एका प्रेमवेड्याने विचारलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उत्तरे ज्यो. शांताराम केणी यांनी कशी दिली याबद्दलची  ही लेखमाला …..

या लेखमालेतले पहिले लेख इथे वाचा:

 

अबब ! किती हे प्रश्न ! (१)

अबब ! किती हे प्रश्न ! (२)

अबब ! किती हे प्रश्न ! (३)

अबब ! किती हे प्रश्न ! (४)

अबब ! किती हे प्रश्न ! (५)

अबब ! किती हे प्रश्न ! (६)

 

 


ज्यो. शांताराम केणी लिहितात:


 

कालनिर्णय:

अपेक्षापूर्ती किंवा अपेक्षाभंगाचे योग कुंडलीत आढळून आले व त्याप्रमाणे तसा निर्णय एकदाचा घेतला , म्हणजे अतिमहत्त्वाचा असा दुसरा एक प्रश्न आपोआपच उपस्थित होतो तो म्हणजे अपेक्षित घटना केव्हा म्हणजे कोणत्या कालमर्यादेत घडून येईल किंवा साध्य होईल. सबब प्रश्नकुंडलीच्या द्वारे अशा गोष्टींचा कालनिर्णय कसा ठरवतात त्याचा आता थोडक्यात विचार करू.

कालनिर्णय ठरवण्याची प्रश्नज्योतिषांतर्गत पद्धती जातकशास्त्रातील पद्धती पेक्षा सर्वस्वी भिन्न पण जास्त सुटसुटीत आणि सकृद्दर्शनी सुलभ अशी आहे. योगकारक अपेक्षित ग्रहांचा संकल्पित योग ज्या काळी पूर्ण होईल त्या काळी  कार्यसिद्धी होते , हा त्या कालनिर्णयाचा पाया आहे, अर्थात तो योग शुभ गुणधर्माचा असतां त्या योगपूर्ती कालीं कार्यसिद्धी प्राप्त्न होते आणि अशुभ गुणधर्माचा असतां त्याच्या समाप्ती काळी कार्यनाश किंवा अपेक्षाभंग, हा त्यांच्या फळांचा शुभाशुभ प्रकार असतो.

संकल्पित योग परिपुर्ण होण्यास जितके अंश कमी असतील तितके दिवस, आठवडे , महिने किंवा वर्षे लोटल्यावर अपेक्षित घटना घडून येते , हा त्यातला प्रमिख नियम असून , असा योगकारक ग्रह म्हणजे संबधित कारकां पैकी योगाची परिपूर्णता करण्यास जाणारा ग्रह चर , स्थिर व द्विस्वभाव यापैकी ज्या प्रकारच्या राशीत आणि केंद्र , पणफर व आपोक्लिम यापैकी ज्या प्रकारच्या स्थानात असेल, तदनुसार दिवसापासून वर्षा पर्यंतचे काल परिमाण ठरवण्यात येत असते.

सर्वसाधरणपणे अपेक्षित योगकारक ग्रह —

१)  केंद्रस्थानात आणि चर राशीत असता प्रत्येक संपूर्ण अंशास – एक दिवस.

२)  केंद्रस्थानात आणि द्विस्वभाव राशीत असता प्रत्येक संपूर्ण अंशास – एक आठवडा.

३)  केंद्रस्थानात आणि स्थिर राशीत असता प्रत्येक संपूर्ण अंशास – एक महिना.

४)  पणफर स्थानात आणि चर राशीत असता प्रत्येक संपूर्ण अंशास – एक आठवडा.

५)  पणफर स्थानात आणि द्विस्वभाव राशीत असता प्रत्येक संपूर्ण अंशास – एक महिना.

६)  पणफर स्थानात आणि स्थिर राशीत असता प्रत्येक संपूर्ण अंशास – एक वर्ष.

७)  आपोक्लिम स्थानात आणि चर राशीत असता प्रत्येक संपूर्ण अंशास – एक महिना.

८)  आपोक्लिम स्थानात आणि द्विस्वभाव राशीत असता प्रत्येक संपूर्ण अंशास – एक वर्ष.

९)  आपोक्लिम स्थानात आणि स्थिर राशीत असता प्रत्येक संपूर्ण अंशास – एका वर्षापेक्षा जास्त , अनिश्चित.

 

असे हे कालनिर्णयाचे परिमाण ठरवण्यात येत असते.

उदाहरणार्थ , एक आजार विषयक प्रश्न असून शनी व बुध हे त्याचे तात्कालिक कारक ग्रह बनलेले आहेत . या पैकी शनी कुंभेच्या २१ अंशावर धनस्थानात आणि बुध हा तूळेच्या १५ अंशात दशमस्थानात आहे असे गृहीत धरू. या कारक ग्रहांचा त्रिकोणयोग परिपूर्ण होण्यास सहा अंश कमी आहेत. योग पूर्ती करण्यास जाणार्‍या बुधाचे वास्तव्य केंद्रस्थानात आणि चर राशीत आहे. केंद्र स्थान आणि चर राशी यांचे संयुक्त परिमाण ‘दिवस’ असे आहे. त्यामुळे प्रश्नकाला पासून सहा दिवसांनी तो आजारी रोगमुक्त होईल , हे या प्रश्नाचे उत्तर आहे.

कालनिर्णय पद्ध्तीची ही रुपरेषा पाहून ही पद्धती फारच सुलभ आहे असे सकृद्दर्शनी वाटते हे खरे तथापि ती तितकी सुलभ नसून उलट काही अंशी गुंतागुंतीची , गणिती खटाटोप करण्यास भाग पाडणारी आणि निदान पाच-पन्नास कुंडल्या सोडवून प्रत्यक्ष अनुभव संपादन केल्या शिवाय पूर्ण पचनी न पडणारी अशी आहे.

कारण केंद्रस्थान आणि चर राशी या दुकलीशी निगडित असलेल्या ग्रहाचा दर्शक काल ‘दिवस’ असतो हे खरे पण केव्हा? तर तो ग्रह त्या केंद्र स्थानाच्या प्रारंभी असताना किंबहुना त्या केंद्र स्थानाच्या व्याप्तीच्या एक सप्तमांश या पेक्षा जास्त अंशात त्या प्रारंभबिंदू पासून दूर गेलेला नसताना आणि त्याच बरोबर, चर राशीच्या अगदी प्रारंभी असला तरच. कारण केंद्रस्थानाचा दर्शक काल ‘दिवस’ असून त्यानंतर येणार्‍या पणफर स्थानाचा दर्शक काल ‘आठवडा’ असल्याने त्या केंद्रस्थनाच्या सात विभागा पैकी ज्या विभागात ग्रहाचे वास्तव्य असेल, त्यानुसार तो दर्शक काल ठरवणे आवश्यक असते.  त्याच प्रमाणे चर राशीचा दर्शक काल ‘दिवस’ असून  त्या नंतर येणार्‍या स्थिर राशीचा दर्शक काल ‘महिना’ असल्याने चर राशीच्या तीस विभागां पैकी ज्या विभागात ग्रह आहे त्यानुसार तो दर्शक काल निश्चित करणे भाग असते. आणि हाच नियम स्थिर राशीतून द्विस्वभाव राशीत किंवा आपोक्लिम स्थातून केंद्र स्थानात जाण्याच्या मार्गावर असलेल्या ग्रहास लागू होत असतो.

वर घेतलेल्या उदाहरणात, आजारी व्यक्ती सहा दिवसांनी रोगमुक्त होईल असे आपण विधान केले खरे, पण ते विधान बिनचूक आणि सूक्ष्म आहे असे म्हणता येणार नाही. कारण संबधित कारक ग्रह बुध हा तूळेच्या १५ अंशावर आहे, आणि दशमबिंदू हा तूळेच्या पहील्या द्रेष्काणात नसून त्या राशीच्या ११ ते १५ यांपैकी कोणत्यातरी एका अंशात आहे. हा बुध अगदी दशमबिंदूच्या पूर्ण युतीत आहे असे जरी गृहीत धरले तरी,  तो दर्शक काल एका दिवासा ऐवजी एका पंधरवड्याचा घ्यावा लागेल, व त्यास अनुसरुन संपूर्ण रोगमुक्ती होण्यास तीन महीन्यांची गरज भासेल , असे उत्तर देणे भाग आहे.

तथापि, दरम्यानच्या काळात त्या आजार्‍याची स्थिती कशी राहिल, सतत तीन महीने तो आजार ठाण मांडून बसेल काय , अशा सारखे प्रश्न आपोआपच उद्भवतात. परंतु कोणताही ग्रह प्रामुख्याने राशितत्व आणि भावतत्व यांच्यानुसार फळे देत असतो, या मूलभूत नियमा कडे लक्ष दिले तर वर उल्लेखलेल्या प्रमाणे अवघ्या सहा दिवसात त्याच्या आजारात स्थूल मानाने बरीच सुधारणा होईल , निदान घरातल्या घरात हिंडण्याफिरण्याची त्यास ताकद मिळेल व त्याचे कुटुंबिय काळजीमुक्त होतील असे समजण्यास काही हरकत नाही. इतकेच नव्हे तर अशा वेळी प्रश्नकालीन चंद्र हा उपर्युक्त बुध किंवा शनि यांच्या शुभयोगात असला व तो शुभ योग पूर्ण होण्यास सहा अंशापेक्षा कमी अंतर असेल, तर सहा दिवसांच्या आधीच  तात्पुरती रोग मुक्तता होऊ शकेल. कारण चंद्र हा हितसंबधी व्यक्तीचा लग्नेशा खालोखाल दुय्यम कारक असतो.

त्याच प्रमाणे, अशाच एका संबधित कारक ग्रहाचा प्रश्नलग्नाशी शुभयोग झाला तर त्या वेळी या रोगमुक्ततेने आणखी एक टप्पा गाठलेला असतो. फक्त रोगाचा कायमचा बीमोड होऊन संपूर्ण रोगमुक्तता होण्यास तीन महिने लागतील इतकाच त्या सुक्ष्म योगाचा अर्थ असतो.

आता तो आजार कोणता असेल, कोणकोणत्या काळी टक्केवारीने वाढत्या प्रमाणात गुण येत राहील, शस्त्रक्रियेची गरज भासेल का, वैद्य बदलावा का इत्यादि अनेक प्रश्न उदभवू शकतील ही बाब वेगळी !

असो , प्रश्नकुंडली बाबत बरेच विवेचन झाले आता आपण ‘त्या’ जताकाने विचारलेया तिस-चाळिस प्रश्नांची उत्तरे कशी मिळवता येतील ते पाहू….

(क्रमश: )

 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.