एक सत्य घटना.


 

‘काटा रुते कुणाला‘ या लेखमालेच्या पहील्या दोन भागात मी काही अनुभव लिहले आहेत, त्याच धर्तीचा आणखी एक अनुभव लिहून ही लेखमाला संपवायची म्हणतो. तसे माझ्या कडे लिहण्या सारखे असे अनेक अनुभव आहेत. काही लोक म्हणतात ‘लिहण्या सारखे त्यांच्या आयुष्यात काही घडतच नाही आणि जे घडते ते लिहण्या सारखे नसते!’ मी मात्र या बाबतीत मात्र सुदैवी ठरलो आहे , देशात – परदेशात काम करताना असे अनेक कडू – गोड अनुभव मिळून माझे जीवन समृद्ध झाले आहे,  पण किती लिहायचे ? आणि लिहले तरी वाचतंय कोण? (मी ह्या बाबतीत मात्र दुर्दैवी!) हा प्रश्न आहेच तेव्हा , थोडक्यात गोडी !

 

या लेखमालेतले पहीले दोन भाग इथे वाचा:

काटा रुते कुणाला .. किस्सा – २

काटा रुते कुणाला .. किस्सा – १

 

सो, त्या मद्यसम्राटाचा प्रकल्प आणि पाठोपाठचा ‘अ‍ॅटोमेटीक टेस्ट सिस्टीम’ चा प्रकल्प मला हादरवून गेला. ‘आपण आपले कर्तव्य पार पाडायचे’ हा गीतेतला उपदेश पटत असला तरी वळत नव्हता. फार अस्वस्थ झालो होतो मी तेव्हा. मनाची ही तगमग अगदी असह्य झाली आणि  त्या तिरमिरीत मुंबईच्या क्लायंट साठी सबमर्सिबल पंपा साठीची टेस्टींग सिस्टीम डिझाईन करायला स्वच्छ शब्दात नकार देत मी सरळ नोकरीचा राजीनामा टाकला. अर्थात कंपनीच्या मालकांनी त्या राजीनाम्याचे तुकडे तुकडे करुन फेकून दिले,  माझे काही ऐकायला ते तयारच नव्हते. मी नोकरी सोडून जाणे त्यांना परवडणारे नव्हतेच. मी जाऊ नये म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केले पण नोकरी सोडायचा माझा निर्णय अगदी पक्का होता.

नोकरीतून बाहेर येताच थोडा मोकळा श्वास घेता आला पण थोडा वेळच,  नोकरी तर सोडली पण आता पोटा पाण्याचे काय? थोडेफार पैसे साठवलेले होते त्याच्या जोरावर काही महीने तग धरता येणार होता पण त्यानंतर पुढे काय हा प्रश्न आता सतावू लागला, दुसरी नोकरी मिळू शकली असती, ती समस्या नव्हती पण नोकरी बदलली तरी कामाचे स्वरुप तेच राहणार आणि पूर्वी आले तसेच अनुभव थोड्याफार फरकाने पुन्हा पुन्हा येत राहणार म्हणून आता नोकरी करण्या ऐवजी स्वतंत्र पणे काम करायचे असे ठरवले. पण स्वत:चे काही करायचे तर नेमके काय करायचे ? हा प्रश्न नव्हे प्रश्नांची मालिका समोर आली. जागा नाही , भांडवल नाही , सॉफ्टवेअर लिहता येत होते, हातखंडा काम होते ते माझ्या साठी पण ते काम करायला एक कॉम्प्युटर लागतो तो कोठून आणणार? मी जिथे स्वत:च १० x १० च्या खुराड्यात राहात होतो तिथे कसले उत्पादन चालू करु शकणार ?  टेक्नीकल कन्सलटन्सी चालू  करणे हा त्यातला त्यात सहजसाध्य आणि कमी भांडवलात , चटकन सुरु करता येण्यासारखा मार्ग होता, मी त्या दृष्टीने प्रयत्न केले , त्या काळात  पुण्यातला एक नंबरचा प्रॉडक्ट डिझाईनर म्हणून माझा चांगला लौकिक होता त्यामुळे काम मिळायला कोणतीच अडचण आली नाही. दोन कंपन्यानी लगेच माझ्याशी करार केले देखील, पण या कामांचे पहिले पेमेंट मिळायलाच चार – पाच  महीने लागणार होते त्या दरम्यान खाऊ काय ?

