बाईंनी विचारलेला प्रश्न अगदी शब्दश: एका काना मात्रेचा फरक न करता इथे लिहितो:
“उद्या एका मेडिकल टेस्ट साठी डॉक्टरांच्या कडे जात आहे, त्याचे काय होईल?”
बाईंनी प्रश्न विचारला आणि मला तो समजला तो नेमका क्षण आणि ‘नाशिक शहर’ या स्थळाची एक कुंडली मी तयार केली ती सोबत छापली आहे.
दिनांक: ११ जुलै २०१९, वेळ: ०९:१०:४७ स्थळ: नाशिक शहर (19N59 , 73E48)
ही (प्रश्न) कुंडली, सायन भावचलित, रिजिनोमोनटॅनस हाऊस सिस्टीम आणि मीन नोड्स अशी आहे.
आत्ता पर्यंतच्या अॅनालायसिस वरून आपण अंदाज बांधला आहे की:
बाई बहुदा आय व्हि एफ IVF सारखी एखादी असीस्टेड गर्भधारण ट्रीटमेंट घेत असाव्यात आणि त्याच्या शेवटच्या टप्प्यावर असाव्यात
या टप्प्यावर ही ट्रीटमेंट यशस्वी झाली की नाही याची एक महत्त्वाची चाचणी असते आणि बाई बहुदा याच चाचणी बद्दल प्रश्न विचारत असतील
या चाचणी द्वारे ट्रीटमेंट यशस्वी होऊन ‘गर्भधारणा’ झाली किंवा ट्रीटमेंट मध्ये अपयश आले ( गर्भधारणा झाली नाही) हे कळणार आहे.
बहुदा बाईंच्या बाबतीतले असे काही प्रयत्न पूर्वीच्या काळात अयशस्वी ठरले असतील आणि या वेळी ही असेच काही अशुभ घडेल या चिंतेने धास्तावल्या असतील.
आता बाईंना जरी सरळ सरळ “मी गर्भवती आहे का?’ असा रोख ठिक सवाल विचारला नसला तरी आपला तर्क त्यांचा प्रश्न हा आणि असाच आहे हे सांगत आहे तेव्हा आता त्याचेच उत्तर हुडकायला हवे.
आता गर्भधारणा झाली आहे का नाही हे ठरवायचे कसे?
ज्योतिषशास्त्रात अगदी निश्चित, सदासर्वकाळ लागू पडतील, १००% बरोबर ठरतील असे कोणतेही नियम / अडाखे नाहीत. पण तरीही काही सर्वमान्य आणि बर्याच वेळा पडताळा येणारे नियम/अडाखे आहेत. सर्वप्रथम आपण ते तपासू.
एखादी स्त्री जर गर्भवती असेल तर त्या प्रश्नकुंडलीत त्या स्त्रीचा प्रतिनिधी, जन्मलग्न भाव, लग्न बिंदू यांचा पंचमेश (संतती), पंचमातले ग्रह (संततीचे सह प्रतिनिधी), पंचम भावारंभ बिंदू , संततीचा कारक गुरू यांच्यात कोणता तरी घनिष्ट संबंध दिसला पाहिजे.
खास करून जर पंचमेश जर लग्नात (मूल आईच्या पोटात!) असेल तर गर्भधारणा जवळजवळ पक्कीच समजता येईल!
लग्नेश पंचमात किंवा चंद्र पंचमात असणे ही स्थिती गर्भधारणेला अनुकूलता दाखवू शकते पण गर्भधारणा झाली असेलच हे ठरवण्या साठी आणखी काही पुरावे पत्रिकेत असावे लागतात जसे लग्नेश किंवा पंचमेशा वर शुभ ग्रहांची दृष्टी किंवा एखादा शुभग्रह पंचमातच असणे किंवा पंचम स्थानारंभावर शुभ ग्रहाचा अंशात्मक शुभ योग इ.
असे अनेक घटक आहेत ज्यांच्या अभ्यासातून ‘मी गर्भवती आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर तपासता येते, यादी करायची झाली तर फार मोठी होईल, विस्तारभयास्तव सगळेच इथे लिहीत बसत नाही.
आपण आता यातलेच काही नियम या पत्रिकेला लागू पडतात का ते तपासू.
लग्नेश, चंद्र आणि पंचमेश यांच्यात संबंध येतो आहे का:
रवी लग्नेश आहे आणि शनी पंचमेश आहे. या दोघांत प्रतियोग होऊन गेला आहे आणि तो अगदी ताजा ताजा आहे, याचाच अर्थ गर्भधारणा झाली आहे आणि ती अगदी नजिकच्या काळातच! आपण हेच तर पाहात होतो ना?
अर्थात एका ग्रहयोगा वर अवलंबून इतके मोठे भाकीत करणे योग्य नाही, आपल्याला आणखी काही पुरावे गोळा करावे लागतील तरच केस स्ट्राँग होईल!
रवी (बाई) – गुरु (संतती) मधला १५० अंशाचा होऊन गेलेला योग हा आणखी एक पुरावा.
चंद्र आणि शुक्र यांच्यात अगदी नुकताच (चंद्र १० वृश्चिक आणि शुक्र ९ कर्क) होऊन गेलेला नव-पंचम हा योग आता अचानक भाव खाऊन जाणार कारण हा योग देखील संतती कारक किंबहुना गर्भधारणा कारक मानला जातो.
जगदविख्यात ज्योतिर्विद डॉ. रेनोल्ड ईबर्रटीन यांनी त्यांच्या COSI या ग्रंथात (ज्योतिषशास्त्राचे बायबल मानले जाते याला) या चंद्र – शुक्राच्या युती बद्दल लिहिले आहे:
Glandular secretion (Harmones. Ferments in the stage of generation), menstruation, the female capability of conception!
म्हणजेच गर्भधारणा, दुसरे काय? आणखी एक पुरावा.
आता गर्भधारणा ही प्रकिया स्त्रीच्या शरीरात (किंवा आय व्हि एफ तंत्रात, टेस्ट ट्युब मध्ये!) मध्ये होत असली तरी त्यात तिच्या पतीचा वाटा असतोच, मूल जसे त्या स्त्रीचे असणार तसेच ते तिच्या पतीचे पण असणार, तेव्हा पतीला बाजूने या पत्रिकेचा ओझरता आढावा घेणे देखील औत्सुक्याचे ठरेल!
बाईंचा पती म्हणजे पत्रिकेतले सप्तम (७) स्थान त्याची संतती म्हणजे या सप्तमाचे पंचम स्थान म्हणजे लाभ (११) स्थान. पत्रिकेत लाभ स्थानावर कर्क राशी आहे. सप्तम स्थानावर गुरू ची मीन रास आहे. कर्क आणि मीन या दोन्ही राशी फर्टाईल म्हणजेच ‘बहु प्रसव’ राशी आहेत. बाईंच्या पतीचा प्रतिनिधी म्हणजे सप्तमेश गुरू तो तर संततीकारक ग्रह असून धने सारख्या प्रसवा राशीतच आहे. गुरु चा राश्याधिपती स्वत: गुरूच आहे. आणखी एक पुरावा.
म्हणजे बाईंच्या पती बाबतचा असा अगदी वर वरचा विचार केला तरी प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे असे दिसत आहे.
बाईंचे दोन्ही प्रतिनिधी रवी आणि चंद्र हे अनुक्रमे कर्क आणि वृश्चिक या बहु प्रसव राशीत आहेत, शुक्र देखील कर्के सारख्या बहु प्रसव राशीत आहे.
संततीचा प्रतिनिधी शनी मकरे सारख्या मध्यम दर्जाच्या प्रसव राशीत आहे.
मी माझ्या अभ्यासात बर्याच वेळा ‘अरेबिक पार्ट्स (किंवा अरेबिक लॉट्स) चा वापर करतो. गुंतागुंतीच्या केसीस मध्ये या अरेबिक पार्ट मार्फत बरीच माहिती मिळते , टेस्टीमोनिज मिळतात असा माझा अनुभव आहे. या अरेबिक पार्ट्स ना आपल्या कडे पारंपरिक मध्ये ‘सहम’ असे संबोधले जाते, या अरेबिक पार्ट मधला ‘पार्ट ऑफ फॉरच्युन’ म्हणजेच ‘फॉरच्युना’ म्हणजेच ‘धन सहम’ आपल्या कडे काहीसा प्रचलित आहे, आपल्या कडच्या सॉफ़्टवेअर आणि अॅपस मध्ये हा ’धन सहम’ दाखवतात देखील. नक्षत्र पद्धतीत देखील याचा उल्लेख आहे पण भारतात याचा किंवा अन्य अरेबिक पार्ट्स चा वापर केला गेल्याची फारशी उदाहरणे मी पाहिली नाहीत.
असो.
मी गर्भधारणे संदर्भात असलेले ‘अरेबिक पार्ट’ तपासून बघायचा ठरवले.
जुन्या ग्रंथांतून याबाबत उलट सुलट विधाने , सुत्रे असली तरी एक सर्वमान्य असा अरेबिक पार्ट मी विचारात घेतला.
