आणि  जेव्हा  भविष्य चुकते …

आपल्या प्रांजल अभिप्राया बद्दल धन्यवाद.

होते हो असे काही वेळा, माझेही अंदाज चुकतात , पण आपला जो अपेक्षाभंग झाला, जी निराशा झाली त्याचे मला फार वाईट वाटले. बरोबर आलेल्या भविष्या पेक्षा चुकीच्या ठरलेल्या भविष्या तूनच मला जास्त शिकायला मिळते. माझे कुठे चुकले ते तपासता येते व अशा चुका पुन्हा होऊ नयेत याबाबतीत द्क्षता घेता येते.

माझे  गुरु नेहमी म्हणायचे

“सुहास, आपली भाकितें अधून मधून चुकलीच पाहीजेत !  आपल्या चुका तर समजतातच पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे ‘आपले पाय जमिनीवर’ राखण्यासाठी काही भाकितें  चुकणे आवश्यकच असते!!”

दुर्दैवाने आज माझे गुरु मला मार्गदर्शन करायला , वेळप्रसंगी माझे कान उपटायला (आणि पाठीत दणके घालायला !)  हयात नाहीत पण अशी चुकलेली भाकिते व ते आवर्जुन कळवणारे आपल्या सारखे जातक तेच काम करत आहेत ! मी आपला अत्यंत आभारी आहे.

ज्योतिष हे सर्वसाधारण पणे भविष्यातल्या घटनांची शक्याशक्यता (probability) सांगत असते. मूळात ज्योतिषशास्त्र ही एक संकेतांची भाषा आहे (Symbolic Language), ग्रह, पत्रिकेतली घरे, राशी, ग्रहयोग , नक्षत्रें हे सारे एक प्रकारचे संकेत (Symbol) असतात आणि अशा प्रत्येक संकेताला अक्षरश: शेकड्याच्या घरात अर्थ (meanings) देण्यात आले आहेत, आता त्यातला नेमका कोणता अर्थ घ्यायचा हे काहिसे तर्काने,  संदर्भाने ठरवाचे असते. हे सर्व व्यक्ति / स्थळ / काल / परिस्थिती सापेक्ष असते.

‘अंगण ओले आहे म्हणजे पाऊस पडून गेला असेल ‘ असा तर्क आपण पावसाळ्यात अगदी सहज करु शकतो आणि तो बरोबर ही ठरतो पण जेव्हा पावसाळा नसतो तेव्हा ‘अंगण ओले’ व्हायला दुसरेच काहीतरी कारण असू शकते आणि ते आधी लिहल्या प्रमाने तर्काने,  संदर्भाने ठरवाचे असते. (धरणें भरायला पाऊसच लागतो असे नाही हे अलिकडच्या काळात काही राजकारण्यांनी दाखवून दिले आहेच म्हणा !).

अचानक संध्याकाळी पाच च्या सुमारास ‘फटाके’ वाजले ही घटना घ्या , काय अर्थ लावायचा याचा? ‘फटाके वाजणे’ हा एक ‘संकेत’ आहे , याचा मूळ अर्थ (core meaning)  ‘कोणीतरी ‘आनंद’ व्यक्त करत आहे असा आहे. पण हा कशाचा ‘आनंद’ व्यक्त केला जातोय हे ठरवायला पुन्हा आपल्याला तर्क आणि संदर्भच उपयोगी पडतात. जर त्याच दिवशी भारत-पाकीस्तान वन डे मॅच असेल तर आपण ‘भारताने मॅच जिंकली’ असा अर्थ आपण सहज काढू शकतो. पण जर हेच ‘’फटाके’’ त्याच दिवशी स्पेशल पाकिस्तान धार्जिण्या भागात वाजले तर ‘पाकीस्तान’ ने मॅच जिंकली असा तर्क करावा लागेल!

पण त्या दिवशी जर अशी मॅच चालू नसेल तर? या ‘फटाक्यांना’ दुसरे काहीतरी कारण असणार उदा; कोणाचे संध्याकाळच्या गोरज मुहुर्तावर लग्न लागले असेल! पण लग्न सराई चा काळ नसेल तर ती ही शक्यता असणार नाही, मग कोणीतरी निवडणूक जिंकली असेल, कोणाच्या कोर्ट कचेरीच्या कामाचा निकाल मनासारखा झाला असेल , कोणाच्या दुकानाचे/ व्यवसायाचे ‘फित’ कापून ओपनिंग झाले असेल,  एक ना दोन शेकडों कारणे असू शकतात!

तेव्हा बर्‍याच वेळा ज्योतिषाला तर्क व परिस्थितीजन्य संकेत यांच्या साह्यानेच ‘भाकित’ करावे लागते. त्यामुळे पत्रिका / ग्रह  यांच्या अभ्यासातून एखाद्याला ‘नोकरी लागेल’ असे दरवेळी स्पष्टपणे दिसेलच असे नाही पण  व्यक्तीच्या आयुष्यात काही  ‘बदलाचे संकेत’ आहेत हे मात्र चांगले कळू शकते. आता इथे असा बदल अनेक बाबतीत घडू शकतो. पण ‘नोकरीचे कारक  ग्रह, ‘दशम स्थान’ असा संबध असेल तर हा बदल नोकरी साठी असा कयास बांधता येईल ही पण पुन्हा ‘दशम स्थान’ हे फक्त ‘नोकरी’ साठीच नाही, ते ईतरही अनेक गोष्टी सुचित करते म्हणजे पुन्हा आली पंचाईत! अशा वेळी जर ती व्यक्ती नोकरी साठी जोरदार प्रयत्न करत असेल तर हा बदल नोकरी संदर्भात होईल असा तर्क केला जातो. पण प्रयत्न पुरेसे नसतील तर ‘बदल’ होतोच होतो ,पण तो दुसर्‍या कोणत्यातरी बाबतीत.

ज्योतीष शास्त्र हे कर्मवादाचा पुरस्कार करते, सगळे काही आपल्या साठी आधीच लिहून ठेवलेय आणि तेच घडणार असे अजिबात नाही ,  व्यक्तीची पूर्वसंचित कर्मे, या जन्मातली बरी वाईट कर्मे, प्रयत्न (कर्म) , व्यक्तीची ईच्छाशक्ती, निर्णय स्वातंत्र्य (Free Will) अशा बर्‍याच बाबी आपल्या आयुष्यात होणार्‍या घटनांना आकार देत असतात. पत्रिकेत योग असले तरी बाकीच्या बर्‍याच गोष्टिही जुळून यायला लागतात. जसे एकादे कुरियर / स्पीड पोष्ट डिलीव्हरी साठी आले असताना नेमके त्या वेळी आपल्या घराला कुलूप असेल तर काय होईल ? ते पत्र / पार्सल परत जाईल ! तसेच काहीसे  ईथे होते , ग्रहांनी संकेत दिला (कुरीयर वाला घरी आला) पण कर्म कमी पडले (नेमके त्याच वेळी तुमच्या घराला कुलुप !) , तर्क केलेली / भाकित केलेली घटना घडू शकली नाही. “दैव देते आणि कर्म नेते” अशी आपल्याकडे म्हण आहे ती उगाच नाही !

आपल्या बाबतीत असेच काहीसे घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही ईथे मी माझे भाकित चुकले आहे हे मान्य करत आहे , कोणत्याही प्रकारे ते झाकण्याचा (Cover Up) प्रयत्न करत नाही.

आपण जन्मवेळेतल्या चुकी बद्दल लिहले आहे, अहो ही तर आम्हा ज्योतिषांची चुकलेल्या भाकितां  साठीची अगदी पेटंट सबब  आहे  ,  एकदम जालीम , कोणी काही  त्यावर प्रतिवाद करुच शकत  नाही !  विनोद बाजूला ठेऊन असे म्हणता येईल की अचूक जन्मवेळ ही एक दुखरी नस आहे. काही वेळा ही चुक नेमकी कशी आहे यावर ती चुक किती महागात पडणार आहे ते ठरवता येते. समजा एखाद्या परिक्षेत दोन विद्यार्थ्याना मिळालेल्या मार्कांत फक्त 1 मार्काचा फरक आहे , आता हाच फरक 50 आणि 51 असा असेल तर हरकत नाही  पण तोच जर 59 – 60 अ‍सा असेल तर?  60 मार्क वाल्याला फर्स्ट क्लास आणि 59 मार्क वाल्याला सेकंड क्लास ! आयुष्यावर कायमचा परिणाम करणारा फरक ! पहिल्या केस मधे 1 मार्काची चूक फारशी महत्वाची ठरत नाही पण दुसर्‍या केस मध्ये तीच 1 मार्काची चूक फार महागात पडू शकते.

जन्मवेळ नेमकी काय होती हे कळणे केवळ अशक्य आहे , आपण फक्त त्याबाबतचा अंदाज करु शकतो, हा अंदाज करायला सुद्धा अपार कष्ट पडतात, अक्षरश:  दिवस दिवस जातात. हे करायला ज्योतिषीही अनुभवी, निष्णात असावा लागतो आणि जातका कडून ही कमालीचे सहकार्य  लागते (हो, त्यात आर्थिक सहकार्याचा मोठा वाटा आहे !!) .  व्यावहारीक पातळीवर विचार केला तर, काळ , काम , वेग यांची गणितें आणि एखाद्या भविष्य कथना साठी मिळणारे मानधन यांचे प्रमाण अतिशय व्यस्त आहे.  ‘नोकरी लागेल का ‘ ‘लग्न कधी’ अशा सारख्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी जर रुपये  10,000 मानधन  (कारण जन्मवेळ दुरुस्त करण्यात माझे दिवस दोन दिवस मोडणार त्या मेहेनतीचे हे अतिरिक्त सेवा मूल्य !) घ्यायला सुरवात केली तर माझ्या कडे कुत्रे सुद्धा फिरकणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ‘वडापाव’ च्या बजेट मध्ये ‘अन लिमिटेड गुजराथी थाळी – स्विट सह’  देणे परवडत नाही  ही माझी अ‍डचण आहे !

त्यामुळे जन्मवेळेत चूक आहे हे प्रथम गृहीत धरुन ती ‘फारशी महत्वाची ठरणार आहे का नाही’  याचा अंदाज घेतला जातो, जर जन्मवेळ थोडीफार ईकडे तिकडे होऊनही चालणार असेल तर ‘जन्मवेळेतली चूक ‘ दुरुस्त करण्याचा घाट घातला जात नाही. कारण जन्मवेळेतली चूक पहिल्या उदाहरणातल्या प्रमाणे फारशी क्रिटीकल नसेल तर मोठे नुकसान नाही, काही घटनांच्या तारखा बदलतील, घटनांच्या स्वरुपात / स्केल मध्ये काहीसा बदल पडेल पण चूक खरोखरच क्रिटीकल असेल तर मात्र खूप मोठे बद्ल घडू शकतात.

ते काहीही असो,  मी तुमची पत्रिका पुन्हा एकदा तपासतो , आणि सुधारित भविष्य आपल्याला पाठवून देतो. काळजी नसावी.

पुन्हा एकदा,आवर्जुन प्रतिसाद दिल्या बद्दल मन:पूर्वक आभार व चुकलेल्या भाकिता बद्दल खेद व्यक्त करतो.

कळावे लोभ असावा ही विनंती.

आपला ,

सुहास गोखले


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.