एका प्रेमवेड्याने विचारलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उत्तरे ज्यो. शांताराम केणी यांनी कशी दिली याबद्दलची  ही लेखमाला …..

या लेखमालेतले पहिले दोन लेख इथे वाचा:

या लेखमालेचा पहिले भाग इथे वाचा:

अबब ! किती हे प्रश्न ! (१)

अबब ! किती हे प्रश्न ! (२)

अबब ! किती हे प्रश्न ! (३)

 


ज्यो. शांताराम केणी लिहितात:


प्रश्नकुंडलीच्या कार्यक्षमतेची कसोटी:

कार्यक्षमता:

इष्टकाळ साधनाद्वारे मांडण्यात आलेली कुंडली जरी विश्वासार्ह्य ठरली तरी ती कार्यक्षम ठरेलच असे म्हणता येणार नाही आणि जर ती कुंडली कार्यक्षम नसली तर त्या कुंडलीचा आणि पर्यायाने पृच्छकाच्या प्रश्नांचा विचार करणे कोणत्याच दृष्टीने आणि कोणत्याच परिस्थितीत हितावह ठरणार नाही. पृच्छकाच्या प्रश्नांची अनुकूल व प्रतिकूल पण काही अंशी नि:संदिग्ध उत्तरे सापडणे व त्या उत्तरांनी पृच्छाकाच्या जिज्ञासेचे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत समाधान होणे हे प्रश्नकुंडलीच्या कार्यक्षमतेचे लक्षण आहे.

परंतु –

१)  प्रश्नकुंडलीच्या लग्नकेंद्री कोणत्याही राशीचा पहीले किंवा शेवटचे तीन अंश उदीत असणे-

२) प्रश्नकालिन चंद्र दृष्टीशून्य (Void Of Course) असणे , म्हणजे स्वत:ची तात्कालिक राशी सोडण्यापूर्वी कोणत्याही ग्रहाशी चंद्राचा कोणताच दृष्टी संबंध न घडणे ; विशेषत: असा प्रकार होत असता त्या चंद्राचे वास्तव्य तात्कालिक राशीच्या शेवटच्या दोन अंशात असणे –

३) या चंद्राचे वास्तव्य आपोक्लिम स्थानांत, आणि त्यातल्या त्यात षष्ठम स्थानात असणे, तो चंद्र वृश्चिक – मकरेचा असून आपोक्लिम स्थात असणे, किंवा विशाखा नक्षत्र विभगाच्या तृतीय अथवा चतुर्थ चरणात असणे –

अशा सारखा एखादा प्रकार प्रश्नकुंडलीत आढळून तयेणे हे त्या कुंडलीच्या अकार्यक्षमेतेचे खास लक्षण समजून ती प्रश्नकुंडली त्याज्य ठरवून त्यावरून कोणताही प्रश्नविचार करणे टाळणे उचित ठरते. कारण अशा इष्टकाळी पृच्छकाच्या मनात अनाकलनिय गोंधळ माजलेला असतो. आपले प्रश्न कोणते आहेत, आपण काय विचारत आहोत, व कोणत्या गोष्टी बाबत किंवा प्रकरणा बाबत खुलासा करून घ्यावयाचा आहे याचे त्याला भान नसते. त्याचे विचार , जिज्ञासा, आणि प्रश्न यांत एकवाक्यता नसते, वाक्यागणिक वारंवार असे काही बदल होतात की आपल्याला काय पाहिजे आणि त्यासाठी आपण कोणते प्रश्न विचारले पाहिजेत हेच त्याला समजेनासे होते व त्यामुळे प्रश्नविचारण्यास कारणीभूत झालेले मुख्य प्रकरण आणि प्रमुख बाब ही अधांतरीच लोंबकळत ठेवून अप्रस्तुत आणि विसंगत प्रश्नांची सरबत्ती तो करत असतो. त्या सर्व प्रश्नांचे योग्य वर्गीकरण करून त्यांची यथायुक्त उत्तरे देण्याचा ज्योतिषाने कितीही प्रामाणिक प्रयत्न केला किंवा यशस्वी प्रयत्न केला तरी त्याचे समाधान न होता , उलट त्याच्या कडून ज्योतिषाची आणि पर्यायाने ज्योतिषशास्त्राची हेटाळणी होत राहते.

आणि अशा वेळी शनि-मंगळ-केतू यांसारखा पापग्रह स्व:स्वस्तिकी असला तर त्या प्रश्न विचारण्याच्या वेळी पृच्छक आणि ज्योतिषी यांच्या मध्ये वितंडवाद व भांडणे माजून उभयतांची बेअब्रू होण्याचा धोका असतो. आणि त्याच वेळी प्रश्नलग्नेश किंवा प्रशनचंद्र स्वत:च्या नीच क्षेत्री अगर अस्तंगत असला तर तो पृच्छक स्वत:च्या अतिमहत्त्वाच्या मूळ प्रश्नाबाबतही बेफिकीर असतो !

अर्थात वर उल्लेख केलेल्या प्रकारांपैकी एखादा प्रकार प्रश्नकुंडलीत आढळून येत असला तर अशा वेळी ती कुंडली विचारात न घेता तो प्रश्नविचार अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकणे अपरिहार्य असते.

प्रश्नकालीन सप्तमबिंदू क्रूर ग्रहांच्या युती-प्रतियोगात असणे; सप्तमेश वक्री, नीच किंवा अस्तंगत असणे; शनि-हर्षल- नेपच्यून सारखा वक्री ग्रह लग्नी असणे; अशा ग्रहांच्या युतीत लग्नेश असने; प्रश्नकालीन चंद्र एका क्रूर ग्रहाच्या पापयोगातून सुटलेला असणे; दुसर्‍या क्रूर ग्रहाच्या अशुभ योगात जाणारा असणे, अशा सारखे प्रकारही पृच्छ्काचे असमाधान आणि चिडखोरपणा वाढणारेच असल्याने अशा वेळीही प्रश्नविचार न करणे हे पृच्छक आणि ज्योतिषी यामधील अप्रीती, कटूता आणि परस्परांतला तिटकारा टाळण्याच्या दृष्टीने सोयिस्कर असते.

तथापि तीच कुंडली , प्रश्नकाल किंवा जिज्ञासाकाल यांच्या ऐवजी एखाद्या विशिष्ट घटनाकालीन असली आणि विचारलेला प्रश्न त्या घटनेशी निगडित असला तर अशा वेळी तीच कुंडली विश्वसनीय आणि कार्यक्षम मानून प्रश्नविचार करणे योग्य ठरत असते. मग त्या प्रश्नलग्नी राशीचा शेवटचा अंश जरी उदित असला किंवा प्रश्नचंद्र दृष्टिशून्य असला तरी हरकत नाही.

कुंडली विचार:

कुंडली हा इष्टकालीन आकाशस्थ ग्रहस्थितीचा इष्ट स्थळानुसार काढलेला नकाशा असून मानवी आयुष्यातील शुभाशुभ फळांचा आणि गोष्टींचा अंदाज बांधण्याचे ते एक विश्वसनीय साधन आहे. फलादेशाच्या सोयीसाठी अशा कुंडलीचे कमी-अधिक व्याप्तीचे बारा भाग केलेले असून त्या प्रत्येक भागास ‘भाव’ ऊर्फ ‘स्थान’ अशी संज्ञा दिलेली आहे. मानवी आयुष्यातील असंख्य गोष्टींची , घडामोडींची आणि शुभाशुभ फळांची विभागणीही तशाच बारा गटांत करण्यात आलेली असून त्या प्रत्येक गटाचे कारकत्व कुंडलीतल्या एकेका स्थानास प्रामुख्याने दिले आहे. अशा प्रत्येक स्थानाचा अधिपतिग्रह हा त्या त्या गटात अंतर्भूत होणार्‍या गोष्टींचा आणि व्यक्तींचा तात्कालीक पण महत्त्वाचा कारक असतो. अर्थाय त्या त्या स्थानात बसलेले ग्रह आणि विशिष्ट गोष्टींचे स्वाभाविक किंवा नैसर्गिक कारक ग्रह हेही पण त्या त्या विशिष्ट गोष्टींचे आणि व्यक्तींचे दर्शक असे प्रमुख घटक आहेत, तसेच लग्नेश हा पृच्छकाचा दर्शक किंवा कारक ग्रह असून पृच्छकाचे कार्य आणि प्रश्न ज्या स्थानाने दर्शित होणारे असतील त्या स्थानाचा अधिपति हा कार्यकारक ग्रह असतो.

आता या माहितीच्या आधार घेऊन कुंडली विचाराच्या पूर्वतयारीकडे वळू.

सर्वसामान्य, पण खर्‍याखुर्‍या जिज्ञासू पृच्छकाचा प्रश्न ज्या गोष्टिंशी निगडीत असेल ती गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे सिद्धीस जाऊन त्याची अपेक्षापूर्ती होईल की कार्यनाश होऊन पृच्छकाचा अपेक्षाभंग होईल, आणि ती कार्यसिद्धी किंवा कार्यनाश केव्हा म्हणजे कोणत्या काळी होईल, हा पृच्छक आणि ज्योतिषी या उभयतांच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा प्रश्न असून त्याबाबतचा सविस्तर तपशीळ ही दुय्यम महत्त्वाची बाब असते. सबब सर्वसाधारणपणे अपेक्षापूर्ती आणि अपेक्षाभंग करणारे ग्रहयोग कोणकोणत असतात ते आता पाहू…

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.