नाशकातले एक बडे डॉक्टर असेच एकदा रितसर अ‍ॅपॉईंटमेंट घेऊन भेटले. डॉक्टर साहेबांचा स्वत:चा ज्योतिषाचा अभ्यास होता , त्यांनी पारंपरीक आणि  कृष्णमुर्ती पद्धतीचे कोर्सेस पूर्ण केले होते, पण डॉक्टरीच्या व्यवसायाच्या व्यापात ज्योतिषाकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही याची मोठी खंत त्यांना होती, याचे मला त्याचे फार कौतुक वाटले.

ज्यो

तिषशास्त्राच्या अभ्यासकांत डॉक्टर्स , इंजिनियर्स, चार्टर्ड अकौंटंट असे उच्च शिक्षण घेतलेले लोक मोठ्या संख्येने यायला हवेत तरच या शास्त्राची प्रगती होईल, या शास्त्राला एक प्रतिष्ठा प्राप्त होईल. एखादे चोपडे वाचून तयार झालेले ‘ओव्हर नाईट / फ्लाय बाय नाईट’ ज्योतिषी , कुठला तरी गल्ली बोळातला फडतूस तीन महीन्याचा क्लास लावून किंवा दोन चार दिवसांची एखादी कार्यशाळा करुन बनलेले ज्योतिष शास्त्री, नक्षत्र शिरोमणी, उपाय- तोडग्यांचा किसळवाणा बाजार मांडणार्‍या पासून ते ‘ठेवा पंचागावर काय खुषीला येईल ते’ अशी केविलवाणी , बुळबुळीत भाषा वापरणार्‍या लोकांच्या हाती हे शास्त्र गेल्यामुळे शास्त्राची प्रगती तर सोडाच नाचक्कीच जास्त झाली आहे असे माझे मत आहे.

पण जेव्हा एखादा ज्योतिषाचा अभ्यासक स्वत:च जातक म्हणून समोर येतो तेव्हा काही वेगळ्याच समस्या निर्माण होतात! मी जातकांना भविष्य सांगतो पण ते कसे आले, काय पद्धती वापरली, कोणते घटक अभ्यासले हा तांत्रिक तपशील देत नाही. पण ज्योतिषाची माहीती असलेला जातक समोर येतो तेव्हा  ज्योतिषाचा क्लासच उघडावा लागतो ! काहीवेळा तर चक्क वादाचा प्रसंग येतो पण मी माझ्या पद्धतीने काम करतो , वाद विवाद टाळतो.

डॉक्टर साहेबांनी त्यांची समस्या सांगीतली, प्रश्नाचा आवाका मोठा होता, प्रश्नकुंडलीचे हे काम नाही म्हणून मी जन्मकुंडली मांडली आणि  जन्मवेळेची खातरजमा करुन घेण्याच्या हेतुने मी डॉक्टरांना प्रश्न विचारायला सुरवात केली … डॉक्टरांच्या ते लक्षात आले असावे कारण ते चट्कन म्हणाले..

“जन्मवेळ अगदी बरोबर आहे, काळजी नको”

“जन्मवेळ बरोबर आहे असे कशाच्या आधारावर म्हणता?”

“म्हणजे काय , ते ‘XXXX’ तुम्हाला माहीती असतीलच , त्यांच्या कडून जन्मवेळ शुद्ध करुन घेतली आहे, ते के.पी. मधले रुलिंग प्लॅनेटस वापरतात , एकदम अचूक”

“केवळ ‘ते’ म्हणाले म्हणून त्यांनी शुद्ध केलेली जन्मवेळ अचूक ठरत नाही! रुलिंग प्लॅनेटस द्वारे मिळालेली जन्मवेळ बरोबरच हे कशावरुन? त्याची अशी कोणती  खात्री त्या ‘‘XXXX’ नी पटवून दिली आहे काय?”

“त्यांनी सांगीतले , शंका घ्यायचीच नाही , रुलिंग प्लॅनेटस ने दिलेली वेळ आहे अचूकच असणार”

“अरे हा काय जुलुम आहे? हीच वेळ बरोबर याची सिद्धता काय? तुम्ही खात्री करुन घेतली का?”

“नाही पण…”

“तुम्ही डॉक्टर आहात, एखादी व्यक्ती तुमच्या समोर आली आणि म्हणाली ‘अमुक तमुक ‘ झाले आहे, द्या आता औषध तर तुम्ही काय करता?”

“आधी त्या पेशंटची तपासणीं करतो मगच औषध कोणते द्यायचे ते ठरवतो”

“पण तपासणी का करायची? पेशंट स्वत:च सांगतोय ना , ‘अमुक अमुक ‘ झाले आहे , म्हणजे त्याला तो आजार झालाच आहे , शंका घ्यायलाच नको,  लगेच द्या औषध असे का नाही करत ?”

“असे नाही करता येत , डॉक्टर म्हणून पेशंटला काय झाले आहे त्याची प्रथम खात्री करुन घेणे माझे कर्तव्यच आहे”

“मी तेच म्हणतोय , एखाद्याला तुझी शुद्ध केलेली जन्मवेळ ‘क्ष” आहे हे सांगतानाच ती ‘क्ष’ च आहे अन्य दुसरी कोणती असू शकणार नाही याची सिद्धता देणे त्या ज्योतिषाची जबाबदारी नाही का? पण तुमच्या बोलण्या वरून ‘XXXX’ नी ही सिद्धता दिलेली नाही असे दिसतेय. ते (किंवा अन्य कोणीही) काहीही सांगोत जर त्याची कोणतीही सिद्धता दिलेली नसेल तर ती जन्मवेळ तशीच्या तशी स्विकारायची काय? निदान मला तरी ती तशी स्विकारता येणार नाही”

“म्हणजे ते ‘XXXX’..”

मी डॉक्टरांना थांबवत म्हणालो..

“ते जे कोण ‘XXXX’ ज्योतिषी आहेत, त्यांच्या कार्यपद्धती वर टीका करायचा माझा हेतु नाही, अशी टीका करणे माझ्या व्यावसायिक नितिमत्तेत (Professional ethics) बसत नाही. तरीही त्यांचे  ‘रुलिंग प्लॅनेटस ने दिलेली वेळ अचूकच असते’ हे विधान मला पटलेले नाही. माझी टीका एकंदरच के.पी. वाले रुलींग प्लॅनेटस वर जो आंधळा विश्वास ठेवतात किंवा ते एक शार्ट कट म्हणून वापरतात त्यावर आहे. रुलींग प्लॅनेट्स नुसार आलेली जन्मवेळ बरोबरच असते हे होलसेल मध्ये गृहीत धरले जाते या वृत्तीला माझा विरोध आहे. रुलींग़ प्लॅनेटस वापरा किंवा अन्य कोणती पद्धती , शुद्ध केलेली जन्मवेळ हीच कशी बरोबर आहे याची सिद्धता देणे त्या ज्योतिषाचे कर्तव्य आहे असे माझे मत आहे “

“मला लक्षात आले , पण माझ्या सुधारित जन्मवेळे नुसार माझ्या विवाहाची घटना मॅच होतेय, दशा स्वामी लाभाचा कार्येश आहे… ”

मी डॉक्टर साहेबांना थांबवत म्हणालो,

“इथेच तर गंमत आहे . हे पहा रुलिंग प्लॅनेटस नुसार आलेली आपली जन्मवेळ सकाळी ८:२३ घेतली

तर विवाहाची घटना जुळतेय हे मान्य पण ही वेळ ८:१९ घेतली किंवा ८:२७ अशी वेळ घेतली तरीही विवाहाची घटनाजुळतेय एव्हढेच कशाला ८: १५ ही वेळघेतली तरीही घटना जुळतेय आणि ८: ३१ घेतली तरी जुळत आहे ! मग नक्की कोणती वेळ ग्राह्य धरायची ?”

“हे कसे सांगणार ?”

“का नाही सांगता येणार , हे रुलिंग प्लॅनेटस वाले ‘नक्षत्र शिरोमणी’ सारखे , सदासर्वदा  दशमाचा सब यंव असेल तर त्यंव होते , चतुर्थाचा सब हा असेल तर ते घडते अशा गप्पा ठोकत असतात ना, मग त्याच पद्धतीने रुलींग प्लॅनेट्स ने मिळालेल्या जन्मवेळे नुसार चे ‘सब’  ताडून बघता येणार नाही का ? उदाहरणार्थ तुमचा सप्तमाचा सब ‘शनी’ आहे मग तुमची पत्नी त्याप्रमाणे आहे का? तुमच्या दशमाचा सब ‘शुक्र’ आहे मग तुमचा व्यवसाय त्याच्याशी मिळता जुळता आहे का? इतके तर करता येईलच ना? हे का केले जात नाही ? सब ठेवा बाजूला , फार सुक्ष्म अ‍ॅनॅलायसीस होईल ते, पण त्या ‘XXXX’ नी तुमच्या आयुष्यात या आधी घडलेल्या किती घटनां मॅच करुन दाखवल्या ?”

“एक ही नाही!”

