(हा फटू इंटरनेट वरुन साभार! फटु तला वाडा आणि ज्योतिषीबुवा राहात असलेला वाडा यांचा काहीही संबंध नाही.)

या लेख मालिकेतला पहिला भाग इथे वाचा:

पुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १

त्या वाड्याला दरवाजाच नव्हता, फक्त चौकट होती, आत शिरताच भप्पssकन घाण वास आला, येणारच कारण डाव्या हाताला ओळ धरुन चार-पाच (समाईक) संडास ! त्या ‘संडासां’ ची मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) स्विकारत , पुढे सरकलो.

पुढे एक चौक (म्हणजे मोठी मोकळी जागा) होता . इंच न इंच जागा वेड्यावाकड्या पार्क केलेल्या दुचाक्यांनी भरुन एक चक्रव्युह तयार झाला होता. पुढे कसे जायचे याचे महाभारतातल्या अभिमन्यु सारखे प्लॅनिंग करावे लागले. शेवटी मार्ग सापडला , ती वाहने आणि उजव्या हाताची भिंत यातली चिंचोळी पट्टी हाच काय तो पुढे जाण्याचा राजमार्ग होता.

बघावे तिथे उखडलेल्या फरश्या आणि त्यात साचलेले पाणी, त्यातून ‘चुबुक चुबुक फटॅक चुबुक फटॅक’ असे आवाज करत जरासे पुढे येतो न येतो तोच वाटेत आडवे ‘गटार’ आले, त्यावरुन टूण्णकन उडी मारली , जमले की असे स्वत:शीच म्हणत होतो तोच लक्षात आले पुढे आणखी एक गटार आहे , त्यापुढे आणखी एक , आणखी एक…

आता या सगळ्यात या ज्योतिषीबुवांना कोठे हुडकायचे याचा विचार करत होतो तेवढ्यात समोरुन एक ‘राजा गोसावी ‘ टाईप व्यक्तीमत्व, लेंगा सदरा घालून , सराईता सारखे टणाटणा गटारें ओलांडत माझ्या समोरच आले. माझा भांबावलेला चेहेरा पाहून त्याला कळलेच ..

“काय हो, कोण पाहीजे?”

“आपले ते हे , काय नाव त्यांचे , हां, ते ‘ xxxxxx’ कोठे राहतात म्हणायचे?”

“ते होय , तुम्ही असे करा , इथून पुढे सरळ गटारी मोजत जा. बरोब्बर पाचवे गटार”

“तिथे राहतात का ते?”

“नाही हो , गटारात कसे राहतील ! पाचव्या गटारीला उजव्या हाताला एक खोली आहे. तिथे एक जिना आहे ”

“ओक्के”

“तुम्ही वर जाऊ नका”

“असे कसे , आज ना उद्या सगळ्यांनाच वर जायचे आहे”

“अहो त्या अर्थाने वर जाणे नाही, जिन्याने वर जाऊ नका”

“मग?”

“त्या जिन्याच्या बाजुला एक बोळ चालू होतो”

“त्या बोळाचे काय?”

“त्या बोळातून थोडे पुढे गेलात की डाव्या हाताची तिसरी खोली”

“नक्की का?”

“नक्की म्हणजे , मी त्यांच्या समोरच तर राहतो , उजव्या हाताला मी , डाव्या हाताला ते “

“धन्यवाद”

“काय ज्योतिष बघायाला आलात वाटते “

“हो, तसेच काहीसे”

“लग्नाचा नाहीतर नोकरीचा प्रश्न असणार”

“कशा वरुन?”

“नाही, आपला एक अंदाज”

“तसे काही नाही”

“अरे हो, एक सांगायचे राहिले’

“काय?”

“त्या जिन्याच्या पायरीवर आमच्या घरमालकांची म्हातारी आई केस विंचरत बसलेली असते”

“बसु देत ना आईसाहेबांना तिथे, माझे त्यांच्याकडे थोडेच काम आहे”

“तुम्हाला त्यांच्या कडे काम नसेल हो पण त्यांना आहे ना!”

“म्हणजे?”

“त्या तुम्हाला हटकतील , जवळ बोलावतील ”

“आणि?”

“आणि काय? एकदा का त्यांच्या हातात सापडलात तर किमान दोन तासांची निश्चिंती, इथले कोणीही मध्ये पडणार नाही “

“असे करतात तरी काय त्या?”

“प्रत्यक्ष अनुभव घेऊन बघा”

“नको , आता तुम्ही एव्हढे सांगताय त्यावरुनच कल्पना आली”

“समजदार दिसताय, पुण्याचे वाटत नाही”

“हॅ हॅ हॅ ”

“तुमची प्यॅन्ट नविन दिसते “

“असेल, त्याचे काय?”

“घरमालकांचे कुत्रे ! त्या खोलीतच बांधलेले असते, अंधारात चटकन दिसत नाही”

“पुन्हा एकदा धन्यवाद”

“जपून जा म्हणजे झाले”

“हो , पण एक विचारायचे राहीले”

“काय?”

“आईसाहेब आधी की कुत्रा ?”

“आज वार कोणता ?”

“गुरुवार “

“मग आईसाहेब”

“असे असते का?”

“मी इथेच राहतो ना”

“हो हे ही खरेच आहे “

त्या ‘राजा गोसाव्याने’ माझ्या कडे एक छद्मी कटाक्ष टाकला आणि तरातरा निघून गेला. मी ही खांदे उडवले आणि गटारींच्या दिशेने कुच केले.

एक – दोन – तीन… हे काय आलेच की पाचवे गटार ! उजव्या हाताला तो दरवाजा ही दिसला, दरवाजा आपलं म्हणायचे कारण इथेही दरवाजा असा नव्हताच फक्त चौकट होती. त्या चौकटी पाशी येताच लक्षात आला की आत अंधार चांगलाच आहे, दबकत दबकत आत प्रवेश केला. आत येताच डाव्या हाताला जिना होता, त्या जिन्यावर प्रकाशची एक मात्र तिरीप येत होती, तेव्हढाच काय तो उजेड !

क्रमश:

शुभं भवतु

सुहास

या लेख मालिकेतला पहिला भाग इथे वाचा: पुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

0 प्रतिक्रिया

///////////////
 1. sandip

  म्हातारी आई केस विंचरत बसलेली
  घरमालकांचे कुत्रे
  सुहास जी
  पुन्हा ज्योतिषाची तर्‍हा …… की
  सस्पेन्स………………….स्टोरी

  0

 2. स्वप्नील

  राजा गोसावी … हा…हा….हा…..छान विनोदी पद्धतीने वर्णन सुहासजी …!! …!! तो क्रमशः शब्द वाचायला नको वाटतो . पुढे काय असेल अशी उत्सुकता वाटते ना

  0

  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी ,

   अभिप्रया बद्दल धन्यवाद ,

   कामाच्या व्यापामुळे लिखाणाला वेळ मिळणे कठीण होत चाललेय त्यामुळे जसे लिहीन होईल त्से पोष्ट करत आहे .

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *