गेल्याच महिन्यातली घटना.

….

 

“हॅलो गोखले सर ना?”

“हो, बोलतोय”

“मी अलका xxxxx, मागे बघा मी आपल्याला माझ्या मुलाच्या अमितच्या विवाहा बद्दल प्रश्न विचारायला आले होते, अडीच – तीन वर्षे झाली असतील त्याला”

“हो, माझ्या लक्षात आले, बोला आज कशा साठी फोन केला म्हणायचा?”

“अहो आमच्या अमितचे लग्न ठरले बरे का, अगदी छान मनासारखी सुन मिळतेय आम्हाला, बाकी अगदी तुम्ही सांगीतल्या प्रमाणेच झाले, आधी देवा पुढे साखर ठेवली आणि सगळ्यात पहील्यांदा तुम्हाला फोन करुन ही शुभ वार्ता देत आहे”

“अरे वा! अभिनंदन हो , तुमचे आणि अमितचे पण, चला तुमची मोठी काळजी मिटली”

“हो ना , सर, तुमचे अनंत उपकार आहेत हो, तेव्हा मी तुम्हाला तेव्हा भेटले नसते तर आजचा हा दिवस उजाडला नसता..”

“अहो मी केवळ निमित्तमात्र, कर्ता करवता तर तो परमेश्वर”

“हो , तो परमेश्वरच तुमच्या मुखातून बोलला अशी माझी श्रद्धा आहे”

“धन्यवाद, मग केव्हा आहे शुभ मंगल”

“मार्च मधली तारीख बघतेय, हल्ली मॅरेज हॉल बुक करायचा आणि मग मुहुर्त काढायचा”

“हो तेही खरेच “

“तारीख , मुहुर्त ठरला की आमंत्रण देतेच आहे”

“अलका ताई फार चांगली बातमी दिलीत आज, तुम्हाला आणि अमितला शुभेच्छा …”

…..

‘विवाह कधी ?’ असा प्रश्न विचारणारा जातक आला नाही असा माझा आठवडा जात नाही, माझ्या कडे विचारल्या जाणार्‍या प्रश्नांत हा प्रश्न पहील्या क्रमांकावर आहे. (दुसर्‍या क्रमांका वर ‘नोकरी’ संदर्भातले प्रश्न !)

दैव दयेने, गुरु कृपेने  ‘विवाह कधी ?’ या संदर्भात केलेली माझी भाकितें बर्‍याच प्रमाणात बरोबर येतात. त्यामुळे जातकांचे ‘सर , तुम्ही सांगीतल्या प्रमाणे घडले, विवाह ठरला/ झाला’ असे फोन / ईमेल / मेसेज येणे ही तशी नित्याचीच बाब.

पण अमित ची केस जरा वेगळीच होती. आणि त्यामुळेच चांगली लक्षात राहीली होती.

………

………

—–

मला आठवतेय आज पासुन बरोबर अडीच वर्षापूर्वी फेब्रुवारी २०१५ मध्ये सौ.अलका xxxxx माझ्याकडे आल्या होत्या, त्यांचा प्रश्न होता :  त्यांच्या मुलाचा म्हणजे अमित चा विवाह कधी?”

माझी कामाची एक पद्धत आहे त्यानुसार जातकाची (ज्याचा प्रश्न आहे ती व्यक्ती) जास्तीतजास्त माहीती नोंद करुन घ्यावी लागते , ह्या  माहीतीचा म्हणजेच संदर्भाचा पत्रिकेच्या अभ्यासात कमालीचा उपयोग होतो , मी तर पुढे जाऊन म्हणतो, अशी पूर्ण माहीती (ब्यॅक ग्राऊंड) उपलब्ध नसेल तर मी त्या पत्रिकेला (प्रश्नाला) हात घालतच नाही.

प्राथमिक माहीती वरुन म्हणजे  जन्मतारीख आदी तपशील बघताच कळत होते की अमित आता ३२ वर्षाचा आहे म्हणजेच ‘उशीरा विवाह’ या गटात दाखल झाला आहे.  ‘विवाहास विलंब का आणि कसा’ याची उत्तरे पत्रिकेच्या अभ्यासातुन मिळवता येत असली तरी मी प्रथम पत्रिकेच्या बाहेरची कारणे काही आहेत का याचा खुलासा करुन घेतो, तेव्हढाच आपला वेळ वाचला!

