रक्तशर्करा !

म्हणजेच रक्तातली साखर , आता इथे ‘साखर’ हा शब्द वापरल्याने अनेक जणांची जणांची गफलत होऊ शकेल कारण आपल्याला ‘साखर’ म्हणले की आपल्या डोल्या समोर येते ती चहात घालतो ती साखर ,  कारखान्यात बनणारा पांढरा, दाणेदार , गोड्ड गोड्ड पदार्थ ! पण मी जी ‘साखर’ म्हणतो त्याला इंग्रजीत ‘ग्लुकोज’ म्हणतात, माझा लिखाणात मी काही वेळा ‘ग्लुकोज’ म्हणतो किंवा  ‘साखर’ म्हणतो असे असले दोघांचा अर्थ एकच आहे.

आपण जे काही खातो (चरतो?) त्याचे पोटात गेल्यावर पचन होऊन ग्लुकोज (साखर) बनते , ब्रेड चा पांढरा , चौकोनी स्लाईस कोठे गोड असतो का? पण पोटात गेल्या नंतर त्याची साखर (ग्लुकोज) तयार होते इतकेच कशाला अगदी एखादा कडू पदार्थ किंवा अगदी मिरची खाल्ली तरी त्याची साखर म्हणजे ग्लुकोजच तयार होते.

आपल्या शरीरातल्या सर्व पेशींना त्यांचे काम करण्यासाठी इंधन लागते आणि ते इंधन म्हणजेच ही साखर (ग्लुकोज)  अन्नाचे पचन झाल्यावर त्याची साखर बनते , ती रक्तात मिसळली जाते आणि शरीरातल्या प्रत्येक पेशी ला इंधन म्हणून पुरवली जाते त्यासाठी आपल्या शरीरभर रक्त वाहिन्यांचे मैलोगणिक जाळे पसरलेले असते.

शरीराची सर्व नियमीत कामे ( हालचाल, बोलणे-चालणे, पचनक्रिया, श्वासोश्वास इ) सुरळीत चालू ठेवण्यासाठी आपल्या शरीरातल्या रक्तात थोडेसे का होईना ग्लुकोज (साखर) कायम राखलेले असते. निसर्गाने रक्तातली साखर एका सुनिश्चित पातळी वर ठेवण्याची उत्तम सोय केलेली असते. सर्वसाधारण पणे निरोगी व्यक्तीच्या शरीरात साधारण (सरासरी) ५ लिटर रक्त खेळत असते आणि ज्याला मधुमेह नाही अशा व्यक्तीच्या संपूर्ण शरीरभरातल्या ह्या ५ लिटर रक्तात मिळून ४ ते ५ ग्रॅम (म्हणजे चहाचा एक चमचा इतकी साखर!) इतकी साखर कायमच राखलेली असते

रक्तातली साखर ही मिलिग्रॅम एका डेसी लिटर साठी (मिग्रॅ / डेली  – mg / dl ) या प्रमाणात मोजली जाते ( मिलिग्रॅम म्हणजे ग्रॅम चा एक हजारावा भाग , डेसी लिटर म्हणजे लिटरचा दहावा भाग).

रक्तात  ४ ते ५ ग्रॅम साखर असावी लागते हेच मिग्रॅ / डेली mg / dl मध्ये  ८० ते १०० मिग्रॅ / डेली mg / dl असे म्हणता येईल. हा हिशेब सोपा आहे , ८० mg / dl म्हणजेच ८० मिलिग्रॅम प्रत्येक डेसी लीटर साठी , म्हणजेच ८०० मिलिग्रॅम प्रत्येक लीटर साठी . आपल्या शरीरातल्या ५ लिटर रक्त असते त्या हिशेबाने ४००० मिलिग्रॅम ( ८०० गुणिले ५) साखर असते , म्हणजेच ५ लीटर रक्ता मध्ये  ४ ग्रॅम साखर.

यावरुन आपल्याला हे कळेल की निरोगी ( मधुमेह नसलेल्या व्यक्ती) ची आदर्श ब्लड शुगर ही   ७० ते १०० mg / dl अशी नियंत्रीत केलेली असते , किमान आपले शरीर ती तशी ठेवण्याचा प्रयत्न तरी करत असते.

