जातकांच्या काही तक्रारी आणि त्याबद्द्लचा माझा खुलासा

आता व्यवसाय म्हणले की जातकांच्या तक्रारी अधून मधून येणे स्वाभाविकच. जातकाची कोणतीही , कसलीही, कितिही लहान सहान तक्रार असो , मी अत्यंत गांभिर्याने घेतो, हातातली सर्व कामें बाजूला सारुन त्याकडे तातडीने लक्ष देतो.  काहीजण तक्रार करतात, काही जण न बोलता गप्प बसतात, तर काहीं अकारण गैरसमज करुन घेतात. काहीजण ईतर लोकांनी क्षुद्र हेतुने केलेल्या अपप्रचाराला बळी पडले असल्याची शक्यता आहे,

तेव्हा या ब्लॉग पोष्ट द्वारे एकच एक कॉमन खुलासा करुन देणे मला उचित वाटते.

तक्रार 1: आम्ही संपर्क फॉर्म भरुन दिला पण यांचे उत्तर आलेच नाही…

आपण जेव्हा संपर्क फॉर्म (जो ब्लॉग च्या होम पेज वर उजव्या हाताला , सगळ्यात वर आहे) भरता तेव्हा माझा ब्लॉग ज्या वर्डप्रेस माध्यमातून तयार झाला आहे , त्यांच्या कडून मला एक ईमेल येते, त्या ईमेल मध्ये आपण भरलेली सर्व माहीती व आपला मेसेज अशी माहीती येते.
अशी आलेली प्रत्येक मेल मी स्वत: व्यक्तीश: वाचतो आणि त्याच दिवशी त्या ईमेलला माझे उत्तर जातेच. जर मी प्रवासात असेल तर अगदी क्वचित वेळेस एखादा दिवस जास्त लागला असेल नसेल. पण उत्तर गेले नाही असे होणारच नाही. तेव्हा 2-3 दिवसांत माझ्या कडून उत्तर मिळाले नाही तर खुषाल समजा की आपली ईमेल माझ्या पर्यंत पोहोचलेलीच नाही, हे मी अत्यंत आत्मविश्वासाने लिहतोय, उत्तर द्यायला उशीरा होणे ही बाब मी फार गांभिर्याने घेतो.
आपण दिलेल्या ईमेल पत्त्या मध्ये टायपिंग ची चूक असेल तर मी आपल्याला पाठलेली ईमेल पता सापडत नाही म्हणून परत येते (बाऊंस) , मी अशा वेळी पुन्हा एकदा प्रयत्न करतो. त्याही वेळा ईमेल बाऊंस झाली तर मला काहीच करता येत नाही कारण आपल्याशी संपर्क साधायला माझ्या कडे मग कोणताच ईतर पर्याय उपलब्ध नसतो.

उदाहरण द्यायचे तर , 15 डिसेंबर 2014 रोजी मुंबैच्या सौ. मनीषा (सचिवालय) यांनी संपर्क साधला होता, पण त्यांचा ईमेल अॅड्रेस बरोबर नसल्याने चार वेळा उत्तर पाठवून ही काही उपयोग झाला नाही. सौ. मनीषा जर ही पोष्ट वाचत असतील तर त्यांनी पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट फॉर्म व्यवस्थित अचूक भरुन पाठवावा ही विनंती, त्यांना त्याच दिवशी माझ्या कडून उत्तर मिळेल याची हमी.

तक्रार 2: फार वेळ लावतात हो… दोन दिवसात रिपोर्ट देतो म्हणाले आणि आठ -दहा दिवस घेतले..

ह्याला अनेक कारणें आहेत. ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्वड’ ‘प्रथम येईल त्याला प्राधान्य’ ह्या सुत्रा नुसार मी आलेली कामे हाताळत असतो. बर्‍याचवेळा होते असे की आपण जेव्हा प्रश्न विचारलेला असतो नेमक्या त्याच वेळी माझ्या हातात बरीच कामे असतात, साहजिकच जर आपल्याला नेहमीपेक्षा जास्त वेळ प्रतिक्षा करायला लागते.

माझे काम केवळ मीच करतो, हाताखाली नोकर / असीस्टंट्स ठेऊन करत नाही (किंवा तसे केलेले आपल्यालाही रुचणार नाही) , मी एका दिवसात किती कामे करु शकेन यालाही काही नैसर्गिक मर्यादा आहेच. हे कमालीचे इंटेन्स , बौद्धिक स्वरुपाचे काम असल्याने थकवा लौकर येतो, वाचन , लिखाण, फोन वर बोलणे , संगणकाच्या प्रखर , भगभगीत स्क्रिन कडे सतत पाहावे लागणे या सार्‍या गोष्टींचा मेंदू वर, डोळ्यांवर कमालीचा ताण येतो, दर तासा दोन तासांनी दहा पंधरा मिनिटांची सक्तीची विश्रांती घ्यावीच लागते अन्यथा तब्बेतीवर आणि कामाच्या दर्जावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. त्यातच मी सॉफ्ट्वेअर कन्सलटंट / कार्पोरेट ट्रेनर म्हणून कामे करत असल्याने त्या कामांनाही वेळ द्यावा लागतो.काही वेळा सॉफ्ट्वेअर मध्ये मोठ्या समस्या आल्या तर मला तातडीने बेंगलोर ला जावे लागते.

काही वेळा एखाद्या जातकाचे काम अगदी तातडीचे असल्याने (उदा: हरवलेल्या वस्तू , व्यक्ति चा शोध) बाकीची कामे बाजूला ठेऊन ते करावे लागते. माझ्या क्लायंटस मध्ये ‘सेलेब्रिटी’, ‘वजनदार राजकारणीं’ आणि ‘भाई’ पण आहेत, त्यांची कामे मला प्राधान्याने करावीच लागतात, त्या बाबतीत माझा अक्षरश: नाईलाज असतो.

माझ्या कोटेशन मध्ये मी साधारण एका प्रश्ना साठी दोन – तीन दिवस असा उल्लेख केलेला असतो तो काहीतरी निश्चित कालमर्यादा असावी , समय मर्यादेचे थोडेसे बंधन माझ्यावर असावे या हेतुनेच, ही अशी काही मुदत आखून घेतल्यानेच कामाची म्हणून एक शिस्त निर्माण होते, एक वायदा केलेला असल्याने त्याच दबाव / अंकुश मनावर कायम राहतो व ‘बघू रे सावकाश, काय गडबड आहे’ अशी टंगळमंगळ होत नाही. पण ही कालमर्यादा केवळ एक अंदाज असतो , काही वेळा जास्त वेळ ही लागू शकतो, पण ‘दिवसांचे’ आठवडे किंवा ‘आठवड्यां’ चे ‘महिने’ असा प्रकार सहसा होत नाही.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्योतिषविषयक काम काहीसे ‘कला-कौशल्य’ या सदरात मोडते. गणिताने केवळ पत्रिका बनते बाकी काहीही होत नाही, पत्रिकेतल्या ग्रहांचा अन्वयार्थ लावायला एकाग्रता, मूड, इंट्यूइशन, शकून, प्रतिभा, दैवी मदत या सार्‍यांची नितांत आवश्यकता असते. वरवर जरी “हे त्यात काय पत्रिका घ्यायची, गुरु कोणत्या राशीत , भावात बघायचे आणि सांगायचे ” असे सोप्पे वाटले तरी तसे ते नाही. काही वेळा ग्रह योगांचा नेमका अर्थ लावणे, पत्रिकेतला कोणता ग्रह हा ‘डिल मेकर / डिल ब्रेकर ‘ ठरणारा आहे, कोणती अंतर्दशा / विदशा फळ देणार आहे इ. गोष्टीं गणिताने ठरवता येत नाहीत ना तर्काने त्यासाठी ‘इंटीइश्यून’ च लागते.

पत्रिका समोर येताच मी त्याकडे काही क्षण अत्यंत एकाग्र चित्ताने पाहातो. जर ती पत्रिका बघायची तीच योग्य वेळ असेल तर मला काही संकेत मिळायला सुरवात होते, काही संवेदना होतात, मेंदूतल्या रसायनांचा काही अतर्क्य खेळ सुरु होतो, आता हे मला नेमक्या शब्दात सांगता येत नाही पण मला ते जाणवते. हा माझ्या गुरुंचा आशीर्वाद आहे असे मी मानतो. आणि जेव्हा अशा संवेदना पुरेशा तीव्र होतात तेव्हाच मी  त्या पत्रिकेवर काम चालू करतो आणि न थांबता , एकाच बैठकीत (सेशन) काम पूर्ण होते. पण असे संकेत / संवेदना जर मिळाल्या नाहीत तर मात्र मी लगेच ती पत्रिका बाजूला ठेवतो, दुसर्‍या कोणत्यातरी पत्रिकेवर काम चालू करतो. माझी ही पद्दत काहीजणांना विचित्र वाटेल पण तशी ती आहे हे मात्र खरे.

