मागे एका एका वाचकाच्या उपाय – तोडगे या विषयावरच्या शंकांना सविसत्र उत्तर दिले होते , आज सकाळी एका जातकाशी बोलताना त्याची आठवण झाली , म्हणून ते उत्तर हुडकून आपल्या समोर सादर करत आहे.
श्री. XXXX,
अभिप्रया बद्दल धन्यवाद.
आपण लिहले आहे:
“१. ज्योतिषाचे मूळ हे कर्माधिष्टीत सिद्धांतावर अवलंबून आहे (cause and effect). जर एखाद्या कर्माचे फळ हे मिळण्याआधी एखाद्या दुसऱ्या कर्माने आधीचे कर्मफळ किंवा कर्मफळाची तीव्रता का कमी करता येऊ नये? तसेच जर ज्योतिष हे भविष्यातील घटनांची फक्त संभाव्यता दर्शवते तर ती संभाव्यता बदलता का येऊ नये?
२. जर क्रियमाण कर्माची तीव्रता कमी असेल तर काही गोष्टींद्वारे (जसे कि प्रयत्न किंवा तत्सम उपाय) कर्मफळात बदल घडवता येणे का शक्य असू नये?”
माझे उत्तर:
‘ज्योतिषाचे मूळ हे कर्माधिष्टीत सिद्धांतावर अवलंबून आहे..” हा मुद्दा बरोबरच आहे इथे ‘कर्म ‘ आणि ‘चांगले कर्म’ यातला फरक समजाऊन घेणे महत्वाचे आहे! कर्माचे समीकरण बरेच लोक समजतात (किंवा त्यांचा तसा समज करुन दिला जातो) तितके सरळ सोपे बेरीज वजाबाकी सारखे नाही. हा एक अत्यंत गुंतागुंतीचा विषय / प्रांत आहे.
आपण वर मुद्दा क्रमांक १ मध्ये ‘दुसर्या कर्माने ’ असा उल्लेख स्वत:च केला आहे. ‘दुसरे कर्म ‘ म्हणजे ‘खडा वापरणे’ , पोथी वाचणे ‘. ‘जप करणे’, ‘गणपतीला लाल फुल वाहणे ‘. ‘वाहत्या पाण्यात पिठाचे गोळे सोडणे’. ‘मुंग्यांना साखर घालणे’ ‘घुबडाचे पीस तिजोरीत ठेवणे’. ‘पिंपळाला प्रदक्षिणा घालणे’ ‘अक्षता भिरकावणे’, ‘शाबुदाण्याची खिचडी चापत उपास करणे’, यातले काहीही नाही हे लक्षात घ्या.
कारण वर लिहलेली (आणि अशी अनेक कर्मे जी उपाय तोडग्यात केली जातात) ही स्वकेंद्रीत , मोहमय , फक्त स्वत:चाच विचार करुन , फक्त स्वत:च्याच लाभाची अपेक्षा ठेवून केलेली कर्मे आहेत. त्यात स्वार्थ आहेत , ही असली कर्मे फलिताच्या दृष्टीने कुचकामी आहेत.
आता कोणतेही कर्म केले , कसलेही कर्म केले की त्याचे फळ निर्माण होतेच त्या प्रमाणे या असल्या कर्मांचीही फळे निर्माण होणारच, पण त्या फळांचा दर्जा अतिसामान्य असतो त्याच्या तुम्ही म्हणता तसा ‘आधीचे कर्मफळ किंवा कर्मफळाची तीव्रता कमी करणे’ या कामासाठी काडीचाही उपयोग होणार नाही, कदापीही नाही! मी दिवसभर मजुरी केली ह्या कर्माचे फळ म्हणून मला ३०० उपये मिळाले, आता या ३०० रुपयात मी डाल-चावल (किंवा एखादी ‘चपटी’ !) खरेदी करु शकेन पण ३० लाखाची मर्सीडीस कार विकत घेऊ शकणार नाही हे नक्की. ‘उपाय तोडग्या’ माध्यमातून केलेली कर्मे अशीच फुटकळ, चिल्लर, चण्या फुटाण्या सारखी फळें निर्माण करतील, तुमची पापे धुवुन काढायची, भविष्य बद्लायची कोणतीही ताकद त्यात नाही.
आयुष्यात कोणतेही चांगले काम केले नाही, सतत खोटे बोलत राहीला आज अचानक एका ज्योतिषाने सांगीतलेला तोडगा केला झाला देव प्रसन्न असे कसे होईल? असल्या फालतुगिरीला गंडायला देव काही अलिबाग हून आलेला नाही ! ए.टी. एम. मधुन पैसे मिळायला आधी खात्यात पैसे असावे लागतात, भाऊ !
हे उपाय तोडगे इतके फालतू असतात की या असल्या टीचभर लाचे ने देवच काय देवा घरचे कुत्रे देखिल तुमच्या वर भाळणार नाही (पु .ल. देशपांडें च्या रावसाहेबांचे वाक्य जरासे बदलून!) .
जर ‘आधीचे कर्मफळ किंवा कर्मफळाची तीव्रता का कमी करणे’ हा हेतु असेल तर करावी लागणारी कर्मे वेगळी आहेत. अर्थात ही कर्मे तुमचे मुळ फळ कधीही नष्ट करु शकणार नाहीत ही बाब वेगळी . ह्या चांगल्या कर्मांची ठळक गुण विषेष म्हणजे:
१>कोणत्याही फळाची अपेक्षा न धरणे , म्हणजेच ‘मी हे अमुक करतो आहे त्याचा मला तमुक लाभ व्हावा / काम व्हावे / संकट टळावे’ अशी अपेक्षा न धरता , कोणताही संकल्प न सोडता केलेले कर्म. (संकल्प सोडणे म्हणजे परमेश्वराशी ‘डील ‘ करणे आहे किंवा चक्क परमेश्वराला ‘लाच’ दिल्या सारखे आहे !
केवळ ‘गणपती पुढे २१ दिवस दालचिनी चा तुकडा ठेवला की गणपती प्रसन्न ! अरे काय हे ? गणपती काय इतका ‘चीप – स्वस्त’ आहे की त्याने दालचिनीच्या २१ तुकड्यांचा बदल्यात ‘तहसील दार कचेरी / आरटीओ’ मधली ‘खाबुगिरीची – मलईदार’ नोकरी तुमच्या झोळीत टाकायची ? अरे काही लाखांत रेट चाललाय सध्या, लोक स्वत:चा दोन एकर जमीनीचा तुकडा विकतात ही असली नोकरी मिळवण्यासाठी! म्हणुनच मी म्हणतो, परमेश्वराला जरुर वंदन करा पण ते करताना ‘ मला सुखी ठेव; असे देखील म्हणू नका ! मुळात तुमची निर्मीतीच जर परमेश्वराने केली असेल तर तुमचे काय करायचे हे त्यालाच ठरवू दे ना! आपले काम कसे करायचे हे परमेश्वराला चांगले ठाऊक आहे , म्हणूनच तो परमेश्वर आहे , खरे ना?
२> ज्या कर्मात फक्त स्वत:चाच विचार न करता दुसर्याचा विचार जास्त किंबहुना स्वत:ला विसरुन फक्त दुसर्याच्याच विचार केलेले कर्म. या मध्ये रुग्ण सेवा करणे, अनाथ मुले / अपंग / वद्ध व्यक्ती यांना मदत करणे. प्राणी मात्रांवर दया करणे / मदत करणे.
३> आत्मिक शक्ती वाढवणारी कर्मे ज्यात : खरे बोलणे, दुसर्या बद्दल वाईट न बोलणे / न चिंतणे, सतत सकारात्मक विचार करणे, सात्विक भाषा , सात्विक आहार
४> कुरकर न करता , नशिबाला दोष न देता , दुसर्याला दोष न देता, आपली ध्येय धोरण आखून त्या दिशेने सतत प्रयत्न करत राहणे
आता जे ‘उपाय –तोडगे ’ म्हणून जे सुचवले जाते ते कोणतेही कृत्य , कर्म असले तरी तरी ते वरील चार (आणखीही काही ) निकष पूर्ण करत नाहीत हे इथे लक्षात घ्या, त्यामुळे या असल्या उपाय तोडग्यांनी काहीही साध्य होणार नाही, अशक्य ते शक्य होणार नाही, जे आडात नाही ते पोहोर्यात येणार नाही.
मी लिहले आहे त्याप्रकारची चांगली कर्मे केली तरीही मुळ ‘प्राकत्न किंवा ढाँचा’ बदलता येणे शक्य नसते , वन रुम किचन फ्लॅट चा आलिशान बंगला तर सोडाच साधा टू बिएच के फ्लॅट सुद्धा करता येणार नाही!
मी वर लिहली आहेत त्या प्रकाराची चांगली कृत्ये काही प्रमाणात ( फक्त काही प्रमाणातच!) मदत करु शकतात , ही मदत:
१)फळांची तिव्रता कमी करणे
२)फळे मिळायाचा / भोगायचा कालवधी आपल्याला अनुकूल असा मागे –पुढे करुन घेणे
३)अगदी अपवादात्मक स्थितीत या जन्मात मिळणारी फळे पुढच्या जन्मात ढकलणे
अशी असू शकते , पण त्यासाठी मी सांगीतल्या प्रमाणे फक्त चांगली कर्मेच फळाची अपेक्षा न धरताच केली पाहीजेत.
इथे परत हे लक्षात घ्या , ही ‘चांगली कृत्ये’ देखिल आडात नसलेले पोहोर्यात आणून देत नाहीत ! ‘तहशीलदार कचेरीतली ‘ नोकरी नशिबातच नसेल तर ही चांगली कृत्ये करुन सुद्धा ती नोकरी मिळणार नाही!!
भगवान श्रीकृष्णांनी ‘कर्मेणेंवाधि कारस्ते..” असे जे गीतेत सांगीतले आहे त्याचे मर्म हेच तर आहे. आपले कर्म करत राहा , काय फळ द्यायचे, कसे द्यायचे , केव्हा द्यायचे ते मी (परमेश्वर) ठरवेन , शनीला तेल वाहणे ‘ ,’ नक्षत्र शांती करणे’, ‘ पोथी वाचणे’ ह्या असल्या कर्मांनी देव प्रसन्न होणार नाही. ही कर्मे वाईट नसली तरी फुसकी आहेत , भाकड आहेत , दुध न देणारे रेडे आहेत! त्यांनी काहीही साध्य होणार नाही हे पण लक्षात घ्या.
आपण लिहले आहे:
“आपल्याकडे रत्नांचा उपयोग ज्योतिषामद्ये पुरातन काळापासून केला गेलेला आहे. रत्नांच्या वापरातून कर्मफळाची तीव्रता कमी करता येऊ शकते हे देखील सांगितले आहे. मग तो तोडगाच नाही का? हे खरे कि सध्याच्या काळात त्याचा प्रचंड गैरवापर होत आहे तेही ज्योतिषांकडूनच…परंतु त्यामुळे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केल्यास रत्नाचा तोडगा म्हणून वापर का करता येऊ नये?”
माझे उत्तर:
हा आपला गैरसमज आहे , रत्नांचा उल्लेख आहे पण प्राचिन काळापासुनचा नाही. दुसरे म्हणजे पोथीत लिहलेले सगळेच बरोबर / खरे हा पण गैरसमजच आहे. मुळ जुन्या पोथ्या शुद्ध स्वरुपात उपलब्ध नाहीत, जे काही आहे ते अत्यंत भ्रष्ट (करप्ट) आहे , कोणीही उठावे काहीही भाकड रचावे आणि पोथी पुराणात घुसडून द्यावे (नारदमुनी म्हणाले अशी सुरवात केली की झाले! नाहीतर सगळ्याची सोय करायला कैलासा वर सारीपाट खेळणारे शंकर – पार्वती आहेतच !). जर पोथीत लिहल्या प्रमाणेच जायचे तर मुलींची लग्ने वयाच्या सात-आठ वर्षाच्या आत (रजोदर्शन सुरु व्हायच्या आत) व्हायला पाहीजेत ना? केवळ मतलबा साठी जुन्या पोथ्यांतल्या एखाद्या त्रोटक उल्लेखाचा कशाशीही बादरायण संबंध जोडणे चुकीचे आहे.
संकटांनी / निराशेने ग्रासलेल्या व्यक्तीला थोडी मानसिक उभारी मिळावी म्हणून काही उपाय तोडगे सुचवावेत अशी कल्पना लोकांच्या मनात येऊ लागली, साध्या साध्या उपायांवर लोकांचा विश्वास बसणार नाही म्हणून काहीतरी दुर्मिळ , इंग्रजीत ज्याला ‘एक्सोटीक’ म्हणतात असे इलेमेंट त्यात असावे म्हणुन रत्ने सुचवायला सुरवात केली असावी (काही जणांनी ह्या ऐवजी स्मशान, प्रेत, रक्त, हाडे, बाहुल्या, कवड्या, टाचण्या खुपसलेली , पिंजर मारलेली लिंबे, माकडाची वार, बाळंतिणीचा केस पासुन ते पशुबळीं, नरबळी असाही मार्ग निवडला..जोडीला शाबरी मंत्र आणि चामुंडा माता आहेच !). महागडे खडे परवडत नाहीत म्हणून मग ‘उपरत्ने’ सुचवायला सुरवात झाली , ‘उपरत्ने’ पण महाग म्हणून आता चक्क मशीन वर पॉलीश केलेले गारेचे तुकडे ! (उत्पादन खर्च २५ रुपयांहून ही कमी मात्र विक्री किंमत रुपये २००० पासुन ते कितीही – डिपेंडस ऑन द कॅच ऑफ द डे !, दोन -पाच रुपयांची सुद्धा नसलेली प्लॅस्टीकची पिरॅमीड नामक टोपली चक्क ५०० रुपये ! )
इथे हे लक्षात घ्या , रत्नांचा आपल्या प्रभाव पडतो हा गैरसमज आहे. रत्नांतून कोणतेही शुभ किरण निघत नाहीत’, रत्न हा एखाद्या दिव्या सारखा प्रकाशाचा सोर्स नाही त्यातले किरण आपले भाग्य पालटवू शकेल, रत्नात कोणतेही औषधी गुणधर्म नाहीत जे तुमचा रोग (मानसीक ?) बरा करु शकेल. रत्न/ खडा त्याच्या वर पडणारा सुर्य प्रकाश काही प्रमाणात ‘रिफ्रॅक्ट ‘ करुन बाहेर सोडते (याला भौतिक शास्त्रात ‘रिफ्रॅक्शन ऑफ लाईट’ म्हणतात) , पण या रिफ्रॅक्टेड लाईट चा प्रभाव आपल्यावर पडणार नाही. मुळात असे प्रकाशाचे ‘रिफ्रॅक्शन’ प्रभावी असायाला (लेझर सारखा इफेक्ट मिळायला !) मुळात तो खडा तांत्रिक (ऑप्टीकल जिओमेट्री) दृष्ट्या निर्दोष असावा लागेल, त्याचा आकार किमान एका कोंबडीच्या अंड्या एव्हढा (गेला बाजार , एखाद्या आवळ्या इतका तरी) असायला हवा, असे रत्न / खडा मिळणे कमालीचे दुर्मिळ असते आणि त्याची किंमत लाखो / करोडों मध्ये जाईल. हजार – बाराशेचा खडा (हॅ हॅ हॅ … ४००० रुपयाचा पुष्कराज!) हे असले काहीही साध्य करुन देणार नाही! मुळात इथे पहीले प्रिंसीपल कायमच लक्षात ठेवायचे ‘आडात असेल तरच पोहोर्यात येणार’ त्यामुळे प्राकत्नातच नसेल तर एक खडाच काय खड्याची माळ घालून बसले तरी काहीही होणार नाही (पैसे मात्र बरबाद होतील हा भाग वेगळा)
आपण लिहले आहे:
“तोडगे हे फक्त मानसिक समाधान देतात तर ज्या गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात (कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागणे, किंवा ज्या गोष्टींचे परिणाम आपल्या हातात नाहीत जसे कि जवळच्या व्यक्तीचे अपघातातून वाचणे etc) त्या गोष्टी घडून आल्यास त्या तोडग्याद्वारा नसाव्यात हे कशावरून?”
माझे उत्तर:
इथे मी उलट प्रश्न विचारतो ‘तोडगा केला म्हणून केस जिंकली ‘ हे सिद्ध करुन दाखवता येईल का? जो पर्यंत हे तुम्ही निर्विवाद पणे सिद्ध करुन दाखवत नाही तो पर्यंत यावर कोणताच प्रतिवाद करता येणार नाही , उपाय तोडगे करुनही केस हरल्याची अनेक उदाहरणे मी देऊ शकतो त्याचे काय? मी उपाय तोडगे केल्याने दुसर्याला लाभ होतो ही तर कमालीची हास्यास्पद वेडगळ कल्पना आहे , मी औषध घेऊन दुसर्याचा आजार कसा बरा होईल? मी जमा केलेले पुण्य दुसर्याच्या खात्यावर जमा करायचे असे कोणतेही नेट बँकिंग आस्तीत्वात नाही. दुसर्याच्या वतीने जप करा (संकल्प सोडून बरे का!) इ. सुचना म्हणजे हातचे गिर्हाईक निसटून जाऊ नये म्हणून शोधलेली केविलवाणी पळवाट आहे. ‘ती व्यक्ती समोर नसली तरी हरकत नाही आपण तिच्या फोटो वरुन नारळ उतरवून टाकू’ … अरे हाय काय आन नाय काय ! हा शोध कोणी लावला असेल ? ज्या जुन्या पोथ्यांचे दाखले देतात त्या पोथ्या जेव्हा रचल्या / लिहल्या गेल्या त्यावेळी फोटोग्राफी आस्तीत्वतच नव्हती!
मग याला लाभ झाला, त्याला पडताळा आला त्याचे काय ? असा युक्तिवाद केला जातो त्याला एकच उत्तर आहे ‘बोला फुलाला गाठ पडली’!
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020