बाईंनी विचारलेला प्रश्न अगदी शब्दश: एका काना मात्रेचा फरक न करता इथे लिहितो:

“उद्या एका मेडिकल टेस्ट साठी डॉक्टरांच्या कडे जात आहे, त्याचे काय होईल?”

 

बाईंनी प्रश्न विचारला आणि मला तो समजला तो नेमका क्षण आणि ‘नाशिक शहर’ या स्थळाची एक कुंडली मी तयार केली ती सोबत छापली आहे.

दिनांक: ११ जुलै २०१९, वेळ: ०९:१०:४७ स्थळ: नाशिक शहर (19N59 , 73E48)

ही (प्रश्न) कुंडली, सायन भावचलित, रिजिनोमोनटॅनस हाऊस सिस्टीम आणि मीन नोड्स अशी आहे.

 

 

आता जरा विचारांची दिशा बदलली ! सध्या कोणता आजार, कसली टेस्ट हा भाग जरा बाजूला ठेवू,  बाई टेस्ट करून घेणार आहेत ना, मग असेल झाले काही तरी त्यांना ! बाईंचा प्रश्न  ‘टेस्ट कोणती ते ओळखा ?’ असा थोडाच आहे ? त्यांना जाणून घ्यायचे आहे त्या टेस्टच्या नतिजा बद्दल. तेव्हा आता आपल्या नेहमीच्या पद्धतीने पुन्हा एकदा या प्रश्नकुंडलीचा अभ्यास करायला हवा.

प्रथम आपण बाईंचे प्रतिनिधी ग्रह काय म्हणत आहेत त्याचा तरी अंदाज घेऊ, कदाचित त्यातून एखादा सुगावा लागू शकेल, कोणी सांगावे!

चंद्र हा जातकाचा / प्रश्नकर्त्याचा नैसर्गिक प्रतिनिधी असतो त्यामुळे या चंद्रा पासून सुरवात करू.

सामान्यत: चंद्राने तो सध्या ज्या राशीत आहे त्या राशीत प्रवेश केल्या पासून कोणकोणत्या ग्रहांशी कोण कोणते ग्रहयोग केले आहेत या वरून आपल्याला जातकाच्या आयुष्यात अगदी नजिकच्या काळात कोणते प्रसंग घडले असावेत याचा काहीसा अंदाज येतो आणि हा चंद्र त्याची सध्याची रास ओलांडे पर्यंत कोणत्या ग्रहाशी कोणते योग करणार आहे या वरून आपल्याला आगामी काळात जातकाच्या आयुष्यात काय काय घडू शकेल याचा काहीसा अंदाज येतो. सामान्यत: हे झालेले आणि होणारे ग्रहयोग जातकाने विचारलेल्या प्रश्ना संदर्भातच असतात असा अनुभव आहे, कारण प्रश्नकुंडली ही एका विषीष्ठ प्रश्नाचे उत्तर मिळवण्या साठीच तयार केलेली असते.

सदरच्या प्रश्नकुंडलीतल्या चंद्राने त्याच्या सध्याच्या वृश्चिक राशीत आल्या पासून केलेलं योग असे आहेत:

१) ४ सिंहे वरच्या बुधाशी झालेला केंद्र योग

२) ५ सिंहे वरच्या मंगळाशी झालेला केंद्र योग

३) ६ वृषभे वरच्या युरेनस झालेला प्रती योग

४) ९ कर्के वरच्या शुक्राशी झालेला नव पंचम योग योग

हे योग तपासताना योग करणार्‍या ग्रहाचे कारकत्व, राशी स्वामित्व आणि भावेशत्व यांची जातकाने विचारलेल्या प्रश्नाशी सांगड घालावी लागेल. तशी ती दिसत असेल तरच त्या योगाची दखल घ्यावी. काही वेळा एखादा ग्रहयोग जो प्रसंग / घटना सुचित करतो त्याचा जातकाने विचारलेल्या प्रश्नाशी कसलाही संबंध नसतो. प्रश्न विचारणार्‍या जातकाच्या आयुष्यात एकाच वेळी अनेक परस्पर संबंध नसणार्‍या घटना घडतच असतातया. या सगळ्यांची दखल घेणे अव्यवहार्य ठरेल. उदाहरणार्थ:  ‘लग्न कधी होणार’ हे विचारत असलेल्या जातकाने गेल्याच महिन्यात नवीन नोकरी स्वीकारल्याची घटना चंद्राचा झालेला एखादा योग दाखवेल देखील, पण त्या घटनेचा जातकाच्या ‘विवाह कधी’ या प्रश्नाशी प्रत्यक्ष संबंध नाही. या योगाच्या द्वारे, ‘चला चांगली नोकरी लागली आता लग्नाचे बघू’ असा विचार बळावला असा कयास करता येईल पण विवाह कधी या प्रश्नाच्या उत्तराला त्याचे कसलेच साहाय्य नाही.

आता चंद्राने केलेल हे योग जातकाच्या प्रश्नाशी सुसंगत आहेत का? म्हणजेच त्यांची दखल घ्यायची का हे तपासू.

शुक्र तृतीयेश आणि दशमेश आहे म्हणजे या अंगाने तसा आरोग्याशी काही संबंध पोहोचत नाही. इथे एक शंका माझ्या मानात डोकवून गेली. हा योग बघताच COSI (Combination Of Stellar Influences) मध्ये डॉ. इबर्टीन नी नोंदवलेले निरिक्षण माझ्या डोळ्यासमोर विजे सारखे चमकले. या निरिक्षणाचा आरोग्याशी निश्चित संबंध पोहोचतो पण सध्याच्या स्थितीत त्याचा नेमका काय कार्यकारण भाव आहे हे मला उमगले नाही. पण या ग्रहयोगाची नोंद जरूर घेतली.

मंगळ चतुर्थेश आणि नवमेश आहे म्हणजे त्याचा आरोग्याशी काही संबंध पोहोचत नाही

बुध द्वितियेश आहे याचा ही आरोग्याशी काही संबंध पोहोचत नाही.

नवम स्थानातल्या युरेनसचाही ही आरोग्याशी काही संबंध पोहोचत नाही असे जरी असले तरी इथेही या योगा बद्दल COSI (Combination Of Stellar Influences) मध्ये डॉ. इबर्टीन नी नोंदवलेले निरिक्षण माझ्या डोळ्यासमोर थयथयाट करून गेले. इथे मी जरा सावध झालो. आधीच्या चंद्र- शुक्र योगाच्या बाबतीतले निरिक्षण आणि आता या योगाच्या बाबतीतले निरिक्षण निश्चितच काहीतरी वेगळे सांगत आहे, अगदी ठोस पणे, निरिक्षणाचा आरोग्याशी निश्चित संबंध पोहोचतो हे नाकारता येतच नव्हते.  ‘कुछ तो गडबड है, दया, तोड दो दरवाजा’ असे म्हणावे वाटले पण तरीही पण सध्याच्या स्थितीत त्याचा नेमका काय आणि काय संबंध पोहोचतो हे मला उमगले नाही. पण या ही ग्रहयोगाची नोंद जरूर घेतली.

दोन खास ग्रहयोगांनी काही सुगावा दिला असला तरीही मला कोणताही ठोस असा तर्क करता आला नाही, म्हणजे या चंद्राने वृश्चिकेत दाखल झाल्या नंतर केलेल्या ग्रहयोगांच्या माध्यमातून आपल्याला काही धागेदोरे मिळत नाहीत.