होरारी (प्रश्न कुंडली) चे असेच आहे आतून प्रेरणा मिळते “अरे , आत्तच्या आत्ता ह्या अमुक तमुक प्रश्नासाठी कुंडली मांड, हीच ती वेळ आहे , चांगले मार्गदर्शन मिळण्याची’ मी काही वेळा तर चक्क झोपेतुन जागे होऊन रात्री दोन – अडीच वाजता सुद्धा प्रश्नकुंडल्या मांडल्या आहेत.

थोडक्यात सांगायचे तर हे काम ‘कार वॉश’, ‘लॉन्ड्री’ ‘गवंडी काम’ अथवा ‘पापड लाटणे’ , ‘भिंत रंगवणे ‘ असे यांत्रिकी पद्धतीचे नाही, (ही कामें कमी दर्जाची आहेत असे मी म्हणत नाही कृपया तसा गैरसमज करुन घेऊ नका). या यांत्रिकी पद्धतीच्या कामाला किती वेळ लागेल ह्याचा आगाऊ अंदाज बांधणे सहज शक्य असते आणि त्यात फारशी चूक होत नाही. मला मात्र एखाद्या पत्रिकेच्या अभ्यासाला किती वेळ लागेल हे आधीच ठरवणे खरोखर अवघड असते.

तक्रार 3अ: रिपोर्ट मिळाला पण सात – आठ ओळींतच गुंडाळले हो सगळे..

माझा ज्योतिष विषयक मार्गदर्शन पर रिपोर्ट संक्षिप्त असतो, जातकाने विचारलेल्या प्रश्नांची नेमकी उत्तरें असे त्याचे स्वरुप असते. जर जातकाने ‘विवाह योग कधी’ असा प्रश्न विचारलेला असेल तर रिपोर्ट मध्ये तेव्हढेच उत्तर असते “विवाह योग …. या कालावधीत आहे ‘ यापेक्षा जास्त मी काही लिहीत नाही, कारण जातकाला जे हवे असते ते त्यात समाविष्ट असतेच असते.

काही ज्योतिषी रिपोर्ट मोठा दिसावा ह्या साठी ‘तुमचा गुरु अमुक ठिकाणी आहे, त्याची दृष्टि अमक्यावर आहे, तुमची ही महादशा आहे, यंव ग्रहाचा सबलॉर्ड त्यंव आहे , या भावाचे कार्येश अमुक आहेत आणि तो ग्रह या या भावांचा कार्येश आहे ‘ अशी जडजंबाल वर्णने करुन रिपोर्ट ची पाने भरत असतात. यातले काहीही जातकाला कळणार नसते, ज्याला कळते तो एक ज्योतिषीच असू शकतो , मग तो माझ्या कडे कशाला येईल?

दुसरे म्हणजे पत्रिकेचा अभ्यास करताना मी अनेक घटक विचारात घेतले असतात, अनेक सुत्रे वापरलेली असतात, सर्वच त्या रिपोर्ट मध्ये लिहायचे तर पानेच्या पाने भरतील आणि जातकाला मग त्याच्या प्रश्नाचे उत्तर त्यातून हुडकून काढावे लागेल.

काही वेळा ज्योतिष विषयक तांत्रीक माहीती देणे त्रासदायक ठरते, होते काय , काही जातक माझा रिपोर्ट दुसर्‍या ज्योतिषापुढे नाचवतात मग तो ज्योतिषी त्यावर काहीबाही कॉमेंट करतो, पिचकारी टाकतोच टाकतो, “ह्या , त्याला काय कळतेय, बच्चा आहे तो, हे असे नाही…ते तसे नाही… ह्याला कसलाही आधार नाही… अमका मुद्दा महत्वाचा नाही आणि तो मुद्दा चुकीचाच आहे “ इ. त्या ज्योतिषाला हे करावेच लागते, त्याशिवाय तो आणि त्याची कार्य पद्धतीं सरस कशी ठरणार ! एका सराफाच्या सोन्या बद्दल दुसरा सराफ काय बोलतो ते प्रत्यक्षातच पहा म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल. प्रकरण एव्हढ्यावरच संपत नाही, मग हे जातक परत माझ्याकडे येऊन वाद घालतात.. “का हो, तुम्ही असे म्हणालात आणि ते अमके तमके ज्योतिषी तर असे म्हणताहेत” झाले म्हणजे आता दोन ज्योतिषांत जुंपली. एका जातकाने अक्षरश: तसे केले होते, माझ्या समोरच त्या दुसर्‍या ज्योतिषाला फोन करुन “बोला ह्या अमक्या तमक्या शी, ते काय म्हणताहेत बघा , द्या त्यांना उत्तर..“ असे म्हणत बळेच हॅंडसेट माझ्या हातात कोंबला होता!!