अर्थात ही अशी साखरेची आदर्श पातळी (७० ते १०० mg / dl) संपूर्ण दिवसभर तशीच राहते असे मात्र अजिबात नाही.

आपण जेव्हा रात्रीचे जेवण करून झोपतो आणि साधारण सात-आठ तासांची झोप घेऊन दुसर्‍या दिवशी सकाळी उठतो , झोपेत गेलेल्या त्या सात- आठ तासांत आपण काही खात नसल्यामुळे सकाळी जेव्हा आपण झोपेतून जागे होतो तेव्हा आपल्या रक्तातली साखर ही तिच्या आदर्श पातळी वर म्हणजेच ७० ते १०० mg / dl  अशी असते नव्हे तशी ती असायलाच हवी ! यालाच ‘फास्टींग ब्लड शुगर’ म्हणतात.

त्यानंतर दिवसभरात ही रक्तातली साखर सतत कमी – जास्त होत राहताना दिसते, आपल्या दिवसभराच्या हालचाली, व्यायाम, ताण-तणाव, आणि अर्थातच खाणे ( आणि पिणे – बसणे देखिल ! –  खूप जणांच्या जिव्हाळ्याचा या विषयावर एक खास लेख लौकरच लिहणार आहे!! ) यावर हा साखरेतला चढ-उतार अवलंबून असतो.

आपण आधी पाहीले आहे की आपण काही खाल्ले की त्याची साखर तयार होते आणि ती रक्तात मिसळली जाते त्यामुळे काही खाणे झाल्या नंतर रक्तातल्या साखरेची पातळी ७० ते १०० mg / dl पेक्षा जास्त होते , हे स्वाभाविकच आहे. ही साखरेतली वाढ किती होणार , किती वेळात होणार हे आपण काय खातो आणि किती खातो यावर अवलंबून असते. आपल्या अन्नातले काही घटक असे असतात की त्यांचे पचन झटपट होते आणि अर्धा एक तासात त्याची साखर तयार होऊन ती रक्तात दाखल पण होते , काही अन्न घटक पचायला वेळ लागतो त्यामुळे त्या पासुन साखर बनायला जास्त वेळ लागतो. (या बाबतीत मी काही आलेख माझ्या आधीच्या काही पोष्ट्स मधून दिले आहेत ते पुन्हा एकदा पहा)

सर्व साधारण हिशेबाने पाहील्यास, आपण काही खाल्ल्या नंतर अर्धा तास ते एक तासात रक्तातली साखर वाढते. अर्थात निसर्गाने ह्या वाढलेल्या साखरेचा निचरा करण्याची यंत्रणाही उभी केली आहे, ही यंत्रणाही साधारण याच वेळात कार्यरत होते आणि रक्तात ‘इन्शुलिन’ नामक संप्रेरक दाखल केला जातो, या ‘इंन्शुलिन’ चा वापर करुन आपल्या शरीरातल्या सर्व पेशी साखर खेचायला सुरवात करतात , याचाच परीणाम म्हणून ह्या वाढलेल्या साखरेचा झपाट्याने निचरा व्हायला सुरवात होते,  म्हणजेच रक्तातली साखर जशी झपाट्याने वाढते तशी ती झपाट्याने कमी पण होते (व्हायला हवी !)

साधारणपणे जेवल्या नंतर तासाभरात आपल्या रक्तातली साखर तिची सर्वोच्च पातळी गाठते आणि तिथून पुढे ती कमी होत राहते आणि सुमारे दोन एक तासांनी रक्तातल्या साखरेचे प्रमाण ११०-१२० च्या आसपास येऊन पोहोचते , म्हणजे ७० ते १०० mg / dl या स्थिर पातळीच्या किंचीत जास्त. पण साखर खेचण्याचे काम अजूनही चालू असल्याने जेवल्या नंतर तीन-चार तासांनी ती  ७० ते १०० mg / dl या मूळच्या पातळी वर स्थिरावते, सारे सामसुम होते. अर्थात हे होण्यासाठी या साठी जेवल्या नंतर किमान तीन – चार तास तरी नविन खाणे व्हायला नको. तसे खाणे झाल्यास रक्तातल्या साखरेला ७० ते १०० mg / dl या मूळच्या पातळी वर येण्याची उसंतच मिळणार नाही!

जेवण – खाण केल्या नंतर जी शुगर वाढते त्याला  पोस्ट प्रांडियल (Post Prandial) म्हणजेच पीपी शुगर म्हणतात. साधारण पणे ‘पीपी शुगर’ जेवणानंतर दोन तासांनी मोजायची असते, हे दोन तास म्हणजे जेवणा पूर्ण झाल्या नंतरचे दोन तास नाहीत तर जेवणाच्या पहिला घास घेतल्या नंतरचे दोन तास असावे लागतात. बरेच जण जेवण पूर्ण झाल्यावर हात धुतल्या नंतरचे दोन तास मोजतात हे चुकीचे आहे. जेवणाचा पहीला घास घेतला ती वेळ नोंदवावी, मग आपल्या तब्बेतीत जेवण करावे (कोणाचे जेवण पंधरा मिनिटात होईल तर कोणाला अर्धा तास लागेल) , त्यानंतर पहीला घास घेतल्याच्या बरोब्बर दोन तासांनी रक्तातली साखर मोजायची ती खरी ‘पीपी शुगर ‘ असते.

एखाद्या निरोगी आणि मधुमेह नसलेल्या व्यक्तीच्या रक्तातल्या साखरेचे (आदर्श) प्रमाण असे असते:

 


 


 

ही झाली आदर्श स्थिती , आता जर एखाद्याची अनशी पोटीची साखर (किमान सात- आठ तासांत काहीही खाल्ले प्यायले नसले तर)) जर १०० mg / dl पेक्षा जास्त असेल तर ते एक काळजीचे लक्षण असते! जर ही फास्टींग शुगर १०० ते १२५ mg / dl अशी असेल तर त्याला मधुमेह पूर्व ( Pre diabetes ) स्थिती मानली जाते, म्हणजे ही मधुमेहाची सुरवात आहे असे समजले जाते.

अर्थात  फास्टींग शुगर १०० ते १२५ mg / dl असणे हे ‘मधुमेहाची चाहूल’ या गटात मोडत असले तरी , बर्‍याच मधुमेह नसलेल्या व्यक्तींच्या बाबतीत काही वेळा ही अशी साखर आढळते देखील, त्याची ही काही कारणें आहेत, पण त्याचा विचार आपण नंतर एका स्वतंत्र लेखा द्वारे करूयात.

जर फास्टींग शुगर १०० ते १२५ mg / dl  या पातळीवर सातत्याने रहात असेल तर मात्र ते निश्चितच मधुमेह पूर्व ( Pre diabetes ) स्थितीचे लक्षण मानले जाते.

अशी साखर असणार्‍या व्यक्तींना मधुमेहाची लागण झाली असेल असे म्हणता आले नाही तरी ह्या व्यक्तींना आगामी काळात मधुमेह होण्याची मोठी शक्यता असते. अशी साखर आढळली तर मधुमेह होऊ नये म्हणून ताबडतोब प्रयत्न सुरु करणे आवश्यक असते. बर्‍याच वेळा केवळ पथ्य , व्यायाम , जीवन शैलीत बदल अशा विना औषधी उपाय योजनांनी या होऊ पाहणार्‍या मधुमेहा ला चार हात लांब ठेवणे सहज शक्य आहे.

आता जर ही फास्टींग शुगर १२५ mg / dl पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला मधुमेहाची लागण झाली आहे असा निदान प्राथमीक अंदाज तरी नक्कीच करता येतो. पण नक्की निदान करता येणार नाही त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीची  ‘पोस्ट प्रंण्डीयल’  Post Pradndial’ म्हणजेच पीपी साखर शुगर तपासणे देखील अत्यावश्यक असते.

