एक सत्य घटना.


या लेखमालेतला पहीला भाग इथे वाचा:  

काटा रुते कुणाला — किस्सा – १

या लेख मालिकेतल्या पहील्या भागात मी एका मद्य सम्राटा साठी बनवलेल्या ‘फरमेंटेशन कंट्रोलर’ बद्दल लिहले होते. नोकरीचा भाग , कर्तव्य म्हणून मी ते उपकरण डिझाईन केले, मुळात ते उपकरण ‘औषध निर्मीती’ साठी वापरले जाणार आहे असे मला खोटेच सांगीतले होते. पण जेव्हा मला ते उपकरण दारु च्या कारखान्यासाठी होते हे कळले तेव्हा मला फार वाईट वाटले , कंपनीच्या मालकांनी माझी समजुत काढली होती असे जरी असले तरी ती सल मात्र माझ्या हृदयात कायमची घर करुन राहीली हे ही खरेच.

त्यानंतर साधारण सहा महीन्यात अशीच एक घटना घडली त्याबद्दल आज लिहीत आहे.

तो काळ ‘ISO 9000 सर्टीफिकेट मिळवण्याचा होता, असे सर्टीफिकेट  असणे हे औद्योगीक विश्वात मोठे प्रतिष्ठेचे मानले जात होते ,  त्यामुळे प्रत्येक लहान – मोठी कंपनी असे सर्टीफिकेट मिळवण्याच्या मागे होती. ‘ISO 9000 सर्टीफिकेट मिळवणे ही एक मोठी वेळ काढू आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते त्यामुळे सुरवातीच्या टप्प्यात फक्त मोठ्या उद्योगांनाच असे सर्टीफिकेट मिळवणे शक्य झाले. नंतर मात्र कोणालाही हे असले सर्टीफिकेट मिळायला लागले, अगदी पान टपरी किंवा आलू बोंडा विकणारा देखील असले सर्टीफिकेट मिरवू लागला आणि मग ह्या सगळ्याचेच हसें झाले , आजकाल या सर्टीफिकेटला कोणीच भीक घालत नाही, पण तेव्हा मात्र ह्या सर्टीफिकेटचा मोठा दबदबा होता!‌

ज्यांना असे सर्टीफिकेट प्राप्त झाले त्यांनी मग त्या उत्साहाच्या भरात , या ‘ISO 9000 ‘ चे निकष पूर्ण करण्यासाठी कमालीचे कडक क्वालीटी चेक्स ठेवायला सुरवात केली , प्रत्येक टप्प्यावर अत्यंत कसोशीने , बारीक सारीक तपशीलात जाऊन क्वालीटी नॉर्म्स वापरायला सुरवात केली. हे मोठे उद्योग आपल्या उत्पादनांतून वापरले जाणारे ५०-६०% सुटे भाग, देशभरातल्या अनेक लघुउद्योजकां कडून,  OEM (ओरिजिनल ईक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर)  स्वरुपात घेत असतात, त्यामुळे हा क्वॉलीटाचा वरवंटा या सर्व लहान लघु उद्योजक सप्लायर्स वर फिरायला लागला. ‘अमूक तपासणी झाली पाहीजे’, ‘सर्वचा सर्व लॉट, प्रत्येक नग आणि नग १००% तपासुन, तपशीलवार टेस्ट रिपोर्ट सहीत पाठवला नाहीजे नाही तर ऑर्डर कॅन्सल!’ असे फतवे निघू लागले. लघु उद्योगकच ते , आधीच कसेबसे मेटाकुटीने आपला व्यवसाय सांभाळत होते त्यात दुष्काळात तेरावा महीना म्हणतात तशातली गत झाली. ‘क्वालीटी’ बद्दल कोणाचेच दुमत असणार नाही पण त्याचा अतिरेकी सोस या लघु उद्योजकांचे कंबरडे मोडणारा ठरला.

मुंबईचा असाच एक लघु उद्योजक XXXX  कंपनीचा मालक, या ‘ISO 9000 ‘ चे निकष सांभाळताना हैराण झाला होता इतका की हा व्यवसायच बंद करावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.  हा उद्योजक लहान आकाराच्या विजेच्या मोटार्स  (Fractional horse power motors) बनवत होता. ह्या मोटार्स वॉशींग मशीन, पंखे, ड्रीलिंग मशीन्स, हेअर ड्रायर, मायक्रोवेव्ह ओव्हन, ए.सी., मिक्सर – ग्राईंडर्स अशा अनेक घरगुती आणि औद्योगीक वापराच्या उत्पादनात वापरलेल्या दिसतात. ही उत्पादनें तयार करणार्‍या मोठ्या कंपन्या त्यांना लागणार्‍या विजेच्या मोटार्स  अशाच कोणा लघु उद्योजकांकडून घेऊन आपल्या उत्पादनात वापरतात. हा मुंबईचा लघु उद्योजक अशा काही कंपन्यांना मोटार्स पुरवत असे.

हा उद्योजक तयार केलेल्या विजेच्या मोटार्स  त्याच्या मगदूरा प्रमाणे काही दर्जा चाचण्या करुनच पाठवत असे , नाही असे नाही . एखादी विजेची मोटार चांगली काम करते की नाही हे ठरवण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात पण ह्या चाचण्या अगदी बारकाईने म्हणजे फाईन स्टेप्स मध्ये केल्या जात नाहीत . उदाहरणच द्यायचे तर एखाद्या मोटार ची लोड टेस्ट करताना मोटार वर कोणतेही लोड नसताना ( ०%) , कमी लोड असताना (२५%) , मध्यम लोड असताना  (५०%) , पूर्ण लोड दिल्यानंतर (१००%) , जरा ओव्हर लोड केल्यावर (१२५%) अशा चार पाच टप्प्यात टेस्ट केली जायची,  या मुळे ही टेस्ट कमी वेळात व्हायची आणि बहुतांश वेळा अशा चार-पाचच टेस्ट केसीस घेऊन केलेली चाचणी पुरेशी ठरते, शिवाय एका लॉट मध्ये समजा १० मोटार्स असतील तर त्यातल्या रॅन्डम निवडलेल्या तीन मोटार्स खर्‍या अर्थाने तपासल्या जायच्या, त्या ठीक (OK) निघाल्या तर तो सगळा लॉट ठीक आहे असे समजले जायचे.

पण आता हे ‘ISO 9000 ‘ चे दर्जाच्या बाबतीतले निकष पूर्ण करायचे तर प्रत्येक मोटार कसोशीने तपासवी लागणार होती. मघाच्या ‘लोड टेस्ट’ चे च उदाहरण घेतले तर आता ०%, २५%, ५०%, १००%, १२५% अशा पाच टप्प्यात न करता अक्षरश: ० % .. १%..२%…३% असे करत १२५% पर्यंत जायचे म्हणजे पाच टेस्ट्स ऐवजी आता १२५ टेस्ट घ्याव्या लागणार होत्या. या कामात अतोनात वेळ खर्च तर होणार होता, अशा टेस्ट करत बसलो तर डिलीव्हरीचे सारे वेळापत्रक कोलमडणार होते , शिवाय या सगळ्या टेस्ट इतक्या बारकाईने करायच्या तर बरीच जादाची खर्चिक उपकरणें, जागा, प्रशिक्षित मनुष्यबळ लागणार होते. हे सर्व त्या उद्योजकाला पेलवणारे नव्हते, आणि जर अशा टेस्ट घेता आल्या नाहीत तर त्या मोठ्या कंपन्या त्याला ऑर्डर देणार नव्हता. हा उद्योजक कात्रीत सापडला होता.

कोठून तरी त्याला कळले की मी तेव्हा ज्या कंपनीत काम करत होतो ती कंपनी अशा मोटार्स कॉम्प्युटर च्या साह्याने अ‍ॅटॉमेटीक टेस्ट करुन देणारी यंत्रणा पुरवू  शकेल आणि अशी यंत्रणा कमी जागेत , कमी मनुष्यबळाचा वापर करुन या सार्‍या टेस्ट अगदी त्या ‘ISO 9000 ‘ चे दर्जाच्या बाबतीतले सर्व  निकष  पाळत पूर्ण करेल.

जेव्हा हा उद्योजक आमच्या कडे आला तेव्हा मी त्याच्याशी प्राथमिक चर्चा केली होती. मी तेव्हा कॉम्प्युटर हार्डवेअर – सॉफ्टवेअर – मायक्रोप्रोसेसर्स – इनस्ट्रुमेंटेशन- अ‍ॅटोमेशन अशा क्षेत्रात पार गळ्या पर्यंत बुडालेलो असलो तरी मी मुळचा (हाडाचा) इलेक्ट्रीकल इंजिनियरच असल्याने , या उद्योजकाच्या नेमक्या गरजां मी चांगल्या समजून घेऊन त्याच्या बजेट मध्ये बसेल असे समर्पक सोल्युशन पण सुचवू  शकलो.