मी माझी प्रश्नोत्तरे चालू केली…..

“वय ३२ , अजून लग्न नाही, तसा उशीरच होतोय म्हणायचे,  पण विवाह रखडायला असे काय कारण?”

“काही कळत नाही बघा, सगळे चांगले आहे हो , अगदी एक नंबर! आमचा अमित आय.टी. इंजिनियर आहे , लाखाच्या घरात महीन्याचा पगार, चार चाकी, आमचा दोन बेडरुम चा फ्लॅट आहेच शिवाय अमितने पण स्वत:चा दोन बेडरुमचा फ्लॅट घेतला आहे, कामा निमित्त चार वेळा परदेशात जाऊन आला आहे, उंच आहे, गोरा आहे , दिसायला बरा आहे, शिगरेट नाही, दारु नाही….”

“म्हणजे अगदी ‘आदर्श स्थळ’ आहे म्हणायचे तर..’

“हो ना, पण आता ३२ वय झाले तरी लग्न नाही, मोठी काळजी लागून राहीली हो”

“मला ही आश्चर्य वाटते, खरे तर इतके सगळे चांगले असताना विवाहास इतका विलंब का व्हावा?”

“त्या साठीच तर तुमच्या कडे आले. जरा बघून सांगा काय होणार, लग्न होणार की हा असाच राहणार?”

अलकाताईंच्या डोळ्यात पाणी आले.

“ठीक आहे, अमितची पत्रिका बघितल्या वर काही खुलासा नक्कीच होईल, पाहुया काय करता येते ते”

इतके सगळे चांगले असताना विवाह इतका रेंगाळावा असे काय आहे अमितच्या पत्रिकेत? याचा छडा लावलाच पाहीजे.

अमितची जन्मपत्रिका बघताच एक चटकन लक्षात आले, ‘ विवाहाला विलंब’ दाखवणारे बरेच ग्रहयोग पत्रिकेत होते पण एक नक्की अमित आयुष्यभर अविवाहीत राहील असा कोणताही कौल नव्हता, म्हणजे विवाहाचे योग पण होतेच. माझा उत्साह वाढला. थोडी आणखी गणितें , गोचरी आणि प्रोग्रेशन्स विचार केल्यावर माझी खात्री पटली, अमित चा विवाह नक्की होणार फक्त अजून दोन –तीन वर्षांनी , वयाच्या ३५ व्या वर्षी !

खरे तर या ट्प्प्यावर ‘अजून दोन वर्षानी अमितचा विवाह होईल, काळजी करु नका’ असे सांगून केस बंद करता आली असती.

पण….पण…पण…

या अमितच्या पत्रिकेतले दोन वर्षानी येणारे हे विवाह योग जरासे वेगळ्या पद्धतीचे होते. हे योग पुसट  / अस्पष्ट आणि ‘कंडीशन्स अप्लाय’ टाइपचे होते.  म्हणजे त्या योगांची फळे मिळणार की नाही आणि मिळाल्यास कशी / किती / केव्हा मिळणार हे त्या व्यक्तीने त्या दिशेने घेतलेल्या प्रयत्नांवर जास्त अवलंबून असते. याला काहीसे ‘ कर्म प्रधान / प्रयत्नाधीन’ पद्धतीचे योग म्हणता येईल,  काहीही न करता बसल्या जागी फळे देणारे हे योग नसतात. अथक परिश्रम तसेच  ‘फ्री विल’ चा पूर्ण वापर करुनच ह्या ग्रहयोगांची फळे खेचून आणता येतात. मात्र प्रयत्न केलेच नाहीत मात्र हे ग्रहयोग फळे न देताच टळून जातात. कदाचित अशी न दिलेली फळे (साचलेली फळें) मग पुढे केव्हा तरी, अनुकूल स्थिती आल्यास त्याच किंवा दुसर्‍या स्वरुपात मिळू शकतात. जर अशी अनुकूल परिस्थिती निर्माणच झाली नाही तर अशी फळे मग या जन्मात न मिळता पुढच्या जन्मात ढकलली जातात!

‘अमितचे लग्न दोन वर्षांनी होईल, काळजी करु नका’ असे सांगून बोळवण करणे बरोबर ठरले नसते, विवाह योग असले तरी त्या योगांचा लाभ उठवण्या साठी अमित ने काही प्रयत्न केलेच पाहीजेत,  फ्री विल चा वापर झाला पाहीजे तरच विवाह जमून येईल.  तसे नाही झाले तर परत ‘येरे माझ्या मागल्या’…. तीन वर्षांनी अलकाताईच सांगत येतील ” अजून नाही जमले हो अमितचे , तुम्ही तर लग्न होणार असे बोलला होतात!”

त्यामुळे  या ग्रहयोगांच्या बाबतीतले सगळे ‘काय आणि कसे’ हे पण सांगायला हवे तरच अमितला ह्या मार्गदर्शनाचा काही तरी उपयोग होईल.  

या साठी मी पत्रिकेतल्या त्या योगांचा जास्त खोलात जाऊन अभ्यास सुरु केला, एकेक खुलासा होत गेला.

वाटले होते तसे हे काही साधे ‘विलंबाने विवाह’ छापातले प्रकरण नव्हते तर! मला काही वेगळ्याच शंका यायला सुरवात झाली! अमितची नवमांश कुंडली तर जास्तच बोलकी होती आणि युरेनियन प्लॅनेटरी पिक्चर्स नी समस्या नेमकी हेरुन त्याला ठोस दुजोरा दिला. माझी तर खात्रीच पटली.

( जातकाची पत्रिका समोर ठेऊन हे सगळे समजाऊन सांगायला हवे , मलाही ते आवडले असते पण जातकाची माहीती गुप्त ठेवायची असल्याने असे करता येणार नाही. )

माझी खात्री झाली असली तरी पुरेशी खातरजमा न करताच काही निष्कर्ष काढणे (आणि ते जातकाला सांगणे!) घोकादायक ठरले असते.

खातरजमा करायची म्हणजे या अलकाताईंनाच प्रश्न विचारुन काही घागे – दोरे मिळतात का हे पाहणे आले!

मामला साधा नव्हताच , मला ही थोडा विचार करावा लागलाच , अखेरीस नेमकी कोणती माहीती मिळवायची , कशी मिळवायची याची एक स्ट्रॅटेजी ठरवली आणि त्यानुसार माझी प्रश्नोत्तरें म्हणजेच ‘उलट तपासणी’ चालू केली!

…..

…..

…..

“अमित ३२ वर्षाचा, म्हणजे गेली पाच एक वर्षे तरी स्थळे बघत असाल नाही का?”

“तर हो, ‘अनुरुप’ मध्ये नाव गेली पाच वर्षे आहे, इतरही चार – पाच  ठिकाणी नाव नोंदवले आहे, शिवाय शेजारी पाजारी म्हणू नका , मित्र – ओळखीचे म्हणू नका , नातेवाईक तर आहेतच , या सगळ्यां कडून सतत प्रस्ताव येत असतात”

“साहजीकच आहे, इतके चांगले स्थळ म्हणल्यावर उड्या पडणारच ना? पण मग फार कडक अटी घालून बसलाय का तुमचा अमित?”

“नाही हो, म्हणजे तशा फारश्या अटीं नाहीतच, मुलगी अनुरुप हवी इतकीच माफक अपेक्षा आहे”

“तरी देखील अजून एक ही नजरेत भरली नाही? दर विकएंड ला कांदा पोहे खाउन कंटाळला असेल अमित”

“छे हो, कसले कांदापोहे घेऊन बसलात”

“अरे हो , कांदे पोह्याचा जमाना गेला नाही का? आजकाल मुले परस्पर बरिस्ता, सीसीडी त भेटतात, तिथेच कॉफी पिता पिता ठरते म्हणे!”

“कुठले बरिस्टा आणि सीसीडी , तसले काही सुद्धा होत नाही”

… पुढे काय झाले ?

सत्यघटनेवर आधारित या प्रसंगाचा दुसरा भाग लौकरच….

 

क्रमश:

शुभं भवतु

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

8 प्रतिक्रिया

///////////////
 1. प्राणेश

  ग्रहयोगांची साचलेली फळे पुढच्या जन्मात ढकलली जाणे! भन्नाट! खूप महत्त्वाचा मुद्दा शिकायला मिळाला. धन्यवाद!

  तुमचा प्रत्येक लेख वाचनीय असतो. काहीतरी महत्त्वाचा ज्योतिषशास्त्रीय धागा त्यात नक्कीच सापडतो.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्राणेशजी ,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   नुकत्या जन्मलेल्या बालकाच्या हृदयाला भोक का असते , कोणाला इतर मोठे व्यंग असते , कोणी मतीमंद निपजते असे का? या जगात येतानाच त्यांना हा त्रास का भोगावा लागतो? या ज्न्मात बरी – वाईट कर्मे करायला त्यांना अवधीही मिळालेला नाही मग ही कुठल्या कर्माची फळे म्हणायचे? याचा सरळ सरळ अर्थ आहे, ही सगळी गेल्या जन्मात केलेल्या वाईट कर्मांची फळे आहेत. गेल्या जन्मी अनेक वाईट कर्मे केली पण तेव्हा फळे मिळाली नाहीत / फळे देता येतील अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली नाही, त्यामुळे ही अशुभ फळें साठत गेली आणि शेवटी ती पुढच्या जन्मात ढकलली गेली.

   वाईट फळेच कॅरी फॉरवर्ड होतात असे नाही तर चांगली फळे देखील अशीच पुढच्या जन्मात ढकलली जातात . अमिताभ बच्चन चा मुलगा अभिषेक बच्चन हे त्याचे एक मासलेवाईक उदाहरण ठरावे. काहीही नकरता त्याला जगातली सर्वोत्तम सुखे , वैभव प्राप्त झाले , एक नव्हे दोन नव्हे तर चक्क तीन तीन आलिशान बंगले रोल्स रॉईस गाड्या, अब्जावधी नव्हे खर्वावधींची माया आणि ऐश्वर्या राय सारखी अप्सरा पत्नी म्हणून लाभली आणखी काय हवे असते?

   ज्योतिष आणि कर्माचा सिद्धांत फार जवळचे नाते राखून आहेत. कर्माचा सिद्धांत जरा खोलात जाऊन समजाऊन घेणे त्यासाठी गरजेचे असते.
   एकदा का हा भाग चांगला अवगत झाला की मग ग्रहांची फळे कशी . केव्हा . कशा पद्धतीने मिळणार , कुठल्या ‘कंडीशंस अ‍ॅप्लाय’ होणार याचा बर्‍यापैकी खुलासा होईल.

   सुहास गोखले

   +3
 2. Suresh

  छान लेख ! लवकरच पुढचा भाग वाचायला आवडेल.
  एक प्रश्न- Free willpower चा वापर हा प्रत्येक केस मध्ये करता येऊ शकतो का? म्हणजे समजा एखाद्याची कुंडली लग्नासाठी अत्यंत अनुकूल अवस्था दाखवत असेल म्हणजे जवळजवळ लग्न होईलच असे भाकीत असेल तर त्यावेळी एखाद्यास लग्न करायचे नसल्यास ते शक्य होऊ शकते का? अथवा तुम्ही म्हणालात तसे समजा एखाद्या पत्रिकेत लग्नाचा योग आहे किंवा एखादी पत्रिका ही बिनलग्नाची निश्चितच नाही असे आढळून आल्यास फ्री विलपॉवर चा वापर करून एखाद्याने ठरवले कि त्याला लग्न करायचेच नाही तर लग्नासाठी अनुकूल अत्यंत मजबूत ग्रहमान असताना देखील बिनलग्नाचे राहणे हे शक्य होऊ शकते का?