पण लक्षात आले , मी इंजिनियर आहे , अनेक क्षेत्रात स्वत:चा हाताने काम करुन मिळवलेला अनुभव जमेस आहे, त्याचाच वापर करुन मी शिकवण्याचे काम करु शकतो. पुण्यातल्या प्रतिष्ठीत इंजीनियरींग कॉलेजीस नी मला लेक्चरर ची नोकरी देऊ केली पण अशी नोकरी मला घेता आली नाही. कारण मी तेव्हा दोन कंपन्यांना कन्सलटन्सी देण्या साठीचे देणार करार करुन बसलो होतो आणि एकाच वेळी कॉलेजात पूर्ण वेळ नोकरी आणि कन्सलटन्सी व्यवसाय नियमा प्रमाणे करता येणार नव्हता. काही जण स्वत: नोकरी करायची आणि व्यवसाय बायकोच्या नावावर चालवायचा असे करताना पाहात होतो पण असे काही करणे माझ्या प्रिंसिपल्स मध्ये बसणारे नव्हते आणि बायकोच्या नावावर व्यवसाय चालवायचाच तर आधी बायको असायला हवी ना? मग पूर्ण वेळ नोकरी ऐवजी मी ‘व्हिजीटींग लेक्चरर ‘ पद्धतीने काम सुरु केले आणि माझी एक शिक्षक म्हणून कारकिर्द सुरु झाली.

हा ‘शिक्षकी पेशा’ तेव्हा जो सुरु झाला तो वेगवेगळ्या स्वरुपात / प्रमाणात आजतागायत चालू आहे ! एक इंजीनियर म्हणून जसे वेडे वाकडे . कडू गोड अनुभव आले तसे या ‘शिक्षकी पेशात’ पण आले !! त्याबद्दल नंतर कधी सवडीने लिहेन.

 


 


 

 

कन्सलटन्सी व्यवसाय सुरु केल्याने एक बरे झाले म्हणजे मला बर्‍या पैकी स्वातंत्र्य मिळाले,  नोकरीत जे काम नेमून देतात ते करावेच लागते , इथे मात्र कोणते काम स्विकारायचे हे ठरवण्याचे मला स्वातंत्र्य होते , माझ्या मेहेनतीचे , कौशल्याचे काय मूल्य आकारायचे हे मी ठरवू शकत होतो पण असे करताना अनेक कामे मला सोडून द्यावी लागली , कोठे मी मागत असलेली किंमत मिळाली नाही तर कोठे माझ्या प्रिंसिपल्स शी तडजोड करण्याचे नाकारले म्हणून , एकंदर काय या कन्सलटन्सी व्यवसायाने कधी अंग म्हणुन धरले नाही, सदैव आपले मुडदूस झालेल्या बालका सारखे, हातपायाच्या काड्या आणि पोटाचा नगारा!

‘व्हिजीटींग लेक्चररशीप‘ चे पैसे मिळत होते पण हे काम वर्षात प्रत्येक टर्म मध्ये अडीच – तीन महीने असायचे , हिशेबाने एका वर्षात कसेबसे  पाच – सहा महीने, बाकीच्या सात महीन्यात खडखडाट! आणि कन्सलटन्सी चे पैसे मिळवण्या साठी सुद्धा प्रत्येक वेळी घोटाभर रक्त आटवायला लागायचे.

आर्थीक ओढग्रस्ती असली तर काम करताना मनापासुन आनंद होत होता, अनेक लहान मोठे, चमत्कृतीजन्य प्रकल्प हाताळले , मना सारखा पैसा मिळाला नाही तरी खूप नावलौकीक  मिळवला, मी माझ्या क्लायंट्स साठी डिझाईन केलेल्या दोन उत्पादनांना मराठा चेबर ऑफ  कॉमर्स चे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे ‘गो. स. पारखे’ अवॉर्ड मिळाले. कौतुक, मान सन्मान त्या क्लायंटसना मिळाला, मात्र त्या पारितोषकाचा खरा हकदार असा मी ,  पडद्या आडच राहीलो (नाही म्हणायला त्यातल्या एका क्लायंट ने चितळे आंबा बर्फीचे अर्धा किलोचे बॉक्स हाता वर ठेवले होते, कर मज्जा !! )

एके दिवशी पुण्यातल्याच एक तरुण (जवळजवळ माझ्याच वयाचा) उद्योजक संपर्कत आला. हा उद्योजक (आणि त्याचे आर्मीतून निवृत्त झालेले वडील! ) पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक दूध उत्पादक संघांना (गोकुळ, वारणा, इ.) डेअरी उपकरणे पुरवत होता, त्याच्या डोक्यात एक नव्या उत्पादनाची कल्पना होती. त्या काळात (आज सुद्धा असेल, मला माहीती नाही) हे दुध संघ त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या गावां मधून दुध गोळा करायचे , त्यासाठी प्रत्येक गावात , खेड्यापाड्यात एक ‘दूध सोसायटी’ असायची. गावातले सर्व गाई – म्हशी बाळगणारे या सोसायटीचे सभासद. रोज सकाळ, संध्याकाळ आपल्या कडचे दूध सोसायटीत आणून जमा करायचे. सोसायटीच्या दूध संकलन केंद्रात प्रथम वजन काट्यावर दुधाचे वजन बघायचे  (किलोत वजन घ्यायचे नंतर गणित करुन त्याचे लिटर मध्ये रुपांतर करायचे!), नंतर ‘मिल्कोटेस्टर’नामक उपकरण वापरुन दुधाचा फॅट (गाईचे दुध असेल तर एसएनएफ Solid Not Formed ) तपासायचा, ह्या फॅट वरुन दुध किती चांगले, कसदार आहे हे ठरायचे व त्यावरुन त्या दुधाला काय दर मिळणार हे पण ठरायचे. सरकारने प्रसिद्ध केलेल्या दरपत्रका प्रमाणे (हे वर्षात दोन वेळा बदलायचे ‘सिझन’ व ‘ऑफ सिझन’ ) दुधाचे किती पैसे होतात ही गणिते करायची. आणि त्याची एक छोटीसी पावती त्या सभासदाला द्यायची. पैशाचे व्यवहार मात्र रोज व्हायचे नाहीत, दर पंधरवड्याला एकदाच हिशेब होऊन (इथे भ्रष्टाचाराला मोठा वाव होता म्हणे!) पैसे (फायनल बील) सभासदाच्या जिल्हा सहकारी बँकेच्या खात्यात जमा व्हायचे , अशी ती संपूर्ण प्रक्रिया होती.

