त्याचे असे झाले, एके दिवशी…..

भर बाजारपेठेत एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीची चाकूचे वार करुन अगदी निर्घृण अशी हत्या केली, अगदी राजरोस!

या लेखमालेचा पहीला भग इथे वाचा:

लाय डिटेक्टरचा किस्सा  – १

त्या व्यक्तीला अर्थातच लोकांनी पकडले व न्यायाधिशां समोर उभे केले. मामला इतका सरळ होती की आता जास्त वेळ न घालवता त्या व्यक्तीला ताबडतोब फाशीची शिक्षा सुनावली जाईल अशी लोकांची अपेक्षा होती. असे जरी असले तरी न्यायालयाची म्हणून एक कार्यपद्धती असते,काही औपचारिकता पाळावीच लागते, आरोपीला बचावाची संधी देणे आवश्यक असते. आता न्यायालयात ‘सत्यशोधक’ यंत्राचा वापर होत असल्याने, न्यायाधिशांनी त्या यंत्राचा वापर केला.

ते यंत्र (म्हणजे एका प्रकारचे हेल्मेट) त्या आरोपीच्या डोक्यावर ठेवले व प्रश्न विचारला :

“तू एका व्यक्तीचा चाकूने वार करुन खून केला असा आरोप तुझ्यावर आहे, हा आरोप तुला मान्य आहे?”

त्या आरोपीने क्षणार्धात उत्तर दिले:

“ नाही, मला हा आरोप मान्य नाही, मी त्या व्यक्तिचा खून केला नाही, मी खूनी नाही, मी कोणताही गुन्हा केलेला नाही”.

‘ट्रींग ट्रींग’

त्या सत्यशोधक यंत्रातून लगेच असा आवाज यायला सुरवात झाली ! म्हणजे आरोपी खरे बोलतोय, त्याने कोणताही गुन्हा केला नाही, म्हणजेच आरोपी चक्क निर्दोष आहे !

हे कसे शक्य आहे! ही घटना शेकडो लोकांच्या डोळ्यादेखत घडल्याने, आरोपीने गुन्हा केल्याचे स्पष्टच होते, मग आरोपीने गुन्हा केलेला नाही असे यंत्र का सांगते! असे होणार नाही, चाचणी घेण्यात काहीतरी चुक झाली असावी, पुन्हा एकदा चाचणी घ्या असे सुचवण्यात आले, अनेक चाचण्या झाल्या, प्रत्येक वेळी

‘ट्रींग ट्रींग’ – आरोपी निर्दोष !

यंत्रात काही बिघाड झालाय का हे तपासून पाहण्यासाठी तेच यंत्र दुसर्‍या व्यक्तींच्या सत्य-असत्य कथनाला अचूक प्रतिसाद देते का हे बघितले गेले, यंत्रात काही बिघाड नव्हता, ते व्यवस्थित काम करत होते मग आरोपी इतके धडधडित खोटे बोलत असताना सुद्धा तो खरे बोलत आहे आहे असा चुकीचा संदेश हे यंत्र का देत आहे ?

यंत्राने केलेला हा न्यायनिवाडा कोणालाच पटला नाही. शेवटी प्रकरण रमण महाराजां समोर नेण्यात आले.

महाराजांच्या समोर पुन्हा एकदा चाचणी झाली, आरोपीने ठामपणे सांगीतले:

“मी कोणाचाही खून केला नाही”

‘ट्रींग ट्रींग’ – आरोपी निर्दोष!

रमण महाराजांनाही कळेना, काय गडबड आहे, आरोपीने दिवसाढवळ्या राजरोस एकाचा खून पाडलाय, शेकडो लोकांनी त्याला हे कृत्य करताना बघितलय , पण मग ह्या यंत्राच्या चाचणीत मात्र तो आरोपी दोषी ठरत नाही असे का? यंत्र एरवी व्यवस्थित काम करते आहे पण ह्याच आरोपीच्या बाबतीत ते असा चुकीचा संदेश का देत आहे?

