प्रश्नकुंडलीत दोन भाव महत्वाचे असतात, प्रश्नकर्ता व ज्या बाबतीत प्रश्न विचारला गेला आहे ती बाब दर्शवणारा भाव.
प्रश्नकुंडलीतला प्रथम भाव / लग्न स्थान (1) हे नेहमीच ‘जातक / प्रश्नकर्ता’ दाखवते व कुंडलीतले इतर भाव हे त्या जातकाचे/ प्रश्नकर्त्याचे हितसंबंध दाखवतात.

उदाहरणार्थ द्वितीय (2) स्थान जातकाचा पैसा , चतुर्थ (4) स्थान जातकाचे घर-आई-वाहनें-शिक्षण-आयुष्याचे अखेरचे दिवस , षष्ठम (6) स्थान जातकाची नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणाची उपस्थिती – आरोग्य- नोकरचाकर-पाळीव प्राणी, भाडेकरु दाखवते इ. याप्रमाणे प्रश्नकुंडलीतले प्रत्येक स्थान हे जातकाच्या कोणत्या न कोणत्या बाबीं बद्दल भाष्य करत असतेच असते.

जातक जेव्हा स्वत:चाच प्रश्न विचारतो तेव्हा हे सर्व ठीक पण बर्‍याच वेळा जातक दुसर्‍या व्यक्तीच्या संदर्भात प्रश्न विचारतो तेव्हा काय करायचे?

तसे पाहीले तर एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीला न विचारता , न सांगता त्या व्यक्तीच्या संदर्भात प्रश्न विचारणे नैतिकतेला धरुन होत नाही . दुसर्‍या व्यक्तीची खासगी माहीती उघड करणे, त्या व्यक्तीच्या खासगी प्रश्नां बद्दल इतरांशी चर्चा करणे , त्या व्यक्तीच्या प्रश्नांबद्दल इतरांच्या कडून सल्ला / मार्गदर्शन मागणे इ बाबीं त्या व्यक्तीच्या ‘प्रायव्हसी’ चे उल्लंघन ठरते , भारतात या बाबतीत फारसा विधीनिषेध पाळला जात नाही, किंबहुना भारतातले कायदेकानु तितकेसे सक्षम नाहीत किंवा त्याचे पालन प्रभावी पणे होताना दिसत नाही , पण परदेशात हा एक मोठा कानूनन अपराध मानला जातो व त्याला शिक्षा होऊ शकते.

मी माझ्या प्रॅक्टीस मध्ये या बाबीं वर खास लक्ष देतो. जर कोणी दुसर्‍या व्यक्ती संदर्भात प्रश्न विचारला , मग ती दुसरी व्यक्ती अगदी त्याची बायको, मुलगा, मुलगी, भाई, बहीण अशी अगदी जवळचे नातेवाईक असली तरीही, मी प्रश्न विचारणार्‍याला स्पष्ट्पणे सांगतो “जर आपण दुसर्‍या व्यक्तीच्या वतीने प्रश्न विचारणार असाल तर त्या दुसर्‍या व्यक्तीची याला परवानगी असणे जरुरीचे आहे आणि तशी परवानगी घेतल्याचे आपण प्रश्न विचारताना स्पष्ट्पणे नमूद करावे.“ . आता या ठिकाणी या बाबतीत फार साक्षीपुरावे मागत बसणे व्यवहार्य होणार नाही, तेव्हा “तशी परवानगी घेतल्याचे “ एक फॉर्मल डिक्लरेशन मी पुरेसे मानतो. कोठेतरी आपल्याला जातकाच्या खरेपणा वर विश्वास ठेवावा लागतो.

असो, आता जेव्हा जातक दुसर्‍या व्यक्ती बाबत किंवा दुसर्‍या व्यक्तीच्या वतीने प्रश्न विचारत असतो तेव्हा प्रश्नकुंडलीतले कोणते दोन भाव बघायचे?

प्रश्न जरी दुसर्‍या साठी विचारला असला तरीही प्रश्नकुंडलीतला प्रथम भाव(1) हा त्या प्रश्न विचारणार्‍याचाच (जातक) !  तो बदलत नाही हे लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

समजा बबनरावांनी त्याच्या मुलीच्या , सुचेता च्या विवाहासाठी प्रश्न विचारला असेल तर?

