अपुरा अभ्यास / अनुभव / तारतम्याचा अभाव. .. (पुढे चालू)

हुतांश ज्योतिषी एकच एक ज्योतिष पद्धतीचा वापर करतात किंबहुना ते जी पद्धती वापरतात तीच अचूक , सर्वात्तम आहे , त्याच्या पलीकडे दुसरे काहीही नाही असे समजतात. बर्‍याच वेळा यात ते वापरत असलेल्या पद्धतीचा अभिमान असण्यापेक्षा दुसरी पद्धत शिकण्याचा कंटाळा आणि दुसरी पद्धत पण चांगली आहे हे मान्य करण्याचा दिलदारपणा नाही हेच कारण असते.

प्रत्यक्षात अशी एकही पद्धती नाही की सगळ्या प्रश्नांची उत्तरें देऊ शकेल. प्रश्नाचा सर्वांगानी विचार करायचा असेल किंवा त्यातले बारकावे टिपायचे असतील तर एका पेक्षा जास्त पद्धतींचा एकाच वेळी वापर करावा लागतो. ही क्षमता प्रत्येक ज्योतिषाने विकसीत केलीच पाहीजे. पारंपारीक ज्योतिष पद्धती,  कृष्णमुर्ती पद्धती, पारंपरीक मधल्या वर्ग कुंडल्या, अष्टकवर्ग , प्रश्नशास्त्र, पाश्चात्य ज्योतिष पद्धती (नाताल आणि होरारी), जर्मन ज्योतिषांनी संशोधन केलेली युरेनियन अ‍ॅस्ट्रॉलॉजी , कास्मोबायोलॉजी अशा अनेक पद्धती आहेत ज्याचा वेळोवेळी वापर करावा लागतो.

उदाहरणेंच द्यायची तर, पाश्चात्य ज्योतिर्विद वापरत असलेला कन्सलटेशन चार्ट कमालीचा उपयोगी ठरतो , मी माझ्या ब्लॉग वरच्या अनेक केस स्ट्डीज मधुन ते सोदाहरण दाखवले आहे. केवळ ‘पाश्चात्यां कडुन आलेले ते हिणकस आणि आपले पारंपरीक तेच फक्त  चांगले’ असा दुराग्रह न बाळगता , त्या लोकांनी केलेल्या संशोधनाचा आदर करुन ते स्विकारले पाहीजे, तरच आपली प्रगती होणार आहे.

पारंपरीक आणि कृष्णमुर्ती वाले , युरेनस (हर्षल), नेपचुन या दोन ग्रहांना अक्षरश: फाट्यावर मारतात ही फार मोठी चूक करत आहेत असे मी अनेक वेळा लिहले आहे. या दोन ग्रहांची ताकद विस्मयकारक आहे,  अनपेक्षित घटनां, वादळी घटनां, तर्‍हेवाईक पणा/ मानसीक विकृती, विवाह सौख्य, प्रतिभा . इंटीश्युन, नवनिर्मीती, संशोधन, घोट्टाळे , फसवणूक, भूल, मानसीक आजार अशा अनेक बाबतीत हे ग्रह आपला प्रभाव दाखवतात, किंबहुना या दोन ग्रहांचा विचार न करताच या प्रकारातले भविष्य कथन करणे अनेक दृष्ट्या अपुरे ठरेल.