Part of Conception = Asc + Mars – Sun (day; reverse for night)
Conception: The action of conceiving a child or of one being conceived.
इथे जन्मलग्नाच्या अंशात (Asc) मंगळाचे अंश (Mars) मिळवायचे आणि त्यातून रवीचे अंश (Sun) वजा करायचे म्हणजे आपल्या ‘पार्ट ऑफ कॉन्स्पेशन – गर्भधारणेचा सहम’ मिळतो.
या पत्रिकेत जन्मलग्न २९ सिंह ५४ आहे म्हणजेच याचे अॅबसोल्युट अंश (० – ३६० मध्ये) असे येतील:
कर्के पर्यंत १२० अधिक सिंहेतले २९:५४ म्हणजे – १४९:५४
मंगळ ०५ सिंह ५० वर आहे याचे अॅबसोल्युट अंश (० – ३६० मध्ये) असे येतील:
कर्के पर्यंत १२० अधिक सिंहेतले ०५:५० म्हणजे – १२५:५०
रवी १८ कर्क ३५ वर म्हणजे याचे अॅबसोल्युट अंश (० – ३६० मध्ये) असे येतील:
मिथुने पर्यंत ९० अधिक कर्केतले १८:३५ म्हणजे १०८:३५
आता हिशेब असा होईल: १४९:५४ + १२५:५० – १०८:३५ = १६७:०९
आता १६७:०९ म्हणजेच १७ कन्या ०९ ( सिंहे पर्यंत १५० + कन्येतले १७:०९)
म्हणजेच हा पार्ट ऑफ कॉन्स्पेशन १७ कन्या ०९ वर येतो.
आता पत्रिके कडे नीट पाहिलेत तर असे दिसेल की हा १७ कन्या ०९ वरचा ‘पार्ट ऑफ कॉन्स्पेशन’ १८ कर्क ३५ वरच्या रवी (बाई) बरोबर पूर्ण अंशात्मक लाभयोगात आहे!
इतकेच नव्हे तर हा पार्ट संततीकारक गुरू जो १५ धनू ५८ वर आहे त्याच्याशी अंशात्मक केंद्र योगात आहे.
आणि १७ मकर ०६ वरच्या शनी (बाईंचे आरोग्य , बाईंची संतती) बरोबर चक्क अंशात्मक नवपंचमात आहे !!
गर्भधारणा झाली असल्याचे आणखी कोणते (आणि किती?) पुरावे हवेत!
आपल्या आत्ता पर्यतच्या अभ्यासातून निघालेला ठोस निष्कर्ष :
बाईंच्या बाबतीत अगदी नजिकच्या काळात गर्भधारणा झाली आहे!
बाई उद्या जी मेडीकल टेस्ट करणार आहेत त्याचा निकाल सकारात्मक लागणार असून उद्या बाईंना ‘गुड न्यूज’ मिळणार आहे यात कोणतीही शंका नाही !
जेव्हा जेव्हा गर्भधारणेचा मुद्दा येतो तेव्हा तेव्हा अगदी मनात नसले तरी अशुभत्वाचा म्हणजे ‘गर्भपाता’ चा विचार करावाच लागतो. कारण गर्भधारणा ही तर एक सुरवात असते पण सुखरूप प्रसूती हे अंतिम साध्य असते तेव्हा नुसत्या गर्भधारणेचा विचार करून भागणार नाही तर प्रसूती पर्यंतचा प्रवास पण तपासावा लागतो.
या बाबतीत एक महत्त्वाचा आणि बर्याच वेळा अनुभवास येणारा अडाखा असा आहे:
“गर्भधारणा झाली आहे का? अशा प्रकाराच्या प्रश्नांत एकंदर ग्रहस्थिती होकारार्थी उत्तर देत असताना जर केतू किंवा एखादा बिघडलेला पापग्रह पंचम स्थानात असेल तर गर्भधारणा झाली असली तरी गर्भ टिकणार नाही, गर्भपात होण्याची मोठी शक्यता असते”
या पत्रिकेत अशा अशुभ घटकांची माळच आहे!
१) पंचमात केतू तर आहेच शिवाय वक्री प्लुटो पण आहे!
२) संतती कारक गुरू वक्री आहे.
३) रवी (बाई) आणि शनी (संतती) यांच्यातला संतती दर्शक योग मुळातच ‘प्रतीयोग’ आहे, त्यात शनी वक्री आहे.
४) जन्मलग्न ‘सिंह’ या वंध्या राशीत आहे.
५) गर्भधारणे बद्दलचा चा अरेबिक पार्ट Part Of Conception कन्या या वंध्या राशीत आहे. संतती कारक गुरू च्या केंद्र योगात आहे.
६) शनी पंचमात असणे हे देखील नकारार्थीच आहे जरी इथे शनी स्वत: पंचमेश असला तरी तो त्याच्या स्थानगत फळां नुसार गर्भधारणेच्या किंवा प्रसूतीच्या विरोधातलाच मानला पाहिजे.
७) संतती कारक गुरू अष्टमेश (८) आहे, अष्टम स्थान हे पंचमाचे (५) ते चतुर्थ स्थान होते.
८) बाईंचा मुख्य प्रतिनिधी व्ययेश (१२) आहे.
९) संतती कारक गुरू चतुर्थ (४) स्थानात म्हणजे संततीच्या व्ययस्थानात आहे.
१०) संततीच्या बाजूने विचार केला तर पंचम स्थान हे संततीचे लग्न स्थान होते, लग्नी शनी, केतू आणि प्लुटो येतात सुरवातच बिघडली आणि त्यातच संततीच्या अष्टमात मंगळ आहे.
यादी बरीच मोठी आहे!
आता पत्रिकेतले होणारे ग्रहयोग तपासले तर पुढे नक्की काय होणार याचा अंदाज येईल!
बाईंचा मुख्य प्रतिनिधी रवी अगदी लौकरच वक्री प्लुटो शी प्रतियोग करणार आहे
आणि
बाईंचा दुसरा प्रतिनिधी चंद्र पण प्लुटो शी लाभयोग करणार आहे!
पंचम स्थान हे संततीचे लग्नस्थान म्हणजेच पंचमेश शनी हा संततीचा लग्नेश होतो आणि तो वक्री आहे आणि शनी मार्गी झाला की त्याची ही प्लुटो बरोबर युती होणार आहे!
ही तर एक प्रकारची मृत्यू घंटाच!
आणि
अगदी नजिकच्या काळात होणार्या रवी – नेपच्युन योगा बद्दल आणि त्याच्या संभाव्य परिणामां बद्दल मी आधी लिहिले आहेच!
थोडक्यात ग्रहस्थिती गर्भधारणा झाली आहे असे दाखवत असली तरी विरोधी मत ही तितकेच जोरदार आहे!
यावरून आपल्याला आपले अंतिम अनुमान:
‘गर्भधारणा झाली आहे हे नक्की पण हा गर्भ टिकण्याची शक्यता कमी आहे’
बाईंच्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळाले सुद्धा!
पण आता ते बाईंना कसे सांगायचे हाच मोठा प्रश्न पडला!
याला दोन कारणे आहेत:
पहिले कारण म्हणजे बाईंनी आपल्याला टेस्ट बद्दल आणि आजारा बद्दल काहीही सांगितलेले नाही तरी आपण पत्रिकेच्या अभ्यासा वरून एक तर्क केला आहे, आपल्याला कितीही आत्मविश्वास असला तरी तो बोलून चालून एक तर्क आहे आणि तो कदाचित सपशेल चुकीचा ठरू शकतो!
एका महिलेच्या बाबतीत असा कोणताही आगापिछा नसताना, कोणताही संदर्भ नसताना, एकदम असे धाडकन ‘तुमची आय व्हि एफ IVF ट्रीटमेंट चालू आहे’ अशा स्वरूपाचे विधान करणे हे कमालीचे धाडस ठरले असते आणि हे असले धाडस अंगाशी आले तर चक्क जोडे बसण्याची शक्यता होती.
दुसरे कारण म्हणजे आपण गर्भधारणा झाली आहे, टेस्ट पॉझीटीव्ह येणार असा तर्क केला असला तरी हा गर्भ फार काळ टिकणार्यातला नाही असेही अनुमान बांधले आहे! यातला ‘गर्भधारणा झाली आहे, टेस्ट पॉझीटीव्ह येणार’ हा भाग एखादे वेळी धाडस करून सांगता येईलही पण गर्भपाता विषयीच्या अनुमानाचे काय करायचे?
एकदा वाटले बाईंना हे सांगण्याचे धाडस न करता सरळ गोड शब्दात काहीतरी सबब सांगून बाईंना परत पाठवायचे उदा: पत्रिका रॅडिकल नाही, प्रश्न चुकीच्या वेळेला विचारला गेला, क्षमा करा आत्ता आपल्याला काहीच सांगता येत नाही इ. पण हा रडीचा डाव झाला असता आणि बाईंनी दिलेल्या आव्हानाचे काय?
आणखी एक पर्याय होता तो म्हणजे बाई उद्या वैद्यकीय तपासणी साठी जाणार आहेतच आता ती ‘आय व्हि एफ IVF’ संदर्भात असेल नसेल त्या बद्दल काहीच बोलायचे नाही, फक्त ‘उद्याची नियोजित वैद्यकीय तपासणी शुभ ठरेल’ असे मोघम सांगून मोकळे व्हायचे. पण असे गुळमुळीत, थातुरमातुत, समोरच्या जातकाला खुषी वाटेल असे हेतुत: सांगणे माझ्या व्यावसायिक नीतिमत्तेत बसले नसते.
इकडे कोठेतरी बाईंचे “इथेच तर तुमचे स्किल आहे असे मी समजते” हे काहीसे आव्हानात्मक वाक्य मला नाही म्हणले तरी लागले होतेच. पत्रिका कमालीची रॅडीकल होती आणि ग्रहमान देखील खूपच बोलके आणि आश्वासक होते अशा पत्रिके वरून काढलेले निष्कर्ष सहसा चुकत नाहीत असा माझा अनुभव होता, थोडे फार इकडे तिकडे होऊ शकते पण अगदीच दिल्ली – चैंन्नै होणार नाही. गेली अनेक वर्षे मी ज्योतिष मार्गदर्शन करत आहे, असंख्य केसीस हाताळल्या आहेत आणि माझी उत्तरे बरोबर येण्याची शक्यता बरीच चांगली आहे, मला आत्मविश्वास होता. तेव्हा ठरवलेच हे सांगायचेच, होऊ दे आर या पार!
आता हे सारे सांगायचे कसे या साठी शब्दांची जुळवाजुळव केली.
“आपण उद्याची मेडिकल टेस्ट कशासाठी होत आहे हे अजूनही सांगितले नाहीत, खरे तर ही माहिती इथे आवश्यक आहे. त्या माहिती शिवाय आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे खरे सांगायचे तर शक्यच होणार नाही”
“मान्य आहे, पण काही माहिती मला तुम्हाला द्यायची नव्हती, काही कारणें आहेत”
“आपल्या खासगीपणा जपण्याच्या आग्रहाचा मी आदर करतो, पण ज्योतिषशास्त्राच्या म्हणून काही मर्यादा असतात आणि खास करून जेव्हा प्रश्नकुंडली सारखे माध्यम वापरले जाते तेव्हा या मर्यादा जास्तीच उघड्यावर पडतात”
“म्हणजे तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही असे समजायचे का?”
“तसेही नाही, मी माझी स्किल्स वापरून आपल्या प्रश्नाचे उत्तर ह्या प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न जरूर केला आहे, नाही असे नाही. पण हा एक अपुर्या माहितीच्या आधारे काढलेला निष्कर्ष असेल”
“काय आहे तो? हे पहा मला अचूक उत्तराची अपेक्षा नाहीच, जरासा अंदाज मिळाला तरी पुरेसे होईल”
“जरासा अंदाज कशाला? अगदी स्पष्ट, खणखणीत शब्दात माझा निष्कर्ष सांगेन पण शेवटी अपुर्या माहितीच्या आधारावर काढलेले निष्कर्ष आहेत ते चुकीचे ठरू शकतील, कदाचित भलतीच चूक ठरेल, इतकी की संतापून तुम्ही मला चक्क जोडे माराल!”
“अहो, काही तरीच काय, पण असा काय निष्कर्ष काढला आहात तुम्ही?”
“आता तुमचा इतका आग्रहच असेल आणि मी जे काही सांगतो ते न रागावता ऐकणार असला तर सांगतो, बघा पटते का””
माझे आढेवेढे घेणे काही संपत नव्हते!
“सांगा, माझी तयारी आहे, मी नाही रागावणार तुमच्यावर, बोला, सांगून टाका एकदाचे”
“ठीक आहे, मग या पत्रिकेचा अभ्यास केल्या नंतर मला काय दिसले ते सांगतो. माझा कयास जो १००% चुकीचाही ठरू शकतो, असा आहे की आपण सध्या कृत्रिम गर्भधारणे सारखी एखादी म्हणजे आय.व्ही.एफ. सारखी ट्रीटमेंट घेत असाव्यात आणि उद्याची टेस्ट त्या संदर्भात असावी”
“काय सांगताय?”
“म्हणजे माझा अंदाज चुकला म्हणायचा का? सॉरी, पण मी आधीच बोललो होतो..”
“अहो, सॉरी काय म्हणताय, बरोबर आहात तुम्ही, अगदी असेच आहे हे!”
