एका प्रेमवेड्याने विचारलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उत्तरे ज्यो. शांताराम केणी यांनी कशी दिली याबद्दलची  ही लेखमाला …..

या लेखमालेतले पहिले दोन लेख इथे वाचा:

या लेखमालेचा पहिले भाग इथे वाचा:

अबब ! किती हे प्रश्न ! (१)

अबब ! किती हे प्रश्न ! (२)

 


ज्यो. शांताराम केणी लिहितात:


प्रश्नकुंडली हे जन्मकुंडलीचे एक लहान भावंड आहे असे मानले तरी फलादेशाबाबतचे तिचे कित्येक नियम हे जन्मकुंडली च्या नियमां पेक्षा स्वतंत्र आहेत. त्या सार्‍या नियमांची विस्तृत माहिती येथे देणे सयुक्तिक ठरले असते पण विस्तारभयास्तव त्या विस्तृत नियमांचा संक्षेप करून फक्त आवश्यक स्वरूपाचे नियम देणे प्राप्त परिस्थितीत आम्हास भाग आहे.

प्रश्नकुंडलीचा इष्टकाल:

जन्मकाल हा जसा जन्मकुंडलीचा इष्टकाल असतो त्याप्रमाणे प्रश्नकाल म्हणजे ज्या क्षणी पृच्छक ज्योतिषास प्रश्न विचारील तो क्षण हा प्रश्नकुंडलीचा इष्टकाल असतो अशी समजूत आहे. परंतु ही समजूत सर्वस्वी बरोबर नाही. तर विषीष्ट प्रश्ना बाबतचा प्रथमजिज्ञासाकाल हा त्या प्रश्नकुंडलीचा खरा इष्टकाल असतो. मग त्या पृच्छाकाची आणि ज्योतिषाची भेट केव्हाही झाली असो, किंवा तो प्रश्न पृच्छाकाने केव्हावी उघड केलेला असो.

कल्पना करू की, एका माणसास मंगळवारी  सकाळी १०॥ वाजता टपालाने एक पत्र प्राप्त झाले, तो माणुस त्यावेळी घाईत असल्याने त्याने ते पत्र तसेच बाजूला ठेवून दिले. संध्याकाळी सवड  मिळाल्या नंतर त्याने ते पत्र वाचले, त्या पत्रातल्या मजकूरातून त्याला त्याचा एक अतिजवळचा नातलग परगावीं अत्यवस्थ आजारी असल्याचे समजले. ज्या वेळी त्या पत्रातला हा नेमका मजकूर त्याने वाचला ती वेळ ठीक मंगळवार , संध्याकाळचे ६:२४ अशी होती व त्या क्षणापासून त्याच्या मनाला त्या आजार्‍याच्या भवितव्या बद्दल चिंता वाटू लागली.

१) त्या नातलगास कोणता आजार झाला असेल?

२) त्या आजाराचे स्वरूप काय असेल?
३) तो आजार प्राणघातक ठरेल काय?

४) योग्य वैद्यकिय उपचार चालू असतील काय?

५) सध्या उपचार करणार्‍या वैद्याच्या औषधोपचारनेच गुण येईल काय?

६) अथवा त्या वैद्या ऐवजी दुसर्‍या एखाद्या तज्ञ वैद्याचे औषधोपचार सुरू करणे उपयुक्त होईल काय?

७) औषधोपचार साठी अपरिहार्य असलेला पैसा त्या नातलगाच्या संग्रही असेल काय?

८) तो आजार पूर्णपणे केव्हा बरा होईल?

९) हा आजार अंतिम असेल काय?

१०) आजार अंतिम असेल तर त्या आजार्‍याच्या गावी जाऊन त्याचे शेवटचे दर्शन घेणे शक्य होईल काय?

११) आजार्‍याच्या गावी त्याला भेटायला जाताना दुसर्‍या एका विशेष तज्ञ वैद्यास बरोबर नेणे उपयुक्त ठरेल का?

अशासारखे भितियुक्त विचार त्या माणसाला बैचैन करू लागले. तेव्हा या एकंदर प्रकरणाची फलज्योतिषाधारे शहानिशा करून घ्यावी असे त्याच्या मनात आले. दुसर्‍या दिवशी बुधवारी सकाळी तो एका ज्योतिषा कडे गेला व पत्रातील मजकूर आणि त्याद्वारे मनात उत्पन्न झालेल्या या सार्‍या भितियुक्त शंकांंचा पाढा वाचू लागला. त्या ज्योतिषास त्यावेळी दुसरी कामें असल्यामुळे ज्योतिषाने त्या पृच्छाकाला त्याच दिवशी पण दुपार नंतर भेटावयास सांगीतले. त्या प्रमाणे त्या माणसाने त्याच दिवशी बुधवार संध्याकाळी ४ वाजता त्या ज्योतिषाची भेट घेऊन एकंदर हकीकत निवेदन केली आणि वर उल्लेखिलेल्या प्रश्नांबाबत जिज्ञासा व्यक्त केली.

अशा परिस्थितीत प्रश्नकुंडलीच्या साधना साठी इष्ट काल कोणता घ्यावा असा प्रश्न उपस्थित झाला तर “मंगळवार, संध्याकाळी ६:२४” असेच त्याचे उत्तर असेल. कारण प्रस्तुत प्रश्नकर्त्याचे सारे प्रश्न त्याच्या एका नातलगाच्या आजाराशी निगडित असून त्या आजाराची जाणीव त्याला याच वेळी प्रथम झाली व तेव्हापासून त्याची त्या नातलगाच्या आजारा बाबतीतली जिज्ञासा जागृत झाली.

कोणत्याही गोष्टीबाबत,  कार्याबाबत, घटनेबाबत किंवा बर्‍यावाईट बातमी बद्दल पृच्छाकास ज्या क्षणी आत्यंतिक तळमळ लागून बरेवाईट विचार मनात येतात तो क्षण हा त्या प्रश्नांच्या बाबतीतल्या प्रश्नकुंडलीचा खरा इष्टकाल असतो.

अशा रितीने इष्टकालसाधन झाल्यावर यदाकदाचित त्या प्रश्नकुंडलीच्या लग्नकेंद्री जिज्ञासू पृच्छाकाचे जन्मलग्न उदित होत असले तर ती प्रश्नकुंडली १००% विश्वसनिय मानून बिनधोक रीतीने फलादेश वर्तवण्यास कोणताही अडसर / आक्षेप असत नाही. स्वत:च्या प्रश्नाबाबत पृच्छक किती प्रमाणात प्रामाणिक आहे आणि त्या गोष्टीची त्यास किती प्रमाणात अत्यंतिक तळमळ लागली आहे त्याचा बोध अशा प्रकारच्या लग्नावरून होत असतो.

तथापि, प्रत्यक्ष व्यवहारात कित्येक वेळा असा सुक्ष्म इष्टकाल साधणे शक्य नसते ,  अशा वेळी ज्या क्षणी ज्योतिषास प्रश्न विचारण्यास पृच्छक प्रारंभ करेल त्याच क्षणाची इष्टकालासाठी नियुक्ती करणे अपरिहार्य ठरते. मात्र ज्योतिषी आणि पृच्छक यांची नजरानजर किंवा भेट होण्याचा काल हा खरा इष्टकाल हे येथे ध्यानात ठेवणे जरूरीचे आहे. तसेच पृच्छक आणि ज्योतिषी यांच्या प्रत्यक्ष भेटी ऐवजी एखाद्या पत्राद्वारेच पृच्छा केली असेल तर त्या पृच्छेशी निगडीत असे नेमके वाक्य ज्या क्षणी ज्योतिषाच्या वाचनांत येईल नेमक्या त्या क्षणाची इष्टकालात गणना करावयाची असते आणि अशा इष्टकालानुरोधाने तयार करण्यात येत असलेली सुस्पष्ट सायन भावचलित कुंडली हीच खरीखुरी ‘प्रश्नकुंडली’ असते.

