सध्या मी अगदी मोजक्या , म्हणजे दोनच विद्यार्थांना (फोन / ईमेल द्वारा) ज्योतिषशास्त्र शिकवत आहे.

चैतन्य हा त्यातलाच एक अभ्यासू, मेहनती. तसा चैतन्यचा अभ्यास बर्‍या पैकी आहे, माझ्या कडे येण्याच्या आधी तीन एक वर्षे आणि माझ्या कडे आल्या पासुनची दिड वर्षे , असा नाही म्हणले तरी साडे चार वर्षाचा अभ्यास. प्रगती समाधानकारक असल्याने सहा महिन्यापूर्वी मीच त्याला प्रत्यक्ष क्लायंट हाताळायला सुरवात करण्या बद्दल सुचवले होते, कारण कितीही बुके वाचली तरी प्रत्यक्षात पाण्यात पडल्या शिवाय पोहायला येत नाही !

गेल्याच आठवड्यात चैतन्यचा फोन आला, एकदम निराश झाला होता, आणि कारण काय तर त्याने केलेली काही भाकिते साफ चुकली होती. मी त्याला त्या संदर्भात सगळी माहीती देण्याबद्दल सुचवले. त्यानंतर आम्ही दोघांनी एकत्र त्याचा पोष्ट मॉर्टेम अभ्यास केला , चैतन्य ला त्याचा चुकां लक्षात आल्या.

त्या वेळेच्या आमच्यात झालेल्या चर्चेचा इतरांना पण काही लाभ होईल असे वाटले म्हणुन त्याचा सारांश आपल्या समोर सादर करत आहे!

चैतन्य , तू काय आणि मी काय आपण मर्त्य मानव आहोत आणि आपण चूकू शकतो ह्याचे सतत भान ठेव! त्यामुळे ‘सदैव बरोबर’ येण्याचे ओझे आपल्यावर येणार नाही! आपण केलेली सगळीच भाकिते बरोबर आली पाहीजेत हे पहिल्यांदा मनातून काढून टाक . सगळे प्रयत्न करुनही काही वेळा भाकित चुकते, ते अपरिहार्य आहे, या व्यवसायाचा तो एक अनिर्वाय भाग आहे, स्विकारलाच पाहीजे. एखादे भाकित चुकले म्हणून स्वत:ला अपराधी समजण्याची काही एक गरज नाही. व्यवसायाचे असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे अधून मधून अपयश येत नाही.

 • एकही केस हरलेला नाही असा वकिल आहे?
 • आलेल्या सगळ्याच पेशंटना बरे केलेला डॉक्टर आहे?
 • सगळ्या मॅच मध्ये सेंच्युरी ठोकलेला बॅट्समन आहे?
 • सगळ्या निवडणूका जिंकलेला राजकारणी आहे?
 • सगळ्या परिक्षेत पहीला क्रमांक मिळवलेले किती विद्यार्थी आहेत?
 • सगळेच्या सगळे चित्रपट ‘सुपर हीट’ झालेला एकतरी अभिनेता / अभिनेत्री आहे का?
 • टाटांच्या सगळ्याच कंपन्या नफा मिळवतात का?

मग आपले एखादे भाकित चुकले म्हणून काय बिघडले?  इतका अभ्यास झालेला असून , गेल्या पंधरा-वीस वर्षांत हजारोंनी पत्रिका तपासल्याचा अनुभव गाठीशी असून सुद्धा काही वेळां माझीही उत्तरें बरोबर येत नाहीत!

आता काही उत्तरें चुकणार हे स्विकारल्यानंतर आता जास्तीत जास्त उत्तरें बरोबर कशी येतील या कडे बघितले पाहीजे. त्यासाठी मुळात ‘उत्तर का  चुकते’ याची अनेक कारणें आहेत ती व्यवस्थित समजाऊन घेतली पाहीजेत.

उत्तर चुकण्यामागे अनेक कारणे आहेत, त्यातली काही आपल्या हातात आहेत तर तर काहींच्या बाबतीत आपल्याला फारसे काही करता येत नाही.

उत्तर अनेक कारणांनी चूकू शकते :

अपुरा अभ्यास / अनुभव
अपुरी / चुकीची माहीती
मिळालेल्या माहीतीचा चुकीचा अर्थ काढला जाणे किंवा आपण ज्याला समजुतीतला घोटाळा म्हणतो त्यातला  प्रकार
अन्य पुरक सहाय्य न मिळणे

आता या सगळ्यांचा उहापोह विस्ताराने करणे शक्य नसले तरी यातल्या बाबीं वर आपण जरुर विचार करुयात..

अपुरा अभ्यास / अनुभव / तारतम्याचा अभाव

हे कारण अगदी स्वाभाविक आहे, आपल्या दैनदिन व्यवहारात देखील आपण हा अनुभव घेतच असतो. अभ्यास पुरेसा नसेल तर परिक्षेत यश मिळत नाही. वाहन चालवायला शिकताना किंवा अन्य कोणतेही काम पहील्यांदा करताना पुरेसा अनुभ नसल्याने अपघात / चुका होणारच, त्याला इलाज नाही. पण इथे ‘ अनुभव नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही  म्हणून अनुभव नाही ’ अशा दुष्ट चक्रात आपल्याला अडकायचे नाही. चार पुस्तके वाचली (त्यातही श्री व.दा. भटांची!) की झाले , एखादा फडतूस क्लास लावला झालो आपण ‘ज्योतिष शास्त्री’, ‘नक्षत्र शिरोमणी’ , आले आपल्याला ज्योतिष असे कधी होईल का? अनेक वेगवेगळ्या ग्रथांचा सतत अभ्यास करावा लागतो. पण नुसते ग्रंथ वाचून अगदी त्यांची पारायणें करुन काही होणार नाही, प्रत्यक्ष पत्रिका अभ्यासून त्यावरुन केलेल्या भाकितांचा कसा आणि किती पडताळा येतो हे पाहणे आणि चुकलेल्या भाकिताचा खास अभ्यास करुन भाकित का चुकले त्याचा शोध घेणे , हे सतत, सातत्याने करावे लागते , त्याला तरणोपाय नाही. बरोबर आलेल्या भाकितां पेक्षा चुकलेली भाकिते बरेच काही शिकवून जातात!

ज्योतिष शिकणार्‍या बर्‍याच विद्यार्थ्यांना असे वाटत असते असे एखादे पुस्तक हातात पडावे ज्यात धाडधाड आणि अचूक भविष्य सांगता येईल असे काही नियम / आडाखे दिलेले असतील, . असा एखादा गुरु भेटेल तो असे १००%  बरोबर भविष्य सांगण्याची गुरु किल्ली हातावर ठेवेल , पण प्रत्यक्षात असे एकही पुस्तक नाही की जे वाचले म्हणजे सगळे आले.  गुरु किल्ली देणारा  ‘गुरु’ भेटणे देखिल जवळजवळ अशक्य आहे याला कारण म्हणजे  या शास्त्रातला बराचसा भाग अगम्य आहे , गूढ आहे  तो कोणालाही समजलेला नाही , ती गुरु किल्ली अजून कोणाच्याच हातात पडलेली नाही, मग ती व्यक्ति कितिही थोर असो किंवा ती  कितीही गप्पा मारो.

शास्त्रातील अनेक नियमांचा (ज्याला नियम म्हणणे जिवावर येते , त्याऐवजी ‘ठोकताळा’ हा शब्द सत्याच्या जास्त जवळ जाणारा आहे) पटेल असा खुलासा देता येत नाही, एक सारखे ग्रहमान असताना वेगवेगळी (काही वेळा टोकाची) फळे कशी मिळतात हे न सुटणारे कोडे आहे. केवळ गणित आणि तर्कशास्त्रावर हे शास्त्र चालत नाही, तसे असते तर खाडखाड , अचूक भविष्य सांगणारे सॉफ्टवेअर केव्हाच विकसीत झाले असते (१९८० पासुन ते आजतागायत म्हणजे २०१७ पर्यंत सुमारे  ३७ वर्षे सॉफ्टवेअर लिहण्यात घालवलेल्या माझ्या सारख्या संगणक अभियंत्याला असे सॉफ्टवेअर लिहणे काहीच अवघड नाही) . ज्योतिषशास्त्रात हमखास प्रत्ययास येणारा असा कोणताही ठोस असा नियम नाही.  काही ठोकताळे  आहेत ज्यांचा बर्‍यापैकी पत्रिकांत अनुभव येतो, पण त्याला ही बरेच अपवाद असतात.

जुन्या ग्रथांतुन दिलेले अनेक योग , नियम आजच्या काळात गैरलागू आहेत किंवा आताच्या बदललेल्या सामाजीक स्थितीमुळे , विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे त्यांच्या फळांचे स्वरुप मोठ्या प्रमाणात बदलले आहे याचे तारतम्य राखता आले पाहीजे. ज्या योगांवर (ग्रहस्थिती, अस्पेक्ट्स इ) ‘संतती नाही’ असे ठासून सांगीतलेले जात असे पण आजच्या काळात असे योग असताना देखील आजच्या आधुनिक वैद्यक शास्त्राच्या प्रगती मुळे , आय व्ही एफ, सरोगेट मदर सारख्या रुढ होत असलेल्या मार्गांमुळे संतती होण्याची शक्यता कितीतरी पटीने वाढली आहे. म्हणजे ‘संतती योग  नाही’ या नियमात कालानुरुप बदल करत  ‘संतती होण्यात मोठे अडथळे, कृत्रीम उपाय योजनांचा अवलंब करावा लागेल’ असा अर्थ लावणे आवश्यक झाले आहे.

पूर्वी अगदी प्रतिकूल ग्रहमान असेल तरच ‘घटस्फोटा’ चे भाकित केले जायचे आज क्षुल्लक कारणां वर घट्स्फोट घेतले जातात, ज्या बाबींकडे ‘ चहाच्या पेल्यातले वादळ’ समजून दुर्लक्ष केले जायचे त्याच बाबीं आता ‘त्सुनामी’ चे रुप धारण करुन राहील्या आहेत. एकंदरच घटस्फोटांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर जाऊन पोचले आहे. ‘लिव्ह ईन रिलेशनशीप – लग्न न करताच एकत्र राहणे’, विधूर / विधवा अवस्थेत मोठा कालखंड एकट्याने घालवण्यापेक्षा ‘केवळ सहजीवन – कंपॅनियनशीप’ हाच हेतु ठेवून उतार वयात लग्ने करण्याचे प्रमाण वाढले आहे / मान्य झाले आहे. त्यामुळे  वैवाहीक जीवना बद्दल भाकितें करताना बदलत्या सामाजीक परिस्थितीचे असे भान ठेवणे अत्यावश्यक आहे….

 

असे अनेक मुद्दे आहेत ,  सगळे एकदम लिहायचे तर लेख फार मोठा होईल म्हणून काही भागात प्रकाशीत करत आहे…

पुढचा भाग लौकरच …

 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी,

   अभिप्रया बद्दल धन्यवाद.

   पुढचे भाग पूर्ण लिहीन तयार आहेत , क्रमवार प्रकाशीत होतील , खंड पडणार नाही याची काळजी घेतली आहे.

   संपुर्ण लेख जो माझ्या डोक्यात तयार असातो टाय्पिंग चाच कंटाळा असायचा आता तसे नाही, माझा नवा टीव्हीएस ईभारत गोल्ड किबोर्ड इतका चांगला आहे की आता एकदा टायपिंग सुरु केले की थांबावेसे वाटतच नाही. हा मोठा जंगी लेख मी एका एक दमात नॉन्स्टॉप टाईल केला तेव्हा माझे मलाच आश्चर्य वाटले! पूर्वी मी मोठे लेख छापत होतो पण मोठा लेख वाचायचा लोक कंटाळा करतात असा फिड्ब्यॅक मिळाल्याने लहान लहान भागत लेख प्रकाशीत करत आहे.

   सुहास गोखले

   0
 1. संतोष

  सुहासजी,

  सुरवात छान झाली आहे, पुढील भाग लवकर येऊ देत.

  पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

  संतोष सुसवीरकर

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.