बाईंनी विचारलेला प्रश्न अगदी शब्दश: एका काना मात्रेचा फरक न करता इथे लिहितो:

“उद्या एका मेडिकल टेस्ट साठी डॉक्टरांच्या कडे जात आहे, त्याचे काय होईल?”

 

बाईंनी प्रश्न विचारला आणि मला तो समजला तो नेमका क्षण आणि ‘नाशिक शहर’ या स्थळाची एक कुंडली मी तयार केली ती सोबत छापली आहे.

दिनांक: ११ जुलै २०१९, वेळ: ०९:१०:४७ स्थळ: नाशिक शहर (19N59 , 73E48)

ही (प्रश्न) कुंडली, सायन भावचलित, रिजिनोमोनटॅनस हाऊस सिस्टीम आणि मीन नोड्स अशी आहे.

 

 

बाईंनी हा असाच प्रश्न का विचारला असावा?

प्रश्नकुंंडली सोडवताना पहिल्यांदा त्या प्रश्नाच्या बाबतीतच  ‘का?’, ‘केव्हा?’, ‘कसे?’, ‘असेच का?’, ‘आत्ताच का?’, ‘कोणत्या परिस्थितीत?’ अशा बाजूने विचार करायचा त्यातूनच आपल्याला जातकाने विचारलेल्या प्रश्नाचा रोख कळतो, प्रश्न विचारण्या मागची पार्श्वभूमी कळते, प्रश्न विचारण्या मागे कोणते ठोस कारण (ज्याला इंग्रजीत ‘Compelling reason कंपेलिंग रिझन’ म्हणतात) आहे का याचा शोध घ्या, ते असलेच पाहिजे कारण काहीतरी ठोस कारण असल्या शिवाय का जातक स्वत:चा वेळ, पैसा खर्च करेल? जर असे कोणतेही ठोस कारण नसेल तर जातकाने केवळ एक उत्सुकता , टाईमपास , चेष्टा , ‘गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली’ या थाटात प्रश्न विचारलेला असतो, त्यात गांभिर्य नसते. अशा “दिसला ज्योतिष टाक खडा , मार एक टप्पल” पद्धतीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कधी ही देऊ नयेत एक तर ती हमखास चुकतात आणि त्यात तुमची आणि पर्यायाने ज्योतिषशास्त्राची  नाहक बदनामी होते!

या साठीच फुकट ज्योतिष चुकून सुद्धा सांगू नका, अगदी तुमच्या मित्रांकडून , नातेवाईंकां कडून देखील पैसे घ्याच! कारण फुकट ज्योतिष सांगायला लागलात की काहीही ठोस कारण नसलेले, कसलेही गांभीर्य नसलेले, दिसला ज्योतिषी की विचार प्रश्न असे करणारे, उगाच खडे मारून पाहणारे, ज्योतिषाची परीक्षा घेणारे, टिंगलटवाळी करणारे, फुकटचा टाईम पास करणारेच समोर येतात.

एकदा का प्रश्ना बाबतचा असा खुलासा झाला की ती प्रश्नकुंडली कशी सोडवायची म्हणजेच प्रश्न कोणत्या अंगाने पहावयाचा हे ठरवावे लागते. ही पायरी अत्यंत महत्त्वाची असते इथे घाई गडबड केली तर पुढचे सगळेच चुकत जाते.

असो.

आपण प्रथम बाईंनी विचारलेल्या प्रश्नावरच जास्त विचार करू, प्रश्न समजावून घेऊ, काही वेळा या टप्प्यावर जातकाला अनेक प्रश्न विचारावे लागतात अगदी पोलिसी चौकशी केल्याच्या थाटात पण त्याला नाईलाज असतो. जातक सगळी माहिती एकदम चांगत नाही,  बर्‍याच वेळा मूळ प्रश्नच मोठ्या आडवळणाने विचारलेला असतो, मनात एक असते पण प्रश्न भलताच विचारलेला असतो. सगळ्यांनाच आपल्या मनातले विचार सुस्पष्ट आणि मुद्देसूद रित्या समोर मांडता येत नाही त्यामुळे जातकाला बोलते करून माहिती घेत त्या प्रश्नावर सर्व बाजूंनी विचार करत प्रश्न कोणत्या मार्गाने सोडवायचा याची रणनीती (Strategy!) ठरवावी लागते आणि त्या नंतरच प्रश्नकुंडली कडे वळावे लागते.

