एक रुपैय्या भाडा पैसैंजर इतना जाडा मला नको रे नको रे नको !
मी ज्योतिष मार्गदर्शन करतो आणि त्यासाठी योग्य ते मानधन पण घेतो पण असे असले तरी याला व्यवसाय मानत नाही. आलेल्या जातकाकडे एक गिर्हाईक ( बकरा?) म्हणून पाहात नाही.
ज्योतिषशास्त्र हे अत्यंत मर्यादीत वकूब असलेले शास्त्र आहे . पत्रिकेतल्या ग्रहमाना नुसार आगामी काळात घडू शकणार्या घटनां बद्दल एक पुसटसा अंदाज देण्यापलिकडे या शास्त्राची मजल जाणार नाही, काही ज्योतिषांनी (फेसबुक शास्त्री ?) या मर्यादेचे भान न ठेवता , पैशाच्या लोभापायी या शास्त्रा बद्दल अनेक गैरसमज निर्माण करुन ठेवले आहेत , या शास्त्रा बद्दलच्या अपेक्षा अकारण वाढवून ठेवल्या आहेत , त्यामुळेच एखाद्याच्या उभ्या आयुष्याची डिव्हीडी फास्ट फॉरवर्ड करुन बघून प्रत्येक घटनेचे अगदी बारकाईने , फ्रेम बाय फ्रेम रसभरीत वर्णन करावे अशी अपेक्षा जातक ठेवत आहेत.
वास्तुयोग आहे का (स्वत:चे घर होईल का?) या प्रश्नाचे ‘हो/नाही’ आणि होणार असल्यास अंदाजे कोणत्या कालावधीत इतपत सांगता येईल , पण मग ते घर ‘१ बिएचके का २ बिएचके ?’ , ‘ पुर्वाभिमुख का उत्तराभिमुख ?’, ‘कोथरुड का खराडी?’, ‘पहिल्या मजला की चौथ्या मजला ?’ असे सारे तपशील हे शास्त्र पुरवू शकणार नाही पण काही ज्योतिषी खास करुन केपी वाले नक्षत्र शिरोमणी आणि सबसब लॉर्ड वाले भाऊ हे सांगतात ! इतकेच नव्हे तर रुलिंग प्लॅनेटचा मटका लावून ( ऑप्शन १ = ५०० चौ फूट, २ = ८०० चौ फूट, ३ = ११०० चौ फूट , ४ = १५०० चौ फूट…) त्या घराचे क्षेत्रफळ पण सांगतात !
अशी अनेक उदाहरणे देता येतील पण विस्तारभयास्तव जास्त लिहीत नाही.
गेल्या आठवड्यात एका जातकाने संपर्क साधला, प्रश्न त्याच्या मुलाचा विवाह कधी होईल असा होता. मी सहसा दुसर्याच्या वतीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत नाही. असा प्रश्न विचारण्या पूर्वी त्या संबधीत व्यक्तीची परवानगी घेऊन मगच तो विचारा असा माझा नियम आहे. कारण जेव्हा दुसर्याच्या वतीने प्रश्न विचारला जातो तेव्हा त्या व्यक्तीची गोपनिय माहीती , खाजगी बाबीं उघड कराव्या लागतात, त्या व्यक्तीच्या खासगी पणाचे हे सरळ सरळ उल्लंघन होत असते. आणि जर त्या दुसर्या व्यक्तीला हे माहीती नसेल तर तर अशी खासगी माहीती उघड करणे हा गुन्हाही ठरतो.
माझ्या कडे आलेल्या या जातकाला मी तशी स्पष्ट सुचना दिली.
“आपण आपल्या मुलाच्या कानावर हे सर्व घाला, त्याची या सर्व प्रकराला संमती घ्या , जर आवश्यकता भासली तर मला तुमच्या मुलाशी बोलता आले पाहीजे तेव्हा आपल्या मुलाचा संपर्क क्रमांक पण द्यावा लागेल”
जातकाला ते रुचले नाही,
“अहो मी त्याचा जन्मदाता आहे त्याच्या विवाहाची काळजी मला असणे स्वाभाविक आहे आणि या काळजी पोटी त्याच्या बाबतीतला प्रश्न विचारण्याचा मला अधिकार आहे”
मी जातकाला एकच प्रश्न विचारला
“तुमचा मुलगा संडास / अंघोळीला जातो तेव्हा दाराला आतुन कडी लावून घेतो का? “
“म्हणजे काय ? मुलगा आता ३२ वर्षाचा आहे !”
