या लेखमालेतला पहीले भाग इथे वाचा…
उपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ४
उपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३
उपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २
उपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १
“वत्सा त्याचे असे आहे , जेव्हा आपण तोडगे सुचवतो तेव्हा दोन महत्वाच्या बाबीं लक्षात ठेवायला पाहीजेत. पहिली बाब म्हणजे , तो तोडगा जातकाने करता येईल / परवडेल असा असला पाहीजे. कमरे एव्हढ्या पाण्यात , एका पायावर उभे राहून , एक लक्ष जप करणे सगळ्यांनाच जमेल असे नाही किंवा एखादी दुर्मिळ वस्तू (सापाचे गरळ, माकडाची वार ) जी आणणे भल्या भल्यांना शक्य होणार नाही. तेव्हा असे अवघड तोडगे सांगीतले तर जातक ते करु शकणार नाही . म्हणूनच मी त्या शेतकर्याला अगदी साधा सोपा , बिनखर्ची तोडगा सुचवला , एव्हढेच नव्हे तर त्याला जादा खर्च पडू नये म्हणून ‘जपाची माळ’ पण फ्री मध्ये दिली. सावकार आणि क्षेत्रपालाला सुचवलेले तोडगे जरा खर्चिक असले तरी त्या दोघांना ते सहज साध्य असेच होते ”
“पण बाबा असे का? शेतकर्याला जो सोपा, बिनखर्चीक तोडगा सांगीतला तोच त्या सावकाराला का नाही , तो ही आर्थिक अडचणींत आहे ना ?”
“बरोबर पण सावकार आर्थिक अडचणी असला तरी तो त्या शेतकर्या इतका कफल्लक पण नाही. त्यामुळे त्याला जरा खर्चिक तोड्गा सुचवला . त्याच न्यायाने प्रधान क्षेत्रपाला ला त्याहुनही जादा महागडा तोडगा सांगीतला..”
“बाबा माझ्या लक्षात आले..”
“वत्सा , ही झाली उपाय – तोडग्यां संदर्भातली पहिली बाब, दुसरी बाब त्याहुनही महत्वाची आहे”
“ती कोणती बाबा?”
“मी मघाशी व्यक्ती , स्थळ, काळ, परिस्थिती बद्दल म्हणालो होतो… ग्रहमानाचा अर्थ लावताना याचा विचार करणे अत्यावश्यक असते तसेच ते तोडगे सुचवताना सुद्धा त्याचा विचार करावा लागातो. “
“बाबा मला समजले नाही..”
“असे बघ , आपण जेव्हा तोडगा सुचवतो तेव्हा जातकाने तो मोठ्या श्रद्धेने केला पाहीजे असे बजावतो पण, पण ही श्रद्धा त्या जातकाच्या मनात निर्माण कशी होणार ? त्यासाठी दोन घटक लागतात त्याला , पहीला घटक त्याचा ज्योतिषा वरचा विश्वास आणि दुसरा घटक तो तोडगा स्वत:च “
“…”
“असे बघ जर मी त्या शेतकर्याला जप करण्या ऐवजी हात जोडून देवाला प्रार्थना कर असा तोडगा सुचवला असता तर त्याच्या मनात काय आले असते ? अरे, देवाला हात तर मी रोजच जोडतो.. तुम्ही काय वेगळे करायला सांगीतले ? त्याला उपास करायला सांगीतले असते तर तो म्हणाला असता , उपास काय रोजच घडताहेत , त्याचा काही उपयोग होणार नाही… तेव्हा त्याच्या दृष्टीने वेगळा किंवा जालीम असा तोडगा म्हणजे एखाद्या मंत्राचा जप ते सुद्धा मंत्रवलेली जपमाळ घेऊन … असे काही असेल तरच तो तोडगा त्याला पटेल , त्याचा त्यावर विश्वास बसेल..आणि तो तोडगा श्रद्धेने केला पण जाईल”
” हो , बाबा अगदी बरोबर आहे हे ..”
“आता त्या सावकाराला मी देवाला उदबत्ती लावायला सांगीतले असते किंवा उपास –तपास करायला सांगीतले असते तर त्यालाही ते तोडगे किरकोळ वाटले असते.. म्हणून त्याला त्याच्या मगदूरा प्रमाणे काहीसा कॉम्प्लिकेटेट , खर्चिक तोडगा सांगीतला.. असा तोडगा सांगीतला जो त्याला पटेल, त्याचा त्यावर विश्वास बसेल…प्रधान क्षेत्रपाल जरी आर्थिक अडचणीत असला तरीही त्याची आर्थिक ,सामाजीक, राजकीय ताकद बुलंद आहे , त्याला साधा जप, साधा मंत्र असले तोडगे पटणार नाहीत, म्हणून त्याला त्याचा इतमामाला साजेसा, त्याच्या अहंकाराला साजेसा असा बडा तोडगा सांगीतला.. त्यामुळेच त्याचा त्या तोडग्या वर विश्वास बसेल..”
“बाबा, आम्ही याचा कधी विचारच केला नाही !”