मी जे जे काही लिहीतो, बोलतो ते माझ्या अभ्यासावर , अनुभवावर आधारित असते , त्या दुसर्‍या ज्योतिषाची काम करायची पद्धत वेगळी असेल, त्याचा अनुभव वेगळा असेल, सांगायची शैली वेगळी असेल.  पण म्हणून कोणाही दुसर्‍या ज्योतीषाशी ‘मी बरोबर का तू ‘ असा वाद विवाद घालत बसलो तर मला इतर कामें करायला वेळच मिळणार नाही !

याचा अर्थ मी कोणाला घाबरतो असे नाही, वेळ पडली तर माझ्या रिपोर्ट मधल्या प्रत्येक मुद्द्द्यांवर तासा तासाची लेक्चर देण्याची क्षमता मी राखून असतो, पण म्हणून कोणाही सोम्यागोम्याशी निरर्थक वाद घालत बसणे हे माझ्या काळ-काम-वेगाच्या गणितात बसणार नाही, असा वेळ घालवणे मला आर्थिक दृष्ट्या परवडणार नाही. ज्योतिष सांगणे हा माझा व्यवसाय आहे , हा काही फावल्या वेळेचा छंद / टाइमपास / रिटायरमेंट् नंतरचा विरंगुळा नाही, व्यवसायाची म्हणून काही अवधाने , पथ्ये असतात ती मला पाळावीच लागतात.

दोन ज्योतिषांत एकवाक्यता असणे तसे दुर्मिळच त्यामुळे दोघांच्या भाकितां बाबता तुलना करणे ,  घटना घडायच्या आधिच सरस – निरस ठरवणे हास्यास्पद होईल, ज्याचे भाकित बरोबर येईल तो चांगला हेच शेवटी खरे ना?

तिसरा मुद्दा , मी काही खास ज्याला शिक्रेट म्हणता येईल अशा पद्धतीं वापरतो, त्या मला माझ्या गुरुंनी शिकवलेल्या आहेत, त्या अशा सहज उघड करुन सांगण्या सारख्या नाहीत. हे काहीसे कोकाकोला / लिज्जत पापडां सारखे समजा. तुम्ही जेव्हा कोकाकोला / लिज्जत पापड विकत घेता तेव्हा त्या कंपन्यां त्याचा फॉर्म्युला सांगतात का? नाही ना, मग हे तसेच आहे. ज्यासाठी पैसे मोजले तो कोकाकोला / लिज्जत पापड मिळाले हे महत्वाचे. रेल्वेच्या प्रवासाचे तिकीट काढले म्हणजे आख्खी रेल्वे विकत घेतली असे होत नाही ना?

तक्रार 3ब: रिपोर्ट मिळाला पण काही उपाय नाहीत, तोडगे नाहीत, मग यांच्या कडे कशाला जायचे पैसे खर्चून ज्योतिष बघायला….

खरे तर ही तक्रार होऊच शकत नाही कारण माझ्या कोटेशन मधल्या ‘स्कोप ऑफ सप्लाय’ मध्येच मी स्पष्ट्पणे नमूद केलेले असते की मी कोणतेही उपाय, तोडगे (ज्यात खडे, रत्ने, माळा, रुद्राक्ष, पूजा, जप, यंत्रे , मंत्र , तंत्र ) असले काही सुचवत नाही.

माझ्या मते हे सर्व भाकड आहे, चक्क लूटालुट आहे. मी माझ्या मागच्या एका ब्लॉग पोष्ट वर लिहले आहे , ह्या सर्व उपायात अशी कोणतीही ताकद नाही जी तुमच्या समस्या आपोआप दूर करु शकेल.

ह्जार बाराशेचा गारगोटीचा (किंवा प्लॅस्टीकचा) तुकडा तुमचे काहीही चांगले वाईट करु शकत नाही हे लक्षात घ्या. माझ्या कडे जयपूर (राजस्थान) आणि भोपाळ (मध्यप्रदेश) मधल्या खड्यांच्या व्यापार्‍यांची कोटेशन्स आहेत , रुपये 300 मध्ये खडा देतो (होलसेल रेट) तुम्ही तो आरामात रुपये 3000 ला विकू (गळ्यात मारु) शकता !  आता बोला,  हे लोक मला तो खडा 300 मघ्ये (घरपोच) विकू शकतात तर त्या खड्याची मूळ किंमत  किति असेल ?  20-25 रुपये फक्त , आता हे असले 20-25 रु चे कचकडे तुमचे कसले हो भले करणार आहे , जरा विचार करा !

वादा साठी मान्य करु की असल्या खड्यांत काही ताकद असू शकते तर मग तो खडा अतिशय शुद्ध स्वरुपातला असल्याने कमालीचा दुर्मिळ असेल, साहजीकच अशा खड्याची  किंमत काही लाख रुपयात जाईल, आहात कोठे!

तीच गत एखाद्या ग्रहा च्या जपाची. मुळात हे ग्रह तुमच्या आयुष्यात घटनां घडवून आणत नाहीत हे लक्षात घ्या. ग्रह हे घडणार्‍या घटनांचे  एक प्रकारचे संकेत आहेत / सिग्नल सारखे म्हणून काम करतात. घटना घडवणे / न घडवणे हे त्या ग्रहांच्या हातात नसते. त्यामुळे अमुक्र ग्रहाची ‘दशा’ चालू आहे , कर त्याचा जप, होशील सुखी असे जे सांगीतले जाते ते भाकड आहे ! मुळात हे ग्रह हे दगड-माती आणी विषारी वायूंचे गोलक आहेत, त्यांना तुमचा जप कळणार नाही, तुमच्या जपाचा त्यांच्यावर ठिम्म परिणाम होणार नाही. राहू-केतू तर चक्क गणिताने सिद्ध केलेले पृथ्वी आणी चंंद्राच्या भ्रमण कक्षेचे छेदन बिंदू आहेत, त्याचा कसला जप करताय ! शनीला तेल, उडीद वाहून काहीही होणार नाही. कोणी कितिही काहीही म्हणो.

मग ह्या उपायांचा काहींना लाभ झालाय त्याचे काय ? अहो, हे जप वगैरे प्रकरण मूळातच  कळत-नकळत केलेली ‘ध्यान धारणा’ आहे, त्याचा तुमच्या अंतर्मनावर काहीसा परिणाम होतो,मी जप करतोय ना , आता माझे सगळे चांगले होणार असे मनोबल मिळते बस ह्या केवळ ‘प्लॅसेबो’ इफेक्ट नेच झालाच तर काही फायदा.तुम्हाला ‘जप’ करायला वेळ नाही ? काळजी नको. आम्ही तुमच्या नावाने संकल्प सोडून दुसर्‍या कडून तुमच्या साठी ‘जप’ करवून  घेतो ही तर 100% शुद्ध फसवणूक आहे. लूटालूट आहे. अहो, तुमचे औषध दुसर्‍याने घेतले तर तुम्हाला कसा गुण येईल हो? जरा विचार करा,

या सार्‍यांचा काहींना उपयोग झाला असे छातीठोक पणे सांगीतले जाते, पण हा एक ‘प्लॅसेबो’ इफेक्ट आहे, बाकी काहीही नाही. मी अमुक जप , अमुक वेळा करतोय, ह्या खड्याची अंगठी घातलीय आता माझ्या समस्या दूर होणार , आता माझे सर्व चांगले होणार असे आपल्याला वाटत राहाते, कारण तसे ते असले उपाय सुचवणार्‍या  व्यक्तीने तुमच्या मनावर बिंबवलेले असते ना ! त्याचा कळत नकळत आपल्या अंतर्मनावर परिणाम होत राहातो आणि त्यामुळे मनाला किंचीतशी उभारी येते , बास, ह्या पलीकडे काहीही होत नाही. मग त्यासाठी हजारों रुपये खर्च करायचे कशाला ? रस्त्याच्या कडेला पडलेला कोणताही गारेचा तुकडा बास होईल त्याला !  हीच कथा ईतर उपायांची,  नारायण नागबळी काय आणि यंव पूजा काय , अहो, हजारों रुपयांना लूट्तात तुम्हाला , अजिबात करु नका हे असले काही. ह्या सर्वात फायदा होतो ते उपाय सुचवणार्‍याला, ते 300 चे  3000  लक्षात आहे ना?

या उपाय सुचवणार्‍यांची एक खास कार्यपद्धती असते (मोडस ऑपेरेंडी) असते बघा:

प्रथम तुम्हाला काहीतरी भिती  घालायची , हा ग्रह वाईट्ट आहे , ती तमकी महादशा जबरदस्त वाट लावणार आहे , हा ग्रह योग तुम्हाला रसातळाला नेणार  आहे , इथे पासुन ते याचा शाप आहे , त्याचा तळतळाट लागलाय , साडेसाती आणि पनवती, त्यांनी ही भागले नाहीच तर गेल्या जन्माची पापकर्में आहेतच बोकांडी बसलेली! आता काय बिशाद आहे तुमची नाही म्हणायची.

सावज घाबरले की आपोआपच विचारते ,  “महाराज याला काय उपाय?” . मग सिंहा पुढे कोवळे हरीण आल्यावर जे काय होईल तेच होणार हो तुमच्या बाबतीत !

