले?”
“डोक्यावर पडली आहेस का? पुन्हा गुँ ss गुँ सुरु झालेय तिचे, साली तेल पिऊन आता जास्तच जोरात गुँ ss गुँ करायला लागलीय… आता काय करु?”
“ऐका माझे, असले कसले प्रयोग करण्या पेक्षा आपण सरळ डॉक्टरां कडे जाऊ या”
“हो जाऊ या, पण आत्ता नको, सकाळी लौकरच जाऊ, तो पर्यंत मी गोळी घेऊन पडतो जरा, करतो कसे तरी सहन हे गुँ ss गुँ:
“ठिक आहे , तुम्ही म्हणाल तसे”
……………………………………………………………………………………..
“भाऊ”
“काय रं सद्या?”
“नविन स्टूरी झॅक हाये पन लोक्स पुन्यांदा तुमच्यावर खवळनार!”
“का रं बाबा? आता तेस्नी खवळायला काय रे कारन?”
“तेच त्ये न्हेचं का, नाय म्हंजे मला सोताला तसं काय म्हनायचं नाय पर माज्या काणावर आलय म्हनून सांगतो”
“नीट काय ते सांग की रे मर्दा, का आपला उगाच वडा कूटायला लागलायस”
“नाही म्हंजे भाऊ, पब्लिक आसं म्हंतय की, स्टुर्या लई तानता तुमी, लई छळतासा. स्टूरी धाडधाड सांगायची न मोक्ळे व्हायाचे ते नाई ,सग्ळे खूंटीवर टांगूनशान ठिवतायसा जनू”
“हा.. हा… हा, तेच्या पायी लोक्स खवळल्यात व्हयं , आरं सद्या लेका, तेचातच लई मज्जा हाये आणि तुला येक सांगू..”
“काय म्हंतासा भाऊसो”
“आत्ता नाय नंतर सांगतू”
“भाऊ, बगा पुन्यांदा त्येच!लोक उगाच नै खवळत्यात ते ..”
“गाय छाप ची पुडी काड पयला, नंतर बोलू बैजवार”
……………………………………………………………………………………..
क्रमश:
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020