एक सत्य घटना.


९८९ , तेव्हा मी पुण्यात एका औद्योगिक उपकरणे बनवणार्‍या एका कंपनीत ‘संशोधन आणि विकास’ इंजिनियर म्हणून काम करत होतो. तेव्हा ही कंपनी कमालीची गुंतागुंत असलेल्या नियंत्रण प्रणाली (Instrumentation and Control System) बनवण्यासाठी प्रसिद्ध होती, आयात पर्याय  उपकरणें (Import Substitute) करणे ही ह्या कंपनीची स्पेशॅलिटी होती. भारतातील बहुतेक सर्व मोठे उद्योग आमचे ग्राहक होते.

या कंपनीत काम करत असताना मी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाताळले होते,  खास करुन भारतीय अवकाश संशोधन संस्था (इसरो) , भारताची ‘अंटार्टिका मोहीम’ आणि भारतीय लष्कराला लागणारी विविध प्रकारची उपकरणें बनवण्यात माझा मोठा सहभाग होता आणि त्याचा मला आजही मोठा अभिमान आहे. देशा साठी हातात बंदुक धरु शकलो नाही पण भारताच्या लष्करासाठी दर्जेदार उत्पादनें निर्माण करुन थोडी फार तरी देशसेवा करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.

एक दिवशी आमच्या कडे एक ‘फरमेंटेशन कंट्रोलर’ म्हणजेच ‘पदार्थ आंबवण्याची प्रक्रिया नियंत्रीत करणारी उपकरणें’ बनवण्या संदर्भात विचारणां आली, त्याचा तपशील जेव्हा पाहीला तेव्हाच माझ्या लक्षात आले की हे असले उपकरण (नियंत्रण प्रणाली)  मुख्यत: मद्य निर्मीती साठी वापरले जाते. मी तसे विचारले देखील पण हे उपकरण औषध निर्मिती आहे असे मला सांगण्यात आले. माझ्या सारख्या चौकस (काहीशा संशयी) स्वभावाच्या माणसाला हे उत्तर पटणारे नव्हतेच पण शेवटी ती नोकरी होती, काम सोपवले की चोख पार पाडायचे , नसते प्रश्न विचारत बसायचे नाहीत हे एव्हाना शिकलो होतो म्हणूनच मनात शंका असल्या तरी आपण कशाला फार खोलात जायचे अशी स्वत:चीच समजुत घातली.  ‘फरमेंटेशन कंट्रोलर’ बनवायचा आहे ना? बनवू , त्यात काय अवघड आहे असा विचार करुन मी कामाला लागलो.

सुमारे तीन महीने अथक परिश्रम घेऊन मी एक अभेद्य असा ‘फरमेंटेशन कंट्रोलर’ बनवला. ‘बुलेट प्रुफ’, ‘रामबाण’ असे माझ्या डिझाईंस बद्दल ज्या कौतुकाने आजही बोलले जाते त्या लौकिकाला अगदी साजेसा असा तो ‘फरमेंटेशन कंट्रोलर’ बनला होता. आमच्या कंपनीच्या दृष्टिने ही फार महत्वाची ऑर्डर असल्याने सगळे जण खूष झाले. यथावकाश  ‘फरमेंटेशन कंट्रोलर’  त्या ग्राहका कडे पोहोचवला गेला.

‘ईदं न मम’ म्हणत मी दुसर्‍या प्रकल्पात व्यग्र झालो.

असेच काही महीने झाले असतील..

एके दिवशी कंपनीच्या मालकांनी मला त्यांच्या केबीन मध्ये बोलावले.

“सुहास, हे पत्र बघ’

हो तो , १९८९-९० चा काळ,  अजुनही कागदी पत्र पाठवायचा होता, ईमेल इ. माध्यमांचा उदय त्यानंतर कितीतरी वर्षांनी झाला.

मी ते पत्र पाहीले, एका मद्य सम्राटाने स्वत: सही केलेले पत्र होते ते ( आता हा मद्य सम्राट कोण आहे हे मी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. सध्या बराच चर्चेत आहे तो !)

त्या पत्रात आमचे , म्हणजे आमच्या कंपनीचे बरेच कौतुक केले होते , आम्ही  त्यांना  पुरवलेल्या ‘नियंत्रण प्रणाली (Control System) ‘ च्या दर्जा बद्दल अगदी तोंड फाटे पर्यंत स्तुती केली होती, लिहिले होते की आमच्या त्या आधुनिक नियंत्रण प्रणाली मुळे ते बनवत असलेल्या मद्याचा दर्जा कमालीचा सुधारला आहे, नासधूस पण टाळली, उत्पादनाचा वेळ कमी झाला, नफ्याचे प्रमाण वाढले, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मद्याचा दर्जा सुधारल्या मुळे त्याचा खप ही वधारला आहे , अगदी रेकॉर्ड ब्रेक विक्री होते आहे. …..”

सर म्हणाले..

“सुहास या  सार्‍याचे श्रेय एकट्या तुलाच द्यावे लागेल, तु अफाट मेहेनत करून ही सारी नियंत्रण प्रणाली एकट्याने , एकहाती डिझाईन केलीस, तुझे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे…”

सर काय बोलत होते याच्या कडे माझे लक्षच नव्हते.. त्या मद्य सम्राटाच्या पत्रातले “ मद्याचा खप ही वधारला आहे ’ हे वाक्य माझ्या जिव्हारी लागले होते.. मी जीव ओतून डिझाईन केलेल्या एका उपकरणामुळे मद्याचा खप वाढवायला मदत झाली? अरे  रे , हे मी काय करून बसलो.. मी डिझाईन केलेल्या एखाद्या उत्पादनाने कोणाचे प्राण वाचले असते , परकीय चलनाची बचत झाली असती, उत्पादकता वाढली असती तर तो मी माझा बहुमान समजलो असतो पण हे काय ? मी उत्पादन डिझाईन करतो काय आणि त्यामुळे दारूचा खप वाढ वाढतो , आणखी लोक दारुच्या विळख्यात येणार, कमी पिणारे जास्त प्यायला लागणार आणि याला अप्रत्यक्ष रीत्या का असेना मी कारणीभूत ठरणार ! अरे मी हे काय करून बसलो!

“सुहास , कसला विचार करतोस? अरे तुझे एव्हढे कौतुक चाललयं आणि तुझा चेहेरा असा का पडला , काही प्रॉब्लेम आहे का?”

मी सरांना माझी भावना सांगीतली..

सर जागेवरून उठले, माझ्या जवळ येऊन अक्षरश: माझ्या पाठीवरून हात फिरवित म्हणाले..

“सुहास , मी समजू शकतो, तुझ्या सारख्या तरल, भावनाप्रधान व्यक्तीला असे वाटणे स्वाभाविकच आहे. पण जेव्हा आपण व्यवसाय म्हणून काही करतो तेव्हा अशा भावना जरा बाजूला ठेवायच्या असतात. आपण आपले काम चांगले करायचे असते , पुरेपूर निष्ठेने करायचे असते, आणि ते तू  केले आहेसच , त्याचेच फलस्वरूप म्हणून हे कौतुकाचे पत्र ते देखील इतक्या बड्या व्यक्तीने स्वत: सही करून पाठवले आहे.”

“सर , ह्या असल्या स्तुतीची खरेच गरज आहे? हे पत्र वाचताना तो पैशाच्या राशीत लोळणारा मद्यसम्राट जसा माझ्या डोळ्या समोर उभा राहिला तसाच त्या मद्याने बरबाद झालेले हजारों , लाखों  संसार पण माझ्या डोळ्या समोर फेर धरून उभे राहिले, दारु विकणारा तो मद्य सम्राट, त्याला दारु बनवता यावी यासाठीची ‘उपकरणें’ विकण्याचा व्यवसाय करता म्हणून तुम्ही स्वत: आणि आपल्या कडे करत असलेल्या नोकरीचा भाग म्हणून अशी उपकरणे डिझाईन करणारा मी , आपण सगळेच या पापात हिस्सेदार आहोत, कळात – नकळत , प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष आपण मोठा अपराध केला आहे“

“सुहास अगदी बरोबर तु म्हणतो त्यात काहीच वावगे नाहीत, मला तुझे कौतुकच  वाटते , तु  चांगला इंजिनियर तर आहेसच पण मानवतेची , नैतिकतेची जाण असलेला एक सहृदय , सुसंस्कृत पण आहेस , असा कोणी माझ्या कडे काम करतो याचा मला सदैव अभिमान आहे, पण एक व्यावसायिक म्हणून माझी कर्तव्य आहेत आणि इथे नोकरी करतो म्हणून तुझी ही काही कर्तव्ये आहेतच आणि ती आपल्याला पार पाडावी लागतातच तुझी अवस्था कुरुक्षेत्रावरल्या धनुष्य बाण खाली ठेऊन आपल्याच चुलत भावांशी , गुरुजनांशी युद्ध करणार नाही म्हणणार्‍या अर्जुना सारखी झाली आहे आणि तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय उपदेश केला होता?  एक योद्धा म्हणून युद्धा ला उभे राहीले की समोर कोण आहे हे पाहावयाचे नसते , युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे तेच तू पार पाडावयाचे आहे,  युद्ध करणे हेच तुझे विहीत कर्म आहे, आणि हे नेमून दिलेले कर्म करताना या कर्माची फळें कोणती फळें मिळाली पाहीजेत हे ठरवायचा अधिकार तुला दिलेला नाही, म्हणूनच या कर्माची फळे काय मिळतील याची चिंता करणे व्यर्थ आहे , ती चिंता बाजूला ठेव आणि युद्धाला तयार हो .   ….कर्मण्येवाधिकारस्ते…”

“सर , पटते पण वळत नाही”

 


 


“असे बघ सुहास , तु काय किंवा मी काय आपल्या आपल्या  मर्यादित कार्यक्षेत्रात, साधनसामग्रीच्या जोरावर सार्‍या जगाला दारुच्या व्यसना पासून मुक्त करू शकणार आहोत का? नाही. आपण किती जणांना दारू पिण्या पासून रोखणार आहोत? दारूबंदीचे आजवर किती प्रयत्न झालेत, भारतातच नव्हे तर अगदी अमेरिकेत सुद्धा हे प्रयत्न झाले आहेत पण काही काळातच ही दारूबंदी मागे घ्यावी लागली, सक्तीने दारू बंदी करता येत नाही, तुम्ही काहीही करा, कितीही कायदे कानू करा , लोक दारू पिणारच ते पिणारच , कोणीच त्यांना थांबवू शकणार नाही.

“सर, आपण लोकांना दारू पिण्यापासून रोखू शकत नाही जे जरी खरे असले तरी किमान त्यांना दारू पिण्यास प्रोत्साहन मिळेल असे काही तरी आपल्या हातून घडू नये याची काळजी तरी आपण घेऊ शकतोच ना? “

“अगदी बरोबर आहे तुझे , मला पटते देखील पण आपण एक व्यवसाय करतो आहोत, दर्जेदार उत्पादने तयार करणे हे आपले कर्म आहे, ते आपल्याला करावयाचे आहे , मग आपण बनवलेले उपकरण दारु बनवण्यासाठी वापरले जाणार असले तरी”

“सर, नेमकी हीच गोष्ट मला पटलेली नाही, व्यवसाय करायचा म्हणून अशा तडजोडी केल्याच पाहीजेत का?”

“सुहास, असे बघ,  एखाद्या डॉक्टरचे कर्तव्य काय असते?”

“रोग्यावर उपचार करणे, त्याला रोगमुक्त करणे , त्याचा जीव वाचवणे”

“बरोबर ना? मग समजा एखादा खुनी , दरवडेखोर आसन्नमरणावस्थेत एखाद्या डॉक्टर  कडे उपचार घेण्यासाठी आला तर त्या डॉक्टर ने “तू गुन्हेगार आहेस , मी तुझ्यावर उपचार करणार नाही” असे म्हणायचे का”
“अर्थातच नाही, सर, एक डॉक्टर म्हणून त्याने रोग्यावर उपचार करण्याचे कर्तव्य पार पाडलेच पाहीजे”

“बरोबर सुहास, म्हणजे एखादी व्यक्ती केवळ गुन्हेगार आहे म्हणून डॉक्टरला त्याच्यावर उपचार करणे नाकारता येत नाही,  डॉक्टर चे काम ‘रोग्यावर उपचार करणे’ आहे तेच त्याने करावे.  एखादी व्यक्ती गुन्हेगार आहे का हे ठरवणे, त्याला शिक्षा देणे ही कामे पोलिसांची आणि न्यायव्यवस्थेची आहेत, डॉक्टरची नाहीत, तसेच ग्राहकाच्या मागणी नुसार सर्वोत्तम दर्जाची उपकरणे निर्माण करुन पुरवठा करणे हे आपले कर्तव्य आहे आणि तेच आपण केले आहे”

“सर आपले म्हणणे पटते मला पण..”

“सुहास, मी समजू शकतो. पण आता फार विचार करु नको. तु तुझे काम कमालीचे निष्ठेने करतो आहेस, त्याची चांगली फळें तुला नक्कीच मिळणार आहेत , माझ्या वर विश्वास ठेव”

“हो, सर”

“आणि असे बघ सुहास, त्या मद्यसम्राटाने पत्रात काय लिहले आहे? मद्याचा दर्जा सुधारल्या मुळे त्याचा खप ही वधारला आहे.. म्हणजे काय? त्यातला खप वाढला हा भाग बाजूला ठेवला तरी ‘मद्याचा दर्जा सुधारला आहे हा भाग महत्वाचा आहे. आपण लोकांची दारु सोडवू शकत नाही किंवा मद्यप्राशनाचे वाईट परिणाम रोखू शकत नाही पण पण निदान आपल्या उपकरणांमुळे जे दर्जेदार मद्य तयार होत आहे त्याने हे मद्याचे वाईट परिणाम काहीसे कमी होतील, दारु पिऊन आज मरायचे ते आणखी चार दिवसांनी मरतील, दारु पिऊन मरणार तो मरणारच पण किमान अशा जाणार्‍या माणसाचे आयुष्य आपल्याला चार दिवसांनी का होईना वाढवता आले हे काय कमी आहे? “

“हो , वाईटात जर काही चांगले असेल तर हेच!”

“दॅट्स लाईक अ गुड बॉय… बाय द वे, तुझे इन्क्रीमेंट चे लेटर सही करुन ठेवलेय, एच आर मॅनेजर स्व:त येऊन देतील तुला , आजच,  इन्स्टंट कर्मा म्हणतात याला”

“धन्यवाद सर”

 

काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची
चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे

काही करु पहातो, रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणे ही विपरीत होत आहे

हा स्नेह वंचना की काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे

 


असेच दोन किस्से आहेत ते लौकरच आपल्या समोर सादर करेन


शुभं भवतु 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. शरयू आडकर

  खूप छान अनुभव व वैचारिकता
  महान आहात आपण

  0
  1. सुहास गोखले

   धन्यावाद सौ शरयुताई,

   अहो ‘महान’ वगैर काय म्हणता मला! मी तसा काही नाही, एक मात्र खरे मला शाळा – कॉलेजात फार चांगले शिक्षक लाभले , त्यांच्या शिकवण्याचा / संस्काराच मला अजही लाभ होतो आहे पुढे नोकरी त असताना अगदी सुरवातीच्या काळतच डॉ, वाटवे, श्री भोपटकर, श्री दिपक गुप्ता, डॉ रामकृष्ण , श्री राजन मित्रा यांच्या सारखे चांगले वरिष्ठ अधिकारी भेटले त्यांच्या हाताखाली काम करत मी शिकलो. एकदा एखादे काम स्विकारले मग कुरकुर न करता ते निष्ठेने करायचे , सचोटिने करायचे , माझे काम सर्वोत्कृष्टच असले पाहीजे याचा ध्यास धरायचा हे मी करीयरच्या सुरवातीला शिकलो आणि त्याचा आजच्या घटकेलाही मला लाभ होतो आहे, चुका केल्या नाहीतच असे अजिबात नाही, पण केलेल्या चुकांंमधून शिकत गेलो.

   अजुनही शिकतोच आहे, बरीच मजल गाठायची आहे

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.