आम्ही ते काम (आव्हान) स्विकारले आणि कामाला लागलो. या अ‍ॅटोमेटीक टेस्ट यंत्रणेचे डिझाईन करताना मी वारंवार मुंबईला त्या लघु उद्योजकाच्या कारखान्याला भेटीं दिल्या होत्या.

यथावकाश ही यंत्रणा तयार झाली आणि ती मुंबईला त्या उद्योजकाच्या कारखान्यात बसवली गेली , त्याचे विधीवत उदघाटन वगैरे केल गेले. मी जीव ओतुन केलेली ती यंत्रणा बिनतक्रार काम करु लागली, तो उद्योजक खूष झाला आणि आम्हीही.

  

असेच काही महीने गेले, एके दिवशी कंपनीच्या मालकांनी मला बोलावले..

“सुहास, तुला ती XXXX कंपनी आठवते का?”

“हो, सर , आपण त्यांना ईलेक्टिकल मोटार्स साठीची अ‍ॅटोमेटीक टेस्ट यंत्रणा तयार करुन दिली होती. त्यात काही समस्या आली आहे का?”

“अजिबात नाही, बिनतक्रार चालू आहे , एक दिवसही खंड नाही, शेवटी तु केलेले डिझाईन आहे ते  , ग्रेट जॉब , सुहास..”

“धन्यवाद,  पण आता या कंपनीचा संदर्भ…”

“सांगतो, ती कंपनी आता सबमर्सिबल पंप बनवणार आहे  आणि त्या साठी त्यांना अशीच एक अ‍ॅटोमेटीक टेस्ट यंत्रणा हवी आहे . अर्थातच त्यांना ती आपल्या कडूनच हवी आहे आणि तुच त्या प्रोजेक्ट वर काम करावे असा त्यांचा आग्रह आहे इतकेच नव्हे तर तु डिझाईन करणार असलास तरच ऑर्डर देणार असे म्हणत आहेत, तेव्हा…”

“ठीक आहे, मी बघतो त्यांना नेमके काय हवे आहे ते. “

“चालेल, काम सुरु कर”

मी दुसर्‍याच दिवशी मुंबईला जाऊन त्या उद्योजकाला भेटलो, एखाद्या व्हिआयपी चे व्हावे तसे माझे स्वागत झाले. मला कोठे ठेऊ आणि कोठे नाही असे झाले त्यांना. अर्थात मला हे नविन नव्हते. डिझाईनर म्हणून मी जिथे जिथे गेलो तिथे अगदी अमेरिकेत देखील, माझे असेच स्वागत झाले आहे. ‘जे काही करेन ते सर्वोत्कृष्टच’ असा ध्यास अगदी सुरवाती पासुन जोपासला होता त्याचीच ही फळें होती.

त्या उद्योजकाच्या केबीन मध्ये बसून मी त्यांच्या गरजा समजाऊन घेतल्या, नोटस काढ्ल्या, बरीच चर्चा झाली, मग त्या उद्योजकाने जंगी खाना खिलवला, जेवण झाल्या नंतर मी उत्सुकतेने विचारले..

“काय , आमची  ईलेक्टिकल मोटार्स साठीची अ‍ॅटोमेटीक टेस्ट यंत्रणा कशी चालू आहे?”

“एकदम फस्क्लास, काही समस्याच नाही, आम्ही अपेक्षा केली होती त्याच्या दहापट उत्कृष्ट परफॉरमन्स देती आहे.”

“मला एकून बरे वाटले, केलेल्या कष्टाचे समाधान वाटले”

“सुहासजी, चला आपण शॉप फ्लोअर वर एक राऊंड मारु, चालेल?”

“चालेल म्हणजे काय? मला ही पाहायचे आहे आमचे उत्पादन आपली कशी सेवा करत आहे..”

शॉप फ्लोअर वर चक्कर मारत आम्ही, मी तयार केलेल्या त्या अ‍ॅटोमेटीक टेस्ट यंत्रणे पाशी आलो, एक निळा वर्कशॉप चा डगला घातलेला कामगार टेस्ट पूर्ण झालेल्या चार मोटार्स (सिस्टीम एकाच वेळी चार मोटर्स टेस्ट करु शकत होती) बाहेर काढून त्या जागी दुसर्‍या टेस्ट करावयाच्या मोटार्स बसवण्याचे काम करत होता. ते काम अगदी धसमुसळे पणाने किंबहुना चुकीच्या पद्धतीने चालले होते, मला ते बघवले नाही. पण त्या उद्योजका समोरच त्याच्याच कर्मचार्‍याला बोलणे / झापणे मला प्रशस्त वाटले नाही म्हणून मी नुसतेच त्या उद्योजका कडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहीले, माझ्या कपाळावरच्या पडलेल्या आठ्या त्याने ओळखल्या. तो मला म्हणाला..

“चला , केबिन मध्ये जाऊन बोलुया’

केबीन मध्ये येताच मी माझी नाराजी व्यक्त केली..

“तो तुमचा कर्मचारी अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम हाताळत होता असे दिसले,  कोणी नवीन आहे का ?”

“नवीन नाही , माझा जुना , विश्वासू  आहे , शंकर त्याचे नाव,  आयटीआय झालाय पण काम म्हणालात तर एका इंजिनियर च्या तोडीचे, म्हणूनच  मी  त्याला ह्या सिस्टीम वर ठेवलाय”

“माफ करा जरा स्पष्ट बोलतो पण हे काम अशा अल्पशिक्षीत कामगाराचे नाही, या कामासाठी जरा जास्त तांत्रिक ज्ञान असलेली व्यक्ती पाहीजे”

“तुमचे बरोबर आहे पण मी स्वत: शंकर ला ट्रेन केले आहे , गेले कित्येक महिने तोच हे काम करतो आहे, आज जरा त्याच्या हातुन गडबड झालेली दिसली खरी पण शंकर चे काम चांगले आहे, तरी देखील मी त्याला समजावतो असल्या चुका खपवून घेतल्या जाणार नाहीत”

“पण शंकर का? नाही, शंकर एक कुशल कामगार असेलही , तुम्ही त्याला चांगले ट्रेनिंग दिले असणार यात शंका नाही पण  ही सिस्टीम कमालीची नाजुक आणि गुंतागुंतीची आहे, ही सिस्टीम हाताळणे एका इंजिनियरचे काम आहे,  शंकर सारखी व्यक्ती कितीही प्रशिक्षीत असली तरी ह्या कामाला योग्य तो न्याय देऊ शकणार नाही असे मला वाटते. किंबहुना एखादा इंजिनियर किमान डिप्लोमा इंजिनियर यावर काम करेल हे गृहीत धरुन ही यंत्रणा डिझाईन केली आहे… तेव्हा कोठे तरी चुकतेय, बघा पटते का ?”

“सुहासजी,  आपले बरोबरच आहे, आमच्या पेक्षा आपल्यालाच जास्त माहीती , पण आपण म्हणता तसा इंजिनियर आता आणू कोठून ?”

“का ? ही सिस्टिम डिझाईन करते वेळी मी इथे बर्‍याच वेळा आलो होतो, तेव्हा तुमच्या कडे दोन इंजिनियर होते ना? काय त्यांची नावे होती बरे.. हां आठवले.. वर्तक आणि जमखिंडी .. ( ही खरी नावे वापरली आहेत ... ) मी त्यांच्याशीच तर तांत्रिक चर्चा करत होतो, त्यांनाच हे काम करायला का सांगत नाही, स्मार्ट गाईज, दोघांनाही मोटार टेस्टींगचा चांगला अनुभव आहेच शिवाय इंजिनियरींग पदवी असल्याने हे दोघे ही सिस्टीम अधिक कुशलतेने हाताळू शकतील..”

“वर्तक आणि जमखिंडी.. येस… चांगली पोरं होती”

“होती ? म्हणजे आत्ता नाहीत? तरीच शॉप फ्लोअर वर दिसली नाहीत मला..”

“त्याचे काय आहे सुहासजी, आपली सिस्टीम बसवली तेव्हा सुरवातीला हे दोघेच ती चालवत होते, मग नंतर लक्षात आले की सिस्टीम इतकी चांगली डिझाईन झाली आहे की कोणीही ती चालवू शकेल. त्यासाठी इतके क्वालीफाईड आणि महागडे इंजिनियर लागणार नाहीत..”

“म्हणजे..तुम्ही त्यांना..”

“येस , जर त्यांचे काम आमच्या शंकर सारखी लोकं सहजतेने करत असतील तर मोठा पगार देऊन या इंजिनियरर्स कशाला पोसायचे म्हणून आम्ही त्या दोघांना कामावरुन काढून टाकले, मोठा खर्च वाचला आमचा”

हे वाक्य ऐकले आणि डोक्यावर एखादा विजेचा लोळ कोसळावा तसे झाले मला !

‘आम्ही त्या दोघांना कामावरुन काढून टाकले..’ हे वाक्य काळीज चिरत गेले माझ्या!

अरे रे,  मी हे काय करुन बसलो ! मी एक अत्याधुनिक सिस्टीम्स तयार केली याचा अभिमान एका क्षणात गळून पडला..मी हे काय करुन बसलो? माझ्या सिस्टीम ने काम सोपे केले , झटपट केले हे जरी ठीक असले तरी त्या सिस्टीम ने दोन इंजिनियर्स ची नोकरी घालवली  त्याचे काय?

प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असल्याने, नोकरी जाणे म्हणजे काय , बेकार बसून राहणे म्हणजे काय आणि दुसरी नोकरी मिळवता काय यातायात करावी लागते याची कल्पना होती त्यामुळे या , वर्तक आणि जमखिंडींचे काय झाले असावे याची मी कल्पना करु शकत होतो. नोकरीतुन काढून टाकल्यावर त्यांचे झालेले केवीलवाणें चेहेरे डोळ्या समोर फेर धरुन नाचू लागले. मी डिझाईन केलेल्या सिस्टीम ने या दोघांचा बळी घेतला, मी ही असली सिस्टीम बनवली नसती तर कदाचित आजही ते दोघे , हसत खेळत , चेष्टा मस्करी करत मोटार्स टेस्ट करताना दिसले असते, आज कोठे असतील ते ? ही सिस्टीम आल्या मुळेच त्यांच्या नोकर्‍या गेल्या हे त्यांच्या लक्षात आले नसेल का? आणि मग त्या सिस्टीम बद्दल, ती डिझाईन करणार्‍या सुहास गोखले या व्यक्ती बद्दल काय कौतुकाने थोडेच बोलतील?

चार बुके काय शिकलो , देवाने जरा बर्‍यापैकी बुद्धीमत्तेचे दान पदरात काय टाकले आणि त्याचा वापर करुन मी हे काय करतोय? कधी एका मद्य सम्राटाला मदत करुन दारु सारखे विष समाजात पसरवायला मदत करतोय तर कधी दोन तरुण , उमद्या इंजिनियर्स च्या तोंडचा घास काढून घेतोय!

ही माझी डिझाईंस , हा माझा अभिमान ! नाही, नको , असे काहीही माझ्या हातुन होऊ नये . माझे ज्ञान , माझे  कौशल्य अशा विपरीत कामां साठी वापरले जाता कामा नये.

माझा सारा मूडच गेला. कसेबसे ते संभाषण आवरते घेऊन मी विषण्ण मनाने पुण्याला परतलो..

आजही ती  ‘वर्तक आणि जमखिंडीं’ जोडगोळी माझ्या डोळ्या समोर तरळते. कोठेतरी अपराधीपणाची भावना उचल घेते , डोळ्याचा कोपरा पाणावतो..

हा लेख  लिहिताना मी  मुद्दाम , जाणीवपूर्वक या दोघांची खरी नावे वापरली आहेत , कदाचित ते हा लेख वाचतील देखील , आणि त्यांच्या वाचनात हे लिखाण आलेच तर त्यांच्या साठी माझी एक कळकळीची विनंती ….

वर्तक आणि जमखिंडीं ,   तुमची नोकरी जाण्यास किंचितसा का होईना मी कारणीभूत ठरलो आहे ,  त्याबद्दल तुम्ही मला माफ कराल ?

 


असाच आणखी एक अनुभव आहे , तो या लेखमालेच्या तिसर्‍या आणि शेवटच्या भागात आपल्या समोर मांडतो.


 

क्रमश:

 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
 1. Sudhanva Gharpure

  Very true Suhasji,

  We all may be having such experiences. We do something which we feel right at that moment, but we realize after some years that it has damaged somebody. This does develop guilt.

  It’s very exceptional that you have admitted it openly.

  Warm regards,

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.