धोक्याचा झेंडा: खडे , यंत्रे , पूजा आमच्या कडूनच घ्या, नारायण नागबली ची आम्हीच सगळी सोय करतो , आमचे ओळखीचे गुरुजी आहेत त्र्यंबकेश्वराला , लगेच काम होईल, यथासांग होईल , थांबावे लागणार नाही… असे जेव्हा सांगीतले जाते तेव्हा ओळखा ‘कमीशन, किक बॅक, रेफेरल बोनस, व्हॅल्यू अ‍ॅडिशन, कट प्रॅक्टीस, चेन मार्केटिंग, दलाली ‘ सगळे सगळे चालू आहे,  300 चे 3000 करणे चालू आहे!

या वेळे पर्यंत तुमचे पैसे पाकिटातून बाहेर आलेले असतातच , पण तसे नाही झाले म्हणजे तुमची तयारी अजून झाली नाही असे त्यांच्या लक्षात  येते , मग आणखी भिती घालणे चालू होते, किंवा त्या अमक्याने हा उपाय केला त्याला हा फायदा झाला , त्या दुसर्‍याने यंव केले  त्याला त्यंव लाभ झाला अशा ‘बिफोर आणी आफ्टर’ ची सरबत्ती सुरु होते. टकला वर केस उगवण्या साठीची औषधे विकणारे असेच काहीतरी बोलत असतात ना?

शेवटी  श्रद्धेने , विश्वासाने केले तरच लाभ होईल .. असा डिसक्लेमर टाकलेला असतोच!

पुढ्यातल्या समस्या सोडवायचा हा मार्ग नाही !!  योग्य दिशेने केलेले प्रयत्नच तुम्हाला यश देतील , तुम्हीच आहात तुमच्या यशाचे शिल्पकार, खडे , यंत्रे असले शॉर्ट्कट चालणार नाहीत, तिथे प्रयत्नच पाहीजेत, आणि असे प्रयत्न कसे , केव्हा , कोठे करायचे एव्हढेच  ज्योतिषशास्त्रा द्वारे जाणून घ्या. वाटल्यास  शास्त्रशुद्ध ‘ध्यानधारणा ‘  (विपश्यना, T.M, रामदेव बाबांचे आलोम विलोम, कपालाभाती .इ.) शिकून घ्या , त्याचा चांगला फायदा होईल.

मी म्हणूनच उपाय , तोडगे सुचवत नाही, काही खास केसेस मध्ये , काही वेळा जातकाची हळवी . डिस्टर्बड मन;स्थिती लक्षात आल्यावर काही वेळा मी अगदी साधे उपाय ज्यात पैसे खर्च करायला लागणार नाहीत असे सुचवले ही आहेत, पण ते एका  सायकॉलॉजीकल थेरपी सारखे बाकी काही नाही.  आपण एखाद्या लहान मुलाची काहीतरी सांगून समजूत घालतो ना तसलाच हा लुटुपुटीचा प्रकार,  काही वेळा करावा लागतो मला.

आताशा मी तेही करायचे बंद केले आहे! सबब , माझ्या रिपोर्ट मध्ये मी कोणतेही उपाय सुचवत नाही.क्षमस्व !

तक्रार 4: रिपोर्ट मिळाल्याच्या सात दिवसातच त्यावर खुलासा मागायचा , नंतर मागीतला पुन्हा पैसे घेतात म्हणे..

मी रिपोर्ट पाठवल्यावर एक अर्ध्या तासाचे मोफत फोन कन्सल्टेशन देतो, त्याचा उपयोग जातकाने त्या रिपोर्ट संदर्भात काही शंका असल्यास किंवा काही जादा खुलासा हवा असल्यास तो विचारण्यासाठी करावा ही अपेक्षा असते.

जेव्हा मी एखादे काम हातवेगळे करतो तेव्हा त्याचे सर्व तपशील माझ्या डोक्यात असतात, जर जातकाने रिपोर्ट मिळाल्या बरोबर लगेचच संपर्क साधला तर त्या केस बद्दल चे सर्व डिटेल्स, मी नेमका काय विचार करुन , काय सुत्रे वापरुन, कोणते आडाखे बांधून माझे निष्कर्ष काढले हे सर्व डोक्यात ताजे असल्याने लिंक लागायला फारशी अडचण येत नाही. पण जसा जसा काळ लोटतो तसे ह्या गोष्टी माझ्या विस्मरणात जातात. आता जर कोणी रिपोर्ट पाठ्वल्यानंतर महिन्या भराने त्या बद्दल विचारु लागला तर मात्र मला  पुन्हा एकदा सर्व तपशील आठवावे लागतात, त्याला वेळ लागतो, काही वेळा हे एक नविन केस हाताळल्या सारखेच होते, पहिल्या वेळी जेव्हढा वेळ गेला तेव्हढा नसला तरी , किमान त्याच्या अर्ध्या इतका तरी वेळ लागतोच, पण या जादाच्या कामाचे वेगळे मानधन मात्र जातक द्यायला तयार नसतो, माझा मुद्दा त्याच्या लक्षातच येत नाही. एका जातकाने तर चक्क सहा महिन्या पूर्वी पाठवलेल्या रिपोर्ट बद्दल “.. हे काय लिहले ते कळले नाही , जरा समजाऊन सांगता का ?” या साठी फोन केला होता, मग म्हणजे त्या सहा महिन्यात त्याने रिपोर्ट वाचलाही नव्हता असे समजायचे काय?