“झाले तर मग, तुमचा मुलगा दाराला आतुन कडी घेतो म्हणजेच तो स्वत:चे खासगीपण जाणतो आणि जपतो आहे , तेव्हा त्याच्या विवाहाचा प्रश्न ही असाच खासगी आहे , एकतर त्यालाच हा प्रश्न विचारु दे किंवा त्याची रितसर परवानगी असेल तर त्याच्या वतीने तुम्ही प्रश्न विचारु शकता”
“माझ्या मुलाचा या ज्योतिषावर विश्वास नाही, तो याला परवानगी देणार नाही”
“मग प्रश्नच मिटला , त्याचे तो बघेल , तुम्ही नका या ज्योतिषाच्या भानगडीत पडू , उसे अपनी हाल पे छोड दे”
‘पण मी आत्ता पर्यंत तीन चार ज्योतिषांना हाच प्रश्न विचारला आहे, त्यांनी कोणी असली अट घातली नाही, धाडधाड उत्तरें देऊन मोकळे झाले, तुम्हीच पहीले जे इतके नियम अटीं घालत बसलाय”
“कोणी कसा व्यवसाय करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे , त्याबाबत मी काही भाष्य करणे बरोबर नाही. मी काही उच्च दर्जाची व्यावसायीक नितिमूल्ये जोपासतो , त्यानुसार, दुसर्याच्या वतीने विचारलेला प्रश्न मी सहसा स्विकारत नाही , जर त्या दुसर्या व्यक्तीची रितसर परवानगी असले तर आणि तरच त्या प्रश्नाचा विचार करतो”
“म्हणजे काही मार्गच उरला नाही”
“तसे म्हणा वाटल्यास”
“तुमच्या बद्दल बरेच ऐकले होते, मोठ्या आशेने तुमच्या कडे आलो आहे”
“धन्यवाद, पण मी माझ्या व्यावसायीक नितिमुल्यांशी तडजोड करणार नाही”
“बरे मग मी माझ्या बद्दल प्रश्न विचारला तर कसे?”
“आता आपण स्वत:च , स्वत: बद्दल प्रश्न विचारत असाल तर हरकत नाही”
“ठिक आहे, पण काय हो , आपले मानधन काय असते?”
“ते आपल्या प्रश्नावर अवलंबून असते असा सरसकट रेट नाही”
“तरी पण काही अंदाज?”
“साधारणत: एका साध्या , सरळ प्रश्नाचे मी रुपये xxx मानधन घेतो पण तुमच्या प्रश्नाच्या गुंतागुंती नुसार, व्याप्ती नुसार ते जास्त ही असू शकते “
“नाही , माझा प्रश्न अगदी साधा , सरळ आहे , मला वाटते रुपये xxx मध्ये बसेल”
“ते मी ठरवणार ! तुमचा प्रश्न काय ते आधी सांगा मग मानधनाचे सांगतो “
“त्याचे असे आहे, मला हा एकच मुलगा, ३२ वय झाले तरी अजून विवाहा जमत नाही काळजी वाटते , त्यात माझी, एक हार्ट अॅटॅक येऊन गेलेली तब्बेत, माझा काय भरोसा, कधी फुक्क होईल ते सांगता येणार नाही, तेव्हा माझा एकच अगदी साधा , सरळ प्रश्न असा आहे : “मला माझ्या नातवंडाचे तोंड पहायला मिळेल का?”
आता याला काय उत्तर द्यायचे ?
कुँवारा बाप या चित्रपटाल्या सायकल रिक्षा चालवणार्या मेहेमूद च्या तोंडी असलेल्या एका गाण्याची ओळ मात्र आठवली :
“एक रुपैय्या भाडा, पैसैंजर इतना जाडा मला नको रे नको रे नको !”
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
Hahaha…..ajab gajab vyakti aahet ya jagat
धन्यवाद श्री गोरक्षनाथजी
सुहास गोखले