म्हणजे आत्तापर्यंत आपण ह्या यंत्रावर विसंबून न्यायनिवाडा करत आलो ते चुकीचे तर ठरणार नाही, या यंत्राने आत्तापर्यंत असे किती चुकीचे न्यायनिवाडे केले असतील, किती अपराधी या यंत्राच्या चुकीच्या निर्णयाने मोकाट सुटले असतील , आणि त्याहून ही भयंकर म्हणजे किती निरपराधांना या यंत्राच्या चुकीच्या निर्णयाने शिक्षा सुनावली गेली असेल?

ह्या नुसत्या कल्पनेनेच रमण महाराजांचा नखशिखांत थरकाप उडाला! हर हर, अरे देवा, मी हे काय करुन बसलो ! उद्वेगाने त्यांचे डोके गरगरु लागेल, संतापाने लालबुंद होऊन त्यांनी, आज्ञा दिली:

“कोठे आहेत ते श्वेतमुर्ती ? त्यांना जसे असेल तसे , आत्ताच्या आत्ता माझा समोर हजर करा, सरळपणे आले नाहीत तर जेरबंद करुन , मुसक्या बांधून त्यांना आमच्या समोर हजर करा”

श्वेतमुर्ती दरबारात हजर झाले, त्यांनीही एक चाचणी करुन बघितली, पुन्हा तेच

‘ट्रींग ट्रींग’ – आरोपी निर्दोष !

शंकेला जागा नको म्हणून श्वेतमुर्तींनी त्या यंत्राला एक ‘फॅक्टरी रिसेट’ मारला, व्हायरस चेक केला, फर्मवेअर अपग्रेड केले, पण तरीही पुन्हा तेच –

‘ट्रींग ट्रींग’ – आरोपी निर्दोष !

दरबारातले वातावरण कमालीचे गंभीर झाले. एकीकडे श्वेतमुर्ती यंत्र खोलून त्यात डोके खुपसुन बसले आहेत, रमण महाराज उद्वेगाने डोक्याचे केस ओढताहेत, दरबारी स्तब्ध, आरोपी शांत चित्ताने उभा आहे आणि प्रजाजन काकुळतीला येऊन वाट पाहात आहेत!

असेच काही क्षण गेले. अखेर श्वेतमुर्तींनी त्या यंत्रातून आपले डोके बाहेर काढले वा महाराजांना म्हणाले,

“महाराज, यंत्रात काहीही दोष नाही, यंत्र बरोबर काम करत आहे”

“मग तुमचे हे यंत्र हा आरोपी खरे बोलतोय असा चुकीचा संदेश का देत आहे?”

“महाराज, यंत्र चुक करत नाही पण आपण सर्वजण चुकत आहोत”

रमण महाराज कडाडले,

“श्वेतमुर्ती, दरबाराची आदब राखायची असते हे तुम्हाला माहीती आहे ना?”

“माफी महाराज”

“ठीक आहे, आता तुमचे म्हणणे जरा व्यवस्थित समजेल अशा भाषेत सांगावे”

“महाराज, आपली आज्ञा असेल तर मी आरोपीची पुन्हा एकदा चाचणी घेतो”

“मंजूर”

श्वेतमुर्तींनी आरोपीच्या डोक्यावर ते यंत्र ठेवल आणि विचारले:

“तू एका व्यक्तीचा चाकूने वार करुन खून करण्याचा गुन्हा केला केला आहेस, हे खरे आहे ना?”

आरोपीने पुन्हा तेच उत्तर दिले,

“नाही, मी कोणाचाही खून केला नाही, मी कोणताही गुन्हा केलेला नाही”.

‘ट्रींग ट्रींग’- आरोपी निर्दोष !

एव्हाना दरबारी आणि प्रजाजनांचा धीर सुटला होता, एकच गलका झाला:

“बास झाले आता, फेकून द्या ते चुकीचे यंत्र, आरोपी दोषी आहे, खुनी आहे, आता वाट कसली बघताय, फासावर चढवा त्याला आणि त्याच्या बरोबर त्या श्वेतमुर्तींना पण, काय तर म्हणे सत्यशोधक यंत्र.”

प्रधानजींनी सगळ्यांना थांबवले:

“आदब ! आपण दरबारात आहात”

शांतता प्रस्थापित होताच श्वेतमुर्तींनी आरोपीला प्रश्न विचारला.

“तू एका व्यक्तीवर चाकूने हल्ला केला हे खरे का खोटे”

“खोटे, मी कोणावरही हल्ला केला नाही”

“ट्रींग ट्रींग”

“ठीक आहे, मग तू त्या व्यक्तीवर चाकूने वार केलेस हे खरे का खोटे”

“खरे आहे ”

“ट्रींग ट्रींग”

“तू केलेल्या चाकूच्या वारांनी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, हे तरी तुला मान्य आहे का?”

“मला मान्य आहे”

“ट्रींग ट्रींग”

“म्हणजे तू त्या व्यक्तीचा खून केला आहेस”

“मी खून केलेला नाही”

“ट्रींग ट्रींग”

श्वेतमुर्ती रमण महाराजांना म्हणाले..

“महाराज, आरोपी चाकूने वार केल्याचे मान्य करतोय, त्या वारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे हे ही तो मान्य करतोय , दोन्ही बाबतीत तो खरे बोलतोय असा दुजोरा आपल्या सत्यशोधक यंत्राने दिला आहे. पण “मी हल्ला केला नाही, मी खून केला नाही” असे तो म्हणाला ते ही तो खरेच बोलतोय ”

“श्वेतमुर्ती उगाच शब्दाचे खेळ करत बसून दरबाराचा वेळ वाया घालवू नका, ज्या दोन गोष्टी आरोपी मान्य करतोय त्यावरुन हेच सिद्ध होते आहे की आरोपीने खून केला आहे, पण तुमचे यंत्र चुकीचा संदेश देत आहे, आता आम्हाला त्यावर भरवसा ठेवता येणार नाही”

“महाराज, माफी असावी, पण यंत्र बरोबरच आहे, पण त्याचा वापर कसा करायचा  हे अजून आपल्या पूर्णपणे लक्षात आले नाही, आपली चूक होते आहे ,आपण चुकतोय , ते कसे हे मी तुम्हाला पटवून देऊ शकेन, आपली परवानगी असेल तर..”

“श्वेतमुर्ती, तुम्हाला ही शेवटची संधी देतो आहे आम्ही, ते सुद्धा तुम्ही आजतागायत दरबाराची जी सेवा केली आहे ती लक्षात घेऊन. दरबाराचा वेळ किति मौल्यवान असतो हे आपल्याला वेगळे सांगायला नको तेव्हा जे काही सांगायचे ते थोडक्यात सांगा”

“महाराज” घसा साफ करत श्वेतमुर्ती म्हणाले..,,,,,

ये बेन्या, ऐकत काय बसलाय मगाधरनं, शेकंड पार्ट संपला त्ये कळ्ळं नै का , ल्येका चा कोन सांगनार रे , येकदम कड्क पायजे हा, आन पावनं जरा ती माचिस बगू जरा, चा येईस्तो येक फसक्लास विडी संपीवतो, तुमाला सांगतो पावनं, येकदा आमची ही ‘लाल दोरा’ विडी यकडाव वढून बगा, पायापास्नं डोई पत्तुर नुस्त्या झिनझिन्या, अ‍श्शी जब्री किक बगा, अवो काय हाय त्या तुमच्या शिग्रेटित आं , नुस्ता धूर निगतोय हो, काय दम नाय त्यात, येकदम मिळमिळीत,थूत …

क्रमश:   भाग 3 मध्ये  लौकरच, ईथेच खाल्ल्या अंगालाच हाय बगा भाग 3 लगीच घावल , स्क्रोल डावून का काय म्हंत्यात ना त्ये करा जरा अल्लाद , हा हा जास्त डावून नाय वो मालक , उगाच अस्स आन तस्स  कसं..

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *