फार वर्षापूर्वी ‘व्यक्तीमत्व विकास’ संदर्भात एक बोधकथा ऐकली होती , त्यातल्या संदेशाचा मला फार उपयोग झाला.

काय आश्चर्य बघा , आज त्या बोधकथेतला प्रसंग जसाच्या तसा माझ्या समोर घडला ….

त्याचे असे झाले …

आज एक जातक संध्याकाळी भेटायला आले होते, पावसाची भुरभुर चालु असल्याने त्यांनी आपली छत्री बरोबर आणली होती. काम झाल्यावर ते निघून गेले , जरा वेळाने माझ्या लक्षात आले की साहेब आपली छत्री विसरुन गेले आहेत. त्यांचा फोन नंबर असल्याने मी लगेच त्यांना फोन करुन छत्री बद्दल सांगीतले , ते तसे फार दूर गेले नसल्याने लगेचच यु-टर्न घेऊन परत आले.

“धन्यवाद, ही छत्री माझी लाडकी आहे, चाळीस वर्षा पुर्वी घेतली , आता अशा मोठ्या आणि दणकट छत्र्यां बाजारात भेटत नाहीत,  आजकालच्या चीनी बनावटीच्या छ्त्र्यात काही दम नाही. ही छत्री घेऊन चाळीस वर्षे झाली , माझ्या मैत्रीणी सारखी सतत माझ्या सोबत असते”

“चाळीस वर्षे जुनी ? पण काका ही छ्त्री तर अगदी नवीन वाटते”

“वाटणारच , गेल्याच महीन्यात छत्रीचे कापड बदलले”

“कसे का असेना तब्बल चाळीस वर्षे ही छत्री आपल्या पाशी टिकली , नाही तर आम्ही, आमच्या छ्त्र्या केवळ हरवण्या साठीच घेतल्या की काय असे वाटते”

“म्हणालो ना माझी मैत्रीण आहे ही, चांगली निगा राखतो हीची. गेल्या सिझन ला सगळ्या काड्या बदलून नवीन टाकल्या, त्याच्या आदल्या वर्षी स्टीलची दांडी बसवून घेतली आधीची गंजली होती, त्या आधी एकदा मुठ पण बदलून घेतली, त्याच्या आधीच्या वर्षी हा उघड झाप करायचा घोडा आहे ना तो बदलला, या मापाचा मिळत नव्हता शेवटी मुंबईला एके ठिकाणी मिळाला एकदाचा”

“बरीच काळजी घेतलीत म्हणायचे, खर्च ही बराच झाला असणार”

“तर काय , आपली छत्री एकदम चकाचक असते. छत्री घेतल्या पासुन तीन वेळा कापड, चार वेळा काड्या बदलल्या  म्हणुन तर चाळीस वर्षे छत्री टिकली. आपले कामच  असे असते , छत्री आज ही काल घेतल्या सारखी नवीन दिसते”

“पण काका, चाळीस वर्षा पुर्वी आपण छत्री घेतली म्हणता पण त्यातले ओरीजनल असे आता काय राहीलेय , सगळे पार्ट्स तीन- चार वेळा बदलून झालेत , मुळ छत्रीतले आता काहीच शिल्लक नाही तरीही आपण म्हणता ही छ्त्री चाळीस वर्षा पासुनची , चाळीस वर्षे टीकली आहे “

“पार्ट बदलले ते छत्री तिचे काम अधिक चांगल्या रितीने करत राहावी म्हणुन, पण माझ्या साठी ही छ्त्री चाळीस वर्षाची आहे , म्हणुनच माझी लाडकी आहे”

…….

काड्या, कापड, दांडा, घोडा, मुठ असे छत्रीतले एक न एक पार्ट अनेकदा बदलले, मुळ छत्रीतले काहीही आता शिल्लक नाही तरीही काकांना ती छत्री चाळीस वर्षाची का वाटते, इतकेच नाही तर सध्या दिसणारी छ्त्री हीच चाळीस वर्षा पुर्वी घेतलेलीच छत्री आहे असे काका ठाम पणे का म्हणत होते?

याचे साधे सोपे उत्तर आहे : छत्रीत अनेक बदल होत गेले पण एका वेळी एकच बदल होत गेला. सगळे पार्टस एकदम बदलले असते तर सगळी छत्री बदलली असे झाले असते आणि काकांना ही मग ही छत्री चाळीस वर्षे टिकली असे म्हणता आले नसते , प्रत्येक बदलाच्या वेळी मुळ छत्रीतले काही तरी शिल्लक असायचे त्यामुळे आपण छत्री बदलली नाही तर तिचा एखादा पार्ट्च बदलला असे काकांना वाटत राहीले आणि म्हणुनच त्यांच्या दृष्टीने त्यांच्या हातात असलेली छत्री ही तीच जी त्यांनी चाळीस वर्षां पुर्वी खरेदी केली होती.

आपल्या व्यक्तिमत्वाचे असेच असते , अनेक घटकांनी आपले व्यक्तीमत्व घडत असेत , कधीतरी आपल्याला साक्षात्कार होते की आपण समाजात अप्रिय आहोत ,  आपल्या व्यक्तीमत्वातले दोष प्रकर्षाने जाणवतात (किंवा कोणी तरी दाखवून देते)  मग सगळे एका रात्रीत बदलायचा घाट घातला जातो.

पण तो फसतो !

असे का होते?

आपले अव्यक्त मन (Subconscious mind) कोणतेही होलसेल बदल स्विकारत नाही किंबहुना करुच देत नाही कारण एकदम बरेच बदल किंवा एखादा मोठा बदल घडवण्याचा प्रयत्न झाला तर आपण आपलीच ओळख हरवून बसु अशी भीती आपल्या अव्यक्त मनाला वाटत असते. त्यामुळे व्यक्तीमत्वातले बदल करताना एका वेळी एकच बदल तो ही लहानसा असा केला तर अव्यक्त मनाला ही भीती / शंका राहात नाही कारण एक वाईट सवय किंवा खोड बदलली तरी व्यक्तीमत्वाचे बाकिचे पैलू जुनेच असतात त्यामुळे अव्यक्त मन असा लहानसा बदल सहजतेने स्विकारते , अंमलात आणते . मग दुसरा बदल , मग तिसरा असे  बदल करत गेलो तर हळू हळू व्यक्तीमत्वात मोठे बदल नक्की घडवून आणता येतात.

रोज सकाळी आठ वाजले तरी लोळत पडणारा बंडू,  नव्या वर्षाचा संकल्प म्हणुन एक जानेवारी पासुन , सकाळी पाच वाजता उठून व्यायाम / अभ्यास/ ध्यान / रियाज करणार असा संकल्प सोडतो पण हा संकल्प एक दिवस तरी पाळला जातो का? असे संकल्प अयशस्वी का होतात? कारण एकाच वेळी मोठा बदल करायचा प्रयत्न केला जातो.

केवळ ३१ डिसेेंबर ते १ जानेवारी  असे कॅलेेंडर चे पान उलटले ,म्हणुन एका रात्रीत असे काय होणार की आठ वाजे पर्यंत लोळणारी व्यक्ती भल्या पहाटे पाच वाजता उठून कामाला लागेल ? असे संकल्प यशस्वी व्हायचे असतील तर लहान लहान बदल करायला सुरवात करा, अव्यक्त मनाला एकदम धक्का (शॉक)  बसेल असे बदल करुच नयेत. आठ वाजता उठायची वर्षानुवर्षाची सवय अशी एकदम जाणार नाही, त्या साठी प्रथम सकाळचे आठ  ऐवजी सात ( गेला बाजार साडे सात !) वाजता उठायचा संकल्प करा, आठ आणि सात हा फरक लहान असल्याने अव्यक्त मन तो स्विकारते , अंमलात ही आणते. एकदा सात (किंवा साडे सात) ची सवय अंगवळणी पडली की सहा वाजता उठायचा संकल्प करा , हा बदल पण तुलनात्मक (सात ऐवजी सहा, एक तासच लौकर तर उठायचेय)  लहान असल्याने तो ही कोणतीही कुरकुर न करता अंमलात येईल आणि मग तिसर्‍या टप्प्यात आपला मुळचा पहाटे पाच वाजता उठायचा संकल्प अंमलात आणणे कमालीचे सोपे जाईल कारण सहा वाजता आणि पाच वाजता यात ही फक्त एक तासाचेच अंतर आहे (सहा ऐवजी पाच, एक तासच लौकर तर उठायचेय)  !

पहाटे लौकर उठणे , व्यायाम करणे, निटनेटके राहणे, फेसबुक/ व्हॉट्स अ‍ॅप वर वेळ न घालवणे , अभ्यास करणे , सिगरेट / दारु सोडणे, घराच्या कामात मदत करणे, कट्ट्यावर टाईमपास न करणे, फ्यॅमीली साठी जास्त वेळ देणे, अनावश्यक खरेदी न करणे, रोजच्या रोज हिशेब ठेवणे ….  असे अनेक महत्वाकांक्षी संकल्प एक जानेवारीला सोडले जातात आणि अवघ्या एक – दोन दिवसात धुळीस मिळतात , याचे कारण हेच आहे एकदम अनेक बदल किंवा एकच पण मोठ्ठा बदल करण्याचा प्रयत्न !

बघा पटते का?

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
 1. मयुरेश आडकर

  अतिशय मार्गदर्शक लेख आहे हा
  स्पेशली त्यांना ज्या लोकांना आपली वाईट सवय सोडायची आहे
  तुमचे लेख नेहमीच छान असतात उतकंठवर्धक असतात
  स्पेशली तुमच्या अभ्यासातून तुम्ही प्रश्नकुंडली ने उत्तर देता ते फार भारी वाटत
  तुम्हाला शुभेच्छा

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री मयुरेशजी,

   आपल्या सरखे काही जाणकार, रसिक आणि चोखंदळ वाचक आहेत त्या जोरावर मी काही बाही लिहीत असतो. आपला स्नेह असाच कायम रहावा ही विनंती

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.