एका प्रेमवेड्याने विचारलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उत्तरे ज्यो. शांताराम केणी यांनी कशी दिली याबद्दलची ही लेखमाला …..
या लेखमालेतले पहिले लेख इथे वाचा:
ज्यो. शांताराम केणी लिहितात:
फलादेश विचार
फलादेश प्रकरणात प्रवेश करण्या पूर्वी ज्योतिष विद्यार्थ्यास फिरून एकदा एक अगत्याची सूचना देण्याची अपरिहार्यता आम्हाला भासत आहे. “ज्योतिषशास्त्रातील विविध शाखांची , विषयांची आणि उपांगांची माहिती जरूरीपुरती प्राथमिक माहिती, आणि या लेखमालेतून सुचित करण्यात आलेली माहिती त्यांनी आधी आत्मसात करून घ्यावी आणि त्यानंतरच फलादेश विभागाच्या अभ्यासाकडे वळावे “ ही ती सूचना होय.
या सूचनेचा अवलंब करण्यात आला तर आजचे ज्योतिष विद्यार्थ्यी उद्याचे यशस्वी ज्योतिषी ठरतील व त्यांनी वर्तवलेली भविष्ये चुकण्याचा संभव अत्यल्प राहील. उलटपक्षी , वैद्यकशास्त्राचा आणि शरीरशास्त्राचा योग्य परिचय करून न घेता वैद्यकीय पुस्तकांचा आश्रय घेऊन व केवळ बाह्यलक्षणां वरून रोगनिदान ठरवून औषधयोजना करणार्या वैदूची जशी अवस्था होते तशीच ज्योतिष विद्यार्थ्यांची स्थिती चमत्कारिक होण्याची शक्यता जास्त राहील.
जिज्ञासू पृच्छका कडून विचारण्यात येणार्या विशिष्ट प्रश्नांची उत्तरें प्रश्नकुंडलीच्या आधारे कशी निश्चित करता व त्या त्या विशीष्ट प्रश्नविचाराचे खास नियम कोणते याचा उहापोह करणे , या आपल्या मुख्य विषयाकडे आता वळू आणि त्याचा योग्य परिचय करून घेण्यासाठीच आपण एका जातकाने विचारलेल्या ३० पेक्षा अधिक प्रश्नांचा अधीक तपशीलवार विचार करू.
प्रश्न पहिला (१) :
माझा विवाह होईल काय, की मी आयुष्यभर अविवाहित राहीन ?
प्रश्नज्योतिषात लग्नेश हा नेहमी पृच्छ्काचा प्रमुख कारक ग्रह असून पृच्छकाचा प्रश्न ज्या कार्याशी निगडित असेल व ते कार्य ज्या स्थानाने द्र्शित होणारे असेल , त्या स्थानाचा अधिपती हा त्या कार्याचा आणि त्या कार्याशी संबधित असलेल्या व्यक्तीचा प्रमुख कारक ग्रह असतो. तसेच चंद्र व लग्न स्थानातील ग्रह हे पृच्छकाचे दुय्यम कारक ग्रह असतात.
लग्नकेंद्री आणि संबधीत भावारंभी उदित असलेल्या राशीं या अनुक्रमे पृच्छकाच्या आणि संबधीत कार्याच्या किंवा व्यक्तीच्या कारक असतात. त्याच प्रमाणे अपेक्षित कार्याचे आणि व्यक्तीचे नैसर्गिक आणि स्वाभाविक कारकत्व ज्या ग्रहां कडे असते, ते ग्रह , मग त्यांचे वास्तव्य कुंडलीतील कोणत्याही स्थानांत किंवा राशीत असो, हे पृच्छक, संबधित व्यक्ती आणि अपेक्षित कार्य या सर्वांचे स्वाभाविक कारक ग्रह असतात. अशा कारकां पैकी कोणत्याही दोन कारक ग्रहांचा ‘होऊ घातलेला योग – Applying aspect’ स्वरूपाचा शुभ योग झाला, मग तो योग युती, त्रिरेकादश त्रिकोण, संग्रहह किंवा मध्यस्थ यापैकी कोणताही असो, तर ते कार्यसिद्धी आणि अपेक्षापूर्तीचे लक्षण असते आणि याच्या उलट , अशा कारकांचा ‘होऊ घातलेला योग – Applying aspect’ स्वरूपाचा केंद्र , प्रतियोग सारखा अशुभ योग झाला किंवा संकल्पित शुभयोगांत वक्र-प्रतिबंध या सारखा बाह्य योगांनी अडथळा आणला, तर तो प्रकार कार्यनाशाचा आणि अपेक्षाभंगाचा द्योतक असतो.
प्रस्तुत प्रश्न विवाह प्रकरणाशी निगडित आहे, विवाह ही सप्तम स्थानाने दर्शित होणारी घटना असून चंद्र आणि शुक्र जे उभय स्त्रीग्रह पुरुषकुंडलीतील, म्हणजे पुरुषव्यक्तीचे, स्वाभाविक विवाहकारक ग्रह आहेत, पैकी शुक्र हा स्त्रीसुखाचा आणि विषयसुखाचा नैसर्गिक कारक ग्रह असून चंद्र हा विवाहसंस्काराचा , विवाह संस्थेचा आणि वैवाहिक जीवनाचा स्वाभाविक कारक आहे. प्रेम , प्रणय , विषयसुख इत्यादी गोष्टींचे कारकत्व पंचमस्थानाकडे असल्याने सप्तमस्थाना खालोखालच या पंचम स्थानाचाही विवाहप्रकरणाशी निकटचा संबंध पोहोचत असतो. सबब, प्रस्तुत प्रश्नाचा विचार खालील प्रमाणे करावा लागेल:
अनुकूल योग:
१) लग्नेश आणि सप्तमेश यांचा शुभ योग होणे.
२) लग्नेशाचे वास्तव्य सप्तम, पंचम किंवा एकादश स्थानात असणे.
३) लग्नेश व गुरू किंवा लग्नेश व शुक्र यांचा शुभयोग होणे.
४) सप्तम , पंचम किंवा एकादश स्थानांत बहुप्रसव किंवा प्रसव राशी असणे.
५) सप्तमेशाचे वास्तव्य तनुस्थानात असणे.
६) सप्तमेश आणि चंद्र यांच्यात शुभयोग होणे.
७) गुरू- चंद्र , शुक्र – चंद्र किंवा रवि – चंद्र यांचा शुभयोग होणे.
८) गुरू किंवा शुक्र यांचे वास्तव्य सप्तमात किंवा पंचमात असणे.
९) विवाहप्रकरणातील नैसर्गिक आणि तात्कालिक कारकांपैकी बहुसंख्य कारक प्रसव राशींत असणे.
१०) अशा कारकांपैकी बहुतांश कारकांचे स्वामित्व शुक्रा कडे असणे.
११) या नैसर्गिक आणि तात्कालिक कारकां पैकी कोणत्याही दोन कारकांचा परस्पर शुभयोग होणे.
अशासारखे ग्रहयोग विवाहास अनुकूल अतएव विवाह घडवून आणणारे असतात, आणि याच्या उलट ,
प्रतिकूल योग:
१) सप्तम , पंचम किंवा एकादश या स्थांत वंध्याराशी असून गुरू , शुक्र किंवा चंद्र यांपैकी कोणत्याच ग्रहाचे वास्तव्य त्या स्थानांत नसणे.
२) सप्तम किंवा पंचम स्थानातील शनी, मंगळ, हर्षल, केतू यांसारख्या क्रूर ग्रहाशी लग्नेशाचा किंवा चंद्राचा अशुभयोग घडणे आणि त्याचबरोबर गुरू – शुक्रा सारख्या शुभ ग्रहांच्या शुभकिरणांचा अभाव असणे.
अशासारखे ग्रहयोग विवाहप्रतिबंधक, अतएव विवाहाचा अभाव दर्शविणारे असतात.
स्पष्टीकरण:
वर उल्लेखिलेल्या प्रतिकूल प्रकारापैकी एखादा प्रकार दृष्टोत्पत्तीस आला तर तेव्हढ्याच कारणावरून पृच्छक आयुष्यभर अविवाहित राहील , असा तडकाफडकी निर्णय देणे बरोबर ठरणार नाही. कारण असा प्रकार असून लग्न, पंचम , सप्तम किंवा एकादश स्थानात वंध्याराशी नसल्या , विवाहकारक ग्रहांपैकी बहुसंख्य ग्रह वंध्याराशींपासून अलिप्त असले आणि संबधित कारकांपैकी कोणत्याही दोन कारकांचा विवाहानुकूल असा एखादा योग होण्या जोगा असला तर अशा वेळी आयुष्यभर अविवाहित राहण्याची पाळी पृच्छकावर येत नसते.
(क्रमश: )
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020