“म्हणजे तुम्ही सध्या आय व्ही एफ सारखी ट्रीटमेंट घेत आहात आणि उद्याची टेस्ट ही गर्भधारणा यशस्वी झाली का नाही हे तपासण्या साठी आहे असेच ना?”
“अगदी असेच, १०० % बरोबर, अगदी तंतोतंत! पण हे सगळे आपल्याला ह्या पत्रिकेतून कळले? मी तर ह्या टेस्ट बाबत, ट्रीटमेंट बद्दल काहीच बोललेले नसताना आपण हे कसे काय ओळखलेत? कमाल आहे!”
“स्किल! तुम्ही स्किल बद्दल बोलला होतात ना, हेच ते स्किल! थोडा अभ्यास आहे, थोडा अनुभव आहे, जमून जाते काही काही वेळा, पण दर वेळेला असे जमेलच असे नाही पण आज तुमच्या सुदैवाने ते जमले इतकेच”
“पण मग ह्या टेस्ट चे काय होणार, ते सांगा ना आता पटकन, मला आता धीर धरवत नाही”
“हो सांगतो, आपला उत्साह वाढवणारे ग्रहमान आहे”
“म्हणजे टेस्ट पॉझिटीव्ह येणार”
“अर्थातच! ग्रहमान सांगते आहे, गर्भधारणा झाली आहे”
खरे तर इथे माझी अवस्था ‘अश्वत्थामा हतः नरो वा कुंजरो वा’ अशी झाली होती म्हणजे गर्भधारणा झाली हे सांगितले पण हा गर्भ जास्त काळ टिकणार नाही हा भाग मला बोलताच आला नाही!
दोन क्षण कमालीची शांतता पसरली आणि पुढच्याच क्षणी बाईंनी एक हुंदका दिला, बाईंच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते. असेच काही क्षण गेले, बाई सावरल्या आणि म्हणाल्या..
“काय सांगता गोखले? हे खरे आहे? म्हणजे पत्रिकेत हे सारे दिसले”
“हो, पत्रिकेत जे दिसले तेच तुम्हाला सांगितले माझ्या पदरचे यात काहीही नाही”
“सॉरी बरे का मी तुम्हाला स्किल बद्दल बोलायला नको होते, मी नकळत तुमचा अपमान केला म्हणायचा, माझी चूक झाली’
“असू दे हो, अशी आव्हाने मिळतच असतात, मला त्याला तोंड द्यावेच लागते आणि सुदैवाने मला त्यात यश मिळाले”
“माझा माझ्या कानावर अजूनही विश्वास बसत नाही, खरेच हे असे होईल”
“मला खात्री आहे, तुम्ही यशस्वी होणार!”
“मग आता पुढचे काय?”
“पुढचे म्हणजे?”
“पुढ्चा नऊ महिन्यांचा केव्हढा मोठा आणि खडतर कालखंड असेल, मला भिती वाटते, सगळे नीट पार पडेल ना”
“हा वेगळा प्रश्न होईल आणि त्याचे उत्तर या प्रश्नकुंडली वरून नाही कळणार, आपण नंतर सवडीने येऊन भेटा, पुन्हा एक नवीन प्रश्नकुंडली मांडून तुमच्या या प्रश्नाचे पण उत्तर तपासू त्यात काय मोठेसे”
डोळ्यातले आनंदाश्रु पुसत बाई निघून गेल्या…
….
….
….
मी बाईंना टेस्ट पॉझिटीव्ह येणार म्हणजे गर्भधारणा झाली आहे असे सांगितले पण हा आनंद फार काळ टिकणार नाही, गर्भ पोटात फार काळ टिकणार नाही हा भाग वगळला कारण हे बाईंना आत्ताच सांगणे मला आवश्यक वाटले नाही. बाईंनी टेस्ट चा निकाल काय येईल असा प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर आपण दिले आहे, पण पुढे काय होईल ह्याचा अंदाज आपल्याला आला असला तरी ही माहिती बाईंनी न विचारताच अनाहूतपणे कशाला सांगायची, गप्प राहिलेलेच बरे.
जे होणार आहे असे वाटते आहे ते होईल किंवा होणारही नाही. आजच्या खुशखबरीवर पुढचा काही कालखंड तरी बाईंना चांगला जाणार आहे, मातृत्वाची चाहूल लागणे हा प्रत्येक स्त्री साठी मोठा आनंद सोहळा असतो आणि तो बाईंच्या आयुष्यात तर इतकी वाट पाहिल्या नंतर, मोठ्या कष्टाने येणार आहे, बाईंना जरा त्या आनंदात राहू दे ना. त्यांचे हे हळुवार भावविश्व आत्ताच गरज नसताना उद्ध्वस्त करण्याचा मला काय अधिकार आहे?
शेवटी काही झाले तरी ज्योतिषशास्त्र हे काहीसे अंदाजांचे , शक्याशक्यतेचे म्हणजेच प्रॉबॅबिलिटीज चे शास्त्र आहे, या शास्त्रा द्वारे व्यक्त केलेले अंदाज नेहमीच बरोबर येतील असे नव्हे. जेव्हा जेव्हा मी असे नकारार्थी भाकीत करतो ना तेव्हा तेव्हा मी माझे भाकीत चुकावे अशीच प्रार्थना करत असतो, मी चुकीचा ठरलो तरी बेहेत्तर पण जातकाची ईच्छा पूर्ण व्हावी असेच मला मनापासून वाटते. आत्ताही, बाईंची टेस्ट नक्की पॉझिटिव्ह ठरावी आणि त्यांची अनेक वर्षाची संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण व्हावी अशीच प्रार्थना मी केली.
बाईंना आशीर्वाद देण्या इतका मी मोठा नसलो तरी एक हितचिंतक म्हणून त्यांना मन:पूर्वक सदिच्छा दिल्या .
त्यानंतर लगेचच म्हणजे दुसर्याच दिवशी, टेस्ट झालेल्या दिवशीच बाईंनी आवर्जून फोन करून ‘गुड न्युज’ दिली, मला आनंद तर वाटलाच पण एक मुष्किल केस यशस्वीपणे सोडवता आली याचे समाधान वाटले.
पण हे भाकीत बरोबर आले म्हणजे याचा दुसरा भाग पण बरोबर येण्याची शक्यता वाढली आणि त्याचा विचार येताच काळजाचा थरकाप झाला, हे एक भाकीत बरोबर आले ठीक आहे पण आता पुढचे भाकीत मात्र नक्की चुकावे असे मनापासून वाटले.
पुढे दोन महिन्यांनी गणपतीच्या दिवसांत एका समारंभात अचानक माझी आणि बाईंची भेट झाली, मला जरा बाजूला घेऊन बाई फक्त इतकेच म्हणाल्या:
“नशिबात नव्हते माझ्या”
—-
समाप्त
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
सुंदर लेखमाला सर..
धन्यवाद श्री उमेशजी
सुहास गोखले
ओ हो, सर्व छान जमून आले पण शोकांतिका झाली. आव्हान पेलाल्याचाही आनंद तुम्हाला पूर्ण घेता आला नसेल. असो दैव इच्छा असेच आपण म्हणायाचे.
शुभरात्र.
धन्यवाद श्री योगेशजी
काही गोष्टी आपल्या हातात नसतात !
सुहास गोखले
धन्यवाद सुहासजी,
हि एक खूपच चांगली केस स्टडी आहे, त्याहीपेक्षा तुमचा अभ्यासाचा आवाका फारच मोठा आहे वेगवेगळ्या पद्धतीतून शोध घेत तुम्ही आव्हान पूर्ण केलंत.
ह्यातून बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतींबद्दल कल्पना आली.
मागे तुम्ही स्थिर ताऱ्यांवर लेख लिहिला होता एखादी केस स्टडी किंवा बेसिक माहिती ह्या स्थिर ताऱ्यांवर लिहिता येईल का? 🤔
बाकी केस स्टडीतील जातकाबद्दल वाईट वाटलं.
तुमच्या लेखातून ज्योतिष खूपच खोल आहे ह्याचा एक नमुना मिळाला आणि त्याची लिमिटेशन देखील आहेत हे देखील जाणवायला लागले.
पूर्ण लेखामध्ये एक गोष्ट खूप आवडली तो तुमचा प्रामाणिकपणा एवढ्या खोलवर स्टडी करुनसुध्या तुम्ही कुठेही बडेजाव न दाखवता तुमच्या मनातली त्यावेळच्या भावना जश्या तश्या मांडल्या आहेत. 🙏👍
ह्या वर्षाची सुरवात खूपच अभ्यासामय चालू आहे, पुढे देखील अश्याच उत्तमोत्तम केस स्टडी वाचायला मिळोत हि शुभेछया.
नवीन केस स्टडीच्या प्रतीक्षेत 🤗
धन्यवाद श्री संतोषजी
स्थिर तार्यां विषयी एखादा लेख लिहता येईल प्रयत्न करतो. मात्र स्थिरतार्यांचा वापार तसा मर्यादीतच आहे , सेकंडरी टेस्टीमोनी असे काहीसे स्वरूप ठेवावे मुख्य भर हा ग्रह आणि ग्रहयोग यावरच असावा असे मला वाटते .
