असेच काही महीने गेले. माझा शोध चालूच होता. अचानक मला एका बड्या प्रकाशन संस्थेचा फोन आला…….
इंग्रजी पुस्तकें वाचणार्‍या प्रत्येक व्यक्तीला अतिपरिचीत असलेली, नावाजलेली अशी एक अतिबलाढ्य विदेशी प्रकाशन संस्था आपण हून माझ्या संपर्कात आली!

हे काय आक्रित म्हणायचे ? मी धन्य धन्य झालो!
(मात्र त्यांना माझा फोन नंबर कसा मिळाला एक कोडेच होते).

“सुहास, पुस्तक लिहतो आहेस, अभिनंदन!”

“पण आपल्याला कसे कळले की मी पुस्तक लिहीत आहे?”

“आमची मोठी प्रकाशन संस्था आहे, नवे नवे लेखक हुडकणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांचे नवे , ताज्या दमाचे लेखन वाचकां पर्यंत पोहोचवणे हे तर आमचे कामच आहे,  तुझी माहीती आम्हाला अशीच मिळाली, आम्हाला तुझ्या लेखना बद्दल कमालीची उत्सुकता आहे, काय लिहतो आहेस?”

“ज्योतिषशास्त्रा वर एक पुस्तक लिहायचे सुरु आहे”

“ओ, वंडरफुल, आमच्या कडे येणार्‍या नेहमीच्या फिक्शन पेक्षा वेगळा , एक्सायटींग विषय आहे, तशी पूर्वी ह्या विषयावर काही पुस्तके आम्ही प्रकाशीत केली आहेत, चांगला रिसपॉन्स मिळाला होता तेव्हा, आम्ही तुझे पुस्तक जरुर प्रकाशीत करु, पण पुस्तक इंग्रजीत लिहतो आहेस ना? रिजनल लॅन्ग्वेज मध्ये आम्ही प्रोजेक्ट करत नाही”

“हो, पुस्तक इंग्रजीतच आहे”

“उत्तम ! मग लिखाणचे कोठेपर्यंत आलेय?”

“पुस्तकाची संपूर्ण आऊटलाईन तयार आहे आणि दोन चॅप्टर्स पूर्ण लिहुन तयार आहेत ”

“ओ, दॅट्स ग्रेट , बाकीचे चॅप्टर्स लिहायाला साधारण किती वेळ लागेल?”

“साधारण तीन महीने”

“ओह, रिझनेबल आहे, तेव्हढा वेळ लागणारच. विषयच तसा आहे, काही हरकत नाही. पण म्हणून आपण तीन महीने थांबायचे नाही सुहास, आपण लगेच काम सुरु करुयात, कसे?”

“म्हणजे नेमके काय करावयास पाहीजे?”

“सुहास , तु असे कर, ते जे दोन चॅप्टर्स तयार आहेत ना ते आम्हाला लगेच पाठवून दे म्हणजे आमची एडिटोरियल टीम त्याचा एक क्वीक रिव्हू घेऊ शकेल.”

“चालेल, मी ‘स्क्रिव्हनर’ सॉफ़्टवेअर वापरुन लिहतोय, आपल्याला त्या फॉरमॅट मधले चालेल?”

“परफेक्ट, ‘स्क्रिव्हनर’ म्हणजे काय , प्रश्नच नाही. आमचे बरेचसे ऑथर्स हेच सॉफ्टवेअर वापरतात. पण एम एस वर्ड पणे एक बॅक -अप कॉपी पाठवलीस तर जास्त सोपे जाईल नाही का?”

“काही हरकत नाही, वर्ड मध्ये पण पाठवतो, पण नेमके कोठे पाठ्वायचे?’

“मी आमच्या एडिटींग ब्युरोच्या प्रिंसीपल एजंट ची एमेल आयडी तुला एसेमेस करते , माझे नाव रेफरंस म्हणून दे, म्हणजे तो ताबडतोब अ‍ॅक्शन घेईल.”

“जमेल मला ते”

“पण नक्की पाठव,  एक नवा लेखक , एका वेगळ्या एक्सायटींग विषयावरचे पुस्तक घेऊन आमच्या कडे येतोय याच्या सारखा दुसरा आनंद नाही!”

“मला ही तुमचे आभार मानायचे आहेत. माझे पहीलेच पुस्तक इतक्या मोठ्या प्रकाशना तर्फे प्रकाशीत होणार ही माझ्या साठी अभिमानास्पद गोष्ट आहे”

“कसचे, कसचे, पण जास्त उशीर करु नको, मी पुन्हा फोन करु का?”

“छे छे , त्याची गरजच नाही, मी आजच , आत्ताच सँपल पाठवतो”

“शुभेच्छा !”

“धन्यवाद”

त्यांच्या मागणी नुसार मी पहीले दोन चॅप्टर्स त्यांना हव्या असलेल्या फॉरमॅट मध्ये पाठवून दिले.

अक्षरश: तिसर्‍याच दिवशी त्यांनी फोन करुन माझे कौतुक केले , चांगले लिहले आहे, पुस्तकाचा विषय एकदम वेगळा आहे , खूप खपेल हे पुस्तक, आम्ही प्रकाशीत करायला तयार आहोत.. लौकरात लौकर पुस्तक पूर्ण कर..

मी तर हरखूनच गेलो! ह्याला म्हणतात प्रकाशक ! नाहीतर तो दिल्लीवाला !

सुरवात तर छानच झाली,  ठरलं तर मग , भराभर चॅप्टर्स लिहून पुस्तक पूर्ण करायचे .. नंतर काय … माझे पुस्तक बाजारात येणार … लेखक म्हणून माझे नाव होणार … पुरस्कार मिळणार … एका पाठोपाठ आवृत्त्या  निघताहेत, आणखी लिहा आम्ही छापतो अशा मागण्या होताहेत …

स्वप्नरंजनच ते त्याला कसल्या आल्यात मर्यादा !

पण माझ्या तेव्हा हे लक्षात आले नाही , की मी सॅपल पाठवल्या नंतर अवघ्या तीन दिवसात उत्तर कसे येईल?  एव्हढी मोठी प्रकाशन संस्था , इतक्या झटपट माझे लिखाण वाचून लगेचच माझे  पुस्तक प्रकाशनाला कसे काय स्विकारु शकते?  ते देखील माझ्या सारख्या आता पर्यंत एकही पुस्तक नावावर नसलेल्या नवख्या लेखकाचे? मी काय त्यांना ‘चेतन भगत / शोभा डे ‘ वाटलो का?

मी स्वप्नरंजनात व्यस्त होतो त्यात काही काळ गेला….

एके दिवशी त्या प्रकाशन  संस्थेतून मला फोन आला. त्यांची कोणी तरी व्हाईस प्रेसिडेंट होती म्हणे ! त्या स्त्रीने माझी अगदी तोंड फाटे पर्यंत स्तुती केली ,  मी तिचे बोलणे लक्ष पूर्वक ऐकायला हवे होते कारण  बोलताना ती म्हणत होती

“प्लॉट मस्त आहे, काय एक एक घटना/ प्रसंग खुलवले आहेत, व्यक्तीरेखा अगदी हुबेहुब जमल्या आहेत, वाचताना उत्कंठा शिगेस पोचते..”

आता माझ्या ग्रहयोगा सारख्या रुक्ष आणि तांंत्रिक पुस्तकात कसला आलाय ‘प्लॉट’  आणि त्यात कसल्या येणार ‘घटना’, ‘प्रसंग’ आणि ‘व्यक्तीरेखा’ ! ती तथाकथित व्हाइस प्रेसिडेंट माझे सँपल लिखाण न वाचताच  माझ्याशी बोलत होती हे उघड होते, पण तेव्हा ‘मैं चेतन भगत बनना चाहतां हूँ’ च्या नशेत असल्याने माझ्या ते तेव्हा लक्षात आले नाही! गोलमाल है भाई सब गोलमाल है !

अशी अगदी गोड गोड , मिठ्ठास सुरवात करत , तिने हळूच सुचवले:

“सुहास , मस्त लिहले आहेस रे! पण एक अडचण आहे,  तुझे  इंग्रजी जरी चांगले असले तरी इंग्रजी मातृभाषा आहे अशा व्यक्तीने ते लिहले आहे असे वाटत नाही , आपल्याला काही शब्द , वाक्यरचना बदलल्या पाहीजेत , लिखाणाला खास असा ‘ब्रिटीश ‘ किंवा ‘अमेरिकेन’ टच आणायला पाहीजे”.

“अहो मी मुद्दामच ‘सोप्या इंग्रजीत’ लिहलेय, माझे संभाव्य वाचक , जे बहुतांश भारतीय आहेत , त्यांना फार फर्डे , शैलीदार असे इंग्रजी पेलवणार नाही आणि  व्हिक्टोरियन इंग्रजी तर डोक्या वरुन जाईल त्यांच्या !”

“ओ, कम ऑन सुहास , तु भारतातल्या वाचकां पुरता विचार का करतोस? आपले इंंटरनॅशनल पब्लीकेशन आहे , सार्‍या जगात तुझे पुस्तक जाणार आहे , त्याचा जरा विचार कर ना!”

“मग मी नेमके काय करावे अशी आपली अपेक्षा आहे?”

“सुहास, आपण असे करु हे स्क्रिप्ट एडिट करु, भाषा – व्याकरण जरा सुधारुन घेऊ म्हणजे तुझे आधीच उत्तम , शैलीदार असे लिखाण कसे इंंटरनॅशनल दर्जाचे वाटेल! त्यासाठी तू आमची एडिटींग सर्व्हिस वापरु शकतोस , अगदी मोफत आहे ही सेवा. कोणताही जादाचा खर्च नाही!”

“अरे वा, मग तर काहीच  हरकत नाही , काय बदल आवश्यक आहेत ते करा पण कोणताही बदल माझ्या संमती शिवाय फायनल करायचा नाही”

“अलबत, हे काय सांगायला हवे का? तुला दाखवल्या शिवाय , तुझी परवानगी घेतल्या शिवाय , एखादे ‘टिंब’ ही बदलले जाणार नाही, तु निश्चिंत रहा त्या बद्दल”

असेच दोन आठवडे गेले एव्हाना मी पुढचे तीन-चार चॅप्टर्स तयार केले होते ते त्यांना रिव्हू साठी पाठवणार,  तोच त्यांचा पुन्हा एक फोन आला. आता त्यांचा चीफ एडीटर लाईनवर होता…

त्याने ही कौतुक सुरु केले अगदी त्या पूर्वी कॉल केलेल्या (तथाकथित!) व्हाईस प्रेसिडेंट च्याच भाषेत , अगदी ‘तेच शब्द न शब्द’ वापरत म्हणजे. अगदी एखादे आधी पासुन लिहून ठेवलेले स्क्रिप्ट वाचून दाखवावे तसे!!!!

इथे माझ्या लक्षात यायला हवे होते  की ती व्हाईस प्रेसिडेंट आणि आता हा चीफ एडिटर एकसारखे कॉपी टू कॉपी कसे काय बोलू शकले?

… गोलमाल है भाई सब गोलमाल है !

ह्या चीफ एडीटर सायबांचे म्हणणे होते की लिखाणात मोठे बद्ल करावे लागणार आहेत , एरव्ही ते असे बदल एक सॉफ़्टवेअर वापरुन करतात पण बदल बरेच आणि  स्ट्रक्चरल असल्याने आता ते माणसा कडून म्हणजे एका हाडामांसाच्या एडिटर कडून करुन घ्यावे लागतील. मी म्हणालो ..

“हरकत नाही तसे करा, नाहीतरी तुमची ही फ्री सर्व्हीसच आहे , मशीन वापरा किंवा माणुस , मला काहीही चालेल.”

तेव्हा ते एडिटर साहेब मोठ्या अदबीने म्हणाले ..

“तसे नाही सुहास, फरक आहे, सॉफ्टवेअर द्वार केलेले एडिटींग फ्री असते पण माणसां कडुन केलेल एडिटींग चार्जेबल असते”

“साधारण किती चार्जेस होतील”

“तसे आम्ही एका पृष्ठाला दोनशे रुपये चार्ज करतो पण तुझे हे पहीलेच पुस्तक आहे म्हणून खास वेलकम ऑफर म्हणून एका पृष्ठाला फक्त दिडशे रुपये!”

“माझे पुस्तक अंदाजे ३०० पानाचे म्हणजे त्या हिशेबाने एडिटींग चे ४५,००० होतात , हे फार जास्त होतात!”