असेच दशा पद्धती बद्दल बोलता येईल, महाराष्ट्रात आणि संपूर्ण दक्षिणेत ‘विशोत्तरी दशा एके विशोत्तरी दशा’ असा पाढा घोकला जातो, पण केवळ हीच एक दशा कालनिर्णयासाठी उपलब्ध आहे असे नाही, इतरही अनेक दशा तितक्याच प्रभावी आहेत. पत्रिका कशी आहे हे पाहून कोणती दशा वापरायची हे ठरवता आले पाहीजे. केवळ एकच एक दशा पद्धती धरुन बसून नये. विशोत्तरीचा इतका आग्रह असेल तर किमान ह्या दशेची सुधारीत (आणि सुक्ष्म) आवृत्ती असलेली ‘त्रिभागी दशा’ का वापरु नये? जन्मवेळ बर्‍यापैकी अचूक असेल तर ‘कालचक्र’ या तलवारीच्या पात्यासारख्या धारदार (रेजर शार्प)  अचूक अशा दशेचा विचार करता येईल. रुलिंग प्लॅनेट्स ने अगदी सेकंदाच्या ९९९ भागा इतकी अचूक जन्मवेळ मिळवता येते असा दावा करणारे के.पी. वाले मग ही ‘कालचक्र’ दशा का वापरत नाहीत?  विशोत्तरी दशा वापरत असतानाच पूरक म्हणून  ‘योगीनी’ दशा पद्धतीचा वापर केला तर उत्तरात अचूकता येण्यास निश्चितच मदत होईल.

मुळात या दशा पद्धती म्हणजे एक प्रकारचे ‘प्रोग्रेशन’ आहे हे फार थोड्या ज्योतिषांना माहीती असते मग पाश्चात्यांनी प्रोग्रेशन्स चे अनेक प्रकार संशोधनातून सिद्ध केले आहेत त्यांची माहीती घेऊन वापर करुन पाहणे ही फार लांबची गोष्ट. मागच्या पिढीतल्या काही ज्योतिषांनी दशा पद्धती पेक्षा  सेकंडरी प्रोग्रेशन्स (दिनवर्ष) , ‘परिभ्रमण पद्धती’, ‘अंगीरस पद्धती ‘ अशा अनेक वाटां धुंडाळल्या होत्या. ‘टर्शरी प्रोग्रेशन्स’ चा अत्यंत प्रभावी वापर करत ‘भविष्य चुकले तर दामदुपटीने पैसे परत’ अशी लेखी हमी देणारा ज्योतिषी परदेशातच तयार होऊ शकतो आणि भारतातले ज्योतिषी ‘उपाय –तोडगे’ सांगण्यात धन्यता मानतात  ह्या हून मोठे दुर्दैव दुसरे कोणते नसेल.

भारतात ‘काल निर्णय ‘ म्हणजेच ‘इव्हेंट प्रिडीक्शन’ ला अतिरेकी महत्व दिले जाते , एखादी घटना केव्हा घडेल हे अचूक पणे सांगणे म्हणजेच ज्योतिष असा अतिशय चुकीचा समज भारतातल्या ज्योतिष्यांत आणि त्यांच्याकडे येणार्‍या जातकांच्या मनात घट्ट रुतुन बसला आहे. कृष्णमुर्ती सारख्या ज्ञानी , प्रतिभावंत , संशोधक ज्योतिषाने तर  ‘ज्योतिष म्हणजेच ‘इव्हेंट प्रिडीक्शन’ असा पराकोटीचा दुराग्रह धरत भारतीय ज्योतिषशास्त्राला किमान हजार वर्षे तरी मागे लोटून फार मोठे नुकसान करुन ठेवले आहे. ‘इव्हेंट प्रिडीक्शन’ च्या अट्टाहासात कृष्णमुर्ती वाहावत गेले आणि पारंपरीक मधल्या अनेक बहुमोल घटकांना (ग्रहयोग, कारकत्वे, वर्गकुंडल्या, संपूर्ण गोचरी, भावेश) त्यांनी शब्दश: लाथाडले, ही फार मोठी चूक करुन ठेवली. कृष्णमुर्ती पद्धतीचा प्रसार ज्या वेगाने होतो आहे ते पाहता आगामी काळात ग्रहयोग , कारकत्व नावाचे काही असते त्याचा ज्योतिषशास्त्रात कमालीचा उपयोग होतो हे पुढच्या पिढीतल्या ज्योतिषांना माहीतीच होणार नाही. गल्लोगल्ली बोकाळलेले ‘सब लॉर्ड एके सबलॉर्ड’ घोकणारे, ‘अर्ध्या नव्हे पाव हळकुंडाने’ पिवळे झालेले के.पी. वाले ‘नक्षत्र शिरोमणी’ बघितले की काळजात धस्स होते!