आता चंद्राने त्याच्या सध्याच्या अंशात्मक स्थिती मधून, वृश्चिक रास ओलांडे पर्यंत केलेले योग तपासू:

१) १७ मकरे वरच्या शनी शी होणारा लाभ योग

२) २१ मकरे वरच्या प्लुटो शी होणारा लाभ योग

३) १८ मीने वरच्या नेपच्युन शी होणारा नव पंचम योग

(चंद्र १८ कर्के वरच्या रवीशी नवपंचम योग करणार आहे पण रवी आणि चंद्र दोघेही जातकाचेच प्रतिनिधी असल्याने तूर्तास या ग्रहयोगाचा विचार करण्याची आवश्यकता नाही)

या योगां पैकी शनी शी होणारा लाभ योग लक्षवेधी आहे. बाकीचे दोन योग ही नक्कीच महत्त्वाचे आहेत पण हे योग आगामी काळात घडणार्‍या घटनां बद्दल बोलतील त्यामुळे बाईंच्या प्रश्नाचे उत्तर काय असू शकेल याचा जरासा अंदाज आल्या नंतरच या योगांचा विचार करू.

आता बाईंचा मुख्य प्रतिनिधी जो ‘रवी’ त्याच्या कडे वळू.

रवी लाभ स्थानात (११) असून १८ कर्क ३५ अंशावर आहे.

हा रवी (बाई) अगदी नुकताच १७ कर्क २६ वरच्या राहू शी युती करून बाहेर आला आहे.

पाश्चात्त्य होरारीत तसे पाहिले तर राहू आणि केतू या छाया ग्रहांना फारसे स्थान दिलेले नाही पण जेव्हा एखादा ग्रह या राहू (केतू) शी अगदी अंशात्मक असा योग करतो तेव्हा त्या योगाचा विचार नक्की केला जातो. इथे रवी आणि राहू यांच्यात अगदी म्हणजे अगदी नजिकच्या काळात युती होऊन गेली आहे, दोघांत अवघे १ अंश ९ कलांचे अंतर आहे म्हणजेच हे दोघे ही अजून युतीच्या दीप्तांशातच आहेत  त्यामुळे या घडून गेलेल्या युती योगा कडे जरा लक्ष दिले पाहिजे.

पाश्चात्त्य होरारीत राहू ला काहीसा शुभ ग्रह मानले जाते आणि राहू जेव्हा एखाद्या ग्रहाच्या अंशात्मक युतीत असतो तेव्हा त्याला खास महत्त्व प्राप्त होते.

प्रश्नकुंडलीत (होरारी चार्ट) असा योग जेव्हा होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही नव्या, शुभसुचक अशा घटना घडण्याची शक्यता असते, जातकाने हाती घेतलेल्या कामात यश मिळायला सुरवात होते, जातकाचे समाजातले स्थान उंचावते. एकंदरच जातकाच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात अनेक चांगले शुभ संकेत दिसतात.

जर ही युती एक शुभवार्ता अशा अंगाने घेतली तर बाईच्या आयुष्यात अगदी नजिकच्या काळात काहीतरी शुभ असे घडले असण्याची शक्यता आहे.

कुंडलीत अजून एक आश्चर्य दडले होते! रवी – राहूची ही युती चालू असतानाचा अगदी त्याच वेळी रवी (बाई) आणि पंचमात १७ मकर ०६ अंशावर असलेला शनी (बाईंचे आरोग्य) प्रतियोगात आले होते! रवी शनीशी प्रतियोग करून फक्त १ अंश २९ कला पुढे सरकला आहे म्हणजेच हे दोघे ही अजून प्रतियोगाच्या दीप्तांशातच आहेत. बाई आणि आरोग्य यांच्यात प्रतियोग होणे म्हणजे आरोग्य विषयक समस्या, दुसरे काय? त्यात हा शनी वक्री असल्याने समस्या गंभीर पण असणार!

पण एक प्रश्न उत्पन्न होतो तो असा की एकाच वेळी झालेले दोन योग, एक योग शुभ घटनेचा कौल देतो आणि एक योग अशुभाची ग्वाही देतो, हे एकाच वेळी कसे शक्य आहे? म्हणजे बाईंच्या आयुष्यात एकाच वेळी एक अशुभ आणि एक शुभ अशा दोन वेगवेगळ्या घटनां घडल्या असतील का?

