“वत्सा, ज्योतिषातला गणिताचा म्हणून जो भाग असतो , तो आता सॉफ्टवेअर मुळे कमालीचा सोपा झाला आहे. एक पत्रिका करायला पूर्वी तास-दीड तास लागायचा तो आता केवळ सेकंदा इतका कमी झाला आहे. याचा पुढचा टप्पा म्हणजे पत्रिकेचा अभ्यास , इथे ग्रहांची स्थान गत , राशी / नक्षत्रगत स्थिती, त्यांचे आपसात होणारे योग इत्यादी नुसार काही प्राथमीक आडाखे बांधले जातात आणि नंतर दशा – विदशां , ग्रह गोचरीचा अभ्यास करुन अपेक्षित घटना घडेल का नाही हे ठरवले जाते आणि जर घटना घडण्याची शक्यता असेल असेल तर ती  केव्हा घडेल याचा अंदाज बांधता येतो.”

या लेखमालेतला पहीले भाग इथे वाचा…

उपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३

उपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २

उपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १

“हो बाबा , आम्ही आपण सांगीतल्या प्रमाणे, याच पद्धतीने अभ्यास करत आहोत..”

“वत्सा, ज्योतिष सांगताना पत्रिकेचा अभ्यास अगदी कसून करावा लागतो, अगदी एखाद्या लहानशा घटका कडे केलेले दुर्लक्ष आपले भाकित चुकवू शकते.”

“हो बाबा , माझी काही भाकिते याच मुळे चुकली आहेत..”

“ग्रह , भाव, राशी, ग्रहयोग हे सगळे  एक प्रकारचे संकेत असतात आंग्ल भाषेत याला  सिम्बॉल म्हणतात , या संकेताना अर्थातच अनेक अर्थ असू शकतात. त्यातला कोणता अर्थ विचारात घ्यायचा हे जातकाला जी व्यक्ती , स्थळ, काळ, परिस्थिती सापेक्ष अशी पार्श्वभूमी लाभलेली असते त्यानुसार ठरते ज्याला आंग्ल भाषेत ‘कॉन्टेक्स्ट ‘ म्हणतात. त्यामुळेच काही वेळा दोन जातकांचा प्रश्न जरी एक सारखाच दिसत असला तरी हा ‘कॉन्टेक्स्ट’ दोघांच्याही बाबतीत वेगवेगळा असू शकतो त्यामुळे त्या दोघांना दिलेल्या उत्तरांत ही फरक करावा लागतो. या कामी आपण तर्क शास्त्राचा फार मोठा उपयोग करुन घेत असतो. मी काय म्हणतो ते लक्षात येत आहे का ?”

“हो , पण बाबा ,  या सगळ्याचा त्या उपाय तोडग्यांशी कसा काय संबंध जोडता  येतो.  उपाय तोडगे घटना घडवून आणत नाहीत असे आपण नेहमी म्हणता पण तरीही या तीनही जातकांना उपाय – तोडगे सुचवले गेले , हे कसे काय?”

“वत्सा,  उपाय तोडगे आपल्या समस्या सोडवत नाहीतच , या तीनही जातकांना सांगण्यात आलेले तोडगे त्यांच्या समस्या सुटाव्यात म्हणून सांगीतले नाहीतच..”

“मग ?”

“ऐक वत्सा, असे बघ , आपल्या पुढ्यातल्या बराचश्या समस्यांना ‘काळ’ हेच उत्तर असते, आंग्ल भाषेत म्हणतात ना ‘ टाईम ईज दी बेस्ट मेडिसीन’ त्यातला प्रकार असतो हा. ठरावीक काळ लोटला की या ना त्या मार्गाने समस्या आपोआपच सुटत असतात, फक्त  त्या कालावधीत धीर न सोडता प्रयत्न मात्र चालू ठेवायचे असतात. “

“हो बाबा , तसा अनुभव येतो..”

“या जातकांसाठीच्या प्रश्नकुंडल्यांचा अभ्यास केला तेव्हा मला पक्की खात्री झाली होती की अवघ्या दोन महीन्यां नंतर ह्या तिघांच्याही समस्या दूर व्हायला सुरवात होणार आहे. आणि त्यानंतरच्या दोन तीन महीन्यात चांगली फळें पण मिळणार आहेत , हे असेच होणार याबद्दल मला कमालीचा आत्मविश्वास होता  पण म्हणून मी या जातकांना असे सरळ सांगीतले असते की तुमच्या समस्या येत्या तीन –सहा महिन्यात दूर होतील, तर काय झाले असते ?”

“बाबा, आपले वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य .. दी लास्ट वर्ड इन अ‍ॅस्ट्रोलॉजी.. . जातकांनी नक्कीच त्यावर विश्वास ठेवला असता..”

“बरोबर, जातकांनी नक्कीच माझ्या भाकितावर विश्वास ठेवला असता पण तरीही त्यांच्या मनात कुठेतरी एखादी शंका नक्कीच राहीली असती.  अशुभ भाकितांवर जातकाचा लगेच विश्वास बसतो पण शुभ भाकितें जातक मनात शंका ठेऊन स्विकारतो”

“ते कसे काय?”

“मानसशास्त्र ! आपल्या आयुष्यात चांगल्या घटनां पेक्षा वाईट घटनांचे प्रमाण जास्त आहे किंवा आयुष्यात शुभ घटना घडत नाहीतच किंवा घडल्या तरी त्या तुरळक असेच प्रत्येकाला वाटत असते…माझे नशीब बलवत्तर आहे असे म्हणणारे फारच कमी.. नशीब फुटके आहे म्हणत रडणारेच जास्त !”