आता हे बाळबोध आहे की टेस्ट होईल का? असे काही बाईंना विचारायचे नसेल. उद्या नाही झाली टेस्ट तर परवा होईल, तेरवा होईल पण त्या साठी का कोणी ज्योतिषाला विचारत बसेल? शक्यच नाही.

याचा सरळ अर्थ असा आहे की उद्याच्या टेस्ट मध्ये काहीतरी अशुभ निघेल ह्या भितीने बाई धास्तावल्या असतील आणि त्या काळजी पोटी हा प्रश्न विचारला असेल.

बाईं मेडिकल टेस्ट म्हणाल्या म्हणजे त्यांना नक्की कोणत्या तरी आरोग्य विषयक समस्या असतील किंवा एखादा आजार झाला आहे का याची खातरजमा करण्याचा हेतू असेल आणि ही टेस्ट देखील बाई बहुदा आपल्या डॉक्टरांच्या सूचने वरून करून घेणार असतील.

कोणता आजार / कोणती शंका / टेस्ट कोणती, कशासाठी ही माहिती मिळणे खरे तर आवश्यक होते पण बाईंनी आधीच ज्या तर्‍हेने दटावले होते त्यावरून ह्या बाबतीत त्या काही बोलतील असे मला वाटले नाही, म्हणून मी ही ते विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही.

आता हा प्रश्न सोडवायचा कसा?

उद्याच्या टेस्ट मधून काही अप्रिय असा निष्कर्ष निघू नये असेच बाईंना मनापासून वाटत असणार. तेव्हा ही इच्छा पूर्ती होईल का अशा अंगाने हा प्रश्न सोडवावा असा विचार माझ्या मनात आला. पण याचे ‘हो/नाही’ अशा स्वरूपाचे ‘ब्लॅक अँड व्हाईट’ उत्तर मिळाले असते,  हे फारच मुळमुळीत होईल! एवी तेवी आव्हान स्वीकारलेच आहे तर जरा जास्त खोलात जाऊन सविस्तर, खुलासेवार असेच काही सांगायला लागेल, तरच आव्हान स्वीकारण्यातली मजा!

दुसरा विचार असा आला की  टेस्ट चा रिपोर्ट म्हणजे महत्त्वाचे कागदपत्र अशा अंगाने हा प्रश्न बघता येईल का? पण तो विचार लगेच बाजूला सारला कारण इथे टेस्ट रिपोर्ट (कागदपत्र) कधी मिळणार हा प्रश्नच नव्हता, रिपोर्ट कधी मिळणार ह्या पेक्षा त्या रिपोर्ट मध्ये काय असेल आणि त्याचा जातकावर कोणता परिणाम होणार, हे खरे महत्त्वाचे. त्यामुळे ह्या मार्गाने जाऊन काहीच हाताला लागणार नाही.

तिसरा विचार आला. बाई उद्या एका मेडिकल टेस्ट साठी जाणार आहेत ही टेस्ट म्हणजे एक प्रकाराची परीक्षा आहे समजून त्या परीक्षेत बाई उत्तीर्ण होतील का? परीक्षेत यश मिळेल का? अशा ही अंगाने ही पत्रिका अभ्यासता येईल.  पण ही टेस्ट नेमकी काय आहे हे माहिती नाही, टेस्ट उत्तीर्ण होणे (पास होणे) नेमके कशाला समजावे जे पण ठरवता येत नाही त्यामुळे ह्या मार्गाने जाऊन काही उपयोग होणार नाही आणि जरी असा प्रयत्न केलाच तरी इथे ही ‘हो/नाही’ अशाच स्वरूपाचे म्हणजेच ‘ब्लॅक अँड व्हाईट’ उत्तर मिळाले असते, हे पण मुळमुळीत होईल!