“सुहास, मुळात तुला वाटतात तसे हे दर जास्त नाहीतच, बाहेर या कामाला दुपटीपेक्षा जास्त चार्ज लावतात. आपल्याला काहीतरी दर्जेदार , आंतरराष्ट्रीय निकषांना उतरेल असे काही करायचे आहे ना ? मग हा खर्च करावाच लागेल. आमच्या प्रकाशनाचा एक दर्जा आहे तो आम्हाला सांभाळावा लागतो ना?”

“मला जरा विचार करु द्या”

“हरकत नाही, टेक युअर ओन टाइम , पण शक्य तितक्या लौकर कळव, कारण जर जास्त उशीर झाला तर आमची वेलकम ऑफर मिळणार नाही, रेगुलर चार्जेस ६०,००० लागू होतील , तुला निष्कारण १५००० चा जादा खर्च येईल”

मी नेमके काय करावे याचा विचार करत असतानाच , परत त्यांचा फोन आला…

आता फोन वर मधाळ आवाजाची एक महीला होती , तिने स्वत:ची ओळख आर्ट डायरेक्टर अशी करुन दिली. तिने ही अगदी साखरेच्या पाका सारख्या गोड आवाजात माझी स्तुती करत मुख्य विषयाला हात घातला , पुस्तकातल्या मजकूरा पेक्षा त्याच्या कव्हरला कसे महत्व असते,  कव्हर लोकांच्या डोळ्यात भरल्या शिवाय ते हाताळले जाणार नाही, आणि हाताळले गेले नाही तर पुस्तक विकले जाणार नाही इ. तिने मला पुस्तकाचे कव्हर डिझाईनची  ऑफर दिली.. ती होती ३०,००० ची !

मी म्हणालो…

“अहो, हे काही कथा – कादंबरी वाले फिक्शन पुस्तक नाही, ज्योतिषावर आहे, ज्योतिषा वरच्या पुस्तकांची कव्हरें एका ठरावीक साच्याची असतात , त्यात फारसे व्हेरिएशन नसते, कव्हर डिझाईनला फारसा स्कोप नाही शिवाय ज्योतिषा वरील पुस्तकाचा वाचकवर्ग वेगळा असतो, केवळ कव्हर आकर्षक आहे म्हणूण पुस्तक घेणार्‍यातला तो नसतो. तसेही माझे पुस्तक मास मार्केट साठी नाहीच , माझे पुस्तक ‘अ‍ॅडव्हांस / अप्लाईड’ अ‍ॅस्ट्रॉलॉजी वर आहे जिथे मजकूर महत्वाचा ठरतो, कव्हर नाही. तेव्हा कव्हर साठी इतका पैसा खर्च करायची आवश्यकता नाही. हा विचार करुनच मी दोन कव्हर्स चे नमुने तयार केले आहेत , ते बघता का? माझ्या मते ते नमुने चालू शकतील.”

“ओ, दॅट्स ग्रेट ! म्हणजे लेखन करण्या बरोबरच तु उत्तम चित्रकार / डीझाईनर पण आहेस वाटते.. हरकत नाही, तु तुझी डिझाईन्स पाठवून दे. बघु कसे काय जमते ते.”

मी कव्हरचे नमुने त्यांना पाठवून दिले…

परत त्यांचा फोन आला अगदी दुसर्‍याच दिवशी बरे का! ………………

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

10 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   श्री हिमांशुजी,

   कसला मर्क्युरी घेऊन बसलात राव, ती माणसे ड्यॅबिस होती .. तीच कशाला आणखी बरीच आहेत / भेटलीत… मीच कशाला साक्षात प / ल. देशपांडे, व पु काळे सारख्या प्रथितयश लेखाकांनानाही ह्या जमातीने असेच पिडले आहे.

   सुहास गोखले

   0

 1. Santosh

  सुहासजी,

  भन्नाट, खिसे कापाकापिची छान साधने आहेत ह्या लोकांकडे.

  आपला अनुभव बाकीच्या लोकांना जरूर उपयोगी पडेल.

  संतोष सुसवीरकर

  0

  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री संतोषजी,

   अगदी खरे आहे आपण म्हणाता ते. ही लेखमाला त्याच हेतुने लिहीत आहे.

   सुहास गोखले

   0

 2. आन्नासाहेब गलान्डे.

  प्रथमच इथे आलो, आनि चकित झालो!
  तुमच्य्या व्यासंगास नमस्कार.

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *