१७ मार्च २०१३ ची गोष्ट, अनिकेत मला भेटला त्यावेळी त्याची अवस्था अगदी केविलवाणी झालेली होती, एव्हढा चांगला हुशार इंजिनियर पण एके दिवशी अनपेक्षितपणे नोकरीतून डच्चू मिळाला, कारण काय तर ‘कॉस्ट रिडकशन’! दुसरी नोकरी काय हसत हसत मिळेल असे म्हणता म्हणता चार महिने निघून गेले आणि मग याच्या तोंडचे पाणी पळाले.

मिळेल का अनिकेत ला नोकरी?
के. पी. होरारी ने उत्तर दिले.. अचूक – ठाम आणि परखड!

“अनिकेत, काळजी करू नको, तुझ्या सारखा चांगला इंजिनियर फार काळ नोकरी विना राहणार नाही, असतो एखादा बॅड पॅच, आपण बघू हा बॅड पॅच कधी संपणार ते”
“काका, हे असे ज्योतिषा द्वारे सांगता येते ?”
“अर्थातच, अनेकांना प्रचिती आलीय, तुला ही येईल”
अनिकेत ने त्याची जन्मपत्रिका आणली होती, पण नोकरी कधी लागेल, बदली कधी होईल यासारखे तत्कालीन प्रश्न सोडवायला प्रश्न कुंडलीच जास्त उपयोगी पडते असा माझा अनुभव आहे.

जन्मपत्रिके बाबत एक मोठी समस्या असते ती म्हणजे अचूक जन्मवेळेची! के.पी. ही  ‘सब लॉर्ड थिअरी ‘ आहे  त्यामुळे जन्मवेळेत अवघी २-४ मिनिटांची जरी चूक असली तरी सब लॉर्डस बदलतात व होत्याचे नव्हते होऊन बसते, बहुतांश लोकांच्या जन्मवेळा +/- 5 पासुन  ते  +/- 3० मिनिटां पर्यंत मागेपुढे असु शकतात. यावर उपाय म्हणजे जन्मवेळेचे शुद्धीकरण.

के. पी. मध्ये जन्मवेळेच्या शुद्धीकरणा साठी रुलिंग प्लॅनेट्स वर आधारित एक पद्धत मोठ्या प्रमाणात वापरतात . पण मुळातच रुलिंग प्लॅनेट्स ही संकल्पना  दैवी मार्गदर्शन, ‘इंटयुशन’ या प्रकारात मोडते, मला हे इंटयुशन चे अंग जरा कमीच.त्यामुळे  के.पी. मधील ‘रुलिंग प्लॅनेट्स’  हे अत्यंत लोकप्रिय आयुध मी फार कमी वेळा वापरतो. ( इंटयुशन मिळवायला, वाढवायला बरेच काही करावे लागते, त्या बद्दल कधी तरी सवडीने लिहिणार आहेच).

मी जातकाच्या आयुष्यात घडलेल्या घटनांच्या आधारे,  टरशरी प्रोग्रेशन्स, युरेनियन प्लॅनेटरी पिक्चर्स असे मार्ग वापरून जन्मवेळेतली चूक सुधारुन घेतो, पण त्यासाठी (संगणक हाताशी असला तरीही ) अक्षरशः ढोर मेहनत करावी लागते, एखादा पूर्ण दिवस त्यात जाऊ शकतो,  जातकाच्या आयुष्यात घडलेल्या महत्त्वाच्या ठळक घटना तारखेवार लागतात त्यात काही मोठ्या ठळक दु:खद (ट्रामा) घटना असाव्या लागतात, जातकाची  इतर वैयक्तीक माहिती  लागते  (त्याला काही जातक तयार नसतात), सरते शेवटी ह्या एवढ्या मेहनती चा योग्य मोबदला पण मिळत नाही, फुकटेच जास्त!

त्यामुळे  के. पी. साठी जन्मपत्रिके पेक्षा प्रश्न कुंडली हाच खात्रीचा मार्ग आहे असे माझे मत बनले आहे. कारण प्रश्नकुंडलीची वेळ आपण स्वत: ठरवु शकतो. मी बरेचसे प्रश्न प्रश्न कुंडलीच्या आधारानेच सोडवतो. अनेक जुन्या जाणकार  के. पी. अभ्यासकांनी सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या याचाच पुरस्कार केला आहे.

पण प्रश्न कुंडली  मांडताना, प्रश्न जातकाचा स्वत:चा आहे, त्याच्या साठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याला प्रश्नाचे उत्तर जाणण्याची कमालीची कळकळ आहे, आणि प्रश्नाच्या उत्तराचा पडताळा सहा महिने ते दीड एक वर्ष या कालावधीत मिळणारा आहे का? हे पाहावे. उगाचच पुढच्या पाच वर्षांनी घडण्याची शक्यता असलेल्या घटनांची उत्तरे आजच जाणण्याचा प्रयत्न नसावा. ह्या सर्व बाबीं नीट बघून पारखून घ्यायच्या.

प्रथम मी अनिकेत शी थोडे बोलून, इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मी त्याच्या मनावरचा ताणतणाव जरा हलका केला, ही पायरी महत्त्वाची असते,  त्यामुळे जातकाच्या मनावरचे दडपण  कमी  होते, त्याच्या मनाला थोडी उभारी येते, प्रश्न विचारण्यासाठी जे स्थिर मन लागते ते तयार होते.

अनिकेतला  अगदी थोडक्यात प्रश्न कुंडली म्हणजे काय ते सांगून त्याला, त्याला त्याच्या मनात घोळणार्‍या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून, एक नंबर जो, १-२४९ मध्ये असेल असा द्यायला सांगितला.

अनिकेतने थोडा वेळ विचार केला आणि मला म्हणाला “ काका, आता ह्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर १६१ ही फिगर येतेय, ही चालेल काय? ”

“अनिकेत, इथे अमुक नंबर चालेल काय हा प्रश्न नाही, नंबर आपण निवडायचा नसतो, तो सहज सुचायला किंवा तू म्हणतो तसा डोळ्यासमोर दिसायला हवा, हा नंबर ही एक प्रकारचे दैवी संकेतच आहे, तो जसा आहे तसा स्वीकारायचा, तेव्हा आता आपण जो  मिळलाय तोच नंबर वापरायचा”

ह्या १६१ नंबरवर आधारित जी प्रश्न कुंडली बनली ती खाली छापली आहे.

 

प्रश्न कुंडली चा डेटा:
होरारी नंबर: १६१
वेळ: ०४:१९:०४ दुपार
दिनांक: १७ मार्च २०१३
स्थळ: नाशिक
अयनांश: कृष्णमूर्ती २३ :५७:०५
संगणक आज्ञावली : KPStar One

प्रश्न कुंडली तयार होताच सर्वात प्रथम बघायचा तो चंद्र. हा चंद्र कोणत्या घरात आहे, कोणाच्या नक्षत्रात आहे यावरून जातकाच्या मनात काय घोळते आहे ते कळते, प्रश्नाचा रोख बरोबर आहे का ते ठरवता येते.

अनिकेतचा  प्रश्न आहे नोकरी कधी मिळेल? त्यासाठी कै. पी. मध्ये ४ महत्त्वाची स्थाने आहेत:

२: पैसा, बँक बॅलन्स
६: नोकरी, नोकरीतल्या जागेवरची उपस्थिती
१०: उपजीविकेचे मुख्य साधन
११: जातकाची इच्छापूर्ती
( हे ११ हे इच्छापूर्तीचे स्थान असल्याने सर्वच प्रश्नांना शेपटासारखे जोडावेच लागते)

इथे एक नमूद करतो, १० वे स्थान हे ११ व्या स्थानाचे व्यय स्थान त्यामुळे ते ११ व्या स्थानाला  विरोध नाही का करणार अशी शंका आपल्या मनात  येणे साहजिकच आहे, पण  नोकरी विषयक प्रश्ना साठी १० वे घर हे प्रमुख( प्रिन्सिपल हाउस ) मानलेले असल्याने , या केस  मध्ये ही १० -११ ची जोडी त्याला अपवाद आहे.