रवी गुरू च्या षडाष्टक (१५० अंश) योगातून अगदी नुकताच बाहेर पडला आहे, अर्थात १५० अंशाच्या योगाचे फारसे महत्त्व दिले जात नाही पण जेव्हा प्रश्नकुंडली अशी गुंतागुंतीची, गूढ , अनाकलनीय असते तेव्हा अगदी बारीक सारीक संकेतां कडे, घटकां कडे डोळ्यात तेल घालून पहावे लागते म्हणून या एरवी दुर्लक्षिल्या जाणार्‍या षडाष्टक योगाची ही दखल घेतली पाहीजे.

तसा रवी शुक्राच्या युतीतून ही बाहेर पडला आहे, पण शुक्राचा आणि बाईंच्या आरोग्याचा तसा संबंध जोडता येत नाही.

हे बघत असतानाच आणखी एका जबरदस्त योगाने माझे लक्ष वेधून घेतले! १८ कर्क ३५ वरचा रवी हा १८ मीन ३७ वरच्या नेपच्युन च्या नवपंचमात येणार आहे! या दोघांत अवधे २ कलांचे अंतर आहे म्हणजे अगदी अगदी अगदी नजिकच्या काळात या दोघांतला हा नव पंचम योग तांत्रिकदृष्ट्या पूर्णत्वास जाईल पण दीप्तांशाचा विचार करता, व्यावहारिक पातळीवर हा योग सध्या चालूच आहे असे मानता येईल.

आता या योगाचा काय अन्वयार्थ लावायचा?

सामन्यत: रवी नेपच्युन प्रतियोग व्यक्तीची मानसिक स्थिती मोठी हळवी बनवतो, या योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या भावभावना जरा जास्तच नाजूक आणि अती संवेदनाशील बनतात. विश्वासघात , फसवणूक, अपेक्षाभंग या सारखे मानसिक पातळीवर आघात करणारे प्रसंग घडू शकतात. खोल वर जाऊन रूतणार्‍या, दीर्घ काळ टिकणार्‍या मानसिक व्यथा, काळजी , दु:ख असे काही या योगाच्या प्रभावा मुळे होण्याची / घडण्याची शक्यता असते.

या योगाचा बाईंच्या उद्या होणार्‍या टेस्ट शी काही संबंध जरूर जोडता येतो, टेस्ट मध्ये काय निघेल याचे दडपण बाईंवर आहे हे दिसतेच आहे पण हा योग आणखी सांगत असेल की बहुदा ही टेस्ट अशुभ निघेल आणि त्याचा सदमा बाईंना पोहोचेल, बाईंवर मोठा मानसिक आघात होईल !

चला म्हणजे काहीतरी सुगावा लागला म्हणायचा!

पण अजूनही या आधी बघितलेल्या  रवी – राहू आणि रवी – शनी योगांचा बाईंच्या आजारपणाशी म्हणा किंवा उद्या होणार्‍या वैद्यकीय चाचणीशी कसा संबंध जोडायचा हा प्रश्न शिल्लक राहतोच आहे!

मुळात बाईंना आजार झाला आहे का? असल्यास कोणता? याचाच अंदाज लागत नव्हता. ग्रहांच्या राशीगत, स्थानगत स्थिती वरून बांधलेले आरोग्य विषयक समस्येचे अंदाज आणि बाईंची प्रत्यक्षातली स्थिती यात काहीच मेळ बसत नाही हे आपण पाहिलेच आहे. जसा जसा विचार करत गेलो तसे तसे मला जाणवू लागले की इथेही मला एका ‘डेड एंड’ चा सामना करावा लागतोय.

इतक्यात एखादा विजेचा लोळ अंगावर पडावा तसे झाले!

इतका वेळ मी पत्रिका बघत होतो तरीही एक बाब माझ्या नजरेतून सुटली होती, कशी काय नजरेतून निसटली कोण जाणे पण बाईंचा आजार, तपासणी या सगळ्या संभ्रमात एका मुद्द्याकडे माझे साफ दुर्लक्षच झाले होते! आणि तो मुद्दा म्हणजे शनी जसा षष्ठेश आहे तसा पंचमेश पण आहे! कारण शनीची मकर रास पंचमावर आहे! याचा अर्थ शनी जसा षष्ठेश म्हणून बाईंच्या आरोग्याचा प्रतिनिधी आहे तसाच तो पंचमेश म्हणून बाईंच्या अपत्याचा प्रतिनिधी पण आहे!

‘आरोग्य’ हा मुद्दा घेऊन आपण काही धागेदोरे मिळतात का हे आपण पाहिले पण काहीच अनुमान काढता आलेले नाही, तेव्हा आता ‘संतती’ हा मुद्दा घेऊन काही सुगावा लागतो का ते पाहावे लागेल.

प्रश्न बाईंच्या अपत्या बाबतीत देखील असू शकतो कारण पंचमेश शनी (अपत्य) आणि रवी (बाई) यांच्यातला प्रतियोग आणि रवी-राहू युती ज्या घटने बद्दल सुचवत आहे ती घटना बाईंच्या अपत्या संदर्भातली देखिल असू शकेल!

आता संततीचा विषय निघालाच म्हणून संततीचा नैसर्गिक कारक गुरू कडे बघितले. गुरू चतुर्थ (४) स्थानात , १५ धनू ५८ अंशावर वक्री अवस्थेत आहे. गुरू ची धनू रास चतुर्थातच लुप्त आहे!

संततीचा कारक गुरु आणि रवी (बाई) यांच्यात १५० अंशाचा ‘इनकनजंक्ट’ म्हणजेच षडाष्टक योग अगदी नुकताच होऊन गेला आहे हे आपण बघितलेच होते. जर ‘संतती’ हा मुद्दा उपस्थित होणार असेल तर या योगा कडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

हे सगळे पाहता मला असे प्रकषाने वाटायला लागले की बाईंचा खरा प्रश्न कदाचित त्यांच्या अपत्या बद्दलचा तर नसेल ना?

पण बाईंनी तर विचारले आहे: “उद्या एका मेडिकल टेस्ट साठी डॉक्टरांच्या कडे जात आहे, त्याचे काय होईल?”, म्हणजे बाईं आपल्या अपत्याच्या आरोग्याच्या बाबतीत किंवा एकंदरच अपत्या बद्दल काहीच बोलल्या नाहीत म्हणजेच टेस्ट कोणासाठी असा कोणताही उल्लेख त्यांच्या बोलण्यात नव्हता. बाई काहीतरी लपवत आहेत असा संशय आपल्याला आला होता कदाचित ही ‘टेस्ट त्यांच्या अपत्या बद्दल आहे’ हाच मुद्दा त्यांनी लपवला तर नसेल?

पण आता नवा प्रश्न उपस्थित होतो तो असा की जर प्रश्न त्यांच्या अपत्याच्या आजारा संबंधातला किंवा त्या कारणाने केल्या जाणार्‍या एखाद्या  टेस्ट संदर्भातला असेल तर तसे स्पष्ट सांगता आले असते ना? लपवावे का लागले?

इकडे दिसते आहे की प्रश्न तर बाईंच्या आरोग्याचा, बाईंच्या वैद्यकीय तपासणी बाबतचा आणि तरीही ग्रहमान बाईंच्या आरोग्या बद्दल काही ठोस सुगावा देत नाही उलटपक्षी रवी–शनी, रवी-राहू, रवी–गुरू इ. योगांच्या माध्यमातून बाईंच्या अपत्या कडे बोट दाखवते आहे, हे काय गौडबंगाल आहे?

त्या क्षणी पुन्हा एकदा वीज चमकली म्हणा ना!

कदाचित असे तर नसेल ना की बाईंना सध्या अपत्य नसावे आणि त्या अपत्यप्राप्ती साठी प्रयत्न करत असाव्यात आणि ही तपासणी त्या संदर्भातच असावी!

बाप रे! असे असू शकेल?

असेलही, का नाही? जर ‘अपत्य प्राप्ती’ असा रोख ठेवला त्याचा संबंध एकाच वेळी ‘बाईंचे आरोग्य’ , ‘संतती’ आणि ‘तपासणी – टेस्ट’ यांच्याशी सहज जोडला जाऊ शकतो ना?

आणि आता आपण आधी तपासलेल्या चंद्र – शुक्र आणि चंद्र – युरेनस योगांचा अर्थ स्पष्ट झाला! या योगां बद्दल COSI (Combination Of Stellar Influences) मध्ये डॉ. इबर्टीन नी नोंदवलेली निरिक्षणे काय आहेत हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरेल.

 

चंद्र- शुक्र: Glandular secretions (hormones, ferments in the stage of generation), menstruation. The female capacity of conception!

चंद्र – युरेनस: emotional tensions, Sudden manifestation of subconscious forces, Sacrifices for the attainment of special aims, help and assistance through friends attainment of sudden success, accomplishment of a change in one’s circumstances!

 

याचा अर्थ एकच…

गर्भधारणा झाली आहे का?  हे जाणून घेण्यासाठी ही उद्याची तपासणी असूही शकते.
चला गुंता सुटला एकदाचा असे मला हायसे वाटले, पण हे समाधान क्षणभरच टिकले!

दुसर्‍या क्षणी परत शंका यायला सुरवात झाली.

कारण आजकाल ‘गर्भ राहिला आहे का नाही’  हे तपासायची अगदी सोपी सुलभ आणि खात्रीची ‘प्रेगा न्यूज’ सारखे टेस्ट किटस कोपर्‍या वरच्या औषधाचा दुकानात अगदी सहजपणे अवघ्या ५० रुपयात उपलब्ध आहेत, असे किट वापरून घरच्या घरी अशी तपासणी करता येते आणि ती  बर्‍यापैकी अचूक असते. आणि समजा जरी एखाद्या गायनॅकॉलॉजीस्टला भेटून पक्की खात्री करून घ्यायचे म्हणले तरी ती ही तपासणी अगदी साधी असते, निदान एखाद्या ज्योतिषाला प्रश्न विचारावा लागेल असे गंभीर त्यात काहीच नाही. त्यातही बाईंचे अंदाजे वय विचारात घेता ही काही त्यांची पहिलीच वेळ नसणार, अशा चाचण्यांची त्यांना माहिती असणार, त्या किती सोप्या, रुटीन चाचण्या असतात हे पण त्यांना माहिती असणार, यात ज्योतिषाला विचारावे अशी काळजी करण्याची परिस्थिती नक्कीच नसते इतपत अंदाज त्यांना नक्कीच असणार !

पण तरीही टेस्ट बद्दल प्रश्न का विचारला असावा?

क्रमश: 

शुभं भवतु 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+3

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
  1. Avinash

    सुहासजी नमस्कार
    मला ज्यातिषामधले ओ की ठो कळत नाही. परंतु आपण लिहिलेला प्रत्येक लेख(वेगवेगळ्या विषयांवरचेही) मी अतिशय उत्सुकतेने वाचतो. सगळे लेख मला आवडतात. ज्योतीषावरचे एकेक पदर उलगडत जाणारे विशेषकरून.मागे रेल्वेत भेटलेल्या माणसाशी गूढ असे संवाद असलेला एकच लेख मला वाचायला मिळाला.त्याची पण उत्कंठा आहे. अभिनंदन! असेच लिहीत रहा. धन्यवाद!

    0

Leave a Reply to Avinash Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.