“बाबा, खरे आहे हे.. मला सुद्धा काही वेळा असेच वाटते..”

“वत्सा,  मी तुम्हा सगळ्यांना  नेहमी बजावत असतो की पत्रिकेचा सांगोपांग अभ्यास करा , कोणतीही कसर सोडू नका.. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे  अभ्यासावरुन आलेले निष्कर्ष आत्मविश्वासाने जातकाला सांगा… “छापा मी जिंकलो, काटा  तू हरलास ‘ अशा पद्धतीची दोन्हीही डगरींवर हात ठेवणारी भाषा वापरायची नाही.. जे काही आहे ते साफ, नि:संदिग्ध आणि खणखणीत शब्दात सांगीतले पाहीजे ..”

“हो , बाबा, आम्ही आपला हा सल्ला पाळायचा अगदी कसोशीने प्रयत्न करतो आहोत..”

“गुड … पण आपण ज्या आत्मविश्वासाने ज्योतिष सांगतो तसाच आत्मविश्वास त्या भाकितां बद्दल  जातकाच्या मनात निर्माण करता आला पाहीजे , त्याच साठी ज्योतिषाला गणित , तर्कशास्त्र याच बरोबर मानसशास्त्राचेही उत्तम ज्ञान असावे लागते. जातकाला ज्योतिष नुसते सांगायचे नसते तर ते त्यांच्या मनात बिंबवायचे असते.  त्यासाठीच मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. ज्योतिषशात्राच्या अंगाने विचार केला तर हे उपाय – तोडगे निरर्थक / भाकड आहेतच पण मानसशास्त्राचा अंगाने विचार केला तर  मी सुचवलेले उपाय तोडगे हा एक प्रकाराचा मानसोपचारच आहे.”

“बाबा,मला समजले नाही “

“असे बघ वत्सा,  जेव्हा जातक आपल्या समोर येतो तेव्हा तो समस्यांनी ग्रासलेला असतो , बरोबर ?  पण तो जेव्हा आपल्या समोरुन जाईल तेव्हा त्या जातकाच्या मनातला प्रबळ भाव काय असायला हवा ? -‘ थोडा वेळ लागेल  पण माझ्या समस्या सुटणारच आहेत , सगळे चांगले होणार आहे !’ ”

“हो बाबा,  असेच पाहीजे  ते आंग्ल भाषेत म्हणतात ना ‘एंडींग ऑन अ पॉझीटीव्ह नोट’ ”

“बरोबर आणि त्यातच जर आपण ‘बस्स,  बाबांनी सांगीतलेला तोडगा केला की झालं’ अशी रायडर नोट टाकली की हे अधिक पॉझीटीव्ह फिलिंग होईल ना?”

“बाबा, आता माझ्या लक्षात यायला लागलेय ..”

“तोडगा केला की समस्या सुटतात असे काही नाही हे मलाही माहिती आहे आणि तुला ही माहीती आहे , पण जातकाला हे पटणार्‍यातले नसते किंवा पटले तरी वळणार्‍यातले नसते , बहुतेक जातकांना शॉर्टकट म्हणजे तोडगा  हवा असतो ना! “

“बरोबर आहे बाबा..”

 “त्यामुळेच मी या तीन ही जातकांना आवश्यकता नसताना देखील तोडगे सुचवले. पण तुला माहीती आहेच की प्रत्यक्षात यांच्या समस्या काही कालवधी नंतर आपोआपच सुटणारच आहेत , मात्र तोपर्यंत वाट पाहायची तयारी त्यांच्याकडे नाही ती तयारी, आपण त्यांना या तोडग्याच्या नादाला लावून त्यांच्या कडून करवून घेणार आहोत ,  तेही अगदी त्यांच्या नकळत ! “

“बाबा…”

“जातकाला अपेक्षित असलेला परिणाम दिसायला चार –सहा महीन्याचा कालावधी लागणारच आहे तो या तोडग्याच्या नादात सहज पणे निघून जाईल. हे जातक आता दिवस – महीने असे न मोजता, पाचवा गुरुवार , सातवा शुक्रवार अश्या तोडग्यांच्या गणतीत मग्न होतील!

तोडगा नाही केला तरी समस्येचे समाधान आपोआपच होणारच आहे , पण तोडग्याच्या माध्यमातून आपण त्यांना एक ‘आशा’ दिली आहे , एक नवी उभारी दिली आहे , कडू  औषध साखरेचा लेप देऊन दिले आहे .”

“बाबा आपण धन्य आहात !”

“आता झाले ना तुझे समाधान?”

“हो बाबा, पण तरीही एक शंका मनात आहे ..”

“बोल”

“समस्या एक, ग्रहमान एक, परिणाम पण एक सारखे मिळणार, असे असताना प्रत्येकाला वेगवेगळे तोडगे कसे काय सुचवले ?”

बाबा हसत हसत म्हणाले…

“तुला उगाच ‘स्मार्ट बॉय’ म्हणत नाही मी..”

“बाबा, माझे काही चुकले का? “

“नाही, वत्सा,  उलट तू अगदी योग्य शंका विचारली आहेस .  त्याचे असे आहे …”

 क्रमश:  … पुढच्या भागात संपूर्ण ..अगदी नक्की

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. Anant

  श्री. सुहासजी,

  ज्योतिषाला मानसशास्त्राचेही उत्तम ज्ञान असावे लागते – मस्त !

  आत्ता उत्सुकता वेगवेगळे तोडग्यामागचे रहस्य काय हे जाणून घेण्याची ?

  धन्यवाद,

  अनंत

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.