“मग कशाच्या जोरावर तुमची ही ८:२३ ची जन्मवेळ बरोबर? के.पी. मध्ये साधारण दोन अडीच मिनिटांत ’सब’ बदलतात ना मग रुलिंग प्लॅनेटस द्वारा आलेली जन्मवेळ अडीच मिनीटें  मिनिटे मागेपुढे करुन आता त्या घटना जुळत नाहीत / सब जुळत नाहीत अशी सिद्धता दिली आहे का?”

“तुम्ही म्हणता ते खरे , त्यांनी अशी कोणतीही सिद्धता दिली नाही,  उलट रुलींग प्लॅनेट्स द्वारा मिळालेली जन्मवेळ बरोबरच असते हे त्यांनी अशा काही दरडावणीच्या भाषेत सांगीतले गेले की बस्स , त्या पुढे काही विचारायची सोयच ठेवली नाही!”

“भले शाब्बास ! ”

“आणि चक्क YYYY रुपये घेतले हो त्याचे !”

पुन्हा एकदा डॉक्टरांना थांबवत म्हणालो..

“हे पहा , कोण कसे काम करतो, बोलतो , काय मानधन घेतो याबद्दल आपण नको बोलायला, कारण ते माझ्या व्यावसायिक नितिमत्तेत (Professional ethics) बसत नाही. त्यापेक्षा मला माझ्या पद्धतीने तुमची जन्मवेळ किती अचूक आहे ते तपासू दे,  कसे?”

“म्हणजे मी दिलेली जन्मवेळ चुकली आहे असे आपल्याला वाटते का?”

“ते मी आत्ताच कसे सांगणार ? मी तुमच्या आयुष्यातल्या घटना जुळवून पाहतो, आणखी ही प्रश्न विचारतो, त्यानंतरच मला काही सांगता येईल”

मी माझ्या पद्धतीने गणिते केली , मी बर्‍याच वेगवेगळ्या पद्धती वापरतो, त्या आधारे मी जातकाच्या आयुष्यात कोणत्या घटना घडल्या असतील आणि त्या केव्हा याची एक यादी तयार करतो त्यानंतर जातकाला विचारुन त्या घटना खरोखर घडल्या होत्या का आणि घडलेल्या असल्यास त्या केव्हा हे विचारुन घेतो. त्यावरुन मला जातकाची जन्मवेळ कितपत बरोबर आहे ( +/- ५ मिनिटे, +/- १५ मिनिटें, +/- ३० मिनिटे’ किंवा याहुनही जास्त मोठी चूक, अगदी AM / PM चा घोटाळा ) हे ठरवतो , एकदा जन्मवेळ किती चुकली असावी याचा अंदाज आला की मग आणखी रिफाईनमेंट करता येते त्यासाठी मी काही शिक्रेट पद्धतींचा अवलंब करतो. त्या द्वारे मला साधारण +/- ४ मिनिटाच्या आतबाहेर जन्मवेळ सुधारुन घेता येते. अर्थात सर्वच पत्रिकांच्या बाबतीत हे जमेल असे नाही, त्यासाठी अनेक घटक एकाच वेळी कार्यरत असावे लागतात , त्याची चर्चा इथे करणे शक्य होणार नाही.

एकदा का जन्मवेळ ही अशी +/- ४ मिनिटाच्या आत लॉक झाली की मग जातकाच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटना बर्‍यापैकी अचूकतेने सांगता येतात आणि मग ओघानेच भविष्यातल्या घटनांचे अंदाज ही बरोबर येण्याची शक्यता जास्त असते.

ही सर्व प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळ घेणारी असते!

माझ्या लगेचच लक्षात आले की डॉक्टर साहेबांची सकाळी ८:२३ ही जन्मवेळ चूक आहे आणि चूक साधी सुधी नाही तर चक्क AM / PM चा घोटाळा आहे. मी डॉक्टर साहेबांना विचारले …

“मला वाटते तुमची जन्मवेळ बरीच चुकीची नोंदवली गेली आहे”

“किति?”

“१२ तास !”

“क्काय !”

“हो, चक्क संध्याकाळचा जन्म असताना सकाळचा जन्म असे नोंदवले गेले आहे”

“अहो काय बोलता! एव्हढी मोठी चूक कशी शक्य आहे?”

“अशा काही केसेस मी हाताळल्या आहेत. त्यावरुन सांगतो, अशा चुका होतात , मूळ वेळ बरोबर लिहली जाते पण त्याच्या पुढे AM / PM लिहायचे विसरतात”

“माझ्या बाबतीत असे काही झाले असण्याची शक्यता नाही”
………

 

क्रमश: भाग २ मध्ये … लौकरच!

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.