मग आणखी एक विचार असा आला की बाईंना ‘आपल्याला एखादा आजार झाला आहे आहे’ अशी शंका आहे, ही शंकाच एक ‘बातमी / अफवा’ असे मानून ती खरी ठरेल का खोटी अशा अंगानेही या प्रश्नाची उकल करता येईल. पण ह्या मार्गाने गेल्यास ‘एखादा आजार झाला अशी जी शंका / अफवा आहे ती खरी / खोटी’ ठरेल म्हणजेच ‘मेडिकल टेस्ट चा रिपोर्ट अनुकूल किंवा प्रतिकूल येईल’ अशा पद्धतीचे ‘हो/नाही’ स्वरूपाचेच उत्तर हाताला लागेल. या खेरीज जास्त माहिती मिळणार नाही. हा तर्क चालू ही शकेल आणि या मार्गाने उत्तर मिळवणे पण तुलनात्मक रित्या  सोपे जाईल पण  मुळात ‘आजाराची शंका’ आहे की ’आजार झालेलाच आहे’ हा खुलासा झालेला नाही! शिवाय बाईंनी ज्या ढंगात प्रश्न विचारला होता त्यावरून त्यांना जास्त माहिती हवी होती हे तर कळत होतेच शिवाय माझी परीक्षा घेण्याचा हेतू पण दिसत होता तेव्हा त्यांचे समाधान करायला मला ‘हो/नाही’  या उत्तरा पेक्षा ही जास्त सविस्तर आणि वर्णनात्मक असे काही सांगता आले पाहिजे, तरच पप्पू पास होईल!

शेवटी विचार केला बाईंना आरोग्य विषयक काही समस्या असतील किंवा काही आजार झाला आहे का नाही याची खातरजमा करण्याच्या हेतूने त्या टेस्ट करवून घेणार आहेत. आजारपण किंवा आजाराची शंका काहीही असो इथून तिथून ‘आजार’ हाच मुद्दा आहे, त्यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. म्हणूनच ‘आजारपण’ या अंगाने या पत्रिकेचा अभ्यास करायचे ठरवले.

बाईंनी विचारलेल्या प्रश्ना साठी तयार केलेली प्रश्नकुंडली आता आपण या अंगानेच अभ्यासू.

पत्रिकेत जन्मलग्न २९ सिंह ५४ वर आहे म्हणजे सिंह लग्नाची पत्रिका आहे.

प्रश्न कुंडलीत जेव्हा सिंह लग्न येते तेव्हा प्रश्न विचारणारी व्यक्ती सिंह राशीच्या वर्णनाशी मिळती जुळती असते किंवा त्याचे प्रश्न ही सिंह राशीच्या कारकत्वा मध्ये मोडणारे असतात असा अनुभव काही वेळ येतो. मात्र असा अनुभव दर वेळेला येतोच किंवा यायलाच पाहिजे असे अजिबात नाही हे लक्षात ठेवा. म्हणजेच पत्रिकेतले लग्न आणि जातक यांच्यात काही साधर्म्य दिसले तर उत्तमच पण असे साधर्म्य असलेच पाहिजे असा काही नियम नाही.

कदाचित असे साधर्म्य दिसणे हे प्रश्न अगदी नेमक्या वेळेला विचारल्याची एक खूण असू शकते. पण लग्न आणि जातक यांचे वर्णन जुळले नाही म्हणजे प्रश्नाची वेळ चुकली असा अर्थ लगेच काढू नये. प्रश्न नेमक्या वेळेला विचारला गेला असल्याच्या इतरही अनेक खुणा असतात हे पण लक्षात ठेवा.

इथे बाईंचे व्यक्तिमत्व, श्रीमंती (बी एम ड्ब्लू कार!), त्यांचे आणि त्यांच्या नवर्‍याचे समाजातले स्थान पाहता सिंह लग्न अगदी समर्पक वाटले इतकेच.

इथे एक नकारार्थी सुर लागला आहे तो म्हणजे हे जन्मलग्न, २९  सिंह ५४ असे सिंहेच्या अगदी शेवटच्या अंशावर आहे, म्हणजेच हा अगदीच ‘लेट लेट लेट असेंडंट’ आहे! सामान्यत: पत्रिकेत जेव्हा लेट असेंडंट (राशीचे शेवटचे तीन अंश म्हणजे २७ :००ते २९:५९) असतो तेव्हा विचारलेल्या प्रश्नाच्या बाबतची परिस्थिती हाता बाहेर गेलेली असते, विचारलेल्या प्रश्ना संदर्भात करण्या सारखे जातकाच्या हातात काहीही राहिलेले नसते, जे जे होईल ते केवळ बघत राहणे इतकेच काय ते जातक करू शकेल. अर्थात हे विधान शब्दश: नियम म्हणून वापरायचे नाही, तारतम्य वापरायचेच, कदाचित जातक असहाय परिस्थितीत आहे असाही त्याचा अर्थ निघू शकतो.

पत्रिकेत शनी पंचमात (५) असल्याने शनी लग्नात (१) किंवा सप्तमात (७) असताना जे नकारार्थी संकेत विचारात घ्यावे लागतात ते लागणार नाहीत.

आता  चंद्र ‘व्हाईड ऑफ कोर्स’ आहे का हे तपासायचे. चंद्र तृतीय (३) स्थानात, वृश्चिकेत १० अंशावर आहे. ही वृश्चिक रास ओलांडे पर्यंत चंद्र शनी आणि रवी बरोबर योग करणार असल्याने चंद्र ‘व्हाईड ऑफ कोर्स’ नाही.

आता या खेळात कोण कोण खिलाडी आहेत ते बघू .

या खेळात दोन महत्त्वाचे खेळाडू आहेत,

१) बाई

२) बाईंचे आरोग्य

‘टेस्ट’ हा देखील एक खेळाडू होऊ शकेल का? कदाचित! पण सध्या या टेस्ट कडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही आपला सारा रोख बाईंचे आरोग्याच्या समस्या (टेस्ट त्यासाठीच तर केली जाणार आहे) असाच असल्याने टेस्ट ला या खेळात सामील करायची आत्ता लगेच तरी आवश्यकता दिसत नाही.

म्हणून बाई आणि त्यांचे आरोग्य याहून जास्त घटक बहुदा विचारात घ्यावे लागणार नाहीत.

आता हे खेळाडू कोण आहेत, असे आहेत, काय करत आहेत हे तपासू.

बाई:

सिंह लग्न असल्याने लग्नेश रवी बाईंचे प्रतिनिधित्व करेल, चंद्र अर्थातच जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी असतोच. लग्नात कोणताही ग्रह नसल्याने रवी आणि चंद्र हे दोघेच बाईंचे प्रतिनिधित्व करतील.

रवी लाभ (११) स्थानात, १८ कर्क ३५ अंशावर आहे, तर चंद्र तृतीय  (३)  स्थानात, १० वृश्चिक २० अंशावर आहे.

बाईंचे आरोग्य:

‘आरोग्य’ विषयक कोणताही विचार करताना आपल्याला षष्ठम (६) स्थान तपासावे लागते.

इथे षष्ठम स्थानावर शनी ची कुंभ रास आहे, षष्ठात कोणताही ग्रह नसल्याने एकटा षष्ठेश शनी बाईंच्या आरोग्याचे प्रतिनिधित्व करेल म्हणजेच बाईंच्या आजारा बद्दल सांगेल. १७ मकर ०६ वरचा शनी वक्री अवस्थेत पंचम (५) स्थानात आहे.

आता हे प्रतिनिधी काय काय खेळ खेळत आहेत ते पाहायचे

आजाराचा प्रतिनिधी शनी असणे आणि त्यात तो वक्री असणे हे मला जरा चिंतेचे वाटले.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा प्रतिनिधी (सिग्निफिकेटर) वक्री असतो तेव्हा जातकाने विचारलेल्या प्रश्ना संदर्भातली काही तरी माहिती, एखादा महत्त्वाचा मुद्दा जाणीवपूर्वक लपवून ठेवलेला असतो किंवा जातकाने दिलेल्या माहितीत काहीतरी खोटे, दिशाभूल करणारे असे काही असते.

इथे आरोग्याचा प्रतिनिधी वक्री असल्याने बाईंनी आजारा संदर्भात असेच काही महत्त्वाचे लपवून ठेवले आहे, म्हणजे टेस्ट नेमकी काय आहे, कशा साठी केली जात आहे हा बद्दल बाई काहीही बोलायला तयार नाहीत, आरोग्याचा प्रतिनिधी शनीचे वक्री असणे हीच बाब अधोरेखीत करत आहे. प्रश्न नेमक्या वेळेला विचारला गेला आहे, पत्रिका ‘रॅडिकल’ आहे याचा हा एक पुरावाच म्हणता येईल.

बाईंच्या आरोग्याचा प्रतिनिधी शनी वक्री स्थितीत, पंचमात वक्री प्लुटो आणि केतू  बरोबर आहे. आरोग्या बाबतीतला प्रश्न आणि शनी आणि केतू  व प्लुटो सारखे ग्रह एकत्र असणे हा काही निव्वळ योगायोग नक्कीच नाही, यात बरेच काही दडलयं!

शनी हा जुनाट, असाध्य, चिवट, दीर्घकाळ चालणारी दुखणीं दाखवतो, शनीच्या आजारात प्रामुख्याने दात, हाडे,  हाडांचे सांधे, गुढगे, पाय यांचा समावेश होतो. त्यात शनी वक्री असला तर आजाराची तीव्रता जास्त असू शकते.

The organs of the human body governed by Saturn are feet, wind, acids, knees, marrow and secretive system. The anatomical structures governed by Saturn are spleen, upper stomach, endocardium, ribs, bones, hair, nails, cold and catarrh. The diseases related to Saturn are incidental to exposure, rheumatism, consumption, bronchitis, asthma, gout, constipation and bright disease. Troubles in leg, injury, amputations, arthritis, bones & joints issues, cancer, madness, depression and mental trauma, hallucination, tumors, constipation, lymphatic system issues, excretory system issues, piles, fistula, paralysis, lameness, stroke, blockages, fall from height, venereal diseases, dental issues, gout, baldness, polio etc.

पत्रिकेतले आरोग्य विषयक महत्त्वाचे स्थान म्हणजे षष्ठम स्थान, इथे कुंभ रास आहे, कुंभ राशीचा संबंध पायाचे घोटे, पोटर्‍या, गुढग्या पासून ते घोट्या पर्यंतचा संपूर्ण पायाचा भाग यांच्याशी येतो,

शनी मकरेत आहे. मकर राशीचा संबंध  गुढगे, हाडांचे सांधे, एकंदरच शरीराचा हाडांचा सापळा (skeletal system) यांच्याशीच येतो.

मी विचार करू लागलो, बाईंना नक्की काय झाले असेल? असा कोणता आजार झाला असावा / आजाराची शक्यता असावी, ज्याच्या साठी उद्या वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे? खरे तर अशा परिस्थितीत जातकाची जन्मपत्रिका अभ्यासणे आवश्यक असते पण इथे ते शक्य नव्हते.

‘दाताचे दुखणे’ म्हणावे तर तसे काही दिसत नव्हते. बोलताना बाई एकदा हसल्या होत्या तेव्हा त्यांचे सगळे दात दिसले होते, दातांत काही समस्या दिसली नाही. बाईंचे वय पाहता दातांच्या कवळीची शक्यता वाटत नाही, ‘रुट कनाल’ वगैरे असू शकेल पण हा उपचार आजकाल इतका सामान्य झाला आहे की त्या साठी कोणतीही खास वैद्यकीय चाचणी करावी लागत नाही आणि करावी लागली तरी ही ती फारशी गंभीर नसणार एखादा एक्स रे, ब्लड ग्लुकोज टेस्ट असलेच काही तरी साधे आणि सोपे असेल, निदान ज्या साठी ज्योतिषाला प्रश्न विचारावेसे वाटेल अशी गंभीर वा स्पेशल टेस्ट नक्कीच नसणार.

दात नाहीत तर मग काय असू शकते? हाडांची दुखणीं, हाडांच्या सांध्यांची दुखणी वगैरे. पण तशी शक्यताही वाटत नव्हती कारण बाई अगदी छान, व्यवस्थित पावले टाकत, अगदी सहज, नैसर्गिक, स्मूथ हालचाली करत आत आल्या होत्या, त्यांच्या चेहेर्‍या वरून, हालचालीं वरून, देहबोली वरून कोठेही असे हाडांचे, सांध्याचे दुखणे असल्याची सुतराम शक्यता दिसत नव्हती. सामान्यत: अशी दुखणीं असलेल्या व्यक्तींचे चालणे, हालचाली ह्या अवघडलेल्या, वेदनादायी आणि संथ असतात, प्रत्येक हालचाली मागे होणार्‍या वेदनेची झाक त्यांच्या चेहेर्‍यावर दिसत असते. मुळात या प्रकाराचा गंभीर आजार असलेली व्यक्ती फारशी हिंडत फिरत सुद्धा नाही आणि हिंडली फिरली तरी कोणते तरी ‘वॉकर’ सारखी उपकरण वापरेल, बाई तर स्वत: गाडी चालवत आल्या होत्या! कदाचित बाईंच्या अशा काही व्याधी / आजाराच्या सौम्य तक्रारी असू शकतील, त्या साठी काही टेस्ट्स कराव्या लागणार असतील, कदाचित एम आर आय करायला सांगितला असेल पण आजकाल या अशा टेस्टस पण सामान्य झाल्या आहेत यात गुप्तता बाळगण्या सारखे काही नाही आणि खास वेळ काढून, वाकडी वाट करून ज्योतिषाला विचारावेसे वाटावे इतक्याही त्या गंभीर नसतात.

इथे मी थोडासा बुचकळ्यात पडलो. मी काही डॉक्टर नाही, आजारपण आणि औषधोपचार या विषयीचे माझे ज्ञान तसे यथातथाच! कदाचित हाडांच्या कॅन्सर, नॉन कॅन्सरस बोन ट्युमर किंवा अन्य विचित्र, असाध्य आणि कमी आढळणारा असा आजार बाईंना झाला असावा किंवा झाला असल्याची शंका असेल, असे होऊ शकते ना! माझ्या माहितीत एक निष्णात अस्थिरोगतज्ञ डॉक्टर आहेत त्यांना फोन करून विचारले असते तर काही खुलासा झाला असता पण बाई समोर बसलेल्या असताना असे करणे मला प्रशस्त वाटले नाही.

समजा बाईंना हाडांचा, सांध्यांचा असा स्पेशल कोणता तरी आजार असेल किंवा आजार झाल्याची शंका असेल असे जरी मानले तरी एक प्रश्न उरतोच ना! बाईंनी टेस्ट बद्दल म्हणजेच पर्यायाने आजारा बद्दल काही बोलण्यास नकार का दिला? हाडांच्या, सांध्यांच्या आजारां मध्ये असे लपवून ठेवण्या सारखे, लाज वाटण्या सारखे काय असते?

एक अभद्र विचार मनात आला. षष्ठावर कुंभ रास, षष्ठेश शनी मकरेत म्हणजे ‘पाय’, षष्ठेश शनी (हाडे), पंचमात आहे म्हणजे षष्ठम स्थानाच्या व्ययात, शनी वक्री आहे, वक्री प्लुटोच्या राश्यात्मक युतीत आहे, सोबत केतू पण आहे! शनीच्या कारकत्वात ‘अ‍ॅम्प्युटेशन’ पण आहे, त्यामुळे या सार्‍याचा अर्थ ‘अ‍ॅम्प्युटेशन – पाय कापणे’ असा होऊ शकतो का? अरे हे काहीच्या काही आहे, बाईंचा पाय कशाला कापतील? मधुमेहाच्या काही रुग्णांच्या बाबतीत पाय कापावा लागतो हे खरे पण तेव्हा त्या पायाला बरीच जुनी, चिघळलेली , गॅगरीन झालेली जखम असते, पाय कापणे हा शेवटचा, निर्वाणीचा उपाय असतो, पण बाईंच्या बाबतीत असे काही असणे शक्यच नाही. बाईंच्या पायांना जखम, बँडेज वगैरे काहीही दिसत नव्हते. दोन्ही पाय एकदम ठणठणीत वर पायात सुंदर नाजूक डिझाईनर हाय हिल्स!

काहीच सुचत नव्हते, बाईंनी कोणती टेस्ट, कशा साठी हे सांगायला हवे होते. ही आवश्यक माहिती उपलब्ध नसल्याने मी आता एका ‘डेड एंड’ समोर होतो!

‘कोणती टेस्ट, कशा साठी हे सांगा’ तरच या प्रश्नावर काम करता येईल असे ठणकावून सांगून मोकळे व्हावे असा एक विचार मनात आला देखील पण मग बाईंनी ‘“इथेच तर तुमचे स्किल आहे असे मी समजते” असे जे आव्हान दिले आहे त्याचे काय?

नाही, अशी माघार घ्यायची नाही, बचेंगे तो और भी लढेंगे!

क्रमश: 

शुभं भवतु 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. प्रसाद

  पुन्हा सुस्पेन्स ठेवल…!! please पुढचा भाग लगेच पोस्ट करा सर.
  तुमचे लेख अतिशय सुंदर असतात , मी जवळजवळ सर्व लेख वाचले आहेत ! तुमच्या ब्लॉग चे व्यसन लागून राहिले म्हणा कि हो !असा एकही दिवस जात नसावा कि तुमच्या ब्लॉग ला भेट दिली नाही. धन्यवाद !

  0
 2. Yogesh Daithankar

  सरजी त्या बाईंपेक्षा जास्त सस्पेन्स तुम्ही निर्माण केलाय जनु

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री योगेशजी

   शाळेत असल्या पासून डीटेक्टीव्ह कदंबर्‍या (तेव्हा चोरुन वाचत असे !) सवय त्यामुळे ‘संस्पेन्स ‘ अंगात मुरलाय !

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.