शक्यतो फास्टींग आणि पीपी शुगर तपासण्या एकाच दिवशी केल्या जातात. म्हणजे सकाळी उठल्या बरोबर लगेचच फास्टींग शुगर तपासली जाते. ही तपासणी करण्या पूर्वी काहीही खायचे – प्यायचे नसते ( चहा – अगदी बिनसाखरेचा चहा देखील नाही ,ग्रीन टी, कॉफी, दुध, लिंबू पाणी, मध पाणी, ताक, जडी बुट्टी , मेथीचे दाणे वा इतर औषधे असले काहीही चालणार नाही, फक्त साधे पाणी चालू शकेल), फास्टींग  शुगर साठी रक्त दिल्या नंतर नेहमीचा दिनक्रम चालू करायला हरकत नाही. नेहमीच्या वेळी दुपारचे जेवण घ्यायचे, जेवणात नेहमी असतात तेच खाद्य पदार्थ ठेवावे,  चाचणी करायची आहे म्हणून ठरवून कमी खाणे किंवा बघुया किती शुगर वाढते ते म्हणून खूप गोड पदार्थ खायचे असे पण करायचे नाही. या जेवणाचा पहीला घास घेतला ती वेळ नोंदवून त्यानंतर बरोब्बर दोन तासांनी तपासणी  साठी रक्त द्यायचे.

या आधी आपण बघितले सामान्यत: मधुमेह नसलेल्या व्यक्तीत जेवणा नंतर एक तासा नंतरची साखर १४० पर्यंत वाढते आणि दोन तासांत ही साखर साधारण १००- १२० पर्यंत खाली येते आणि त्यानंतर तासाभरात ती फास्टिंग शुगर च्या पातळीवर म्हणजे ७० ते १०० वर येते.

पण मधुमेही व्यक्ती मध्ये रक्तातल्या साखरेतली वाढ खूपच जास्त असते आणि ही अशी वाढलेली साखर कमी होण्याची गती देखील कमालीची मंद असते. साखर जेवणा पूर्वीच्या पातळी वर यायला सहा ते आठ तास देखील लागू शकतात.

मात्र मधुमेह असलेल्या व्यक्ती मध्ये  जेवणा नंतर एक तासा नंतरची साखर १४० पेक्षा कितीतरी जास्त , म्हणजे २००, ३०० – ४०० पर्यंत देखील वाढते, आणि दोन तासांत ही साखर साधारण १८०- २२५ पर्यंत खाली येते ( आणि त्यानंतर चार एक तासांनी ती कशीबशी १५० च्या आसपास आली तरी जिंकले अशी स्थिती असते)

जर एखाद्याची जेवल्या नंतर दोन तासां नंतर ची साखर जर १४० mg / dl पेक्षा जास्त असेल तर ते एक काळजीचे लक्षण असते! जर ही शुगर १४० ते १८० mg / dl अशी असेल तर त्याला मधुमेह पूर्व ( Pre diabetes ) स्थिती मानली जाते, म्हणजे ही मधुमेहाची सुरवात आहे असे समजले जाते. अशी साखर असणार्‍या व्यक्तींना मधुमेहाची लागण झाली असेलच असे म्हणता आले नाही तरी ह्या व्यक्तींना आगामी काळात मधुमेह होण्याची मोठी शक्यता  असते. अशी साखर आढळली तर मधुमेह होऊ नये म्हणून ताबडतोब प्रयत्न सुरु करणे आवश्यक असते. बर्‍याच वेळा केवळ पथ्य , व्यायाम , जीवन शैलीत बदल अशा बिन औषधाच्या उपाय योजनांनी मधुमेहा ला  चार हात लांब ठेवणे शक्य आहे.

सध्या मधुमेह नसलेल्या पण होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तीच्या रक्तातल्या साखरेचे प्रमाण असे असते:

  

जर ही पी.पी. शुगर १८० mg / dl पेक्षा जास्त असेल तर त्याला नक्की मधुमेह (diabetes ) झाला आहे असे मानले जाते,  अशी साखर असणार्‍या व्यक्तींना मधुमेहाची लागण झाली आहे असे समजून पथ्य , व्यायाम , जीवन शैलीत बदल आणि मधुमेहा साठी असलेली प्रारंभीची औषधे ( बहुदा मेटफॉर्मिन ) अशा उपाय योजनांनी मधुमेहा वर उपचार केले जातात.