प्रश्नकुंडलीतला प्रथम भाव (1) अजुनही ‘बबनरावां’  बद्दलच बोलणार , द्वीतीय भाव (2) अर्थातच बबनरावांचा पैसा इ. पण प्रश्न त्यांच्या मुलीच्या – सुचेता ताईचा आहे, तिच्या विवाहाचा आहे! प्रश्नकुंडलीतला पंचम भाव (5) हा संतती चा असतो, म्हणजेच या उदाहरणात पंचम भाव ‘सुचेता’ बद्दल सांगेल.आता विवाह , वैवाहिक जीवनातला जोडीदार सप्तम भावा (7) वरुन पाहतात. प्रश्नकुंडलीतला सप्तम भाव बबनरावांच्या विवाहा बद्दल व बबनरावांच्या पत्नी बद्दल सांगेल , पण आपल्याला तर सुचेता च्या लग्ना बद्दल पाहावयाचे आहे. म्हणजे आपल्यला सुचेताचा सप्तम भाव बघितला पाहीजे, या उदाहरणात आपण पाहीले की पंचम स्थान (5) म्हणजे सुचेता , म्हणजेच पंचमाचे सप्तम स्थान म्हणजे लाभ स्थान (11) सुचेताच्या विवाह आणि वैवाहीक जोडीदारा बद्दल सांगेल.

हे कसे मोजले हो?  सोपे आहे  ज्या स्थाना पासुनचा पुढचा भाव बघायचा तिथूनच मोजायला सुरवात करायची  (या उदाहरणा प्रमाणे पंचम स्थान) आणि  जेव्हढी घरे पुढे जायचे, तितके अंक मोजायचे . या उदाहरणात आपल्याला पंचमाचे सप्तम बघायचे आहे , तर 5 पासून सुरवात करायची आणि सात अंक पुढे जायचे  एकदा बोटांवर मोजून बघा : 5 – 6 – 7 -8 -9 -10 -11, .आले  लक्षात! बरेच वेळा विद्यार्थी इथे चुका करतात. या उदाहरणात 5 स्थाना पासून सुरवात न करता 6 पासून सुरवात करतात , मग जो व्हायचा तो घोळ होतोच , चक्क बारा वाजतात !

आपण हा जो काही उद्योग केला त्याला मूळ प्रश्नकंडली फिरवून घेतली असे म्हणतात,  प्रश्नकुंडली अशी फिरवायची की सुचेता दाखवणारा पंचमभाव हाच लग्न (1) भाव होईल, मग मूळ पत्रिकेतला षष्ठम (6) भाग सुचेताचा पैसा , लाभ स्थान (11) सुचेता चा  ‘घोव’!

समजा हेच बबनराव त्यांच्या नातवा बद्दल विचारत असतील तर? आता हा नातू कोण? अहो, काय हे एव्हढ्याच विसरलात काय, सुचेता चे लग्न झाले नै का दोन वर्षापूर्वी, तिचाच हा मुलगा हो, ‘अनुभव’ नाव ठेवलेय त्याचे , पण हे अस्से भरपूर जावळ म्हणून सगळे त्याला ‘धोनी’ म्हणतात हो लाडाप्रेमाने !

प्रश्न बबनरावांच्या नातवा बद्दल ‘धोनी’ बद्दल आहे, म्हणजे ‘फिरवा फिरवी’ ओघानेच आली!

प्रथम भाव (1) : बबन आजोबा !
पंचम स्थान (5): सुचेता मम्मा
पंचमाचे पंचम म्हणजे सुचेताबाईंचे अपत्य म्हणजेच नवम स्थान (9): ‘धोनी’ !

थांबा ! आपण आधी बघितले आहे की प्रश्नाच्या अभ्यासाला कमीतकमी दोन भाव लागतात, त्यातला एक भाव सापडला नवम स्थान (9): ‘धोनी’ ! पण प्रश्न काय होता, या ‘धोनी’ सायबांना बाल दमा आहे, तेव्हा त्यात सुधारणा होईल का हा तो प्रश्न! प्रश्न आरोग्या संदर्भात आहे म्हणजे षष्ठम (6) स्थान, पण प्रश्न कुंडलीतले षष्ठम (6) स्थान नाही बघायचे ते तर बबनरावांच्या ब्लडप्रेशर आणि मोतीबिंदू बद्दल सांगेल , आपल्याला ‘धोनी’ चे आरोग्य बघायचे आहे, नवम स्थान (9): ‘धोनी’ , नवमाचे षष्ठम (6) ,  9 – 10 -11 -12 -1 -2 , म्हणजे द्वितीय स्थान (2) म्हणजे या ‘धोनी’ चा बाल दमा !! आले लक्षात?

‘अशी ही ‘फिरवा फिरवी’ ! एखादे कोडे सोडवल्या सारखी मज्जा येतेय नै !

चला मग जरा आपल्या मेंदूला खुराक! काही प्रश्न देतो, सांगा पाहू त्यांची उत्तरें देताना कोणते दोन प्रमुख भाव आपल्याला वापरायला लागतील ते?

आनंदरावांचे प्रश्न:

 1. माझी मेव्हणी घर विकायच्या प्रयत्नात आहे , विकले जाइल का हो तिचे घर?
 2. साला, महागाई महागाई, पगार पुरत नाही अगदी आणि ते मोदींचे अच्छे दिन काही अजून आले नाहीत, अनायसे इयर ऐंड जवळ आलेच आहे तेव्हा पगार वाढी बद्दल बॉस शी बोलून बघू का एकदा ?
 3. या उन्हाळ्यात कूलू मनालीला जायचे ठरतेय , ट्रीपचे काही जमेल का? ट्रीप चांगली होईल का?
 4. आमचा ‘खंड्या’ कुत्रा काल पासून गायब आहे, सगळी कडे शोधले , पत्ता लागत नाही, सापडेल का आमचा ‘खंड्या”?
 5. माझे धाकटे बंधूराज त्या ‘विकीसेठ’ बरोबर भागीदारीत ट्रॅवल कंपनी काढायचे म्हणताहेत, होईल का ही भागीदारी यशस्वी ? का आहे मागच्या वेळे सारखा दगा फटका?
 6. आताशा मला  ‘गॅसेस’ चा फार त्रास होतोय, काय सांगू, पब्लीक मध्ये वावरताना अगदी पंचाईत होते हो, लोक सतत संशयाने बघतात , अगदी मेल्या हून मेल्या सारखे होते,  त्याबद्दल काही तरी सांगा ना?
 7. माझी मुलगी सायली,  त्या पं. मुद्दनहळ्ळीकरां कडे गाणे शिकायला  जाते,  त्या  पं. मुद्दनहळ्ळीकरांच्या बायकोच्या भावाला शेअर्स मध्ये गुंतवणुक करायची आहे , ती लाभदायक ठरेल का?
 8. सायलीची (माझी मुलगी) मैत्रीण दिपाली आहे ना तिच्या मोठ्या बहीणीला तिच्या सासर्‍यांकडून मृत्यूपत्रा द्वारे काही डबोले मिळणार आहे का?
 9. आमच्या जुन्या घराचे रिनोव्हेशन करायचे म्हणतोय, बरीच पाडापाडी होईल, माझी आजी नेहमी म्हणायची घरात म्हणे गुप्तधन आहे, या पाडापाडीत सापडेल का हो असले काही ?
 10. घराचे सगळे वायरिंग बदलायला झाले आहे, एका इलेक्टीशयनला काम द्यायचे म्हणतोय, करेल का हो तो काम व्यवस्थित?
 11. माझे आजोबा 1956 साली गेले , त्यांची आठवण म्हणून त्यांची जपाची माळ मी अगदी जपून ठेवली होती , पण आता ती सापडत नाहीये , कोठे असेल , काही सांगता येईल?
 12. सोने -चांदी बाजार परत उसळी मारणार आहे असे ऐकतोय , काय होईल हो?
 13. आमच्या धाकट्या सुनबाई प्रेग्नंट आहेत , डॉक्टरांनी मे मधली तारीख दिलीय , त्याबद्दल प्रश्न नाही , पण मुलगा होइल का मुलगी सांगा.
 14. कोणाला सांगू नका हो, एकदम शिक्रेट ठेवायचे बरे का, पण माझे जरा ते हे म्हणतात ना , ते हे हो, नाही समजलात अजून? ते आपले ‘बाहेरचा नाद’ म्हणतात ते , जरा त्या ‘सुरंगे’ बरोबर गुळपीठ चालू आहे, इनामदार कुळातले आम्ही! असले षौक तसे अनुवंशीकच, तेव्हा बघा जरा त्या ’सुरंगे’ चा काय मूड आहे, काय नूर आहे? हा, पण एकदम शिक्रेट ठेवायचे हां, नैतर आमच्या घरी सांगाल आणि आमचे ‘खळ्ळ खट्ट्याक ‘ व्हायचे!
 15. मला ना आजकाल  स्वप्नात हे मोठ्ठाले साप दिसतात, साप म्हणून नका, नाग म्हणून नका, अजगर दिसतात , ते अ‍ॅनाकोंडा का काय म्हणतात ना तो पण दिसला होता एकदा, त्याचे काय? हे साप दिसणे कधी थांबेल?
 16. आमचे शेजारी आहेत ना,  ते   ‘चौगुले सरकार’ हो, त्यांच्या आत्तेभावाच्या बायकोचा काहीतरी इन्शुरन्स चा क्लेम पेंडिंग आहे,  त्याचे काय, कधी मिळेल क्लेम?
 17. दोन वर्षापूर्वी आमच्या जावईबापूंनी त्या संग्राम भाऊ ला धंद्यासाठी काही पैसे अगदी कायदेशीर लिखापढी करुन दिले होते, आता संग्राम भाउ देत नाही जा म्हणतो, कोर्टात केस घालावी का?
 18. आपला म्हणले तर विश्वास आहे म्हणले तर नाही , पण काहो, ‘देव/ परमेश्वर/ गॉड ’ प्रत्यक्षात आहे का का काल्पनीक ?
 19. आमच्या सौभाग्यवतीची मैत्रीण त्या  ‘कल्पना ताई’ ,  त्या नाही का कॅनडात असतात,   त्यांच्या सुनेच्या धाकट्या बहीणीच्या लग्ना चा प्रश्न आहे, चार वर्षे झाले बघताहेत, कधी योग आहे?
 20. ते गोपाळ गुरुजी नाही का आमच्या घरच्या मंदीराच्या पुजेअर्चे चे बघतात ते, त्यांच्या बायकोच्या मामेबहीणीच्या शेजार्‍याचा प्रश्न आहे , नोकरी सूटली हो त्यांची , दुसरी मिळेल का?
 21. ते मोदींचे अच्छे दिन कब आनेवाले हैं?

आपण आपली उत्तरे मला कळवल्यास ती तपासून देईन. आपली उत्तरें ईमेल मार्फतच कळवा , परस्पर कॉमेंट मध्ये लिहू नका , मी अशा कॉमेंटस प्रकाशीत करणार नाही किंवा त्याला उत्तर देणार नाही.

माझी ईमेल आयडी आहे suhas———–dot——-astro———-AT——–gmail———–dot————-com!

या ‘क्वीज’ ची उत्तरें ब्लॉग वर प्रकाशीत होणार नाहीत तेव्हा कळेलच नंतर अशी वाट पाहू नका! जे प्रयत्न करतील त्यांनाच उत्तरे कळवण्यात येतील . तुम्हाला जर काही शिकायचे असेल तर तुमच्या कडून प्रयत्न झालेच पाहीजेत, स्पून फिडींग ची अपेक्षा धरु नका. प्रश्न सोडवण्या साठी जो काही अभ्यास करायचा , ग्रंथ ढूंडाळायचे ते सगळे तुमचे तुम्ही बघायचे , ते कसे हे मला विचारु नका , ही बालवाडी नाही.

आणखी एक , आपली उत्तरें ईमेल मध्येच लिहा , वेगळी टेक्स्ट फाइल (. txt, .docx. .pdf. , .xlsx) इमेल सोबत अ‍ॅटॅच करु नका , व्हायरस च्या भितीने मी अ‍ॅटचमेंटस उघडत नाही.

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

7 प्रतिक्रिया

///////////////
 1. Gaurav Borade

  Sorry but cant control Sir…. Ek comment tar denarach ya Post sathi… Ekach Number… 🙂 khup chaan post.. & of course tya prashnanchi uttare denyacha prayatna pan karen…

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद गौरवजी,
   अहो साध्या नेहमीच्या कॉमेंती चालतील . प्रश्नांची उत्त्रें देणार्‍या कोमेंटी आल्या तर इतर अभ्यासकांना उत्त्रें आधिच कळतील मग त्या कोड्यांतली मजाच निघून जाईल.

   शुभेच्छा !
   सुहास

   0
 2. सुहास गोखले

  धन्यवाद राहुलजी,

  अभ्यास करायचा म्हणून उदाहरणे जरा जास्त ताणलेली दिली आहे पण प्र्त्यक्षात लोक काहीही विचारतात , ज्योतिषाला हे ठरवता आले पाहीजे की कोणत्या प्रश्नाचे उत्तर द्याय्चे आणि कोणत्या नाही.
  बाकी आपण उत्तर पत्रिका पाठवली तर तपासून दईन. बघा प्रयत्न करुन!

  शुभेच्छा
  सुहास

  0
 3. swapnil kodolikar

  सुहास जी आपण अभ्यासासाठी प्रश्न दिले आहेत पण कुंडली कोणती घ्यायची ? म्हणजे तुम्ही कुंडली दिलेली नाही का इथे मला दिसत नाही ती ?? आणि उत्तरे कोणत्या पद्धतीने द्यायची आहेत ? पारंपारिक पद्धतीने का कृष्णमुर्ती ने कारण मला फक्त पारंपारिक पद्धत माहिती आहे .please Replay… Thaks …!

  0
  1. सुहास गोखले

   स्वप्नीलजी,

   धन्यवाद.

   आपल्याला प्रश्नाचे उत्तर शोधायचे नाही आहे. फक्त प्रश्नाचे उत्तर कसे शोधणार ते सांगायचे आहे. त्यामुळे कोणतीही कुंडली दिलेली नाही / लागणार नाही. कृष्णमुर्ती पद्धती किंवा पाश्चात्य होरारी पद्धती मध्ये असलेली विचार सरणी अपेक्षित आहे. पारंपारीक पद्धतीने याची उत्तरे देणे कितपत शक्य होईल या बद्दल मला शंका आहेत.
   शुभेच्छा.
   सुहास

   0
 4. अतुल बर्वे

  सर ,

  एकच प्रश्न विचारतो .

  प्रश्नकुंडली मधले भाव हे पारंपारीक पद्धतीप्रमाणेच समजायचे का ?

  मला प्रश्नकुंडलीतले 1% सुद्धा कळत नाही . पण गेले काही दीवस तुमचे लेख ब्लाॅगवर वाचत होतो . म्हणून उगाचच खुमखुमी आली . एकचा नोकरीचा प्राॅब्लेम म्हणून जन्म लग्न कुंडली मोबाईल अॅपमध्ये तयार करून बघीतली .

  नंतर तुमच्या युट्युब वरच्या व्हीडीओ प्रमाणे प्रश्न कुंडलीही तयार करून बघीतली . आणी खरोखरच काय चमत्कार झाला माहीत नाही . त्याची नोकरी वारंवार अनपेक्षीतपणे जाते हे दोन्ही कुंडल्यांमधून रीफ्लेक्ट होतय .

  जन्म लग्न कुंडलीत शष्ठ भावात रवि , प्लुटो आणी हर्षल तर प्रश्न कुंडलीत दशम स्थानात रवि , प्लुटो आणी त्यावर हर्षलाची नजर .

  हा केवळ योगायोग समजायचा का ?

  उत्तराची वाट बघतोय ….

  0
  1. सुहास गोखले

   श्री अतुलजी,

   सप्रेम नमस्कार

   आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   आपण जे लिहले आहे ते निव्वळ योगायोगाच्या म्हणजेच ‘कावळा बसायला ठांपी मोडायला गाठ पडली’ असे म्हणतात तसे झाले असावे.
   कृपया यावरून कोणतेही नियम / थिअरी बनवायचा प्रयत्न करू नये अशी कळकळीची विनती , नाहीतर आजकाल काय झाले आहे ‘एखाद्या अनुभवाच्या’ जोरावर नियम तयार करुन ‘फेसबुक / यु ट्युब’ सारख्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी द्यायची लाट आली आहे असे दिसते. तशातला प्रकार होऊ नये असे.

   असो.

   शुभेच्छा

   आपला

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.