प्रत्येक जातकाच्या बाबतीत असा 100% बरोबर असा अनुभव येणार नाही पण आपण प्रयत्न करताना कोणतीही कसूर ठेवायची नाही, अगदी शिस्तब्द्ध काम करायचे निदान जे आपल्या हातात आहे ते तरी व्यवस्थित पार पाडावे.
ज्योतिष असो वा अन्य कोणताही व्यवसाय आपल्याला जित्या जागत्या जिवंत लोकांशी व्यवहार करायचा असतो तेव्हा मानवी भावभावना जपल्या पाहीजेत त्यांचा आदर केला पाहीजे ह्या गोष्टी महत्त्वाच्या म्हणूनच या केस स्ट्डी मध्ये त्या बाईंचा गर्भपात होणार हे लक्षात येऊन देखील ते सांगायचे मी टाळले
आपण स्वत: ‘मांजर ह्रवले’ या केस स्ट्डि मध्ये ‘मांजर मेले असावे’ असे सांगून टाकले तो भाग टाळता आला असता, त्या ऐवजी ‘मांजर परत येण्याची शक्यता कमी आहे’ असे सांगता आले असते ! हा थोडा भाग अनुभवाने येतो त्यासाठी संवेदनशील मन पाहीजे , ते कुठे मिळते हे सांगणे अवघड आहे !
शुभेच्छा
सुहास गोखले
😭 नाय वो नाय सुहासजी मी माझ्या अनुमानात फक्त ओघमपणे एवढेच सांगितले कि “गुरूचा हर्षलशी त्रिकोण योग होऊन गेलेला आहे त्यावरून मांजर अडचणीत आहे असे वाटते.”
आणि शेवटाच्या विश्लेषणामध्ये “वरील विश्लेषणावरून असे वाटते कि मांजर घरी येणार नाही.” असा उल्लेख आहे.
माझे विश्लेषण फारसे बरोबर येत नाही पण मी इतका निर्दयी नाही हो. 😳😱
तुमच्या मागच्या एका लेखामध्ये तुम्ही शॅरॉचा वापर केला होता कृपया त्याबद्दल तुमच्या सिद्धहस्त लेखणीने लिहावे त्यामुळे बरेच काही शिकण्यास मिळते. 🖋
तुमच्या पुढील लेखाच्या प्रतीक्षेत 🙏
श्री संतोषजी
आपण बरोबर आहात , मला तुमच्या आधी दुसर्या कोणीतरी ते मांजर मेले असावे असे अनुमान काढले आहे त्यामुळे माझा काहीसा गोंधळ झाला आणि ते मांजर मेल्याचे भाकित तुम्हीच केले आहे असा माझा गैरसमज झाला त्या बद्दल क्षमस्व.
‘शेरॉ’ च काय सुमारे बारा अस्ट्राईड्स , कॉमेट्स , किमान दहा एक फिक्स्ड स्टार्स , 78 मीड पॉईंट्स , 25-30 अरेबीक पार्ट्स ज्योतिषशास्त्रात असे बरेच घटक (फॅक्टर्स) आहेत ते आपल्याला अत्यंत प्रभावी पणे वापरता येतात पण मी आधी लिहले आहे त्या प्रमाणे हे सर्व घटक काहीसे सपोर्टींग टेस्टिमिनिज साठीच वापरले जातात/ जावे असे माझे अनुभवा अंती मत बनलेले आहे. जे आपल्या नेहमीच्या बारा ग्रह , बारा राशी, बारा भाव आणि पाच अस्पेक्ट्स यांच्या साह्याने दिसते / मिळते त्यावरच सर्व अवलंबून ठेवावे , हे जादाचे घटक काही नवा शोध लावत नाहीत , जे आधीच कळले आहे त्यात थोडीशी भर , थोडा अधिक खुलासा असे त्याचे स्वरुप असते.
म्हणून सुरवातीच्या काळात तरी या असल्या फॅन्सी घटकांच्या मागे लागू नये , तसे केल्यास ना घर का ना घाट का अशी अवस्था होऊन उगाच वैचारीक गोंधळ मात्र होतो तेव्हा काही वर्षांचा सराव झाला एक हजार एक प्रश्नकुंडल्या सोडवून आत्मविश्वास आला की मगच या नव्या घटकांच्या मागे लागावे असे मला वाटते मी ही असेच करत आलो आहे.
शुभेच्छा
सुहास गोखले