प्रश्नकुंडलीच्या संदर्भात एक मजेदार प्रसंग..
मागच्या पिढीतले महान ज्योतिर्विद कै. शांताराम केणी यांनी त्यांच्या ग्रंथात लिहलेला एक मजेदार किस्सा आठवला. तो इथे देण्याचा मोह आवरत नाही, तो प्रसंग काहीश्या संक्षिप्त (आणि संपादित स्वरुपात) असा:
“एके दिवशी एक तरुण आमच्या कडे आला व ज्योतिषी सल्ल्याची अपेक्षा करु लागला, त्याचे एका तरुणीशी प्रेमप्रकरण चालू होते व त्या प्रेमप्रकरणाने पुढची पायरी गाठली होती, दोन्ही घरांतून या गोष्टीला जबरदस्त विरोध होता, मुलीचे भाऊ धमक्या देऊ लागले होते, मुलाचे वडिल या मुलाचे लग्न त्यांच्याच नात्यातल्या एका मुलीशी जबरदस्तीने लावण्याचा प्रयत्नात होते आणि मुलीच्या बाजूचे लोक ही अशाच प्रयत्नात होते त्यासाठी त्यांनी मुलीला एका अज्ञातस्थळी हलवले होते.
इकडे या मुलीशी विवाह न झाल्यास संपूर्ण आयुष्य अविवाहित राहण्याचा त्या तरुणाचा निश्चय होता , त्या मुलीचा ही असाच निर्धार होता. या सर्व गोष्टीं सांगून त्या तरुणाने एका मागून एक अशा अनेक प्रश्नांचा भडीमार आमच्यावर केला आणि त्या प्रश्नां बाबत ज्योतिष सल्ल्याची अपेक्षा केली. त्याचे प्रश्न असे होते.या तरुणाकडे स्वत:ची अथवा त्याच्या प्रेयसीची कोणाचीच जन्मपत्रिका नव्हती, आणि त्यांच्या जन्मतारखां, जन्मवेळा याबबतीतही साशंकता होती. अर्थातच त्यावेळी ज्यो.केणींनी “मी या प्रश्नांची उत्तरें द्यायला असमर्थ आहे” असे सांगून त्या जातकाला परत पाठवले.
प्रेमवेड्या, बहकलेल्या तरुणाची विचारसरणी आणि मन:स्थिति कशी असते याचे हे एक मासलेवाईक उदाहरण ठरावे. ज्यो.केणी पुढे जाऊन म्हणतात “जन्मपत्रिके अभावी अशा प्रश्नांची सविस्तरच काय पण मोघम उत्तरें सुद्धा देणे शकय नव्हते, उलट अशा मनोवृत्तीचे पाच दहा पृच्छक एखाद्या ज्योतिषाला भेटले तर त्या पृच्छका ऐवजी त्या ज्योतिषालाच वेड लागायची शक्यता!”
त्या प्रेमवेड्याने विचारलेल्या एक नाही दोन नाही तर तब्बल 47 प्रश्नांची ही ‘अबब’ यादी !
हे सारे प्रश्न एकाच व्यक्तीने , एकाच वेळी , एकाच दमात विचारले आहेत !! ‘क्या बच्चे की जान लोगे क्या’ असे विचारायला सुद्धा संधी नाही !!
१) माझा विवाह होईल की मला आयुष्यभर अविवाहित राहावे लागेल ?
२) विवाह होणार असल्यास तो केव्हा होईल ?
३) जिच्याशी माझे प्रेमसंबंध चालू आहेत तिच्याशीच विवाह घडून येईल का
४) तिचा-माझा विवाह घडून आला तर त्या योगे आम्हाला खरीखुरी सुखप्राप्ती होईल का ?
५) आम्हा दोघांपैकी जास्त सुखी कोण होईल? म्हणजे अघिक सुखावह आणि अधिक समाधानकारक वैवाहिक जीवन आम्हा उभयतांपैकी कोणाचे जाईल?
६) या प्रेमविवाहा नंतर किंवा तत्पूर्ती आमच्यात बेबनाव येणार नाही ना?
७) हा आमचा संकल्पित विवाह फिसकटणार नाही ना?
८) हा संबंध फिसकटणार असला किंवा त्यात व्यत्यय येणार असला तर त्याची कारणेंकोणतीं असतील? मी त्या घटनेला कारणीभूत असेल का अन्य कोणी?
९) माझ्या किंवा तिच्या घरची हितसंबंधी माणसे किंवा अन्य हितसंबंधी व्यक्ती काहीतरी कारस्थानें करुन आमच्या प्रेमसंबंधात आणि विवाहात व्यत्यय आणतील का?
१०) या विवाहमुळे हुंड्याच्या रुपाने मला भरपूर रोकड पैसा मिळेल का?
११) सासरची इस्टेट किंवा सासरच्या माणसांकडून मला विपुल प्रमाणात द्रव्यलाभ होईल का?
१२) आधुनिक सुखसोयींनी युक्त आणि सुसज्ज असा एखादा फ्लॅट विकत घेऊन तो मला देतील काय?
१३) त्या मुलीच्या भावाने मला जी तंबी दिली आहे त्यापासून मला धोका आहे का ? आणि त्यामुळे कोर्टदरबारादि प्रसंग निर्माण होतील काय?
१४) या प्रकरणात मला कोर्टाची पायरी चढायला लागली तर त्या कोर्टप्रकरणात मला यश येईल की माझा प्रतिस्पर्धी विजयी होऊन मला गोत्यात आणेल का?
१५) कोर्ट बाजी करण्यास हवा असलेला पैसा मजपाशी नाही अशा स्थितीत माझी बाजू यशस्वीपणे मांडणारा एखादा वकील मला मिळेल का?
१६) तो वकील प्रतीपक्षास फितूर होणार नाही ना? आणि न्यायाधीशाचा दृष्टिकोन माझ्या बाबतीत आणि या एकंदर खटला प्रकरणात कोणता राहील?
१७) यदाकदाचित कोर्टदरबारादि प्रकरण उपस्थित झालेच तर मागाहून लगेच आमच्यात समझौता होऊन खटला लढवण्याचे टळेल का?
१८) माझ्या प्रेमसंबंधातून तिला दिवस गेलेले असावेत अशी आमची कल्पना आहे, तेव्हा ती खरोखरीच गरोदर असेल का? आणि तो गर्भ नऊ महिने पर्यंत टिकेल काय?
१९) ती गरोदर असली तर ही गर्भधारणा कीती काळापासून झालेली असावी? तिचा प्रसूतकाल कोणता असेल ?
२०) तिच्या या गरोदरपणास प्रत्यक्ष मीच आणि एकटा मीच कारणीभूत झालेला असेन का?
२१) तिला होणारे मूल मुलगा असेल की मुलगी? ते जुळे असेल का?
२२) जन्मास येणारे हे अपत्य दीर्घायुषी असेल की बालारिष्टस बळी पडेल?
२३) जर ती सध्या गरोदर नसली तर पुढेमागे तिला गर्भधारणा होणे शक्य आहे का ?गर्भप्रतिबंधक उपायांचा यापूर्वीच अवलंब करुन तिने स्वत:ला कृत्रिम वंध्यत्व आणलेले असेल का?
२४) गर्भधारणेची शक्यता असल्यास ती धारणा केव्हा होईल?
२५) माझ्याशी प्रेमसंबंध जडण्यापूर्वी तिचा कौमार्यभंग झालेला असेल का?
२६) माझ्या व्यतीरिक्त अन्य कोणाशी तिचे प्रेमसंबंध चालू आहेत का?
२७) तसे असल्यास तिला होणार्या सार्या मुलांचे खरेखुरे पितृपद सर्वस्वी माझ्याकडेच राहील ना?
२८) आम्हा उभयतांना एकंदर किती अपत्ये होतील? त्यात पुत्राधिक्य असेल की दीर्घायू होतील का? व ती भाग्यशाली निपजून नावलौकिकास चढतील का?
२९) तिच्या घरची माणसें दुसर्या एका श्रीमंत तरुणाशी तिचा विवाह करून देण्याचा जो प्रयत्न करतात तो त्यांचा प्रयत्न यशस्वी होईल का?
३०) अशा विवाहाची तिच्यावर सक्ती झाली तर वैतागाच्या भरात ती स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करुन घेणार नाही ना?
३१) तिच्या आयुष्याला काही धोका दिसतो का ?
३२) आम्हा दोघांपैकी जास्त दीर्घायुषी कोण असेल?
३३) एखाद्या अज्ञातस्थळीं जाऊन आम्ही तडकाफडकी विवाहकार्य उरकून घेतले तर असा विवाह कायदेशीर ठरण्यास काही अडचणीं येतील का?
३४) अशा रितीने आम्ही घरच्या मंडळींच्या नकळत विवाह उरकून घेतला तर त्यांच्या संयुक्त असहकारामुळे आमचे आर्थिक नुकसान होऊन आमचे सांसारिक जीवन असह्य होणार नाही ना?
३५) श्रीमंत होण्या इतपत भरपूर पैसा मला मिळेल का ? व तो कोणत्या मार्गाने मिळेल?
३६) डर्बी लॉटरी सारख्या एखाद्या लॉटरीचे तिकीट मी खरेदी केले तर ते बक्षिसप्राप्त ठरुन मला विपुल पैसा मिळेल का?
३७) आमच्या जन्मगावीं वडिलोपार्जित मालकीच्या जुन्या घरात कित्येक पिढ्यांपूर्वी पुरुन ठेवलेला गुप्त खजीना आहे स्वप्न मला पडले होते ते खरे असेल का?
३८) खरोखरीच त्या घरात वा जवळपास असे भूमीगत धन असेल काय ? आणि ,तसे ते असल्यास मला त्याची प्राप्ती होईल का?
३९) ज्या मुलीशी माझी सध्या ताटातूट केली गेली आहे तिची माझी भेट कधी होईल?
४०) ज्या एका नातेवाईक मुलीशी मला विवाहशृंखलेने बद्ध करण्याची माझ्या वडीलांची धांदल सुरु आहे आणि जिला मी आजवर कधीही पाहीली नाही , त्या परक्या मुलीशी विवाहबद्ध होण्याचा प्रसंग माझ्यावर येईल का?
४१) परिस्थितीच्या दडपणाखाली वडिलांनी ठरवलेल्या मुलीशी माझा विवाह झाला तर तो टिकेल का?
४२) माझे एकापेक्षा जास्त विवाहसंबंध संभवतात का ? आणि संभवत असल्यास त्याचे कारण कोणते असेल? पहिल्या बायकेचा मृत्यू की घटस्फोट ?
४३) अंती माझा विवाह कोणाशी होईल हे निश्चित सांगाल काय ? माझी भावी पत्नी कशी असेल? तिचे एकंदर वर्णन कराल काय ?
४४) या प्रेमप्रकरणाचा आमच्या ऑफिस मध्ये बभ्रा झाला आहे त्यामुळे नोकरीस मुकण्याची पाळी माझ्यावर येईल काय ?आणि जर अशी वेळ माझ्यावर आलीच तर मला लगेच दुसरी मनाजोगती नोकरी मिळेल काय ?
४५) त्या मुलीच्या आईने माझा ऑफिस मधल्या वरिष्ठांकडे माझ्या विरुद्ध तक्रार केली असून ते वरिष्ठ या प्रकरणाचा गंभीर रीतीने विचार करत आहेत अशी एक बातमी माझ्या कानांवर आली आहे ,तेव्हा ही बातमी वा कुणकुण खरी असेल का? त्यामुळे मला धोका आहे का? जर ही बातमी खरी नसेल तर ही अफवा कोणी पसरवली असेल?
४६) या निराशेच्या भरात मला वेड तर लागणार नाही ना?
४७) माझ्या हातून आत्महत्या तर होणार नाही ना? असल्यास केव्हा?
असे असले तरी कालांतराने त्यांनी ‘प्रश्नशास्त्रा’चा सखोल अभ्यास करुन या सर्व प्रश्नांची उत्तरें कशी देता येतील हे सोदाहरण स्पष्ट केले.
या ठिकाणी एक मुद्दा खास जाणवतो तो असा की या 46 प्रश्नांपैकी बर्याचशा प्रश्नांची उत्तरें देणे ‘जन्मकुंडली’वरुन देणे अत्यंत अवघड असते किबहुना यातल्या काही प्रश्नांची उत्तरें ‘जन्मकुंडली’वरुन देणे जवळ्जवळ अशक्यच असते.
ज्योतिर्विद श्री केणी यांनी या यादीतल्या सार्या प्रश्नांची उत्तरें ’प्रश्नकुंडली’ च्या माध्यमातून दिली होती ! ती कशी हे मी या लेखमालेच्या पुढच्या भागांतून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
क्रमश:
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
टेस्ट मेसेज
sir lavkar pudhcha bhag taka
धन्यवाद श्री गोरक्षनाथजी
पुढचे भाग लिहित आहे पुढच्या आठ्वड्यात प्रकाशीत करतो
सुहास गोखले
Good sir, I want to read.
धन्यवाद श्री रमेशजी
सुहास गोखले