(विनोदी शैलीत लिहलेला लेख आहे, कोणत्या ‘बाबा/बापु/बुवा/अण्णा/ महाराज’ यांच्या शी या लेखाचा काहीही संबंध नाही, तसा कोणाला आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ही लेखमाला लिहताना कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतु नाही!)

फार फार वर्षां पूर्वीची स्टूरी आहे ही . तिकडे दूर पार साता समुद्रा पल्ल्याड ,  ‘उसगाव’ नावाचा एक जंक्शन देश आहे, तिथल्या सॅमबाबा नामक अवतारी पुरुषाची ही कहाणी.

‘बाबा’, ‘अवतारी पुरुष’ म्हणल्याबरोबर कसे सगळे सावरुन बसले बघा!

तसे काय नाय , आधीच सांगून ठेवतो.

‘सॅम बाबा’ काही ‘अवतारी पुरुष’ वगैरे नाही, आपल्या सारखीच एक साधी सुधी व्यक्ती होती. ‘सॅम बाबा’ त्या उसगावात होते म्हणून बरे, जर सॅम बाबा भारतात प्रकट झाले असते तर? सॅम बाबाचा  ‘अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज महाराज!’ केव्हाच झाला असता! सॅम बाबाच्या झोपडीचे  ‘श्री क्षेत्र संस्थान’ झाले असते! गावोगावी ‘सॅम बाबा’ चे मठ स्थापन झाले असते, सॅम बाबाचा ‘प्रकट दिन’ साजरा झाला असता आणि आषाढी एकादशीला सॅम बाबाची पालखी पंढरपुरास गेली असती आणि सॅम बाबाचे फोटो, लॉकिटे! सॅम बाबाची कोणती पोथी वगैरे काही नाही हे बरे झाले नै, नाहीतर ह्या पण पोथी चे पारायण बोकांडी बसले असते आणि फेसबुक ग्रुप्स वर ‘सॅम बाबा ची’ पोथी स्त्रियांनी वाचावी का नाही यावर चर्चा रंगल्या असत्या. तोडगे सम्राट ज्योतिषांनी ‘सॅम बाबा ची’ पोथी वाचायचा तोडगा सुचवला असता.

वारेमाप, आडमाप पसरलेल्या त्या ‘उसगाव’ देशात एक ‘वेताळाचा डोंगर’ म्हणून एक डोंगर आहे, डोंगर इवलासा असला तरी ‘सॅम बाबा’ च्या वास्तव्याने पुनित झालेला आहे. ( हा असला ‘पुनित’ सारखा भारदस्त शब्द वापरावा लागतो, नायतर ‘सॅम बाबा’ च्या पॉवर वर तुम्ही लोक विश्वास ठेवणार नाही !)आख्ख्या उसगावात कोणालाही विचारा ‘वेताळाचा डोंगर‘ कोठे आहे, शेंबडे पोर सुद्धा ‘डायरेक्शन्स’ देईल! पण इतके कशाला आपला ‘गुगल बाबा’ आहे ना! (घ्या इथे पण ‘बाबा’ आलाच पाहा!)

तर, आपले (आता आपलेच म्हणायचे की !) सॅम बाबा त्या वेताळाच्या डोंगरावर राहायचे, सॅम बाबांची छोटीसी झोपडी सोडली तर त्या वेताळाच्या डोंगरावर बाकी काहीही नव्हते. सॅम बाबा तिथे कधी आले, कसे आले, कशा साठी आले कोणाला काही पत्ता नाही. एखादी पुटकुळी कशी आपल्या अंगावर नकळत येते तसे सॅम बाबा डोंगरावर आले . बरे आले तर आले , तेव्हा पासुन ते त्या डोंगरावर जे  मेठा मारुन बसले ते आजपर्यंत तिथेच आहेत. बाबांना ह्या वेताळाच्या डोंगरावरुन खाली उतरल्याचे फारसे कोणी पाहीले नव्हते, अगदी क्वचित म्हणजे साधारण चार वर्षांतून एकदा केव्हातरी ते  डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ‘कपिताल वाडीत’ चक्कर मारायचे!

आता सॅम बाबा कडे जायचे म्हणजे एक खडतर दिव्यच म्हणायचे. आधी ती ‘कपिताल वाडी’ गाठायची पण त्या कपिताल वाडीला जायला ना रेल्वे, ना विमान, ना वोल्वो! भारतात एक बरे असते, काही नसले तरी यस्टी चा ‘लाल डब्बा’ असतोच असतो, किमान फाट्या पर्यंत तरी पोहोचता येते मग ‘वडाप’ सर्व्हिस ! इथे तसेल काही नाही. सोत्ताच्या वाहनाने कशीबशी कपिताल वाडी गाठावी लागते. तिथुन पुढे वेताळाच्या डोंगरावर जायला पक्की तर सोडाच साधी कच्ची सडक पण नव्हती, कोणतेही वाहन नेण्याची सोय नव्हती अगदी आत्ताच्या काळात ज्याच्या त्याच्या बुडा खाली असलेल्या फटफट्या देखील तिथे नेणे धाडसाचे होते. म्हणजे तसा प्रयत्न काही वेळा झाला पण होता अगदी ‘हार्ले डेव्हिडसन’ ची अजस्त्र धुडें नेली होती भाविकांनी पण प्रत्येक वेळी असे धाडस केलेला फटफटी स्वार आपली पंक्चर झालेली फटफटी ढकलत ढकलत कपिताल वाडीच्या एकमेव पंक्चर काढणार्‍या ‘अण्णा’ च्या टपरी वर आणून नंतर दोन तास तिथे फळकुटाच्या बाकावर ‘उसगाव पोलिस टायम्स’ वाचताना दिसला आहे. बाकी ह्या ‘अण्णा’ लोकांना मानले पाहीजे नाही, कपिताल वाडीत सुद्धा पोहोचले! काही जण म्हणतात फटफट्या वर येऊ नयेत म्हणून सॅम बाबानेच स्पेशल टोकदार खिळे वाटेत जागोजागी पसरवून ठेवले आहेत, काही म्हणतात हे सगळे त्या टायरवाल्या ‘अण्णा’ चे काम आहे. खरे खोटे ते  ‘सॅम बाबा’ आणि अण्णालाच ठावे.

थोडक्यात काय, सॅम बाबाकडे जायचे म्हणजे तो वेताळ डोंगराची पूर्ण चढण पायी पायी पार करावी लागते. त्याला पर्याय नाही. वाटेत जागोजागी वेडे वाकडे वाढलेले निवडुंग, साप म्हणू नका , बिच्छू म्हणून नका, झाडांना हे मोठ्ठाल्ले दहा – पंधरा फुटी अजगर लोंबकळाताहेत, विषारी कोळी , कोल्हे , लांडगे, तरस धुमाकुळ घालताहेत , रानटी माकडें तर पावला पावला त्रास द्यायला सज्ज. त्या माकडांना ‘केळी’ खायला घालावी लागतात नाहीतर तुमचा खिशातला मोबाईल तुमच्या समोर काढून कधी घेतील ते कळणार पण नाही ! आणि त्यांना द्यायची केळी पण पिकलेली लागतात, कच्ची केळी त्या माकडांना चालत नाहीत , नेम धरुन फेकून मारतील! भरपुर बिसलेरीच्या बाटल्या आणि इलेक्ट्रॉल पावडर ची पाकीटे च्या पाकीटे असल्या शिवाय ही वाट चढणे शक्यच होणार नाही. बिसलेरी , इलेक्ट्रॉल पावडर आणि केळी पायथ्याला असलेल्या ‘अण्णा’ च्या दुकानात (च) मिळतात (अण्ण्या , अण्ण्या , अरे किती कमवशील रे !) , माकडांनी मोबाईल पळवला तरी घाबरायचे नाही, परत जाताना अण्णाच्या दुकानात चौकशी करा, मोबाईल मिळेल! असे सगळे असले तरी या सार्‍या हालाअपेष्टा सोसुन ‘सॅम बाबा’ भेटणार्‍या भाविकांची गर्दी दिवसें दिवस वाढतच होती. ‘सॅम बाबा’ चा महिमाच आहे तसा! ‘आहे’ म्हणजे काय, ‘सॅम बाबा’ अजून आहेत!

या सॅम बाबा मुळे आख्ख्या कपिताल वाडीचे मात्र कोट कल्याण झाले आहे, नेसत्या लुंगीवर कपिताल वाडीत आलेला पंक्चर वाला अण्णा मालेमाल झालाय,  तीस एकर बागायती, चार जे.सी.बी,  आठ पाण्याचे टँकर गव्हर्मिंट डुटीवर, दोन छत्तीस सीटर बशी टुरिस्ट लाईनीवर, हाय-वे वर (अनारकली) डान्स बार, भावाला आमदारकी, सगळ्यात धाकटा भाऊ पी.एस.आय.   …आहात कोठे? एके काळी या अण्णा कडे टायरीत हवा भरणार ‘बबन्या’ आता ‘बबनशेट’ झालाय, चाळीस रुम्स च्या  ‘सॅम भक्त निवास’ (२४ तास गरम पाणी!) चा मालक आहे !

‘सॅम बाबा’ आहेतच तसे… अरे नाय, नाय, नाय! पाव्हणं, असे लगेच सरसाऊन बसू नका! इथे आता मी ‘सॅम बाबा’ चे गुण वर्णन सुरु  करणार नाही (बाकी ‘सॅम बाबा’ चे वर्णन मी काय करणार म्हणा!) , बोलण्या/लिहण्याच्या ओघात या ‘सॅम बाबा’ बद्दल सांगतच जाईन की…

त्या बाबा/म्हाराजांच्या भाकड आणि खोट्या चमत्कारांनी भरलेल्या पोथ्या वाचण्या पेक्षा हे अस्सल सॅम बाबाचे अस्सल नुस्के आपल्याला जास्त उपयोग पडतील, आपल्याला प्रचिती आली बरे का !  हे ‘प्रचिती’ आली म्हणले की  झाले!  कोण बघायला जाणार आणि कोण वाद-विवाद घालणार ! असे नुस्के मला माझ्या करीयरच्या सुरवातीला काळात हातात पडले असते तर? जाऊ दे ‘जो हो गया सो हो गया’!

तर ह्या लेखमालेत मी सांगणार आहे सॅम बाबाचे नुस्के, सॅम बाबाचे चमत्कार नाही! सॅम बाबा कोणी अवतारी पुरुष इ. नाहीत हे आधीच सांगीतले आहे , चला तर मग पाहुयात हे ‘सॅम बाबा’ काय म्हणतात ते…

पुढच्या भागात 

नुस्का: १ ‘झुठाँ कहीं का’ 

त्याच्या पुढच्या भागात …

नुस्का: २….

(जसा वेळ होईल तसा , टायम भ्येटला की , नुस्का लिहिणार ! छ्या मी  काय लिहिणार ?  ती  गुरुमाऊली माझ्या हातून लिहवून घेणार ना ! ) 

(भाऊ तुमी परत सुरु झाला … लोक्स आधीच खवळल्यात आता मारायला धावतील बर्का

शुभं भवतु 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. संतोष

  सुहासजी,

  साउथ चा सिनेमा हिंदीमध्ये डब केल्यासारखं आहे, हा हा हा.

  😜

  संतोष सुसवीरकर

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *