‘प्रॉक्झी’ प्रश्न : ज्योतिषाला कोणीही कोणाच्याही वतीने प्रश्न विचारू शकतो, ‘हरवलेल्या व्यक्ती’ संदर्भातला प्रश्न मात्र कायमच दुसर्‍याच व्यक्तीला विचारावा लागतो, कारण हरवलेली व्यक्ती स्वत:च ‘मी सापडेन काय’ असा प्रश्न कसा विचारू शकेल ? हा एक अपवाद वगळता बाकी सर्व प्रश्न कोणीही कोणाच्याही वतीने प्रश्न (ज्याला आपण  ‘प्रॉक्झी’ प्रश्न म्हणतो ) विचारू शकतो, पण जेव्हा एखादी व्यक्ती दुसर्‍याच्या वतीने प्रश्न विचारते तेव्हा  अनेक प्रश्न  उभे राहतात.

या लेख मालेतले आधीचे लेख इथे वाचा:

प्रश्न शास्त्र का आणि कसे – १

प्रश्न शास्त्र का आणि कसे – २

प्रश्न शास्त्र का आणि कसे – ३

प्रश्न शास्त्र का आणि कसे – ४

प्रश्न शास्त्र का आणि कसे – ५
सर्वप्रथम विचारात घ्यायचे ते म्हणजे प्रश्न विचारणारा व प्रश्न ज्याच्या साठी विचारला गेला आहे ती व्यक्ती  यांच्यात  कोणता नाते संबंध आहे? कोपर्‍यावरच्या नारियल पानी वाल्याने ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील का ?’  हा प्रश्न जरी पैसे देऊन विचारला तरी त्याचे उत्तर द्यायचे का? जिथे आपला काही संबंध नाही, ना घेणे ना देणे पण केवळ उत्सुकता म्हणून विचारलेले सार्वजनिक स्वरुपाचे बरेचसे प्रश्न या स्वरुपाचे असतात. काही वेळा असे दुसर्‍याच्या वतीने प्रश्न विचारुन मिळवलेल्या माहीतीचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते , अशा वेळी प्रश्न विचारणार्‍याला खडसावयास हवे की ‘दुसर्‍याच्या भानगडीत तू का नाक खुपसतो आहेस?’

दुसरा त्यांहूनही मोठा प्रश्न आहे तो म्हणजे नैतिकतेचा. प्रश्नाच्या अनुषंगाने ज्योतिर्विदाला त्या व्यक्तीविषयी वा प्रश्ना संदर्भात काही खासगी माहिती विचारावी लागते, काही वेळ जन्मतारीख , जन्मवेळ असले तपशील वा अन्य माहिती मिळवावी लागते, त्याच्या आधारे ज्योतिर्विद ने केलेले त्या व्यक्तीच्या भविष्या बद्दल भाष्य हे  सर्व ज्या व्यक्तीसाठी होत  आहे त्या व्यक्तीला मात्र हया सार्‍या बद्दल काहीच कल्पना नसते! त्या व्यक्तीने प्रश्न विचारणार्‍याला तशी परवानगी दिली आहे का याची खातरजमा करावयास नको?

ही दुसरी व्यक्ती मग ती प्रश्न विचारणार्‍या व्यक्तीचा मुलगा /मुलगी/भाऊ/बहीण/जावई/सून/मित्र असला तरी त्या व्यक्तीच्या परवानगी शिवाय त्याच्या आयुष्यातल्या खाजगी गोष्टी जाणून घ्यायचा दुसर्‍याला काय अधिकार आहे ? याला ‘Invasion of privacy ’ म्हणतात , भारतात असे शिष्टाचार पाळले जात नाहीत (इतरही कोणते पाळले जातात म्हणा !)  किंवा त्याकडे तितकेसे गांभीर्याने बघितले जात नाही पण परदेशात हा एक गंभीर व दखलपात्र गुन्हा मानला जातो.

मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे विवाहित आहे , पण त्याची नोकरी स्थिर नाही सतत नोकर्‍या बदलाव्या लागत आहेत हे असे का ?  हा प्रश्न त्या मुलाच्या अपरोक्ष त्याच्या वडिलांनी विचारला होता,  हा प्रश्न त्या अमेरिका स्थित मुलाने स्वत:च  विचारला असता तर ठीक पण हा प्रश्न त्या मुलाच्या अपरोक्ष त्याच्या वडिलांनी का विचारावा ?  असे विचारणे कदाचित त्यांच्या त्या  अमेरिका स्थित मुलालाही आवडणार नाही.

विवाहित मुलीची आई विचारते ‘माझ्या मुलीने पुढचे शिक्षण घ्यावे का ? तिने अपत्य केव्हा होऊ द्यावे ? तिने नोकरी करावी का? असे प्रश्न त्या मुलीचे (आणि कदाचित तीच्या नवर्‍याचे / तीच्या सासरच्यांचा लोकांचे) आहेत ,  मुलगी एकदा सासरी नांदायला लागल्या नंतर मुलीच्या आईने तीच्या संसारात व खासगी आयुष्यात लुडबुड करायचे काही एक कारण नाही.

या उदाहरणांतल्या व्यक्तींची आपल्या अपत्यां बद्दलची काळजी आपण समजू शकतो पण असे ही असू शकते की आई वडील ज्याला समस्या मानताहेत त्या मुळातच त्यांच्या अपत्यांच्या दृष्टीने समस्या नसतीलही, माता पित्यांना उगाचच (अपुर्‍या माहितीच्या आधारावर) काळजी वाटत असते. वरील उदाहरणांत जेव्हा या मुलांना प्रश्न पडेल आणि ती जेव्हा स्वत: असा प्रश्न विचारतील तेव्हाच त्याचे उत्तर देणे संयुक्तिक ठरेल.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे , माझ्या दाढदुखीच्या वेदनांची तीव्रता मला जेव्हढी जास्त जाणवते तितकी ती दुसर्‍या व्यक्तीला (मग ती माझ्या कितीही जवळची असू दे) जाणवणार नाही. दुसरी व्यक्ती माझ्या वेदनांना सहानुभूती दाखवू शकते पण माझ्या वेदना घेऊ शकत नाही. दुसर्‍या व्यक्तीने कितीही प्रयत्न  केला तरी माझ्या मनात जी खळबळ, तळमळ ,चिंता, भिती, वेदना आहे त्याची अनुभूती त्या व्यक्तीला कधीच येणार नाही. प्रश्न कुंडली हा त्या जातकाच्या त्या वेळच्या मन:स्थितीचा आरसा असते, त्यातली प्रतिमा जितकी डायरेक्ट , स्वच्छ तितकी  भविष्य कथनातली अचूकता जास्त.

तिसरा मुद्दा थोडा तांत्रिक आहे, कुंडलीतले 1 ले स्थान (लग्न स्थान) हे  नेहमीच प्रश्न कर्त्याचे  असते, जर आई ने मुलाच्या वतीने प्रश्न विचारला असेल तर आधी नेहमी सारखी कुंडली मांडावी लागते, इथे लग्न स्थान प्रश्नकर्त्याचे म्हणजे  या उदाहरणातल्या आईचे असणार, पण प्रश्न तिच्या मुलाचा असल्याने प्रश्नकुंडली फिरवून घ्यावी लागेल , म्हणजे कुंडलीतले पंचम स्थान हे लग्नस्थान मानावे लागेल ( प्रश्नकर्ता लग्न स्थान 1, तिची संतती , पंचम  स्थान 5 ), आजीने नातवासाठी प्रश्न विचारला असेल कुंडलीतले नववे स्थान हे लग्नस्थान मानावे लागते ( प्रश्नकर्ता लग्न स्थान 1, तिची संतती पंचम स्थान 5, संततीची संतती –नातू म्हणजे पंचमाचे 5 चे पंचम  स्थान  5 म्हणजे नवम स्थान 9 ), एखाद्याने त्याच्या मामेबहिणी बाबत प्रश्न विचारला असेल तर कुंडलीतले दहावे स्थान हे लग्नस्थान मानावे लागते ( प्रश्न कर्ता लग्न स्थान 1, त्याची आई चतुर्थस्थान 4 , मामा म्हणजे आईचा भाऊ म्हणजे चतुर्थाचे 4 त्रितीय स्थान,षष्ठम स्थान  6,  मामाची मुलगी म्हणजे षष्ठम स्थानाचे  6 चे पंचम स्थान 5,दशम स्थान 10).

जसे  ‘मूळ कागदाची झेरॉक्स कॉपी , या कॉपीची झेरॉक्स कॉपी, त्या कॉपी च्या कॉपीवरून परत एक झेरॉक्स कॉपी‘ करत राहिल्यास शेवटी एका काळा कागद हातात पडेल; तसेच जितक्या वेळेला कुंडली फिरवली जाईल तितकी ती अस्पष्ट होत जाईल व शेवटी निरुपयोगी ठरेल. म्हणून प्रश्नकुंडली फिरवून घ्यावी लागणारच असेल तर एकदाच ‘फिरवण्या’ इतकीच त्याची मर्यादा असावी. वरील उदाहरणात मामेबहिणी बाबतचा प्रश्न, खुद्द त्या मामेबहिणीने विचारावा हे  सगळ्यात चांगले, जास्तीतजास्त ‘मामा’ आपल्या मुलीसाठी विचारू शकेल.

अंतिमतः ज्याचा प्रश्न त्याचा त्यानेच विचारावा’ हे  योग्य. ज्योतिर्विदांनी ही अशा ‘प्रॉक्झी’ प्रश्नांची उत्तरे शक्यतो देऊ नयेत. इथे व्यवसाय मिळाला नाही तरी चालेल पण मी ज्योतिषशास्त्राची प्रतारणा व व्यावसायिक  नीतिमूल्यांशी तडजोड करणार नाही अशी कणखर भूमिका ज्योतिर्विदाला घेता यायला पाहिजे, माझ्या सुदैवाने अशी भूमिका मला  घेता येते आणि ती मी नेहमीच घेत असतो.

पुढच्या भागात आपण आणखी काही प्रश्नांच्या प्रकारावर विचार करु.

या लेखमालेतील मागील भाग इथे वाचा:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *