‘डॉक्टर ’ चा अंदाज (का नेम ?) चुकल्याने ज्योतिषीबुवा हडबडले, खरे तर अगदी सुरवातीलाच पत्रिकेवर वर-वर ची नजर टाकून एखाद्याचे शिक्षण / व्यवसाय सांगून तोंडघशी पडून घ्यायची काहीच गरज नव्हती. कारण इतक्या अपुर्या माहीतीवर आणि पत्रिकेचा फारसा अभ्यास न करताच असले अंदाज करणे आत्मघातकीच म्हणावे लागेल. किंबहुना असा प्रयत्न करणे सुद्धा अत्यंत चुकीचे / वेडगळ पणाचे आहे हे माझ्या त्यावेळेच्या अत्यंत तुट्पुंज्या अभ्यासावरुन देखिल मला माहीती पडले होते पण साठीच्या पुढे वय असलेल्या , त्यातली तीस पेक्षा जास्त वर्षे ज्योतिषाचा अभ्यास / व्यवसाय करणार्याला हे लक्षात येऊ नये याचे मला आश्चर्य वाटले.
“कमाल आहे ! तुम्ही डॉक्टर नाही ? असे कसे काय? मग तुमचे वडील किंवा आजोबा तरी नक्कीच डॉक्टर असायलाच पाहीजेत”
“नाही, माझे वडील नॉन-मॅट्रीक असून , बँकेत ३८ वर्षे नोकरी करुन नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत , माझे आजोबा पण डॉक्टर नव्हते की वैद्य .. ते सांगली संस्थानच्या शेतकी विभागात अंमलदार होते”
“बरोब्बर, ये हुई ना बात! हा सूर्य हा जयद्रथ ! अहो तुमचे आजोबा शेतकी खात्यात होते म्हणजे झाडपाल्याशी त्यांचा रोजचा संबंध येत असणार , म्हणजे त्यांना वनौषधींचे ज्ञान असणारच ..लोकांना लहान सहान झाडपाल्याचे उपाय / नुस्के सांगतच असतील ते , एक प्रकारची डॉक्टरकीच म्हणायची ती… आता आला ना पडताळा ?”
हतबुद्ध होत मी म्हणालो…
“अहो हा कसला पडताळा म्हणायचा?”
“आजोबां बद्दल तुम्हाला माहीती नसेल, कदाचित तुमचा जन्मच झाला नसेल तेव्हा किंवा खूप लहान असणार तुम्ही त्या काळी , तेव्हाचे काय आठवणार तुम्हाला म्हणा.. “
मी कपाळावर हात मारुन घेतला, कोपरा पासुन हात जोडत म्हणालो ..
“अहो काहीही काय , सुतावरुन स्वर्ग गाठताय तुम्ही , तुमच्या या अजब तर्काने मंडईतल्या प्रत्येक भाजीविक्रेत्याला डॉक्टर म्हणायला पाहीजे !”
ज्योतीषीबुवांना त्याचे काय , ते आपले भविष्य (?) बरोबर (?) आले यातच मग्न होते !
“तुम्ही किंवा तुमचे वडील / आजोबा ‘डॉक्टर असायलाच हवे होते असे तुमची पत्रिका ओरडून ओरडून सांगतेय आणि बघा पडताळा आला! ”
आता मात्र मला हसू दाबून ठेवणे जमले नाही, फिस्स्कन हसत मी म्हणालो..
“अस्सं , माझी पत्रिका आणखी काय ओरडून सांगतेय म्हणायची ?”
“चेष्टा करु नका..पत्रिका बरोबर सांगतेच , विश्वास बसत नसेल तर आणखी सांगतो..”
(पुन्हा एकदा फिस्स्कन हसत) “सांगा”
“सावत्र आई..”
“काssssय ?”
“मातृसुख नाही तुम्हाला , एकतर सावत्र आई असणार तुम्हाला किंवा तुमची आई गंभीर दुखण्याने आजारी असणार”
“हे पहा , मला सावत्र आई नाही आणि माझ्या आईला कोणताही गंभीर आजार नाही, अगदी ठणठणीत आहे ती आणि मातृसुखाचे म्हणाल तर अगदी भरपूर मिळाले आहे , मिळत आहे आणि मिळत राहील”
हा अंदाज ही साफ चुकल्याचे त्या ज्योतिषाला काहीच वाटले आहे , त्याचे आपले चालूच होते…
“पत्रिका असे सगळे सांगते बघा , सगळे स्वच्छ दाखवत असते, हां आता ते पाहणारी नजर मात्र तय्यार पाहीजे!”
पाठीमागच्या त्या तसबीरी कडे बोट दाखवत म्हणत होते ..
“बरे का गोखले , गणिताचा आणि तर्काचा थोडासा भाग सोडला तर ज्योतिषात बाकीचे सारे इंट्युईशन च असते , आम्ही त्या बाबतीत सुदैवी , महाराजांची कृपा आहे बरे का आमच्या वर , अहो आम्ही कोण ? आणि सांगणार तरी काय ? कर्ते करवते तर हे महाराजच , आम्ही नाही , महाराजच आमच्या मुखातून बोलतात हो”
“पण आतापर्यंत तुमचे सॉरी तुमच्या या महाराजांंचे सगळे अंदाज चुकलेत”
“गुरुमाऊली माझी परिक्षा घेत असेल!”
“हे बघा, तुमचा कोणावर विश्वास असेल , श्रद्धा असेल , त्याला माझी काही हरकत नाही पण निदान या कन्सलटेशन पुरते का होईना , तुमचे हे ‘महाराज , गुरुमाऊली ’ वगैरे जरा बाजूला ठेवाल का? मला नाही पटत असले काही , तेव्हा आता मुख्य मुद्यावर या आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या”
“इंजिनिअयर ना तुम्ही , असे बोलणारच… श्रद्धा पाहीजे मिस्टर श्रद्धा पाहीजे , ज्योतिषात तर ती पाहीजेच पाहीजे”
“अहो इथे श्रद्धेचा प्रश्न येतोच कोठे?”
“श्रद्धा नसेल तर नियती मार्गदर्शन करत नाही”
“क्षणभर तुमचा मुद्दा मान्य करतो, श्रद्धा नसेल तर नियती भविष्यकाळ सांगणार नाही , ओक्के, मग श्रद्धा असो वा नसो , माझा भूतकाळ तरी बरोबर सांगता आला पाहीजे ना? जे घडलेय ते तरी कोठे बरोबर सांगता आले तुम्हाला ? “
“गोखले, आम्ही भविष्य काळ सांगण्यासाठी प्रसिद्ध आहोत”
“मी ही भवीष्यकाळ जाणुन घ्यायलाच तुमच्याकडे आलोय ना, उलट तुम्हीच भूतकाळ चिवडत बसलाय , ते कशाला ?”
“अहो भूतकाळ कशाला कोण चिवडत बसेल, भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी आपल्याला माहीती असतातच की , मी आपले खातरजमा करुन घ्यायच्या हेतुने काही विचारले इतकेच”
“का?’
“अहो का म्हणुन काय विचारता , भविष्याची पाळेमुळे भूतकाळातच दडलेली असतात ना ? भूतकाळातल्या घटनांचा मागोवा घेतला की ग्रहांची ‘मोडस ओपेरेंडी’ समजते मग भविष्यात हेच ग्रह कशी फळें देणार याचा बरोब्बर अंदाज येतो आम्हाला”
“एव्हढी मगजमारी कशाला , तुमचे महाराजच सांगणार आहेत ना सगळे ?”
“तुम्ही चेष्टा करु नका”
“चेष्टा तर तुम्ही चालवली आहे, नुसते खडे टाकत बसलाय ते , मुद्द्याचे बोला ना काहीतरी..”
“मुद्द्या कडे येणारच आहे , माझी एक प्रोसीजर आहे त्याप्रमाणे मी काम करत असतो.. बरे ते असो, तुमच्या मोठ्या भावाला काही समस्या असणार, तुमचे त्याचे काही वाद पण असणार , तुमचे दोघांचे पटत नसणार”
“मला भाऊ च नाही मोठा ही नाही आणि लहान ही नाही”
“असे कसे, माझा अंदाज असा चुकणार नाही”
“साफ चुकलाय तो”
“निट आठवून सांगा”
“अहो यात आठवायचे काय ? भाऊ नाही तर नाही , तुमचे अंदाज बरोबर यावेत म्हणुन आता नसलेला भाऊ उत्पन्न करायचा का काय?”
ज्योतिषबुवा थोबाडीत मारल्या सारखा चेहेरा करुन काही काळ गप्प बसले.. मागे वळून त्या गांजावाल्याला नमस्कार करत राहीले.. पुन्हा एकदा पत्रिके कडे काही काळ निरखून पाहात म्हणाले ..
“लहानपणी एखादा अपघात , शस्त्रक्रिया, डोळ्याला दुखापत”
“काहीही नाही , अपघात नाही , शस्त्रक्रिया नाही , अधूनमधून येणारी सर्दी, ताप, खोकला, अपचन सारखे किरकोळ आजार वगळता तब्बेत पहिल्यापासुन ठणठणीत आहे , डोळ्याचे म्हणाल तर साधी रांजणवाडी सुद्धा कधी झाली नाही मला”
“असे कसे?”
“असेच असेच”
हा पण अंदाज चुकल्याने ज्योतिषीबुवा चांगलेच खचलेले दिसले..
हा निष्कारण चाललेला वेळेचा अपव्यय थांबवण्याच्या हेतुने मी शेवटी एक घाव दोन तुकडे करायचे ठरवले..
“माफ करा पण आपण सांगताय ती सर्व ग्रहांची स्थानगत , राशीगत फळें आहेत , तशी ग्रहस्थिती असलेल्या सगळ्यांनाच ती कशी लागू पडतील? मला पण लागू पडलेली नाहीत. आपण म्हणता आहात तसे काहीही नाही, काहीही घडलेले नाही .. “
“तुमची जन्मवेळ चुकलेली असेल..”
“माझी जन्मवेळ अचूक आहे, कारण माझ्या ज्न्माचे वेळेचे बाळंतपण करणारे डॉक्टर स्वत:च एक उत्तम ज्योतिषी होते. ते डॉक्टर म्हणूण प्रसिद्ध असण्यापेक्षा एक ज्योतिषी म्हणुनच जास्त प्रसिद्ध होते . त्यामुळे त्यांच्याच प्रसुतिगृहात जन्मणार्या बालकांची जन्मवेळ अचूक पणे नोंदवण्या बाबत ते कमालीचे दक्ष होते. आता चूक असलीच तर जास्तीत जास्त एक – दोन मिनिटांची असेल नसेल. “
“त्या एक दोन मिनिटांच्या चुकीने पत्रिका बदलते महाशय ..”
“मान्य , एक दोन मिनिटांच्या चुकीने भावचलित पत्रिकेतल्या भावांच्या मिनीट – सेकंदां मध्ये अगदी किंचितसा फरक दिसेल , ग्रहांच्या स्थितीत अगदी चंद्राच्या स्थितीत ही पडलेला फरक अगदी लक्षात सुद्धा येणार नाही इतका सुक्ष्म असेल. पण ज्या ठोकळा पत्रिके वरुन तुम्ही ज्योतिष बघत आहात त्यात या चुकीने ढीम्म सुद्धा बदल होणार नाही “
“आम्ही असलीच पत्रिका बघून अचूक भविष्य सांगतो..”
कागदांच्या एका ढिगा कडे बोट दाखवत ….
“तो पहा पुरावा.. लोकांची आलेली पत्रें, पेपरात / मासीकांत छापून आलेल्या लेखांची कात्रणें.. सगळे आपल्या समोर आहे.. ते सर्व लोक काय खोटे बोलत आहेत का ?”
“ते पुरावे ठेवा बाजूला, इथे हातच्या काकणांना आरसा कशाला ,माझे भविष्य सांगा , ते कधी सांगणार ?”
