स दुनिया में जीना हो तो  सून लो मेरी बात..

फेसाळणारा  समुद्र किनारा , घोंघावणार्‍या वार्‍याचा लहरी, लख्ख सूर्य प्रकाश आणि मृत्यूच्या सावटा खाली दबलेल्या , पिचलेल्या आपल्या मित्रांना “कशाची चिंता आजचा दिवस आला , उद्याचे कोण पाहिलेय, आत्ता आपल्या हाती आहे तो क्षण आपला , तो मौज मजेत घालवू ‘ असे अवखळ . लाडिक भाषेत सांगत , उत्फुल्लतेने थिरकणारी मदनिका !

वा, काय माहौल म्हणायचा !

पडद्यावर हेलेन सारखी तारुण्याने मुसमुसलेली , ऐन बहरात असलेली कसलेली नृत्यांगना आणि शंकर जयकिशन नी बांधलेली थुई थुई कारंज्या सारखी वेगवान चाल , त्याला चपखल असे हसरत जयपुरींचे शब्द आणि  वातावरणाचा बाज अचूक पकडणारा दर्जेदार वाद्यमेळ . अक्षरश: बेहोष करून टाकते ही जादू.

हे गाणे ऐकताना / पाहताना ज्याची पावली थिरकली नाहीत त्याने त्याच्या गोवर्‍या मसणात पोहोचल्या असे समजून पुढच्या तयारीला लागावे !

1965 साली प्रदर्शित झालेल्या ‘गुमनाम’ या रहस्य पटातील हे गाणे , एक ‘बीच’ सॉग आहे ( समुद्र किनार्‍यावरचे गाणे) आणि मला वाटते हिंदी चित्रपटाच्या इतिहासात जी काही मोजकीच ‘बीच’ सॉग्ज आहेत त्यातले हे अव्वल क्रमांका वरचे ठरेल.

एका निर्जन बेटावर,  सुटकेची कोणताही आशा शिल्लक न राहिलेल्या असहाय अवस्थेतला लोकांचा एक समूह , आपले काय होणार याच्या चिंतेत , कधी गळा घोटला जाईल या भीतीच्या सतत दडपणाखाली जीव मुठीत धरून आला दिवस ढकलत आहेत. निर्जन बेट , काहीसा वेडसर वाटणारा नोकर कम आचारी,  एकेकाळची वैभवी पण आता खंडग्रस्त अवस्थेतली भितीदायक , गूढ हवेली आणि या सार्‍यांच्या साथीला कधीही , केव्हाही , घिरट्या घालणारी  ‘गुमनाम है कोई’ अशी आर्त पण तितकाच काळजाचा थरकाप उडवत साद घालणारी मृत्यूची सावली.

 “ पल दो पल की मस्ती है बस दो दिन की हस्ती है , चैन यहाँ पर महँगा है और मौत यहाँ पर सस्ती है , किसको ख़बर कौन है वो अनजान है कोई”

भितीच्या या अक्राळविक्राळ गडद छायेत उभे असतानाच एका वळणावर हे अवखळ गाणे अचानकपणे समोर येते. कडाक्याच्या, अंगाची काहिली करणार्‍या, रणरणत्या उन्हाळ्यात एखादी वार्‍याची झुळूक यावी तसे हे गाणे येते आणि सगळे भान विसरायला लावून अलगत अंगावरून मोरपीस फिरवून निघून जाते.

इस दुनिया में जिना हो तो सून लो मेरी बात

ग़म छोड़ के मना लो रंग रेली

और मान लो जो कहे किटी केली

 

शंकर- जयकिशन यांनी हे गाणे स्वरबद्ध केले आहे , एरव्ही आपल्या स्वत:च्या प्रतिभेतून सुरांचे ताजमहाल उभ्या करणार्‍या ह्या जोडगोळीने या चित्रपटासाठी सगळी गाणी कोणा पाश्चात्त्य कलावंताच्या आधीच प्रकाशीत झालेल्या गाण्यांची उचलेगिरी करून बांधली याचे मोठे वैषम्य वाटते. अर्थात हा सरळ सरळ चोरीचा मामला असला तरी या ढापलेल्या चालींना सुबक भारतीय साज चढवण्याचे काम मात्र त्यांनी उत्तम केले आहे हे मान्यच करावे लागेल . असो हा चोरी मारीचा विषय नेहमीच वादग्रस्त राहिला आहे तेव्हा त्या वादात न शिरता आपण या गाण्याचा रसास्वाद घेऊ कसे ?

गाण्याची पार्श्वभूमी पाहा ,  ‘गुमनाम है कोई’ च्या अनामिक दहशतीत वावरणारे, दबलेले . पिचलेले , हताश असे लोक काहीतरी करून मन रमवायचे म्हणून समुद्र किनार्‍यावर एकत्र बसले आहेत. सोनेरी संध्याकाळ, समोर उफाळणारी लाटांची आवर्तने , वार्‍याचा छेडछाड सगळे काही आहे पण त्याचा निर्भेळ आनंद काही लुटता येत नाही अशी कुचंबणा ! अशा अवघडलेल्या , हताश, निराश, कुंठीत स्थितीत त्यांच्या पैकीच एक जण हे भितीचे दडपण झुकारुन म्हणते.. “ग़म छोड़ के मना लो रंग रेली”.  उद्या काय होणार आहे ते माहिती नाही आणि जे होणार आहे तेही अशुभच असणार आहे असे असताना उद्याची काळजी तरी का करायची त्यापेक्षा आत्ता जो क्षण आपल्या मुठीत आहे तो तरी का हातून निसटून द्यायचा , त्या पेक्षा जे आहे त्याचा पुरेपूर आनंद लुटूया  .. जो भी होगा हम देखेंगे गम से क्यों घबराएँ “

नेहमी 150 / 200 वादकांचा अजस्त्र ताफा घेऊन गाणी बांधणार्‍या शंकर-जयकिशन यांनी इथे अगदी मोजक्या वाद्यांचा उपयोग केला आहे. वरच्या पट्टीतली गिटार्स, इंग्लीश फ्लूट , बॅग पाईपर, व्हिसल्स , तबला , ढोलक , बोंगो-कोंगो आणि बेस व्हायोलिन्स, इतकाच काय तो वाद्यमेळ, आणि या सार्‍यांच्या जोडीला “टाळ्या’ हे मानवी हातांतून साकारलेले अनोखे वाद्य (?). या म्युझीक अ‍ॅरेंजमेंट ने (खास करून टाळ्या, व्हिसलस आणि बॅग पाईपर्स) गाण्याला किंचितसा मिलिटरी बँड चा फिल येत असला तरी , गाण्याची गती, तबला आणि घोंगावणारी बेस व्हायोलिन्स आपले काम चोख बजावून मिलिटरी बँडचा फील कमी करून एखाद्या हलक्या फुलक्या गाण्याचा त्यात ही ‘बीच साँग’ चा मूड व्यवस्थित पकडतात. अशा बेभान , उफाळणार्‍या गाण्याचा मूड पकडायला या पेक्षा वेगळा वाद्यमेळ कोणता असू शकेल? पण मला अजूनही वाटते की इथे थोडा ब्रास सेक्शन दिला असता, किमान एखादे फ्रेंच हॉर्न आणि सोप्रानो सॅक्स , तर गाण्याचे दोन – चार कोपरे जरा जास्त लखलखीत चमकले असते. (“’परदेसीयां, ये सच है पिया , सब कहते है की मैं ने तुझको दिल दे दियाँ ’ या मि नटवरलाला मधल्या गाण्याची  खुमार अशा नेमके पणाने वापरलेल्या ब्रास सेक्शन  मुळे किती वाढली आहे ते प्रत्यक्ष ऐकलत तर मी काय म्हणतो आहे ते आपल्या लक्षात येईल ) पण काहीही असले तरी नेमका जितका पाहिजे तितकाच वाद्यमेळ वापरल्यामुळे गाण्यातले अनावश्यक क्लटर निघून गेले आहे. त्यामुळे गाण्याचा मूड सांभाळत बांधलेला ठेका (रिदम) अधिकच उठावदार होतो. इथे रिदम सेक्शन फक्त तबला + ढोलक आणि जोडीला किंचितसा शिडकावा म्हणता येईल असे बेस गिटार यांच्या जोरावर तोलला आहे , तबला + ढोलक  देखील असेे काही  दिल खोल के , मुक्त स्वरूपात वाजवले गेले आहे की त्याला कोसळणार्‍या धबधब्याची सळसळती धार लाभली आहे.

गाण्याची सुरवात होते तीच एका थरार उत्पन्न करणार्‍या सुरावटीने,   ( 00:00:00 ते 00:00:07 ) हे गाणे चित्रपटाच्या मध्यावर असल्यामुळे ही थरार उत्पन्न करणारी सुरावट (ज्याला आपण थीम किंवा सिगनेचर ट्यून म्हणू शकतो) त्या आधी बर्‍याच वेळा चित्रपटात कानावर येत राहिल्याने एव्हाना पूर्णपणे स्थापित झालेली आहे. अर्थात ही सुरावट जशी आधी ऐकवली तशी संपूर्ण न वाजवता त्याची फक्त एक चुणूक (हिंट ) मिळावी इतकीच आहे , आणि तीही अशी की समुद्राच्या रोरावत येणार्‍या लाटांचा आभास त्यातून निर्माण व्हावा. ही जराशी झलक दिसते , जरा जाणवते न जाणवते तोच  पुढे लगेचच आपला ताबा घेणार्‍या मूड स्वींग करणार्‍या  गिटार च्या सुरेख पीस मध्ये अलगदपणे जाऊन मिसळली आहे.  ही अत्यंत कौशल्याने , काफी सोच समझ के की हुई अ‍ॅरेंजमेंट आहे.

गिटार चा हा पीस  ( 00:00:11 ते 00:00:16) मूड स्थापन करतो आणि तो समेवर येताच , लता दीदीचा धारदार आणि काहीशा वरच्या पट्टीत (आणि नको इतका लडिवाळ !) बेतलेला आवाज आपला ताबा घेतो.. “ओ इस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात.. इस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात..  ग़म छोड़ के मना लो रंग रेली और मान लो जो कहे किटी केली(00:00:17 ते  00:00:34) यात सुरवातीला रिदम सेक्शन नाही, तो चालू होतो ‘गम छोड के मना लो..” मधल्या  “मना लो” (00:00:28) वर काय टायमिंग आहे! आधी आणि नंतर रिदम सुरू केला असता तर इथे जो परिणाम साधला गेला आहे तो मिळालाच नसता किंवा फार फार सपक झाला असता.  गाणे नेमक्या याच क्षणाला आपला ताबा घेते , सगळा मूड बदलून टाकते , आणि अगदी ध्यानीमनी नसताना एखाद्याला पाण्यात ढकलून द्यावे तसे आपण कधी या गाण्यात मिसळून जाऊन, पडद्यावरच्या त्या सुबक नृत्याविष्काराला ठेका धरतो हे कळतच नाही. टायमिंग  ! याला म्हणतात टायमिंग !

आणि हे मध्येच रिदम बंद करून पुन्हा तो नेमक्या वेळेला चालू करण्याची ही चुलबुली हरकत या गाण्यात अनेक वेळा साधली आहे. इतकेच नव्हे तर कोणताही रिदम नसलेला लताच स्वर आणि त्या नंतर येणारा पॉज जाणीव पूर्वक, अत्यंत विचारपूर्वक टाकला आहे हे जाणवते. भितीला , दडपणाला झुगारुन देण्याचा कितीही आव आणला तरी कोठेतरी काळीज लक्क कन हालते , ‘भय इथले संपत नाही’ , हे उसने अवसान फार काळ टिकणारे नाही याची विषण्ण , विदारक जाणीव हा ‘पॉझ’ करुन देत आहे अगदी सातत्याने. पण पुन्हा भानावर येत गाणे पुढे चालू होते ! हे गाणे नुसते ऐकताना हा ‘पॉझ’ समजणार नाही पण चित्रपटाच्या कथेच्या पार्श्वभूमीवर हा पॉझ चौफेर अंगावर येतो.

रिदम बंद करून पुन्हा तो नेमक्या वेळेला चालू करताना प्रत्येक “‘गम छोड के मना लो..” मधल्या  “मना लो” वरच रिदम चालू होतो आणि मजा पाहा प्रत्येक वेळा रिदम (तबला + ढोलक ) सुरू होताना वेगवेगळे बोल ऐकवतो , कधी एखादे अवखळ बालक दुडु दुडु धावावे तर कधी धबधब्याच्या कोसळणार्‍या  धारेची गुंज कानी पडावी तसा हा रिदम कमालीचा नितांत श्रवणीय आणि खुमासदार आहे.

इथे रिदम सोबतच अगदी अलगद ,  फिकट (सबड्युड) अशी इंग्लीश फ्लूट एकदाच समेवर असताना (00:00:38) वाजवली आहे , फक्त एकदाच पण अगदी नजाकतीने!

ध्रुवपद संपताच सुरू होतो तो इंटरल्यूड  (दोन कडव्यां मधले संगीत) 00:00:42 , इथे संगीतकाराने आपला नेहमीचा सुरावटींचा सिद्धहस्त कल्लोळ आणला आहे पण गाण्याचा जो मूड एव्हाना प्रस्थापित झाला आहे तो खुलवायला हे आवश्यकच आहे. इथे रिदम ला बोंगो-कोंगो आणि बेस व्हायोलिंस आहेत आणि अर्थातच बॅग पाइपर्स , इंग्लिश फ्लूट त्याच जोडीला पार्टीचा अवखळ पणा म्हणा किंवा चिअर अप करण्यासाठी म्हणा,  ‘टाळ्या’ (हँड क्लापिंग) चा सुरेख उपयोग करून घेतला आहे. हा भाग काहीसा कर्कश्यते कडे झुकणारा वाटला तरी “पार्टी है भाई , शोर तो होनेवाला ही है , चलता है !”

इंटरल्यूड संपतो 00:01:00 वर.  आता अंतरा चालू होतो.  इथे 00:01:18 वर  “जो करना है आज करलो कल किसने देखा ‘ मधल्या ‘देखां’ वर लता दीदींचा स्वर वर चढताना फाटला आहे , हे काहीसे खुपते तरी बाकी अंतरा सुरेख जमला आहे. रिदम सेक्शन ने आपले काम चोख बजावले आहे, यातले काही तुकडे  (00:01:08 ) तर चक्क जान लेवे आहेत !  या अंतर्‍यात 00:01:24 ला” आई हैं रंगीन बहारें लेकर दिन रंगीले” नंतर रिदम थांबवला आहे” आणि मग   फक्त लता दीदींच्या आवाजातले “ओ इस दुनिया में जीना हो तो सुन लो मेरी बात” हे दोन वेळा  आणि मग त्याला जोडून “गम छोड़ के मना लो रंग रेली” येते.  इथे ध्रुवपदा सारखेच “मना लो..” 00:01:35 वर पुन्हा रिदम सुरू केला आहे , टायमिंग कसे अचूक साधले गेले आहे आणि या खेपेला रिदम सुरू होताना चे बोल कसे वेगळे आहेत , त्यातली नजाकती ऐका.  इथे   “ग़म छोड़ के मना लो रंग रेली” असे दुसर्‍यांदा येते तेव्हा 00:01:45 वर लतादीदींनी ‘”मना लो” आणि पाठोपाठ ‘रेली’ वर जे कातीलाने, लाडीक हेलकावे असे काही दिले आहेत की बस्स ! दिल खेचक , मार डाला,  कत्लेआम , कुछ भी कहों यार …. !

हा अंतरा संपताच पुन्हा एक इंटरल्यूड होतो 00: 01:51 वर. याचा बाज पहिल्या इंटरल्यूड सारखाच स्वरमेळ बदलाला आहे , बॅग पाईपर्स हटवले आहेत आणि टाळ्या पण नाहीत त्यामुळे हा  इंटरल्यूड कमी कर्कश्य वाटतो. पहिला इंटरल्यूड जरा गोंगाटी केला आहे पण मला वाटते ते आवश्यकच आहे . पहिल्या इंटरल्यूड  नंतर गाणे वर चढवायचे असल्याने असे काही करणे जरूरीचे होतेच पण आता गाणे एक अंतरा पार करून आल्यामुळे फक्त टेंपो राखायचा आहे . इथे समेवर येतानाचा फ्लूट चे दिल खेचक पीसेस 00:02:00  आणि 00:02;12  वर आहेत  ते जरा तबियतीत ऐका.

इंटरल्यूड  नंतर दुसरा अंतरा सुरू होतो तो 00:02:13 वर. या अंतर्‍यात काही नवीन नाही , जे चांगले चाललेय त्यात कशाला बदल करायचा म्हणा ! बदल हवाच असेल तर पडद्यावर हेलेन आणि प्राण तो दाखवत आहेतच !  इथेही 00:02:29 पासुन “दुनिया वालों तुम क्या जानो जीने की ये बातें” गाताना लता दीदींचा स्वर वर चढताना फाटला आहे , हे काहीसे खुपते, पण लतादीदीं होत्या म्हणून गाणे इतके तरी पेलले गेले , दुसरी कोण या पट्टीत बेसूर न होता गाऊ शकली असती ?

पहिल्या अंतर्‍या सारखेच इथेही 00:02:38 वर रिदम थांबवून लता दीदीचे सोलो “ओ इस दुनिया में जीना हो तो सुन लो मेरी बात” हे दोन वेळा  आणि मग त्याला जोडून “गम छोड़ के मना लो रंग रेली” येते.  इथे आधी प्रमाणेच “मना लो..” वर पुन्हा रिदम सुरू केला आहे , आणि बोल वेगळे आहेत. छोटे छोटे टचेस आहेत हे पण त्यांनी गाण्याची खुमारी दहापटीने वाढली आहे.

दुसरा अंतरा 00:03:02 संपतो आणि तिसरा आणि अखेरचा  इंटरल्यूड सुरु होतो. हा इंटरल्यूड ध्रुवपदा नंतर येणार्‍या इंटरल्यूडच आहे , काहीही बदल केला नाही, कदाचित गाणे संपत आल्याची खुण म्हणून तोच इंटरल्यूड पुन्हा वापरला असेल. पण एखादी व्हरायटी इथे दिली असती तर आवडले असते !

हा इंटरल्यूड 00:03:19 ला संपतो आणि शेवटचा अंतरा चालू होतो. ह्यात नवीन काही नाही, आवाज फाटायची परंपरा इथेही 00:03:38 वर “ऐश के बंन्दो ऐश करो तुम छोडो ये खामोशी “ वर आहेच , यावेळेला मात्र त्यातले ‘खामोशी” ऐकवत नाही , सॉरी लतादीदी !

00:03:44 वर रिदम थांबणे आणि पुन्हा सुरू होताना नवे बोल ही सिलसिला मात्र चांगला जमला आहे, प्रत्यक्षात गाण्यात जाणवणार नाही पण पिक्चरायझेशन मध्ये हेलन च्या या नृत्याविष्काराचा , सळसळणार्‍या उत्साहाचा आणि चिअर अप चा प्रभाव इतर पात्रांवर झालेला दाखवलेला आहे , तो कसा ते गाणे पाहताना आपल्या लक्षात येईलच.

00:04:09 वर हा शेवटचा अंतरा संपतो आणि ध्रुवपदा नंतर येणार्‍या इंटरल्यूडच पण  जरा जलद गतीने पुन्हा वाजवून गाणे संपवले आहे.

हे गाणे नुसते ऐकले तरी मन उल्हसित होते आणि पडद्यावर पाहताना तर त्याची गोडी अधिकच वाढते.

[ माझा मुलगा नेहमी मला बोलत असतो “डॅड , तुम्ही गाणे सरळ का ऐकत नाही ? प्रत्येक गाण्याचा असा कीस पाडलाच पाहीजे का? आता याला काय उत्तर देणार ! देवाने मला गोल्डन इयर दिले आहेत ना? ]

आपल्या सोयी साठी या गाण्याचा व्हीडीओ ‘यु ट्युब’ आणि “अल्ट्रा’ च्या सौजन्याने आपल्या साठी सादर केला आहे , व्हिडिओ होस्ट करायला व्हीमिओ ने मदत केली आहे.

 

 

इस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात

ग़म छोड़ के मना लो रंग रेली

 

जिना उसक जीना है जो हँसते गाते जीले

ज़ुल्फ़ों की घनघोर घटा में नैन के सागर पीले

जो करना है आज करलो कल किसने देखा

आई हैं रंगीन बहारें लेकर दिन रंगीले

 

मैं अलबेली चिंगारी हूँ नाचूँ और लहराऊँ

दामन दामन फूल खिलाऊँ और ख़ुशियाँ बरसाऊँ

दुनिया वालों तुम क्या जानो जीने की ये बातें

आओ मेरी महफ़िल में मैं ये दो बातें समझाऊँ

 

जो भी होगा हम देखेंगे गम से क्यों घबराएँ

इस दुनिया के बाग में लाखों पंछी आए जाए

ऐश के बंन्दो ऐश करो तुम छोडो ये खामोशी

लोग वहीं तो जिंदादिल है कर बैठे जो चाहे

 

 

फ़िल्म: गुमनाम / Gumnaam (1965)

गायक/गायिका: लता मंगेशकर

संगीतकार: शंकर-जयकिशन

गीतकार: हसरत जयपुरी

अदाकार: हेलन, , नंदा, प्राण

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.