  0
  1. सुहास गोखले

   श्री.सुरेशजी,
   अभिप्राया बद्दल धन्यवाद.
   ‘फ्रि विल’ याचा मराठीत अर्थ आहे ‘निवड स्वातंत्र्य’. आपल्या आयुष्यात जे जे काही घडणार आहे (शिक्षण, नोकरी, विवाह, संतती, आरोग्य, प्रवास, नोकरी-व्यवसाय, पैसा, वाहन इ.) त्या प्रत्येका साठी आपल्याला अनेक पर्याय दिलेले असतात. म्हणजे एकच एक असे काही प्राक्तनात लिहलेले नसते. ‘करियर’ चे उदाहरण घेतले तर एखाद्याला डॉक्टर/ वकील/ पत्रकार/ खाटीक असे चार पर्याय दिलेले असतात याचा अर्थ तो या चार-पाच पैकीच एखादा व्यवसाय करु शकेल त्यापलीकडे जाऊन त्याला कोणताही व्यवसाय करता येणार नाही. या उपलब्ध किंवा निर्धारीत पर्यांयां मध्ये एखादा पर्याय हा ‘डिफॉल्ट’ असतो म्हणजे जर त्या व्यक्तीने स्वत: काही निवड केली नाहीतर तो डिफॉल्ट पर्याय हा त्याचा व्यवसाय होतो. वरील उदाहरणातली व्यक्ती डॉक्टर होऊ शकते, वकिल होऊ शकते , पत्रकारी करु शकते किंवा हातात सुरा घेऊन खाटीक बनू शकते या चार पैकीच एक व्यवसाय निवडायचा आहे, हे निवडण्याचे स्वातंत्र्य म्हणजेच ‘फ्री विल’ त्या व्यक्तीला आहेच. आता समजा त्यातला वकील हा ‘डिफॉल्ट’ पर्याय आहे, व्यक्तीने फ्री विल चा वापर करुन जाणीवपुर्वक ‘डॉक्टर’ हा व्यवसाय निवडला तर तो डॉक्टर होतो पण ‘फ्री विल’ वापरलेच नाही, तर मात्र तो ‘वकील’ होतो.
   विवाहाच्या बाबतीत असेच म्हणता येईल. इथे विवाह होणे / न होणे हे जसे पर्याय असू शकतात तसेच काहीजणांच्या बाबतीत विवाह नाही / विवाह न करताच (अनैतीक) शारीरीक सुख असे पर्याय असतात. भारतातली एक अविवाहीत राजकीय नेत्याने “मी अनमॅरीड (अविवाहीत) आहे पण बॅचलर (ब्रह्मचारी) नाही’ असे प्रामाणीक विधान केले होते’!
   इथे एक बाब लक्षात घेतली पाहीजे ती अशी की पत्रिकेतले ग्रह आपल्याला फक्त घटने संदर्भातला अनुकूल / प्रतिकूल काळ सांगतात, शक्याशक्यता सांगतात. घटना घडेलच याची हमी नसते. उत्तम सकस काळी जमीन ही चांगल्या पिकपाण्या साठी अनुकूल पार्श्वभुमी आहे पण केवळ चांगली कसदार जमीन आहे एव्हढ्यावर उत्तम पीक येईल असे नाही. त्यासाठी चांगला पाऊस, पोषक हवामान, चांगल्या बियाणाची योग्य वेळी केलेली पेरणी, खते, किड नियंत्रण असे अनेक घटक पण तितकेच आवश्यक असतात.

   फ्री वील चा प्रभावी वापर केला तर या शक्याशक्यतेचा प्रभावी वापर करुन घेता येतो. An Autobiography of a Yogi चे लेखक स्वामी परमानंद योगानंद यांच्या बाबतीत पत्रिके नुसार तीन विवाह होते पण त्यांनी फ्री विल चा वापर करुन एकही विवाह होऊ दिला नाही हे एक उत्तम उदाहरण आहे,
   रस्त्यावरच्या भिकार्‍याच्या पत्रिकेतही राज योग / गज केसरी योग असू शकतात मग त्याचा त्या भिकार्‍याला काहीच लाभ होताना दिसत नाही असे का? कारण त्या भिकार्‍याने त्या योगांचा लाभ ऊठवण्यासाठी काही प्रयत्नच केले नाही, त्याने फ्री विल वापरले पण ते ‘मेहेनत करणे’ / ‘भिक मागत फिरणे’ यापैकी एकाची निवड करण्याचे. त्याने मेहेनत हा पर्याय निवडला असता तर त्याच्या पत्रिकेतल्या शुभ योगांचा त्याला पूर्ण लाभ मिळाला असता. भिक मागायचा पर्याय निवडून त्याने ते शुभ योग लाथाडले असेच म्हणता येईल.
   एखाद्या पत्रिकेत ‘संसार सुखाचा कमतरता’ हा भोग असतो पण इथे ‘कमतरता’ नेमकी कोणती/कशी/केव्हा/ कोठे हे सारे पर्याय निवडीस खुले असतात, कमतरते बाबतीत पती पत्नीत कलह / काही काळ दुरावा / जोडीदाराचे आजारपण/ घट्स्फोट / जोडिदाराचे अकाली निधन होऊन आलेला विधवा-विधुर पणा इतके पर्याय आहेत आणि आपण त्यातला एक निवडू शकतो! असेच आजारपणा बाबत म्हणता येईल. ‘आजारपण ‘येणारच पण कोणता आजार , किती वेळ चालणार ह्याचे निवड स्वातंत्र्य आपल्यालाच दिलेले असते इथे आपण साधा ताप खोकला, सांधेदुखी, दमा या पासुन ते सोरायसीस, एड्स, कॅन्सर पैकी काही एक निवडु शकतो.
   थोडक्यात आपले प्राकत्न हे बहु पर्यायी असते आणि फ्री विलचा वापर करुन त्यातला योग्य पर्याय आपण निश्चितच निवडू शकतो. पण मुख्य समस्या ही की असे कोणते पर्याय आपल्याला उपलब्ध अहेत याची कल्पना आपल्याला येत नाही. जन्मपत्रिकेवरुन या बाबतीत काही मार्गदर्शन नक्कीच मिळू शकते किंवहुना असे मार्गदर्शन देणे / घेणे हाच ज्योतिष शास्त्राचा खरा / मुळ उपयोग आहे. पण असे मार्गदर्शन देऊ शकणार ज्योतिषी फार कमी आहेत आणि असे मार्गदर्शन घेऊ ईच्छिणारे जातक तर त्याहुनही दुर्मिळ आहेत ही शोकांतीका!
   इथे हे लक्षात घ्या की ‘फ्री विल’ वापरणे म्हणजे योग्य निर्णय घेऊन , योग्य त्या दिशेने, योग्य त्या वेळी प्रयत्न करणे, फ्री विल म्हणजे ‘उपाय-तोडगे’ नाहीत !

   सुहास गोखले

   +2
 3. Rakesh

  Lekh ani mahiti changli jamun ali ahe. एखाद्या पत्रिकेत ‘संसार सुखाचा कमतरता’ हा भोग असतो पण इथे ‘कमतरता’ नेमकी कोणती/कशी/केव्हा/ कोठे हे सारे पर्याय निवडीस खुले असतात, कमतरते बाबतीत पती पत्नीत कलह / काही काळ दुरावा / जोडीदाराचे आजारपण/ घट्स्फोट / जोडिदाराचे अकाली निधन होऊन आलेला विधवा-विधुर पणा इतके पर्याय आहेत आणि आपण त्यातला एक निवडू शकतो! – pan he mala kalala nahi. konala asa paryay kasa niwdta yeil. 95% people are not conscious about their daily simple acts. They are driven by their tendencies which are indicated by planets in horoscope. Paramhans Yoganandanche Guru Yukteshwar maharaj swataha changle astrologer hote, ase ek tar Guru chya ashirwadani nahi tar swataha paramhans sarkhe jagrut lokach tyanchi destiny change karu shaktat na.
  Baki lekh uttam zala ahe.

  0
 4. सुहास गोखले

  धन्यवाद श्री राकेशजी,

  आपली कॉमेंट उशीरा प्रकाशित करतोय कारण कशी काय आपली कॉमेंट स्पॅम मध्ये गेली होती , आज अचानक स्पॅम मधले कंटेंट्स तपासत असताना आपली कॉमेंट त्यात दिसली. विलंबा बद्दल क्षमस्व

  सुहास गोखले

  0
 5. Rakesh

  Ho…mi pan ha comment donda post kele hote tari ti disat navti….Suhas Ji, free will cha paryay kasa nivdta yeil…hya baddal jamel wel asel tasa replya karal ka?
  Dhanyawad.

  0
  1. सुहास गोखले

   श्री राकेशजी,

   धन्यवाद

   फ्रीविल हा खूप मोठी व्याप्ती असलेला विषय आहे असा थोडक्यात सांगता येणार नाही. फ्री वुइल चा नेमका कसा उपयोग घ्यायचा या बाबतीत माझी एक केस स्ट्डी आहे ती वाचावी म्हणजे कल्पना येईल. ही लिंक तपासा: http://blog.suhasjyotish.com/%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%88-%E0%A4%9C%E0%A5%8B-%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%AE/

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.