चला आता आपण अनिकेत च्या प्रश्न कुंडलीत चंद्र काय दर्शवतो ते पाहू.

हा चंद्र षष्ठात (६), चंद्र भाग्येश (९), रवीच्या नक्षत्रात, रवी सुखस्थानात (४), दशमेश (१०). म्हणजे चंद्र ६, ९, ४ व १० या भावांचा म्हणजे नोकरी साठीच्या  महत्त्वाचा ६ व  १० या दोन्ही भावांचा कार्येश आहे.अनिकेत ने प्रश्न तळमळीने विचारला ते ह्या वरून स्पष्ट झाले. म्हणजे ही कुंडली आपल्याला अनिकेतच्या  प्रश्नाचे उत्तर देणार. अशा कुंडलीला पाश्चात्त्य ज्योतिषशास्त्रात  ‘रॅडिकल चार्ट’ म्हणतात. चंद्र ४ (घर) व ९ (वडील, लांबचा प्रवास) ही स्थाने ही दाखवत आहे म्हणजे अनिकेतच्या मनात नोकरी बरोबर घर व वडील (प्रकृती) बद्दल विचार असणार.

चंद्र सांगतोय की  अनिकेत चा प्रश्न जेन्युइन आहे, मनापासून, कळकळीने विचारला आहे. जर चंद्र भलतीच कोणती स्थाने दाखवत असेल तर? असे होते बर्‍याचवेळा, जातकाच्या मनात दुसरेच काही तरी घोळत असते, प्रश्न तिसराच कोणता तरी विचारलेला असतो, चंद्र हा गोंधळ दाखवतोच. अशा वेळी प्रश्नाचे उत्तर देऊ नये, जातकाला काही वेळा नंतर, मनातले इतर विचार बाजूला करून, फक्त समोरच्या पश्नावरच मन केंद्रित करायला सांगून त्याच्या कडून दुसरा नंबर घ्यावा.

आता पुढचा टप्पा. नोकरी मिळेल का? कधी? याचे उत्तर १० व्या स्थानाचा सब लॉर्ड देणार कारण नोकरी विषयक प्रश्नांना १० वे घर हे प्रमुख( प्रिन्सिपल हाउस ) असते. हा सब लॉर्ड जर नोकरी साठी लागणार्‍या म्हणजेच २, ६, १०, ११ यापैकी एकाचा तरी कार्येश असावा. त्यातही १० किंवा ६ व्या स्थानाचा, कारण २ हे स्थान पैशा संदर्भात व ११ हे इच्छापूती, पैसा काय फक्त नोकरीतूनच मिळतो असे नाही आणि प्रश्न विचारते वेळी जातकाच्या मनात इतरही अनेक इच्छा असू शकतात. तेव्हा प्रश्न नोकरी चा असल्याने १० व ६ हीच स्थाने प्रामुख्याने बघावी.

चला बघूया, १० व्या घराचा सब लॉर्ड काय म्हणतो आहे ते.हा सब लॉर्ड आहे चंद्र, ह्यांचे कार्येशत्व आपण आताचं बघितले आहे: ६,९, ४ व १० म्हणजे १० व्या स्थानाच्या सब ने खणखणीत होकार दिला आहे. पण सब चा होकार म्हणजे नोकरी पक्की असे काही नाही, त्यासाठी पुढे येणार्‍या दशा, अंतर्दशा, विदशा या अनुकूल असायला हव्यात नाहीतर सगळेच मुसळ केरात! जर योग्य दशा योग्य वयात आल्या  तरच नोकरी मिळाल्याचा उपयोग, नाहीतर व्हायचे काय, सुयोग्य दशा येतीलही पण तोपर्यंत अनिकेत सीनियर सिटिझन झालेला असेल तर, नोकरी मिळुन सुद्धा काय उपयोग?

प्रश्नाच्या वेळी कुंडलीत रवी महा दशा चालू होती ती १० डिसेंबर २०१३ पर्यंत. साधारण आठ महिन्याचा  कालावधी आहे, या काळात नोकरी लागू शकते, तेव्हा ही रवी दशा अनिकेतला नोकरी देणार का ते बघू या. रवी  चतुर्थात (४), दशमेश (१०), रवी, गुरू च्या नक्षत्रात, गुरू षष्ठात (६), धनेश (२) व पंचमेश (५), म्हणजे रवी ५, १०, ६, २ चा कार्येश, आणखी काय पाहिजे, नोकरी साठी रवी चा होकार आहे. पण रवीचा सब लॉर्ड पण बघितला पाहिजे, सायबानु, नाहीतर  “बेगानी शादी मे अबदुल्ला दिवाना”  अशी अवस्था व्हायची!

रवीचा सब आहे राहू!

राहू आणि केतू हे दोन छाया ग्रह हाताळायला, पचवायला भलतेच जड! कारण ते अनेक मार्गांनी फळे देतात, त्याचे कार्येशत्व ठरवताना नाकी नऊ येतात! त्यातही राहू केतूच्या नक्षत्रात असा काही प्रकार असला तर मग काही खैर नाही. असो, विषय निघालाच आहे तर, राहू चे कार्येशत्व कसे ठरवायचे ते जरा विस्कटून सांगतो.

राहू सर्व प्रथम त्याच्या शी युतीत असलेल्या ग्रहांची फळे देणार. हे युती योग पारंपरिक पद्धतीने बघायचे, अंशात्मक नाही, म्हणजे युती साठी दोघे ही ग्रह एकाच राशीत हवे, त्यांच्यात मग २०-२५ अंशाचे अंतर असले तरी चालेल. या साठी भावचलिता बरोबरच नेहमीची साधी लग्न कुंडलीही तयार करून ठेवावी.

इथे राहू व शनी युतीत आहेत, शनी लाभात (११), त्रितियेश (३), सुखेश (४) शनी राहूच्या नक्षत्रात, राहू लाभातच (११) म्हणजे शनीचे कार्येशत्व ११, ३, ४. म्हणजे या सर्व भावांचा राहू कार्येश होणार.

राहू त्यानंतर त्याच्या वर दृष्टी असलेल्या ग्रहांची फळे देणार हा दृष्टी योगही पारंपरिक पद्धतीने बघायचा ,अंशात्मक नाही. इथे राहू वर मंगळाची ८ वी दृष्टी आहे, मंगळ चतुर्थात (४), लग्नेश (१) व षष्ठेश (६), मंगळ शनीच्या नक्षत्रात शनी लाभेश (११) व त्रितियेश (३), सुखेश (४) म्हणजे मंगळाचे कार्येशत्व ११, ३, ४, १, ६ या सर्व भावांचा पण राहू कार्येश होणार.

राहू त्यानंतर त्याच्या नक्षत्रस्वामी प्रमाणे फळे देणार, राहू गुरूच्या नक्षत्रात, गुरू षष्ठात (६), धनेश (२) व पंचमेश (५),  म्हणजे ६, २, ५ या  भावांचा राहू कार्येश होणार.

नंतर राहू त्याच्या राशी स्वामी प्रमाणे फळे देणार, राहू तूळेत, शुकाचे कार्येशत्व शुक्र चतुर्थात (४), सप्तमेश (७) व व्ययेश (१२), शुक्र गुरूच्या नक्षत्रात गुरू षष्ठात (६), धनेश (२) व पंचमेश (५), म्हणजे  ४, ७, १२, ६, २, ५ या  भावांचा राहू कार्येश होणार.

सगळ्यांत शेवटी राहू तो ज्या भावात आहे त्या भावाची फळे देणार. म्हणजे इथे राहू लाभात (११) असल्याने तो ११ चे फळ देणार.

हुश्श! एकंदर पाहता, रवी महा दशेचा सब राहू, नोकरीसाठी आवश्यक त्या सर्व भावांचा कार्येश आहे. चला तर, रवी महादशा ‘लॉक’ करू.

पण रवी महा दशेत अजून आठ महीने शिल्लक आहेत, आपल्याला आता  महिना, आणि शक्य झाला तर दिवस ठरवायचाय, म्हणजे, अंतर्दशा,विदशा, सूक्ष्म दशा बघणे ओघाने आलेच.

रवीच्या दशेत आता फक्त शुक्राचीच अंतर्दशा शिल्लक  आहे. शुकाचे कार्येशत्व चतुर्थात (४), सप्तमेश (७) व व्ययेश (१२), शुक्र गुरूच्या नक्षत्रात, गुरू षष्ठात (६), धनेश (२) व पंचमेश (५) म्हणजे  ४, ७, १२, ६, २, ५ .  शुक्राचा सब आहे चंद्र (जो आपण आधीच तपासला आहे) ६, ९, ४ व १०. म्हणजे शुक्राची अंतर्दशा योग्य आहे.

आता शुक्राच्या अंतर्दशेतल्या विदशा पाहू.

पहिलीच  विदशा चंद्राची जी  २९ मार्च २०१३ म्हणजे ह्या विदशेतले फक्त बारा दिवस हातात आहेत, ईतक्या कमी कालावधी चा विचार करायला नको.

पुढची विदशा मंगळाची जी २० एप्रिल २०१३ पर्यंत. पण प्रश्न करते वेळी शनी वक्री होता व मंगळ शनीच्या नक्षत्रात आहे,  के. पी. नियमांनुसार वक्री ग्रह स्वतः: फळे देऊ शकतो पण वक्री ग्रहांच्या नक्षत्रातले ग्रह मात्र फळे द्यायला असमर्थ असतात,  त्यांचा नक्षत्र स्वामी पुन्हा मार्गी झाल्यावरच असे ग्रह फळे देऊ शकतील, हा शनी , मंगळाची विदशा संपे पर्यंत तरी मार्गी होणार नाही, त्यामुळे मंगळाची विदशा सोडावी लागेल.

नंतरची विदशा अर्थातच राहूची, राहू चे कार्येशत्व आपण पाहिलेच आहे. राहू चा सब बुध आहे.  बुध त्रितियेत  (३), अष्टमेश (८) व लाभेश (११), बुध राहूच्या नक्षत्रांत, राहू लाभात (११) म्हणजे बुध अनुकुल आहे. राहूची विदशा २० एप्रिल ते १४ जून २०१३ पर्यंत आहे, म्हणजे या दोन महिन्याच्या काळात अनिकेत ला नोकरी लागणार.

खरे तर एव्हढा दिलासा, अनिकेत साठी पुरेसा होता , पण आम्ही के. पी. वाले , पुरता किस पाडणार, तेव्हा आणखी पुढे जाणे भाग आहे!

आपण आतापर्यंत रवी-शुक्र-राहू अशी साखळी तयार केली. यात नोकरी साठी चे सर्व भाव आले २, ६, १०, ११ पण एक अजून महत्त्वाचे घर समाविष्ट नाही ते म्हणजे  (३) जे मुलाखत, करार (जॉब ऑफर) दाखवते. कारण नोकरी मिळण्या पूर्वी  हा एक महत्वाचा टप्पा आहे.तेव्हा सूक्ष्म दशा पाहताना  मी (३) या भावाचा जास्त विचार करायचे ठरवले, जो ग्रह ३ र्‍या स्थानाचा प्रथम दर्जाचा कार्येश असेल तो निवडायचा.

३ र्‍या स्थानाचा प्रथम दर्जाचा कार्येश म्हणजेच ३ र्‍या स्थानात असलेल्या ग्रहांच्या नक्षत्रातले ग्रह. इथे  ३ र्‍या स्थानात  बुध आहे, बुधाच्या नक्षत्रात कोणीच नाही. नंतर क्रमांक येतो त्रितीय स्थानातल्या ग्रहांचा, इथे बुध आहे, तो जरी वक्री असला तरी ३ र्‍या भावाची फळे देणार, त्याच बरोबर त्याच्या नक्षत्रात कोणी नसल्याने बुधाला पोझीशनल स्टेटस त्यामुळे प्रबळ,  नंतर  नंबर लागेल तो  त्रितीयेशाच्या नक्षत्रातल्या ग्रहांचा. त्रितीयेश आहे शनी, तो वक्री म्हणजे त्रितीयेशाच्या नक्षत्रातले ग्रह आपल्या काही कामाचे नाहीत, सगळ्यात शेवटी उरतो म्हणजे भावेश, जो शनी आहे, तो जरी वक्री असला तरी फळे देऊ शकतो. म्हणजे आपल्या कडे इथे बुध व शनी  आहेत, या पैकी बुध जास्त प्रबळ. बुध चा सब शनी, जो अनुकूल आहेच. शिवाय बुध हा कागदपत्रे, करार, वाटाघाटीं, संभाषण यांचा कारक, त्यातच बुधाची दशमा वर दृष्टी आहे म्हणजे दुधात साखरच!

बुधाची सूक्ष्म दशा १५ मे २०१३ ते २२ मे २०१३ अशी आहे, म्हणजे या कालावधीत अनिकेतला मुलाखतीत यश मिळेल,जॉब ऑफर ही मिळेल.

आता आपला कळसाध्याय! ट्रान्सीट तपासयचे, जर ट्रान्सीट मॅच नाही झाले तर ? दुसरी दशा ,विदशा पहायची त्याला ईलाज नाही!

आपल्याला मे महिन्याचा तीसरा आठवडा हा कालखंड मिळाला आहे. काय आश्चर्य पहा बरोबर १५ मे २०१३ ला रवी वृषभेत प्रवेश करतो आहे, म्हणजे शुक्र व नक्षत्र स्वामी रवी. म्हणजे रवी, दशा व अंर्तदशा स्वामी यांच्या राशी – नक्षत्रामधून भ्रमण करणार! १५ मे ते २२ मे या काळात  जोरदार घटना घडून अनिकेतची ईच्छापूर्ती  होणार यात शंकाच नको.

इथे थोडेसे तारतम्य वापरून मी अनिकेत ला म्हणालो:
“ अनिकेत, तुझी काळजी लौकरच मिटेल, जून २०१३ च्या पहिल्या आठवडया पासून तुझी नोकरी चालू होईल”

अनिकेतने अक्षरशः: जागची उडीच मारली, “ काय म्हणता,, नक्की असेच घडेल? ”

“अनिकेत, ह्या कालखंडात नोकरी लागायची शक्यता खूप मोठी आहे, पण ह्याचा अर्थ असा होत नाही की “असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी”, प्रयत्न  हे केलेच पाहिजेत. तेव्हा जोमाने प्रयत्नांना लाग, तुझ्या प्रयत्नांना निश्चित यश लाभेल, माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठी शी आहेतच”

अनिकेतचा फोन आला “काका,मला ‘क्ष’ ह्या कंपनीने प्रत्यक्ष भेटी साठी १७ मे २०१३ रोजी बोलावले आहे, टेलिफोनिक इंटरव्हू  गेल्याच आठवड्यात झाला होता”

अनिकेत ला ही नोकरी मिळाली, आणि तो ३ जून ला जॉईन सुद्धा झाला.

“ काका तुमचे कसे आभार मानू तेच कळत नाही.मी किती निराश अवस्थेत होतो पण त्या दिवशी तुम्ही जे ठासून नोकरी मिळेलच असे सांगितले, मला मोठी उमेद मिळाली, आणि त्याचेच हे रिझल्ट्स.. ”

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.