‘काल निर्णय’ हा ज्योतिषशास्त्राचा एक भाग असला तरी ‘काल निर्णय’ म्हणजेच सबकुछ असे अजिबात नाही. कालनिर्णय ही जेवणानंतर घेतलेली स्विट डिश आहे , आईस्क्रीम / केक वरची चेरी आहे , त्याला मुख्य जेवणाचा दर्जा कसा देता येईल. ‘लग्न कधी होईल’ हा कालनिर्णय झाला पण त्यापेक्षा महत्वाचे असते ते ‘हा विवाह सुखाचा होईल का?’ आणि त्याहुनही महत्वाचे असते ते म्हणजे ‘ हा विवाह सुखाचा होण्या साठी मी नेमक्या कोणत्या बाबतीत अ‍ॅडजस्टमेंट/ तडजोड करायची तयारी ठेवली पाहीजे’. ‘नोकरी कधी लागेल’ या कालनिर्णया पेक्षा ‘कोणत्या क्षेत्रात नोकरी – व्यवसाय केला तर जास्त अनुकूल / लाभदायक ठरेल’ हे कळणे जास्त महत्वाचे असते.

‘नळाला पाणी कधी येईल’, ‘खंडीत झालेला विद्युत पुरवठा केव्हा सुरळीत होईल ‘, ‘कामासाठी पाठवलेली व्यक्ती कधी परत येईल’  या सारख्या प्रश्नांची उत्तरे के.पी. वाले छान देतात पण मला सांगा हे प्रश्न खरोखरीचे इतके गंंभीर आहेत का की ज्यांची  उत्तरें मिळालीच पाहीजेत ? यांची अचूक उत्तरें मिळाल्याने किंवा न मिळाल्याने आपल्या जीवनावर किती दूरगामी परिणाम होणार आहेत? या घटना आपल्या उभ्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतील अशा आहेत का? हे काही जीवनमरणाचे प्रश्न आहेत ? नक्कीच नाही. मग अशा प्रश्नांची उत्तरे अचूक देण्यात कोणती मर्दुमकी मानायची. मजा म्हणजे या असल्या प्रश्नांची उत्तरे अचुक देणारे  के.पी.  वाले इतर महत्वाच्या प्रश्नां बाबतची उत्तरे देताना मात्र  हमखास  तोंडावर पडतात!  याचे कारण म्हणजे एकांगी विचारसरणी, ज्योतिषातल्या मूलभूत घटकांना दिलेली तीलांजली,  जन्मवेळ अचूक माहीती नसताना लढवलेले ‘सब लॉर्ड’ चे खुळचट तर्कट. रुलिंग प्लॅनेट वरचा आंधळा / अनाठायी विश्वास. ग्रह त्याच्या नक्षत्रस्वामी जिथे असेल त्या स्थानाची फळे देतो  हे इतके पुरेसे आहे का? तो ग्रह कार्येश असला तरी फळे द्यायला कितपत सक्षम आहे याचा विचार नको करायला?  ग्रह कसा आहे, कोणाच्या सांन्निध्यात आहे, कोणाशी कसे ग्रहयोग करत आहे, स्वक्षेत्री आहे का शत्रु राशीत, त्या ग्रहाचा डिस्पोझीटर कोण आहे -कसा आहे, ग्रह भावाच्या सुरवातीला आहे का मध्यावर आहेत , अग्नि तत्वाच्या राशीत आहे का जलतत्वाच्या , हे सारे कोण बघणार ? गोचरी म्हणजे फक्त कार्येश ग्रहांच्या राशी नक्षत्रांतून चंद्राचे / रवीचे भ्रमण हा किती तोकडा विचार आहे. पण लक्षात कोण घेतो.

