एका नवविवाहातला त्याचे (विवाह झालेले अनुभवी) मित्र सल्ला देतात,
“अगदी पहील्या दिवसा पासुन बायकोला धाकात ठेव नाहीतर ती डोक्यावर बसेल “
हा नवविवाहीत तसे करण्याचा प्रयत्न कसा करतो ! कसे ते प्रत्यक्षात या व्हीडीओतच पहाना…
चित्रपट : ‘पती, पत्नी और वो
अभिनय: संजीवकुमार , विद्या सिन्हा
चित्रपट निर्माता: बी.आर . चोप्रा
व्हीडीओ सौजन्य: व्हीनस रेकॉर्ड्स, यु ट्युब
हा व्हिडीओ ‘विमिओ vimeo ’ मार्फत आपल्या समोर सादर करण्यात आला आहे.
……
“ मैं जो केहेता हूँ वैसा करो. बीबी , सुबह उठते ही हमे एक गरमागरम चाय चाहीये.. वरना ..”
“अय बीबी जब मैं बाथरुम से नहाके निकलू तो कपडे हँगर पे टँगे हुए मिलने चाहीये… वरना”
“लंच ठीक देड बजे टेबल पे लग जाना चाहीये…. वरना”
“डिनर रात के ठिक नऊ बजे,…. वरना”
“कल सुबह ही सुबह हमे दौरे पे जाना है नहाने के लिए ठीक पाँच बजे गरम पानी मिल जाना चाहिये … वरना “
या सार्या ‘वरना ..वरना’ अशा दिल्या जाणार्या धमक्यांवर वैतागून त्याच्या बायकोने
“वरना क्या?” असे चिडून विचारले तेव्हा:
“वरना ? मै ठंडे पानी से नहाके चला जाऊंगा”
या उत्तरा वरुन ह्या ‘वरना’ च्या धमक्यां किती पोकळ होत्या ते लक्षात आले ना!
आता तुम्ही म्हणाल याचा ज्योतिषशास्त्राशी काय संबंध? आहे ना संबंध आहे म्हणून तर ही स्टूरी सांगीतली/ दाखवली ना!
……………………………
जसे त्या ‘वरना’ वाल्या धंमक्या पोकळ होत्या तसेच ज्योतिषाला विचारले जाणारे काही प्रश्नही असेच पोकळ असतात, केवळ एक खडा टाकून पाहवा म्हणून विचारलेले असतात. एक उत्सुकता म्हणुन विचारलेले असतात. त्यात पुरेसे गांभिर्य नसते. अशा प्रश्नांची उत्तरे प्रश्नकुंडली मार्फत दिल्यास ती हमखास चुकतात. कारण ‘प्रश्न विचारताना जातक पुरेसा गंभीर असणे’ ,’प्रश्न अगदी तळमळीचा / कळकळीचा ‘ असणे ही जी प्रश्नशास्त्राची महत्वाची अट आहे, त्याची पायमल्ली झाल्यास प्रश्नकुंडली मार्फत सहाय्य मिळत नाही.
म्हणुनच जातक प्रश्ना बाबत पुरेसा गंभीर आहे , त्याला प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायची खरी तळमळ आहे आणि प्रश्न ही तितकाच कळकळीचा आहे , जातकाची त्या प्रश्नात असलेली भावनिक गुंतवणूक किती आहे याचा शहानिशा प्रत्येक ज्योतिषाने करुन घेणे आवश्यक आहे.
उगाच येईल त्या जातकाचा , विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत बसू नये, विचारलेला प्रश्ना जर वर दिलेले निकष पूर्ण करत नसेल तर असे प्रश्न टाळणेच श्रेयस्कर असते. हे न करता उत्तर देण्याचा घाट घतला तर अशी उत्तरे चुकण्याची शक्यता फार मोठी असते. प्रश्नकुंडली वापरा अथवा जन्मकुंडली वर दिलेल्या बाबीं तपासायला हव्यातच,
उगाच विचारला प्रश्न निघाले ‘सब लॉर्ड्स’ धुंडाळायला असे करु नका (सध्या एका ‘सब सब लॉर्ड वाल्या’ कोल्हासुराने धुमाकूळ घालायला सुरवात केली आहे, या असल्या ‘सब सब लॉर्ड बहाद्दराला ‘ वेळीच आवर घातला पाहीजे!), उगाच त्या गल्लीबोळातल्या ‘नक्षत्र शिरोमणीं’ सारखे काही बाही तर्कट लढवत, अयोग्य आणि उत्तर चुकण्याची शक्यता जास्त असलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे म्हणजे आपली विश्वासार्हता कमी करुन घेण्यासारखे आहे.
जातकाने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहीजे असे कोणतेही बंधन ज्योतिषावर नाही.
मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आता आपण काही उदाहरणे विचारात घेऊया.
समजा एका जातकाने प्रश्न विचारला “मला इन्फोसीस ‘ मध्ये नोकरी मिळेल का?”
प्रश्नशास्त्राच्या आधारे ‘नोकरी मिळेल का नाही’ हे जरी सांगता येत असले तरी दुर्दैवाने हे शास्त्र ‘नेमक्या अमुक कंपनीत नोकरी मिळेल’ हे सांगण्यास असमर्थ आहे. आता या मुद्द्यावर काही के.पी. नक्षत्र शिरोमणी चवताळून उठतील! ‘उत्तर देता येत नाही असे कसे म्हणता… ‘इन्फोसीस मध्ये नोकरी मिळावी ही जातकाची इच्छा आहे ना मग लाभ स्थाना ‘सब’…”…………. हे मान्य की लाभ स्थानाचा ‘सब’ आपल्याला जातकाची इच्छा पूर्ण होणार का नाही ते जरुर सांगेल पण हे करण्यापूर्वी जातकाची इन्फोसीस मध्ये नोकरी करण्याची ईच्छा कितपत प्रबळ आहे हे आपल्याला तपासायला पाहीजे ती तशी अत्यंत प्रबळ असेल तरच लाभाच्या सबची साक्ष काढण्यात अर्थ आहे.
समजा या जातकाला प्रतिप्रश्न केला (जो मी नेहमीच करतो)
“ते ठिक आहे पण समजा तुम्हाला इन्फोसीस मध्ये नोकरी मिळाली नाही तर काय?”
आता इथे जर जातकाने उत्तर दिले:
“इंफोसीस मध्ये नोकरी नाही मिळाली तर आत्महत्या करेन / संन्यास घेऊन हिमालयात जाईन”
अर्थात हे असले उत्तर मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असेल! विनोदाचा भाग बाजूला ठेवला तरी जातका कडून पुरेशा गांभिर्याने उत्तर मिळाले तर त्यातून जातकाची आत्यंतीक तळमळ दिसेल आणि मग ती आत्यंतीक इच्छा पूर्ण होईल का नाही हे प्रश्नकुंडली जरुर सांगेल (लाभाचा सब वापरायचा का कोणता हे तांत्रिक भाग जरा बाजूला ठेवा!)
पण जातकाने असे उत्तर दिले
“इन्फोसिस लय भारी कंपनी आहे म्हणून तिथे नोकरी करावीशी वाटते ,पण तिथे नाही मिळाली तर दुसर्या कोणत्यातरी चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली तरी चालेल ”
म्हणजे इथे ‘नोकरी मिळावी”’ हीच खरी इच्छा आहे , नोकरी ही खरी ‘पुरण पोळी ‘ आहे , बाकी ते ‘इन्फोसिस इ. केवळ ‘पुरणपोळी वरची तुपाची धार आहे”
जातक जेव्हा:
चांगली नोकरी
आर्थिक सुस्थिती
असे प्रश्न विचारतो त्यावेळी असाच प्रकार पाहावयास मिळतो.
मुळात ‘चांगली नोकरी’ ह्या बद्दल ज्योतिष शास्त्रात कोणतेही नियम / आडाखे नाहीतच. ज्योतिष शास्त्राच्या सहाय्याने काही अंदाज बांधायचा असेल तर आधी ‘चांगली नोकरी’ म्हणजे काय हे ठरवायला पाहीजे , केवळ ‘जातकाची चांगली नोकरी मिळण्याची इच्छा आहे’ इतके पुरेसे नाही. (हे त्या पाव हळकुंडने पिवळ्या झालेल्या के.पी. नक्षत्र शिरोमणींना कधी कळणार कोण जाणे? निघाले लगेच २,६,१०,११ तपासायला!) चांगल्या नोकरीची व्याख्या अनेक मार्गाने होत असते आणि व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती सापेक्ष असते. दरवेळेला ‘चांगली नोकरी = अधिक पैसा’ असे समीकरण नसते हे लक्षात घेतले पाहीजे. जातकाला प्रश्न विचारुन त्याची / तिची ‘चांगल्या नोकरीची व्याख्या’ समजाऊन घेऊन मग त्या अनुषंगाने प्रश्न तपासावा लागतो.
आर्थिक सुस्थिती हा तर सरळ सरळ ओपन एंडेड प्रश्न आहे. अधिक पैसा मिळावा ही इच्छा कोणाला नसते? रस्त्यावरच्या भिकार्यापासुन ते अंबानी पर्यंत , सगळ्यांचीच ती इच्छा असते ना? जेव्हा असा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा हा प्रश्ना आत्ताच का विचारला गेला यामागे काही ठोस कारण आहे का ते तपासुन मग ह्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते. मुळात अशा ओपन एंडेड प्रश्नाचे उत्तर देऊच नये , कारण असा प्रश्न विचारताना ‘ज्योतिषाने हो , नक्की येत्या सहा महीन्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे , इतकेच नव्हे तर वर्षभरात साक्षात लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरणार आहे’ अशा थाटाची उत्तरें देणे जातकाला अपेक्षीत असते. विनोदाचा भाग बाजूला ठेवला तरी, ‘तुमची आर्थिक स्थिती सुधारण्या ऐवजी आणखी खालावणार आहे’ असे उत्तर कोणाला आवडेल / कोणाकडे हे असले उत्तर स्विकारायची ताकद असते? काही वेळा तर ‘चपराश्याची नोकरी मिळण्याची सुद्धा लायकी नसताना, कलेक्टरची नोकरी मिळावी अशी इच्छा धरलेली असते’. इथे इथे मी चपराशाला कमी लेखत नाही तर दोन्ही नोकर्यांत पगार, अधिकार, मान, शैक्षणीक पात्रेतेचे निकष अशा अर्थाने मोठा फरक आहे हे मला सांगायचे आहे, तेव्हा कृपया कोणी गैरसमज करुन घेऊ नये. असे प्रश्न विचारताना काय उत्तर मिळाले पाहीजे हे आधीच ठरवून ठेवलेले असते! एखाद्या रोग्याने काय डॉक्टरांनी काय रोगनिदान करावे, कोणते औषध दिले जावे हे मनात ठरवूनच डॉक्टरांना भेटल्या सारखे आहे. म्हणुन असे प्रश्न हाताळू नयेत. ‘शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो भाकड’ अशातली गत होते.
असाच विचार एखादा प्रेमवीर ‘त्या अमुक तमुक मुलीशीच माझा विवाह होईल का’ असे विचारतो तेव्हा करता येईल. या प्रेमवीराला ‘ जर या मुलीशी तुझा विवाह होणार नाही असे उत्तर मिळाले तर काय करशील?” असा प्रश्न विचारुन पहा, त्याच्या चेहेर्यावरचे हावभाव, त्याने दिलेले उत्तर यातूनच आपल्याला कळेल हा प्रेमवीर किती सच्चा आहे. असा उलट सवाल करावा लागतच नाही, मुळ प्रश्न विचारते वेळेची त्याची देहबोलीच आपल्याला बरेच काही सांगून जाते. मुळात असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तिथेच लक्षात यायला हवे की ‘हे प्रेम एकतर्फी आहे, केवळ विश फुल थिंकिंग आहे , स्वप्नरंजन आहे, हवेतला मनोरा आहे” कारण खरा प्रेम करणारा असा प्रश्न विचारायला ज्योतिषाकडे जात नाही, घरच्यांनी परवानगी दिली नाही तर सरळ पळून जाऊन आळंदीला श्री. माऊलींच्या साक्षीने लग्न करुन मोकळा होतो.
असो अशी अनेक उदाहरणें देता येतील ..
शेवटी आजच्या लेखाचा सारांश:
- येईल त्या जातकाच्या प्रश्नांची उत्तरें देत बसू नका, विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे ज्योतिषावर बंधनकारक नाही.
- विचारलेल्या प्रश्ना बाबत जातक किती गंभिर आहे, त्या प्रश्नात त्याची भावनिक गुंतवणूक किती आहे, प्रश्न किती तळमळीने विचारला हे ठरवल्या शिवाय प्रश्नाला हात घालू नये
- जातकाला प्रतिप्रश्न विचारुन , प्रश्ना मागची पार्श्वभुनी तपासून प्रश्ना मागचे गांभिर्य , तळमळ इ, बाबी तपासुन घेता येतात. जातकाची देहबोलो (बॉडी लँग्वेज) आपल्याला बरेच काही सांगून जाते.
- केवळ क्षुल्लक आर्थिक लाभापायी अयोग्य प्रश्नांची उत्तरे देत बसून आपली विश्वासार्हता कमी करुन घेऊ नये.
असो, यावर लिहण्या सारखे बरेच आहे, याच विषयावर आणखी एक लेख लिहून तयार आहे तो लौकरच प्रकाशीत करत आहे..
सध्या इथेच थांबतो.
शुभं भवतु
- काटा रुते कुणाला .. किस्सा – ३ - March 27, 2018
- काटा रुते कुणाला .. किस्सा – २ - March 26, 2018
- काटा रुते कुणाला .. किस्सा – १ - March 25, 2018
- जय खतंजली ! - March 24, 2018
- बळीचा बकरा भाग – ३ - March 23, 2018
- बळीचा बकरा भाग – २ - March 22, 2018
- बळीचा बकरा भाग – १ - March 21, 2018
- असे जातक येती – ११ - March 19, 2018
- वेबसाईट चे नवे रुप ! - March 18, 2018
- 6020 चा योगायोग - March 12, 2018