ही सर्व प्रकिया अ‍ॅटोमॅटीक करायची असे त्या उद्योजकाच्या मनात होते. माझ्या साठी हा पोरखेळ होता ! मी कॉम्प्युटर वर आधारीत सोल्युशन सुचवले. पण तो उद्योजक त्याला तयार नव्हता, त्याच्या म्हणण्या नुसार अशी कॉम्प्युटर वर आधारित सिस्टीम खेड्यापाड्यात चालवताना अडचणीं येतील, तो काळ असा होता की कॉम्प्युटर चालवू शकणारे लोक शहरांत मिळणे अवघड किंवा महाग होते तिथे खेड्यात कोठून सापडणार? शिवाय कॉम्प्युटर चे काम म्हणजे इंग्रजी ! (तसे त्या काळी होते पण ), खेड्यात असे ज्ञान असलेली व्यक्ती सापडणे अवघडच! मला त्याचे मुद्दे पटले, मी नविन सोल्युशन त्याच्या पुढे ठेवले, त्याच्यात साधारण हॉटेलात किंवा बिगबजार सारख्या ठिकाणी आपण पाहतो तसे एक लहानसे , टेबलावर सहज मावेल असे  ‘पॉईंट ऑफ सेल टर्मिनल (Point Of Sale terminal POS Terminal)  मायक्रोप्रोसेसर चीप वापरुन तयार होणार होते , वजन काटा, मिल्कोटेस्टर या टर्मिनल ला जोडले जाणार होते, वजन , दुधाचे फॅट किती आले ते दाखवणारे मोठे डिस्प्ले (पूर्वी बँकात कॅशीयर जवळ टोकन नंबर दाखवणारे डिस्प्ले असत तसेच). ही यंत्रणा खेड्यात वापरली जाणार , तिथे इंग्रजीची समस्या विचारात घेऊन सगळे म्हणजे दुधाच्या वजनाचे , फॅट (एस एन एफ) , दर काय लागला, आजच्या दूधाचे पैसे किती , हे सर्व आकडे मराठीत, छोट्या पावतीचे प्रिंटींग मराठीत , पंधरा दिवसाचा हिशेब, बिले सगळे मराठीत, सभासदाच्या पेमेंटची माहीती फ्लॉपी डिस्क (त्या काळातला युएसबी पेन ड्राईव्ह!) वर साठवून  ती फ्लॉपी डिस्कच जिल्हा मध्यवर्ती बँकेत पाठवणे , अशा अनेक ‘भारतात प्रथमच’ या सदरात मोडतील अशा सुविधा होत्या,  मराठीत प्रिंट झालेल्या पावत्या , बिले, हिशेबाचे तक्ते पाहून लोक भुताटकी बघितल्या सारखे करायचे , कारण प्रिंटर मधून मराठीत प्रिंट झालेले लोकांनी कधी पाहीलेच नव्हते.

या डिझाईन साठी मी भरपुर पैसे (अगदी अव्वाच्या सवा म्हणता येतील असे!) मागीतले होते त्याला तो उद्योजक तयार पण झाला, मी काम सुरु केले. बाकी सगळे जमले पण मराठीत प्रिंटींग ने मात्र माझे रक्त आटवले. त्या साठी मला माझे स्वत:चे असे मराठी फॉन्ट करावे लागले, तेव्हा आजच्या सारखी फॉन्टमेकर सॉफ्टवेअर उपलब्ध नव्हती, एक एक बिंदू न बिंदू मॅप करत , एक एक अक्षर , काना , मात्रा , वेलांटी , उकार, रफार , जोडाक्षरांचे किचकट नियम यांचा विचार करत हे फॉन्ट एकदाचे तयार झाले.

सिस्टीम तयार झाली, सर्व चाचण्या पूर्ण झाल्या. दृष्ट लागावी अशी सिस्टीम तयार झाली, मी कोणती तक्रार येण्यास जागाच ठेवली नव्हती. पहीली ऑर्डर मिळाली ती कोल्हापुरच्या वारणा दुध संघाच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या एका दुध सोसायटी कडून. कागल तालुक्यातले एक लहानसे गाव चार – पाचशे उंबरठ्यांचे.  कौतुकाची पहीलीच सिस्टीम म्हणून त्या उद्योजकाने मला आग्रहाने , सिस्टीमच्या उद्घघाटनाच्या कार्यक्रमाला नेले. स्थानीक पुढार्‍यांची ‘आज आपल्या इथे …” थाटाची भाषणें झाली , ही यंत्रणा मी डिझाईन केली म्हणून माझी ओळख करुन देण्यात आली, मान म्हणून नारळ, टोपी आणि टॉवेल मिळाला. नंतर पुजा वगैरे करुन , नारळ वाढवून, सिस्टीम सुरु करण्यात आली. सगळे अपेक्षे प्रमाणे सुरळीत झाले. गावकर्‍यांनी आग्रहाने जेवायला घातले. माझा क्लायंट दिवसभर तिथेच थांबणार होता पण मला त्याच दिवशी पुण्याला परतायचे होते, दुपारची तीन च्या यष्टीने कोल्हापुर आणि तिथुन मिळेल ती बस पकडून रात्री उशीरा का होईना पुण्यात पोहोचायचे होते. माझी गडबड चालू होती. इतक्यात खांद्यावर एक हात पडला, मी मागे वळून पाहीले,  गावचे सरपंच होते ते, वय सुमारे पंच्चाहत्तर, सकाळी झालेल्या समारंभात स्टेज वर काहीशा गंभीर मुद्रेने बसलेले पाहीले होते. त्यांची ओळख करुन घेतली होती पण बोलणे असे काही झाले नव्हते. पण आता त्यांनी आपणहुन जवळ येऊन माझ्या खांद्यावर हात ठेऊन बोलायला सुरवात केली..

“कौतुक आहे पोरा तुझे, सगळे आटूमाटीक करुन टाक्लासा, माणसाला काय काम ठेवलेच न्हाई म्हणायचे की”

“हो, तसा प्रयत्न तर केला आहे”

“पर का?

“म्हणजे?

“आरं मला सम्जना झालंय, ह्ये इतके सारे आटूमाटीक करायचे कशापायी रे”

“अहो, त्यामुळे तुमची कामे झटपट होणार, वेळ वाचणार, सभासदांना रांगेत उभे राहवे लागणार नाही. सगळे दूध संकलन वेळेत होईल, दूध नाशवंत माल आहे जास्त वेळ घालवून चालणार नाही, त्याचे संकलन जितक्या लौकर करता येईल तितके करुन, ताबडतोब त्याची पाठवणी दुध संघा कडे होणे महत्वाचे ,  दुध वेळेत दुध संघाकडे पोहोचले तरच दुधाचा दर्जा चांगला राहील आणि  त्यामुळे सोसायटीच्या दुधाला दर पण चांगला मिळेल, सभासदांना चांगला लाभांश / बोनस मिळून गावाचा विकास होण्यास मदत नाही का होणार. शिवाय सगळा हिशेब मशीन करणार असल्याने हिशेबातल्या चुका होणार नाहीत. कोणाला हेराफेरी करता येणार नाही  कोणाची तक्रार येणार नाही. हिशेबाचे काम वेळेत आणि चोख झाल्याने सभासदांना त्यांचे पैसे पण वेळेवर मिळतील”

मी एका दमात उच्चारलेल्या या हाय पीच सेल्स डायलॉग चा त्या सरपंचावर काही ढिम्म परिणाम झाला नाही उलट त्याच्या कपाळावरच्या आठ्या मात्र वेगाने वाढल्या.

“ह्ये सग्ळे ठीक हाय पर याची काय गरज हुती रे”

“अण्णा, आपण असे का म्हणता, माझ्या लक्षात येत नाही”