“वत्सा , ज्योतिषशास्त्र हे असे जातकाचे मानसशास्त्र समजून घेऊन वापरायचे असते .. किंबहुना मी तर असे म्हणेन की मानसशास्त्राचा अभ्यास असल्या खेरीज ज्योतिष सांगायच्या भानगडीतच पडू नये .. आले लक्षात ?”
“हो बाबा,..पण एका शंका अजुनही आहे ”
“बोल..”
“शनी मार्गी होणे आणि नंतर तो राशी बदलणे या घटना वा त्याचा कालखंड तिन्ही जातकांच्या बाबतीत सारखाच आहे , म्हणजे त्यांना फळे ही एकाच वेळी मिळायला पाहीजेत , असे असताना शेतकर्याला चार महीने , सावकाराला सवा पाच महीने , प्रधान क्षेत्रपालाला सव्वा आठ महीने असा वेगवेगळा कालावधी का सांगीतला..”
“वत्सा , तुझे निरिक्षण चांगले आहे , इथे मी अर्थशास्त्राचा विचार केला.. शेतकर्याला लाभ झाला की तो कर्ज फेड करणार , त्यामुळे सावकाराची आर्थिक स्थिती सुधारणार आणि तो करांचा भरणा करणार, जनते कडून करांचा भरणा सुरु झाला की शासकिय तिजोरीत धन जमा होणार ,असे धन जमा झाल्या नंतरच कोठे क्षेत्रपालाला त्यावर डल्ला मारता येणार ना ? … अशी ही पैशाची गंगा खालून वर वाहणार आहे … लक्षात आले ?.”
“हो बाबा..”
“काय लक्षात आले ?”
“अर्थशास्त्राचा अभ्यास असल्या खेरीज ज्योतिष सांगायच्या भानगडीतच पडू नये..”
“हुषार आहेस, उगाच नाही मी तुला प्रधान शिष्याचा दर्जा दिला!”
“बाबा , ही सगळी आपली कृपा .. पण मला अजुन एक शंका आहे..आपण रागवणार नसाल तर..”
“वत्सा , अरे विद्यार्थ्याला शंका या आल्याच पाहिजेत , अभ्यास चालू असल्याचे ते एक प्रमुख लक्षण आहे,, तू विचार तुझी शंका..”
“बाबा, या तीनही जातकांच्या बाबतीत आगामी ग्रहमान अनुकूल होते त्यामुळे त्यांना सकारात्मक भविष्य सांगता आहे , पण समजा आगामी ग्रहमान प्रतिकूल असते तर ते नकारात्मक भविष्य या जातकांना कसे सांगीतले असते ?”
बाबांनी कौतुकाने आपल्या शिष्याकडे पाहीले… आपला हात त्या शिष्याच्या मस्तकावर ठेवत ते म्हणाले..
“वत्सा… तुझ्या सारखा जिज्ञासु शिष्य मिळाला याचा मला अभिमान वाटतो.. तू म्हणालास तसे काही वेळा होते ही.. जातकाच्या नशिबात अशुभच फळ असते आणि ते सांगतानाच ज्योतिषाची खरी कसोटी लागते.. इथे ही आपल्याला मानसशास्त्र उपयोगी पडते.. पण त्याबद्दल आपण नंतर सविस्तर चर्चा करुयात..”
बाबा हे बोलत होते इतक्यात बाबांच्या अपॉईंटमेट्स हाताळणारा शिष्य सचिव बाबांसमोर अदबीने येऊन उभा राहीला. बाबांनी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहीले..
“बाबा, आपल्याला डायरेक्टर बोर्डच्या मिटींग साठी निघायचे आहे, मिटींगचा अजेंडा आपल्या मॅक बुक वर अपलोड केला आहे..”
“आय सी , आज काही खास आहे का? ”
“नाही , रुटीन मॅटर आहे , मिटींगला लागू शकणारे काही रेफेरेंसेस पण अपलोड केले आहेत , ते आपण प्रवासात पाहू शकाल. ”
“आणखी काही ?”
“बाबा, पण एक ईश्यु येऊ शकेल ..हरिद्वारच्या टामदेव बाबांचा प्रतिनिधी आज मिटिंगला आहे अशी पक्की खबर आहे , तो काही वाद विवाद उकरुन काढायची शक्यता आहे .. त्याबद्द्ल मी पूर्ण रिसर्च केला आहे , मी प्रवासात त्याबद्दल आपल्याला ब्रिफ करतोच आहे. ”
“ठीक आहे..”
“पण बाबा, आपल्याला आता लगेचच निघायला हवे , बाहेर आपला रथ सज्ज आहे..”
“असे म्हणतोस , तर मग चल …”
बाबा आपले मॅक बुक बगलेत मारत , मंत्रणा कक्षाच्या दरवाज्याकडे जाऊ लागले..
प्रधान शिष्याने बाबांना मनोभावे नमस्कार केला.
समाप्त
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
श्री. सुहासजी ,
जातकाच्या आर्थिक परिस्थिती प्रमाणे तोडगा दिला की दोघे ही खूष – त्यावर जातकाकडून फुकट प्रसिद्धी – “जालीम उपाय सांगणारे जोतिषी ”
मालिका आवडली – छान लिहिली आहे.
धन्यवाद,
अनंत
श्री. अनंतजी,
अभिप्रया बद्दल धन्यवाद.
सुहास गोखले