एका प्रेमवेड्याने विचारलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उत्तरे ज्यो. शांताराम केणी यांनी कशी दिली याबद्दलची  ही लेखमाला …..

या लेखमालेतले पहिले लेख इथे वाचा:

 

अबब ! किती हे प्रश्न ! (१)

अबब ! किती हे प्रश्न ! (२)

अबब ! किती हे प्रश्न ! (३)

अबब ! किती हे प्रश्न ! (४)

अबब ! किती हे प्रश्न ! (५)

 


ज्यो. शांताराम केणी लिहितात:


 

अपेक्षाभंगाचे योग

१) अनिष्ट केंदर्योग:

‘कष्टसाध्य केंद्र योगा’ ऐवजी त्याच कारकांचा ‘अनिष्ट केंद्रयोग’ होत असला तर त्या संबधित व्यक्तीं मध्ये तंटेबखेडे माजून कार्यसिद्धी होणे सर्वस्वी अशक्य ठरत असते.

२) प्रतियोग:

संबधित कारक ग्रहांचा ‘होऊ घातलेला – Applying’ प्रतियोग घडणे हे कार्यनाशाचे आणि अपेक्षाभंगाचे खास लक्षण असते. कारण असा योग घडत असता संबधित व्यक्तीं मध्ये मत्सर , तंटेबखेडे व शत्रुत्व माजते, आणि परस्परांस नुकसानीत आणि संकटांत लोटण्याचा प्रयत्न त्यांच्या कडून होत असतो, अर्थात कार्यनाश आणि अपेक्षाभंग या गोष्टी तर ठरलेल्या असतातच; पण अशा वेळी ज्या व्यक्तीचा कारक ग्रह जास्त दुर्बल असेल तर ती व्यक्ती जास्त प्रमाणात गोत्यात येत असते.

३) प्रतिबंध योग (Frustration):

अपेक्षित दोन कारक ग्रहांचा ‘होऊ घातलेला – Applying’ स्वरूपाचा शुभ योग होत असतां, तो योग परिपूर्ण होण्यापूर्वी तिसरा एखादा ग्रह स्वत:च्या केंद्र / प्रतियोगा सारख्या अशुभ योगाने त्यातील कोणत्याही एका कारक ग्रहास विद्ध करत असला तर अशा वेळी ‘प्रतिबंध योग’ होत असतो. ‘मध्यस्थ’ योगाच्या नेमक्या विरूद्ध गुणधर्माचा आणि कार्यनाशक असा हा योग असून पृच्छकाचा अपेक्षाभंग करण्यात त्याचा हातखंडा असतो. आणि असा प्रतिबंध करणारा ग्रह ज्या स्थानाचा अधिपती असतो , त्या स्थानाने दर्शित होणार्‍या गोष्टी किंवा व्यक्ती प्रतिबंधक स्वरूपाचे अडथळे आणून कार्यनाश करीत असतात. मात्र हा विचार करताना तो प्रतिबंधक ग्रह कोणत्या कारकाशी प्रतिबंध करतो ते पाहून त्या बाबतीतला अंदाज बांधायचा असतो. कारण पृच्छ्काच्या कारका ऐवजी संबधित व्यक्तीच्या कारकाशी प्रतिबंध घडला तर त्या त्या संबधीत व्यक्तीचे दर्शकस्थान हे तनुस्थान (लग्न) धरून त्या प्रतिबंधक ग्रहाचे त्या व्यक्तीपुरते भावाधिपतित्व ठरविणे भाग असते.

उदाहरणार्थ , एक विवाह विषयक प्रकरण असून प्रश्नलग्नी मीन राशी उदित आहे. आणि पृच्छक व त्याची संकल्पित पत्नी यांचे कारक ग्रह अनुक्रमे गुरू व बुध हे मिथुनेच्या अनुक्रमे १५ व्या व १२ व्या अंशात आहेत असे गृहीत धरू. वास्तविक अल्पकाळात म्हणजे काही थोड्या आठवड्यांच्या अवधीत संकल्पित विवाह घडवून आणणारा हा योग आहे. पण अशा वेळी त्या बुध – गुरू ची अंश- कला-विकलात्मक युती परिपूर्ण होण्यापूर्वी , बुधाशी किंवा गुरूशी कन्या राशीगत पंचमेश चंद्राचा केंद्र योग घडला तर त्या केंद्रयोगामुळे जवळपास निश्चित ठरलेला विवाह सर्वस्वी फिसकटत असतो. हा केंद्रयोग बुधाशी म्हणजे सप्तमेशाशी होत असेल तर संबधीत स्त्री म्हणजे संकल्पित वधू स्वत:च्या उद्दिष्टां पासून परावृत्त होऊन काढता पाय घेत असते ; जर बुधा ऐवजी लग्नेश गुरूशी हा केंद्रयोग होत असेल तर संबधित पुरूष म्हणजे स्वत: पृच्छकच त्या प्रकरणातून निवृत्त होत असतो. प्रस्तुत प्रकरणी चंद्र हा पृच्छकाचा पंचमेश आणि संकल्पित वधूचा लाभेश आहे. अर्थात त्या चंद्राचा बुधाशी योग घडता त्या वधूची मित्र-मैत्रीणी सारखी एखादी व्यक्ती तिला परावृत्त करण्यास कारणीभूत होईल. जर बुधा ऐवजी गुरूशी त्या चंद्राचा केंद्र योग होत असेल तर पृच्छकाच्या एखाद्या प्रेयसीसारखी पंचमस्थानाने दर्शित होणारी व्यक्ती त्याला परावृत्त करेल. तसेच पुरुष राशीतलील पुरुष ग्रहाचा योग घडत असता प्रतिबंध करणारी व्यक्ती पुल्लिंगी असते , तर स्त्री राशीतील स्त्री ग्रहाचा योग घडत असेल तर ती प्रतिबंधक व्यक्ती स्त्री लिंगी असते. आणि ग्रह राशीत लिंगभेद असला, विशेषत: द्विस्वभाव राशी निगडित असल्या तर एक स्त्री आणि दुसरी पुरुष अशा दोन व्यक्ती संयुक्त रीतीने त्या प्रतिबंधास कारणीभूत होत असतात. त्याच प्रमाणे असा योग ज्या राशीप्रत असेल त्या ग्रह-राशी – असमागमाच्या वर्णनानुसार अशा व्यक्तींच्या शारीरिक आणि मानसिक ठेवणीचा बोध होत असतो. इतकेच नव्हे तर, ग्रह , राशी, भाव, योग इत्यादि सर्वांचे नैसर्गिक तात्कालिक गुणधर्म , त्यांचे कारकत्व वगैरे मूलभूत स्वरूपाच्या प्राथमिक आणि माध्यमिक माहितीचा साकल्याने अवलंब करून जरा खोलवर कुंडलीचा विचार केला तर, प्रतिबंध करणार्‍या व्यक्तीने काय सांगितले असेल, कोणते आरोप केले असतील व त्यांच्या मनावर कोणते परिणाम केले असतील याचा अंदाज बांधणे शक्य असते.

४) वक्र योग ( Refranation)

अपेक्षित दोन कारक ग्रह परस्परांशी ‘होऊ घातलेला – Applying’ योग , जसे युती किंवा अन्य शुभ योग करीत असतील आणि तो योग पूर्ण होण्या आधीच त्यातील एखादा ग्रह वक्री होणे याला ‘वक्र योग ‘ असे म्हणतात. हा योग कार्यभंग आणि अपेक्षाभंग करणारा अतएव नेहमी प्रतिकूल असतो, आणि अशा वेळी ज्या व्यक्तीचा कारक ग्रह वक्री होतो त्या व्यक्तीचे विचार बदलून आणि नियोजित कार्यापासून परावृत्त होऊन ती व्यक्ती स्वत:चे अंग सपशेल काढून घेत असते.

५) दृष्टीशून्य योग ( Void of Course)

अपेक्षित ग्रहाचा किंवा इष्टकालिन ग्रहाचा स्वत:ची तात्कालिक राशी सोडण्यापूर्वी कोणत्याच ग्रहाशी कसलाही दृष्टीसंबंध न घडणे , हा ‘दृष्टीशून्य योग’ असतो. हा योग बहुतांशी प्रतिकूल असतो, कारण असा योग असता संबंधीत ग्रह स्वत:च्या कारकत्वा खालील शुभफळे देण्यास असमर्थ असतो. विशेषत: प्रश्नकालिन चंद्र दृष्टीशून्य असला तर त्या प्रश्नाशी संबधीत असलेल्या कार्यात पृच्छकाला यश लाभणे अशक्य तर असतेच; पण त्या कार्यास प्रारंभ होणे किंवा त्याची पूर्वतयारी होणे हे देखीळ कठीण होत असते.

६) निष्क्रिय योग (Impediments)

अपेक्षित दोन कारक ग्रहांचा कार्यसिद्धी किंवा अपेक्षापूर्ती दर्शवणारा शुभयोग होत असता त्यातील एखादा कारक ग्रह स्वत:च्या नीच किंवा प्रतिकूल राशीत आपोक्लिम स्थानात असून शुभदृष्टीविरहित असला अगर एखाद्या क्रूर ग्रहाने पीडीत असला तर तो ‘निष्क्रिय योग’ ठरत असतो. अशा वेळी संकल्पित किंवा अंगिकृत कार्यात अनिवार्य स्वरूपाचे अडथळे येऊन कार्यसिद्धी होणे कठीण असते आणि अशा रितीने ज्या व्यक्तीचा कारक ग्रह दुर्बल असेल, त्या व्यक्तीची असहायता कार्यनाशास कारणीभूत ठरते.

याशिवाय , प्रश्नकालीन चंद्र पीडित असणे , रवीच्या युतीत शिरणारा असणे, कोणत्याही ग्रहाशी योग करण्यास जाणारा नसणे, लग्नेश किंवा कार्यकारक भावाचा अधिपती वक्री अथवा अस्तंगत असणे, अशा सारखे योग कार्यसिद्धीच्या बाबतीत नेहमी प्रतिकूलच असतात. पापग्रहांचे योग कार्याचा खेळखंडोबा करून विलंब लावतात तर निर्बली अवस्थेतील शुभ योग कार्यपूर्तीच्या बाबतीत दुर्बल ठरत असतात.
प्रश्नकालीन चंद्र शुभग्रहाच्या योगातून सुटलेला असता पृच्छकाचा प्रश्न शुभ कार्या संबधीत असतो , तर तोच योग पाप ग्रहाशी झालेला असेल तर पृच्छकाचे कार्य अशुभ गुणधर्माचे असते.

त्याच प्रमाणे प्रश्नकालीन चंद्र शुभ ग्रहाशी शुभ योग करण्यास जात असेल तर संबधित कार्याचा शेवट अतिशुभपर्यवसायी ठरत असतो आणि क्रूर ग्रहाशी पापयोग करण्यास जात असता तो शेवट दु:खपर्यवसायी आणि आपत्तिकारक ठरत असतो आणि असा योग केतूशी होत असला तर ज्या स्थानात केतू असेल त्या स्थानाने दर्शित होणार्‍या गोष्टी बाबत पृच्छ्कावर भलतेच आळ आणि आरोप येत असतात.

लेखमालेच्या पुढच्या भागात आपण ‘कालनिर्णय’ या विषयाचा विचार करू .

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.