“लक्शात येत नाई म्हनतुस, आरं तुझे हे ‘मिशीन’ हिथे यायच्या अदुगर स्गळ शिस्तीत चाललं हुतच की, धा वर्सं , कोठे काई अडलतं का? ऑ, मग आत्ताच ह्ये सगळ कशापायी रे.. काल पत्तुर गावची चार पोरं हिथे कामाला होती , येक जण दुदाचे वजन करायला, एक दुदाचा फ्याट मोजायला, येक पावती फाडायला,  येक बुकात यंट्री मारायला आता आज तुझं ये मिशीन आलं, झालं ह्या पोरांचा रोजगार संपला नव्हं का? या समद्यास्नी एक फटक्यात घरी बशिवलस की तू ,आता त्यांनी करायचे काय रे? आदी गावात पोरांना देन्यासारखे काम नाही आन जे हुतें ते बी तुज्या मिशीन ने काहाडुण घ्येटलं आता इतर पोरं गेली तशी ही  पोरं पन शेरात मोलमजुरीला जानार, झोपडपट्टीत किड्या मुंग्या सारखी राहणार “

“अण्णा..”

मला काय बोलावे ते सुचले नाही..

‘आरं, या नोकरीच्या जिवावर यातल्या दोघांची सोयरीक जमली होती, आता कसली सोयरीक आनं कसचे काय. आमाला आमची पोरं हिथे आमच्या गावात रायली पाह्यजे, तेस्नी रोजगारा साटी देशोधडीला लावायचं नाय आम्हाला. गावात नविन रोजगार घावतील आसं बघायचे सोडून तुमी हाये ते रोजगार घालवून बस्लात की. ह्ये असले काही मिशीन पुन्या ममईला चाललं रे पर हिथे असले काई नकू.. परत ग्येऊन जा ये स्मदं,, नगं आमाला.. आमच्या पोरांच्या हातचा रोजगार काहाडूण घेणारं काई नगं आमाला”

….

…..

 

आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला!

“आमच्या पोरांच्या हातचा रोजगार काहाडूण घेणारं काई नगं आमाला” हे विदारक सत्य , लोखंडाचा रस कानात ओतल्या सारखे माझ्या कानात घुसले.

मी चक्क डोके दोन्ही हातांनी दाबून धरत , खाली बसलो.

खरेच हे ऑटोमेशन आवश्यक होते का? खेड्यातल्या तरुणाईला रोजगाराच्या अगदी तुटपुंज्या संधी उपलब्ध असतात, शेतीत भागत नाही आणि रोजगाराच्या संधी नाही अशा कात्रीत सापडलेल्या या युवकां साठी नविन रोजगाराच्या संधी निर्माण करायचे लांबच उलट आपण आहे ते रोजगार नष्ट करुन बसलोय !

विज्ञान , तंत्रज्ञान सगळे ठीक आहे पण जेव्हा बाटलीतल्या राक्षसा सारखे ते आपल्या जीवावरच उठून आपलेच  रोजगार हिरावून घेणार असेल तर काय उपयोग या सार्‍या आधुनिक तंत्रज्ञानाचा ? या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर चांगली दळण वळण यंत्रणा दिली, चांगल्या शिक्षणाच्या किंवा आरोग्य विषयक सुविधा देता आल्या तर चांगलेच पण खास काही लाभ न मिळवून देता आपण काही तरी नविन केल्याचा देखावा करुन चार युवकांच्या नोकर्‍या घालवल्या , या पलीकडे आपण काहीच साध्य करु शकलेलो नाही मग हे करायची काय आवश्यकता होती ?

‘आमाला आमची पोरं हिथे आमच्या गावात रायली पाह्यजे, तेस्नी रोजगारा साटी देशोधडीला लावायचं नाय आम्हाला.” काय चुक होते आण्णांचे , गावातला एखादा तरुण जिद्दीने  इंजिनियर , सी ए  झाला आणि रोजगाराच्या शोधात (नाईलाजाने)  मोठ्या शहरात गेला ते समजण्या सारखे आहे पण दहावी नापास, यस वाय बीए वाला आंद्या (किंवा बाळ्या ) शहरात जाऊन तरी काय करणार आहे. त्यापेक्षा त्याला त्याच्या गावातच रोजगार मिळाला तर तो स्वत:च्या घरातच राहील, थोडी शेती बघेल, दुधाचा धंदा चालवेल. कोंबड्या पाळेल, सुखात मीठ – भाकरी खाईल निदान शहरातले किड्या मुंग्याचे जीणे तरी नक्कीच पदरात पडणार नाही. दर गावातले दर उंबरठ्यातले असे अनेक आनंदा, बाळ्या, गण्या , सुर्‍या, संग्राम, तानाजी रोजगारा साठी घरदार सोडून शहराकडे धाव घेत आहेत ते रोखून त्या हातांना गावातच काम देऊन त्यांचा आणि पर्यायाने गावचा विकास व्हायला हवा ना. विकासाचे हेच मॉडेल योग्य आहे ना? मग विज्ञान , तंत्रज्ञान , एकविसावे शतक यांच्या नादात हा कसला विकास करत आहोत? विकासाच्या नावाखाली गाव भकास , उजाड होतो आहे. आज गावात , आपल्या घरात, आपल्या म्हातारा – म्हातारीची काळजी घेणारे आनंदा, बाळ्या, गण्या , सुर्‍या, संग्राम, तानाजी उद्या शहरात जाणार , आणि मग गावात राहणार कोण? गात्रं थकलेली , जीर्ण जर्जर म्हातारी कोतारी, आज आहेत उद्या नाहीत.

…..

…..

 

मी असाच अस्वस्थ अवस्थेत पुण्यात परत आलो. माझ्या क्लायंटशी नंतर बोललो बरीच चर्चा केली , माझे म्हणणे त्यालाही पटले (माझे सुदैव!) , मग आम्ही त्या सिस्टीम मध्ये आवश्यक बदल केले, काही बदल बरेच मोठे होते. काही ऑपरेशन्स अ‍ॅटोमॅटीक तर काही भाग हातानेच करावा लागेल असे बदल सिस्टीम मध्ये केले. मुळ सिस्टीम चा सारा डौल, चुस्तपणा निघून गेला पण गेलेल्या नोकर्‍या परतून आल्या , गावातले आनंदा, बाळ्या, गण्या , सुर्‍या, संग्राम, तानाजी गावातच राहीले! आपली नोकरी गेली नाही उलट एक कॉम्प्युटर हाताळायचा अनुभव मिळणार हे कळताच त्यांच्या चेहेर्‍यावर पसरलेली खुषी आणि सरपंच अण्णांचे ‘ऐकलस माजं , चांगले केलेस पोरा’ हे कौतुकाचे शब्द !

सगळे भरुन पावले..

देरी से आये लेकिन दुरुस्त आये म्हणतात ते यालाच म्हणत असतील कदाचित …

 

—————–   समाप्त  ——————–

 


(गजल हा प्रकार मला फारसा आवडत नाही पण एखादी गजल अशीच काळजात घर करुन बसते हे मान्यच करावे लागेल, ह्या प्रसंगाला साजेशी आणि मला बेहद आवडलेली मीर तकी मीर ची हि आर्त गझल , मेहेंदी हसनजीं च्या आवाजात आपल्या साठी यु टुब च्या सौजन्याने सादर करत आहे, बाकी काही वाचले, ऐकले नाही तरी ही गजल एकदा ऐकाच , मी म्हणतो म्हणून , माझी खास रिक्केष्ट म्हणून तरी ऐकाच  )

 

 


 

देख तो दिल के जाँ से उठता है

ये धुवाँ सा कहाँ से उठता है

 

गोर किस दिलजले की है ये फ़लक़

शोला एक सुबह याँ से उठता है

 

बैठने कौन दे है फिर उसको

जो तेरे आस्ताँ से उठता है

 

यूँ उठे आह उस गली से हम

जैसे कोई जहाँ से उठता है

 

सुध ले घर की भी शोला-ए-आवाज़

दूद कुछ आशियाँ से उठता है

 

इश्क़ एक ‘मीर’ भारी पत्थर है

कब ये तुझ नातुवाँ से उठता है

 

लेखमाला समाप्त

 

या लेखमालेतले तीन ही लेख एकत्र वाचता यावे म्हणून ह्या लेखांची एक पीडीफ फाईल सोबत देत आहे , इथेच वाचा किंवा डाऊनलोड करुन घ्या 

 

शुभं भवतु 

 

 

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+3

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

12 प्रतिक्रिया

///////////////
 1. Sudhanva Gharpure

  Dear Suhas ji,

  Your experience of Milkomatic is touching. It’s true that boys in rural area certainly needs worthy jobs there itself.

