एका प्रेमवेड्याने विचारलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उत्तरे ज्यो. शांताराम केणी यांनी कशी दिली याबद्दलची ही लेखमाला …..
या लेखमालेतले पहिले लेख इथे वाचा:
ज्यो. शांताराम केणी लिहितात:
विवाह कारक ग्रह:
शुक्र आणि चंद्र हे पुरुष व्यक्तीचे विवाहकारक ग्रह आहेत. आणि प्रस्तुत प्रकरणात पृच्छक पुरुष असल्याने या ग्रहांना प्राधान्य दिले गेले पाहीजे. परंतु हाच प्रश्न एखाद्या स्त्री जातकाने विचारलेला असल्यास शुक्र – चंद्रा ऐवजी रवी-मंगळ या दोन ग्रहांना प्राधान्य दिले गेले पाहिजे. कारण स्त्री जाती मध्ये वसत असलेल्या नैसर्गिक गुणाधर्मापासून पुरूष ज्या सुखाची अपेक्षा करतो त्याचे कारकत्व शुक्रा कडे असते, तसेच पुरुषाच्या पौरुषाचे आणि त्या पुरुषा पासून ज्या सुखाची अपेक्षा स्त्री करते त्या सुखाचे कारकत्व मंगळा कडे असते आणि पुरुष कुंडलीतील किंवा पुरुष व्यक्तीच्या चंद्रास विवाह प्रकरणात जे महत्त्वाचे स्थान असते तसेच असामान्य स्थान स्त्री कुंडलीत रवीस प्राप्त झालेले असते.
म्हणजे रवी आणि मंगळ हे दोन ग्रह स्त्री व्यक्तीचे विवाहकारक असे नैसर्गिक प्रमुख घटक असतात. यामुळे कोणत्याही स्त्री कुंडलीत , मग ती जन्मकुंडली असो वा प्रश्नकुंडली असो, हे कारक ग्रह (रवी आणि मंगळ) निर्बली आणि पिडीत असले तर त्या स्त्रीचा विवाह होणे कठीण आणि महत्त्प्रयासाचे तर असतेच , पण त्याच बरोबर तिला मिळणार्या पतीचे सौख्य दुय्यम प्रतीचे असते.
आणि प्रश्नकुंडलीपुरता विचार करावयाचा झाला तर अशा कुंडलीत यापूर्वी उल्लेखलेल्या विवाह प्रतिबंधक योगां पैकी एखादा योग आढळून येत असता त्याच वेळी रवी-मंगळा मध्ये ‘परिचय योगा familiarity’ चा पूर्णत: अभाव असला तर अशा पृच्छ्क स्त्रीचा अगर संकल्पित किंवा अपेक्षित मुलीचा विवाह होणे अशक्य असते.
कार्यकारक ग्रह – भावांची निवड
पृच्छकाचा प्रश्न त्याच्या दृष्टीने कितीही महत्त्वाचा असला किंवा ज्या कामार्थ तो प्रश्न असेल त्या कार्याशी पृच्छ्काच्या सार्या आशाआकांक्षा एकरूप किंवा केंद्रीभूत झालेल्या असल्या तरी , कोणताही प्रश्ना विचार करतेवेळी तो प्रश्न प्रत्यक्ष कोणत्या व्यक्तीचा , कोणत्या प्रकारच्या कार्याशी आहे व त्या व्यक्तीचे आणि पृच्छाकाचे नातलग संबंध काय आहे , या गोष्टींचा स्पष्ट खुलासा करून घेऊन त्यानुसार प्रश्नकुंडलीतील कार्यकारक स्थानांची आणि कार्यकारक ग्रहांची निवड करणे भाग असते.
उदाहरणार्थ: पुरुष पृच्छ्काचा प्रश्न त्याच्या स्वत:च्या विवाहा संदर्भात असला तर अशा वेळी तनुस्थान हे पृच्छकाचे आणि सप्तम स्थान हे त्या संकल्पित विवाहकार्याचे आणि अपेक्षीत वधू चे दर्शक स्थान असते.
परंतु तोच प्रश्न जर त्याच्या एखाद्या नातलग व्यक्ती संदर्भात असेल तर , उदाहरणार्थ ‘माझ्या मुलाचा विवाह होईल काय ?’ असा प्रश्ना एखाद्या पृच्छाकाने विचारलेला असल्यास , प्रश्न जरी पृच्छकाने विचारलेला असला तरी विवाह पृच्छकाच्या मुलाचा अपेक्षीत असल्याने पंचम स्थान हे त्या मुलाचे आणि पंचमाचे सप्तमस्थान म्हणजेच लाभ स्थान हे त्याच्या विवाहाचे आणि त्याच्या अपेक्षित वधूचे अशा दोन भावांचा विचार करावा लागेल. कारण तनुस्थान हे नेहमीच पृच्छकाचे स्वत:चे दर्शक स्थान असते, इथे प्रश्न मुलाच्या वडीलांनी विचारलेला असल्याने या प्रश्नकुंडलीतले तनुस्थान हे मुलाच्या वडीलांचे असेल. पण प्रश्न त्याच्या मुलाच्या बाबतीतला असल्याने तनुस्थानाचे पंचम स्थान हे त्याच्या संततीचे म्हणजे मुला-मुलींचे दर्शक स्थान असते. आणि या पंचमस्थानाचे सप्तम स्थान म्हणजे लाभ स्थान ते आपोआपच त्या संतती चे विवाह विषयक कारक स्थान होते.
समजा पृच्छकाने त्याच्या एक प्रश्न त्याच्या मावस बहीणीच्या नातवंडाच्या आजर बद्दल विचारल असेल तर ? प्रश्नकुंडलीतले तनुस्थान हे नेहमीच पृच्छकाचे असते. चतुर्थ स्थान हे पृच्छकाच्या आईचे असते, या चतुर्थाचे तृतीय स्थान म्हणजेच षष्ठम स्थान हे पृच्छकाच्या मामा/ मावशीचे असते, या षष्ठम स्थानाचे पंचम स्थान म्हणजेच दशम स्थान हे मामाच्या / मावशीच्या संततीचे म्हणजेच पृच्छकाच्या मामे / मावस बहीणीचे होणार, या स्थानाचे पंचम स्थान म्हणजेच धनस्थान हे पृच्छकाच्या मामे / मावस बहिणीच्या संततीचे दर्शक स्थान होणार आणि या धनस्थानाचे पंचम स्थान म्हणजे षष्ठम स्थान पृच्छकाच्या मामे / मावस बहीणीच्या नातवंडाचे दर्शक स्थान असेल म्हणजे या प्रश्नकुंडलीतले षष्ठम स्थान हे प्रश्ना उल्लेखलेल्या ( मामे / मावस बहीणीचे नातवंड) आजारी व्यक्तीचे कारक स्थान होईल आणि अर्थातच या स्थानाचे षष्ठम स्थान म्हणजेच लाभ स्थान हे त्या आजारी व्यक्तीच्या आरोग्याचे कारक स्थान असेल.
संबधित आणि कार्यकारक स्थानांची निवड वरील प्रमाणे करण्यात येत असली तरी आपली प्रस्तुत स्थान निवड बरोबर आहे असे म्हणता येणार नाही उलट पाया नसलेली इमारत अशीच उपमा प्रस्तुत निवडीस द्यावी लागेल ! कारण, पंचम स्थान हे जरी संतरीचे दर्शक स्थान असे असले तरी प्रत्येक अपत्याचा आणि त्याच्या स्थितीचा बोध केवळ पंचमस्थानावरून होत नसतो, तर पहील्या अपत्याचा पंचमभावा वरून , दुसर्या अपत्याचा सप्तमभावा वरून , तिसर्या अपत्याचा नवमभावा वरून या प्रमाणे बोध करून घ्यावयाचा असतो. भावंडांच्या बाबतीत हाच नियम आहे, तृतीय स्थाना वरून आपल्या पाठी वर जन्माला आलेले लहान भावंड , पंचमा वरून त्या पाठीचे भावंड , अर्थात लाभ स्थान आपल्या लगतच्या (आपल्या आधी जन्मले ) मोठ्या भावंडाचे दर्शक स्थान असते. तर भाग्य स्थान हे त्या पेक्षा मोठ्या भावंडाचे असते. त्याचप्रमाणे पती किंवा पत्नी यांचा विचार करताना, सप्तमस्थान हे प्रथम पत्नीचे (किंवा पतीचे) दर्शक स्थान घेऊन त्यानंतरच्या म्हणजेच दुसर्या / तिसर्या पत्नीचे (पतीचे) दर्शक स्थान अनुक्रमे नवम, एकादश, लग्न अशा प्रमाणात त्या त्या नेमक्या व्यक्तीच्या कारक स्थानची निवड करणे अपरिहार्य असते.
या न्यायाने ‘माझ्या मुलीचा विवाह केव्हा होईल’ असा एखाद्या पृच्छाकाने प्रश्न विचारला असता, आणि ही मुलगी त्याचे तृतीय अपत्य असेल तर, नवम स्थान हे त्याच्या मुलीचे स्थान मानले पाहीजे आणि या स्थानाचे सप्तम स्थान म्हणजे तृतीय स्थान हे तिच्या भावी पतीचे , विवाहाचे आणि एकंदरच विवाह प्रकरणाचे कारक स्थान मानून त्या प्रश्नकंडलीचा विचार करणे आवश्यक ठरते. आणि असे करताना केवळ ह्यात सध्याची हयात (जिवंत) अपत्ये यांची संख्या विचारत न घेता त्या व्यक्तीने ज्न्म दिलेल्या सर्व अपत्यांची संख्या विचारात घेतली पाहीजे, यात सध्या जिवंत असलेली अपत्यें , अल्पायुषी ठरलेल्या आणि गर्भावस्थेतच मृत पावलेल्या यांचीही गणना करावी लागेल, थोडक्यात जन्माला आलेल्या आणि गर्भात प्रवेश केलेल्या अशा एकंदर अपत्यांची गणना करून , त्या विशिष्ट अपत्याचे नेमके दर्शक स्थान कोणते आणि त्या व्यक्तीचे कारक ग्रह निश्चित करणे आवश्यक असते.
या बाबतीत एक नाजूक शंका आहे, त्या बद्दल पुढच्या भागात पाहू..
(क्रमश: )
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020