म्हणूनच मी सात दिवसांची मुदत घालून दिली आहे, त्यानंतरही कोणाला त्या रिपोर्ट बद्दल खुलासा हवा असेल तर मी आनंदाने देईन पण ती एक नवी केस आहे असे समजून त्याचे रितसर (कदाचित काही डिसकाऊंट देऊन) मानधन घेऊन.

तक्रार 5: प्रत्यक्ष भेट एक तर देत नाहीत किंवा त्यासाठी अव्वाच्या सव्वा मानधन घेतात..

बरेचसे ज्योतिषी जातक समोर आला की लगोलग , आमने सामने  त्याची पत्रिका बनवून फटाफट उत्तरें देतात, हे लोक पत्रिका हातात धरल्या क्षणी धाड्धाड उत्तरें कशी काय देऊ शकतात याचे मला अजुनही कुतूहल आहे. मला मात्र कोणत्याही पत्रिकेचा सांगोपांग अभ्यास केल्या शिवाय उत्तरे देणे जमत नाही, आणि असा अभ्यास करायला मला तास दोन तास तरी लागतातच, आधी लिहल्या प्रमाणे काही गुंतगुंतीच्या ग्रहस्थितीं असता,  ‘इंटीईश्युन’ द्वारे मार्गदर्शन येण्याची वाट ही पाहावी लागते. हे सगळे जातक समोर बसलेला असतानाच्या अर्ध्या तासात करणे मला जमत नाही. त्यामुळे मी: ‘ जातक आला- पत्रिका घेतली- भविष्य सांगीतले’ अशा प्रकारे काम करु शकत नाही. जास्तित जास्त मी काय करु शकतो:  जातकाची माहीती व प्रश्न, फोन वा ईमेल द्वारा समजाऊन घेणे, नंतर माझ्या सवडीने पत्रिका बनवून , अभ्यास करुन , निष्कर्ष काढणे आणि हे सगळे झाल्या नंतरच काय ते जातकाला प्रत्यक्ष भेटीत मार्गदर्शन करणे.

जुन्या काळी ईमेल नव्हती, फोन सुद्धा सहजासहजी उपलब्ध नव्हते (BSNL च्या लॅन्डलाईन साठी तब्बल सहा सात वर्षाची वेटींग लिस्ट होती तेव्हा, 1997 नंतर हे चित्र बदलले) त्यामुळे ज्योतिषला प्रत्यक्ष भेटणे हाच एक पर्याय उपलब्ध होता. काहींना अजून त्याचीच सवय आहे, डॉक्टर ला भेटताच निम्मे बरे वाटू लागते तसे काहींना ज्योतिषाशी आमने सामने बातचित केल्या खेरिज समाधान वाटत नाही. तर काहींना त्यांची ग्राहाणीं ऐकवायला कोणीतरी हक्काचा श्रोता हवा असतो. काहींना आपले दु:ख दुसर्‍या समोर मोकळे केल्याने हलके वाटत असते. ह्याला ही माझी हरकत नाही, मी हे सर्व समजू शकतो पण प्रत्यक्षात अनुभव असा येतो:

लोक दिलेल्या वेळेला येत नाहीत, काहीजण तर येतही नाहीत आणि येत नसल्याचे कळवतही नाही. मी मात्र त्यांच्या साठी वेळ राखून ठेवलेला असतो आणि त्यांची वाट पहात ताटकळत बसलेला असतो.

दुसरा मुद्दा वेळेचा , जातक येणे, त्याचे आगत स्वागत करणे, काही वेळ जरा इकडचे तिकडचे बोलणे , भविष्य कथन , समारोप असे सगळे साधारण अर्ध्या पाऊण तासात उरकायला हवे , पण प्रत्यक्षात तसे होत नाही. एकदा का जातक समोरच्या खुर्चीत बसला की दोन दोन तास हलत नाही, कोणी आपली कर्म कहाणी सांगत बसतो तर कोणी तोच तोच मुद्दा पुन्हा पुन्हा विचारत राहतो.