 

मधुमेह  असलेल्या आणि तो नियंत्रणात नसलेल्या व्यक्तीच्या रक्तातल्या साखरेचे प्रमाण असे असते:

 

 

 

म्हणजेच सकाळची अनश्या पोटीची साखर आणि जेवल्या नंतर दोन तासांची साखर या दोन चाचण्यांच्या साह्याने मधुमेहा चे निदान केले जाते आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांना या चाचण्यां वरुन आपला मधुमेह किती नियंत्रणात आहे हे ठरवता येते.

मधुमेह  असलेल्या आणि तो नियंत्रणात ठेवलेल्या  व्यक्तीच्या रक्तातल्या साखरेचे प्रमाण असे असते:

 

अर्थात मधुमेहाचे निदान / नियंत्रण या साठी केवळ फास्टींग – पीपी या दोन चाचण्यांच्या जोडीला HbA1C ही चाचणी देखील केली जाते.

फास्टींग किंवा पीपी या चाचण्या केवळा एका विषीष्ठ क्षणाची ( चाचणी केलेल्या वेळेची) साखर सांगतात, आज चाचणी केली तेव्हा साखर किती हे या चाचण्यातून कळले तरी काल किती साखर होती हे  त्यातून कळणार नाही   HbA1C वरून आपल्याला मागच्या तीन महीन्यातली सरासरी साखर किती राखली गेली आहे ते कळते. ही चाचणी बरीच विश्वासार्ह्य आहे. फास्टींग किंवा पीपी चाचण्या , चाचणी करण्या आधी काय खाल्ले होते यावर अवलंबून असतात कारण रक्तातल्या साखरेचे प्रमाण आपण काय खातो , किती खातो यावरच अवलंबून असते.  त्यामुळे या दोन चाचण्यांचे निकाल काही फसवे असू शकतात . बरेच चाणाक्ष लोक्स अशा चाचण्या करण्या पुर्वी स्कोअर कमी यावा म्हणून खास (?) उपाय करतात त्यामुळे या चाचण्यांचे निकाल (मधुमेह नाही  असा!)  चांगले येतात , ते  ‘खास ‘ उपाय कोणते हे लिहण्याची ही जागा नाही !!

मात्र असे अशी फसवाफसवी HbA1C टेस्ट मध्ये करता अजिबात येत नाही त्यामुळेच आजकाल ह्या HbA1C चाचणी वर जास्त भरवसा ठेवला जातो. अर्थात HbA1C चाचणी चे स्वरुपच असे आहे की त्यातूनही काही वेळा फसगत होऊ शकते ! पण त्याबद्दल नंतर कधी तरी.

मधुमेहाचे रोग निदान करण्यासाठी आणखी एक चाचणी करता येते त्याला ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (OGTT) म्हणतात , त्याबद्दल ही मी एक सविस्तर लेख लिहणार आहे.

पुढच्या काही लेखांतून आपण या मधुमेहा बद्दल आणखी काही माहिती , त्याच्या तपासण्यां बद्दल, प्रचलित उपचारां बद्दल माहिती घेत राहणार आहोतच.

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+7

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

7 प्रतिक्रिया

///////////////
   1. Prashant

    Dear Suhasji,
    I have read that type -2 diabetes is further classified into cluster-2 insulin dependent who are prone to retinopathy, cluster -3 insulin resistant prone to neprhropathy, cluster-4 who get milder form of diabetes due to obesity and cluster -5 age related who also have milder form.
    Your thoughts on this? Also awaiting more articles on the ongoing series.
    Thanks and Regards,
    Prashant

    0
    1. सुहास गोखले

     धन्यवाद श्री प्रशांतजी , या बाबतीत मला माहिती आहे , जसा वेळ मिळेल तसे या विषयावर नक्की लिहेन

     सुहास गोखले

     +1
  1. सुहास गोखले

   इथेच हाये जी , मी कुठे जाणार ? नवीन लेख म्हणाल तर काही लेख अर्धवट लिहून तैयार आहेत पण इतर पोटापाण्याच्या कामात बिजी असल्याने वेळ मिळत नाही पण या मार्क्घ महीन्यात एकंदर तीन नवे लेख प्रकाशीत करण्याचा प्लॅण आहे , तेक्व्हा जराशी प्रतिक्षा करावी लगणार त्या बद्दल स्वारी !

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.