मुळात एखादी घटना घडेल का हे ठरवता येते का हाच मूलभूत प्रश्न आहे मग ती घटना कधी घडणार हे ठरवणे फार लांबची गोष्ट !   हे मी म्हणतो कारण ज्योतिषशास्त्र फक्त शक्याशक्यता सांगू शकते , म्हणजे आपल्या पुढे कोणते पर्याय आहेत याची जाणीव करु देऊ शकते. प्रत्यक्षात या चार-पाच पर्यांयां पैकी त्यापैकी  नेमके काय घडेल हे सांगणे अवघडच नाही तर अशक्य आहे ! हे विधान मी अत्यंत जबाबदारीने करत आहे , कारण नेमके काय घडणार हे पत्रिकेतून बापजन्मात समजणार नाही!  पत्रिकेत व त्यातल्या ग्रहतार्‍यांत ती ताकद नाही!  जे घडते ते त्या व्यक्तीच्या शारीरीक, मानसिक जडणघडण, संस्कार, स्थळ , काळ, परिस्थिती, पूर्वसंचित , सत्कृत्ये अशा अनेक घटकांचा एकत्रित परिणाम असतो. ‘इव्हेंट प्रेडीक्शन ‘ च्या अतिरेकी उन्मादात , ज्योतिषाशास्त्रातल्या या पायाभूत अशा कमालीच्या महत्वाच्या घटका कडे साफ दुर्लक्ष होत आहे.

पाश्चात्य ज्योतिर्विदांनी या ‘इव्हें प्रीडीक्शन’ ला केव्हाच हद्दपार केले आहे इतकेच नव्हे तर ‘इव्हेंट प्रिडीक्शन ‘/ ‘फॉरच्युन टेलींग’ हा तिकडे चक्क गुन्हा मानला जातो , तर आपल्याकडे ‘इव्हेंट प्रेडीक्शन’ अचूक पणे करता येणे हा बहुमान मानला जातो किंवा ज्योतिषी किती चांगला याची कसोटी मानले जाते, हे मोठे दुर्दैव आहे!

पाश्चात्यांनी ज्योतिषातल्या दुर्लक्षीत अशा ‘मानसशास्त्रा’ चा फार सुक्ष्म असा विचार केला आहे, रुज्यार  , लिझ ग्रीन सारख्यांनी केलेल्या संशोधनाचा फार मोठा उपयोग आपल्याला करुन घेता येईल. फक्त आपली मनोवृत्ती बदलायला हवी.

आपल्या पारंपरीक ज्योतिषशास्त्रात पूर्वसंचित कर्माचा प्रभाव, जन्म-मृत्यू-पुनर्जन्म या संकल्पनेचा तसेच धर्म , अर्थ, काम आणि मोक्ष यांचा फार सखोल विचार झाला आहे. मग याचा वापर का केला जात नाही?

कृष्णमुर्तींनी पाश्चात्यांची प्लॅसिडस ही भावसाधन पद्धती स्विकारली ती केवळ सोय म्हणून, प्लॅसिडस हून सरस  अशा अनेक भावसाधन पद्धती तेव्हाही उपलब्ध होत्या पण त्यांची तयार टेबल्स उपलब्ध नव्हती म्हणून त्यांचा वापर सहजपणे करता येत नव्हता.  पण आज संगणकाच्या जमान्यात ही अडचण राहीली नाही मग आपण आजही त्या सदोष प्लॅसीडस भावसाधनाला चिकटून राहायचे का? तसे पाहीले तर प्लॅसिडस किंवा तत्सम भावारंभ ही संकल्पना असलेल्या भावसाधना पेक्षा भावमध्य ही संकल्पना असलेल्या भावसाधन पद्धती जास्त सरस आहेत. या बाबतीत पाश्चात्यांची उसनवारी कशाला , आपल्या श्रीपती नामक महान ज्योतिषाने हजार वर्षापूर्वीच अशी एक भावसाधन पद्धती विकसीत केली आहे. पाश्चात्यांनी विकसीत केलेली ‘कोश ‘ ही भावसाधन पद्धती अनेक बाबतीत सरस आहे. पण वाळूत तोंड खुपसुन बसलेल्या शहामृगांना हे कसे समजवायचे?