काही बिलंदर तर आवळा देऊन कोहोळा काढण्यात पटाईत असतात, आडवळणाने , वळसे घेत , बोलण्यात गुंगवून , गाफिल ठेऊन , एका प्रश्नाच्या मानधनात चार प्रश्नांची उत्तरें मिळवायचा प्रयत्न करतात !

एक ना दोन, पण सभ्यतेच्या मर्यादांमुळे ‘आपले काम झाले , या आता ‘ असे मला म्हणता येत नाहीत. अजून तेव्हढा श्रुड बिझनेसमन झालेलो नाही.

माझा वेळ हा माझा कच्चा माल आहे, तो नाशवंत ही आहे.  प्रत्येक मिनीट न मिनीट माझ्या साठी मोलाचे आहे आणि, दिवसअख्रेर ह्या सार्‍याचा माझा मलाच हिशेब द्यावा- घ्यावा लागतो.  वेळ अशा तर्‍हेने  दवडला गेला आणि त्याचे मूल्य मला मिळाले नाही तर माझे नुकसान होते.

लग्न कधी होणार, नोकरी कधी मिळेल, परदेशगमनाचा योग आहे का, या अशा प्रश्नाला प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता नसते, ही कामे फोन वर किंवा ईमेलच्या माध्यमातून अगदी सहज होऊ शकतात. या अशा प्रश्नांना मी मानधन ही कमी घेतो, ह्या इकॉनमी पॅकेज मध्ये प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ देणे म्हणूनच परवडत नाही.

मी प्रत्यक्ष भेट सहसा देत नाही किंवा दिल्यास त्या साठी मी जादा मानधन घेतो ते याच साठी.

काही वेळा जातकाचा ( विषेषत: स्त्री जातकांचा) प्रश्न नाजुक असतो, त्याचा खासगीपणा जपावा लागतो, अशा वेळी मी निश्चीतच वेळ देतो आणि त्यासाठी कोणतेही जादा मानधन घेत नाही हे इथे नमूद करतो..

बाकी काही बारीक सारीक मुद्दे आहेत त्यांच्या बद्दल नंतर कधीतरी सवडीने.

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

5 प्रतिक्रिया

///////////////
 1. swapnil kodolikar

  छान विवेचन ! सर आपणास एक विचारू काय ? आपले गुरु कोण ? त्यांचे नाव काय ?

  0

 2. swapnil kodolikar

  आणि आपल्या इतका perfectionalist व्यवस्थित शिस्तबद्ध , बुद्धिवादी सायंटिफिक , प्रामाणिक, परखड पण तितकीच नम्रपणे मते मांडणारा कोणाचे मन न दुखावता स्पष्ट बोलणारा व्यक्ती किवा जोतिषी प्रथमच पहिला .

  0

  1. सुहास गोखले

   धन्यवाद स्वप्निलजी,

   मुळात मी एक इंजिनियर असल्याने त्या शिक्षणाचा प्रभाव माझ्यावर असणे स्वाभावीक आहे. मी अमेरिका सहीत अनेक देशात हिंडलो आहे, अमेरिकेत माझे सात वर्षे वास्तव्य होते त्याचा ही जाणवण्या इतका प्रभाव माझ्यावर आहे. आज कोणीही उटह्तो एखादे चोपडे वाचतो आणि स्वत: ला ज्योतिषी समजतो, बर्‍याच वेळा ज्योतिष हा एक बहाणा असतो त्याच्या आधारे खडे, माळा, यंत्रे, पूजा विकणे हा त्यांचा मूळ व्यवसाय असतो. मी असले उद्योग करत नाही.

   शुभेच्छा

   सुहास

   0

 3. swapnil kodolikar

  SIR AAPAN EKA PRASHNACHE UTTAR DILE NAHI ..

  आपले गुरु कोण ? त्यांचे नाव काय ?

  0

  1. सुहास गोखले

   मला कै. श्रीधरशास्त्री मुळ्ये यांचे मार्गदर्शन काही काळ लाभले , ते मुळचे नागपूर , त्यांचा मोठा मुलगा पुण्यात नोकरी निमित्त असत्ताना ते त्याच्या कडे यायचे तेव्हा आमची भेट व्हायची. पण हा सहवास फार काळ टिकला नाही कारण गुरुजींचे अकाली निधन झाले. त्यानंतर मात्र कोणी गुरु भेटले नाहीत, त्यामुळे ग्रंथ हेच गुरु मानून एकलव्या सारखी थोडीफार आराधना केली आहे.

   शुभेच्छा

   सुहास

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *