बाहेरच्या भगभगीत उजेडातून आतल्या खोलीत आल्यावर , पिवळ्या पंचवीस वॅट च्या बुल्लोक च्या क्षीण उजेडात ते ज्योतिषीबुवा मला दिसलेच नाहीत, नजर जरा सरावल्या वर ह्ळूहळू मला त्या ज्योतिषीबुवांचे समग्र दर्शन झाले.

आता त्या ज्योतिषीबुवांचे वर्णन काय करावे…

जन्मजात लाभलेला कळकट रंग, दाढीचे भयाण खुंट , धोतर – सदरा –कोट असा जुना जमान्यातला पेहेराव, धोतर बहुदा आठपंधरा दिवसांपूर्वी केव्हातरी धुतले गेले असावे आणि (लग्नात , सासर्‍याने दिलेल्या !) कोटाला तर तो शिवल्या पासुन कधी पाणी लागले नसावे. चहाचे डाग पडलेला शर्ट ही तसाच मळकट , त्याच्या वरच्या सर्व गुंड्या खोललेल्या होत्या का त्याला गुंड्याच नव्हत्या कोण जाणे. शंकराच्या गळ्या भोवती नाग वेटोळे घालून बसलेला असतो तसा कॉलर मध्ये घाम टिपायला रुमाल खोचलेला .. डोळ्यावर गोल काचांचा महात्मा गांधी छाप चष्मा.

टेबलावर धुळीने माखलेला, मूळ कोणत्या रंगाचा आहे हे सांगणे केवळ अशक्य होईल असा टेबल क्लॉथ . टेबला वर फाईलींचा उंचच उंच ढीग, स्टीलचे तांब्या भांडे, एक भिंग (हे ज्योतिषीबुवा पत्रिके बरोबरच हात पण बघत असावेत बहुदा) , ढवळे बृहद्पंचांगाचा ठोकळा , काही जीर्णशीर्ण झालेली वाळवी लागलेली पुस्तके, या सगळ्यांत एखाद्या झोपडपट्टीत मर्सिडिज बेंझ कार दिसावी तशी सी.ई.ओ. कार्टर सरांचे अस्ट्रोलॉजीकल अस्पेक्ट्स आणि अ‍ॅलन लिओ चे ‘प्रॅक्टीकल अ‍ॅस्ट्रॉलॉजी’ अशी दोन जरा नव्यातली दिसणारी पुस्तके मात्र उठून दिसत होती.

टेबल लाकडी होते , ज्योतिषीबुवा बसले ती खुर्ची पण लाकडाची होती त्यावर एक कळकट या शब्दालाही लाज आणेल अशी (उसवलेली) गादी आणि पाठीला टेकायला म्हणून चक्क एक उशी सुतळीने खुर्चीच्या पाठीला करकचून बांधलेली होती. जातकांना बसण्यासाठी म्हणून तीन खुर्च्या होत्या त्या मात्र निलकमल प्लॅस्टीकच्या, नव्याच दिसत होत्या! (नशिब माझे!) , त्या खुर्चीत बसताच मला जरासे टोचले आणि पुढे सतत टोचतच राहीले.. दोष त्या नीलकमलचा नव्हता तर ‘हेअर कटिंग सलुन’ छाप बाकड्यांतील ढेकणांचा होता!

ज्योतिषीबुवांच्या पाठीमागल्या भिंतीवर एका महाराजाची फुलांचा सुकलेला हार मिरवणारी एक कळाहीन तसबीर ..

“साला काय कटकट आहे !” असे म्हणताना आपल्या चेहेर्‍यावर जे भाव असू शकतात त्यापेक्षा कैक पटीने जास्त तिरसटलेले भाव चेहेर्‍यावर दाखवत ज्योतिषीबुवांनी माझ्याकडे पाहीले !

‘या , बसा’ म्हणणे तर सोडाच पण सामन्य शिष्टाचार म्हणून चेहेर्‍यावर वरकरणी का होईना स्माईल दाखवणे नाही , काही नाही !

मीच सुरवात केली…

“मी गोखले , गेल्या सोमवारी मी फोन करुन अपॉईंट्मेंट घेतली होती”

चेहेर्‍यावर आधीच धारण केलेल्या वैतागा वर कुप्रसिद्ध ‘पुणेरी तुसडेपणा’ चा आणखी एक थर लावत ज्योतिषीबुवा म्हणाले …

“पत्रिका आणली आहे का?”

“त्याबद्दल आपण काही बोलला नव्हता”

“ज्योतिषाकडे जाताना पत्रिका बरोबर घेऊन जायला नको का?”

मी थक्क झालो.

“अहो पण फोन वर आपण जन्मवेळ , जन्म गाव इ तपशील विचारलात , तेव्हा मला वाटले आपण पत्रिका स्वत:च बनवणार आहात..”

“ती माहीती विचारली ती आमच्या रेकॉर्ड साठी , पत्रिका बनवायला दोन तास लागतात, मोठी मेहेनत असते , त्याचे मी १०० रुपये वेगळे घेतो, ५१ मध्ये फक्त प्रश्नाचे उत्तर देतो..”

“मग द्या.. ते ऐकायला तर आलोय आपल्या कडे”

“पत्रिका नाही तर काय सांगणार ?”

“आता हा तिढा कसा सोडवायचा ?”

“सोपे आहे , तुम्ही बाहेर रिसेप्शनिष्ट कडे पत्रिकेचे १०० रुपये भरा आणि पुढची अपॉईंटमेंट घ्या..”

“म्हणजे एकूण १५१ रुपये ? बापरे माझे तेव्हढे बजेट नाही,, तुम्ही आधी याची कल्पना द्यायला हवी होती..”

“त्याचे काय आहे , गोखले, बहुतेकां कडे जन्मपत्रिका बनवलेली असतेच आणि लोक पत्रिका सोबत घेऊनच येतात ना.. त्यामुळे जातक आल्यावर आमने सामने पत्रिका बनवायची वेळ सहसा येत नाही ”

“जन्मपत्रिका बनवलेली असतेच’ आणि ‘तुमच्या कडे येणारी प्रत्येक व्यक्ती पत्रिका बरोबर घेऊनच येईल’ असे कसे काय गृहीत धरता तुम्ही.. “

“आमची हीच सिस्टिम आहे, जादाचे पैसे भरा. करुन टाकतो तुमचे काम .. या आता ..”

ज्योतिषीबुवांनी सरळ बाहेरचा रस्ता दाखवला !

“जादाचे पैसे कशाला , तुम्हाला पत्रिकाच हवी आहे ना , मी सांगतो ना पत्रिकेतल्या ग्रहांची अगदी अंशात्मक अशी स्थिती, फक्त तुम्ही सायन वाले का निरयन वाले ते सांगा “

“ज्योतिषाची माहीती आहे वाटते ..”

“ज्योतिषाची नुसती तोंड ओळख आहे पण पुण्यातल्या ज्योतिष्यांची मात्र चांगलीच माहीती राखून रायलोय ..”

‘पुण्यातल्या ‘ आणि ‘चांगलीच’ या दोन शब्दांवर जरा जास्त जोर आणि ‘राखून रायलोय’ ला जरा नागपुरी अ‍ॅक्सेंट ची फोडणी दिल्याने , ज्योतिषीबुवा चमकले..

“विदर्भातले दिसता, चांगलेय, पण पुण्यातले ज्योतिषी वाईट नाहीत..”

“चांगला अनुभव आलेला पुण्याचा ज्योतिषी अजून भेटायचाय मला..”

ज्योतिषीबुवा काही बोलले नाहीत , कागदांच्या ढीगार्‍यातून त्यांनी एक चतकोर पाठकोरा कागद उपसला, टेबलावरच एक दोरी बांधलेले बॉलपेन !

मी त्यांना अंशात्मक ग्रहस्थिती सांगत होतो पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत नेहेमीची ठोकळा पत्रिका लिहून काढली.

“दशा – अंतर्दशा इ. तारखां सांगू ?”

“नको, तेव्हढा अंदाज येतो आम्हाला..”

“चंद्राचे अंश माहीती नसताना सुद्धा ?”

चेहेर्‍यावर जितका म्हणुन तुच्छ आणि छद्मी भाव आणता येईल तितका आणत ज्योतीषीबुवा …

“आमची पद्धती वेगळी आहे”

“हरकत नाही, कोणाच्या कोंबड्याच्या आरवण्याने का होईना सुर्य उगवल्याशी मतलब !”

ज्योतिषीबुवांनी चतकोर कगदावर लिहून घेतेलेल्या पत्रिके कडे काही क्षण रोखुन पाहीले , मग डोळे बंद करुन काही काळ पुटपुटले… मग डोळे उघडून माझ्या कडे बघत म्हणाले ..

“डॉक्टर असून ज्योतिषात रुची ठेवताय , कौतुक आहे “

“अहो पण मी डॉक्टर नाही साधा कंपौंडर सुद्धा नाही ”

“काय सांगता , खरे की काय ? “

“मी कशाला खोटे बोलेन?”

“पण तुमची पत्रिका तर एका निष्णात सर्जनची आहे”

“असेल, पण मी डॉक्टर नाही , इंजिनियरिंग चे शिक्षण घेतले आहे आणि आता कितीही मनात असले तरी डॉक्टर बनू शकणार नाही..”

“च..च…च… गल्ली चांगलीच चुकलीय म्हणायची”

“अहो ते जाऊ द्या , जे झाले ते झाले , त्यावर कशाला खल करायचा , मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या , ते जास्त महत्वाचे आहे.”

“ते उत्तर देणारच आहे पण त्या आधी ब्यॅक ग्राऊंड चेक करायला नको का?”

मी उगाचच पाठीमागे वळून पाहीले!

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. दर्शन जोशी

  तुमच्यासारख्या सर्जिकल स्ट्राईक ज्योतिषाला पाहून तुम्हाला त्यांची ओपन हार्ट सर्जरी करावी लागली ,असं लक्षात येतंय.

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री दर्शनजी ,

   काय करणार हो दुसरे ? अहो चक्क 51 रुपये घेतले हो माझ्या कडून , हे 1987 सालचे 51 रुपये म्हणजे आजचे सुमारे 800 रुपये ! (1987 मध्ये पुण्यात डेक्कन वर जनसेवा ची राइसप्लेट रु 7 मध्ये होती ! , स्वारगेट – डेक्कान 4 नंबर बस चे भाडे 95 पैसे होते आणि अलकाला बाल्कनीचे तिकीट 8 रुपये होते !) इतके पैसे घेऊन सुद्धा भविष्य काही सांगीतलेच नाही , सगळेच गोलमाल, छापा मी जिंकलो, काटा तू हरलास’ स्टाईल चे . आणि ही व्यक्ती 30-40 वर्षे ज्योतिषाच्या प्रांतात काम करत होती , स्वत:ची ज्योतिष संस्था काय, परिषदा काय , अधिवेशनें काय , नुस्ता दिखावा, सतत स्वत:चा टिर्र्या बडवून घ्यायचा , काही कूपमंडूक लोकांचे टोळके करुन कुचाळक्या करत बसायचे !

   त्या काळात मी पुण्यातल्या बहुतेक तथाकथीत ज्योतिषांना भेटलो आहे , सगळे सारखेच !

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.