अबब ! किती हे प्रश्न !………

या लेखमालेच्या पहिल्या भागात एका प्रेमवेड्याने विचारलेल्या एक नाही दोन नाही तर तब्बल ४७ प्रश्नांची  एक ‘अबब’ यादी आपण पाहीली हे सारे प्रश्न एकाच व्यक्तीने , एकाच वेळी , एकाच दमात विचारले आहेत !!
‘क्या बच्चे की जान लोगे क्या’ असे विचारायला सुद्धा संधी नाही !!

त्या वेळेस ज्यो शांतारामजी केणी यांना त्या जातकाच्या ह्या सार्‍या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत पण नंंतर त्यांनी प्रश्नशास्त्राचा सखोल अभ्यास करून ह्या अशा सार्‍या प्रश्नांची समर्पक उत्तरे प्रश्नाशास्त्राच्या माध्यमातून कशी देता येतात हे सोदाहरण स्पष्ट केले त्यांच्या लेखनाचा काही अंश आपल्या समोर सादर करत आहे , अर्थात कै ज्यो. शांतारामजी केणी यांची परवानगी न घेता हे कृत्य करत आहे त्याबद्दल त्यांची मन:पूर्वक क्षमा मागत आहे.

या लेखमालेचा पहिला भाग इथे वाचा:

अबब ! किती हे प्रश्न ! (१)

 

ज्यो. शांताराम केणी लिहितात:

जन्मस्थळाच्या अक्षांश – रेखांशानुसार तयार करण्यात येत असलेली व स्पष्ट द्वादशभाव, स्पष्ट द्वादश ग्रह, सहमें , क्रांती, गती, शर , नक्षत्रें, तारे , दृष्टीयोग इत्यादि बाबींनी युक्त असलेली सुस्पष्ट सायन भावचलित जन्मलग्न कुंडली हा सर्व फलादेशाचा मूलभूत पाया आहे. मानवी आयुष्यातील असंख्य घडामोडी , शुभाशुभ घटना व सुखदु:खादी भोग यांचा अंदाज बांधण्याचे प्रमुख साधन म्हणजे हीच जन्मकुंडली होय. आणि या कुंडलीत आढळून येणारी , किंवा या जन्मकुंडलीत सर्वस्वी व्यक्त न होणारी परंतु बीजरूपाने वास करून राहिलेली शुभाशुभ फळें परिपक्व होऊन ती फळें आयुष्यात केव्हा , कशा रितीने व किती प्रमाणात मिळतील यांचा अंदाज बांधण्याचे किंवा ती कालमर्यादा ठरविण्याचे प्रमुख साधन म्हणजे ‘वर्ष कुंडली’ होय. मग ती वर्ष कुंडली डायरेक्शन पद्धतीची असो, सौरपरिभ्रमण पद्धतीची असो किंवा अन्य पद्धतीची असो, फलज्योतिषातील या विभागास ‘जातकशास्त्र’ किंवा ‘जातक विभाग’ या नावाने संबोधीत असतात.

तथापि कित्येक लोकांस, किंबहुना बर्‍याच लोकांस स्वत:चा जन्मकाळ माहिती नसल्याने त्यांच्या जन्मकुंडल्या किंवा वर्षकुंडल्या तयार करणे शक्य नसते, व या मुळे त्यांस जातकशास्त्राचा कोणताहि होत नसतो. ही उणीव कशी भरून काढावी , जन्मकाळ माहिती नसलेल्या लोकांसही ज्योतिषशास्त्राचा लाभ कसा करून द्यायचा याबाबत प्राचीन फलज्योतिषशास्त्राज्ञांचे अखंड संशोधनात्मक प्रयत्न सुरू झाले व पूर्ण अनुभवांती ‘प्रश्न ज्योतिष’ हा फलज्योतिषांतर्गत स्वतंत्र विभाग आस्तित्वात आला. अर्थात, जातकविभाग, मुहूर्त विभाग, मेदिनीय विभाग असे जे ज्योतिषशास्त्राचे निरनिराळे स्वतंत्र विभाग किंवा शाखा आहेत, त्यापैकीच ‘प्रश्नज्योतिष’ हा एक असून स्वत:च्या परीने तो फार महत्त्वाचा आहे.

प्रश्नकुंडली म्हणजे प्रश्नकालीन किंवा जिज्ञासकालीन अशा एका विषिष्ट क्षणाची सुस्पष्ट सायन भावचलित कुंडली हा या प्रश्नज्योतिषाचा मूलभूत पाया आहे. आणि अशा कुंडली वरून विषिष्ट गोष्टींचे , घटनेचे , कार्याचे आणि त्याच्या शुभाशुभ परिणामांचे कालनिर्णयासह सुयोग्य रितीने तपशीलवार भविष्य वर्तवणे हे त्या प्रश्नकुंडलीचे अंतिम साध्य आहे. तथापि प्रश्नज्योतिषाची उपयुक्तता एवढ्यापुरतीच मर्यादित नसून त्याचे महत्त्व दुहेरी आहे. सत्कृतदर्शनी किचकट भासणारे आणि जातकशास्त्र किंवा जन्मकुंडली यांच्या द्वारे उकलता येत नसलेले असे जे अनेक प्रश्न उपस्थित होतात किंवा जिज्ञासू पृच्छाका कडून ज्योतिषी लोकांना विचारण्यात येतात त्यातील कित्येक प्रश्नांची सुस्पष्ट आणि तपशीलावार उत्तरे निश्चित करण्यासाठी प्रश्नकुंडलीचा होत असलेला बहुमोल उपयोग, हे ते दुहेरी महत्त्व होय. अर्थात् काही विषीष्ट प्रश्नांचा खास विचार करावयाचा झाला , किंबहुना त्या प्रश्नामागे दडलेल्या अज्ञात गोष्टींचा आणि गूढ   रहस्यांचा अंदाज बांधायचा झाला तर अशा वेळी जन्मकुंडली किंवा जातकशास्त्र यापेक्षाही प्रश्नकुंडलीचा जास्त उपयोग होतो असे म्हटले तरी ती फार मोठी अतिशयोक्ती होणार नाही. तथापि ज्योतिषाच्या विद्यार्थ्यांनी नेहमी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही की, जातकशास्त्रा प्रमाणेच प्रश्नज्योतिष हा विभाग पूर्णत्वास पोहोचलेला नसून आजवर अपूर्ण अवस्थेतच राहिलेला आहे. आणि केवळ तुलनाच करावयाची झाली तर प्रश्नज्योतिष हा विभाग जातकाशास्त्रा  पेक्षाही जास्त अपूर्ण आहे. तरी देखील हा विभाग जातकशास्त्रा इतकाच महत्त्वाचा आणि उपयुक्त असल्याने , त्याचा ऊहापोह करण्यात येत आहे.

प्रश्नज्योतिष हा स्वतंत्र विभाग असून प्रश्नकुंडलीचे आणि त्या वरून करण्यात येणार्‍या फलादेशाचे कित्येक नियम स्वतंत्र असले तरी प्रश्नकुंडली हे जन्मकुंडलीचेच एक लहान भावंड असल्याने उभयतांना लागू करण्यात येत असलेले असंख्य नियम समान आहेत. अर्थात कोणत्याही कुंडली वरून भविष्य विषयक फलादेशाचा प्रपंच करावयाचा झाला तर त्यापूर्वी समान स्वरूपाच्या अशा या प्राथमिक माहितीचा आणि फलादेश विषयक प्राथमिक नियमांचा परिचय करून घेणे अपरिहार्य आहे. बारा राशी, बारा भाव, बारा ग्रह, आणि बारा दृष्टीयोग हे फलज्योतिषशास्त्राचे पायाभूत स्वरूपाचे चार आधारस्तंभ असून प्रत्येक कुंडलीची  इमारत मग ती जन्मकुंडली असो वा प्रश्नकुंडली असो किंवा अन्य कोणत्याही पद्धतीची वर्षकुंडली किंवा मुहूर्तकुंडली असो या चतु:सूत्रीवरच उभारण्यात आलेली असते. यामुळे फलादेशाचा प्रत्यक्ष प्रपंच करण्यापूर्वी किंबहुना त्या प्रपंचाची पूर्वतयारी म्हणून या चतु:सूत्रीतील प्रत्येक सूत्राचा आणि त्यांच्या निरनिराळ्या उपांगांचा सशास्त्र , सोपपत्तीक आणि पायाशुद्ध रीतीने शक्य तितका संपूर्ण परिचय करून घेणे अगत्याचे तर आहेच पण त्याच बरोबर एक विभाग किंवा एक विषय दुसर्‍या विषयाशी संबद्ध असल्याने कोणत्याही एका विषयाचे पूर्ण आकलन होण्यास फलज्योतिषांतील विविध शास्त्रांची , त्यांच्या सूत्रांची, आणि तत्त्वप्रणालींची जरूरीपुरती तोंडओळख करून घेणे अगत्याचे आहे. फलज्योतिषशात्रातील प्राथमिक माहिती म्हणून जिला संबोधण्यात येते ती हीच आहे.

प्राथमिक आणि माध्यमिक अशा या सर्व माहितीचा जरूरीपुरता देखील उहापोह करावयाचा तर त्यासाठी कित्येक पृष्ठांचा लेखनप्रपंच करणे भाग पडेल. परंतु आपला तो विषय नसल्याने आणि त्यातील बरीचशी माहिती अन्यत्र उपलब्ध असल्याने त्या प्राथमिक आणि माध्यमिक माहितीचा उहापोह येथे न करता आता प्रश्नकुंडली या आपल्या मुख्य विषया कडे वळू .

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+4

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.