“गोखले , अहो ज्योतिषात अशी गडबड – घाई करुन चालत नाही, आस्ते आस्ते एक एक पदर उलगडत सत्यापर्यंत जायचे असते”
“कसले सत्य?”
“अहो सत्य म्हणजे विधीलिखीत , आपल्या प्राक्तनात काय लिहून ठेवले आहे ते.”
“हो ना, मग तेच सांगा ना , केव्हाचा विचारुन रायलोय, आणि तुमचे आपले दुसरेच चर्हाट चाललेय”
“त्याचे असे आहे गोखले… ते जाऊ द्या , आता तुमची इच्छा आहे ना मग आपण डायरेक्ट तुमच्या प्रश्नालाच हात घालू”
“हे बेस्ट बोललात..”
“प्रश्न काय होता तुमचा ?”
खुर्चीवरुन जवळजवळ कोसळण्याच्या बेतात असताना कसेबसे स्वत:ला सावरत मी चक्क ओरडलोच..
“काsssssय ?”
क्रमश:
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
सुहास जी तिन्ही लेख छान. तुमचे असे विविध जोतीशांचे अनुभव वाचाण्य्स आम्ही उत्सुक आहोत . मग ते तुम्ही अगदी साधे पणाने लिहिलेत तरीसुद्धा !!
श्री. स्वप्नीलजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद ,
जे लिहले आहे ते १००% अगदी असेच घडले आहे , आणि हे मी खात्रीने का सांगू शकतो त्याचे उत्तर या लेखमालेच्या पुढच्या भागात (म्हणजे उद्याच) वाचावयास मिळेल!
सुहास गोखले
तिन्ही लेख छान aahet
श्री. प्रमोदजी ,
अभिप्राया बद्दल धन्यवाद
सुहास गोखले
व्यक्तिरेखा छान टिपली आहे, एकदम छोटे छोटे बारकावे 🙂
संतोष
श्री.संतोषजी ,
अभिप्राया बद्दल धन्यवाद ,
अहो मी काही मोठा लेखक नाही , जे बघितले , अनुभवले ते जसेच्या तसे लिहून काढले आहे
सुहास गोखले
हाहाहा! मस्तच! बाकी तुम्ही ज्योतिषाशी एवढे रोकठोक बोललात याबद्दल अभिनंदन. नाहीतर अंदाज चुकले तरी लोक थोडं अदबिनच घेतात ज्योतिषांशी. असेच पुढचे लेख येवुद्यात आणि असे अनेक अनुभव आपल्या पाठीशी असतील (चांगले आणि वाईट दोन्हीही) आणि लिहायचा विचार असेल (असेच ज्योतिषाचे नाव न टाकता) तर मोठी लेखमाला वाचायला नक्कीच आवडेल.
श्री. सुरेशजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद .
मी जेव्हा या ज्योतिषांना भेटत होतो तेव्हा माझा स्वत:चा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास चालू होताच त्यामुळे ‘अभ्यास करुन सांगणारा / सांगण्याचा निदान प्रयत्न तरी करणारा ‘ आणि नुस्ते थातुरमातुर सांगून बोळवण करणारा लबाड’ मला ओळखायला येत होता. जिथे लबाडी / भंपकपणा दिसला तिथे मी आवाज चढवला होताच. शास्त्राशी प्रामाणिक असणाया , तळमळीच्या ज्योतिषांना वंदन ही केले आहे . पण भामटे ज्योतिषीच जास्त भेटले हे मात्र कटू सत्य आहे.
सुहास गोखले
Shri सुहासजी,
ब्लॉगवर मराठी “Shri” नीट येत नाही, म्हणून इंग्लिश मध्ये लिहिला.
भट्टी एकदम मस्त जमली आहे. पुण्यातील चाळीचे व महान ज्योतिषी यांचे वर्णन एकदम झक्कास.
पुढील भागाची प्रतीक्षा.
धन्यवाद.
अनंत
श्री. अनंतजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद . पुढचे दोन भाग पूर्ण तयार आहेत , आज एक पोष्ट करतोय शेवटचा उद्या.
सुहास गोखले