  Men Vs machine issue is always there in highly populated countries. Western countries developed technology since they wanted to do many things & had very less manpower. In India, root cause is high population. Wars and epidemics have stopped. Population has continued to rise. People don’t follow Hum Do Hamara Ek or Do. Scientists agree that ( although looks in-human ) rising human population due to stoppage of wars & epidemics has over burdened the natural resources leading towards depletion.

  Had the Sarpanch of that village promoted Hum Do Humara Ek, all the boys would have got enough jobs in that village itself ( just an example )

  Regards,

  0
  1. सुहास गोखले

   श्री. सुधन्वाजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   आपण म्हणता ते अगदी रास्त आहे, ग्रामीण भागाच्या समस्या ओळखताच आल्या नाहीत असे म्हणावे लागले आणि ज्या काही थोड्या फार योजना राबवल्या गेल्या त्या पुरेशा ठरल्या नाहीत , त्यातच ग्रामीण भागाच्या विकासाच्या चुकीच्या कल्पना डोक्यात घेऊन ‘सहकार’ चळवळ राबवली गेली. चांगली सुरवात झालेली सहकार चळवळ नंतर भ्रष्ट्राचाराच्या दलदलीट आणी राजकारण्यांच्या विळख्यात कधी गेली ते कळलेच नाही (आणि कळले तेव्हा फार उशीर झला होता).

   ग्रामीण भागातल्या समस्या आणि आप्ण काय करु शकतो यासंदर्भात काही विचार मांडलेला ‘स्वदेस’ नामक चित्रपट काही वर्षां पूर्वी पाहील्याचे आठवते, फिल्मी मसाला बाजूला ठेवून त्यातल्या नासा मध्ये काम करणार्‍या अभियंत्याचे (शाहरुख खान ने केलेली भूमिका) विचार विचारात घेण्या सारखे आहेत.

   असो या विषयावर बरेच लिहण्या बोलण्या सारखे आहे. आपल्या विचार पाहूण मला आश्वस्त वाटले की मी एकटाच नाही.

   सुहास गोखले

   0
 2. प्राणेश

  तिन्ही ‘काटे’ बरंच काही शिकवून गेेले! मनःपूर्वक धन्यवाद!!

  मराठी फॉन्ट डिझाइनसाठी त्या काळात तुम्ही काय कष्ट घेतले असतील याची कल्पना मी करू शकतो.

  इतरही अनुभव वाचायला आवडतील.

  0
 3. sandip

  संवेदनशील मन असण फार महत्वाच आहे.
  छान झाली कथा माला

  0
 4. koushal

  Great experience and nicely articulated… will love to read more of this….
  Finally you did something which u liked, is more important in this case 🙂

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री अमितजी, नविन बरेच लिहायचे मनात आहे पण सध्या इतर कामे बरीच असल्याने वेळ मिळत नाही. पण लौकरच लिहेन.

   सुहास गोखले

   0
 5. Gorakshnath

  Rudayala Bhidla aaj tumacha lekh. sir aaj tumchya sarkha vichar karnari mansa havit. aaplyala sarvancha sarvangin vikas hava kahi muthabhar lokancha nako. mulatach 21va shatak he fasava shatak aahe ithe je dista tasa nahi aani je aahe te disat nahi….! aso
  thank you punha ekda eka sundar lekha sathi

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.