इष्टकालानुसार मांडण्यात आलेल्या प्रश्नकुंडलीच्या द्वारे पृच्छकाच्या समस्यांचा शोध घेण्यापूर्वी ती प्रश्नकुंडली विश्वसनीय आणि कार्यक्षम आहे किंवा काय याची तपासणी करणे आवश्यक असते आणि अशा तपासाअंती त्या कुंडलीत विश्वसनियता किंवा कार्यक्षमता यापैकी कोणत्याही एकाचा अभाव आढळून आला तर त्या कुंडलीवर विसंबून भविष्य वर्तविणे बरोबर ठरत नसते.

सबब, ही तपासणी कशी करतात हे आपण आता थोडक्यात पाहू.

प्रश्नकुंडलीची विश्वसनियता:

इष्टकालीन प्रश्नकुंडलीच्या विश्वसनियतेची खात्री करून घेण्यासाठी त्या कुंडलीत खालील लक्षणें दिसून येतात किंवा काय याची पाहणी करणे भाग असते , विशेषत:

प्रश्नकुंडलीच्या लग्नकेंद्री उदित असलेली राशी आणि त्या राशीशी किंवा तनुस्थानात अंतर्भूत झालेल्या राशीशी, किंबहुना अशा उभय राशींशी झालेले विशिष्ट ग्रहांचे समागम, हे प्रश्नकर्त्याच्या शारीरिक आणि मानसिक ठेवणीचा बोध करून देतात काय म्हणजे प्रश्नकर्त्याचे शारीरिक आणि मानसिक वर्णन व त्या ग्रह-राशी समागमाचे वर्णॅन यात साम्य आढळत आहे काय हे तपासावे लागते.

लग्नकेंद्री कोणताच ग्रह उदित नसला तर लग्नारंभीची राशी, राशीविभाग आणि राश्यांश हे स्वत:च्या परीने तशा वर्णनाचा बोध करून देतात काय, पृच्छकाचा प्रश्न ज्या व्यक्तीशी निगडीत असेल व ती व्यक्ती ज्या स्थानाने (नेमक्या ज्या स्थानाने) दर्शित होणारी असेल, त्या व्यक्तीच्या (तिच्या शारिरिक वर्णनाचा आणि मानसिक ठेवणीचा) बोध प्रश्नकुंडलीतल्या त्या  संबधित स्थानाने होत आहे काय,

लग्नकेंद्री उदित असलेली राशी , लग्नेश ज्या राशीत असेल ती राशी , षष्ठभावारंभी उदित असलेली राशी , षष्ठेशाचे वास्तव्य ज्या राशीत असेल ती राशी व ज्या राशीत चंद्र असेल ती राशी , या सर्व राशींनी दर्शित होणार्‍या पृच्छकाच्या त्या त्या शरीरावयावर तीळ, डाग, व्रण , जखम अशा सारखी एखादी खूण आहे काय,

तसेच लग्नेश, षष्ठेश, किंवा चंद्र यांच्या दृष्टीयोगातील शनि – मंगळ – हर्षल सारखे पापग्रह ज्या राशीत असतील, त्या राशिंनी दर्शित होणार्‍या  पृच्छकाच्या त्या त्या शरीरावयावर तीळ, डाग, व्रण , जखम अशा सारखे एखादे दर्शक चिन्ह आहे काय,

प्रश्नकुंडलीत लग्नकेंद्र हे जसे पृच्छकाचे  तनुस्थान असते, त्याचप्रमाणे पृच्छकाचा प्रश्न ज्या व्यक्तीशी निगडित असेल व ती व्यक्ती नेमक्या ज्या स्थानाची दर्शक असेल, ते स्थान हे त्या व्यक्तीचे तनुस्थान ऊर्फ लग्नकेंद्र मानण्यात येत असते, सबब वर उल्लेखिलेल्या नियमांस अनुसरून त्या संबधित व्यक्तीच्या त्या त्या विशिष्ट शरीरावयावर तशीच तीळ-जखमादि दर्शक चिन्हें आहेत काय,

वर उल्लेखिलेल्या तीळ-डागांशी किंवा व्रण-जखमांशी पुरूष राशी किंवा पुरूष ग्रह निगडीत असता त्या दर्शक खुणां शरीराच्या उजव्या बाजूस आणि स्त्री राशी किंवा स्त्री ग्रह यांच्याशी संबंध येत असता त्याच खुणां डाव्या बाजूस आढळतात काय,

तसेच संबधित ग्रह किंवा राशी उदित गोलार्धात असता त्या खुणां शरीराच्या पुढीळ बाजूस इष्टोत्पत्तीस येतात काय ,

त्याच प्रमाणे संबधित ग्रहांचे वास्तव्य तात्कालिक राशीच्या पहिल्या द्रेष्काणात असता किंवा संबधित भावाच्या आरंबसंधीवर तात्कालिक राशीचा पहिला द्रेष्काण उदित असता या खुणां अगर दर्शक चिन्हे ही त्या त्या शरीरावयावर वरच्या भागात , आणि दुसरा किंवा तिसरा द्रेष्काण निगडित असता त्या त्या शरीरावयाच्या अनुक्रमे मध्यभागी व खालच्या भागी त्या खुणा दिसून येतात काय,

प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक राशी यांचा निरनिराळ्या शरीरावयावर जसा अंमल असतो , त्याच प्रमाणे कुंडलीतील प्रत्येक स्थानाचा अंमलही पण तशाच विशिष्ट अवयवां वर असतो म्हणून ग्रह-राशी प्रमाणेच प्रश्नकुंडलीतील संबधित स्थाने ही पृच्छक आणि त्याचे प्रश्न ज्या व्यक्तीशी निगडित असतील ती व्यक्ती या सर्वांच्या स्थितीचा आणि वर्णनाचा बोध करून देतात काय ,

प्रत्येक राशी आणि प्रत्येक ग्रह यांचे निरनिराळे रंग असून विशिष्ट ग्रहांच्या विशिष्ट राशी – समागमानुसार विशिष्ट प्रकारचे तिसरेच रंग निर्माण होतात याची कल्पना ज्योतिषाच्या विद्यार्थ्यांना असेलच , सबब वर उल्लेखिलेले कारक हे पृच्छक आणि संबधित व्यक्ती यांनी परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगाचा आणि शरीरावरील तीळ, मस, व्रण ,जखमादि रंगांचा योग्य बोध करून देतात काय,

संबधित व्यक्तीच्या धंदाव्यवसायाची स्थूल कल्पना प्रश्नकुंडलीतील तात्कालिक कारकांकडून होत आहे काय,

अशासारख्या अनेक गोष्टींची बारकाईने पाहणी करणे भाग असते आणि वर उल्लेखिलेले प्रकार जर प्रश्नकुंडलीत आढळून आले तर ती कुंडली विश्वसनिय समजण्यास हरकत नसते.

 


हे लेखन कै शांताराम केणींचे आहे , मी ते जसेच्या तसे उतरवून काढले आहे , या लेखनावर विल्यम लिली चा मोठा प्रभाव आहे हे दिसते आहे.

या  भागात प्रश्नकुंडली आणि अंगावरचे तीळ मस, डाग , व्रण ,इ बद्दल लिहले आहे ते नियम लावायचे ठरवले तर एकही प्रश्नकुंडली रॅडीकल ठरणार नाही.

शिवाय आजकालच्या जमान्यात खास करुन स्त्रियांना ‘तुमच्या अंगावर अमुक ठिकाणी , तमुक प्रकाराचा डाग, खूण, तीळ इ आहे का ?” असे विचारणे व्यवहार्य  नाही  , धोक्याचे आहे  (जोडे पडतील !)

 

चार्ट रॅडीकल  (विश्वासार्ह्य आणि कार्यक्षम ) आहे का नाही हे ठरवायच्या अजूनही काही चांगल्या पद्धती आहेत.

 


 

 

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.