हे सारे सांगायचे कारण , केवळ एकच एक पद्धत आपल्याला उत्तराकडे घेऊन जाणार नाही, जसे काम तसे हत्यार वापरले पाहीजे.   कोणत्या ‘नट’ ला किती नंबरचा पाना लागतो हे मेकॅनिकाला कळावे लागते तसेच आहे हे!

‘चैतन्य ने केलेले विवाहा संदर्भात केलेले भाकित चुकले ते केवळ ‘शुक्र – युरेंस (हर्षल) ‘ यांच्यातला अंशात्मक केंद्र योग (त्यात युरेनस वक्री) , बघितलाच नाही ! दुसर्‍या एका विवाहाच्या प्रश्ना संदर्भात  केवळ मंगळ सप्तमाचा बलवान कार्येश इतकाच विचार केला गेला पण हा मंगल कर्केचा होता आणि नेपच्युनच्या योगात होता या महत्वाच्या बाबीं कडे साफ दुर्लक्ष केले आणि  भाकित चुकले! “

असो , लेखाच्या पुढच्या भागात आपण आणखी काही मुद्द्यांचा उहापोह करु..

 

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

14 प्रतिक्रिया

///////////////
 1. अण्णासाहेब गलांङे

  आपल्या ण्यानसाधनेस सलाम!
  नुसते संर्दभ वाचून भंजाळलो।
  धन्यवाद

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री. अण्णासाहेब,
   थोडेफार वाचलय , अनुभवले आहे ते आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला लेख बरा वाटला हे वाचून समाधान वाटले.

   सुहास गोखले

   0
 2. प्राणेश

  उत्तम लेखमाला. काहीतरी शिकायला मिळालं.

  0
 3. Sudhanva Gharpure

  Suhasji,

  Very good analysis. Basically, it seems that very few knows details of all these methods and their usability. It takes lot of in depth study to understand and know cause & effects.

  We all jataks are fortunate that we are in contact with a person named as Suhasji Gokhale. Halvayashi aasaleli maitarki far god lagte !!!

  Warm regards,

  Sudhanva

  0
  1. सुहास गोखले

   श्री. सुधन्वाजी,

   एक पत्रिका पूर्ण अभ्यास करुन प्रश्नाचे उत्तर द्यायचे म्हणले तर काही तासांची मेहेनत असते , पण हे कष्ट दिसत नाहीत , त्याचे उचित मानधन मिळत नाही मग कशाला एव्हढे कष्ट करा ‘दहा रुपयात वडा पाअव्च येणार , गुजराथी थाळी कशी मिळेल?” दुसरे लोकांना आजकाल भविष्य नकोच असते , ते तुमचे राहु , मंगळ ,शनी ठेवा बाजूला , आम्हाला फक्त उपाय तोडगे सांगा ‘ अशी मागणि जेव्हा होते तेव्हा कोण पत्रिका खोलात जाऊन तपासत बसेल?

   सुहास गोखले

   0
 4. संतोष

  सुहासजी,

  ‘कालचक्र’ दशा विशोत्तरी दशे मध्ये काय फरक आहे ते सांगू शकाल काय?

  संतोष सुसवीरकर

  0
   1. संतोष

    सुहासजी,

    ‘कालचक्र’ दशा ह्यावर एक लेख लिहिला तर अभ्यासुना नक्की फायदा होईल.

    संतोष सुसवीरकर

    0
    1. सुहास गोखले

     श्री संतोषजी ,

     धन्यवाद.

     वेळ मिळाला तर नक्की या विषयावर काही लिहायचा प्रयत्न करेन.

     सुहास गोखले

     0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.