“काय होता तुमचा प्रश्न?”

ज्योतिषीबुवा मख्खा सारखे पुन्हा विचारते झाले…

“अहो, अपॉईंटमेंट घेतानाच मी तो सांगीतला होता ना?”

“त्याचे काय आहे , मला रोज इतके फोन येतात ना की सगळे डिटेल्स लक्षात ठेवणे अवघड जाते.”

“मग लिहून का ठेवत नाही ?”

“लिहलेले असतेच हो, पण ते लिहून ठेवलेली वही , शिंची कोठे ठेवली ते आत्ता आठवत नाही”

“कमाल आहे, व्यवसायीक ज्योतिषी तुम्ही मग किमान जातकाने दिलेली माहीती, जातकाने विचारलेले प्रश्न यांच्या नोंदी सहज हाताशी राहतील अशी व्यवस्था असायला पाहीजे ना?”

“वाsss, राजे, आता मी व्यवसाय कसा करावा याचे धडे देणार का मला?”

“तुम्हीच ही वेळ आणलीत नाही का?”

ज्योतिषीबुवा चिडचिडे झाले, पुढे झुकून त्यांनी एक दोरी दोन -तीनदा जीव खाऊन खेचली , ही तीच दोरी जी छायाच्या खोलीतली (पुजेची) घंटा वाजवत होती.

बाहेर घंटानाद झाला, लगेचच ‘खार्र्र्खार्र टार्र्रर्र खरॅक खर्खर किर्र्र कुईई खटृयअ‍ॅक’ असा खुर्ची सरकवल्याचा कर्णकटू आवाज.. मग ‘धप्प धप्प’ पावलांचा आवाज…(त्या ‘ज्युरासिक पार्क’ वाल्याने छायाच्या पावलांचा हाच ‘धप्प धप्प ‘ आवाज डायनासोर साठी वापरला असावा असा मला अजुनही संशय आहे !)

छाया आत आली.. चेहेर्‍यावर तेच ते कुप्रसिद्ध पुणेरी “साला काय कटकट आहे ‘ छापाचे तुच्छ , तिरसट भाव झळकत होते!

“अग, यांची माहीती लिहून ठेवलेली वही कोठे आहे?”

छाया जिभ चावत बाहेर पळाली , आता ‘खार्र खारारा टरॅक टरॅक डार्र्रर्र कुई ठ्रॅक ‘ असा ड्रॉवर खेचल्याचा कर्कश्य आवाज आणि नंतर “खर्र खरार्र खर्र टार्र्र डार्र थॉड फाट्ट ‘ असा ड्रॉवर थाडकन बंद केल्याचा कर्णकटू आवाज सांगत होता की बाबा कदमांची कादंबरी चांगलीच रंगात आलेली असणार , छायाचा रसभंग होणे साहजीकच आहे म्हणा !

छाया आत आली, तिच्या हातात तीच ती सुरवातीला बघितलेली चतकोर , शाळकरी वही !

“अग ही ‘अपॉईंटमेंट्स ची वही दिसतेय, जातकांची माहीती लिहलेली वही कोठे आहे ?”

“सर, ती वही तर तुमच्या कडेच, या टेबलावरच तर असते नेहमी”

“शोध जरा”

छाया ने शोधकार्य सुरु केले !

आणि धुळीचा एकच खणाका उसळला, एखादे जुने बांधकाम पाड्ताना उसळतो तस्सा! काय होते आहे ते कळायच्या आतच टेबलावरचा तो पुस्तकांचा मोठा ढिगारा जमीनदोस्त झाला. (पुढे 911 ला वर्ड ट्रेड सेंटरचे टॉवर कोसळताना चे फुटेज पाहताना मला ‘दे जा वू’ झाला !) पुस्तकांच्या ढिगार्‍या पाठोपाठच टेबलावरच्या फायलीं पण धराशयी झाल्या, या दणक्याने कागदाच्या गठ्ठ्यांवर ठेवलेली वजने अस्ताव्यस्त झाली आणि मग खोलीभर कागद च कागद पसरवण्याचे काम पंख्याने इमाने इतबारे बजावले …ते जरा सावरत असतानाच ‘ठण्ण ssss ठण्ण ssss ठण्ण…. ठणाणा करत टेबलावरच्या ई-स्टीलच्या भांड्याने जमीनीकडे धाव घेतली.

“अग , जरा हळू..”

ज्योतिषीबुवा छायावर खेकसले.

शेवटी मलाच राहावले नाही..

“अहो, राहु द्या , नसेल सापडत तर, नाहीतरी पत्रिका मीच सांगीतली होती, आत प्रश्न काय होता ते पण पुन्हा एकदा सांगतो… “

मी हे एव्हढे बोलायचा अवकाश , छायाने सरांच्या परवानगीची वाट न पाहाता खोली बाहेर धाव घेतली, बाबा कदमांच्या कादंबर्‍या एव्हढ्या रंजक असतात ?

इकडे ज्योतिषीबुवा कपाळावरचा घाम पुसत म्हणाले.

“असे सहसा होत नाही , त्याचे काय झाले गेल्या आठवड्यात आमच्या परिषदेचे अधिवेशन होते , मोठा जंगी , दणक्या कार्यक्रम झाला, आपले ते हे अध्यक्ष होते , दृरदर्शन वर बातम्यांत दाखवले थोडेसे…आता त्यावेळेच्या गडबडीत इथल्या सगळ्या कागदपत्रांची जरा उलथापालथ झाली खरी..”

मी पुढे सरसावलो आणि एखाद्या सराईता सारखा समोरच्या कागदाच्या ढीगातला एक चतकोर पाठकोरा कागद उपसला , ते दोरी बांधलेले पेन शेजारीच होते ! हे एक बरे केले होते, पेनला दोरी बांधलेली असल्याने ते बिचारे लगेच सापडले तरी !

माझा प्रश्न तो काय, लिहून काढला आणि कागद ज्योतिषीबुवांकडे सरकवला.

“अ‍क्षर छान आहे हो तुमचे, अगदी मोत्याचे दाणें”

“हे माझ्या पत्रिकेने ओरडून कसे काय नाही सांगीतले ?”

माझा जरा खवचट्पणा…

हा ज्योतिषी बोगस आहे याची एव्हाना खात्री पटली होतीच , ५१ रुपये पाण्यात गेल्याची खंत विसरुन आता मी हे सगळे करमणूकीच्या अंगाने घ्यायचे ठरवले होते.

ज्योतिषाला माझा टॉन्ट समजला का नाही कोण जाणे , त्याचे पत्रिके कडे पाहणे , डोळे बंद करुन पुटपुटणे , मध्येच त्या गांजावाल्याच्या तसबिरीला नमस्कार करणे चालूच होते.

काही क्षण स्तब्धतेत गेले , त्या पंख्याच्या कर्कश्य आवाजाने सुरवातीला माझे डोके उठले होते पण आता त्याची सवय झाली होती. त्या कुबट वासाचेही तसेच. मी कान टवकारुन , ह्या ज्योतिषाच्या नव्हे त्याच्या त्या महाराजाच्या तोंडून आता कोणती भविष्यवाणी (?) बाहेर पडते याची आतुरतेने वाट पहात होतो.

असेच आणखी काही क्षण गेले आणि एक दीर्घ उसासा टाकून , लांब चेहेरा करत ज्योतिषीबुवा बोलते झाले…

“कठीण आहे”

“क्काय ?”

“तुम्हाला अपेक्षित असलेली घटनां, योग नाहीत”

“घटना घडणार नाही ?”

“अगदी तसेच काही नाही , एका अंगाने विचार केला तर घटना घडण्याचे योग पण आहेतच की , घटना घडेल पण काय सांगावे. पण दुसर्‍या अंगाने विचार केला की वाटते , ऐनवेळी कोणीतरी बिब्बा घालणार ”

“म्हणजे शेवटी नेमके काय घडणार ? “

”कठीण आहे”

“ते सांगुन झालेय”

“अहो म्हणजे नक्की सांगणे कठीण आहे असे म्हणायचेय मला”

“अहो , ही काय फिरवाफिरवी चालवली आहे , जे काही आहे ते स्पष्ट आणि नि:संदिग्ध शब्दात सांगता येणार नाही का ?”

“मी तरी काय करणार , ग्रहांचा कौलच तसा आहे ना”

“ ‘तसा’ म्हणजे ?”

“त्याचे असे आहे, घटना घडवून आणणारे ग्रह आणि घटनेच्या विरोधात असलेले ग्रह यांच्यात जोरदार रस्सीखेच होणार आहे”

“रस्सीखेच होऊ दे नाहीतर सुरपारंब्या, शेवटी जिंकणार कोण?”

“अहो, घटना घडणार किंवा नाही शेवटी तुमच्या प्रयत्नांवरच अवलंबून असणार नाही का?”

“मग त्या रस्सीखेचीचे काय?”

“ती नियती घेत असलेली तुमची परिक्षा असे समजा”

“ऑ , आता ही ‘नियती’ कोठून आली ?”

“तीच ती सगळ्याची कर्ती करवती शक्ती”

“आदिमाया?”

“तसे नव्हे हो”

“मग या कोणत्या म्यॅडम? ”

“अहो म्यॅडम काय म्हणता , तो एक सेंट्रीफ्युगल फोर्स असतो”

“आता हे काय नविन?”

“नविन नाही जुनेच आहे , तुमच्या विज्ञानाला आत्ताशीक पटायला लागलय ते”

“अहो काय बोलताय तुम्ही हे , कशाचा कशाला मेळ नाही !”

“ग्रहांचे कौल असेच असतात , त्याचा अर्थ आपणच लावायचा असतो”

“मग हा अर्थ लावायचा कोणी? मी का तुम्ही”

“आमचे हे रोजचेच काम आहे”

“होय ना , मग एकदाच काय तो लावा की अर्थ का फिर्थ आणि सांगून सोडा भविष्य”

“अरेच्चा , अर्थ सांगीतलाय ना तुम्हाला त्याचा”

“कधी ?”

“योग आहेत म्हणालो नव्हतो?”

“पण योग नाहीत असेही म्हणाला होतात ना? मग नेमके काय समजायचे मी? “

“इथेच तर खरी ‘ग्यानबाची मेख’ आहे”

“आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे?”

“गॉगलच्या काचांचा रंग बदलला की समोरच्या दृष्याचे जसे रंग बद्लतात अगदी तस्से आहे हे”

“मला अजुनही कळले नाही”

“सोप्पे आहे , असे समजा , तुम्ही करत असलेले प्रयत्न म्हणजे गॉगलच्या काचा आणि प्रयत्नांची दिशा बदलणे , गती वाढवणे म्हणजे काच बदलणे , तुम्ही प्रयत्न रुपी काच बदलली की अपेक्षित घटना घडलीच म्हणून समजा!”

“अहो , काहीही काय सांगता ?”

“हे सगळे अध्यात्म आहे बरे का , गोखले. अध्यात्म आणि ज्योतिष काही वेगळे नाहीत !”

“तुमचे अध्यात्म घाला चुलीत , जरा व्यवहारीक पातळीवर येऊन बोला ना ”

इकडे माझा संयम ढळत चालला होता तर तिकडे ज्योतिषीबुवा शांतपणे चष्म्याच्या काचा पुसत होते.

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

8 प्रतिक्रिया

///////////////
 1. स्वप्नील

  हा… हा….हा…..सगळे लेखात विनोदाची फोडणी चांगलीच जमलीये . असो पण सुहास जी आम्ही तुमचे पुढचे अनुभव हि वाचण्यास उत्सुक आहोत पण या सर्वामध्ये Perfect सांगणारा कोण भेटला का ? किवा मागे बाबाजी सारखा चक्रावून टाकणारा कोणी भेटले का ?

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   तसे पाहीले तर परफेक्ट ज्योतीष असा काही प्रकारच नसतो त्यामुळे तसे सांगाणारा कोणी असतच नाही (पर्फेक्ट सांगतो असा कोणी दावा करत असेल तर त्या व्यक्ती पासुन दहा हात लांब राहा)

   आपण जे काही करतो, अनुभवतो, भोगतो ,आपल्या आयुष्यात जे काही घडते या सगळ्यांचे 1. दैवाधिन 2. प्रयत्नाधिन असे दोन भाग पडतात. दैवाधीन बाबीं आपण काहीही केले तरी त्या टाळू शकत नाही, या गोष्टी पत्रिकेतून स्पष्ट दिसतात आणि चांगल्या अभ्यासु ज्योतिषाला त्या सांगता येतात , बरोबर ही ठरतात.

   प्रयत्नाधीन बाबिं मध्ये आपल्या प्रयत्नांचा वाटा ७० % असतो तर दैवाचा भाग ३० % असतो. प्रयत्नाधीन गोष्टी बाबत भाकित करताना तारतम्य बाळगळे नाही किंवा त्या व्यक्तीची कर्मप्रवणता विचारात घेतली नाही तर भवीष्य हमखास चुकते.

   सुहास गोखले

   0
 2. स्वप्नील

  खरय सुहास जी मी पण आपल्यासारखे खूप जणांना भेटलो पण तुम्ही म्हणता तसे Perfect सांगणारा कोणी नाही अजून भेटले . हा पण कोकणात एक जण आहेत पण ते पत्रिका वगरे नाही पाहत कोणत्या तरी आत्म्याचा संचार होतो ते त्यांना बाबा म्हणतात ते समोरच्या व्यक्तीची व्यक्तिगत माहिती वगरे बिनचूक ओळखतात . काय चुकले आहे ते सांगतात काम होईल का नाही हे सांगतात . पण मी गेलो होतो तेव्हा मला सांगितलेला अंदाज चुकला . काही कारणाने परत foloow up ला जाता आले नाही असो . मी पण जाता जाता आपला एक अनुभव Share केला .

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्निलजी,

   आपला अनुभव इंटरेस्तींग वाटतो , याची एक स्टुरी होऊ शकेल ! लिहणार का? तुम्ही मुद्दे काढा, बाकी शब्दांकन मी करुन दईन, या ब्लॉग वर गेष्ट ऑथर म्हणून प्रसिद्ध करेन (तुमच्या नावानिशी )

   सुहास गोखले

   0
   1. स्वप्नील

    its माय प्लेजर सुहास जी मी माझे अनुभव नक्की share करेन तुमच्याशी . हा आत्ताचा कोकणातला अनुभव नक्की सांगेन . फक्त कोठे पाठवू ते सांगा
    आपल्या व्यक्तिगत E-mail वर पाठवू का ?

    0
 3. शरयू आडकर

  अतिशय उत्कृष्ट निवेदन
  वाचताना त्या ज्योतिषची त्याचा घराची नीट कल्पना करू शकतो।।खरच छान आहे लेखन चातुर्य ।।

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.